अभ्यास लेख ३२
गीत ४४ दीन माणसाची प्रार्थना
कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही
“कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.”—२ पेत्र ३:९.
या लेखात:
पश्चात्ताप म्हणजे काय, तो का गरजेचा आहे आणि यहोवाने सगळ्या प्रकारच्या लोकांना पश्चात्ताप करायला कशी मदत केली, ते पाहू या.
१. पश्चात्ताप करणारी व्यक्ती काय करते?
आपण एखादी चूक करतो तेव्हा पश्चात्ताप करणं महत्त्वाचं आहे. बायबलमध्ये म्हटलंय, की एखादी व्यक्ती पश्चात्ताप करते तेव्हा ती एका विशिष्ट वागण्याबद्दल आपलं मन बदलते, तसं वागायचं सोडून देते आणि पुन्हा तसं न वागायचा निश्चय करते.—शब्दार्थसूची, “पश्चात्ताप” पाहा.
२. आपण सगळ्यांनी पश्चात्तापाबद्दल शिकून घेणं का महत्त्वाचं आहे? (नहेम्या ८:९-११)
२ आपल्या सगळ्यांनाच पश्चात्तापाबद्दल शिकायची गरज आहे. का? कारण आपण रोज पाप करतो. आपण आदाम आणि हव्वा यांचे वंशज आहोत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला वारशाने पाप आणि मृत्यू मिळालाय. (रोम. ३:२३; ५:१२) यापासून कोणीच सुटलेलं नाही. प्रेषित पौलसारख्या विश्वासू माणसांनाही पापाशी लढावं लागलं. (रोम. ७:२१-२४) पण याचा अर्थ असा होतो का, की आपल्या पापांमुळे आपण कायम दुःखी आणि निराश राहावं? नाही. यहोवा दयाळू देव आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण आनंदी राहावं. नहेम्याच्या काळातल्या यहुद्यांचा विचार करा. (नहेम्या ८:९-११ वाचा.) पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांनी दुःखी राहावं असं यहोवाला वाटत नव्हतं. तर त्यांनी त्याची आनंदाने उपासना करावी अशी त्याची इच्छा होती. यहोवाला माहीत आहे की पश्चात्ताप केल्यामुळे आनंद मिळतो. म्हणूनच तो आपल्याला त्याबद्दल शिकवतो. आपण जर आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला तर आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की आपला दयाळू देव आपल्याला नक्कीच क्षमा करेल.
३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ तर चला आपण पश्चात्तापाबद्दल आणखी शिकू या. या लेखात आपण तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत. पहिली, यहोवाने पश्चात्ताप करण्याबद्दल इस्राएली लोकांना काय शिकवलं? दुसरी, यहोवा देव पापी लोकांना पश्चात्ताप करायला कशी मदत करतो? आणि तिसरी, येशूचे शिष्य पश्चात्ताप करण्याबद्दल काय शिकले?
यहोवाने पश्चात्ताप करण्याबद्दल इस्राएली लोकांना काय शिकवलं?
४. पश्चात्ताप करण्याबद्दल यहोवाने इस्राएली लोकांना काय शिकवलं?
४ यहोवाने इस्राएली लोकांना एक राष्ट्र म्हणून संघटित केलं. त्याने त्यांच्याशी एक करार केला. जर त्यांनी या करारातले कायदे पाळले असते, तर त्याने त्यांचं संरक्षण केलं असतं आणि त्यांना आशीर्वाद दिला असता. या कायद्यांबद्दल त्याने त्यांना अशी खातरी दिली: “आज मी तुम्हाला देत असलेली आज्ञा तुमच्यासाठी कठीण नाही किंवा तुमच्यापासून फार दूरही नाही.” (अनु. ३०:११, १६) पण जर त्यांनी त्याच्या कायद्याचं पालन केलं नाही आणि इतर देवांची उपासना केली, तर तो त्यांचं संरक्षण करणार नव्हता. आणि त्यांना दु:ख भोगावं लागणार होतं. पण असं असलं तरी, ते पुन्हा देवाची पसंती मिळवू शकणार होते. ते आपला ‘देव यहोवा याच्याकडे परत येऊ शकत होते आणि त्याचं ऐकू शकत होते.’ (अनु. ३०:१-३, १७-२०) दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ते पश्चात्ताप करू शकत होते. आणि जर त्यांनी तसं केलं, तर यहोवा त्यांच्याशी नातं जोडणार होता आणि पुन्हा त्यांना आशीर्वाद देणार होता.
५. यहोवाने आपल्या लोकांबद्दल आशा सोडली नव्हती हे त्याने कसं दाखवून दिलं? (२ राजे १७:१३, १४)
५ पण, यहोवाने निवडलेल्या या लोकांनी वारंवार त्याच्याविरुद्ध बंड केलं. मूर्तिपूजा करण्यासोबतच ते इतर घृणास्पद गोष्टीही करू लागले. याचा परिणाम असा झाला, की त्यांना दुःख भोगावं लागलं. पण या भरकटलेल्या लोकांना यहोवा देवाने असंच सोडून दिलं नाही. त्यांनी पश्चात्ताप करावा आणि त्याच्याकडे परत यावं, म्हणून तो सतत आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवत राहिला.—२ राजे १७:१३, १४ वाचा.
६. आपल्या लोकांना पश्चात्तापाचं महत्त्व शिकवण्यासाठी यहोवाने त्याच्या संदेष्ट्यांचा वापर कसा केला? (चित्रसुद्धा पाहा.)
६ आपल्या लोकांना इशारा देण्यासाठी आणि त्यांना सुधारण्यासाठी यहोवाने बऱ्याच वेळा आपल्या संदेष्ट्यांचा वापर केला. उदाहरणार्थ, त्याने यिर्मया संदेष्ट्याकडून त्यांना असा संदेश दिला: “हे बंडखोर इस्राएल, माझ्याकडे परत ये. मी तुझ्याकडे रागाने बघणार नाही. कारण मी एकनिष्ठ देव आहे. . . . मी तुझ्याबद्दल कायम मनात राग धरणार नाही. तू फक्त आपले अपराध कबूल कर. कारण तू तुझ्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध बंड केलंय.” (यिर्म. ३:१२, १३) तसंच, यहोवाने योएल संदेष्ट्याद्वारे त्यांना असं सांगितलं: “पूर्ण मनाने माझ्याकडे परत या.” (योए. २:१२, १३) शिवाय, यशया संदेष्ट्याद्वारे त्याने असं घोषित केलं: “स्वतःला धुऊन शुद्ध करा, तुमची दुष्ट कामं माझ्या नजरेपुढून दूर करा; वाईट कामं करायचं सोडून द्या.” (यश. १:१६-१९) तसंच, यहोवाने यहेज्केलद्वारे त्यांना असं विचारलं: “एखादा दुष्ट माणूस मरतो, तेव्हा मला आनंद होतो का? त्याने आपला दुष्टपणा सोडून द्यावा आणि जिवंत राहावं, असंच मला वाटत नाही का? कोणाच्याही मृत्यूने मला आनंद होत नाही. . . . म्हणून मागे वळा आणि जिवंत राहा.” (यहे. १८:२३, ३२) पापी लोक पश्चात्ताप करतात तेव्हा यहोवाला आनंद होतो. कारण त्याची अशी इच्छा आहे की त्यांनी सर्वकाळ जगावं. तर आपण हे शिकलो की पापी लोकांना मदत करण्याआधी त्यांनी स्वतःमध्ये बदल करावा, याची यहोवा वाट पाहत राहत नाही. चला याची काही उदाहरणं पाहू या.
७. संदेष्टा होशेय आणि त्याच्या बायकोचं उदाहरण वापरून यहोवाने त्याच्या लोकांना काय शिकवलं?
७ यहोवाने होशेय संदेष्टा आणि त्याच्या बायकोच्या उदाहरणावरून त्याच्या लोकांना काय शिकवलं ते पाहू या. व्यभिचार केल्यानंतर तिने इतर पुरुषांसाठी होशेयला सोडून दिलं. मग ती मदत करण्याच्या पलीकडे होती का? यहोवा मनं ओळखणारा देव आहे. त्याने होशेयला सांगितलं: “इस्राएलचे लोक दुसऱ्या देवांच्या मागे जातात . . . तरीसुद्धा मी त्यांच्यावर प्रेम करतो; तसाच आता तूही, जिच्यावर दुसरा माणूस प्रेम करतो आणि जी व्यभिचार करत आहे, अशा स्त्रीवर पुन्हा प्रेम कर.” (होशे. ३:१; नीति. १६:२) लक्ष द्या, होशेयची बायको अजूनही गंभीर पाप करत होती. तरीसुद्धा, यहोवाने होशेयला तिच्याकडे पाठवलं, तिला क्षमा करायला सांगितलं आणि तिला पुन्हा आपली बायको म्हणून स्वीकारायला सांगितलं. a त्याच प्रकारे यहोवाने आपल्या हट्टी लोकांबद्दल आशा सोडली नव्हती. ते अजूनही गंभीर पापं करत होते तरीसुद्धा त्याचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांना आपले मार्ग बदलायला आणि पश्चात्ताप करायला मदत करण्यासाठी, त्याने स्वतःहून संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठवलं. या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं, की एका व्यक्तीच्या मनात जे काही चाललंय ते यहोवाला कळतं. तसंच, ती व्यक्ती अजूनही गंभीर पाप करत असेल, तरी यहोवा तिला पश्चात्ताप करायला मदत करतो. (नीति. १७:३) चला या बाबतीत आपण आणखी माहिती घेऊ या.
यहोवा पापी लोकांना पश्चात्ताप करायला कशी मदत करतो?
८. काइनला पश्चात्ताप करता यावा यासाठी यहोवाने त्याला कशी मदत केली? (उत्पत्ती ४:३-७) (चित्रसुद्धा पाहा.)
८ काइन हा आदाम आणि हव्वाचा मोठा मुलगा होता. त्याच्या आईवडिलांकडून त्याला पापी वृत्ती वारशाने मिळाली. इतकंच नाही, तर बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याची स्वतःची कार्यं दुष्ट होती.” (१ योहा. ३:१२) कदाचित यामुळेच, जेव्हा काइनने बलिदान अर्पण केलं तेव्हा यहोवाने “काइनचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही.” पण आपलं वागणं बदलण्याऐवजी “काइनला खूप राग आला आणि तो नाराज झाला.” मग यहोवाने काय केलं? तो काइनशी बोलला. (उत्पत्ती ४:३-७ वाचा. तळटीप पाहा.) लक्ष द्या, की यहोवाने प्रेमळपणे काइनशी तर्क केला. यहोवाने त्याला सांगितलं, की त्याने जर आपलं चुकीचं वागणं सोडून दिलं तर तो त्याला आशीर्वाद देईल. त्यासोबतच, यहोवाने त्याला सांगितलं, की रागामुळे त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते. पण, दुःखाची गोष्टी म्हणजे काइनने त्याचं ऐकलं नाही. यहोवा त्याला पश्चात्ताप करायला मदत करत होता, पण त्याने ती मदत स्वीकारली नाही. काइनने यहोवाचं ऐकलं नाही, म्हणून आता कोणत्याच पापी व्यक्तीला पश्चात्ताप करायला मदत करायची नाही असं यहोवाने ठरवलं का? मुळीच नाही!
९. यहोवाने दावीदला पश्चात्ताप करायला कशी मदत केली?
९ यहोवाचं दावीद राजावर मनापासून प्रेम होतं. त्याने असंही म्हटलं, हा “माझ्या मनासारखा माणूस” आहे. (प्रे. कार्यं १३:२२) पण दावीदच्या हातून व्यभिचार आणि खून यांसारखी गंभीर पापं घडली. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याला मृत्यूदंड दिला गेला पाहिजे होता. (लेवी. २०:१०; गण. ३५:३१) असं असलं तरी, यहोवाला त्याला पश्चात्ताप करायला मदत करायची होती. b दावीदच्या मनात अजूनही पश्चात्तापाची चिन्हं नव्हती, तरीसुद्धा यहोवाने नाथान संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवलं. नाथान संदेष्ट्याने असं एक उदाहरण वापरलं जे दावीदच्या मनाला भिडलं. या उदाहरणामुळे त्याला हे समजायला मदत झाली, की त्याने किती गंभीर चुका केल्या आहेत. त्यामुळे तो मनापासून पश्चात्ताप करायला प्रवृत्त झाला. (२ शमु. १२:१-१४) त्याला किती पश्चात्ताप झाला होता हे त्याने लिहिलेल्या स्तोत्रातून दिसून येतं. (स्तो. ५१, उपरीलेखन) या स्तोत्रामुळे बऱ्याच पापी लोकांना सांत्वन मिळालंय आणि पश्चात्ताप करायची प्रेरणाही मिळाली आहे. यहोवाने दावीदला पश्चात्ताप करायला मदत केली हे किती बरं झालं!
१०. यहोवा आपल्यासारख्या पापी माणसांसोबत धीराने वागतो आणि आपल्याला क्षमा करतो याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
१० यहोवाला सर्व प्रकारच्या पापाची घृणा वाटते. (स्तो. ५:४, ५) पण त्याला हेसुद्धा माहीत आहे की आपण सगळे पापी आहोत. आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो पापाविरुद्ध लढायला आपल्याला मदत करतो. सर्वात वाईट पापं करणाऱ्या माणसांनासुद्धा तो पश्चात्ताप करायला आणि त्याच्याजवळ यायला सतत मदत करत असतो. ही गोष्ट आपल्याला खरंच किती सांत्वन देणारी आहे! जेव्हा आपण यहोवाच्या धीराच्या आणि क्षमेच्या गुणावर विचार करतो, तेव्हा त्याला विश्वासू राहायचा आपला निश्चय आणखी पक्का होतो. तसंच, जेव्हा आपल्या हातून पाप घडतं तेव्हा त्याबद्दल लगेच पश्चात्ताप करण्याचा आपला निश्चयसुद्धा पक्का होतो. आता, येशूने आपल्या शिष्यांना पश्चात्तापाबद्दल आणखी काय शिकवलं ते पाहू या.
येशूचे शिष्य पश्चात्ताप करण्याबद्दल काय शिकले?
११-१२. यहोवा आपल्याला क्षमा करायला उत्सुक आहे हे शिकवण्यासाठी येशूने कोणतं उदाहरण वापरलं? (चित्र पाहा.)
११ पहिल्या शतकात मसीहा येण्याची वेळ आली होती. आपण आधीच्या लेखात पाहिलं त्याप्रमाणे यहोवाने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा आणि येशू ख्रिस्ताचा वापर करून शिकवलं, की पश्चात्ताप करणं किती महत्त्वाचं आहे.—मत्त. ३:१, २; ४:१७.
१२ पृथ्वीवर असताना येशूने लोकांना शिकवलं, की आपण पाप करतो तेव्हा त्याचा पिता आपल्याला क्षमा करायला उत्सुक असतो. हा महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी येशूने हरवलेल्या मुलाची गोष्ट सांगितली. हा मुलगा आपलं घर सोडून गेला आणि त्याने खूप वाईट गोष्टी केल्या. पण मग तो “भानावर आला” आणि पुन्हा घरी आला. मग त्या वेळी त्याचे वडील त्याच्याशी कसे वागले? येशूने म्हटलं: “तो दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले.” त्या मुलाने मनात असा विचार केला होता, की ‘मी माझ्या वडिलांना, मी त्यांच्या घरात मजूर म्हणून राहू शकतो का? असं विचारीन.’ पण त्याच्या वडिलांनी म्हटलं ‘हा माझा मुलगा आहे’ आणि त्याला पुन्हा घरात घेतलं. ते असंही म्हणाले: “तो हरवला होता आणि आता सापडलाय.” (लूक १५:११-३२) येशूने हे उदाहरण का दिलं? पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता. त्याच्या पित्याने पश्चात्ताप करणाऱ्या असंख्य पापी लोकांना दया दाखवून कशी क्षमा केली हे त्याने नक्कीच पाहिलं असेल. खरंच, आपल्या दयाळू पित्याचं, यहोवाचं किती सुंदर चित्र येशूने रेखाटलं!
१३-१४. (क) प्रेषित पेत्र पश्चात्ताप करण्याबद्दल काय शिकला? (ख) त्याने याबद्दल इतरांना काय शिकवलं? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ प्रेषित पेत्रला येशूकडून पश्चात्ताप करण्याबद्दल आणि क्षमा करण्याबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. पेत्रला बऱ्याच वेळा क्षमेची गरज पडली. आणि येशूने मोठ्या मनाने त्याला क्षमा केलं. उदाहरणार्थ, पेत्रने आपल्या प्रभूला तीन वेळा नाकारलं, तेव्हा पेत्रला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल. (मत्त. २६:३४, ३५, ६९-७५) पण येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर, तो पेत्रला एकट्यात भेटला. (लूक २४:३३, ३४; १ करिंथ. १५:३-५) यात काहीच शंका नाही, की त्या वेळी येशूने प्रेमळपणे पेत्रला क्षमा केली आणि त्याला या गोष्टीची खातरीही करून दिली.—मार्क १६:७.
१४ पश्चात्ताप केल्यामुळे आणि क्षमा मिळाल्यामुळे कसं वाटतं हे पेत्रला समजलं होतं. म्हणून या गोष्टी तो इतरांनाही शिकवू शकला. पेन्टेकॉस्टच्या सणाच्या काही काळानंतर, त्याने यहुद्यांपुढे एक भाषण दिलं. त्याने त्यांना समजावून सांगितलं, की त्यांनी मसीहाला ठार मारलं होतं. तरीसुद्धा त्याने प्रेमळपणे त्यांना असं सांगितलं: “पश्चात्ताप करा आणि मागे वळा, म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील. आणि खुद्द यहोवाकडून तुम्हाला तजेला मिळेल.” (प्रे. कार्यं ३:१४, १५, १७, १९) अशा प्रकारे पेत्रने हे दाखवून दिलं की पश्चात्तापामुळे एक पापी व्यक्ती पुन्हा मागे वळते. म्हणजे, ती आपल्या विचार करण्याचा आणि वागण्या-बोलण्याचा वाईट मार्ग सोडून देते. आणि देवाला आवडेल अशा नवीन मार्गावर चालू लागते. प्रेषित पेत्रने हेसुद्धा दाखवलं, की यहोवा त्यांची पापं कायमची पुसून टाकेल किंवा नाहीशी करेल. पुढे अनेक दशकांनंतर, त्याने ख्रिश्चनांना असं सांगितलं: “यहोवा . . . तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) आपण जेव्हा आपल्या पापांसाठी, मग ती कितीही गंभीर असली तरी पश्चात्ताप करतो, तेव्हा आपण याची खातरी ठेवू शकतो की यहोवा आपल्याला पूर्णपणे क्षमा करेल. आणि ही खरंच किती सुंदर आशा आहे, नाही का?
१५-१६. (क) प्रेषित पौलला क्षमा करण्याबद्दल कसं शिकायला मिळालं? (१ तीमथ्य १:१२-१५) (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
१५ पश्चात्तापाची आणि क्षमेची जर सर्वात जास्त कोणाला गरज होती, तर तो होता शौल. त्याने येशूच्या शिष्यांचा क्रूरपणे छळ केला. बहुतेक शिष्यांना वाटायचं की तो कधीच बदलू शकणार नाही. पण येशू सामान्य लोकांसारखा विचार करणारा नव्हता. त्याने आणि त्याच्या पित्याने शौलमधले चांगले गुण पाहिले. येशूने म्हटलं: “हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.” (प्रे. कार्यं ९:१५) शौलला पश्चात्ताप करायला मदत करण्यासाठी येशूने एक चमत्कारसुद्धा केला. (प्रे. कार्यं ७:५८–८:३; ९:१-९, १७-२०) ख्रिस्ती बनल्यानंतर शौलला प्रेषित पौल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याला जी दया दाखवण्यात आली होती आणि जी क्षमा मिळाली होती त्याबद्दलची कदर त्याने बऱ्याच वेळा व्यक्त केली. (१ तीमथ्य १:१२-१५ वाचा.) त्याने भाऊबहिणींना असं शिकवलं: “देव दयाळूपणे [तुम्हाला] पश्चात्ताप करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करत आहे.”—रोम. २:४.
१६ मग पुढे, पौलला करिंथच्या मंडळीत घडलेल्या एका गंभीर पापाबद्दल समजलं. पाप करणाऱ्या व्यक्तीला मंडळीत राहू देण्यात आलं होतं. मग पौलने ही समस्या कशी हाताळली? त्याने ही समस्या ज्या प्रकारे हाताळली त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आपण शिकतो, की यहोवा कशी प्रेमाने शिस्त लावतो आणि दया दाखवणं किती गरजेचं आहे. या घटनेबद्दल आपण येणाऱ्या लेखात आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत.
गीत ३३ आपला भार यहोवावर टाक
a अशी गोष्ट फक्त त्या वेळीच घडली. आज जर जोडप्यातल्या एका साथीदाराने व्यभिचार केला तर दुसऱ्या साथीदाराने त्याच्यासोबत लग्नाच्या बंधनात राहावंच अशी अपेक्षा यहोवा करत नाही. इतकंच काय, तर यहोवाने आपल्या मुलाद्वारे या गोष्टीची स्पष्ट समज दिली. येशूने सांगितलं की अशा परिस्थितीत निर्दोष साथीदार त्याला हवं असेल तर घटस्फोट घेऊ शकतो.—मत्त. ५:३२; १९:९.
b १५ नोव्हेंबर, २०१२ च्या टेहळणी बुरूज अंकातला पान २१-२३ वरचा “यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?” या लेखाचे परिच्छेद ३-१० पाहा.