व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

“ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं” त्या शिष्याकडून काय शिकायला मिळतं?

“ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं” त्या शिष्याकडून काय शिकायला मिळतं?

“आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे.”—१ योहा. ४:७.

गीत ३ “देव प्रीती आहे”

सारांश *

१. देवाच्या प्रेमामुळे तुम्हाला कसं वाटतं?

प्रेषित योहानने आपल्या पत्रात लिहिलं, की “देव प्रेम आहे.” (१ योहा. ४: ८) या छोट्याशा वाक्यातून एक महत्त्वाचं सत्य आपल्या लक्षात येतं. ते म्हणजे, यहोवा जीवनाचा उगम तर आहेच, पण त्यासोबतच तो प्रेमाचाही उगम आहे. यहोवा आपल्यावर खूप प्रेम करतो! आणि त्याच्या प्रेमामुळेच आपल्याला आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटतं.

२. मत्तय २२:३७-४० या वचनांप्रमाणे सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञा कुठल्या आहेत, आणि त्यांपैकी दुसरी आज्ञा पाळणं आपल्याला कठीण का जाऊ शकतं?

ख्रिश्‍चनांना एकमेकांवर प्रेम करायची आज्ञा देण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करायचं की नाही, याची निवड आपण करू शकत नाही. आपण ते केलंच पाहिजे. (मत्तय २२:३७-४० वाचा.) यहोवाची ओळख झाल्यानंतर, येशूने दिलेली पहिली आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटणार नाही. कारण यहोवा परिपूर्ण आहे. तो आपल्याशी प्रेमाने वागतो आणि आपल्याला समजून घेतो. पण येशूने दिलेली दुसरी आज्ञा पाळणं आपल्याला कदाचित कठीण वाटू शकतं. कारण आपले सगळ्यात जवळचे शेजारी, म्हणजे आपले भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत. आणि काही वेळा ते अशा काही गोष्टी बोलतील किंवा करतील ज्यांमुळे आपल्याला वाटेल की ते आपल्याला समजून घेत नाहीत आणि आपल्याशी प्रेमाने वागत नाहीत. अपरिपूर्ण माणसांच्या बाबतीत असं होऊ शकतं हे यहोवाला माहीत होतं. आणि म्हणून, आपण एकमेकांवर प्रेम का केलं पाहिजे आणि आपल्याला ते कसं करता येईल, हे लिहायची प्रेरणा यहोवाने बायबलच्या काही लेखकांना दिली. त्यांपैकीच एक लेखक होता योहान.—१ योहा. ३:११, १२.

३. योहानने आपल्या पुस्तकांत वारंवार कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला?

योहानने जी पुस्तकं लिहिली त्यांत त्याने वारंवार या गोष्टीवर भर दिला, की ख्रिश्‍चनांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकात त्याने अनेकदा प्रेमाचा उल्लेख केला. शुभवर्तमान लिहिणारे मत्तय, मार्क आणि लूक या तिघांनी मिळूनसुद्धा केला नाही, इतक्या वेळा त्याने प्रेमाचा उल्लेख केला. योहानने जेव्हा शुभवर्तमानाचं पुस्तक आणि तीन पत्रं लिहिली तेव्हा तो जवळजवळ १०० वर्षांचा होता. या पुस्तकांतून आपल्याला हे शिकायला मिळतं, की आपण जे काही करतो ते प्रेमापोटी केलं पाहिजे. (१ योहा. ४:१०, ११) ही गोष्ट शिकायला मात्र योहानला वेळ लागला. असं का म्हणता येईल ते आपण पुढे पाहू या.

४. योहान नेहमीच इतरांशी प्रेमाने वागला का?

तरुण असताना योहान नेहमीच इतरांशी प्रेमाने वागला असं नाही. काही उदाहरणं पाहू या. एकदा येशू आणि त्याचे शिष्य शोमरोनमधून यरुशलेमला चालले होते. पण तिथल्या एका गावातल्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं नाही. त्या वेळी योहान कसा वागला? त्याला त्यांचा इतका राग आला, की स्वर्गातून आग बोलावून त्यांचा नाश करून टाकायच्या गोष्टी त्याने केल्या. (लूक ९:५२-५६) आणखी एका प्रसंगी योहान प्रेमाने वागायला चुकला. ही तेव्हाची घटना आहे, जेव्हा योहान आणि याकोबच्या आईने आपल्या मुलांना देवाच्या राज्यात मानाचं स्थान द्यायची विनंती येशूकडे केली. असं दिसतं की योहान आणि योकोबच्या सांगण्यावरूनच तिने ती विनंती केली होती. ही गोष्ट जेव्हा इतर प्रेषितांना कळली तेव्हा ते त्या दोघांवर खूप चिडले. (मत्त. २०:२०, २१, २४) अशा प्रकारे योहान अनेकदा चुकला, पण तरीसुद्धा येशूचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही.—योहा. २१:७.

५. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण योहानबद्दल आणि त्याने प्रेमाविषयी लिहिलेल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने कसं वागायचं, हे आपल्याला शिकायला मिळेल. तसंच, कुटुंबप्रमुखाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे हे तो कोणत्या एका खास मार्गाने दाखवू शकतो, हेसुद्धा आपल्याला शिकायला मिळेल.

इतरांवर आपलं प्रेम आहे हे कसं दिसून येईल?

यहोवाने आपल्यासाठी त्याच्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान देऊन आपल्यावरचं त्याचं प्रेम व्यक्‍त केलं (परिच्छेद ६-७ पाहा)

६. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे त्याने कसं दाखवलं?

आपल्याला कदाचित असं वाटेल, की इतरांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्याबद्दल मनात आपुलकीची भावना बाळगणं किंवा त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलणं. पण खरं प्रेम तितकंच नसतं; ते कृतीतूनही दाखवायची गरज असते. (याकोब २:१७, २६ पडताळून पाहा.) उदाहरणार्थ, यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे. (१ योहा. ४:१९) आणि आपलं हे प्रेम त्याने बायबलमध्ये सुंदर शब्दांतून व्यक्‍त केलं आहे. (स्तो. २५:१०; रोम. ८:३८, ३९) पण यहोवाचं आपल्यावर खरंच प्रेम आहे, याची खातरी फक्‍त त्याच्या शब्दांतून नाही तर त्याने आपल्यासाठी जे काही केलं त्यावरूनही मिळते. त्याबद्दल योहानने लिहिलं: “देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं. हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.” (१ योहा. ४:९) यहोवाने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक मुलगा दिला. (योहा. ३:१६) त्यामुळे त्याचं आपल्यावर प्रेम आहे याबद्दल मनात कोणतीही शंका उरत नाही.

७. येशूचं आपल्यावर प्रेम आहे हे त्याने कसं दाखवलं?

येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे. (योहा. १३:१; १५:१५) पण येशूचं त्यांच्यावर आणि आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याने फक्‍त बोलून दाखवलं नाही; तर त्याने ते आपल्या कृतीतूनही दाखवलं. तो म्हणाला: “कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.” (योहा. १५:१३) तर मग, यहोवा आणि येशू या दोघांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याचा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला काय करायची प्रेरणा मिळते?

८. १ योहान ३:१८ हे वचन आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतं?

यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्याच्या बदल्यात त्यांच्यावर प्रेम करायची प्रेरणा आपल्याला मिळते. हे प्रेम आपण त्यांच्या आज्ञा पाळून दाखवू शकतो. (योहा. १४:१५; १ योहा. ५:३) येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की आपण एकमेकांवर प्रेम करावं. (योहा. १३:३४, ३५) पण आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे, हे आपण फक्‍त शब्दांतून नाही तर कृतीतूनही दाखवलं पाहिजे. (१ योहान ३:१८ वाचा.) मग, आपल्याला हे कसं करता येईल?

आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करा

९. इतरांबद्दल प्रेम असल्यामुळे योहानने काय केलं?

प्रेम कृतीतून कसं दाखवायचं हे योहानच्या उदाहरणातून शिकायला मिळतं. तो खरंतर आपल्या वडिलांसोबत राहून कुटुंबाचा मासेमारीचा व्यवसाय करू शकला असता आणि भरपूर पैसा कमवू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. उलट, त्याने आपलं उरलेलं संपूर्ण आयुष्य इतरांना यहोवाबद्दल आणि येशूबद्दल शिकवण्यासाठी खर्च केलं. त्याने निवडलेला हा मार्ग सोपा नव्हता. येशूबद्दल प्रचार करत असल्यामुळे त्याला छळ सोसावा लागला आणि वयोवृद्ध असताना त्याला पात्म बेटावर कैद करण्यात आलं. (प्रे. कार्यं ३:१; ४:१-३; ५:१८; प्रकटी. १:९) पण कैदेत असतानासुद्धा त्याने इतरांचा विचार केला. उदाहरणार्थ, जेव्हा तो पात्म बेटावर होता तेव्हा त्याने प्रकटीकरणाचं पुस्तक लिहीलं. आणि “लवकरच घडणार असलेल्या गोष्टी” भाऊबहिणींना कळाव्यात म्हणून ते पुस्तक मंडळ्यांना पाठवलं. (प्रकटी. १:१) आणि कदाचित कैदेतून सुटल्यानंतर त्याने शुभवर्तमानाचं पुस्तक लिहिलं. याशिवाय, भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्याने तीन पत्रंही लिहिली. अशा प्रकारे योहानने स्वतःचा नाही, तर इतरांचा विचार केला. त्याच्या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो?

१०. लोकांवर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१० आपण आपला वेळ आणि शक्‍ती ज्या प्रकारे खर्च करू त्यावरून दिसून येईल, की इतरांवर आपलं किती प्रेम आहे. सैतानाचं हे जग आपल्याला सतत हे सांगतं असतं, की आपण आपला सगळा वेळ आणि शक्‍ती भरपूर पैसा आणि मोठं नाव कमवण्यात खर्च करावी. पण जगभरातले आपले भाऊबहीण आपला जास्तीत जास्त वेळ इतरांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आणि त्यांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी खर्च करतात. आणि काही जण तर हे काम पूर्णवेळसुद्धा करतात.

आपण आपल्या भाऊबहिणींसाठी आणि कुटुंबासाठी जे काही करतो त्यावरून त्यांच्यावरचं आपलं प्रेम दिसून येतं (परिच्छेद ११, १७ पाहा) *

११. यहोवावर आणि भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

११ कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या अनेक भाऊबहिणींना पूर्ण वेळेची नोकरी करावी लागते. पण असं असलं तरी ते जमेल त्या मार्गाने देवाच्या संघटनेला मदत करतात. जसं की, एखादी विपत्ती कोसळते तेव्हा काही जण मदतकार्यात हातभार लावतात. तर इतर काही जण बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. आणि जगभरात चाललेल्या कामासाठी तर सगळेच जण आनंदाने दान देतात. देवावर आणि इतरांवर प्रेम असल्यामुळेच ते हे करतात. याशिवाय, आपण सर्व दर आठवडी सभांना उपस्थित राहून आणि त्यांत सहभाग घेऊन भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं दाखवतो. आपण थकलेलो असलो, तरी संभाना जातो. आपल्याला भीती वाटत असली, तरी आपण उत्तरं देतो. आणि आपल्या सगळ्यांनाच काही ना काही समस्या असली, तरी सभेच्या आधी किंवा नंतर आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो. (इब्री १०:२४, २५) खरंच, आपले भाऊबहीण जे काही करतात त्याची आपण मनापासून कदर करतो.

१२. योहानचं त्याच्या भाऊबहिणींवर प्रेम होतं हे त्याने आणखी कोणत्या मार्गाने दाखवलं?

१२ योहानचं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम होतं, हे त्याने आणखी एका मार्गाने दाखवलं. तो म्हणजे, त्याने फक्‍त त्यांची प्रशंसाच केली नाही, तर गरज पडली तेव्हा त्यांना सल्लाही दिला. उदाहरणार्थ, त्याने आपल्या पत्रांत त्यांच्या मजबूत विश्‍वासाची आणि चांगल्या कामांची प्रशंसा केली. पण त्याच वेळी त्यांनी केलेल्या गंभीर चुकांबद्दल त्याने त्यांना सडेतोड सल्लाही दिला. (१ योहा. १:८–२:१, १३, १४) अगदी तसंच आपणसुद्धा, भाऊबहीण करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसा केली पाहिजे. पण जर एखादी व्यक्‍ती चुकीची प्रवृत्ती दाखवू लागली किंवा वाईट काम करू लागली, तर आपण प्रेमाने ती गोष्ट तिच्या लक्षात आणून दिली पाहिजे. असं करून आपण हेच दाखवू, की आपलं तिच्यावर प्रेम आहे. हे खरं आहे, की एखाद्याला सल्ला देणं सोपं नाही. त्यासाठी धाडस लागतं. पण बायबल असं म्हणतं, की जे खरे मित्र असतात ते एकमेकांना सुधारण्यासाठी सल्ला देतात.—नीति. २७:१७.

१३. भाऊबहिणींवर आपलं प्रेम असेल तर आपण काय करणार नाही?

१३ भाऊबहिणींवर आपलं प्रेम असेल, तर काही गोष्टी आपण करणार नाही. उदाहरणार्थ, कोणी काही बोललं तर ती गोष्ट आपण लगेच मनाला लावून घेणार नाही. येशूच्या जीवनातली एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, की सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांना त्याचं मांस खावं लागेल आणि त्याचं रक्‍त प्यावं लागेल. (योहा. ६:५३-५७) हे ऐकून त्याच्या शिष्यांपैकी अनेकांना इतका धक्का बसला की ते त्याला सोडून गेले. पण त्याचे प्रेषित मात्र त्याला एकनिष्ठ राहिले. त्यांच्यामध्ये योहानसुद्धा होता. खरंतर, येशूने जे म्हटलं होतं ते प्रेषितांनाही कळलं नव्हतं, आणि कदाचित त्यांनासुद्धा त्या गोष्टीचं आश्‍चर्य वाटलं असेल. पण तो जे काही म्हणाला ते चुकीचं आहे असा विचार करून त्यांनी त्याचं वाईट मानून घेतलं नाही, तर त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला. कारण त्यांना माहीत होतं, की येशू कधीच काही चुकीचं बोलू शकत नाही. (योहा. ६:६०, ६६-६९) यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. ती म्हणजे, आपले भाऊबहीण आपल्याला काही बोलले, तर आपण त्यांचं बोलणं लगेच मनाला लावून घेऊ नये; तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे समजावून सांगायची संधी त्यांना दिली पाहिजे.—नीति. १८:१३; उप. ७:९.

१४. आपण आपल्या भाऊबहिणींचा द्वेष केला तर काय होऊ शकतं?

१४ आपण आपल्या भाऊबहिणींचा कधीही द्वेष करू नये असाही सल्ला योहानने आपल्याला दिला. आपण हा सल्ला पाळला नाही, तर सैतान सहज आपल्याला चुकीचं वागायला लावू शकतो. (१ योहा. २:११; ३:१५) हीच गोष्ट पहिल्या शतकाच्या शेवटी घडली. त्या वेळी, सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष उत्पन्‍न करायचा आणि फूट पाडायचा खूप प्रयत्न करत होता. याचा परिणाम असा झाला, की योहानने आपली पत्रं लिहिली तोपर्यंत सैतानासारखी मनोवृत्ती दाखवणारी माणसं ख्रिस्ती मंडळीत शिरली होती. उदाहरणार्थ, दियत्रफेस हा एका मंडळीमध्ये फूट पाडत होता. (३ योहा. ९, १०) नियमन मंडळाने पाठवलेल्या वडिलांशी तो आदराने वागत नव्हता. इतकंच नाही, तर त्याला न आवडणाऱ्‍या लोकांना जर कोणी पाहुणचार दाखवला तर त्याला तो मंडळीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं हे वागणं खरंच किती दुष्ट होतं! आजसुद्धा सैतान देवाच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि त्यांच्यामध्ये फूट पाडायचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे सैतानाला आपण कधीच ती संधी देऊ नये.

आपल्या कुटुंबावर प्रेम करा

येशूने योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला आणि तिच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करायला सांगितलं. आज कुटुंबप्रमुखांनीसुद्धा आपल्या कुटुंबाच्या या दोन्ही गरज पूर्ण केल्या पाहिजेत (परिच्छेद १५-१६ पाहा)

१५. कुटुंबप्रमुखाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१५ एक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण करून हेच दाखवतो, की त्याचं त्याच्या कुटुंबावर प्रेम आहे. (१ तीम. ५:८) पण त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की कुटुंबाच्या फक्‍त रोजच्या गरजा पूर्ण करणं पुरेसं नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करणंही महत्त्वाचं आहे. (मत्त. ५:३) या बाबतीत येशूने कुटुंबप्रमुखांसाठी किती चांगलं उदाहरण मांडलं त्याकडे लक्ष द्या. योहानच्या शुभवर्तमानात असं सांगितलं आहे, की वधस्तंभावर शेवटचा श्‍वास घेत असतानासुद्धा येशू आपल्या कुटुंबाचा विचार करत होता. त्याला वधस्तंभावर जिथे खिळण्यात आलं होतं तिथे त्याची आई, मरीया हिच्यासोबत योहानसुद्धा उभा होता. भयंकर वेदना होत असतानाही येशूने योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितलं. (योहा. १९:२६, २७) हे खरं आहे, की येशूच्या भावंडांनी मरीयाच्या रोजच्या गरजा भागवल्या असत्या. पण तिच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण झाल्या नसत्या. कारण असं दिसतं, की तोपर्यंत येशूच्या भावंडांपैकी कोणीही त्याचा शिष्य बनला नव्हता. म्हणून त्याने योहानला आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितली. अशा प्रकारे मरीयाच्या रोजच्या आणि आध्यात्मिक, अशा दोन्ही गरजा पूर्ण होतील याची येशूने खातरी केली.

१६. योहानवर कोणकोणत्या जबाबदाऱ्‍या होत्या?

१६ योहानवर अनेक जबाबदाऱ्‍या होत्या. प्रेषित असल्यामुळे त्याने नक्कीच प्रचारकार्यात पुढाकार घेतला असेल. तसंच, त्याचं कदाचित लग्नही झालं असेल आणि त्यामुळे त्याच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍यासुद्धा असतील. कुटुंबाच्या रोजच्या गरजा भागवण्यासोबतच त्याला त्यांच्या आध्यात्मिक गरजाही पूर्ण कराव्या लागत असतील. (१ करिंथ. ९:५) यावरून आज कुटुंबप्रमुख काय शिकू शकतात?

१७. कुटुंबप्रमुखाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे हे तो कसं दाखवू शकतो?

१७ एका कुटुंबप्रमुखावर अनेक जबाबदाऱ्‍या असू शकतात. जसं की, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्याला नोकरी करावी लागत असेल. आणि यहोवाच्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून नोकरीच्या ठिकाणी त्याला प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करावं लागत असेल. (इफिस. ६:५, ६; तीत २:९, १०) तसंच, तो जर एक वडील किंवा सहायक सेवक असेल, तर मंडळीत त्याला काही जबाबदाऱ्‍याही असू शकतात. जसं की, भाऊबहिणींना प्रोत्साहन देणं आणि प्रचारकार्यात पुढाकार घेणं. पण हे सगळं करत असताना त्याने आपल्या कुटुंबासोबत नियमितपणे बायबलचा अभ्यास करणंही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबाला शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रितीने सुदृढ ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि त्यासाठी तो जे काही करतो त्याबद्दल त्याच्या कुटुंबातले सदस्य त्याची मनापासून कदर करतात.—इफिस. ५:२८, २९; ६:४.

“माझ्या प्रेमात टिकून राहा”

१८. योहानला कशाची खातरी होती?

१८ योहान खूप मोठं आयुष्य जगला. आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला अनेक चांगले अनुभव आले. पण त्यासोबतच, त्याला अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. या समस्यांमुळे त्याचा विश्‍वास कमजोर होऊ शकला असता. पण येशूच्या आज्ञा पाळायचा त्याने होता होईल तितका प्रयत्न केला. भाऊबहिणींवर प्रेम करायची जी आज्ञा येशूने दिली होती तीसुद्धा त्याने पाळली. त्यामुळे त्याला याची पूर्ण खातरी होती, की यहोवा आणि येशूचं त्याच्यावर प्रेम आहे, आणि कोणत्याही परीक्षेचा सामना करायचं बळ ते आपल्याला देतील. (योहा. १४:१५-१७; १५:९, १०; १ योहा. ४:१६) योहान शेवटपर्यंत आपल्या शब्दांतून आणि कृतीतून भाऊबहिणींवर प्रेम करत राहिला. सैतान किंवा सैतानाच्या जगातली कुठलीच गोष्ट त्याला असं करण्यापासून रोखू शकली नाही.

१९. १ योहान ४:७ हे वचन आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतं, आणि आपण ते का केलं पाहिजे?

१९ योहानप्रमाणेच आज आपण सैतानाच्या जगात राहत आहोत. आपल्याला माहीत आहे, की सैतान अतिश्‍य दुष्ट असून त्याला कोणाबद्दलही प्रेम नाही. (१ योहा. ३:१, १०) त्याची अशी इच्छा आहे की आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करू नये. पण आपण त्याला संधी दिली तरच तो तसं करू शकेल. त्यामुळे, आपण भाऊबहिणींवर प्रेम करायचा, ते प्रेम शब्दांतून व्यक्‍त करायचा आणि कृतीतून दाखवायचा ठाम निश्‍चय करू या. मग, यहोवाच्या कुटुंबाचा भाग असल्याचं समाधान आणि आनंद आपल्याला मिळेल.—१ योहान ४:७ वाचा.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 “ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं तो शिष्य” बहुतेक प्रेषित योहानच असावा. (योहा. २१:७) त्याच्यामध्ये नक्कीच अनेक चांगले गुण असतील आणि म्हणूनच येशूचं त्याच्यावर जास्त प्रेम असावं. पुढे जेव्हा तो वयोवृद्ध झाला तेव्हा यहोवाने त्याला प्रेमाबद्दल बरंच काही लिहिण्याची प्रेरणा दिली. या लेखात आपण योहानने लिहिलेल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करू. तसंच, त्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो हेसुद्धा पाहू.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: एक कुटुंबप्रमुख मदतकार्यात हातभार लावत आहे, जगभरात चाललेल्या कामासाठी ऑनलाईन दान देत आहे आणि आपल्या कौटुंबिक उपासनेसाठी त्याने इतर भाऊबहिणींनाही बोलवलं आहे.