अभ्यास लेख ३१
गीत १२ महान देव यहोवा
पापी माणसांना सोडवायला यहोवाने काय केलंय?
“देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला.”—योहा. ३:१६.
या लेखात:
आपल्याला पापासोबत लढता यावं म्हणून यहोवा पुढाकार कसा घेत आलाय? तसंच, आपल्याला पापापासून मुक्त असलेलं कायमचं जीवन जगण्याची संधी त्याने कशी दिली आहे? हे आपण पाहू या.
१-२. (क) पाप म्हणजे काय आणि आपण त्याच्यावर विजय कसा मिळवू शकतो? (“शब्दाचा अर्थ” सुद्धा पाहा) (ख) या आणि या टेहळणी बुरूज अंकातल्या इतर लेखांमध्ये आपण कशावर चर्चा करणार आहोत? (पान ३२ वरची “वाचकांसाठी” ही चौकटसुद्धा पाहा.)
यहोवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का? यासाठी एक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे, पाप आणि मृत्यूपासून आपल्याला सोडवण्यासाठी त्याने काय केलंय याचा अभ्यास करणं. पाप a हा एक भयानक शत्रू आहे. त्याला आपण स्वतःच्या बळावर हरवू शकत नाही. आपण दररोज पाप करतो आणि त्यामुळे मरतो. (रोम. ५:१२) पण एक आनंदाची बातमी आहे. यहोवाच्या मदतीने आपण पापावर विजय मिळवू शकतो. खरंतर, आपला विजय अगदी पक्का आहे!
२ यहोवा देव जवळपास ६,००० वर्षांपासून मानवांना पापाविरुद्ध लढायला मदत करतोय. का? कारण त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे. खरंतर, सुरुवातीपासूनच त्याचं मानवांवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने त्यांना या लढाईत मदत करण्यासाठी खूप काही केलंय. त्याला माहीत आहे पापामुळे मृत्यू होतो आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण मरू नये. खरंतर, त्याला असं वाटतं की आपण कायम जगावं. (रोम. ६:२३) आणि तुमच्याबद्दलही त्याला असंच वाटतं. या लेखात आपण तीन प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: (१) यहोवाने पापी मानवांना कोणती आशा दिली? (२) बायबलच्या काळात पापी माणसांना यहोवाला खूश कसं करता आलं? (३) माणसांना पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी येशूने काय केलं?
यहोवाने पापी मानवांना कोणती आशा दिली?
३. आपले पहिले आईवडील पापी कसे बनले?
३ यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवलं तेव्हा त्याची इच्छा होती की त्यांनी आनंदी राहावं. म्हणूनच त्याने त्यांना एक सुंदर घर दिलं, विवाहाची व्यवस्था केली आणि एक खूप चांगलं काम दिलं. त्यांना एदेन बागेप्रमाणे या पृथ्वीलासुद्धा एक नंदनवन बनवायचं होतं. तसंच, आपल्या मुलाबाळांनी ही पृथ्वी भरून टाकायची होती. पण यहोवाने त्यांना फक्त एक साधीसोपी आज्ञा दिली होती. त्याने त्यांना समजावलं होतं, की त्यांनी ही आज्ञा मोडली तर ते त्याच्याविरुद्ध जाणूनबुजून बंड केल्यासारखं होईल. आणि त्यांच्या या पापामुळे त्यांचा मृत्यू होईल. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की पुढे काय घडलं. एका दुष्ट स्वर्गदूताने त्यांना भुलवलं आणि पाप करायला प्रवृत्त केलं. त्याचं देवावर आणि माणसांवर प्रेम नव्हतं. आदाम आणि हव्वा त्याच्या वाईट प्रभावाखाली आले. त्यांनी आपल्या प्रेमळ पित्यावर भरवसा ठेवला नाही आणि ते पाप करून बसले. पुढे यहोवाने म्हटल्याप्रमाणेच झालं. त्या दिवसापासून त्यांना आपल्या पापाचे परिणाम भोगावे लागले. ते म्हातारे होऊ लागले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.—उत्प. १:२८, २९; २:८, ९, १६-१८; ३:१-६, १७-१९, २४; ५:५.
४. यहोवाला पापाची चीड का आहे आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी तो आपल्याला कशी मदत करतो? (रोमकर ८:२०, २१)
४ या घटनेचे परिणाम जरी दुःखद असले, तरी यहोवाने आपल्या फायद्यासाठी त्याबद्दल बायबलमध्ये लिहून ठेवलंय. त्यामुळे आपल्याला कळतं, की त्याला पापाबद्दल इतकी चीड का आहे. पापामुळे आपण आपल्या पित्यापासून दूर जातो आणि त्यामुळेच आपला मृत्यू होतो. (यश. ५९:२) बंडखोर सैतानाला पाप करायला आवडतं. त्याने आदाम आणि हव्वाला पाप करायला प्रवृत्त केलं आणि आजही तो मानवांना पाप करायला प्रवृत्त करतोय. त्याला कदाचित वाटलं असेल की त्याने एदेन बागेत खूप मोठा विजय मिळवला. पण यहोवा देव किती प्रेमळ आहे हे त्याला समजत नाही. आदाम आणि हव्वाच्या वंशजांसाठी असलेला उद्देश यहोवाने कधीच बदलला नाही. त्याचं मानवांवर इतकं प्रेम आहे की त्याने लगेच त्यांना एक आशा दिली. (रोमकर ८:२०, २१ वाचा.) यहोवाला माहीत होतं की आदाम आणि हव्वाच्या वंशजांपैकी काही जण त्याच्यावर प्रेम करायचं निवडतील आणि पापाविरुद्ध लढण्यासाठी त्याची मदत मागतील. त्यांचा पिता या नात्याने तो त्यांना पापापासून मुक्त होण्यासाठी आणि त्याच्याजवळ येण्यासाठी मदत करणार होता. हे सगळं यहोवा कसं करणार होता?
५. पापी माणसांना यहोवाकडून आशेची पहिली झलक केव्हा मिळाली? समजावून सांगा. (उत्पत्ती ३:१५)
५ उत्पत्ती ३:१५ वाचा. यहोवाने सैतानाला शिक्षा सुनावली तेव्हा मानवांना आशेची पहिली झलक मिळाली. त्याने सांगितलं की एका ‘संततीमुळे’ मानवांना पुढे आशा मिळणार होती. ही संतती सैतानाचा नाश करणार होती आणि एदेन बागेत झालेल्या बंडामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करणार होती. (१ योहा. ३:८) पण, असं करताना या संततीला दुःख सहन करावं लागणार होतं. कारण त्याआधी सैतान त्या संततीवर घाव करणार होता आणि तिचा मृत्यू होणार होता. या सगळ्यामुळे यहोवाला खूप दुःख होणार होतं. पण यहोवा ते दुःख सहन करायला तयार होता. कारण त्यामुळे असंख्य मानवांची पाप आणि मृत्यूपासून सुटका होणार होती.
बायबलच्या काळात पापी माणसांनी यहोवाला खूश कसं केलं?
६. हाबेल आणि नोहासारख्या विश्वासू माणसांनी यहोवाशी जवळचं नातं जोडण्यासाठी काय केलं?
६ पापी माणसं यहोवासोबत नातं जोडण्यासाठी काय करू शकतात हे यहोवाने येणाऱ्या शतकांमध्ये हळूहळू स्पष्ट केलं. एदेन बागेत झालेल्या बंडानंतर आदाम आणि हव्वाचा मुलगा हाबेल हा पहिला माणूस होता, ज्याने यहोवावर विश्वास ठेवला. हाबेलचं यहोवावर प्रेम होतं. त्याला यहोवाला खूश करायचं होतं आणि त्याच्याशी एक जवळचं नातं जोडायचं होतं. म्हणून त्याने यहोवाला बलिदान अर्पण केलं. हाबेल मेंढपाळ होता. म्हणून त्याने आपल्या कळपातली काही कोकरं घेतली आणि ती बलिदान म्हणून यहोवाला अर्पण केली. मग यहोवाला कसं वाटलं? त्याने “हाबेलचा आणि त्याच्या अर्पणाचा स्वीकार केला.” (उत्प. ४:४) इतर लोकांनीही जेव्हा यहोवावर प्रेम केलं, त्याच्यावर भरवसा दाखवला आणि त्याला अशाच प्रकारे अर्पणं दिली, तेव्हा त्याने ती स्वीकारली. नोहासुद्धा अशाच लोकांपैकी एक होता. (उत्प. ८:२०, २१) अशा प्रकारची बलिदानं स्वीकारून यहोवाने दाखवलं की पापी माणसं त्याला खूश करू शकत होती आणि त्याच्याशी एक जवळचं नातं जोडू शकत होती. b
७. अब्राहामने आपल्या मुलाचं बलिदान द्यायची तयारी दाखवली यावरून आपण काय शिकतो?
७ अब्राहामचा यहोवावर मजबूत विश्वास होता. यहोवा देवाने त्याला एक खूप कठीण गोष्ट करायला सांगितली. त्याने अब्राहामला आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान द्यायला सांगितलं. अब्राहामसाठी ही गोष्ट नक्कीच सोपी नव्हती. तरीही तो ही गोष्ट करायला तयार झाला. पण देवाने त्याला अगदी ऐनवेळी थांबवलं. या उदाहरणातून आपल्याला हे शिकायला मिळतं की यहोवा भविष्यात काय करणार होता. तो आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान देणार होता. विचार करा: यहोवा देवाचं माणसांवर किती प्रेम आहे!—उत्प. २२:१-१८.
८. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिली जाणारी बलिदानं कशाची झलक होती? (लेवीय ४:२७-२९; १७:११)
८ याच्या बऱ्याच शतकांनंतर इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र देण्यात आलं. त्यात बऱ्याच बलिदानांबद्दल सांगितलं होतं. या बलिदानांमुळे देवाच्या लोकांना त्यांच्या पापांची माफी मिळणार होती. (लेवीय ४:२७-२९; १७:११ वाचा.) ही बलिदानं एका मोठ्या बलिदानाची झलक होती. आणि त्या बलिदानामुळे संपूर्ण मानवजातीला पापापासून पूर्णपणे सुटका मिळणार होती. देवाच्या संदेष्ट्यांनी त्याच्या प्रेरणेने हे समजावून सांगितलं की वचन दिलेली संतती कोण असणार होती. ही संतती देवाचा एकुलता एक मुलगा असणार होती. त्याला दुःख सहन करून शेवटी मरावं लागणार होतं. एका मेंढरासारखं त्याचं अर्पण दिलं जाणार होतं. (यश. ५३:१-१२) विचार करा: यहोवाने संपूर्ण मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी त्याच्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान देण्याची व्यवस्था केली आणि हे बलिदान तुमच्यासाठीही आहे.
मानवांना सोडवण्यासाठी येशूने काय केलं?
९. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने येशूबद्दल काय म्हटलं? (इब्री लोकांना ९:२२; १०:१-४, १२)
९ पहिल्या शतकात, देवाचा सेवक असलेल्या बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने नासरेथकर येशूकडे बघून म्हटलं: “पाहा! जगाचं पाप दूर करणारा देवाचा कोकरा!” (योहा. १:२९) या शब्दांवरून कळलं की येशू हा वचन दिलेली संतती आहे. देवाने वचन दिल्याप्रमाणे येशू स्वतःचं बलिदान देणार होता. मानवांना पापातून पूर्णपणे सोडवण्यासाठी यहोवाची संतती आता आली होती!—इब्री लोकांना ९:२२; १०:१-४, १२ वाचा.
१०. येशू पापी लोकांना ‘बोलवायला आलाय’ हे त्याने कसं दाखवलं?
१० पापाच्या ओझ्यामुळे दबलेल्या लोकांवर येशूने खास लक्ष दिलं. त्याने त्यांना त्याचे शिष्य बनण्याचं आमंत्रण दिलं. त्याला माहीत होतं की मानवजातीच्या दुःखाचं मूळ कारण पाप आहे. त्यामुळे त्याने पापी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुषांना स्वतःहून मदत केली. एका उदाहरणाचा वापर करून त्याने असं समजावलं: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.” याबद्दल तो पुढे म्हणाला: “मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.” (मत्त. ९:१२, १३) येशू जे बोलला त्याप्रमाणे त्याने केलंसुद्धा. जेव्हा एका पापी स्त्रीने अश्रूंनी त्याचे पाय भिजवले, तेव्हा त्या स्त्रीची पापं त्याने प्रेमळपणे क्षमा केली. (लूक ७:३७-५०) तसंच, एकदा एका विहिरीजवळ त्याला एक शोमरोनी स्त्री भेटली. त्याला तिच्या अनैतिक जीवनाबद्दल माहीत होतं. तरीसुद्धा त्याने तिला महत्त्वाची सत्यं शिकवली. (योहा. ४:७, १७-१९, २५, २६) पापाचा सर्वात भयानक परिणाम म्हणजे मृत्यू. पण देवाने येशूला मृत्यूही काढून टाकण्याची ताकद दिली. ते कसं? येशूने स्त्रियांना, पुरुषांना, लहान मुलांना आणि मोठ्यांना पुन्हा जिवंत केलं.—मत्त. ११:५.
११. पापी लोक येशूकडे का ओढले गेले?
११ यात काहीच आश्चर्य नाही, की पापात पूर्णपणे बुडालेले लोकसुद्धा येशूकडे ओढले गेले. कारण त्यांना कसं वाटतं हे त्याने समजून घेतलं आणि तो त्यांच्याशी दयाळूपणे वागला. आणि तेही मोकळेपणाने त्याच्याकडे येऊ शकत होते. (लूक १५:१, २) त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याने त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना आशीर्वाद दिला. (लूक १९:१-१०) त्याच्या पित्याची दया कशी आहे याचं एक सुंदर चित्र त्याने त्यांच्यासमोर मांडलं. (योहा. १४:९) आपल्या वागण्या-बोलण्यातून येशूने हे दाखवून दिलं की त्याच्या दयाळू पित्याचं लोकांवर प्रेम आहे. तसंच, पापाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येकाला मदत करायची त्याच्या पित्याची इच्छा आहे, हेसुद्धा त्याने दाखवून दिलं. येशूने पापी लोकांना त्यांचा मार्ग बदलायला आणि त्याच्यामागे यायला मदत केली.—लूक ५:२७, २८.
१२. येशूने त्याच्या मृत्यूबद्दल लोकांना काय शिकवलं?
१२ येशूला माहीत होतं की पुढे त्याच्यासोबत काय होणार होतं. म्हणूनच त्याने अनेकदा आपल्या शिष्यांना हे सांगितलं, की त्याचा विश्वासघात केला जाईल आणि त्याला वधस्तंभावर ठार मारलं जाईल. (मत्त. १७:२२; २०:१८, १९) पण त्याला हेसुद्धा माहीत होतं की त्याच्या बलिदानामुळे या जगातल्या लोकांचं पाप दूर होणार होतं. आणि याबद्दलच योहानने आणि इतर संदेष्ट्यांनीही आधी सांगितलं होतं. येशूने हे शिकवलं की त्याने आपल्या जीवनाचं खंडणी बलिदान दिल्यानंतर, तो “सगळ्या प्रकारच्या लोकांना” त्याच्याकडे आकर्षित करेल. (योहान १२:३२) येशूला आपला प्रभू मानून आणि त्याच्या पावलांवर चालून पापी लोक यहोवाला खूश करू शकणार होते. त्यांनी जर असं केलं तर ते “पापातून मुक्त होणार होते.” (रोम. ६:१४, १८, २२; योहा. ८:३२) आणि म्हणूनच येशू स्वेच्छेने आणि धैर्याने एका भयानक मृत्यूला सामोरा गेला.—योहा. १०:१७, १८.
१३. येशूचा मृत्यू कसा झाला आणि त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला यहोवा देवाबद्दल काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ विचार करा, येशूसोबत कायकाय घडलं? त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याला अटक करण्यात आली, त्याला शिव्याशाप देण्यात आले, त्याची बदनामी करण्यात आली, त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. इतकंच नाही तर, त्याला खूप यातनाही देण्यात आल्या. शेवटी मारण्यासाठी सैनिक त्याला वधस्तभांवर लटकवायला घेऊन गेले. येशूने विश्वासूपणे या सगळ्या यातना तर सोसल्याच, पण अशीही एक व्यक्ती होती, जिला यावेळी त्याच्यापेक्षाही जास्त यातना झाल्या. ती व्यक्ती म्हणजे यहोवा देव. यहोवा देवाकडे अफाट शक्ती आहे. येशूला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकला असता. पण त्याने असं केलं नाही. का? एक प्रेमळ पिता अशा प्रकारे का वागला? एका शब्दात सांगायचं तर, प्रेमापोटी. येशूने म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”—योहा. ३:१६.
१४. येशूच्या बलिदानामुळे तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१४ आदाम आणि हव्वाच्या वंशजांवर यहोवाचं किती प्रेम आहे, याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे येशूचं खंडणी बलिदान. यावरून हेच सिद्ध होतं, की यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला पाप आणि मृत्यूपासून सोडवायला त्याने कल्पना करता येणार नाही इतकं दुःख सोसलं. त्याने सर्वात मोठी किंमत मोजली! (१ योहा. ४:९, १०) हो, पापाशी लढत राहायला आपल्यापैकी प्रत्येकाला मदत करायची त्याची इच्छा आहे. आणि त्याला असं वाटतं, की आपण ही लढाई जिंकावी!
१५. देवाने आपल्याला येशूच्या खंडणी बलिदानाची जी भेट दिली आहे, त्यातून फायदा मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
१५ देवाने आपल्याला, त्याच्या एकुलत्या एका मुलाच्या खंडणी बलिदानाची भेट दिली. आणि यामुळेच आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळू शकते. पण देवाकडून क्षमा मिळवण्यासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. पण आपण नक्की काय केलं पाहिजे? याचं उत्तर बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आणि मग स्वतः येशू ख्रिस्ताने दिलं. त्याने म्हटलं: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.” (मत्त. ३:१, २; ४:१७) म्हणून, आपल्याला जर खरंच पापाशी लढायचं असेल आणि आपल्या प्रेमळ पित्याच्या जवळ यायचं असेल, तर आपण पश्चात्ताप केला पाहिजे. पण पश्चात्ताप करण्यात काय सामील आहे? आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पापी वृत्तीशी लढायला कशी मदत होते? याचं उत्तर आपल्याला पुढच्या लेखात मिळेल.
गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ
a शब्दाचा अर्थ: बायबलमध्ये “पाप” हा शब्द सहसा चुकीच्या कामांना सूचित करतो. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती यहोवाच्या नैतिक स्तरांप्रमाणे वागायला किंवा जगायला चुकते. पण “पाप” या शब्दाचा आणखी एक अर्थ असू शकतो. तो म्हणजे आदामपासून वारशाने आपल्याला मिळालेली अपरिपूर्णता किंवा पापी स्थिती. वारशाने मिळालेल्या पापामुळेच आपण सगळे मरतो.