व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १

“घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे”

“घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे”

“तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.”​—यश. ४१:१०.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१-२. (क) यशया ४१:१० मध्ये दिलेल्या संदेशामुळे योशीकोला कसं प्रोत्साहन मिळालं? (ख) यहोवाने यशया ४१:१० मध्ये दिलेल्या संदेशामुळे कोणाला फायदा होऊ शकतो?

योशीको नावाच्या एका विश्‍वासू ख्रिस्ती बहिणीला एक वाईट बातमी मिळाली. तिच्या डॉक्टरांनी सांगितलं की तिच्याकडे आता फक्‍त काहीच महिने उरले आहेत. हे ऐकल्यावर तिची काय प्रतिक्रिया होती? त्या वेळी योशीकोला आपलं आवडतं वचन यशया ४१:१० आठवलं. (वाचा.) मग तिने शांतपणे डॉक्टरांना सांगितलं की तिला भीती वाटत नाही, कारण यहोवाने तिचा हात धरला आहे. * त्या वचनात दिलेल्या सांत्वनदायक संदेशामुळे आपल्या या बहिणीला यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायला मदत मिळाली. या वचनामुळे आपल्यालाही कठीण परीक्षांचा सामना करताना घाबरून न जाता शांत राहायला मदत मिळू शकते. पण हे कसं शक्य आहे? हे समजण्याआधी आपण देवाने हा संदेश यशयाला का दिला ते पाहू या.

सुरुवातीला यहोवाने यशयाला हे शब्द अशा यहुदी लोकांना सांत्वन देण्यासाठी लिहून ठेवायला सांगितले ज्यांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात येणार होतं. पण यहोवाने हा संदेश फक्‍त यहुदी बंदीवानांसाठीच नाही, तर त्यानंतरच्या त्याच्या सर्व सेवकांसाठीही सुरक्षितपणे नमूद करून ठेवला आहे. (यश. ४०:८; रोम. १५:४) आज आपण ‘कठीण काळात’ जगत आहोत आणि यामुळे आपल्याला यशयाच्या पुस्तकात दिलेल्या प्रोत्साहनाची खूप जास्त गरज आहे.​—२ तीम. ३:१.

३. (क) २०१९ साठी असलेलं वार्षिक वचन, यशया ४१:१० यात कोणती अभिवचनं दिली आहेत? (ख) या अभिवचनांमुळे मिळणाऱ्‍या आश्‍वासनांची आपल्याला का गरज आहे?

या लेखात आपण यशया ४१:१० मधल्या विश्‍वास बळकट करणाऱ्‍या यहोवाच्या तीन अभिवचनांबद्दल चर्चा करणार आहोत: (१) यहोवा आपल्यासोबत असेल, (२) तो आपला देवा आहे आणि (३) तो आपलं साहाय्य करेल. आपल्याला या आश्‍वासनांची * गरज आहे, कारण योशीकोप्रमाणेच आपल्यालाही जीवनात परीक्षांना तोंड द्यावं लागतं. तसंच, या जगात चाललेल्या वाईट गोष्टींमुळेही आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच काय तर, आपल्यापैकी काहींना शक्‍तिशाली सरकारांकडून होत असलेल्या छळाचा सामना करावा लागत आहे. आता आपण एक-एक करून या तीन आश्‍वासनांवर चर्चा करू या.

“मी तुझ्याबरोबर आहे”

४. (क) पहिलं आश्‍वासन कोणतं आहे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत? (तळटीपदेखील पाहा.) (ख) यहोवाला आपल्याबद्दल कसं वाटतं? (ग) देवाच्या शब्दांमुळे तुम्हाला कसं वाटतं?

यहोवा आपल्याला पहिलं आश्‍वासन देतो: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” * आपल्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याद्वारे आणि आपली काळजी करण्याद्वारे यहोवा दाखवतो की तो आपल्यासोबत आहे. त्याला आपली मनापासून काळजी आहे हे व्यक्‍त करण्यासाठी तो काय म्हणतो याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “तू माझ्या दृष्टीने अमोल  आहेस; तू मोठ्या योग्यतेचा  आहेस व मी तुजवर प्रेम  करतो.” (यश. ४३:४) या जगातली कोणतीच शक्‍ती यहोवाला त्याच्या सेवकांवर प्रेम करत राहण्यापासून थांबवू शकत नाही. त्याची आपल्यासाठी असलेली एकनिष्ठता स्थिर आणि अटळ आहे. (यश. ५४:१०) त्याचं प्रेम आणि मैत्री यांमुळे आपल्याला खूप धैर्य मिळतं. त्याने आपल्या मित्राला, अब्रामला (अब्राहामला) जसं सुरक्षित ठेवलं, तसं तो आज आपल्यालाही सुरक्षित ठेवेल. यहोवाने त्याला म्हटलं होतं: “अब्रामा, भिऊ नको; मी तुझी ढाल आहे.”​—उत्प. १५:१.

यहोवाच्या मदतीमुळे आपण सामना करत असलेल्या पुरांसारख्या आणि ज्वालांसारख्या परीक्षेतून पार होऊ शकतो (परिच्छेद ५-६ पाहा) *

५-६. (क) परीक्षा येतात तेव्हा यहोवाला आपली मदत करण्याची इच्छा आहे हे आपल्याला कसं कळतं? (ख) योशीकोच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

आपल्याला माहीत आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्‍या परीक्षांदरम्यान यहोवाला आपली मदत करण्याची इच्छा आहे. पण असं आपण का म्हणू शकतो? कारण त्याने आपल्या लोकांना वचन दिलं आहे: “तू जलातून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन;  नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.” (यश. ४३:२) या शब्दांचा काय अर्थ होतो?

आपल्या जीवनातून समस्या नाहीशा होतील असं अभिवचन यहोवा आपल्याला देत नाही. पण तो आपल्याला समस्यांच्या ‘नद्यांत’ बुडू देणार नाही किंवा परीक्षांच्या “अग्नीतून” जाताना अशी इजा होऊ देणार नाही ज्यामुळे आपलं कायमचं नुकसान होईल. तो नेहमी आपल्यासोबत राहील आणि समस्यांचा सामना करत असताना आपली मदत करेल याची तो हमी देतो. यहोवा हे कसं करेल? आपल्या भीतींवर मात करायला आणि आपलं मन शांत ठेवायला तो आपली मदत करेल. यामुळे शेवटच्या श्‍वासापर्यंत आपण त्याच्याप्रती असलेली आपली एकनिष्ठता टिकवून ठेवू शकू. (यश. ४१:१३) आधी उल्लेख केलेल्या योशीकोच्या बाबतीतही हेच घडलं. तिची मुलगी म्हणते: “त्या संपूर्ण काळात आई खूप शांत आणि खंबीर होती ही गोष्ट आमच्या मनाला भिडली. आम्ही पाहू शकलो की यहोवाने खरंच तिला मनाची शांती दिली. तिचा मृत्यू झाला त्या दिवसापर्यंत ती नर्स आणि इतर रुग्णांशी यहोवाबद्दल आणि त्याच्या अभिवचनांबद्दल बोलत होती.” आपण योशीकोच्या उदाहरणावरून काय शिकतो? “मी तुझ्याबरोबर आहे” या देवाच्या अभिवचनावर आपण जेव्हा भरवसा दाखवतो तेव्हा आपल्यालाही परीक्षांचा सामना करण्यासाठी धैर्य आणि शक्‍ती मिळते.

“मी तुझा देव आहे”

७-८. (क) दुसरं आश्‍वासन कोणतं आहे आणि याचा काय अर्थ होतो? (ख) “घाबरू नको” असं यहोवाने यहुदी बंदिवानांना का म्हटलं? (ग) यशया ४६:३, ४ मध्ये दिलेल्या कोणत्या शब्दांमुळे देवाच्या लोकांचं मन शांत झालं?

यशयाने ज्या दुसऱ्‍या आश्‍वासनाची नोंद केली त्याकडे लक्ष द्या: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.” भीतीबद्दल किंवा चिंताबद्दल असलेल्या या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? या वचनांत “घाबरू नको” यासाठी असलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा अर्थ, “आपल्याला कोणत्यातरी गोष्टीमुळे किंवा व्यक्‍तीमुळे धोका आहे या भीतीने सारखं मागे पाहणं” किंवा “धोकेदायक परिस्थितीत असताना एखादी व्यक्‍ती जशी घाबरून जाते तसं घाबरून जाणं” असा होतो.

यहोवा देवाने बाबेलच्या बंदिवासात जाणाऱ्‍या यहुदी लोकांना “घाबरू नको” असं का म्हटलं? कारण त्याला माहीत होतं की तिथले रहिवासी भयभीत होतील. ते कशामुळे? यहुदी बंदीवासात गेल्याच्या ७० वर्षांच्या शेवटी मेद व पारस यांचं शक्‍तिशाली सैन्य बाबेलवर हल्ला करणार होतं. आपल्या लोकांना बाबेलच्या बंदिवासातून सोडवण्यासाठी यहोवा या सैन्याचा वापर करणार होता. (यश. ४१:२-४) जेव्हा बाबेलच्या लोकांना आणि तिथल्या इतर लोकांना कळलं की त्यांचा शत्रू त्यांच्यावर हल्ला करणार आहे, तेव्हा त्यांनी “हिंमत धर” असं म्हणून एकमेकांना धीर दिला. खोटे देव त्यांना मदत करतील या आशेने त्यांनी आणखीन मूर्ती घडवल्या. (यश. ४१:५-७) पण त्यादरम्यान यहोवाने यहुदी बंदिवानांची मने शांत केली. त्याने इस्राएलला म्हटलं: “तू माझा सेवक आहेस [तुझे शेजारी नाहीत] . . . घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.” (यश. ४१:८-१०) यहोवाने त्यांना काय म्हटलं याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “मी  तुझा देव आहे.” या शब्दांद्वारे यहोवाने आपल्या विश्‍वासू उपासकांना आश्‍वासन दिलं की तो त्यांना विसरलेला नाही. तो अजूनही त्यांचा देव आहे आणि ते त्याचे लोक आहेत. तो त्यांना म्हणाला: “मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन.” या सांत्वनदायक आणि प्रोत्साहनदायक शब्दांमुळे यहुदी बंदिवानांना नक्कीच धैर्य मिळालं असेल!​—यशया ४६:३, ४ वाचा.

९-१०. आपल्याला घाबरण्याची गरज का नाही? एक उदाहरण द्या.

आज कधी नव्हे इतकी जगाची परिस्थिती खालावत चालली आहे. यामुळे लोक चिंतित आहेत, घाबरले आहेत. आणि हे खरं आहे की या समस्यांचा आपल्यावरही परिणाम होतो. पण आपल्याला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. यहोवा आपल्याला म्हणतो: “मी तुझा देव आहे.” आपलं मन शांत ठेवण्यासाठी हे विधान इतकं प्रभावशाली का आहे?

१० एका उदाहरणावर विचार करा: जीम आणि बेन विमानाने प्रवास करत असताना जोराचा वारा सुटल्यामुळे विमान हलू लागतं. विमानाला जोराचे हिसके बसायला लागतात तेव्हा पायलट घोषणा करतो: “आपले सीट बेल्ट बांधून ठेवा. आता काही वेळासाठी आपल्याला खराब वातावरणामुळे थोडा त्रास होणार आहे.” जीमला खूपच भीती वाटायला लागते. पण पायलट पुढे म्हणतो: “मी तुमचा पायलट बोलत आहे, सगळं काही नियंत्रणात आहे. तुम्ही घाबरू नका.” हे ऐकल्यावर जीम अविश्‍वास दाखवत म्हणतो, “आपण सुखरूप पोहोचू याची काय गॅरंटी?” आणि त्याचं लक्ष बेनकडे जातं. बेन मात्र अगदी शांत दिसतो, त्याच्या चेहऱ्‍यावर कसलीच चिंता दिसत नाही. जीम त्याला विचारतो: “तू इतका शांत कसा काय बसू शकतोस?” यावर बेन हसून म्हणतो: “मी या पायलटला चांगलं ओळखतो. ते माझे बाबा आहेत!” मग बेन पुढे म्हणतो: “मी तुला माझ्या बाबांबद्दल सांगतो. ते किती चांगले पायलट आहेत हे ऐकल्यावर तूही नक्कीच शांत होशील आणि घाबरणार नाहीस.”

११. दोन प्रवाशांच्या उदाहरणावरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

११ या उदाहरणावरून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात? बेनसारखंच आपणदेखील शांत राहतो कारण आपल्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. या व्यवस्थेच्या शेवटच्या दिवसांत आपल्याला वादळासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण यहोवा आपल्याला यातून नक्कीच सुरक्षित रीत्या पार घेऊन जाईल हे आपल्याला माहीत आहे. (यश. ३५:४) हे जग पूर्णपणे भीतीच्या विळख्यात असताना आपलं मन शांत राहतं कारण आपला भरवसा यहोवावर आहे. (यश. ३०:१५) आपण जेव्हा लोकांना सांगतो की आपला भरवसा देवावर का आहे, तेव्हा एका अर्थी आपणही बेनसारखं कार्य करत असतो. असं केल्यामुळे लोकांनाही भरवसा मिळेल की त्यांना जरी कितीही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला, तरी यहोवा त्यांना मदत करेल.

“मी तुला शक्‍ती देतो [आणि] मी तुझे साहाय्यही करतो”

१२. (क) आपण चर्चा करणार असलेलं तिसरं आश्‍वासन कोणतं आहे? (ख) यहोवाचा “भुज” यावरून आपल्याला त्याच्याबद्दल काय समजतं?

१२ यशयाने नमूद केलेल्या तिसऱ्‍या आश्‍वासनाकडे लक्ष द्या: “मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.” यहोवा आपल्या लोकांना कशी शक्‍ती देईल याबद्दल यशयाने आधीच सांगितलं होतं. त्याने म्हटलं: “प्रभु परमेश्‍वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज  त्याचे प्रभुत्व चालवील.” (यश. ४०:१०) बायबलमध्ये शक्‍ती दर्शवण्यासाठी अनेकदा “भुज” किंवा बाहू या शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे यहोवाचा “भुज त्याचे प्रभुत्व चालवील” या वाक्यांशातून आपल्याला समजतं की यहोवा हा शक्‍तिशाली राजा आहे. प्राचीन काळात त्याने त्याच्या असीम सामर्थ्याचा वापर आपल्या सेवकांना साहाय्य करण्यासाठी व वाचवण्यासाठी केला होता. आणि तो आजही त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांचं धैर्य वाढवतो आणि संरक्षण करतो.​—अनु. १:३०, ३१; यश. ४३:१०.

यहोवाच्या मजबूत बाहूंमध्ये सुरक्षित असल्यामुळे कोणतेही हत्यार आपल्याविरुद्ध चालणार नाही (परिच्छेद १२-१६ पाहा) *

१३. (क) आपल्याला शक्‍ती देण्याचं वचन यहोवा खासकरून केव्हा पाळतो? (ख) कोणत्या हमीमुळे आपल्याला धैर्यवान बनायला आणि विश्‍वास वाढवायला मदत होते?

१३ “मी तुला शक्‍ती देतो” हे अभिवचन यहोवा खासकरून शत्रू आपला छळ करतात तेव्हा पूर्ण करतो. आज काही देशांमध्ये शत्रू आपलं प्रचारकार्य थांबवण्याचा किंवा आपल्या संघटनेवर बंदी आणण्याचा खूप करत प्रयत्न आहेत. पण असे हल्ले होत असतानाही आपण अवाजवी चिंता करत नाही. यहोवाने आपल्याला हमी दिल्यामुळे आपल्याला धैर्य मिळतं व आपला भरवसा वाढतो. त्याने आपल्याला अभिवचन दिलं आहे: “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) या वचनामुळे आपल्याला तीन महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत होते.

१४. देवाचे शत्रू आपल्यावर हल्ला करतील याबद्दल आपल्याला आश्‍चर्य का वाटत नाही?

१४ पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याला अपेक्षित आहे की ख्रिस्ताचे अनुयायी यानात्याने आपला द्वेष केला जाईल. (मत्त. १०:२२) शेवटच्या दिवसांत येशूच्या शिष्यांचा तीव्र छळ केला जाईल असं त्याने आधीच सांगितलं होतं. (मत्त. २४:९; योहा. १५:२०) दुसरी गोष्ट म्हणजे, यशयाच्या भविष्यवाणीमुळे आपल्याला इशारा मिळतो, की आपले शत्रू फक्‍त आपला द्वेषच करणार नाहीत तर आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या हत्यारांचाही वापर करतील. ते कदाचित आपली फसवणूक करतील किंवा आपल्याबद्दल खोटं पसरवतील अथवा आपला तीव्र छळही करतील. (मत्त. ५:११) यहोवा शत्रूंना आपल्याविरुद्ध हत्यारांचा वापर करण्यापासून थांबवणार नाही. (इफिस. ६:१२; प्रकटी. १२:१७) पण अशा वेळी आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपण असं का म्हणू शकतो?

१५-१६. (क) आपण कोणती तिसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि यशया २५:४, ५ याचं कसं समर्थन करतं? (ख) यशया ४१:११, १२ या वचनांनुसार आपल्याविरुद्ध लढणाऱ्‍यांना कोणते परिणाम भोगावे लागतील?

१५ आपण कोणती तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे आता आपण पाहू. यहोवाने म्हटलं की आपल्याविरुद्ध चालवले जाणारे “कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.”  ज्या प्रकारे एक भिंत भयानक वादळी पावसापासून आपलं संरक्षण करते, त्याच प्रकारे यहोवा आपलं ‘निर्दय लोकांच्या झपाट्यापासून’ संरक्षण करतो. (यशया २५:४, ५ वाचा.) आपले शत्रू आपल्याला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवण्यात कधीच यशस्वी होणार नाहीत.​—यश. ६५:१७.

१६ आपल्यावर “क्षुब्ध” झालेल्या किंवा रागावलेल्या लोकांना कोणते परिणाम भोगावे लागतील याबद्दल यहोवा सविस्तर माहिती देतो. असं करण्याद्वारे तो त्याच्यावर असलेला आपला भरवसा आणखी वाढवतो. (यशया ४१:११, १२ वाचा.) आपल्या शत्रूंनी आपल्याविरुद्ध लढण्यासाठी कितीही प्रयत्न केले किंवा आक्रमक युद्ध लढले तरी त्याचा एकच परिणाम असणार आहे. तो म्हणजे, देवाच्या लोकांचे शत्रू “शून्यवत्‌ व नष्ट होतील.”

यहोवावरचा भरवसा आणखी वाढवा

आपण बायबलमधून यहोवाबद्दल नियमितपणे वाचन केल्यामुळे त्याच्यावर असलेला आपला भरवसा आणखी वाढवू शकतो (परिच्छेद १७-१८ पाहा) *

१७-१८. (क) बायबलचं वाचन केल्याने यहोवावरचा आपला भरवसा कसा वाढतो? एक उदाहरण द्या. (ख) २०१९ सालच्या वार्षिक वचनावर मनन केल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

१७ यहोवाला आणखी चांगल्या रीतीने जाणल्यामुळे आपण त्याच्यावर असलेला आपला भरवसा वाढवू शकतो. असं करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, बायबलचं वाचन आणि त्यावर मनन करणं. यहोवाने प्राचीन काळात आपल्या लोकांचं कसं संरक्षण केलं याबद्दल बायबलमध्ये भरवशालायक अहवाल दिले आहेत. या अहवालांमुळे आपल्याला खात्री पटते की तो आजदेखील आपली काळजी घेईल.

१८ यहोवा आपलं रक्षण कसं करतो हे समजण्यासाठी यशयाने एका सुंदर शब्दचित्राचा उपयोग केला. त्याने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी आणि त्याच्या सेवकांची तुलना कोकरांशी केली. यशया यहोवाबद्दल म्हणतो: “मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणाऱ्‍यांस संभाळून नेईल.” (यश. ४०:११) आपण जेव्हा यहोवाच्या मजबूत बाहूंमध्ये असल्याचं अनुभवतो, तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित आणि शांत वाटतं. समस्यांचा सामना करत असताना आपलं मन शांत असावं यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने यशया ४१:१० हे वचन २०१९ सालचं वार्षिक वचन म्हणून निवडलं आहे: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे.”  भरवसा वाढवणाऱ्‍या या शब्दांवर मनन करा. असं केल्यामुळे पुढे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी हे शब्द तुम्हाला नक्कीच बळ देतील.

गीत २२ यहोवा माझा मेंढपाळ

^ परि. 5 जगात किंवा आपल्या जीवनात वाईट गोष्टी घडतात तेव्हादेखील आपण घाबरून न जाता शांत का राहिलं पाहिजे, याची तीन कारणं आपल्याला २०१९ सालच्या वार्षिक वचनामुळे मिळतात. या लेखात आपण त्या कारणांवर चर्चा करणार आहोत. असं केल्यामुळे आपल्याला कमी चिंता करायला आणि यहोवावर जास्त भरवसा ठेवायला मदत मिळेल. वार्षिक वचनावर मनन करा. शक्य असल्यास ते पाठ करा. यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्‍या समस्यांचा धीराने सामना करण्यासाठी बळ मिळेल.

^ परि. 3 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: आश्‍वासन म्हणजे एक सत्य विधान किंवा एक असं अभिवचन जे नक्कीच पूर्ण होणार आहे. आपल्या जीवनात समस्या उद्‌भवल्यावर यहोवाने दिलेल्या आश्‍वासनामुळे आपली चिंता कमी होते.

^ परि. 4 यशया ४१:१०, १३ आणि १४ या वचनांत “भिऊ नको” या वाक्यांशाचा उल्लेख तीन वेळा करण्यात आला आहे. याच वचनांत “मी” (यहोवाला उद्देशून असलेला) हा शब्ददेखील अनेकदा आढळतो. यहोवाने यशयाला “मी” हा शब्द इतक्या वेळा लिहायला का प्रेरित केलं? एका महत्त्वपूर्ण सत्यावर जोर देण्यासाठी. ते म्हणजे, यहोवावर भरवसा बाळगल्यामुळेच आपण आपल्या भीतींवर मात करू शकतो.

^ परि. 52 चित्राचं वर्णन: एका कुटुंबातल्या सदस्यांना कामावर, सेवाकार्यात, शाळेत आणि शारीरिक समस्यांबाबतीत परिक्षांचा सामना करावा लागतो.

^ परि. 54 चित्राचं वर्णन: एका घरात साक्षीदारांची सभा चालू  असताना पोलीस धाड घालतात, पण बंधुभगिनी घाबरत नाहीत.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: नियमितपणे कौटुंबिक उपासना केल्यामुळे आपल्याला धीर धरण्यासाठी बळ मिळतं.