व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३

एक मोठा लोकसमुदाय देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करतो

एक मोठा लोकसमुदाय देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करतो

“तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्‍याकडून मिळतं.”—प्रकटी. ७:१०.

गीत ३० यहोवाने राज्य आरंभिले

सारांश *

१. १९३५ मध्ये एक ऐतिहासिक भाषण ऐकल्यावर एका तरुणाच्या बाबतीत काय घडलं?

१९२६ मध्ये एका मुलाचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याचे आईवडील बायबल विद्यार्थी होते. त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हटलं जायचं. या तरुणाला दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. ही सगळी मुलं सत्यात वाढली होती. इतर बायबल विद्यार्थ्यांप्रमाणेच हा तरुण मुलगासुद्धा दरवर्षी स्मारकविधीच्या वेळी भाकर आणि द्राक्षारस सेवन करायचा. मग १९३५ मध्ये अमेरिकेच्या वॉशिंगटन डी. सी. मध्ये एक अधिवेशन झालं. तिथे बंधू जे. एफ. रदरफर्ड यांनी एक भाषण दिलं. त्यांच्या भाषणाचा विषय होता “एक मोठा लोकसमुदाय.” ते ऐतिहासिक भाषण ऐकल्यावर, भविष्यात मिळणाऱ्‍या जीवनाबद्दल त्या तरुणाला जे काही वाटत होतं ते पूर्णपणे बदलून गेलं. त्या भाषणात असं काय सांगितलं होतं?

२. बंधू रदरफर्ड यांनी शास्त्रवचनांतून कोणती गोष्ट समजावून सांगितली?

प्रकटीकरण ७:९ यात सांगितलेला “मोठा लोकसमुदाय” कोण आहे, हे बंधू रदरफर्ड यांनी आपल्या भाषणात समजावून सांगितलं. तोपर्यंत बायबल विद्यार्थ्यांना असं वाटत होतं, की मोठा लोकसमुदाय मानवांचा असा एक गट आहे जो स्वर्गात जाईल; पण त्या गटातले लोक येशूसोबत स्वर्गात राज्य करणार नाहीत, कारण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपेक्षा ते कमी विश्‍वासू आहेत. बंधू रदरफर्ड यांनी शास्त्रवचनांतून हे समजावून सांगितलं, की मोठ्या लोकसमुदायाला स्वर्गाच्या जीवनाची आशा नाही. पण त्यातले लोक मोठ्या संकटातून वाचतील आणि पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगतील. (प्रकटी. ७:१४) या लोकांबद्दल येशूने म्हटलं: “माझी दुसरीही मेंढरं आहेत. ती या मेंढवाड्यातली नाहीत. मला त्यांनाही आणलं पाहिजे. ती माझा आवाज ऐकतील आणि तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल.” (योहा. १०:१६) ही दुसरी मेंढरं * यहोवाचे विश्‍वासू सेवक आहेत, आणि त्यांना या पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा आहे. (मत्त. २५:३१-३३, ४६) ही नवीन समज मिळाल्यामुळे १८ वर्षांच्या त्या बांधवासोबतच यहोवाच्या अनेक सेवकांना भविष्यात मिळणाऱ्‍या जीवनाबद्दल जे काही वाटत होतं ते कसं बदललं, ते आता आपण पाहू या.—स्तो. ९७:११; नीति. ४:१८.

एक नवीन समज मिळाल्यामुळे काय झालं?

३-४. १९३५ च्या अधिवेशनात हजारो भाऊबहिणींना आपल्या आशेबद्दल काय लक्षात आलं, आणि कशामुळे?

भाषणात बंधू रदरफर्ड यांनी श्रोत्यांना म्हटलं: “ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा आहे, असे सर्व जण कृपया उभे राहाल का?” त्या वेळी उपस्थित असलेल्या जवळजवळ २०,००० लोकांपैकी १०,००० पेक्षा जास्त लोक उभे राहिले, असं अधिवेशनात असलेल्या एका बांधवाने सांगितलं. मग बंधू रदरफर्ड म्हणाले: “पाहा! हाच तो मोठा लोकसमुदाय!” त्यानंतर श्रोत्यांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्‍त केला. अधिवेशनातला तो क्षण खरंच खूप रोमांचक होता. जे उभे राहिले त्यांना याची जाणीव झाली, की यहोवाने आपल्याला स्वर्गातल्या जीवनासाठी निवडलेलं नाही. तसंच, आपल्याला पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात आलेलं नाही हेसुद्धा त्यांना समजलं. याच्या दुसऱ्‍याच दिवशी ८४० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. आणि यांच्यातले बहुतेक जण दुसऱ्‍या मेंढरांपैकी होते.

त्या भाषणानंतर, लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या तरुण भावाने आणि इतर हजारो भाऊबहिणींनी स्मारकविधीच्या वेळी भाकर आणि द्राक्षारस सेवन करायचं बंद केलं. एका बांधवाने हे नम्रपणे कबूल केलं, की “१९३५ च्या स्मारकविधीत मी शेवटचं भाकर आणि द्राक्षारस सेवन केलं. माझ्या लक्षात आलं, की यहोवाने त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे मला स्वर्गातल्या जीवनासाठी निवडलेलं नाही. मला पृथ्वीवर जीवन जगण्याची आशा आहे. आणि पृथ्वीचं एका सुंदर नंदनवनात रूपांतर करण्यात हातभार लावण्याची मी आशा बाळगतो.” इतर अनेक भाऊबहिणींनासुद्धा या भावासारखंच वाटलं. (रोम. ८:१६, १७; २ करिंथ. १:२१, २२) तेव्हापासून मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि ते पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जनांसोबत मिळून काम करत आहेत.

५. ज्यांनी स्मारकविधीत भाकर आणि द्राक्षारस घ्यायचं बंद केलं त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

◌१९३५ नंतर ज्यांनी स्मारकविधीत भाकर आणि द्राक्षारस घ्यायचं बंद केलं, त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटलं? त्याने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा दिली. आज जर एखादी व्यक्‍ती भाकर आणि द्राक्षारस सेवन करत असेल, पण नंतर तिच्या लक्षात येतं, की तिला पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात आलेलं नाही, तर तिच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? (१ करिंथ. ११:२८) आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा आहे असा गैरसमज होऊन काहींनी स्मारकविधीच्या वेळी भाकर आणि द्राक्षारस सेवन केला आहे. पण त्यांनी जर प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केली, भाकर आणि द्राक्षारस सेवन करायचं बंद केलं आणि विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली, तर दुसऱ्‍या मेंढरांप्रमाणेच तो त्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जीवन जगण्याची आशा देईल. ते जरी आता भाकर आणि द्राक्षारस सेवन करत नसले, तरीसुद्धा ते स्मारकविधीला उपस्थित राहतात. कारण यहोवा आणि येशने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून कदर आहे.

एक सुंदर आशा

६. येशूने स्वर्गदूतांना कोणती आज्ञा दिली आहे?

लवकरच मोठं संकट येणार आहे. त्यामुळे प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दल आणि मोठ्या लोकसमुदायाबद्दल जे सांगितलं आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचीच चर्चा आता आपण करू. त्या अध्यायात येशू स्वर्गदूतांना नाशाचे चार वारे अडवून धरायची आज्ञा देतो. सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर शिक्का मारला जात नाही, म्हणजे त्यांना यहोवाकडून स्वीकृती मिळत नाही, तोपर्यंत स्वर्गदूतांनी हे वारे अडवून धरावेत असं येशू त्यांना सांगतो. (प्रकटी. ७:१-४) ख्रिस्ताचे हे अभिषिक्‍त बांधव शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे त्यांना स्वर्गात त्याच्यासोबत राजे आणि याजक म्हणून सेवा करायचं प्रतिफळ मिळेल. (प्रकटी. २०:६) १,४४,००० अभिषिक्‍त जनांना त्यांचं स्वर्गातलं प्रतिफळ मिळेल तेव्हा यहोवा, येशू आणि स्वर्गदूत या सगळ्यांना खूप आनंद होईल.

शुभ्र झगे घातलेला आणि हातात खजुराच्या फांद्या घेऊन आनंद साजरा करणारा एक मोठा लोकसमुदाय, देवाच्या वैभवशाली राजासनासमोर आणि येशूसमोर उभा आहे (परिच्छेद ७ पाहा)

७. प्रकटीकरण ७:९, १० या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे योहानला दृष्टान्तात कोण दिसतं, आणि ते काय करत आहेत? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

◌१,४४,००० जणांबद्दल सांगितल्यावर योहानला दृष्टान्तात हर्मगिदोनमधून वाचणारा “एक मोठा लोकसमुदाय” दिसतो. १,४४,००० जणांपेक्षा मोठ्या लोकसमुदायतल्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे, की कोणालाही ती मोजता येणार नाही. (प्रकटीकरण ७:९, १० वाचा.) त्यांनी “शुभ्र झगे” घातले आहेत. याचा अर्थ सैतानाच्या जगात त्यांनी स्वतःला “निष्कलंक” ठेवलं आहे. आणि ते देवाला आणि ख्रिस्ताला विश्‍वासू राहिले आहेत. (याको. १:२७) यहोवाने आणि कोकराने, म्हणजे येशूने त्यांना वाचवलं आहे अशी ते मोठ्याने घोषणा करतात. तसंच, त्यांच्या हातांत खजुराच्या फांद्या आहेत. याचा अर्थ, येशू हा यहोवाने नेमलेला राजा आहे, असं ते आनंदाने मान्य करतात.—योहान १२:१२, १३ पडताळून पाहा.

८. प्रकटीकरण ७:११, १२ या वचनांप्रमाणे योहानला दृष्टान्तात पुढे काय दिसतं?

प्रकटीकरण ७:११, १२ वाचा. योहानला नंतर दृष्टान्तात काय दिसतं? त्याला दिसतं, की मोठ्या लोकसमुदायाला पाहिल्यावर स्वर्गातले सगळे यहोवाची स्तुती करतात. भविष्यात जेव्हा हा दृष्टान्त पूर्ण होईल, म्हणजे मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून वाचेल तेव्हा स्वर्गातले सगळे जण आनंद साजरा करतील.

९. प्रकटीकरण ७:१३-१५ या वचनांप्रमाणे मोठ्या लोकसमुदायातले लोक आज काय करत आहेत?

प्रकटीकरण ७:१३-१५ वाचा. योहान पुढे सांगतो, की मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” याचा अर्थ त्यांचा विवेक शुद्ध आहे आणि यहोवा त्यांच्यावर खूश आहे. (यश. १:१८) त्या सगळ्यांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला आहे. तसंच, येशूच्या बलिदानावर त्यांचा मजबूत विश्‍वास आहे आणि यहोवासोबत त्यांचं जवळचं नातं आहे. (योहा. ३:३६; १ पेत्र ३:२१) त्यामुळेच पृथ्वीवर “रात्रंदिवस [देवाची] पवित्र सेवा” करायला ते योग्य ठरतात. आजसुद्धा ते अशा प्रकारे सेवा करत आहेत. ते प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम आवेशाने करत आहेत. कारण त्यांच्यासाठी देवाचं राज्य सगळ्यात महत्त्वाचं आहे.—मत्त. ६:३३; २४:१४; २८:१९, २०.

मोठं संकट पार केल्यामुळे मोठा लोकसमुदाय खूप आनंदी आहे! (परिच्छेद १० पाहा)

१०. मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना कशाची खातरी आहे, आणि ते कोणतं अभिवचन पूर्ण होताना पाहतील?

१० मोठ्या संकटातून वाचणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाला याची पक्की खातरी आहे, की यहोवा पुढेही त्यांची काळजी घेत राहील. कारण “राजासनावर जो बसला आहे तो त्यांच्यावर आपला तंबू पसरवेल,” असं बायबल म्हणतं. मग दुसऱ्‍या मेंढरांतले लोक जे अभिवचन पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत होते ते शेवटी पूर्ण होईल. ते अभिवचन म्हणजे: “[देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटी. २१:३, ४.

११-१२. (क) प्रकटीकरण ७:१६, १७ या वचनांप्रमाणे मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना कोणते आशीर्वाद मिळतील? (ख) स्मारकविधीला उपस्थित राहून दुसऱ्‍या मेंढरांतले लोक काय करू शकतात, आणि कोणत्या कारणामुळे ते असं करतात?

११ प्रकटीकरण ७:१६, १७ वाचा. बिकट आर्थिक परिस्थिती, दंगली किंवा युद्धं यांमुळे आज यहोवाच्या लोकांपैकी काहींची उपासमार होत आहे. तर काहींना आपल्या विश्‍वासामुळे तुरुंगात टाकण्यात आलं आहे. पण मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना माहीत आहे, की या दुष्ट जगाच्या नशातून वाचल्यानंतर त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नसेल. खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल असेल. तसंच, त्यांना यहोवाकडून भरपूर शिक्षणही मिळेल. आणि यहोवा सैतानाच्या जगाचा नाश करेल, तेव्हा तो आपल्या जळजळीत क्रोधाची “झळ” मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना लागू देणार नाही. मग मोठ्या संकटातून वाचलेल्या लोकांना येशू, सर्वकाळाच्या “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल.” विचार करा: मोठ्या लोकसमुदायातल्या लोकांना किती सुंदर आशा आहे! ते कधीच मरणार नाहीत!—योहा. ११:२६.

१२ दुसऱ्‍या मेंढरांतल्या लोकांना जी सुंदर आशा आहे, त्याबद्दल ते यहोवाचे आणि येशूचे खूप आभारी आहेत. यहोवाने जरी त्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी निवडलेलं नसलं, तरी अभिषिक्‍त जनांवर त्याचं जितकं प्रेम आहे तितकंच त्यांच्यावरही आहे. अभिषिक्‍त जनांसारखंच, दुसऱ्‍या मेंढरांतले लोकसुद्धा देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करू शकतात. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, स्मारकविधीला उपस्थित राहणं.

स्मारकविधीत देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करा

स्मारकविधीच्या वेळी भाकर आणि द्राक्षारस फिरवला जातो, तेव्हा आपल्याला याची आठवण होते की येशूने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं (परिच्छेद १३-१५ पाहा)

१३-१४. सगळ्यांनीच स्मारकविधीला उपस्थित का राहिलं पाहिजे?

१३ जगभरात स्मारकविधीला सहसा लाखो लोक उपस्थित राहतात. पण प्रत्येक १,००० लोकांपैकी एखादाच भाकर आणि द्राक्षारस सेवन करतो. आणि बऱ्‍याच मंडळ्यांमध्ये तर कोणीच ते सेवन करत नाही. कारण स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्‍यांपैकी बहुतेकांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे. मग तरीसुद्धा ते स्मारकविधीला का उपस्थित राहतात? आपण एखाद्या मित्राच्या लग्नाला का जातो याचा विचार करा. कारण आपलं त्या जोडप्यावर प्रेम असतं आणि आपल्याला त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. त्याचप्रमाणे दुसऱ्‍या मेंढरांतल्या लोकांचं येशूवर आणि अभिषिक्‍त जनांवर प्रेम असतं आणि त्यांना त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. म्हणून ते स्मारकविधीला उपस्थित राहतात. याशिवाय, येशूने दिलेल्या बलिदानाची कदर असल्यामुळेसुद्धा ते या विधीला उपस्थित राहतात. कारण त्या बलिदानामुळेच त्यांना भविष्यात या पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन मिळेल.

१४ दुसरी मेंढरं स्मराकविधीला उपस्थित का राहतात याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, येशूने तशी आज्ञाच दिली आहे. येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत या विधीची स्थापना केली तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: “माझी आठवण म्हणून हे करत राहा.” (१ करिंथ. ११:२३-२६) म्हणून ते या विधीला उपस्थित राहतात. आणि जोपर्यंत अभिषिक्‍त जन पृथ्वीवर जिवंत आहेत तोपर्यंत ते हा विधी पाळत राहतील. त्या विधीला उपस्थित राहण्यासाठी ते इतरांनाही आमंत्रण देतात.

१५. स्मारकविधीच्या वेळी आपण देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल कदर कशी दाखवू शकतो?

१५ स्मारकविधीत आपण जेव्हा एकत्र मिळून गीत गातो आणि प्रार्थना करतो, तेव्हा देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती करायची संधी आपल्याला मिळते. त्या दिवशी जे भाषण दिलं जाईल, त्याचा विषय आहे: “देवाने आणि ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे केलं त्याची कदर बाळगा!” त्या भाषणामुळे देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल आपली कदर आणखी वाढेल. स्मारकविधीत जेव्हा भाकर आणि द्राक्षारस फिरवला जाईल, तेव्हा या गोष्टी कशा प्रकारे येशूच्या शरीराला आणि रक्‍ताला सूचित करतात यावर आपल्याला मनन करता येईल. तसंच, यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे यावरसुद्धा आपल्याला मनन करता येईल. कारण, आपल्याला जीवन मिळावं म्हणून त्याने त्याच्या मुलाचं बलिदान दिलं. (मत्त. २०:२८) स्वर्गातल्या आपल्या पित्यावर आणि त्याच्या मुलावर आपलं प्रेम असेल, तर आपल्यापैकी प्रत्येक जण स्मारकविधीला उपस्थित राहील.

यहोवाने दिलेल्या आशेबद्दल त्याचे आभार माना

१६. अभिषिक्‍त जन आणि दुसरी मेंढरं यांच्यात काय सारखेपणा आहे?

१६ अभिषिक्‍त जन आणि दुसरी मेंढरं यांच्या आशा जरी वेगवेगळ्या असल्या, तरी यहोवाच्या नजरेत ते सारखेच आहेत. यहोवा दोन्ही गटांवर तितकंच प्रेम करतो. शेवटी या दोन्ही गटांसाठी त्याने एकच किंमत दिली; त्याने आपल्या प्रिय मुलाचं बलिदान दिलं. त्यामुळे दोन्ही गटांतल्या लोकांनी देवाला आणि ख्रिस्ताला एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. (स्तो. ३१:२३) शिवाय, हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे पवित्र शक्‍ती देतो; मग तो अभिषिक्‍त जनांपैकी असो किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी असो.

१७. पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍त जन कशाची वाट पाहत आहेत?

१७ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना  स्वर्गाच्या जीवनाची आशा जन्मापासूनच मिळते असं नाही; तर यहोवा ती आशा त्यांना देतो. आपल्या या आशेबद्दल ते मनन करतात, प्रार्थना करतात आणि ती पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहतात. स्वर्गातलं आपलं शरीर नेमकं कसं असेल याची ते कल्पनासुद्धा करू शकत नाहीत. (फिलिप्पै. ३:२०, २१; १ योहा. ३:२) पण तरीसुद्धा ते यहोवाला, येशूला, स्वर्गदूतांना आणि इतर अभिषिक्‍त जनांना भेटण्यासाठी आतुर आहेत. तसंच, स्वर्गाच्या राज्यात राजे आणि याजक म्हणून सेवा करण्यासाठीसुद्धा ते आतुर आहेत.

१८. दुसरी मेंढरं कोणत्या गोष्टींची वाट पाहत आहेत?

१८ दुसरी मेंढरं  पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कायम जगण्याची इच्छा जन्मापासूनच मानवांमध्ये असते. (उप. ३:११) दुसरी मेंढरं त्या दिवसाची मोठ्या आनंदाने वाट पाहत आहेत, जेव्हा ते संपूर्ण पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करतील. ते घरं बांधायची, बगीचे लावायची आणि आपल्या मुलांसोबत एक परिपूर्ण आरोग्य अनुभवायची आतुरतेने वाट पाहत आहेत. (यश. ६५:२१-२३) याशिवाय, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करून डोंगर, जंगलं आणि समुद्र पाहायची, आणि यहोवाने निर्माण केलेल्या सगळया गोष्टींचं जवळून निरीक्षण करायची ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण सगळ्यात मोठा आनंद त्यांना या गोष्टीचा आहे, की भविष्यात यहोवासोबतचं त्यांचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत जाईल.

१९. स्मारकविधीच्या वेळी आपल्यापैकी प्रत्येकाला काय करायची संधी मिळेल, आणि या वर्षी स्मारकविधी कधी पाळला जाईल?

१९ यहोवाने आपल्या प्रत्येक सेवकाला भविष्यासाठी एक सुंदर आशा दिली आहे. (यिर्म. २९:११) आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांची स्तुती करण्याची संधी स्मारकविधीच्या वेळी आपल्याला मिळेल. खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी हा प्रसंग खरोखरंच खूप महत्त्वाचा आहे. शनिवार, २७ मार्च २०२१ या दिवशी सूर्यास्तानंतर आपण हा विधी पाळणार आहोत. आपले बहुतेक बांधव कुठल्याही बंधनाशिवाय मोकळेपणाने हा विधी पाळू शकतील. पण असेही काही जण आहेत जे विरोधाचा सामना करूनही किंवा तुरुंगात असूनही हा विधी पाळतील. आपण कोणत्या परिस्थितीत हा विधी पाळतो याकडे यहोवाचं, येशूचं, स्वर्गदूतांचं आणि पुनरुत्थान झालेल्या अभिषिक्‍त जनांचं लक्ष आहे हे कधीही विसरू नका. स्मारकविधीचा तुमचा हा दिवस आनंदात जावो अशीच आमची आशा आहे!

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

^ परि. 5 २७ मार्च २०२१ हा दिवस यहोवाच्या साक्षीदारांसाठी एक खास दिवस आहे. त्या दिवशी संध्याकाळी आपण सगळे ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळणार आहोत. त्या विधीला उपस्थित असणारे बहुतेक जण ‘दुसरी मेंढरं’ या गटातले असतील. या गटाबद्दल १९३५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांना कोणती महत्त्वाची गोष्ट समजली? दुसऱ्‍या मेंढरांना मोठ्या संकटानंतर कोणते आशीर्वाद मिळतील? आणि स्मारकविधीच्या वेळी ते देवाची आणि ख्रिस्ताची स्तुती कशी करू शकतात?

^ परि. 2 शब्दांचा अर्थ: जे लोक येशूचं अनुकरण करतात आणि ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा आहे त्यांना दुसरी मेंढरं म्हटलं जातं. यांच्यापैकी काही जण शेवटल्या दिवसांत यहोवाची सेवा करू लागले. आणि मोठ्या संकटाच्या वेळी येशू मानवांचा न्याय करेल, तेव्हा दुसऱ्‍या मेंढरांपैकी जे लोक जिवंत असतील आणि मोठ्या संकटातून वाचतील त्यांना मोठा लोकसमुदाय म्हटलं जातं.