व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

सभेला उपस्थित राहिल्याने आपल्याबद्दल काय कळतं?

सभेला उपस्थित राहिल्याने आपल्याबद्दल काय कळतं?

“प्रभू येईपर्यंत . . . तुम्ही त्याच्या मृत्यूची घोषणा [करा].”​—१ करिंथ. ११:२६.

गीत १४९ खंडणीसाठी कृतज्ञ

सारांश *

१-२. (क) प्रभूच्या सांजभोजनासाठी जमलेल्या लाखो लोकांकडे यहोवा पाहतो तेव्हा त्याला काय दिसतं? (मुखपृष्ठावर दिलेलं चित्र पाहा.) (ख) आपण या लेखात काय चर्चा करणार आहोत?

यहोवा जगभरातल्या लाखो लोकांना प्रभूच्या सांजभोजनासाठी एकत्रित आलेलं पाहतो, तेव्हा त्याला काय दिसतं याची जरा कल्पना करा. एक मोठा जमाव एकत्र आला आहे फक्‍त इतकंच त्याच्या लक्षात येत नाही, तर सांजभोजनासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे तो लक्ष देतो. उदाहरणार्थ, त्याचं अशा लोकांकडे लक्ष असतं जे दर वर्षी न चुकता हजर राहतात. त्यांपैकी काही असेही असतील ज्यांना तीव्र छळाचा सामना करावा लागतो. तर इतर काही असे आहेत जे नियमितपणे सभांना येत नाहीत, पण स्मारकविधीला हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. तसंच, काही जण उत्सुकतेपोटी स्मारकविधीला येतात, तेव्हा पहिल्यांदा आलेल्या या लोकांकडेही यहोवाचं लक्ष जातं.

स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या पुष्कळ लोकांना पाहून यहोवाला नक्कीच आनंद होत असेल. (लूक २२:१९) पण या स्मारकविधीला किती मोठ्या संख्येने  लोक हजर राहतात हे यहोवासाठी महत्त्वाचं नाही, तर कोणत्या कारणामुळे  ते हजर राहतात हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. यासोबतच यहोवाने त्याच्यावर प्रेम असणाऱ्‍या लोकांसाठी सभांचीदेखील तरतूद केली आहे. या लेखात आपण एका महत्त्वपूर्ण प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत: आपण फक्‍त वर्षातून एकदा होणाऱ्‍या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीलाच नाही तर सभांनादेखील का हजर राहतो?

जगभरात येशूच्या स्मारकविधीसाठी आलेल्या लाखो लोकांचं स्वागत केलं जात आहे (परि १-२ पाहा)

नम्र असल्यामुळे आपण हजर राहतो

३-४. (क) आपण सभांना का जातो? (ख) सभांना हजर राहिल्याने आपण काय दाखवतो? (ग) १ करिंथकर ११:२३-२६ या वचनांनुसार आपण स्मारकविधीला न चुकता हजर राहणं का महत्त्वाचं आहे?

मंडळीतल्या सभांना हजर राहण्याचं मुख्य कारण म्हणजे सभा आपल्या उपासनेचा एक भाग आहेत. यहोवा या सभांद्वारे आपल्याला शिकवतो म्हणूनही आपण सभांना हजर राहतो. गर्विष्ठ लोकांना वाटतं की त्यांना काहीच शिकण्याची गरज नाही. (३ योहा. ९) पण याउलट, आपण यहोवाकडून आणि त्याच्या संघटनेकडून प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतो.​—यश. ३०:२०; योहा. ६:४५.

सभांना उपस्थित राहिल्याने हे दिसून येतं की आपण नम्र आहोत. आपली शिकून घेण्याची इच्छा व तयारी आहे हे आपण दाखवतो. आपण येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला फक्‍त कर्तव्य म्हणून नाही, तर नम्रपणे येशूची आज्ञा पाळल्यामुळे उपस्थित राहतो. त्याने म्हटलं: “माझ्या स्मरणासाठी हे करत राहा.” (१ करिंथकर ११:२३-२६ वाचा.) आपल्या भविष्याची आशा या सभेमुळे मजबूत होते. तसंच, यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे याचीदेखील आपल्याला आठवण होते. पण आपल्याला फक्‍त वर्षातून एकदाच नाही, तर नेहमीच प्रोत्साहनाची आणि आश्‍वासनाची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. म्हणूनच त्याने प्रत्येक आठवड्याला सभांची तरतूद केली आहे आणि तो आपल्याला सभांना जाण्यासाठी आर्जवसुद्धा करतो. नम्र असल्यामुळे आपण त्याचं ऐकतो. आपण प्रत्येक आठवडी सभांच्या तयारीसाठी आणि त्यांना हजर राहण्यासाठी बरेच तास देतो.

५. नम्र जण यहोवाचं आमंत्रण का स्वीकारतात?

प्रत्येक वर्षी पुष्कळ नम्र लोक यहोवाकडून शिकून घेण्याचं आमंत्रण स्वीकारतात. (यश. ५०:४) त्यांना स्मारकविधीला हजर राहायला आवडतं आणि मग ते इतर सभांनाही येतात. (जख. ८:२०-२३) नवीन जणांसोबत आपल्यालाही आपला “साहाय्यकारी” व “मुक्‍तिदाता” असलेल्या यहोवाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घ्यायला आवडतं. (स्तो. ४०:१७) खरंच, यहोवा आणि त्याचा प्रिय पुत्र, येशू यांच्याकडून शिकून घेण्याचं आमंत्रण स्वीकारण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं किंवा आनंददायी असू शकतं का?​—मत्त. १७:५; १८:२०; २८:२०.

६. नम्र असल्यामुळे एका माणसाला स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी कशी मदत झाली?

दरवर्षी आपण मेहनत घेऊन जास्तीत जास्त लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देतो. बऱ्‍याच नम्र मनाच्या लोकांनी हे आमंत्रण स्वीकारल्यामुळे त्यांना फायदा झाला आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. खूप वर्षांआधी एका माणसाला स्मारकविधीच्या आमंत्रणाची प्रत देण्यात आली. पण आमंत्रण देणाऱ्‍या बांधवाला त्याने म्हटलं की त्याला स्मारकविधीला यायला जमणार नाही. पण जेव्हा तो माणूस स्मारकविधीसाठी राज्य सभागृहात आला तेव्हा त्याला पाहून आपल्या बांधवाला आश्‍चर्यच वाटलं. आपल्या बंधुभगिनींनी त्याचं प्रेमळपणे स्वागत केलं. आणि या गोष्टीमुळे तो इतका प्रभावित झाला की तो नंतर आपल्या सभांनादेखील उपस्थित राहू लागला. स्मारकविधीनंतर वर्षभरात तो फक्‍त तीन सभांना येऊ शकला नाही पण इतर वेळी तो नियमितपणे हजर राहिला. त्याला सभांना यायला कशामुळे मदत झाली? नम्रतेच्या गुणामुळे. आणि यामुळेच त्याला आपला निर्णय बदलायला मदत झाली. ज्या बांधवाने त्याला सुरुवातीला आमंत्रण दिलं होतं त्याने नंतर म्हटलं: “तो खूप नम्र आहे.” खरंच यहोवानेच या माणसाला त्याची उपासना करण्यासाठी त्याच्याकडे आकर्षित केलं होतं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो आज एक बाप्तिस्माप्राप्त बांधव आहे.​—२ शमु. २२:२८; योहा. ६:४४.

७. सभांमध्ये शिकलेल्या आणि बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींमुळे आपल्याला नम्र राहायला कशी मदत होऊ शकते?

सभांमध्ये शिकलेल्या आणि बायबलमध्ये वाचलेल्या गोष्टींमुळे आपल्याला नम्र राहायला मदत होऊ शकते. स्मारकविधीच्या काही आठवड्यांआधी आपल्या सभा सहसा, येशूचं उदाहरण व त्याने खंडणी म्हणून आपलं जीवन देण्याद्वारे दाखवलेली नम्रता या विषयांवर केंद्रित असतात. तसंच, येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्याशी संबंधित असलेल्या घटनांबद्दल बायबलमध्ये अहवाल दिले आहेत. स्मारकविधीच्या काही दिवसांआधी तेसुद्धा वाचण्यासाठी आपल्याला आर्जवलं जातं. आपण अशा सभांमध्ये जे शिकतो आणि बायबल अहवालात जे वाचतो त्यामुळे येशूने आपल्यासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल आपली कदर आणखी वाढते. आपल्याला येशूच्या नम्रतेचं अनुकरण करण्याची आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते, मग तसं करणं आपल्याला कठीण वाटत असलं तरीही.​—लूक २२:४१, ४२.

धैर्य असल्यामुळे आपल्याला हजर राहायला मदत होते

८. येशूने धैर्य कसं दाखवलं?

धैर्य दाखवण्याच्या बाबतीतही आपण येशूचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने दाखवलेल्या धैर्याचा जरा विचार करा. त्याचे शत्रू त्याचा अपमान करतील, त्याला मारहाण करतील आणि शेवटी त्याला मारून टाकतील हे त्याला माहीत होतं. (मत्त. २०:१७-१९) पण तरी त्याने स्वेच्छेने मृत्यूचा सामना केला. गेथशेमाने इथे येशू आपल्या प्रेषितांसोबत होता. त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याने म्हटलं: “उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्‍वासघात करणारा जवळ आला आहे!” (मत्त. २६:३६, ४६) आणि जेव्हा हत्यारबंद जमाव त्याला अटक करण्यासाठी आला, तेव्हा त्याने पुढे येऊन स्वतःची ओळख सांगितली. तसंच, त्याच्या प्रेषितांना जाऊ द्यावं असंही त्याने सैनिकांना सांगितलं. (योहा. १८:३-८) खरंच, येशूने उल्लेखनीय धैर्य दाखवलं! आज अभिषिक्‍त बांधव आणि इतर मेंढरं येशूचं अनुकरण करून धैर्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते कसं?

सभेला उपस्थित राहण्यासाठी तुम्ही दाखवत असलेल्या धैर्यामुळे इतरांना बळ मिळतं (परिच्छेद ९ पाहा) *

९. (क) सभेला नियमितपणे हजर राहण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज का पडू शकते? (ख) विश्‍वासासाठी तुरुंगात असणाऱ्‍या बांधवांवर आपल्या उदाहरणाचा कसा परिणाम होतो?

सभेला नियमितपणे हजर राहण्यासाठी आपल्याला कठीण परिस्थितीत कदाचित धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते. आपल्या काही बंधुभगिनींना दुःखाचा, नैराश्‍याचा किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर इतर काहींना कुटुंबाच्या किंवा सरकारी अधिकाऱ्‍यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो. असं असलं तरी ते धैर्य दाखवून सभांना हजर राहतात. काही क्षणांसाठी जरा विचार करा की विश्‍वासामुळे तुरुंगात असलेल्या आपल्या बांधवांवर आपल्या उदाहरणाचा कसा परिणाम होत असेल. (इब्री १३:३) आपण परीक्षेतही यहोवाची सेवा करत आहोत हे जेव्हा ते ऐकतात, तेव्हा त्यांना विश्‍वास, धैर्य आणि एकनिष्ठता टिकून ठेवण्यासाठी बळ मिळतं. प्रेषित पौललाही असाच अनुभव आला. रोममध्ये तुरुंगात असताना त्याला जेव्हा त्याच्या बांधवांबद्दल बातमी मिळायची की ते विश्‍वासूपणे देवाची सेवा करत आहेत, तेव्हा त्याला आनंद व्हायचा. (फिलिप्पै. १:३-५, १२-१४) पौलची सुटका होण्याच्या काही काळाआधी किंवा सुटका झाल्याच्या काही काळानंतर लगेच त्याने इब्री लोकांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्याने विश्‍वासू ख्रिश्‍चनांना “एकमेकांवर प्रेम करत राहा” आणि एकत्र भेटणं कधीही सोडू नका असं आर्जवलं.​—इब्री १०:२४, २५; १३:१.

१०-११. (क) आपण स्मारकविधीसाठी कोणाला आमंत्रण देऊ शकतो? (ख) असं करण्यासाठी इफिसकर १:७ या वचनात कोणतं कारण दिलं आहे?

१० आपण स्मारकविधीसाठी आपल्या नातेवाइकांना, कामावरच्या सोबत्यांना आणि शेजाऱ्‍यांना आमंत्रण देण्याद्वारे धैर्य दाखवतो. आपण या लोकांना का आमंत्रण देतो? यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे केलं त्यासाठी आपण त्यांचे खूप आभारी आहोत. आणि यामुळे आपल्याला मनापासून वाटतं की आपण इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण दिलंच पाहिजे. यहोवाने खंडणीद्वारे ‘अपार कृपा’ दाखवली आहे. याचा त्यांनाही कसा फायदा होऊ शकतो हे त्यांनी जाणून घ्यावं अशी आपली इच्छा आहे.​—इफिसकर १:७ वाचा; प्रकटी. २२:१७.

११ सभेला एकत्र येऊन आपण धैर्य दाखवतो, तेव्हा आपल्यातला आणखी एक मौल्यवान गुण दिसून येतो. एक असा गुण जो देवाने आणि त्याच्या पुत्राने उल्लेखनीय रितीने दाखवला आहे.

प्रेमामुळे आपण हजर राहण्यासाठी प्रवृत्त होतो

१२. (क) सभांमुळे यहोवा आणि येशू यांच्यावर असलेलं आपलं प्रेम कसं वाढतं? (ख) येशूचं अनुकरण करण्यासाठी २ करिंथकर ५:१४, १५ हे वचन आपल्याला कसं प्रोत्साहन देतं?

१२ यहोवा आणि येशू यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आपण सभेला जातो. मग सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींमुळे आपलं यहोवावर आणि येशूवर असलेलं प्रेम आणखी वाढतं. त्यांनी आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत याची आपल्याला सभांमध्ये नेहमी आठवण करून देण्यात येते. (रोम. ५:८) स्मारकविधीमुळे खासकरून आपल्याला आठवण करून देण्यात येते की त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि फक्‍त आपल्यावरच नाही तर अशांवरही ज्यांना अजून खंडणीचं मोल कळलेलं नाही. आपण प्रत्येक दिवशी कृतज्ञतेमुळे सर्व बाबतीत येशूचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.) त्यासोबतच यहोवाने आपल्यासाठी केलेल्या खंडणीच्या तरतुदीमुळे आपल्याला त्याची स्तुती करण्याचीही प्रेरणा मिळते. आणि त्याची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणजे सभांमध्ये मनापासून उत्तरं देणं.

१३. यहोवा आणि येशू यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो? स्पष्ट करा.

१३ यहोवा आणि त्याच्या पुत्रावर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण स्वेच्छेने कोणताही त्याग करायला तयार असलं पाहिजे. सभेला हजर राहण्यासाठी आपल्याला बऱ्‍याचदा वेगवेगळे त्याग करावे लागतात. अनेक मंडळ्यांच्या आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभा संध्याकाळी असतात. पण त्या वेळी आपण दिवसभर काम करून थकलेलो असतो. तसंच दुसरी सभा शनिवारी किंवा रविवारी असते, तेव्हा इतर लोक आराम करत असतात. मग जेव्हा आपण थकलेलो असतानाही सभांना जातो, तेव्हा यहोवा आपल्याकडे लक्ष देतो का? हो नक्कीच देतो! खरंतर, आपण जितका जास्त संघर्ष करतो तितकं जास्त यहोवा आपल्या प्रेमाची कदर करतो.​—मार्क १२:४१-४४.

१४. निःस्वार्थ प्रेम दाखवण्यात येशूने आपल्यासाठी कसा एक आदर्श ठेवला आहे?

१४ येशूने निःस्वार्थ प्रेम दाखवून आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याने आपल्या शिष्यांसाठी मरण सोसलं. इतकंच काय तर प्रत्येक दिवशी त्याने स्वतःच्या हिताचा नाही तर त्यांच्या हिताचा विचार केला. उदाहरणार्थ, थकलेला किंवा भावनिक रीत्या खूप खचलेला असतानाही त्याने आपल्या अनुयायांसोबत वेळ घालवला. (लूक २२:३९-४६) इतरांकडून आपण काय मिळवू शकतो यापेक्षा आपण इतरांना काय देऊ शकतो यावर त्याने लक्ष केंद्रित केलं. (मत्त. २०:२८) यहोवावर आणि आपल्या बंधुभगिनींवर आपलं जिवापाड प्रेम असेल तर प्रभूच्या सांजभोजनासाठी आणि मंडळीतल्या सर्व सभांसाठी आपण हजर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.

१५. आपल्याला विशेषकरून कोणाला मदत करण्याची इच्छा आहे?

१५ आपण एकच खऱ्‍या ख्रिस्ती बंधुसमाजाचा भाग आहोत. आणि नवीन लोकांनीसुद्धा याचा एक भाग बनावा म्हणून आनंदाने आपण आपला जास्तीत जास्त वेळ त्यांना आमंत्रित करण्यासाठी देतो. पण असं असलं तरी आपल्याला अशा भाऊबहिणींना मदत करण्याची इच्छा आहे जे “विश्‍वासात” आहेत, पण ते प्रचाराला किंवा सभांना येत नाहीत. (गलती. ६:१०) आपण अशा अक्रियाशील जणांना सभांना आणि विशेषकरून स्मारकविधीला यायला प्रोत्साहन देतो, तेव्हा त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम दिसून येतं. आपला पिता आणि मेंढपाळ यहोवा याच्याकडे अक्रियाशील जण परत येतात तेव्हा त्याला आणि येशूला खूप आनंद होतो. तसंच, आपल्यालाही खूप आनंद होतो.​—मत्त. १८:१४.

१६. (क) आपण एकमेकांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो आणि आपल्या सभांमुळे आपल्याला कशी मदत होते? (ख) योहान ३:१६ मध्ये दिलेले येशूचे शब्द लक्षात ठेवण्याची ही चांगली वेळ का आहे?

१६ येत्या आठवड्यांत तुम्हाला शक्य होईल तितक्या जास्त लोकांना तुम्ही स्मारकविधीसाठी आमंत्रित करा. स्मारकविधी शुक्रवारी संध्याकाळी १९ एप्रिल २०१९ ला असणार आहे. (“ तुम्ही त्यांना आमंत्रण द्याल का?” ही चौकट पाहा.) यहोवाने प्रबंध केलेल्या सर्व सभांना नियमितपणे हजर राहण्याद्वारे आपण नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत राहू या. जसजसं व्यवस्थेचा शेवट अगदी जवळ येत आहे, तसतसं मंडळीतल्या सभा आपल्याला नम्रता, धैर्य आणि प्रेम हे गुण दाखवत राहण्यासाठी मदत करतील. (१ थेस्सलनी. ५:८-११) तेव्हा आपण पूर्ण मनाने दाखवू या की यहोवा आणि येशूबद्दल आपल्या काय भावना आहेत, कारण त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे.​—योहान ३:१६ वाचा.

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ परि. 5 येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी शुक्रवारी संध्याकाळी १९ एप्रिल, २०१९ या तारखेला असणार आहे. ही वर्षभरातली सर्वात महत्त्वाची सभा असणार आहे. आपण स्मारकविधीला का उपस्थित राहतो? कारण आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं असतं. या लेखात आपण पाहणार आहोत की स्मारकविधीला आणि दर आठवड्यात होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहिल्याने आपल्याबद्दल काय कळतं.

^ परि. 52 चित्राचं वर्णन: आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात असलेल्या एका बांधवाला घरच्यांचं पत्र वाचून प्रोत्साहन मिळतं. त्याला कोणी विसरलेलं नाही आणि त्यांच्या परिसरात राजकीय अस्थिरता असतानाही त्याचं कुटुंब यहोवाला विश्‍वासू राहिलं आहे, हे समजल्यावर त्याला आनंद होतो.