अभ्यास लेख ३
आपल्या हृदयाचं रक्षण करा?
“सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.”—नीति. ४:२३.
गीत ५२ मनाचे रक्षण करा
सारांश *
१-३. (क) यहोवाचं शलमोनवर प्रेम का होतं आणि शलमोनला कोणते आशीर्वाद मिळाले? (ख) या लेखातून आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत?
शलमोन तरुण असताना इस्राएलचा राजा बनला. राजा बनल्याच्या काही काळानंतर यहोवाने त्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हटलं: “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.” शलमोनने उत्तर दिलं: “मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही . . . यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त [आज्ञाधारक हृदय, NW] दे.” (१ राजे ३:५-१०) ‘आज्ञाधारक हृदय’ देण्याच्या या मागणीवरून शलमोनने दाखवून दिलं की त्याला आपल्या कमतरतांची जाणीव होती. आणि यामुळेच यहोवाचं शलमोनवर प्रेम होतं. (२ शमु. १२:२४) या तरुण राजाचं उत्तर ऐकून देवाचं मन इतकं आनंदित झालं की त्याने शलमोनला “बुद्धिमान व विवेकी चित्त” दिलं.—१ राजे ३:१२.
२ शलमोन यहोवाला विश्वासू राहिला तोपर्यंत त्याला भरपूर आशीर्वाद मिळाले. त्याला इस्राएलाचा देव यहोवा याच्यासाठी मंदिर बांधण्याचा बहुमान मिळाला. (१ राजे ८:२०) देवाने दिलेल्या बुद्धीमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. तसंच, त्याने देवाच्या प्रेरणेने लिहिले शब्द बायबलच्या तीन पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत. त्यांपैकी एक पुस्तक म्हणजे नीतिसूत्रे.
३ नीतिसूत्रे या पुस्तकात ‘हृदय’, ‘अंतःकरण’ किंवा ‘मन’ यांचा उल्लेख जवळपास शंभर वेळा केला आहे. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे ४:२३ या वचनात म्हटलं आहे: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.” या वचनात अंतःकरण किंवा हृदय कशाला सूचित करतं? आपण या प्रश्नाचं उत्तर या लेखातून मिळवणार आहोत. यासोबतच आपण इतर दोन प्रश्नांची उत्तरंही मिळवणार आहोत. ती म्हणजे: सैतान कशा प्रकारे आपलं हृदय भ्रष्ट करू पाहतो आणि आपण आपल्या हृदयाचं रक्षण कसं करू शकतो? देवाला विश्वासू राहण्यासाठी आपल्याला या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं आहे.
‘आपलं हृदय’ म्हणजे काय?
४-५. (क) स्तोत्र ५१:६ यावरून हृदय म्हणजे काय हे आपल्याला कसं समजायला मदत होते? (ख) शरीराची काळजी घेण्याच्या उदाहरणावरून लाक्षणिक हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे हे आपल्याला कसं कळतं?
४ नीतिसूत्रे ४:२३ मध्ये दिलेला शब्द “अंतःकरण” किंवा ‘हृदय’ हे आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत याला सूचित करतं. (स्तोत्र ५१:६ वाचा.) दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ‘हृदय’ आपले गुप्त विचार, भावना, हेतू आणि इच्छा यांना सूचित करतं. म्हणजे आपण बाहेरून कसे आहोत याला हे सूचित करत नाही तर आपण आतून कशी व्यक्ती आहोत याला हे सूचित करतं.
५ आपण आतून कशी व्यक्ती आहोत हे समजण्यासाठी आपण आपल्या शरीराचं उदाहरण घेऊ या. पहिली गोष्ट म्हणजे, शारीरिक रीत्या सुदृढ राहण्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे आणि नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. त्याच प्रकारे, आपलं लाक्षणिक हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण नियमितपणे बायबल आणि बायबल आधारित साहित्यं वाचली पाहिजेत आणि यहोवावर विश्वास असल्याचं दाखवलं पाहिजे. विश्वास दाखवण्यात शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करणं आणि त्याबद्दल इतरांना सांगणं सामील आहे. (रोम. १०:८-१०; याको. २:२६) दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या बाह्य स्वरूपावरून असं वाटू शकतं की आपण सुदृढ आहोत, पण खरंतर आपल्याला आतून कोणता तरी आजार असेल. त्याच प्रकारे, आपल्या आध्यात्मिक नित्यक्रमाच्या आधारावर आपल्याला वाटू शकतं की आपला विश्वास मजबूत आहे, पण चुकीचे विचार कदाचित आपल्या मनात वाढत असतील. (१ करिंथ. १०:१२; याको. १:१४, १५) सैतान त्याच्या विचारांनी आपलं मन दूषित करू पाहतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण तो हे नेमकं कशा प्रकारे करू शकतो आणि आपण आपलं रक्षण कसं करू शकतो?
सैतान आपलं हृदय कसं दूषित करण्याचा प्रयत्न करतो?
६. सैतानाचं कोणतं ध्येय आहे आणि तो ते कसं गाठण्याचा प्रयत्न करतो?
६ सैतानाने यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करून बंड केलं आणि तो स्वार्थी होता. आणि त्याची इच्छा आहे की आपणदेखील त्याच्यासारखं व्हावं. पण त्याच्यासारखा विचार करण्यासाठी किंवा वागण्यासाठी तो आपल्यावर बळजबरी करू शकत नाही. म्हणून तो इतर मार्गांनी त्याचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, त्याच्याद्वारे आधीच भ्रष्ट झालेल्या लोकांना तो आपल्या अवतीभोवती ठेवण्याचा प्रयत्न करतो. (१ योहा. ५:१९) अशा वाईट लोकांसोबत राहून आपले विचार आणि कार्यं भ्रष्ट होतील हे आपल्याला माहीत असतं, पण तरीही तो आशा बाळगतो की आपण अशा लोकांसोबत वेळ घालवू. (१ करिंथ. १५:३३) हीच युक्ती शलमोन राजाच्याबाबतीत यशस्वी ठरली. त्याने मूर्तिपूजा करणाऱ्या बऱ्याच स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांचा हळूहळू त्याच्यावर जबरदस्त प्रभाव झाला आणि त्यांनी यहोवापासून “त्याचे मन बहकवले.”—१ राजे ११:३.
७. सैतान आणखी कोणत्या मार्गाने त्याची विचारसरणी पसरवतो आणि आपण सतर्क का राहिलं पाहिजे?
७ सैतान आपली विचारसरणी पसरवण्यासाठी चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रम यांचा उपयोग करतो. त्यांतल्या कहाण्या फक्त आपलं मनोरंजनच करत नाहीत, तर आपल्याला हेदेखील शिकवतात की आपले विचार, भावना आणि वागणं कसं असलं पाहिजे. येशूने महत्त्वपूर्ण धडे शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. जसं की, त्याने चांगल्या शोमरोन्याच्या आणि उधळ्या पुत्राच्या उदाहरणांचा वापर केला. (मत्त. १३:३४; लूक १०:२९-३७; १५:११-३२) पण सैतानाच्या विचारांनी दूषित झालेले लोक आपल्याला भ्रष्ट करण्यासाठी कहाण्यांचा वापर करतील. अशा वेळी आपण समजबुद्धीचा वापर केला पाहिजे. हे खरं आहे की काही चित्रपट आणि टिव्हीवरचे कार्यक्रम आपले विचार भ्रष्ट न करता आपलं मनोरंजन करू शकतात व आपल्याला त्यांतून शिकायलाही मिळतं. पण असं असलं तरी आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून मनोरंजन निवडताना आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारणं गरजेचं आहे: ‘शारीरिक इच्छेला बळी पडण्यात काहीच चूक नाही, असं हा चित्रपट किंवा टिव्ही कार्यक्रम मला शिकवतो का?’ (गलती. ५:१९-२१; इफिस. २:१-३) एखादा कार्यक्रम सैतानाच्या विचारांना बढावा देत असल्याचं तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही काय कराल? एका संसर्गजन्य रोगापासून जसं तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करता, तसंच या प्रकारच्या मनोरंजनापासूनही दूर राहा!
८. मुलांना त्यांच्या हृदयाचं रक्षण करायला पालक कशी मदत करू शकतात?
८ पालकांनो, सैतानाच्या प्रभावापासून तुमच्या मुलांचं संरक्षण करण्याची खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. आजारांपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न करता. यासाठी तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवता आणि घरात अशा कोणत्याही गोष्टी ठेवत नाही, ज्यामुळे तुम्ही व तुमची मुलं आजारी पडतील. त्याच प्रकारे, सैतानाच्या विचारसरणीमुळे तुमची मुलं भ्रष्ट होण्याची नीति. १:८; इफिस. ६:१, ४) त्यामुळे तुमच्या कुटुंबात बायबलवर आधारित नियम घालून देण्यासाठी कचरू नका. तुमच्या लहान मुलांना सांगा की काय पाहावं आणि काय पाहू नये. तसंच, त्यामागची कारणंही त्यांना समजण्यासाठी मदत करा. (मत्त. ५:३७) मुलं मोठी होत असताना यहोवाच्या स्तरांनुसार काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्यांना स्वतः ठरवण्यासाठी प्रशिक्षित करा. (इब्री ५:१४) आणि हे लक्षात असू द्या की तुम्ही जे बोलता, त्यापेक्षा तुम्ही जे करता त्यावरून तुमची मुलं खूप काही शिकतात.—अनु. ६:६, ७; रोम. २:२१.
शक्यता असलेले चित्रपट, टिव्ही कार्यक्रम, इलेक्ट्रॉनिक गेम्स आणि वेबसाईट यांपासून तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे. मुलांच्या आध्यात्मिकतेची जबाबदारी यहोवाने तुमच्यावर सोपवली आहे. (९. सैतान कोणत्या एका विचाराला बढावा देतो आणि तो धोकेदायक का आहे?
९ यहोवाच्या बुद्धीपेक्षा मानवी बुद्धीवर भरवसा ठेवणं योग्य आहे, या विचारानेदेखील सैतान आपलं हृदय भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सै. २:८) सैतान बढावा देत असलेला एक विचार लक्षात घ्या. तो म्हणजे, श्रीमंत होणं ही आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असायला हवी. असा विचार करणारे लोक कदाचित श्रीमंत बनतील किंवा बनणार नाहीत. पण दोन्ही बाबतीत धोका आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण पैसा कमवण्याचं ध्येय गाठण्यासाठी ते कदाचित आपलं आरोग्य, कौटुंबिक नातेसंबंध आणि देवासोबत असलेलं त्यांचं नातंदेखील धोक्यात घालतील. (१ तीम. ६:१०) खरंच, स्वर्गात राहणारा आपला सुज्ञ पिता आपल्याला पैशांच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवायला मदत करतो. आणि यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत!—उप. ७:१२; लूक १२:१५.
आपण आपल्या हृदयाचं रक्षण कसं करू शकतो?
१०-११. (क) आपलं संरक्षण करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? (ख) प्राचीन काळातले पहारेकरी काय करायचे आणि आपला विवेक एका पहारेकऱ्यासारखा कसा कार्य करू शकतो?
१० आपल्याला जर आपल्या हृदयाचं रक्षण करण्यात यशस्वी व्हायचं असेल तर धोके ओळखणं आणि संरक्षणासाठी लगेच पाऊल उचलणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे ४:२३ मध्ये भाषांतरित केलेला शब्द “रक्षण” यामुळे आपल्याला एका पहारेकऱ्याच्या कामाची आठवण होते. शलमोन राजाच्या दिवसांत पहारेकरी शहराच्या भिंतींवर तैनात असायचे. कोणी शत्रू येत असल्याचं त्यांना दिसलं की ते लगेच इशारा द्यायचे. आपल्या मनात याचं चित्र उभं केल्याने आपल्याला समजतं की सैतानाला आपली विचारसरणी भ्रष्ट करण्यापासून रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.
११ प्राचीन काळात पहारेकरी शहराच्या द्वारपालासोबत मिळून काम करायचे. (२ शमु. १८:२४-२६) एखादा शत्रू जवळ येत असल्यास शहराचे फाटक बंद आहेत याची ते खात्री करून घ्यायचे. असं करण्याद्वारे ते एकत्र मिळून शहराचं रक्षण करायचे. (नहे. ७:१-३) आपले विचार, भावना, हेतू आणि इच्छा यांवर सैतान प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. असं करण्याद्वारे जेव्हा तो आपल्या हृदयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपला बायबल प्रशिक्षित विवेक * एका पहारेकऱ्यासारखा आपल्याला सावध करू शकतो. ज्या वेळी आपला विवेक आपल्याला इशारा देतो, त्या वेळी आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि धोका टाळण्यासाठी लगेच फाटक बंद केलं पाहिजे; म्हणजेच आपल्या परीने होता होईल तितके प्रयत्न केले पाहिजेत.
१२-१३. आपल्याला कोणती गोष्ट करण्याचा मोह होऊ शकतो, पण आपली काय प्रतिक्रिया असली पाहिजे?
१२ सैतानाच्या विचारांनी प्रभावीत होण्यापासून आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. यहोवाने आपल्याला शिकवलं आहे की आपल्यामध्ये “अनैतिक लैंगिक कृत्ये, कोणत्याही प्रकारचा अशुद्धपणा व लोभ यांचा उल्लेखही होऊ नये.” (इफिस. ५:३) पण समजा आपल्या शाळेतले किंवा कामावरचे सोबती लैंगिक अनैतिकता या विषयावर बोलत असले तर? आपल्याला माहीत आहे, की आपण “देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करावा.” (तीत २:१२) आपला विवेक एका पहारेकऱ्यासारखा आपल्याला धोक्याचा इशारा देईल. (रोम. २:१५) पण आपण त्याचं ऐकू का? आपल्याला कदाचित त्याच्याऐवजी आपल्या सोबत्यांचं ऐकण्याचा किंवा ते दाखवत असलेले चित्र बघण्याचा मोह होऊ शकतो. पण शहराचं फाटक बंद करण्याची, म्हणजे धोका टाळण्याची हीच संधी आहे. अशा वेळी आपण विषय दुसरीकडे वळवणं किंवा तिथून निघून जाणं योग्य राहील.
१३ आपले सोबती आपल्यावर चुकीचे विचार किंवा कार्य करण्याचा दबाव टाकतात तेव्हा त्यांचा विरोध करायला धैर्य लागतं. आपण करत असलेले प्रयत्न यहोवा पाहतो. तसंच, तो आपल्याला सैतानाची विचारसरणी टाळण्यासाठी लागणारी शक्ती व बुद्धी देईल याची आपण खात्री बाळगू शकतो. (२ इति. १६:९; यश. ४०:२९; याको. १:५) आपल्या हृदयाचं रक्षण करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो?
सतर्क राहा
१४-१५. (क) आपण कोणत्या गोष्टीसाठी आपलं हृदय उघडलं पाहिजे आणि हे आपण कसं करू शकतो? (ख) नीतिसूत्रे ४:२०-२२ ही वचनं आपल्याला बायबल वाचनातून पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी कशी मदत करतात? (“ मनन कसं करावं?” ही चौकटदेखील पाहा.)
१४ चुकीच्या प्रभावांपासून आपलं रक्षण होण्यासाठी आपल्या हृदयाचं फाटक बंद करणंच फक्त पुरेसं नाही, तर चांगल्या गोष्टींसाठी ते उघडणंही गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा भिंती असलेल्या शहराच्या उदाहरणाचा विचार करू या. शत्रू शहराच्या आत येऊ नये म्हणून द्वारपाल फाटक बंद करतो. पण अन्न किंवा इतर सामग्री आत आणण्यासाठी त्याला इतर वेळी फाटक उघडावं लागतं. पण जर फाटक नेहमीच बंद ठेवलं तर शहरातले लोक उपाशी राहतील. त्याच प्रकारे, देवाच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव होण्यासाठी आपण हृदयाचं फाटक नियमितपणे उघडलं पाहिजे.
१५ बायबलमध्ये यहोवाचे विचार दिले आहेत. म्हणून आपण प्रत्येक वेळी जेव्हा बायबल वाचतो तेव्हा आपण यहोवाच्या विचारांचा आपल्या विचारांवर, भावनांवर व कार्यांवर प्रभाव होऊ देतो. आपण बायबल वाचनातून पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकतो? यासाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. एक ख्रिस्ती बहीण म्हणते: “वचनात दिलेल्या ‘अद्भुत गोष्टी’ मला स्पष्ट दिसण्यासाठी मदत व्हावी, म्हणून बायबल वाचण्याआधी मी यहोवाला प्रार्थना करते.” (स्तो. ११९:१८) आपण वाचलेल्या गोष्टींवर मननही केलं पाहिजे. आपण जेव्हा प्रार्थना करतो, बायबल वाचतो आणि मनन करतो तेव्हा देवाच्या वचनात दिलेल्या गोष्टी “आपल्या अंतःकरणात” खोलवर जातात आणि यहोवाची विचारसरणी आपल्याला प्रिय वाटू लागते.—नीतिसूत्रे ४:२०-२२ वाचा; स्तो. ११९:९७.
१६. JW ब्रॉडकास्टिंग पाहिल्याने बऱ्याच जणांना कसा फायदा झाला आहे?
१६ आणखी एका मार्गाने यहोवाचे विचार आपल्यावर प्रभाव पाडू शकतात. तो मार्ग म्हणजे, JW ब्रॉडकास्टिंगवरचे कार्यक्रम बघणे. एक जोडपं म्हणतं: “दर महिन्याला येणारे कार्यक्रम हे जणू आमच्या प्रार्थनांचं उत्तरंच आहेत! आम्ही जेव्हा निराश होतो किंवा आम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन आणि बळ मिळतं. आम्ही घरी असतो तेव्हा अनेकदा ब्रॉडकास्टिंगमधली गाणी लावतो. आम्ही कधी चहा घेताना, स्वयंपाक किंवा साफसफाई करताना ती ऐकतो.” खरंच, या कार्यक्रमांमुळे आपल्या हृदयाचं रक्षण करायला आपल्याला मदत होते. हे कार्यक्रम आपल्याला यहोवासारखा विचार करायला आणि सैतानाच्या विचारसरणीचा प्रतिकार करायला शिकवतात.
१७-१८. (क) १ राजे ८:६१ या वचनानुसार आपण यहोवाकडून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्या तर काय होईल? (ख) हिज्कीया राजाच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (ग) स्तोत्र १३९:२३, २४ या वचनात दिलेल्या दावीदच्या प्रार्थनेनुसार आपण कशाबद्दल प्रार्थना केली पाहिजे?
१७ योग्य त्या गोष्टी करण्याचे कोणते फायदे होतात हे प्रत्येक वेळी जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपला विश्वास आणखी मजबूत होतो. (याको. १:२, ३) आपण आपल्या वागण्याद्वारे यहोवाचं मन आनंदित केलं आहे, यामुळे त्याला आपल्याबद्दल अभिमान वाटतो व तो आपल्याला त्याच्या मुलांपैकी एक समजतो. आणि यामुळे आपल्याला आनंद होतो व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होतो. (नीति. २७:११) प्रत्येक परीक्षा ही आपल्यासाठी एक संधी आहे, कारण अशा वेळी आपण दाखवतो की आपण आपल्या प्रेमळ पित्याची सेवा वरवर किंवा अर्ध्या मनाने करत नाही. (स्तो. ११९:११३) याउलट, आपण दाखवून देतो की आपण यहोवावर पूर्ण हृदयाने प्रेम करतो. त्याची आज्ञा पाळण्याचा आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा आपला पक्का निर्धार आहे.—१ राजे ८:६१ वाचा.
१८ आपल्या हातून चुका होतील का? हो, कारण आपण अपरिपूर्ण आहोत. जर तुम्ही अडखळलात तर हिज्कीया राजाचं उदाहरण लक्षात ठेवा. त्याच्या हातून चुका झाल्या, पण त्याने पश्चात्ताप केला आणि तो “सात्विक मनाने” किंवा पूर्ण हृदयाने चालला. (यश. ३८:३-६; २ इति. २९:१, २; ३२:२५, २६) तेव्हा, आपली विचारसरणी भ्रष्ट करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांना आपण नाकारू या. आणि आपलं हृदय आज्ञाधारक बनण्यासाठी आपण प्रार्थनाही करू या. (१ राजे ३:९; स्तोत्र १३९:२३, २४ वाचा.) जर आपण कुठल्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त आपल्या हृदयाचं रक्षण केलं तर आपण यहोवाला विश्वासू राहू शकू.
गीत ३२ निर्भय व निश्चयी राहा!
^ परि. 5 आपण यहोवाला विश्वासू राहणार की सैतानाच्या बहकाव्यात येऊन देवाची उपासना करणं सोडून देणार? याचं उत्तर, आपल्यावर किती मोठी परीक्षा येते यावर अवलंबून नसून आपण आपल्या हृदयाचं रक्षण किती चांगल्या प्रकारे करतो यावर अवलंबून आहे. ‘हृदय’ किंवा ‘अंतःकरण’ याचा काय अर्थ होतो? सैतान आपलं हृदय कसं भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो? आणि आपण त्याचं रक्षण कसं करू शकतो? या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं या लेखात दिली आहेत.
^ परि. 11 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाने आपल्याला आपले विचार, भावना आणि कार्यं यांचं परीक्षण करण्याची क्षमता दिली आहे. त्यामुळे आपण ठरवू शकतो की आपण दोषी आहोत किंवा निर्दोष. बायबल या क्षमतेला विवेक असं म्हणतं. (रोम. २:१५; ९:१) एक बायबल प्रशिक्षित विवेक म्हणजे एक असा विवेक जो बायबलमध्ये दिलेले यहोवाचे स्तर वापरून आपले विचार, शब्द आणि कार्यं बरोबर आहेत की चूक हे ठरवतो.
^ परि. 56 चित्राचं वर्णन: एक बाप्तिस्माप्राप्त बांधव टिव्ही पाहत आहे आणि अचानक टिव्हीवर एक अनैतिक दृश्य येतं. पुढे काय करायचं हे बांधवाला ठरवावं लागेल.
^ परि. 58 चित्राचं वर्णन: प्राचीन काळातला एक पहारेकरी शहराबाहेर धोका असल्याचं पाहतो. खाली उभे असलेल्या द्वारपालांना तो हाक मारतो आणि ते लगेच शहराचे फाटक बंद करून आतून अडसर किंवा लाकडी फळी लावून घेतात.