अभ्यास लेख ३४
बायबलमधल्या भविष्यवाण्यांमधून शिकत राहा
“सखोल समज असलेल्यांना मात्र या गोष्टी समजतील.”—दानी. १२:१०.
गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
सारांश a
१. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करायला आवडेल?
मागच्या लेखात उल्लेख केलेला बेन नावाचा भाऊ म्हणतो, “मला बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करायला खूप आवडतं.” बेनसारखंच तुम्हालाही आवडतं का, की बायबलच्या भविष्यवाण्या समजून घेणं तुम्हाला कठीण जातं? कदाचित त्यांचा अभ्यास करणं तुम्हाला कंटाळवाणंही वाटत असेल. पण यहोवाने त्याच्या वचनात या भविष्यवाण्या का लिहून ठेवल्या, हे जर तुम्ही समजायचा प्रयत्न केला, तर कदाचित तुमचा विचार बदलेल.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ या लेखात आपण बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास का केला पाहिजे यावर चर्चा करणार आहोत. तसंच, आपण त्यांचा अभ्यास कसा केला पाहिजे, हेसुद्धा पाहणार आहोत. आणि यानंतर आपण दानीएलच्या पुस्तकातल्या दोन भविष्यवाण्यांबद्दल चर्चा करू या. आणि त्यांना समजून घेतल्यामुळे आपल्याला कशी मदत होते तेही पाहू या.
आपण बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास का केला पाहिजे?
३. बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घ्यायच्या असतील तर आपण काय केलं पाहिजे?
३ बायबलमधल्या भविष्यवाण्या नीट समजून घ्यायच्या असतील, तर आपण कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही एका अनोळखी ठिकाणी गेला आहात. हे ठिकाण तुमच्या ओळखीचं नाही, पण तुमच्यासोबत आलेल्या मित्राला त्या ठिकाणाची चांगली माहिती आहे. तुम्ही सध्या कुठे आहात, तिथून प्रत्येक रस्ता कुठे जातो, हे त्याला चांगलं माहीत आहे. साहजिकच, तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्याचप्रमाणे, काळाच्या ओघात आपण सध्या कुठे आहोत आणि पुढे आपलं भविष्य काय असेल, हे यहोवाला चांगलं माहीत आहे. म्हणून, बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी आपण नम्रपणे यहोवाची मदत घेतली पाहिजे.—दानी. २:२८; २ पेत्र १:१९, २०.
४. यहोवाने त्याच्या वचनात भविष्यवाण्या का लिहून ठेवल्या आहेत? (यिर्मया २९:११) (चित्रसुद्धा पाहा.)
४ सगळ्या पालकांप्रमाणेच, यहोवालाही असं वाटतं की आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळावं. (यिर्मया २९:११ वाचा.) पण मानवी पालकांना एक गोष्ट शक्य नाही, जी यहोवाला शक्य आहे. ती म्हणजे, भविष्यात काय होईल हे तो अचूकपणे सांगू शकतो. भविष्यात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना आपल्याला आधीच समजाव्यात असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याने त्या घटनांबद्दलच्या भविष्यवाण्या आपल्या वचनात लिहून ठेवल्या आहेत. (यश. ४६:१०) त्यामुळे असं म्हणता येईल की बायबलमधल्या भविष्यवाण्या या आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला प्रेमळपणे दिलेल्या भेटीसारख्याच आहेत. पण बायबलमधल्या भविष्यवाण्यांमध्ये जे लिहिलंय, ते खरोखर पूर्ण होईल असं आपण खातरीने का म्हणू शकतो?
५. मॅक्सच्या उदाहरणातून तरुण काय शिकू शकतात?
५ शाळेत जाणाऱ्या आपल्या तरुण मुलांना अशा मुलांसोबत वावरावं लागतं, ज्यांना बायबलबद्दल खूप कमी किंवा काहीच आदर नसतो. त्यांचं बोलणं किंवा वागणं पाहून आपल्या साक्षीदार मुलांच्या मनातही काही वेळा आपल्या विश्वासाबद्दल शंका येऊ शकतात. मॅक्स नावाच्या भावाच्या बाबतीत काय घडलं ते पाहा. तो म्हणतो, “माझ्या आईवडिलांनी मला सत्याबद्दल शिकवलं. पण मी जेव्हा शाळेत जाऊ लागलो, तेव्हा ‘हेच सत्य आहे का? बायबल खरंच देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे का?’ अशा शंका माझ्या मनात येऊ लागल्या.” मग, त्याच्या आईवडिलांनी काय केलं? तो म्हणतो, “मला माहीत होतं की त्यांना माझ्याबद्दल खूप काळजी वाटत होती, पण तरीसुद्धा ते माझ्याशी खूप शांतपणे बोलले.” मॅक्सच्या आईवडिलांनी त्याच्या प्रश्नांचं उत्तर बायबलमधून दिलं. आणि मॅक्सनेही एक गोष्ट केली. तो म्हणतो, “मी स्वतः बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केला. आणि मला जे त्यांतून समजायचं, त्याबदद्ल मी मंडळीतल्या इतर मुलांसोबत चर्चा करायचो.” याचा काय परिणाम झाला? तो म्हणतो, “त्यानंतर मला ही खातरी पटली, की बायबल हे देवाच्याच प्रेरणेने लिहिण्यात आलंय.”
६. तुमच्या मनात जर शंका असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, आणि का?
६ मॅक्ससारखंच जर तुम्हाला बायबलमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे का अशी शंका येत असेल, तर वाईट वाटून घेऊ नका. पण त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. कारण शंका ही एखाद्या गोष्टीला लागलेल्या गंजासारखी असते. जर त्याकडे दुर्लक्ष केलं, तर एखाद्या मौल्यवान गोष्टीचं नुकसान होऊ शकतं. तर, तुमच्या विश्वासाला लागलेला हा गंज तुम्हाला जर काढून टाकायचा असेल, तर तुम्ही स्वतःला असं विचारलं पाहिजे, की “बायबलमध्ये भविष्याबद्दल जे म्हटलंय, त्यावर माझा खरंच विश्वास आहे का?” जर तुम्हाला खातरी नसेल, तर आधी तुम्हाला पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करावा लागेल. मग तुम्ही तो कसा करू शकता?
आपण बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास कसा करू शकतो?
७. भविष्यवाण्यांचा अभ्यास कसा करायचा या बाबतीत दानीएलने चांगलं उदाहरण कसं मांडलं? (दानीएल १२:१०) (चित्रसुद्धा पाहा.)
७ भविष्यवाण्यांचा अभ्यास कसा करायचा या बाबतीत दानीएलने एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याने योग्य हेतूने म्हणजे सत्य जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांचा अभ्यास केला. दानीएल नम्रसुद्धा होता. त्याला माहीत होतं, की जे लोक यहोवाला ओळखतात आणि त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे चालतात, त्यांना तो भविष्यवाण्या समजून घ्यायला मदत करतो. (दानी. २:२७, २८; दानीएल १२:१० वाचा.) मदतीसाठी यहोवावर विसंबून राहून त्याने नम्र असल्याचं दाखवलंसुद्धा. (दानी. २:१८) तसंच, त्याने भविष्यवाण्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला. त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या शास्त्रवचनांतून त्याने संशोधन केलं. (यिर्म. २५:११, १२; दानी. ९:२) मग तुम्ही दानीएलचं अनुकरण कसं करू शकता?
८. बायबलमधल्या भविष्यवाण्या खऱ्या आहेत यावर विश्वास ठेवायला काही जण तयार का नसतात? पण आपण काय केलं पाहिजे?
८ तुमच्या हेतूंचं परीक्षण करा. सत्य जाणून घ्यायची तीव्र इच्छा असल्यामुळे तुम्ही बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करत आहात का? जर असाल तर यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल. (योहा. ४:२३, २४; १४:१६, १७) पण बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करण्यामागे एका व्यक्तीचा आणखी काय हेतू असू शकतो? काही जण बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास, त्या देवाकडून नाहीत याचे पुरावे शोधण्यासाठी करतात. ते असा विचार करतात, की बायबल देवाकडून नाही हे जर त्यांना सिद्ध करता आलं, तर बरोबर काय आणि चूक काय याबद्दल ते स्वतःच स्वतःचे स्तर ठरवू शकतात आणि त्यांप्रमाणे जगू शकतात. म्हणून भविष्यवाण्यांचा अभ्यास करण्यासाठी आपला हेतू योग्य असला पाहिजे. पण यासोबतच, बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी एका महत्त्वाच्या गुणाचीसुद्धा गरज आहे.
९. बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गुणाची गरज आहे? स्पष्ट करा.
९ नम्र असा. जे नम्र असतात त्यांना यहोवा मदत करायचं वचन देतो. (याको. ४:६) त्यामुळे बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घ्यायला आपल्याला त्याने मदत करावी, म्हणून आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला योग्य वेळी आध्यात्मिक अन्न मिळावं, म्हणून तो एका माध्यमाचा उपयोग करत आहे. ते माध्यम म्हणजे विश्वासू आणि बुद्धिमान दास. आणि बायबलमधल्या भविष्यवाण्या समजून घ्यायला, आपल्याला या माध्यामाची गरज आहे हेसुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. (लूक १२:४२) यहोवा व्यवस्थेचा देव आहे, त्यामुळे बायबलमधली सत्यं समजण्यासाठी तो एकाच माध्यमाचा वापर करेल हे समजण्यासारखं आहे.—१ करिंथ. १४:३३; इफिस. ४:४-६.
१०. एस्तेरच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१० चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सर्वात आधी तुम्हाला जी भविष्यवाणी आवडते, तिच्यावर संशोधन करायला सुरुवात करा. एस्तेर नावाच्या बहिणीने असंच केलं. मसीहाच्या येण्याबद्दल ज्या भविष्यवाण्या केल्या गेल्या होत्या, त्यांबद्दल जाणून घ्यायची तिला खूप इच्छा होती. ती म्हणते, “मी जेव्हा १५ वर्षांची होते, तेव्हा या भविष्यवाण्या येशू येण्याच्या आधी लिहिण्यात आल्या होत्या का, याचे पुरावे शोधायला मी सुरुवात केली.” मृत समुद्रात मिळालेल्या गुंडाळ्यांबद्दल जेव्हा तिने वाचलं, तेव्हा तिला या गोष्टीची खातरी पटली. ती म्हणते, “मला समजलं की यातल्या काही गुंडाळ्या येशूच्या जन्माआधी लिहिण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भविष्यवाण्या नक्कीच देवाकडून असल्या पाहिजेत.” ती मान्य करते, “हे समजून घेण्यासाठी मला बऱ्याच वेळा त्याबद्दल वाचावं लागलं.” पण तिने जी मेहनत घेतली त्याबद्दल ती खूप खूश आहे. बायबलच्या बऱ्याच भविष्यवाण्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतर ती असं म्हणते, “आता मला स्पष्टपणे समजलंय, की बायबलमध्ये जे सांगितलंय तेच खरंय.”
११. बायबलमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे याची खातरी करून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
११ बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या आहेत यावर आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा यहोवावरचा आपला भरवसा आणखी पक्का होतो. आणि यहोवा आपल्याला जे मार्गदर्शन देतो, त्यावरचा आपला भरवसाही वाढतो. तसंच, आज आपल्याला कितीही समस्यांना तोंड द्यावं लागत असलं, तरी बायबलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला भविष्याकडे आशेने पाहता येतं. आता आपण दानीएलने लिहिलेल्या अशा दोन भविष्यवाण्यांवर विचार करू या, ज्या सध्या पूर्ण होत आहेत. त्या समजून घेतल्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.
लोखंड आणि मातीच्या पावलांबद्दल माहीत करून घेणं का गरजेचं आहे?
१२. ‘लोखंड’ आणि ‘मातीची’ पावलं कोणाला सूचित करतात? (दानीएल २:४१-४३)
१२ दानीएल २:४१-४३ वाचा. नबुखद्नेस्सर राजाला दानीएलने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. त्या स्वप्नात राजाने एक पुतळा पाहिला होता. त्या पुतळ्याच्या पावलांचा “काही भाग लोखंडाचा, तर काही भाग मातीचा होता.” या भविष्यवाणीची तुलना दानीएलच्या आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या इतर भविष्यवाण्यांसोबत केल्यावर, असं दिसून येतं, की पुतळ्याची पावलं आजच्या अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करतात. या महासत्तेबद्दल दानीएलने असं म्हटलं, “ते राज्य थोडंफार मजबूत आणि थोडंफार कमजोर असेल.” पण ते कमजोर का असेल? कारण मऊ मातीने सूचित करण्यात आलेले सामान्य लोक या महासत्तेच्या लोखंडासारख्या शक्तीला कमजोर करतात. b
१३. ही भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी समजतात?
१३ स्वप्नात पाहिलेल्या पुतळ्याबद्दल आणि खासकरून त्याच्या पावलांबद्दल दानीएलने जे सांगितलं, त्यातून आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे, अँग्लो-अमेरिका या महासत्तेने ती लोखंडासारखी आहे हे दाखवून दिलंय. उदाहरणार्थ, पहिलं आणि दुसरं महायुद्ध जिंकण्यामध्ये या महासत्तेची महत्त्वाची भूमिका होती. पण ही महासत्ता तिच्या नागरिकांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे आणि संघर्षांमुळे मातीसारखी कमजोर झाली आहे आणि पुढेही होत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे, देवाचं राज्य मानवी सरकारांचा नाश करेल, तेव्हा पृथ्वीवर राज्य करणारी ही शेवटची महासत्ता असेल. हे खरं आहे, की अँग्लो-अमेरिकन महासत्तेला इतर देश आव्हान देत आहेत. पण तरी ते तिची जागा घेऊ शकणार नाहीत. असं आपण ठामपणे का म्हणू शकतो? कारण आपल्याला माहीत आहे, की नबुखद्नेस्सरने स्वप्नात पाहिलेला, देवाच्या राज्याला सूचित करणारा “दगड,” अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करणाऱ्या त्या पुतळ्याच्या पावलांवर येऊन आदळेल आणि त्यांचा चुराडा करेल.—दानी. २:३४, ३५, ४४, ४५.
१४. लोखंड आणि मातीच्या पावलांबद्दल असलेली भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे योग्य निर्णय घ्यायला तुम्हाला कशी मदत होईल?
१४ लोखंड आणि मातीची पावलं यांबद्दलची दानीएलची भविष्यवाणी खरी आहे, याची तुम्हाला खातरी आहे का? जर असेल तर ते तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवरून दिसून येईल. या जगाचा एका अर्थाने लवकरच चुराडा होऊन नाश होणार आहे. अशा जगात संपत्ती कमवून आपण सुरक्षा शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. (लूक १२:१६-२१; १ योहा. २:१५-१७) ही भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळेल. (मत्त. ६:३३; २८:१८-२०) या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यावर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारू शकता, ‘देवाचं राज्य लवकरच सर्व मानवी सरकारांचा नाश करणार आहे याची मला खातरी आहे, हे माझ्या निर्णयांवरून दिसून येतं का?’
उत्तरेच्या आणि दक्षिणेच्या राजांबद्दल असलेल्या भविष्यवाणीचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?
१५. आज “उत्तरेचा राजा” आणि ‘दक्षिणेचा राजा’ हे कोणाला सूचित करतात? (दानीएल ११:४०)
१५ दानीएल ११:४० वाचा. दानीएलच्या ११ व्या अध्यायात दोन राजांबद्दल किंवा राजकीय सत्तांबद्दल सांगितलं आहे. या सत्ता जगावर अधिकार चालवण्यासाठी एकमेकांसोबत संघर्ष करतात. आपण या भविष्यवाणीची आणि बायबलमधल्या इतर भविष्यवाण्यांची तुलना केली, तर आपल्याला कळतं, की “उत्तरेचा राजा” रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना सूचित करतो. तर, ‘दक्षिणेचा राजा’ अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला सूचित करतो. c
१६. ‘उत्तरेच्या राजाच्या’ अधिकाराखाली राहणाऱ्या देवाच्या लोकांना कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागतोय?
१६ आज जे देवाचे लोक ‘उत्तरेच्या राजाच्या’ अधिकाराखाली राहतात, त्यांचा तो तीव्र छळ करतोय. काही साक्षीदारांना त्यांच्या विश्वासामुळे मारहाण करून तुरुंगात टाकण्यात आलंय. पण ‘उत्तरेच्या राजाच्या’ अशा कामांमुळे आपले भाऊबहीण घाबरले नाहीत. उलट, त्यांचा विश्वास मजबूत झाला आहे. असं का? कारण त्या भाऊबहिणींना माहीत आहे, की देवाच्या लोकांचा अशा प्रकारे छळ झाल्यामुळे दानीएलच्या पुस्तकातली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. d (दानी. ११:४१) हे माहीत असल्यामुळे आपली आशा मजबूत होते आणि एकनिष्ठ राहण्याचा आपला निश्चय आणखी पक्का होतो.
१७. ‘दक्षिणेच्या राजाच्या’ अधिकाराखाली राहणाऱ्या देवाच्या लोकांना कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला आहे?
१७ ‘दक्षिणेच्या राजानेही’ पूर्वी देवाच्या लोकांवर थेट हल्ले केले. उदाहरणार्थ, २० व्या शतकाच्या सुरुवातीला काही भावांना त्यांच्या निष्पक्षतेसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. तर, काही साक्षीदार मुलांनासुद्धा याच कारणासाठी शाळांमधून काढून टाकण्यात आलं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या राजाच्या अधिकाराखाली राहणाऱ्या यहोवाच्या सेवकांना काही वेगळ्या दबावांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहण्याच्या त्यांच्या निश्चयाची परीक्षा झाली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा एका ख्रिस्ती व्यक्तीला एखाद्या राजनैतिक पार्टीला पाठिंबा द्यायचा मोह होऊ शकतो. एक ख्रिस्ती व्यक्ती कदाचित मतदान द्यायला जाणार नाही, पण मनामध्येच ती एखाद्याची बाजू घेईल. म्हणून आपण आपल्या कामांमध्येच नाही, तर विचारांमध्येही राजकीय दृष्टीने निष्पक्ष राहणं खूप महत्त्वाचं आहे.—योहा. १५:१८, १९; १८:३६.
१८. ‘उत्तरेच्या राजाचा’ आणि ‘दक्षिणेच्या राजाचा’ संघर्ष पाहून आपण काय विचार केला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१८ बायबलच्या भविष्यवाणीप्रमाणे आज ‘दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाला शिंग मारतोय.’ म्हणजे तो त्याच्याशी लढाई करतोय. (दानी. ११:४०, तळटीप) ज्यांना बायबलच्या भविष्यवाण्यांवर विश्वास नाही, त्यांना हे पाहून फार चिंता वाटू शकते. कारण या राजांकडे इतकी आण्विक शक्ती आहे, की ते संपूर्ण पृथ्वीवरचं जीवन नष्ट करू शकतात. पण आपल्याला माहीत आहे, की यहोवा असं होऊ देणार नाही. (यश. ४५:१८) त्यामुळे आपण जेव्हा ‘उत्तरेच्या राजाला’ आणि ‘दक्षिणेच्या राजाला’ एकमेकांशी लढताना पाहतो, तेव्हा आपल्याला घाबरून जायची गरज नाही. उलट, आपला विश्वास आणखी मजबूत झाला पाहिजे. कारण या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ आहे हे यावरून सिद्ध होतं.
भविष्यवाण्यांचा अभ्यास करत राहा
१९. बायबलमधल्या भविष्यवाण्यांबद्दल आपण कोणती गोष्ट समजून घेतली पाहिजे?
१९ बायबलच्या काही भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील हे आपल्याला माहीत नाही. दानीएल संदेष्ट्यालासुद्धा त्याने लिहिलेल्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजला नाही. (दानी. १२:८, ९) एखादी भविष्यवाणी कशी पूर्ण होईल हे आपल्याला पूर्णपणे समजत नसलं, तर याचा अर्थ असा होत नाही की ती भविष्यवाणी पूर्ण होणारच नाही. आधीच्या काळातसुद्धा भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या, हे यहोवाने आपल्या सेवकांना योग्य वेळी सांगितलं. म्हणून, आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, त्या तो आपल्याला योग्य वेळी सांगेल.—आमो. ३:७.
२०. लवकरच बायबलमधल्या कोणत्या रोमांचक भविष्यवाण्या पूर्ण होणार आहेत? आणि तोपर्यंत आपण काय करत राहिलं पाहिजे?
२० लवकरच, “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा केली जाईल. (१ थेस्सलनी. ५:३) त्यानंतर जगाच्या राजकीय सत्ता खोट्या धर्मावर हल्ला करतील आणि त्याचा पूर्णपणे नाश करतील. (प्रकटी. १७:१६, १७) मग त्या देवाच्या लोकांवर हल्ला करतील. (यहे. ३८:१८, १९) या घटनांनी हर्मगिदोनच्या युद्धाची सुरुवात होईल. (प्रकटी. १६:१४, १६) आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की या घटना लवकरच होतील. तोपर्यंत आपण बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करत राहू या. आणि इतरांनाही तसं करत राहण्यासाठी मदत करू या. हे करून आपल्याला दाखवून देता येईल, की स्वर्गातल्या आपल्या पित्याबद्दल आपल्याला कदर आहे.
गीत ९६ देवाचं अनमोल वचन
a जगाची परिस्थिती आज दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पण परिस्थिती कितीही बिघडली तरी येणाऱ्या काळात आपल्याला चांगलं भविष्य मिळेल याची आपण खातरी बाळगू शकतो. बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास आपण का केला पाहिजे याच्या काही विशिष्ट कारणांवर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, दानीएलने लिहिलेल्या दोन भविष्यवाण्यांबद्दलही आपण या लेखात चर्चा करणार आहोत. आणि त्या समजून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो हेसुद्धा पाहणार आहोत.
b १५ जून, २०१२ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ यहोवा प्रकट करतो” या लेखातले परिच्छेद ७-९ पाहा.
c मे २०२० च्या टेहळणी बुरूज अंकातल्या, “आज ‘उत्तरेचा राजा’ कोण आहे?,” या लेखातले परिच्छेद ३-४ पाहा.
d मे २०२० च्या टेहळणी बुरूज अंकातल्या, “आज ‘उत्तरेचा राजा’ कोण आहे?,” या लेखातले परिच्छेद ७-९ पाहा.