अभ्यास लेख ३६
गरजेची ओझी वाहा आणि बाकीची टाकून द्या
“आपण प्रत्येक ओझं . . . काढून टाकू या आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.”—इब्री १२:१.
गीत ३३ आपला भार यहोवावर टाक
सारांश a
१. इब्री लोकांना १२:१ प्रमाणे जीवनाच्या शर्यतीत धावत असताना अंतीम रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
बायबलमध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाची तुलना शर्यतीत धावण्याशी करण्यात आली आहे. या शर्यतीत जी व्यक्ती यशस्वीपणे अंतीम रेषा पार करते, तिला सर्वकाळच्या जीवनाचं बक्षीस मिळेल. (२ तीम. ४:७, ८) या शर्यतीत धावण्यासाठी आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, कारण अंतीम रेषा खूप जवळ आहे. जीवनाची ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांमध्ये प्रेषित पौलसुद्धा होता. आपल्याला ही शर्यत जिंकण्यासाठी कशामुळे मदत होऊ शकते हे त्याने ओळखलं. म्हणून त्याने आपल्याला असा सल्ला दिला: “आपण प्रत्येक ओझं . . . काढून टाकू या आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.”—इब्री लोकांना १२:१ वाचा.
२. आपण ‘प्रत्येक ओझं काढून टाकलं’ पाहिजे याचा काय अर्थ होतो?
२ पौलने जेव्हा म्हटलं की ‘आपण प्रत्येक ओझं काढून टाकलं पाहिजे’ तेव्हा एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणतंच ओझं घेऊ नये असं त्याला म्हणायचं होतं का? नाही. उलट त्याला असं म्हणायचं होतं, की ज्या गोष्टींचं ओझं वाहणं गरजेचं नाही असं प्रत्येक ओझं आपण काढून टाकलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या ओझ्यांमुळे आपल्या धावण्याचा वेग कमी होऊ शकतो आणि आपण थकून जाऊ शकतो. त्यामुळे जीवनाच्या शर्यतीत आपल्याला धावत राहायचं असेल, तर अशी अनावश्यक ओझी कोणती आहेत हे आपण लगेच ओळखलं पाहिजे आणि त्यांना काढून टाकलं पाहिजे. पण जी ओझी वाहणं गरजेचं आहेत तीच आपण काढून टाकली तर आपण या शर्यतीत धावण्यासाठी अपात्र ठरू. (२ तीम. २:५) मग अशी ओझी कोणती आहेत?
३. (क) गलतीकर ६:५ प्रमाणे आपण कोणत्या गोष्टींचा भार वाहिला पाहिजे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत आणि का?
३ गलतीकर ६:५ वाचा. पौलने म्हटलं की आपण काही गोष्टींचं ओझं वाहिलं पाहिजे. त्याने लिहिलं: “प्रत्येक जण स्वतःचा भार वाहील.” पौलला सांगायचं होतं, की देव त्याच्या प्रत्येक सेवकाकडून काही गोष्टींची अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षा त्याच्यासाठी दुसरं कोणी नाही तर फक्त तोच पूर्ण करू शकतो. आपला “स्वतःचा भार” वाहण्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत आणि आपण तो भार कसा वाहू शकतो हे आपण या लेखात पाहू या. तसंच गरज नसलेली ओझी कोणती आहेत आणि आपण ती कशी काढून टाकू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहू या. आपण जर स्वतःचा भार वाहिला आणि गरज नसलेली ओझी काढून टाकली तर आपल्याला जीवनाच्या शर्यतीत यशस्वीपणे धावता येईल.
आपण ज्यांचा भार वाहिला पाहिजे अशी ओझी
४. समर्पणाचं वचन पूर्ण करणं कठीण का नाही? (चित्रसुद्धा पाहा.)
४ आपण यहोवाला दिलेलं समर्पणाचं वचन. आपण जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं होतं, तेव्हा आपण फक्त त्याचीच उपासना करायचं आणि त्याची इच्छा पूर्ण करायचं वचन त्याला दिलं होतं. आपण हे वचन पाळलं पाहिजे. आपण यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जगणं ही जरी एक गंभीर जबाबदारी असली तरी ती कठीण नाही. कारण त्याची इच्छा काय आहे हे आपण ओळखावं आणि त्याप्रमाणे जगावं या क्षमतेनेच त्याने आपल्याला बनवलंय. (प्रकटी. ४:११) त्याने आपल्यामध्ये त्याला जाणून घेण्याची आणि त्याची उपासना करण्याची इच्छा घातली आहे. तसंच त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडणं शक्य होतं. आणि त्याची इच्छा पूर्ण केल्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो. (स्तो. ४०:८) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मुलाचं अनुकरण करतो तेव्हा आपल्याला ‘तजेलासुद्धा’ मिळतो.—मत्त. ११:२८-३०.
५. समर्पणाचं वचन पूर्ण करायला तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते? (१ योहान ५:३)
५ आपण हे ओझं कसं वाहू शकतो? दोन गोष्टींमुळे आपल्याला मदत होऊ शकते. पहिली, यहोवावर असलेलं तुमचं प्रेम वाढवत राहा. यहोवाने आत्तापर्यंत तुमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यावर तुम्ही मनन करू शकता आणि पुढे ज्या चांगल्या गोष्टी तो तुमच्यासाठी करणार आहे, त्यावरसुद्धा तुम्ही विचार करू शकता. यहोवावरचं तुमचं प्रेम जितकं जास्त वाढत राहील तितकं तुम्हाला त्याच्या आज्ञा पाळणं सोपं जाईल. (१ योहान ५:३ वाचा.) दुसरी गोष्ट म्हणजे, आपण येशूचं अनुकरण केलं पाहिजे. तो देवाची इच्छा यासाठी पूर्ण करू शकला कारण त्याने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिफळावर लक्ष केंद्रित केलं. (इब्री ५:७; १२:२) येशूप्रमाणेच मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवा. अशा प्रकारे तुम्ही देवावरचं तुमचं प्रेम वाढवत राहिला आणि त्याचं अनुकरण करत राहिला, तर तुम्हाला तुमच्या समर्पणाचं वचन पूर्ण करणं शक्य होईल.
६. आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण का केल्या पाहिजेत? (चित्रसुद्धा पाहा.)
६ आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या. जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण आपल्या नातेवाइकांपेक्षा यहोवावर आणि येशूवर जास्त प्रेम केलं पाहिजे. (मत्त. १०:३७) पण याचा अर्थ असा होत नाही, की आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं आणि देवाचं आणि ख्रिस्ताचं मन आनंदित करण्यात त्या आड येत आहेत असं समजावं. उलट, देवाचं आणि ख्रिस्ताचं मन आनंदित करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे. (१ तीम. ५:४, ८) असं केल्यामुळे आपण आनंदी होऊ. कारण यहोवाने आपल्याला अशा प्रकारेच बनवलं आहे, की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पार पाडल्यामुळे कुटुंब आनंदी होईल. जसं की, जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांचा आदर करतात, पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांना प्रशिक्षण देतात, तसंच मुलं जेव्हा पालकांच्या आधीन राहतात तेव्हा पूर्ण कुटुंब आनंदी राहतं.—इफिस. ५:३३; ६:१, ४.
७. आपण आपल्या कुटुंबातली जबाबदारी चांगल्या प्रकारे कशी पूर्ण करू शकतो?
७ आपण हे ओझं कसं वाहू शकतो? कुटुंबात तुमची कोणतीही जबाबदारी असली तरी, स्वतःच्या भावनांवर, तुम्ही ज्या संस्कृतीत वाढला आहात त्यावर किंवा स्वतःला जाणकार म्हणून घेणाऱ्या लोकांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका. तर बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांवर आणि त्यातून मिळणाऱ्या बुद्धीवर अवलंबून राहा. (नीति. २४:३, ४) तसंच, बायबलवर आधारित प्रकाशनांचासुद्धा वापर करा. त्यांमध्ये बायबलची तत्वं कशी लागू करायची याबद्दल व्यावहारिक सल्ले दिले आहेत. उदारहणार्थ, “कुटुंबासाठी मदत” या लेखमालिकेत बरीच उपयोगी माहिती दिली आहे. आज पती-पत्नींना, पालकांना आणि तरुणांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या लक्षात घेऊन ही माहिती तयार करण्यात आली आहे. b म्हणून तुमच्या घरातले लोक बायबलच्या सल्ल्यांप्रमाणे वागत नसले तरी तुम्ही त्या सल्ल्यांप्रमाणे वागायचा पक्का निश्चय करा. कारण तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होईल आणि तुम्हाला यहोवाचे आशीर्वाद अनुभवायला मिळतील.—१ पेत्र ३:१, २.
८. आपल्या निर्णयांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
८ आपण घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेणं. यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्याची भेट दिली आहे. आणि चांगले निर्णय घेतल्यामुळे आपल्याला आनंद व्हावा असं त्याला वाटतं. पण वाईट निर्णय घेतल्यामुळे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्यांपासून तो आपल्याला वाचवत नाही. (गलती. ६:७, ८) त्यामुळे जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो, अविचारीपणे काही बोलतो किंवा करतो तेव्हा त्याचे वाईट परिणाम आपण स्वीकारायला तयार असलं पाहिजे. आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे कदाचित आपला विवेक आपल्याला दोष देत असेल. पण आपण आपल्या चुकांसाठी जबाबदार आहोत हे माहीत असल्यामुळे आपण त्या कबूल करायला तयार होतो, त्या सुधारतो आणि त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेतो. या गोष्टी केल्यामुळे आपल्याला जीवनाच्या शर्यतीत धावत राहायला मदत होऊ शकते.
९. तुम्ही जर एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही काय करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
९ आपण हे ओझं कसं वाहू शकतो? जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारा. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही हे लक्षात असू द्या. आपण घेतलेला निर्णय बरोबर होता हे पटवून देण्यासाठी किंवा आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. उलट, आपली चूक मान्य करा आणि आहे त्या परिस्थितीत काय चांगलं करता येईल याचा विचार करा. जर तुम्ही केलेल्या एखाद्या चुकीबद्दल तुमचं मन तुम्हाला दोष देत असेल तर नम्रपणे यहोवाला प्रार्थना करा, आपली चूक कबूल करा आणि त्याच्याकडे क्षमा मागा. (स्तो. २५:११; ५१:३, ४) तुम्ही कोणाचं मन दुखवलं असेल तर त्याची माफी मागा आणि गरज असेल तर मंडळीतल्या वडिलांची मदत घ्या. (याको. ५:१४, १५) तसंच, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून काळजी घ्या. असं करत असताना तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की यहोवा तुम्हाला दया दाखवेल आणि तुम्हाला लागणारी मदत तो नक्की पुरवेल.—स्तो. १०३:८-१३.
आपण काढून टाकली पाहिजेत अशी ओझी
१०. अवाजवी अपेक्षा कशा प्रकारे आपल्यासाठी एक ओझं ठरू शकतात? (गलतीकर ६:४)
१० अवाजवी अपेक्षा. आपण जेव्हा इतरांसोबत स्वतःची तुलना करतो तेव्हा आपण स्वतःबद्दल अवाजवी अपेक्षा ठेवू लागतो, आणि हे आपल्यासाठी ओझं होऊ शकतं. (गलतीकर ६:४ वाचा.) आपण जर कायम असं करत राहिलो तर आपल्या मनात इतरांबद्दल ईर्ष्येची आणि स्पर्धेची भावना निर्माण होऊ शकते. (गलती. ५:२६) इतरांनी ज्या गोष्टी साध्य केल्या आहेत त्या मिळवण्यासाठी आपण जर आपल्या क्षमतांच्या आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केला तर आपलं नुकसान होऊ शकतं. शिवाय, “अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.” आणि विचार करा आपण जर अशा अपेक्षा ठेवल्या ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत तर मन किती निराश होईल! (नीति. १३:१२) असं केल्यामुळे आपली शक्ती कमी होऊ शकते आणि जीवनाच्या शर्यतीत धावायचा आपला वेग कमी होऊ शकतो.—नीति. २४:१०.
११. तुम्ही अवाजवी अपेक्षा ठेवायचं कसं टाळू शकता?
११ तुम्ही हे ओझं कसं काढून टाकू शकता? यहोवा आपल्याकडून जितकी अपेक्षा करतो त्यापेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा करू नका. यहोवा तुम्हाला असं काहीही करायला सांगणार नाही जे तुम्हाला जमणार नाही. (२ करिंथ. ८:१२) तसंच याची खातरी असू द्या, की तुम्ही जे काही करता त्याची तुलना यहोवा इतरांशी करत नाही. (मत्त. २५:२०-२३) तुम्ही मनापासून करत असलेली सेवा, तुमचा विश्वासूपणा आणि तुम्ही दाखवत असलेला धीर यहोवासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे नम्रपणे ही गोष्ट स्वीकारा की तुमचं वय, आरोग्य आणि परिस्थितीमुळे तुम्हाला म्हणावं तितकं करता येणार नाही. म्हणून आरोग्याच्या समस्यांमुळे एखादी नेमणूक पूर्ण करायला तुम्हाला जमत नाही तेव्हा बर्जिल्ल्यसारखं त्या नेमणुकीला ‘नाही’ म्हणायला तयार असा. (२ शमु. १९:३५, ३६) तसंच, मोशेसारखं मदत स्वीकारायला तयार असा आणि योग्य असेल तेव्हा इतरांवर जबाबदारी सोपवा. (निर्ग. १८:२१, २२) अशा प्रकारे, नम्र राहिल्यामुळे तुम्ही स्वतःकडून अवाजवी अपेक्षा करणार नाही आणि जीवनाच्या शर्यतीत थकून जाणार नाही.
१२. इतरांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी आपण जबाबदार असतो का? स्पष्ट करा.
१२ इतरांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी स्वतःला दोष देणं. आपण इतरांसाठी निर्णय घेऊ शकत नाही. तसंच इतरांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना जे वाईट परिणाम भोगावे लागतात, त्यांपासून आपण त्यांना वाचवू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या मुलाने किंवा मुलीने यहोवाची सेवा करायचं सोडून दिल्यामुळे पालकांना खूप दुःख होऊ शकतं; हे दुःख कदाचित त्यांना शब्दातही व्यक्त करता येणार नाही. पण त्यांच्या मुलांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी ते स्वतःलाच दोष देत राहिले तर हे त्यांच्यासाठी खूप मोठं ओझं ठरू शकतं. पण त्यांनी अशा प्रकारचं ओझं वाहावं, अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही.—रोम. १४:१२.
१३. मुलांनी चुकीचा निर्णय घेतला तर पालक काय करू शकतात?
१३ तुम्ही हे ओझं कसं काढून टाकू शकता? हे लक्षात घ्या, की यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेऊ देतो. यात त्याची सेवा करायची की नाही हा निर्णयसुद्धा सामील आहे. तुम्ही एक परिपूर्ण पालक नाही हे यहोवाला माहीत आहे. पण तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेण्यासाठी तुमच्या परीने होईल तितकं करावं असं त्याला वाटतं. तुमची मुलं जे निर्णय घेतील त्यासाठी ती स्वतः जबाबदार आहेत, तुम्ही नाही. (नीति. २०:११) तरीसुद्धा, पालक या नात्याने मुलांचा सांभाळ करताना कदाचित तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील. आणि त्याबद्दल तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. असं असेल तर तुम्हाला कसं वाटतं, ते यहोवाला सांगा आणि त्याच्याकडे क्षमा मागा. यहोवाला माहीत आहे, की तुम्ही मागे घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही. तसंच तुमच्या मुलांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना भोगाव्या लागणाऱ्या परिणामांपासून तुम्ही त्यांना वाचवलं पाहिजे अशी तो तुमच्याकडून अपेक्षाही करत नाही. पण जर तुमच्या मुलांनी त्याच्याकडे परत येण्यासाठी थोडा जरी प्रयत्न केला, तरी यहोवा त्यांना पुन्हा स्वीकारायला आतुर असेल.—लूक १५:१८-२०.
१४. मनात खूप जास्त प्रमाणात दोषीपणाची भावना असणं हे एका ओझ्यासारखं का आहे?
१४ आपल्या चुकांबद्दल स्वतःला सतत दोष देणं. आपण पाप करतो तेव्हा आपल्या मनात दोषीपणाची भावना सलत राहते. आणि हे साहजिक आहे. पण मनात खूप जास्त प्रमाणात दोषीपणाची भावना असणं, हे एक असं ओझं आहे जे आपण वाहत राहण्याऐवजी काढून टाकलं पाहिजे. पण आपल्या मनात दोषीपणाची भावना खूप जास्त प्रमाणात आहे, हे आपण कसं ओळखू शकतो? आपण जर आपलं पाप कबूल केलं असेल, त्याबद्दल पश्चात्ताप केला असेल आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून पावलं उचलली असतील, तर यहोवाने आपल्याला क्षमा केली आहे असा भरवसा आपण बाळगू शकतो. (प्रेषितांची कार्यं ३:१९) ही पावलं उचलल्यानंतरसुद्धा आपण स्वतःला दोष देत राहावं, असं यहोवाला वाटत नाही. कारण असं केल्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं, हे त्याला माहीत आहे. (स्तो. ३१:१०) आपण जर अशा भावनेमुळे खूप जास्त दुःखी झालो, तर आपण कदाचित जीवनाच्या शर्यतीत धावायचं सोडून देऊ.—२ करिंथ. २:७.
१५. जर तुम्हाला सतत दोषीपणाची भावना सतावत असेल, तर तुम्ही काय करू शकता? (१ योहान ३:१९, २०) (चित्रसुद्धा पाहा.)
१५ तुम्ही हे ओझं कसं काढून टाकू शकता? अतिप्रमाणात दोषीपणाची भावना सतावते तेव्हा यहोवा आपल्याला ‘खरोखर क्षमा’ करतो या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. (स्तो. १३०:४) मनापासून पश्चात्ताप करणाऱ्यांना जेव्हा तो क्षमा करतो तेव्हा तो असं वचन देतो, की तो “त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.” (यिर्म. ३१:३४) याचा अर्थ, आपण पश्चात्ताप केल्यानंतर यहोवा आपल्याला पूर्वी केलेल्या पापांसाठी जबाबदार धरणार नाही. म्हणून तुमच्या चुकांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात तेव्हा यहोवाने तुम्हाला क्षमा केलेली नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. तसंच तुमच्या चुकांमुळे तुम्हाला यहोवाची सेवा आधीसारखी करता येत नसली, तरी स्वतःला दोष देऊ नका. यहोवा तुमच्या पापांबद्दल विचार करत बसत नाही, आणि तुम्हीही तसं केलं नाही पाहिजे.—१ योहान ३:१९, २० वाचा.
जिंकण्यासाठी धावा
१६. जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींमधला फरक ओळखता आला पाहिजे?
१६ जीवनाच्या शर्यतीत धावत असताना आपण ‘अशा प्रकारे धावलं पाहिजे की आपल्याला बक्षीस मिळेल.’ (१ करिंथ. ९:२४) आपण कोणती ओझी वाहिली पाहिजेत आणि कोणती काढून टाकली पाहिजे, यातला फरक आपण ओळखला तर आपल्याला असं करणं सोपं जाईल. याची काही उदाहरणं आपण या लेखात पाहिली. पण इतरही काही ओझी आहेत ज्यांबद्दल आपण विचार केला पाहिजे. येशूने म्हटलं, की “अतिप्रमाणात खाणंपिणं आणि जीवनाच्या चिंता यांमुळे तुमचं मन भारावून जाईल.” (लूक २१:३४) हे आणि यासारखी इतर वचनं तुम्हाला जीवनाच्या शर्यतीत धावत असताना कुठे बदल करायची गरज आहे, हे ओळखायला मदत करतील.
१७. जीवनाची शर्यत आपल्याला जिंकता येईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो?
१७ आपल्याला जीवनाची शर्यत नक्की जिंकता येईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. कारण ती पूर्ण करायला यहोवा आपल्याला बळ देतो. (यश. ४०:२९-३१) त्यामुळे तुमचा वेग कमी होऊ देऊ नका! प्रेषित पौलचं अनुकरण करा. कारण त्याने बक्षीस मिळवायचा कसोशीने प्रयत्न केला. (फिलिप्पै. ३:१३, १४) ही शर्यत तुमच्यासाठी दुसरं कोणी धावू शकत नाही तर ती तुम्हालाच धावायची आहे. पण यहोवा तुम्हाला ती पूर्ण करायला मदत करेल. जी ओझी गरजेची आहेत ती वाहायला आणि जी गरजेची नाहीत ती काढून टाकायला तो तुम्हाला मदत करू शकतो. (स्तो. ६८:१९) यहोवा तुमच्या बाजूने उभा असल्यामुळे तुम्ही ही शर्यत धीराने धावू शकाल आणि जिंकूही शकाल!
गीत ६५ प्रगती करू या!
a जीवनाच्या शर्यतीत धावायला हा लेख आपल्याला मदत करेल. धावत असताना आपल्याला काही गोष्टींचं ओझं वाहणं गरजेचं आहे. यांमध्ये यहोवाला दिलेलं समर्पणाचं वचन, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आपल्या निर्णयांची स्वतः जबाबदारी घेणं या गोष्टी सामील आहेत. पण असंही होऊ शकतं, की आपण असं ओझं घेऊन धावत असू ज्यामुळे आपली गती कमी होऊ शकते. त्यामुळे आपण अशी अनावश्यक ओझी काढून टाकली पाहिजेत. पण ही ओझी नेमकी काय आहेत? या लेखातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
b jw.org वर “कुटुंबासाठी मदत” आणि “तरुणांसाठी सल्ला” या विषयांखाली तुम्हाला काही चांगले लेख मिळतील. जसं की, विवाहित जोडप्यांसाठी: “समस्यांवर चर्चा कशी कराल?” आणि “क्षमा का मागितली पाहिजे?” तसंच पालकांसाठी: “मुलांवर संस्कार कसे कराल?” आणि “वाद न घालता—तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला” आणि तरुणांसाठी: “कसा कराल मोहाचा सामना?” आणि “आईबाबांशी कसं बोलावं?”