वाचकांचे प्रश्न
जून २०२० च्या टेहळणी बुरूज अंकात “तुझे नाव पवित्र मानले जावो” या नावाचा लेख आला होता. या लेखामध्ये यहोवाच्या नावाबद्दल आणि त्यालाच पूर्ण विश्वावर राज्य करायचा अधिकार आहे, याबद्दलची आपली समज आणखी कशा प्रकारे स्पष्ट करण्यात आली?
त्या लेखात आपण शिकलो की सगळ्या बुद्धिमान सृष्टीपुढे, म्हणजे स्वर्गदूतांपुढे आणि माणसांपुढे खरंतर एकच महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे यहोवाच्या महान नावाला पवित्र करणं. तर, यहोवालाच पूर्ण विश्वावर राज्य करायचा अधिकार आहे, म्हणजे त्याचीच राज्य करायची पद्धत सर्वात चांगली आहे, हा त्या मोठ्या मुद्द्याचा फक्त एक पैलू आहे. त्याचप्रमाणे, माणसं देवाला एकनिष्ठ राहतील की नाही हासुद्धा त्या मोठ्या मुद्द्याचाच आणखीन एक पैलू आहे.
यहोवाचं नाव आणि ते पवित्र करणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे असं आपण आत्ता का म्हणतो? याची तीन कारणं आपण पाहू या.
पहिलं कारण म्हणजे, सैतानाने यहोवाच्या नावावर कलंक लावला. एदेन बागेत त्याने हव्वाला चलाखीने प्रश्न विचारला. त्यातून त्याला हे दाखवून द्यायचं होतं की यहोवा देव दयाळू नाही आणि तो आदाम आणि हव्वाकडून अवाजवी अपेक्षा करतो. त्यानंतर यहोवा जे बोलला होता त्याच्या अगदी उलट सैतान बोलला. एका अर्थाने तो म्हणत होता की देव खोटं बोलत आहे. असं बोलून त्याने यहोवाच्या नावाची बदनामी केली. अशा प्रकारे तो “दियाबल” म्हणजे “निंदा करणारा” बनला. (योहा. ८:४४, तळटीप.) हव्वाने सैतानाच्या सगळ्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून देवाची आज्ञा मोडली. असं करून तिने देवाविरुद्ध बंड केलं. ती जणू दाखवत होती की तिला देवाच्या शासनाखाली राहायची इच्छा नाही. (उत्प. ३:१-६) सैतान आजसुद्धा यहोवाच्या नावाची बदनामी करतोय. आणि त्याच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतोय. जे त्याच्या अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, ते कदाचित यहोवाची आज्ञा मोडतील. अशा प्रकारे यहोवाच्या पवित्र नावाची बदनामी होणं हा त्याच्या लोकांसाठीसुद्धा सर्वात मोठा अन्याय आहे. जर यहोवाच्या नावाची अशा प्रकारे बदनामी केली गेली नसती तर या जगाची अवस्था अशी कधीच नसती. आणि आज जगात याच कारणांमुळे इतकं दुःख आणि दुष्टता आहे.
दुसरं कारण म्हणजे, सर्व सृष्टीच्या भल्यासाठी यहोवा त्याचं नाव पवित्र करेल आणि त्याच्या नावावर लागलेला सगळा कलंक मिटवेल. ही गोष्ट यहोवासाठी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणूनच तो म्हणतो: “माझं महान नाव मी नक्कीच पवित्र करीन.” (यहे. ३६:२३) यहोवाच्या सर्व विश्वासू सेवकांच्या प्रार्थनांमध्ये कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असली पाहिजे, याबद्दल सांगताना येशूने म्हटलं, “तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्त. ६:९) यहोवाच्या नावाची स्तुती करणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल बायबलमध्ये पुन्हा-पुन्हा सांगण्यात आलंय. याची काही उदाहरणं पाहा: “यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा.” (१ इति. १६:२९; स्तो. ९६:८) “त्याच्या गौरवशाली नावाची स्तुती गा!” (स्तो. ६६:२) “मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन.” (स्तो. ८६:१२) एकदा यरुशलेमच्या मंदिरात येशूने असं म्हटलं: “बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” त्या वेळी यहोवा स्वर्गातून स्वतः असं बोलला: “मी त्याचा गौरव केलाय आणि पुन्हा करीन.”—योहा. १२:२८. a
तिसरं कारण म्हणजे, यहोवाचा उद्देश हा नेहमी त्याच्या नावाशी जोडलेला आहे. विचार करा, येशूच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी जी परीक्षा होईल, त्या परीक्षेनंतर काय होईल? त्या वेळीसुद्धा यहोवाच्या नावाला पवित्र करण्याच्या मुद्द्याबद्दल
स्वर्गदूतांमध्ये आणि मानवांमध्ये वेगवेगळे विचार असतील का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वात मोठ्या मुद्द्याच्या त्या दोन पैलूंबद्दल पुन्हा विचार करू या. ते म्हणजे माणसं यहोवाला एकनिष्ठ राहतील की नाही? आणि यहोवाला संपूर्ण विश्वावर राज्य करायचा अधिकार आहे की नाही? शेवटच्या परीक्षेनंतर विश्वासू मानवांना पुन्हा आपली एकनिष्ठा सिद्ध करावी लागणार नाही. ते पूर्णपणे पारखलेले आणि परिपूर्ण झालेले असतील. त्यांना सर्वकाळचं जीवन मिळेल. मग, यहोवाला संपूर्ण विश्वावर राज्य करायचा अधिकार आहे की नाही, या मुद्द्यावर स्वर्गदूतांमध्ये आणि मानवांमध्ये पुन्हा चर्चा होईल का? किंवा पुन्हा फुटी पडतील का? नाही. यहोवाची राज्य करायची पद्धतच योग्य आणि श्रेष्ठ आहे, हे सर्वकाळासाठी सिद्ध झालेलं असेल. पण मग त्या वेळीसुद्धा यहोवाच्या लोकांसाठी त्याचं नाव सगळ्यात महत्त्वाचं असेल का?तोपर्यंत यहोवाचं नाव पूर्णपणे पवित्र झालेलं असेल आणि त्याच्या नावावर कोणताही कलंक नसेल. पण तेव्हाही स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या त्याच्या सेवकांसाठी त्याचं नाव तितकंच महत्त्वाचं असेल. असं का? कारण ते यहोवाला आश्चर्यकारक गोष्टी करताना पाहतील. विचार करा, “देवाने सगळ्यांसाठी सर्वकाही व्हावं,” म्हणून येशू सगळा अधिकार यहोवाला पुन्हा सोपवेल. (१ करिंथ. १५:२८) त्यानंतर माणसांना ‘देवाची मुलं होण्याचं गौरवशाली स्वातंत्र्य’ मिळेल. (रोम. ८:२१) मग यहोवा आपला उद्देश पूर्ण करेल. तो स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या त्याच्या बुद्धिमान सृष्टीला एक मोठं कुटुंब म्हणून एकत्र करेल.—इफिस. १:१०.
या सर्व गोष्टींचा यहोवाच्या स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या कुटुंबावर काय परिणाम होईल? तेव्हासुद्धा यहोवाच्या सुंदर नावाची स्तुती करण्याची इच्छा आपल्या मनात नक्की असेल. स्तोत्रकर्त्या दावीदने देवाच्या प्रेरणेने असं लिहिलं, “यहोवा याची स्तुती असो! . . . त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!” (स्तो. ७२:१८, १९) सर्वकाळच्या जीवनात त्याच्या नावाची स्तुती करण्याची नवनवीन कारणं आपल्याला मिळत राहतील.
यहोवाच्या नावामुळेच आपल्याला त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे त्याच्या नावामुळे आपल्याला त्याच्या प्रेमाची आठवण होते. (१ योहा. ४:८) आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवू, की प्रेम असल्यामुळेच त्याने आपल्याला निर्माण केलं आणि आपल्यासाठी खंडणी बलिदान दिलं. तसंच, तो प्रेमाने आणि नीतीने राज्य करतो हेही आपण लक्षात ठेवू. पण सर्वकाळच्या जीवनात यहोवाचं प्रेम आपल्याला कायम अनुभवता येईल. आणि त्यामुळे स्वर्गातल्या आपल्या पित्याच्या जवळ जाण्याची आणि त्याच्या वैभवी नावाची स्तुती करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.—स्तो. ७३:२८.