व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४

स्वर्गीय राजाबद्दल शिकवणारं एक साधं सांजभोजन

स्वर्गीय राजाबद्दल शिकवणारं एक साधं सांजभोजन

“ही माझ्या शरीराला सूचित करते. . . . हा प्याला माझ्या ‘कराराच्या रक्‍ताला’ सूचित करतो.”​—मत्त. २६:२६-२८.

गीत १४ सर्व काही नवे झाले!

सारांश *

१-२. (क) येशू आपला मृत्युदिन पाळण्यासाठी सोपी पद्धत सांगेल हे अपेक्षित का होतं? (ख) येशूच्या कोणत्या गुणांवर आपण चर्चा करणार आहोत?

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीमध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात हे तुम्हाला आठवतं का? तिथे काय केलं जातं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण सांजभोजन खूप साधं असतं. पण आपल्या सर्वांसाठी हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे कदाचित काहींच्या मनात प्रश्‍न येऊ शकतो की, ‘इतका महत्त्वाचा कार्यक्रम असताना, येशूने सांगितलेलं सांजभोजन इतकं साधं का होतं?’

पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना येशू इतरांना महत्त्वाची सत्यंदेखील, समजायला सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने शिकवायचा. (मत्त. ७:२८, २९) यामुळेच येशूने आपल्याला अगदी सोप्या पण अर्थपूर्ण पद्धतीने त्याचा मृत्युदिन पाळायला * सांगितला. सांजभोजन आणि त्या दिवशी येशूने जे म्हटलं व केलं त्याबद्दल आता आपण विचार करू या. असं केल्यामुळे येशू खरंच किती नम्र, धैर्यवान व प्रेमळ होता याबद्दल आपल्याला कळेल आणि त्याच्याबद्दल आपली कदर वाढेल. तसंच, आपण येशूचं जवळून अनुकरण कसं करू शकतो हेदेखील आपल्याला शिकायला मिळेल.

येशू नम्र आहे

भाकर आणि द्राक्षारस आपल्याला याची आठवण करून देतात की येशूने आपल्यासाठी जीवन दिलं आणि आता तो स्वर्गात राजा आहे (परिच्छेद ३-५)

३. मत्तय २६:२६-२८ मध्ये सांगितल्यानुसार येशूने पाळलेला विधी इतका साधा का होता, आणि त्यात वापरलेल्या दोन गोष्टी कशाला सूचित करतात?

आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांसोबत असताना येशूने स्मारकविधीची स्थापना केली. वल्हांडण सण साजरा केल्यानंतर जे काही उरलं होतं त्याचाच उपयोग करून त्याने शिष्यांसोबत हा साधा विधी पाळला. (मत्तय २६:२६-२८ वाचा.) त्याने फक्‍त बेखमीर भाकर आणि द्राक्षारस यांचा उपयोग केला. येशूने शिष्यांना सांगितलं की तो लवकरच त्यांच्यासाठी आपला प्राण अर्पण करणार आहे आणि या दोन गोष्टी त्याच्या परिपूर्ण शरीराला आणि रक्‍ताला सूचित करतात. या नवीन विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्‍या गोष्टी इतक्या साध्या का आहेत, असा प्रश्‍न नक्कीच प्रेषितांच्या मनात आला नसेल. आपण असं का म्हणू शकतो?

४. येशूने मार्थाला जो सल्ला दिला त्यावरून त्याने सांजभोजन साधं का ठेवलं असावं याबद्दल आपल्याला काय समजतं?

या घटनेच्या बऱ्‍याच महिन्यांआधी जे घडलं त्यावर विचार करा. सेवाकार्याच्या तिसऱ्‍या वर्षात एकदा येशू लाजर, मार्था आणि मरीया यांच्या घरी गेला. हे तिघंही येशूचे जवळचे मित्र होते आणि त्यांच्या घरी असताना येशू त्यांना काही गोष्टी शिकवू लागला. मार्था येशूचं बोलणं ऐकत तर होती, पण येशूसाठी बऱ्‍याच गोष्टी बनवण्यामध्ये तिचं जास्त लक्ष होतं. हे पाहून येशूने प्रेमळपणे मार्थाची चूक सुधारली. नेहमीच बऱ्‍याच गोष्टी बनवण्याची गरज नाही असं येशूने तिला समजावलं. (लूक १०:४०-४२) याच्या बऱ्‍याच महिन्यानंतर येशूच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्याने मार्थाला दिलेला सल्ला स्वतः लागू केला. त्याने सांजभोजन अगदी साधं ठेवलं. यावरून आपण येशूबद्दल काय शिकतो?

५. या साध्या विधीवरून आपल्याला येशूबद्दल काय कळतं, आणि ते फिलिप्पैकर २:५-८ या वचनांशी कसं जुळतं?

येशू जे काही बोलला आणि त्याने जे काही केलं त्यातून त्याची नम्रता दिसून आली. यामुळेच त्याने पृथ्वीवरील आपल्या शेवटल्या रात्रीही नम्रता दाखवली. (मत्त. ११:२९) त्याला याची जाणीव होती की तो मानवी इतिहासातील सर्वात मोठं बलिदान देणार आहे आणि नंतर यहोवा त्याचं पुनरुत्थान करून त्याला स्वर्गात खूप महत्त्वाचं स्थान देणार आहे. हे माहीत असूनही येशूने कधीच इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधलं नाही. त्याचा मृत्युदिन पाळण्यासाठी त्याने खूप मोठा विधी करायला सांगितलं नाही. याऐवजी त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की वर्षातून एकदा त्याची आठवण म्हणून त्यांनी हा साधा विधी पाळावा. (योहा. १३:१५; १ करिंथ. ११:२३-२५) या साध्या विधीवरूनच दिसून येतं की येशू गर्विष्ठ नव्हता. नम्रता हा आपल्या स्वर्गीय राजाचा एक महत्त्वाचा गुण आहे हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का?​—फिलिप्पैकर २:५-८ वाचा.

६. समस्यांना सामोरं जाताना आपण येशूच्या नम्रतेचं अनुकरण कसं करू शकतो?

आपण येशूच्या नम्रतेचं अनुकरण कसं करू शकतो? आपला नाही तर इतरांचा जास्त विचार करण्याद्वारे आपण असं करू शकतो. (फिलिप्पै. २:३, ४) पृथ्वीवरील येशूच्या शेवटच्या रात्री घडलेल्या घटना आठवा. आपल्याला लवकरच खूप वेदनादायक मृत्यूला सामोरं जावं लागेल हे येशूला माहीत होतं. पण अशा परिस्थितीतही त्याला आपल्या विश्‍वासू प्रेषितांबद्दल जास्त काळजी होती, कारण लवकरच त्याच्या मृत्यूमुळे त्यांना खूप दुःख होणार होतं. यामुळेच त्याने त्या रात्री आपल्या शिष्यांना वेळ दिला. येशूने त्यांना शिकवलं, प्रोत्साहन दिलं व त्यांची हिंमत वाढवली. (योहा. १४:२५-३१) येशूने स्वतःच्या नाही तर इतरांच्या हिताचा जास्त विचार करून नम्रता दाखवली. आपल्या सर्वांसाठी त्याने किती उत्तम उदाहरण मांडलं!

येशू धैर्यवान आहे

७. स्मारकविधीची स्थापना केल्यानंतर लगेच येशूने धैर्य कसं दाखवलं?

येशूने स्मारकविधीची स्थापना केली त्यानंतर लगेच त्याला खूप धैर्य दाखवावं लागलं. असं आपण का म्हणू शकतो? कारण येशूने त्याच्यासाठी असलेली आपल्या पित्याची इच्छा स्वीकारली. येशूला माहीत होतं की लोक त्याच्यावर ‘तो देवाची निंदा करणारा आहे’ असा गंभीर आरोप लावतील आणि त्याला ठार मारतील. (मत्त. २६:६५, ६६; लूक २२:४१, ४२) पण येशू शेवटच्या श्‍वासापर्यंत एकनिष्ठ राहिला. यामुळे त्याने यहोवाच्या नावाला गौरव दिला, यहोवाचा राज्य करण्याचा अधिकार योग्य आहे हे दाखवलं आणि पश्‍चात्ताप करणाऱ्‍या लाखो लोकांसाठी त्याने देवाजवळ येण्याचा मार्ग खुला केला. यासोबतच येशूने पुढे येणाऱ्‍या छळासाठी आपल्या शिष्यांनाही तयार केलं.

८. (क) येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना काय सांगितलं? (ख) येशूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शिष्य धैर्य कसं दाखवत राहिले?

मृत्यू जवळ येत आहे यामुळे येशूला चिंता वाटणं स्वाभाविक होतं. पण त्याने स्वतःवर लक्ष केंद्रित न करता, आपल्या विश्‍वासू प्रेषितांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केलं. यहूदा बाहेर गेल्यानंतर येशूने ज्या साध्या विधीची स्थापना केली, त्यामुळे त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांना त्याने वाहिलेल्या रक्‍ताचे आणि नवीन कराराचे फायदे नेहमी आठवणीत ठेवायला मदत होणार होती. (१ करिंथ. १०:१६, १७) येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तो आणि यहोवा त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात. यामुळे त्यांना शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्यासाठी आणि स्वर्गातील जीवन मिळवण्यासाठी मदत होणार होती. (योहा. १५:१२-१५) येशूने त्यांना पुढे येणाऱ्‍या समस्यांबद्दल आणि छळाबद्दलही सांगितलं. मग स्वतःच्या उदाहरणावर लक्ष केंद्रित करत येशूने त्यांना म्हटलं “हिंमत धरा!” (योहा. १६:१-४क, ३३) बऱ्‍याच वर्षांनंतरही येशूचे शिष्य त्याच्या आत्मत्यागी उदाहरणाचं अनुकरण करत होते आणि धैर्य दाखवत होते. त्यांना बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीदेखील ते एकमेकांना मदत करत राहिले.​—इब्री १०:३३, ३४.

९. धैर्य दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

आज आपणही धैर्य दाखवण्याच्या बाबतीत येशूचं अनुकरण करतो. जसं की, विश्‍वासामुळे आपल्या बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण त्यांना धैर्याने मदत करतो. कधीकधी तर आपल्या बांधवांना काहीही आधार नसताना तुरुंगात टाकण्यात येतं. असं झाल्यावर, आपण त्यांना जमेल ती मदत केली पाहिजे आणि त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. (फिलिप्पै. १:१४; इब्री १३:१९) धैर्य दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे “धैर्याने” प्रचार करणं. (प्रे. कार्ये १४:३) येशूसारखंच आपणही राज्याबद्दल प्रचार करण्याचा निर्धार केला आहे, मग लोकांनी आपला विरोध आणि छळ केला तरीही. पण काही परिस्थितींमध्ये कदाचित आपण धैर्य दाखवायला कचरू. अशा वेळेस आपण काय करू शकतो?

१०. स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांत आपण काय केलं पाहिजे आणि का?

१० येशू ख्रिस्ताने दिलेल्या खंडणीमुळे आपल्याला आशा मिळाली आहे. त्या आशेवर मनन केल्यामुळे आपण धैर्य उत्पन्‍न करू शकतो. (योहा. ३:१६; इफिस. १:७) स्मारकविधीच्या आधीच्या आठवड्यांमध्ये खंडणीबद्दल आपली कदर वाढवण्याची आपल्याजवळ चांगली संधी आहे. या काळात स्मारकविधीचं बायबल वाचन करा आणि येशूच्या मृत्यूच्या वेळी ज्या काही घटना घडल्या त्यावर प्रार्थनापूर्वक मनन करा. असं केल्यामुळे स्मारकविधीला उपस्थित असताना आपल्याला त्या प्रतीकांचा अर्थ आणखी चांगल्या प्रकारे समजेल. तसंच, एका अतुलनीय बलिदानाला ती प्रतीकं कशी सूचित करतात हेदेखील आपल्याला समजेल. येशू आणि यहोवा यांनी आपल्यासाठी कायकाय केलं आहे आणि त्याचा आपल्याला व आपल्या प्रिय जणांना कसा फायदा होतो हे समजून घेतल्यामुळे आपली आशा बळकट होईल. तसंच, शेवटपर्यंत धैर्याने विश्‍वासू राहण्यासाठी आपण प्रेरीत होऊ.​—इब्री १२:३.

११-१२. आपण आतापर्यंत काय शिकलो?

११ आतापर्यंत आपण शिकलो की स्मारकविधी आपल्याला फक्‍त खंडणीबद्दलच नाही, तर येशूने दाखवलेली नम्रता आणि धैर्य यांसारख्या उल्लेखनीय गुणांबद्दलही शिकवतो. आपला महायाजक या नात्याने येशू आपल्या सर्वांच्या वतीने याचना करतो. ती करत असताना तो आजही हे गुण दाखवत आहे यासाठी आपण किती कृतज्ञ आहोत! (इब्री ७:२४, २५) येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल मनापासून कदर दाखवण्यासाठी आपण त्याने आज्ञा दिल्याप्रमाणेच विश्‍वासूपणे हा विधी पाळला पाहिजे. (लूक २२:१९, २०) आज निसान १४ ज्या दिवशी येतो तेव्हा आपण हा विधी पाळतो आणि आपल्या सर्वांसाठी हा दिवस वर्षातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो.

१२ येशूने ज्या साध्या पद्धतीने स्मारकविधी पाळला त्यावरून आपल्याला येशूच्या आणखी एका गुणाबद्दल शिकायला मिळतं. या गुणाने प्रेरित होऊन त्याने आपल्यासाठी जीवन अर्पण केलं. पृथ्वीवर असताना लोक त्याला या गुणामुळे ओळखायचे. तो कोणता गुण आहे?

येशू प्रेमळ आहे

१३. योहान १५:९ आणि १ योहान ४:८-१० ही वचनं यहोवा आणि येशू यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल काय सांगतात, आणि याचा फायदा कोणाला होतो?

१३ यहोवाचं आपल्या सर्वांवर मनापासून प्रेम आहे आणि येशू ख्रिस्ताने आपल्या कार्यांतून ते प्रेम दाखवलं. (योहान १५:९; १ योहान ४:८-१० वाचा.) सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येशूने आपल्या सर्वांसाठी आपलं जीवन दिलं. आपला समावेश अभिषिक्‍तांमध्ये होत असो किंवा दुसऱ्‍या मेंढरांमध्ये, यहोवा आणि येशू यांनी खंडणीद्वारे दाखवलेल्या प्रेमाचा फायदा आपल्या सर्वांनाच होतो. (योहा. १०:१६; १ योहा. २:२) तसंच, सांजभोजनामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात, त्यावरून येशूचं प्रेम आणि शिष्यांबद्दलची काळजी दिसून येते. कशा प्रकारे?

येशूने साध्या पद्धतीने हा विधी पाळायला सांगितला, त्यामुळे बऱ्‍याच शतकांपर्यंत आणि वेगवेगळ्या परिस्थितीतही तो पाळणं शक्य झालं (परिच्छेद १४-१६) *

१४. येशूने आपल्या शिष्यांसाठी कशा प्रकारे प्रेम दाखवलं?

१४ येशूने सांजभोजनात बऱ्‍याच गोष्टींचा समावेश केला नाही, तर ते भोजन साधं ठेवून त्याने आपल्या अभिषिक्‍त बांधवांसाठी प्रेम दाखवलं. अभिषिक्‍त बंधुभगिनींना दर वर्षी स्मारकविधी पाळायचा होता, मग ते तुरुंगात किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरीही. (प्रकटी. २:१०) येशूची आज्ञा पाळणं त्यांना शक्य झालं का? हो, त्यांनी येशूची आज्ञा पाळली.

१५-१६. कठीण परिस्थितीत असतानाही काही जण स्मारकविधी कसा पाळू शकले आहेत?

१५ पहिल्या शतकापासून ते आजपर्यंत खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी स्मारकविधी पाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. स्मारकविधी पाळण्यासाठी येशूने जी पद्धत सांगितली ती जमेल तितकी पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, आणि काही सेवकांनी तर अगदी कठीण प्रसंगात असतानाही असं केलं आहे. याची काही उदाहरणं पाहू या. चीनच्या तुरुंगात एकांत कारावास भोगत असताना बंधू हॅरल्ड किंग यांना स्मारकविधी पाळण्यासाठी मार्ग शोधावा लागला. त्यांनी कोणालाही कळू न देता, त्यांच्याजवळ जी सामग्री होती त्यापासून स्मारकविधीची प्रतीकं बनवली. त्यांनी दिवसांची मोजणी करून स्मारकविधीची तारीखही शक्य तितकी अचूक काढली. स्मारकविधी पाळण्याची वेळ आली तेव्हा ते त्यांच्या खोलीत एकटेच होते. मग त्यांनी गीत गायलं, प्रार्थना केली आणि बायबलवर आधारित भाषणदेखील दिलं.

१६ आणखी एका उदाहरणाचा विचार करा. दुसऱ्‍या विश्‍वयुद्धादरम्यान आपल्या काही बहिणी एका छळछावणीमध्ये होत्या. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून स्मारकविधी पाळला. पण त्यांना असं करणं शक्य झालं कारण स्मारकविधीमध्ये वापरल्या जाणाऱ्‍या गोष्टी अगदी साध्या आहेत. त्यांनी म्हटलं: “आम्ही एकमेकींजवळ उभे राहिलो आणि मधोमध एक छोटा स्टूल ठेवून त्यावर पांढरं कापड ठेवलं. मग त्यावर आम्ही स्मारकविधीची प्रतीकं ठेवली. आम्ही फक्‍त एक मेणबत्ती लावली, कारण जर जास्त प्रकाश केला असता तर आम्ही काय करतोय हे इतरांना लगेच समजलं असतं. . . . आम्ही प्रार्थनेत वारंवार यहोवा देवाला आमचा निर्धार सांगितला की आम्हाला आमची सर्व शक्‍ती वापरून तुझ्या पवित्र नावाचा गौरव करायचा आहे.” या बहिणींनी किती मजबूत विश्‍वास दाखवला! यहोवाच्या सेवकांना कठीण प्रसंगातही स्मारकविधी पाळणं शक्य झालं आहे कारण तो विधी खूप सोपा आणि साधा आहे. हा विधी साधा ठेवण्याद्वारे येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी किती मोठं प्रेम दाखवलं!

१७. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१७ स्मारकविधी जवळ येत असताना आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘प्रेम दाखवण्याच्या बाबतीत मी येशूचं आणखी जवळून अनुकरण कसं करू शकतो? मी स्वतःपेक्षा माझ्या सहविश्‍वासू बांधवांच्या गरजांचा जास्त विचार करतो का? मी बंधुभगिनींकडून अवाजवी अपेक्षा करतो का, की मी त्यांच्या मर्यादा ओळखतो?’ आपण नेहमी येशूचं अनुकरण करू या आणि “एकमेकांशी वागताना सहानुभूती” दाखवू या!​—१ पेत्र ३:८.

येशूच्या नम्रतेचं, धैर्याचं आणि प्रेमाचं अनुकरण करा

१८-१९. (क) आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो? (ख) तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१८ येशू ख्रिस्ताचा स्मारकविधी आपल्याला बरीच वर्षं पाळावा लागणार नाही. मोठ्या संकटादरम्यान येशू ‘येईल’, तेव्हा तो पृथ्वीवर उरलेल्या “निवडलेल्या लोकांना” स्वर्गात एकत्र करेल आणि मग तिथून पुढे आपल्याला स्मारकविधी पाळण्याची गरज नसणार.​—१ करिंथ. ११:२६; मत्त. २४:३१.

१९ शेवटचा स्मारकविधी पाळल्यानंतरही यहोवाच्या सेवकांच्या मनात या साध्या विधीची आठवण कायम टिकून राहील. एका व्यक्‍तीने दाखवलेल्या नम्रतेचं, धैर्याचं आणि प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून ते लोक नेहमी या विधीची आठवण करतील. ज्या लोकांनी स्मारकविधी पाळला होता, ते लोक त्या वेळी या उल्लेखनीय विधीबद्दल नक्कीच इतरांना सांगतील. पण स्मारकविधीपासून आज फायदा मिळवण्यासाठी आपण येशूच्या नम्रतेचं, धैर्याचं आणि प्रेमाचं अनुकरण करण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. आपण असं केलं तर यहोवा आपल्याला नक्की आशीर्वादित करेल या गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो.​—२ पेत्र १:१०, ११.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

^ परि. 5 लवकरच आपण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मरणार्थ प्रभूच्या सांजभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत. हे साधं भोजन आपल्याला येशूने दाखवलेल्या नम्रता, धैर्य आणि प्रेम या गुणांबद्दल बरंच काही शिकवतं. या उल्लेखनीय गुणांचं आपण कसं अनुकरण करू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: एखादा दिवस किंवा विधी पाळणं म्हणजे एखाद्या व्यक्‍तीची किंवा महत्त्वाच्या घटनेची आठवण म्हणून आणि तिला आदर दाखवण्यासाठी काहीतरी विशेष करणं.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: पुढील परिस्थितींचं नाट्यरूपांतर: पहिल्या शतकातील विश्‍वासू सेवक मंडळीमध्ये स्मारकविधी पाळताना; १८८० च्या जवळपास स्मारकविधी पाळताना; नात्झी छळछावणीत स्मारकविधी पाळताना; आणि आज दक्षिण अमेरिकेतील एका उष्ण देशात राज्य सभागृहात स्मारकविधी पाळताना.