व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३३

दानीएलच्या उदाहरणातून शिका

दानीएलच्या उदाहरणातून शिका

“तू देवाला खूप प्रिय आहेस.”​—दानी. ९:२३.

गीत ५५ भिऊ नको वैऱ्‍यांना!

सारांश a

१. बाबेलच्या अधिकाऱ्‍यांवर दानीएलची चांगली छाप का पडते?

 दानीएल संदेष्टा तरुण होता तेव्हा बाबेलचे लोक त्याला यरुशलेमपासून खूप लांब बाबेलला आणतात. पण दानीएलची त्याला बंदी बनवणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांवर खूप चांगली छाप पडते. ते फक्‍त त्याचं “बाहेरचं रूप” पाहतात आणि त्यांना असं दिसतं की तो ‘खूप देखणा आहे आणि त्याच्यात कोणताही दोष नाही.’ तसंच, तो एका उच्च घराण्यातून आहे, हेही त्यांना समजतं. (१ शमु. १६:७) या कारणामुळेच दानीएल राजमहालात काम करायला योग्य ठरावा म्हणून बाबेलचे अधिकारी त्याला प्रशिक्षण देतात.​—दानी. १:३, ४, ६.

२. यहोवाला दानीएलबद्दल कसं वाटत होतं? (यहेज्केल १४:१४)

पण दानीएल दिसायला देखणा होता आणि राजमहालात त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता म्हणूनच यहोवाचं त्याच्यावर प्रेम नव्हतं. तर तो आतून कसा आहे हे यहोवाने पाहिलं होतं. यहोवाने म्हटलं, की तो नोहा आणि ईयोबप्रमाणेच नीतिमान आहे. या दोन्ही विश्‍वासू सेवकांनी यहोवाच्या नजरेत एक चांगलं नाव कमवण्यासाठी बरीच दशकं घालवली होती. (उत्प. ५:३२; ६:९, १०; ईयो. ४२:१६, १७; यहेज्केल १४:१४ वाचा.) पण दानीएलबद्दल जेव्हा यहोवाने हे म्हटलं, तेव्हा तो जेमतेम २० वर्षांचा होता. पुढेसुद्धा जेव्हा दानीएल खूप मोठं आयुष्य जगला आणि त्याच्या आयुष्यात बऱ्‍याच मोठ्या घटना घडल्या, तेव्हासुद्धा यहोवाने त्याला सोडलं नाही, तर तो नेहमी त्याच्यावर प्रेम करत राहिला.​—दानी. १०:११, १९.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण दानीएलच्या दोन गुणांबद्दल पाहणार आहोत. या गुणांमुळेच तो यहोवाच्या नजरेत अतिशय मौल्यवान होता. सगळ्यात आधी आपण या गुणांवर चर्चा करू या आणि दानीएलने हे गुण कधी दाखवले, ते पाहू या. मग दानीएलला हे गुण विकसित करायला कशी मदत झाली, ते पाहू या. आणि शेवटी आपल्याला दानीएलचं अनुकरण कसं करता येईल, यावर चर्चा करू या. हा लेख जरी तरुणांना लक्षात घेऊन लिहिण्यात आला असला, तरी दानीएलच्या उदाहरणातून आपण सगळेच जण शिकू शकतो.

दानीएलसारखं धैर्य दाखवा

४. दानीएलने धैर्य कसं दाखवलं याचं एक उदाहरण द्या.

धैर्यवान लोकांनाही भीती वाटू शकते. पण असं असलं तरी ते योग्य ते करायला कचरत नाहीत. दानीएल वयाने लहान असला तरी तो खूप धैर्यवान होता. त्याच्या आयुष्यातल्या दोन घटनांचाच विचार करा. यांपैकी पहिली घटना बाबेलने यरुशलेमचा नाश केला, त्याच्या दोन वर्षांनंतर घडली असावी. बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर, याला एक स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. स्वप्नात त्याने एक अतिशय मोठा पुतळा पाहिला होता. ते स्वप्न काय होतं आणि त्याचा अर्थ काय होता, हे त्याला समजत नव्हतं. म्हणून राजाने त्याच्या महालातल्या सगळ्या ज्ञानी माणसांना धमकावलं, की जर कोणीही ते स्वप्न आणि त्याचा अर्थ काय आहे, हे त्याला सांगितलं नाही, तर तो सगळ्यांना मारून टाकेल. (दानी. २:३-५) त्यांच्यामध्ये दानीएलसुद्धा होता आणि त्यामुळे त्याला लगेच पाऊल उचलणं गरजेचं होतं, नाहीतर अनेकांना आपल्या जीव गमवावा लागणार होता. “म्हणून दानीएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला.” (दानी. २:१६) हे करण्यासाठी दानीएलला नक्कीच खूप धैर्याची आणि विश्‍वासाची गरज होती. शिवाय याआधी दानीएलने कधीच कुठल्या स्वप्नाचा अर्थ सांगितला नव्हता. म्हणून त्याने आपल्या तीन सोबत्यांनाही, म्हणजे शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो b यांना “स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं,” अशी प्रार्थना करायला सांगितली. (दानी. २:१८) यहोवाने त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं आणि मग देवाच्या मदतीने दानीएलने नबुखद्‌नेस्सरला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्यामुळे, दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांचा जीव वाचला.

५. पुन्हा एकदा दानीएलच्या धैर्याची परीक्षा कशी झाली?

या घटनेच्या काही काळानंतर पुन्हा एकदा अशी एक वेळ आली, जेव्हा दानीएलला धैर्य दाखवावं लागणार होतं. या वेळी नबुखद्‌नेस्सर राजाला पुन्हा एकदा स्वप्न पडलं आणि तो खूप अस्वस्थ झाला. त्याने स्वप्नामध्ये एक अतिशय उंच वृक्ष पाहिला होता. या वेळीसुद्धा त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी दानीएलला खूप धैर्य दाखवावं लागणार होतं. कारण त्या स्वप्नाचा अर्थ असा होता, की राजा वेडा होणार होता आणि काही काळ त्याच्याकडून राज्यपद काढून घेतलं जाणार होतं. (दानी. ४:२५) दानीएलने सांगितलेला अर्थ ऐकून राजाला असं वाटलं असतं की तो त्याच्याविरुद्ध बंड करत आहे, आणि त्यामुळे राजा त्याला ठारही मारू शकला असता. पण हे माहीत असतानासुद्धा दानीएलने धैर्य दाखवलं, आणि त्या स्वप्नाचा अर्थ राजाला सांगितला.

६. धैर्य दाखवण्यासाठी दानीएलला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली?

दानीएलने आपल्या संपूर्ण आयुष्यात धैर्य दाखवलं. पण त्यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? तो लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी नक्कीच त्याच्यासमोर एक चांगलं उदाहरण ठेवलं असेल. त्याचे आईवडील इस्राएली होते आणि देवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले होते आणि ज्या सूचना दिल्या होत्या, त्या नक्कीच त्यांनी पाळल्या असतील. तसंच आपल्या मुलांनाही देवाच्या नियमशास्त्राबद्दल शिकवलं असेल. (अनु. ६:६-९) दानीएलला नियमशास्त्रामधल्या दहा आज्ञांसारख्या फक्‍त मोठमोठ्या गोष्टीचं माहीत नव्हत्या, तर लहानसहान गोष्टीसुद्धा माहीत होत्या. जसं की, नियमशास्त्रानुसार इस्राएली लोकांनी काय खायचं नव्हतं हेसुद्धा त्याला माहीत होतं. c (लेवी. ११:४-८; दानी. १:८, ११-१३) यासोबतच, दानीएलला देवाच्या लोकांचा इतिहाससुद्धा माहीत होता. देवाच्या स्तरांना न पाळल्यामुळे त्यांना काय परिणाम भोगावे लागले, हे त्याला माहीत होतं. (दानी. ९:१०, ११) दानीएलच्या आयुष्यात जे काही घडलं आणि त्याला जो काही अनुभव आला, त्यावरून त्याला या गोष्टीची खातरी पटली होती, की यहोवा आणि त्याचे शक्‍तिशाली स्वर्गदूत नेहमी त्याच्यासोबत असतील.​—दानी. २:१९-२४; १०:१२, १८, १९.

शास्त्रनचनांचा अभ्यास करून, यहोवाला प्रार्थना करून आणि त्याच्यावर भरवसा ठेवून दानीएलने धैर्य वाढवलं (परिच्छेद ७ पाहा)

७. दानीएलला आणखी कशामुळे धैर्य दाखवायला मदत झाली? (चित्रसुद्धा पाहा.)

दानीएलने देवाच्या संदेष्ट्यांनी लिहिलेल्या गोष्टींचा अभ्यास केला. यांमध्ये यिर्मयाच्या भविष्यवाणीचासुद्धा समावेश होतो. या अभ्यासातून दानीएलला हे कळलं, की बऱ्‍याच काळापासून बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुद्यांची लवकरच सुटका होणार आहे. (दानी. ९:२) बायबलची भविष्यवाणी कशी पूर्ण होत आहे हे पाहिल्यामुळे त्याचा यहोवावरचा भरवसा नक्कीच वाढला असेल. आणि ज्यांचा यहोवावर भरवसा असतो, ते सहसा जबरदस्त धैर्य दाखवतात. (रोमकर ८:३१, ३२, ३७-३९ सोबत तुलना करा.) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तो आपल्या स्वर्गातल्या पित्याला नेहमी प्रार्थना करायचा. (दानी. ६:१०) त्याने यहोवासमोर आपल्या चुका कबूल केल्या आणि आपलं मन त्याच्यासमोर मोकळं केलं. तसंच त्याने देवाकडे मदतसुद्धा मागितली. (दानी. ९:४, ५, १९) तो आपल्यासारखाच एक माणूस होता, त्यामुळे त्यालाही धैर्य दाखवायला शिकावं लागलं. त्याने अभ्यास करून, प्रार्थना करून आणि यहोवावर भरवसा ठेवून हा गुण स्वतःमध्ये वाढवला.

८. आपण धैर्य हा गुण स्वतःमध्ये कशा प्रकारे वाढवू शकतो?

धैर्य हा गुण जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण धैर्य दाखवायला कचरू नये म्हणून कदाचित आपले आईवडील आपल्याला प्रोत्साहन देतील. पण हा गुण ते आपल्याला वारशाने देऊ शकत नाहीत. म्हणून धैर्य हा गुण दाखवायला आपण स्वतःच शिकलं पाहिजे. हे एखादं नवीन कौशल्य शिकण्यासारखं आहे. आपल्याला जर एखादं कौशल्य चांगल्या प्रकारे शिकायचं असेल, तर त्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला शिकवणारी व्यक्‍ती काय करते याचं अगदी जवळून निरीक्षण करून तिचं अनुकरण आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर जण धैर्य कसं दाखवत आहेत याचं जवळून निरीक्षण करून आणि त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण धैर्य दाखवू शकतो. म्हणून दानीएलसारखं आपणसुद्धा देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशी मनमोकळेपणाने आणि वारंवार बोलत राहिलं पाहिजे आणि त्याच्याशी एक चांगलं नातं जोडलं पाहिजे. तसंच, तो आपल्याला कधीच सोडणार नाही असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. मग जेव्हा आपल्या विश्‍वासाची परीक्षा होईल, तेव्हा आपल्यालासुद्धा धैर्य दाखवता येईल.

९. धैर्य दाखवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

आपण धैर्य दाखवतो तेव्हा बऱ्‍याच मार्गांनी आपल्याला फायदा होत असतो. बेनचंच उदाहरण घ्या. तो जर्मनीतल्या एका शाळेत शिकत होता. तिथे सगळे जण उत्क्रांतीला मानत होते आणि बायबलमधला निर्मितीचा अहवाल एक दंतकथा आहे असं त्यांना वाटत होतं. एके दिवशी बेनला त्याच्या वर्गात असं विचारण्यात आलं, की तो ‘सगळं काही निर्माण करण्यात आलंय,’ असं का मानतो आणि त्याबद्दल बोलायची संधी त्याला देण्यात आली. बेननेसुद्धा अगदी धैर्याने आपल्या विश्‍वासाबद्दल सांगितलं. याचा काय परिणाम झाला? बेन म्हणतो: “माझ्या शिक्षकांनी मी जे काही सांगत होतो ते अगदी चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. आणि माझे मुद्दे मांडण्यासाठी मी जी माहिती वापरली होती त्याच्या बऱ्‍याच प्रती तयार करून त्यांनी वर्गातल्या सगळ्या मुलांना दिल्या.” यावर बेनच्या वर्गातल्या मुलांची काय प्रतिक्रिया होती? बेन म्हणतो: “बरीच मुलं माझं म्हणणं ऐकून घ्यायला तयार होती आणि त्यांनी माझं कौतुकही केलं.” बेनच्या उदाहरणातून दिसून येतं, की जे लोक धैर्य दाखवतात, त्यांचा इतर जण सहसा आदर करतात. शिवाय, त्यामुळे नम्र मनाचे लोक यहोवाकडे आकर्षित होतात. तर मग, धैर्य हा गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आपल्याकडे नक्कीच खूप चांगली कारणं आहेत.

दानीएलसारखी एकनिष्ठा दाखवा

१०. एकनिष्ठा म्हणजे काय?

१० बायबलमध्ये ज्या इब्री शब्दाचं भाषांतर “एकनिष्ठा” किंवा “एकनिष्ठ प्रेम” असं करण्यात आलंय, तो शब्द सहसा देवाचं त्याच्या सेवकांवर किती गाढ प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी वापरण्यात आलाय. तसंच, देवाच्या सेवकांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमासाठीसुद्धा हा शब्द वापरण्यात आलाय. (२ शमु. ९:६, ७) एकनिष्ठा ही एक अशी गोष्ट आहे, जी काळाच्या ओघात आणखी मजबूत होत जाते. दानीएलच्या बाबतीत हे कसं झालं ते आता आपण पाहू या.

दानीएल यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे यहोवा एका स्वर्गदूताला पाठवतो आणि सिंहांची तोंडं बंद करतो (परिच्छेद ११ पाहा)

११. दानीएल वृद्ध होता तेव्हा त्याच्या एकनिष्ठेची परीक्षा कशी झाली? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

११ दानीएलच्या आयुष्यात अशा बऱ्‍याच घटना घडल्या ज्यांमुळे त्याच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली. पण जेव्हा तो त्याच्या वयाच्या नव्वदीत होता, तेव्हा त्याच्या एकनिष्ठेची सर्वात मोठी परीक्षा झाली. तेव्हा मेद पारसच्या सत्तेने बाबेलवर कब्जा केला होता आणि दारयावेश राजा राज्य करत होता. त्याच्या दरबारातल्या अधिकाऱ्‍यांना दानीएल आवडत नव्हता. आणि तो ज्या देवाची उपासना करायचा त्यांचाही ते आदर करत नव्हते. म्हणून त्यांनी दानीएलला ठार मारायचा कट रचला. त्यांनी असं फर्मान काढायला लावलं, ज्यामुळे दानीएल राजाला एकनिष्ठ आहे की त्याच्या देवाला हे दिसणार होतं. इतर लोकांप्रमाणेच आपणही राजाला एकनिष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी दानीएलला फक्‍त ३० दिवसांसाठी यहोवाला प्रार्थना करायचं थांबवावं लागणार होतं. पण दानीएलने याबाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. याचा परिणाम म्हणजे त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. पण यहोवाने त्याला त्याच्या एकनिष्ठेचं प्रतिफळ दिलं आणि त्याला सिंहांपासून वाचवलं. (दानी. ६:१२-१५, २०-२२) आपणही दानीएलसारखंच यहोवाला एकनिष्ठ कसं राहू शकतो?

१२. दानीएल यहोवाला कायम एकनिष्ठ का राहू शकला?

१२ आधी सांगितल्याप्रमाणे, आपल्याला जर यहोवाला एकनिष्ठ राहायचं असेल तर त्याच्याबद्दल आपल्या मनात गाढ प्रेम असलं पाहिजे. दानीएल यहोवाला कायम एकनिष्ठ होता कारण आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल त्याच्या मनात गाढ प्रेम होतं. आणि यहोवाच्या गुणांवर आणि त्याने ते कसे दाखवले यावर मनन केल्यामुळेच त्याला हे प्रेम वाढवता आलं. (दानी. ९:४) तसंच यहोवाने त्याच्यासाठी आणि त्याच्या लोकांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींवरसुद्धा त्याने मनन केलं.​—दानी. २:२०-२३; ९:१५, १६.

दानीएलसारखंच तुमचंही यहोवावर गाढ प्रेम असेल, तर तुम्ही त्याला कायम एकनिष्ठ राहू शकता (परिच्छेद १३ पाहा)

१३. (क) आज आपल्या तरुण भाऊबहिणींच्या एकनिष्ठेची कशी परीक्षा होत आहे? उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.) (ख) व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्हालाही असं विचारण्यात आलं, की समलिंगी जीवनशैली निवडणाऱ्‍यांना यहोवाचे साक्षीदार पाठिंबा देतात का, तर तुम्ही कसं उत्तर द्याल?

१३ दानीएलसारखंच, आज आपल्या तरुण मुलांनासुद्धा अशा लोकांमध्ये वावरावं लागतं ज्यांना यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल बिलकुल आदर नाही. तसंच देवावर प्रेम करणारे लोकही त्यांना आवडत नाहीत. इतकंच नाही तर आपल्या तरुण मुलांची एकनिष्ठा तोडण्यासाठी ते त्यांना त्राससुद्धा देतात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्‍या ग्रेअम नावाच्या आपल्या एका तरुण भावाच्या बाबतीत काय झालं त्याचाच विचार करा. त्याला त्याच्या शाळेत एका परिस्थितीचा सामना करावा लागला. त्याच्या वर्गातल्या शिक्षिकेने एकदा सगळ्यांना विचारलं, की ‘त्यांच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने जर त्यांना असं सांगितलं, की तो किंवा ती समलिंगी आहे, तर ते काय करतील?’ त्या शिक्षिकेने वर्गातल्या सगळ्यांना असं सांगितलं, की जे त्यांना साथ देतील त्यांनी वर्गाच्या एका बाजूला उभं राहावं आणि जे त्यांना साथ देणार नाहीत त्यांनी दुसऱ्‍या बाजूला उभं राहावं. ग्रेअम म्हणतो: “मला आणि माझ्यासोबत असलेल्या एका साक्षीदार मुलाला सोडून बाकी सगळी मुलं समलिंगी व्यक्‍तींना साथ देण्यासाठी वर्गाच्या एका बाजूला उभी होती.” पण परिस्थिती पुढे आणखी खराब झाली. ग्रेअमला आता तो यहोवाला एकनिष्ठ आहे की नाही हे दाखवून द्यावं लागणार होतं. तो म्हणतो: “तो तास संपेपर्यंत मुलांनी आणि शिक्षिकेनेसुद्धा आमचा खूप अपमान केला आणि आम्हाला टोमणे मारले. पण मी शांत राहून माझ्या विश्‍वासाबद्दल त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडून होताहोईल तितका प्रयत्न केला. पण त्यांनी माझं जराही ऐकून घेतलं नाही.” या गोष्टीचा ग्रेअमवर काय परिणाम झाला? तो म्हणतो: “माझा असा अपमान झालेला मला आवडला नाही. पण कोणतीही तडजोड न करता मी माझ्या विश्‍वासाबद्दल ठाम होतो या गोष्टीचा मला खूप आनंदा होतो.” d

१४. यहोवाबद्दल असलेली आपली एकनिष्ठा आणखी मजबूत करण्याचा एक मार्ग कोणता?

१४ दानीएलसारखंच आपणसुद्धा आपल्या मनात देवाबद्दल गाढ प्रेम निर्माण केलं तर आपल्यालाही त्याला कायम एकनिष्ठ राहता येईल. आपण जर त्याच्या गुणांबद्दल शिकत राहिलो तर आपल्या मनात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम वाढत राहील. उदाहरणार्थ, आपण त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. (रोम. १:२०) जर तुम्हाला यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर वाढवायचा असेल तर तुम्ही “उत्क्रांती की निर्मिती?” या लेखमालिकेतले लेख किंवा व्हिडिओ पाहू शकता. किंवा मग तुम्ही वॉज लाईफ क्रियेटेड? आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न, ही माहितीपत्रकं वाचू शकता. डेन्मार्कमध्ये राहणारी एस्तेर नावाची एक बहीण या प्रकाशनांबद्दल काय म्हणते, त्याचा विचार करा. ती म्हणते: “त्यात जो तर्क मांडलाय तो खूप जबरदस्त आहे. ही माहिती तुम्ही काय मानलं पाहिजे हे सांगत नाही, तर फक्‍त तुमच्यासमोर पुरावे ठेवते आणि निर्णय तुमच्यावर सोडून देते.” आधी उल्लेख केलेला बेन म्हणतो: “या माहितीमुळे माझा विश्‍वास खूप मजबूत झालाय. आणि देवानेच जीवन बनवलंय या गोष्टीची मला पक्की खातरी पटली आहे.” या प्रकाशनांचा अभ्यास केल्यानंतर बायबलमध्ये जे म्हटलंय त्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल: “यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.”​—प्रकटी. ४:११. e

१५. यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करायचा आणखी एक मार्ग कोणता?

१५ यहोवाबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याच्या मुलाचं म्हणजे येशूचं जीवन कसं होतं हे समजून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं. जर्मनीत राहणाऱ्‍या समीरा नावाच्या एक बहिणीने असंच केलं. ती म्हणते: “येशूच्या जीवनाचा अभ्यास करून मला यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखता आलं.” ती लहान होती तेव्हा यहोवा देवालासुद्धा भावना आहेत, ही गोष्ट समजून घ्यायला तिला कठीण जात होतं. पण येशू पृथ्वीवर होता तेव्हा काही परिस्थितींबद्दल त्याला कसं वाटलं असेल, हे ती समजू शकत होती. ती म्हणते: “मला येशूचा स्वभाव आवडतो, कारण तो खूप मनमिळाऊ होता आणि त्याला लहान मुलं आवडायची.” तिने येशूबद्दल जितकं जास्त जाणून घेतलं, तितकं यहोवा कसा आहे, हे ती आणखी चांगल्या प्रकारे समजू शकली. आणि यहोवासोबतचं तिचं नातं आणखी मजबूत झालं. असं का? ती म्हणते: “मला हळूहळू हे समजलं, की येशू आपल्या पित्याचं अगदी हुबेहूब अनुकरण करतो. ते दोघेही एकसारखेच आहेत. मला समजलं की येशूला पृथ्वीवर पाठवायचं हेसुद्धा एक कारण होतं. कारण येशूला पाहून लोकांना यहोवा कसा आहे, हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेता येणार होतं.” (योहा. १४:९) तुम्हालासुद्धा यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करायचं असेल तर येशूबद्दल शिकून घेण्यासाठी वेळ काढावा लागेल. तुम्ही जर असं केलं तर यहोवावरचं तुमचं प्रेम आणखी वाढेल आणि त्याला एकनिष्ठ राहायचा तुमचा निश्‍चय आणखी पक्का होईल.

१६. एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (स्तोत्र १८:२५; मीखा ६:८)

१६ आपण इतरांशी एकनिष्ठ असतो तेव्हा आपली त्यांच्यासोबत चांगली मैत्री होते आणि तेही आपल्याला एकनिष्ठ राहतात. (रूथ १:१४-१७) पण यहोवाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्याला आणखी एक फायदा होतो. तो फायदा म्हणजे आपल्याला मनाची शांती आणि समाधान मिळतं. का बरं? कारण यहोवा आपल्याला असं अभिवचन देतो, की जे त्याच्याशी एकनिष्ठ राहतात त्यांच्याशी तोही एकनिष्ठ राहतो. (स्तोत्र १८:२५; मीखा ६:८ वाचा.) विचार करा, स्वतः सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्याची आपल्यासोबत एक जवळचं नातं जोडायची इच्छा आहे! आणि जेव्हा तो हे नातं जोडतो तेव्हा कोणतीही परीक्षा, विरोधक, इतकंच काय तर मृत्यूसुद्धा हे नातं तोडू शकत नाही. (दानी. १२:१३; लूक २०:३७, ३८; रोम. ८:३८, ३९) खरंच दानीएलचं अनुकरण करणं आणि यहोवाला एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे!

दानीएलकडून आपण आणखी बरंच काही शिकू शकतो

१७-१८. आपण पुढच्या लेखात काय पाहणार आहोत?

१७ या लेखात आपण दानीएलच्या फक्‍त दोन गुणांबद्दलच चर्चा केली. पण त्याच्या जीवनातून आपण आणखी बऱ्‍याच गोष्टी शिकू शकतो. उदाहरणार्थ, यहोवाने दानीएलला बरीच स्वप्नं आणि दृष्टान्त दाखवले आणि भविष्यवाण्यांचा अर्थ सांगण्याची क्षमताही दिली. त्याने सांगितलेल्या बऱ्‍याच भविष्यवाण्या आज पूर्ण झालेल्या आहेत. आणि इतर काही भविष्यवाण्या लवकरच पूर्ण होतील. आणि पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीच्या जीवनावर त्यांचा परिणाम होईल.

१८ पुढच्या लेखात आपण दानीएलने लिहिलेल्या अशाच दोन भविष्यवाण्यांवर चर्चा करू या. या भविष्यवाण्यांचा अर्थ समजून घेतल्यामुळे तरुण आणि वृद्ध अशा सगळ्यांनाच फायदा होईल आणि योग्य निर्णय घेता येतील. शिवाय, या भविष्यवाण्यांमुळे धैर्य दाखवण्याचा आणि यहोवाला एकनिष्ठ राहायचा आपला निश्‍चय आणखी पक्का होईल. आणि पुढे येणाऱ्‍या परीक्षांचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहता येईल.

गीत ११९ खरा विश्‍वास बाळगू या!

a यहोवाच्या तरुण सेवकांना आज वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी त्यांना धैर्य दाखवावं लागतं आणि त्यांच्या एकनिष्ठेची परीक्षासुद्धा होते. ‘सगळं काही देवाने बनवलंय,’ असं ते मानत असल्यामुळे, कदाचित त्यांचे शाळासोबती त्यांची टिंगल करतील. किंवा ते देवाची सेवा करत असल्यामुळे आणि त्याच्या स्तरांप्रमाणे जगत असल्यामुळे कदाचित त्यांचे शाळासोबती त्यांची चेष्टा करतील. दानीएलनेसुद्धा त्याच्या तरुण वयात धैर्याने आणि एकनिष्ठ राहून यहोवाची सेवा केली. या लेखात सांगितल्याप्रमाणे, आज जेव्हा यहोवाचे सेवक दानीएलचं अनुकरण करतात तेव्हा ते खऱ्‍या अर्थाने बुद्धिमान ठरतात.

b ही नावं त्यांना बाबेलमध्ये गेल्यावर देण्यात आली.

c बाबेलमध्ये मिळणारं अन्‍न आपल्यासाठी अशुद्ध आहे असं दानीएलला वाटण्याची तीन कारणं असू शकतात: (१) नियमशास्त्रात जे प्राणी खायची मनाई करण्यात आली होती, त्यांचा कदाचित अन्‍नामध्ये समावेश केलेला असावा. (अनु. १४:७, ८) (२) प्राण्यांचं रक्‍त पूर्णपणे वाहू दिलेलं नसावं. (लेवी. १७:१०-१२) (३) ते अन्‍न खाणं हे कदाचित एखाद्या खोट्या देवाच्या उपासनेचा एक भाग असल्याचं मानलं जात असावं.​—लेवीय ७:१५ ची १ करिंथकर १०:१८, २१, २२ सोबत तुलना करा.

d jw.org या वेबसाईटवर खऱ्‍या नीतिमत्त्वामुळे शांती नांदेल हा व्हिडिओ पाहा.

e यहोवावर असलेलं आपलं प्रेम आणखी मजबूत करण्यासाठी तुम्ही, यहोवा के करीब आओ या पुस्तकाचा अभ्यासही करू शकता. या पुस्तकात यहोवाच्या गुणांबद्दल आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.