व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १

शांत राहा आणि यहोवावर भरवसा ठेवा

शांत राहा आणि यहोवावर भरवसा ठेवा

२०२१ सालचं वार्षिक वचन: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.”—यश. ३०:१५.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१. चिंतेत असताना आपण कदाचित देवाला काय विचारू?

आपल्या सगळ्यांनाच शांत, सुरळीत आयुष्य जगायला आवडतं. चिंता, समस्या या कोणालाही नको असतात. पण तरीसुद्धा काही वेळा आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो. आणि त्यामुळे दावीद राजासारखंच आपणसुद्धा कदाचित यहोवाला असं विचारू: “मी कधीपर्यंत असा चिंतेत राहू? कधीपर्यंत दररोज मनात दुःख बाळगू?”—स्तो. १३:२.

२. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

हे खरं आहे, की चिंतेपासून किंवा भीतीपासून आज आपण स्वतःची सुटका करू शकत नाही; पण त्या भावना आपण नक्कीच कमी करू शकतो. या लेखात आधी आपण हे पाहू, की चिंता किंवा तणाव कोणत्या गोष्टींमुळे येऊ शकतो. त्यानंतर, मन शांत ठेवून समस्यांचा सामना कसा करायचा याचे सहा व्यावहारिक मार्ग आपण पाहू.

चिंतेची कारणं काय असू शकतात?

३. चिंतेची कारणं काय असू शकतात, आणि आपण ती टाळू शकतो का?

चिंतेची कारणं वेगवेगळी असू शकतात; जसं की, बेइमानी आणि अनैतिक कामं करण्याचा दबाव; वाढती महागाई आणि वाढते अपराध. या गोष्टी आपण टाळू शकत नाही. कारण, आज आपण अशा जगात राहत आहोत जिथले लोक बायबलच्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगत नाहीत. शिवाय, लोक ‘जगाच्या व्यवस्थेच्या चिंतांमुळे’ यहोवाची सेवा करणार नाहीत हे या जगाच्या देवाला, सैतानाला माहीत आहे. (मत्त. १३:२२; १ योहा. ५:१९) आणि त्यामुळेच आज जगात इतक्या चिंता आणि समस्या आहेत.

४. आपल्या समस्यांबद्दल आपण नको तितकी चिंता केली तर काय होऊ शकतं?

कधीकधी काही समस्यांचा आपण नको तितका विचार करतो आणि चिंतेत बुडून जातो. आपण असा विचार करतो, ‘मला माझ्या कमाईतून माझं घर तर चालवता येईल ना? मी जर आजारी पडलो आणि माझी नोकरी गेली तर काय होईल?’ किंवा मग, ‘मोहात पडून माझ्या हातून पाप घडलं तर?’ याशिवाय, ‘भविष्यात जेव्हा देवाच्या लोकांवर हल्ला होईल तेव्हा मी यहोवाला विश्‍वासू राहीन का,’ अशीही आपल्याला काळजी वाटू शकते. आणि मग, ‘या गोष्टींबद्दल काही प्रमाणात चिंता करणं चुकीचं आहे का,’ असा प्रश्‍न आपल्याला पडू शकतो.

५. “चिंता करायचं सोडून द्या,” असं येशूने म्हटलं तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं?

येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं: “चिंता करायचं सोडून द्या.” (मत्त. ६:२५) येशूला असं म्हणायचं होतं का, की आपण कधीच कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये? नाही, त्याला तसं म्हणायचं नव्हतं. कारण बायबलमध्ये अशा कितीतरी विश्‍वासू सेवकांची उदाहरणं आहेत ज्यांना काही गोष्टींची चिंता वाटली. * पण त्यामुळे यहोवा त्यांच्यावर रागावला नाही. (१ राजे १९:४; स्तो. ६:३) म्हणून येशूने जेव्हा म्हटलं, की “चिंता करायचं सोडून द्या,” तेव्हा तो खरंतर आपल्याला दिलासा देत होता. त्याला असं म्हणायचं होतं, की आपल्या गरजांची आपण इतकीसुद्धा चिंता करू नये, की देवाच्या सेवेला आपण जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकणार नाही. मग, एखाद्या गोष्टीची फार जास्त चिंता करायचं आपण कसं टाळू शकतो?—“ आपल्याला हे कसं करता येईल?” ही चौकट पाहा.

मन शांत ठेवायला मदत करणाऱ्‍या सहा गोष्टी

परिच्छेद ६ पाहा *

६. फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांत सांगितल्याप्रमाणे कोणती गोष्ट मन शांत ठेवायला आपल्याला मदत करेल?

(१ ) नेहमी प्रार्थना करा.  एखाद्या गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत असेल, तर मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. (१ पेत्र ५:७) त्यामुळे, “सर्व [मानवी] समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” तुम्हाला मिळेल. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) यहोवा त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे तुम्हाला ही शांती देईल आणि त्यामुळे तुमचं अस्वस्थ मन शांत होईल.—गलती. ५:२२.

७. आपल्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत?

यहोवाला प्रार्थना करताना त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करा. तुमची समस्या नेमकी काय आहे, तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे स्पष्टपणे त्याला सांगा. एखादी समस्या सोडवणं शक्य असेल, तर योग्य निर्णय घेण्यासाठी देवाकडे बुद्धी मागा आणि त्या निर्णयांप्रमाणे काम करण्यासाठी त्याच्याकडे बळही मागा. पण एखाद्या समस्येबद्दल तुम्ही काहीच करू शकत नसाल, तर त्याबद्दल जास्त चिंता वाटू नये म्हणून यहोवाला मदत मागा. तुमच्या प्रार्थना नेमक्या आणि स्पष्ट असल्या, तर यहोवा त्या प्रार्थनांची उत्तरं कशी देतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. पण बऱ्‍याचदा प्रार्थना करूनही जर तुम्हाला लगेच तिचं उत्तर मिळालं नाही, तर निराश होऊ नका. प्रार्थना करत राहा. कारण स्पष्टपणे प्रार्थना करण्यासोबतच तुम्ही सतत प्रार्थना करत राहावी असं यहोवाला वाटतं.—लूक ११:८-१०.

८. प्रार्थना करताना आपण कोणती गोष्ट विसरू नये?

प्रार्थनेत यहोवाला आपल्या चिंता सांगताना त्याचे आभार मानायला विसरू नका. यहोवाने आजपर्यंत आपल्यासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांचा विचार करा आणि त्याबद्दल त्याचे आभार माना; अगदी समस्यांचा सामना करत असतानाही. पण तुम्हाला कधी तुमच्या भावना व्यक्‍त करण्यासाठी नेमके शब्द सुचत नसतील, तर निराश होऊ नका. कारण तुम्ही फक्‍त एवढं जरी म्हटलं, की ‘यहोवा प्लीज मला मदत कर!’ तरी तो तुमची प्रार्थना ऐकेल.—२ इति. १८:३१; रोम. ८:२६.

परिच्छेद ९ पाहा *

९. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे?

(२ ) स्वतःच्या बुद्धीवर नाही, तर यहोवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीवर विसंबून राहा.  यशया संदेष्ट्याच्या काळात, यहूदाच्या लोकांना अशी भीती होती, की अश्‍शूरचे लोक आपल्यावर हल्ला करून विजय मिळवतील. त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी इजिप्तकडे मदत मागितली. (यश. ३०:१, २) पण यहोवाने त्यांना बजावून सांगितलं, की त्यांनी जर इजिप्तवर भरवसा ठेवला तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील. (यश. ३०:७, १२, १३) तसंच, यहोवाने यशयाद्वारे त्यांना हेसुद्धा सांगितलं, की खऱ्‍या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. तो म्हणाला: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.”—यश. ३०:१५ख.

१०. आपला यहोवावर भरवसा आहे हे कोणत्या काही परिस्थितींत आपण दाखवू शकतो?

१० आपला यहोवावर भरवसा आहे हे आपण कसं दाखवू शकतो? काही परिस्थितींचा विचार करा. समजा तुम्हाला जास्त पगाराच्या नोकरीची संधी चालून आली आहे. पण त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींसाठी पुरेसा वेळ देता येणार नाही. किंवा मग, कामाच्या ठिकाणी अशी एखादी व्यक्‍ती असेल जी तुमच्याशी जरा जास्तच जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल. किंवा अशी कल्पना करा, की जिच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करता अशी तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्‍ती तुम्हाला म्हणते: ‘आत्ताच ठरव तुला कोण पाहिजे, मी की तुझा देव?’ या प्रत्येक परिस्थितीत निर्णय घेणं खूप कठीण असू शकतं. पण त्यासाठी हवं असलेलं मार्गदर्शन यहोवा तुम्हाला नक्की देईल. (मत्त. ६:३३; १०:३७; १ करिंथ. ७:३९) मात्र प्रश्‍न असा आहे, की यहोवा देत असलेल्या मार्गदर्शनावर तुम्ही भरवसा ठेवाल का? त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्याल का?

परिच्छेद ११ पाहा *

११. विरोध होत असतानाही शांत राहायला बायबलमधली कोणती उदाहरणं आपल्याला मदत करू शकतात?

११ (३ ) बायबलमधल्या चांगल्या-वाईट उदाहरणांतून शिका.  कठीण परिस्थितीत शांत राहणं आणि यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारी कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये आहेत. त्यांचा अभ्यास करा. आणि तीव्र विरोध होत असतानाही देवाच्या सेवकांना शांत राहायला कशी मदत झाली त्याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहुद्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा प्रेषितांना आपलं प्रचार काम थांबायचा आदेश दिला, तेव्हा प्रेषित घाबरले नाहीत. उलट ते धैर्याने म्हणाले: “आम्ही माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे.” (प्रे. कार्यं ५:२९) त्यांना फटके मारण्यात आले तरी ते घाबरले नाहीत. कारण, यहोवा आपल्या बाजूने आहे आणि आपण घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे तो खूश आहे हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे ते प्रचार करत राहिले. (प्रे. कार्यं ५:४०-४२) आता स्तेफनचा विचार करा. मृत्यूच्या अगदी जवळ असतानाही तो शांत राहिला. त्याच्याबद्दल बायबल म्हणतं, की “तेव्हा त्याचा चेहरा एखाद्या स्वर्गदूताच्या चेहऱ्‍यासारखा” दिसत होता. (प्रे. कार्यं ६:१२-१५) यहोवाला विश्‍वासू राहण्याच्या आपल्या निर्णयावर यहोवा खूश आहे याची त्याला खातरी होती आणि म्हणून तो इतका शांत राहू शकला.

१२. १ पेत्र ३:१४ आणि ४:१४ या वचनांप्रमाणे छळ होत असतानाही आपण आनंदी का राहू शकतो?

१२ यहोवा आपल्यासोबत आहे याचा स्पष्ट पुरावा प्रेषितांकडे होता. कारण यहोवाने त्यांना चमत्कार करायची शक्‍ती दिली होती. (प्रे. कार्यं ५:१२-१६; ६:८) आज यहोवा आपल्याला चमत्कार करण्याची शक्‍ती देत नाही. पण त्याच्या वचनाद्वारे तो हे आश्‍वासन देतो, की नीतीने वागल्यामुळे आपल्याला दुःख जरी सोसावं लागलं तरी आपण आनंदी राहू शकतो. कारण आपण जेव्हा देवाची बाजू घेतो तेव्हा त्याला आनंद होतो आणि त्याची पवित्र शक्‍ती आपल्यावर असते. (१ पेत्र ३:१४; ४:१४ वाचा.) त्यामुळे भविष्यात जेव्हा आपला छळ केला जाईल तेव्हा आपण काय करू याचा आपण जास्त विचार करू नये. त्याऐवजी आपला छळ होईल तेव्हा यहोवा आपल्याला नक्की मदत करेल आणि वाचवेल यावरचा आपला भरवसा आज आपण मजबूत केला पाहिजे. तसंच, येशूने दिलेल्या अभिवचनावर त्याच्या शिष्यांप्रमाणेच आपण भरवसा ठेवला पाहिजे. त्याने म्हटलं होतं: “मी तुम्हाला असे शब्द आणि बुद्धी देईन, की तुमचे सगळे विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही.” त्याने पुढे असंही म्हटलं: “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.” (लूक २१:१२-१९) शिवाय आपण हे कधीही विसरू नये, की जे लोक मृत्यूपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहतात त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट लक्षात ठेवून तो भविष्यात त्यांचं पुनरुत्थान करेल.

१३. ज्यांनी यहोवावर भरवसा ठेवला नाही अशांकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

१३ बायबलमध्ये अशाही काही लोकांची उदाहरणं दिली आहेत ज्यांनी यहोवावर भरवसा ठेवला नाही. त्यांच्या उदाहरणांचं परीक्षण केल्यामुळे त्यांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतील. यहूदाचा राजा आसा याचाच विचार करा. एकदा इथियोपियाचं एक भलंमोठं सैन्य यहूदावर हल्ला करायला आलं, तेव्हा तो मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिला, आणि यहोवाने त्याला विजय मिळवून दिला. (२ इति. १४:९-१२) पण नंतर जेव्हा इस्राएलचा राजा बाशा एक छोटं सैन्य घेऊन त्याच्याशी लढायला आला, तेव्हा मात्र आसा आधीसारखं यहोवावर विसंबून राहिला नाही. तर त्याने सीरियाच्या राजाला सोनं-चांदी पाठवून त्याच्याकडे मदत मागितली. (२ इति. १६:१-३) इतकंच नाही, तर त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याला एक गंभीर रोग झाला तेव्हासुद्धा तो मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिला नाही.—२ इति. १६:१२.

१४. आसाने केलेल्या चुकांमधून आपण काय शिकतो?

१४ सुरुवातीला जेव्हा आसा राजावर समस्या आल्या, तेव्हा त्याने यहोवाकडे मदत मागितली. पण नंतर मात्र तो मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिला नाही. त्याने स्वतःच्या बळावर आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. वरवर पाहिल्यावर आपल्याला कदाचित असं वाटेल, की आसा राजाने सीरियाच्या राजाकडून घेतलेल्या मदतीमुळे यहूदावरचं संकट टळलं. पण खरंतर यहूदामध्ये फार काळ शांती टिकून राहिली नाही. यहोवाने एका संदेष्ट्याद्वारे त्याला सांगितलं: “तू तुझा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याऐवजी सीरियाच्या राजावर भरवसा ठेवलास, म्हणून सीरियाचा राजा तुझ्या हातून निसटून गेला.” (२ इति. १६:७) आसाने केलेल्या चुकांमधून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो? तो म्हणजे, आपण यहोवाच्या मदतीशिवाय स्वतःच्या समस्या सोडवू शकतो, असा फाजील आत्मविश्‍वास आपण कधीही बाळगू नये. कधीकधी परिस्थितीमुळे आपल्याला पटकन निर्णय घ्यावे लागले तरी आपण शांत राहून यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. योग्य निर्णय घ्यायला तो नक्कीच आपल्याला मदत करेल.

परिच्छेद १५ पाहा *

१५. बायबल वाचताना आपण काय करू शकतो?

१५ (४ ) बायबलची वचनं तोंडपाठ करा.  संकटाच्या काळात शांत राहणं आणि यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे असं सांगणारी कितीतरी वचनं बायबलमध्ये आहेत. बायबल वाचताना अशी वचनं तुम्हाला सापडली, तर ती तोंडपाठ करायचा प्रयत्न करा. त्यासाठी, तुम्ही ती मोठ्याने वाचू शकता किंवा ती लिहून पुन्हापुन्हा वाचू शकता. यहोशवालासुद्धा असाच सल्ला देण्यात आला होता. यहोवाने त्याला सांगितलं होतं, की यशस्वी होण्यासाठी आणि सुज्ञपणे वागण्यासाठी त्याने नियमशास्त्राचं नियमितपणे वाचन करून त्यावर मनन करावं. त्यामुळे कठीण परिस्थितींत घाबरून न जाता, धाडसाने देवाच्या लोकांचं नेतृत्व करायला त्याला खूप मदत झाली. (यहो. १:८, ९) बायबलमधली अनेक वचनं तुम्हालाही कठीण परिस्थितींत मन शांत ठेवायला मदत करू शकतात.—स्तो. २७:१-३; नीति. ३:२५, २६.

परिच्छेद १६ पाहा *

१६. यहोवा आपल्याला त्याच्यावर भरवसा ठेवायला भाऊबहिणींद्वारे कशी मदत करतो?

१६ (५ ) देवाच्या लोकांसोबत संगती करा.  यहोवा आपल्या भाऊबहिणींद्वारेसुद्धा आपल्याला कठीण परिस्थितीत मन शांत ठेवायला आणि त्याच्यावर भरवसा ठेवायला मदत करतो. सभांमध्ये ऐकायला मिळाणाऱ्‍या भाषणांमुळे, भाऊबहिणींच्या उत्तरांमुळे आणि त्यांच्याशी बोलल्यामुळे आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं. (इब्री १०:२४, २५) तसंच, मंडळीतल्या आपल्या मित्रांना आपल्या चिंता सांगितल्यामुळेही मन खूप हलकं होऊ शकतं. त्यांच्या “दिलासा देणाऱ्‍या शब्दांमुळे” आपल्या मनावरचा भार बराच कमी होऊ शकतो.—नीति. १२:२५.

परिच्छेद १७ पाहा *

१७. इब्री लोकांना ६:१९ या वचनात सांगितल्याप्रमाणे राज्याबद्दलची आपली आशा आपल्याला कशी मदत करेल?

१७ (६ ) आपली आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवा.  देवाच्या राज्याबद्दलची आशा “आपल्या जिवासाठी एखाद्या नांगरासारखी आहे.” नांगर जसं जहाजाला समुद्रात स्थिर राहायला मदत करतं, तसंच आपली आशाही आपल्याला कठीण प्रसंगांत पाय घट्ट रोवून स्थिर उभं राहायला मदत करू शकते. (इब्री लोकांना ६:१९ वाचा.) म्हणून, एका सुंदर भविष्याची जी अभिवचनं यहोवाने आपल्याला दिली आहेत त्यांवर मनन करा. त्या नवीन जगात कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा भीती आपल्याला त्रास देणार नाही. (यश. ६५:१७) दुःखाचं नावसुद्धा तिथे राहणार नाही. अशा शांतिमय नवीन जगात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. (मीखा ४:४) या सुंदर आशेबद्दल इतरांना सांगितल्यामुळेही आपली आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर राहील. म्हणून प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात होता होईल तितका सहभाग घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला “शेवटपर्यंत तुमची आशा दृढपणे टिकवून” ठेवता येईल.—इब्री ६:११.

१८. आपण कशाची अपेक्षा करू शकतो, आणि त्यांचा सामना करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१८ या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतशा आपल्या समस्या आणि चिंता आणखी वाढतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. पण २०२१ सालचं आपलं वार्षिक वचन, कठीण प्रसंगांचा सामना करताना आपल्याला शांत राहायला आणि स्वतःवर नाही, तर यहोवावर भरवसा ठेवायला मदत करेल. तर मग, २०२१ या वर्षादरम्यान आपण आपल्या कामांतून दाखवू, की यहोवाने दिलेल्या पुढील अभिवचनावर आपला पूर्ण भरवसा आहे: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.” यश. ३०:१५.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

^ परि. 5 यहोवावर भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं आहे, या गोष्टीवर २०२१ सालचं वार्षिक वचन भर देतं. कारण आज आपल्याला अशा समस्यांचा सामना करावा लागतो ज्यांमुळे आपण चिंतित होतो आणि घाबरून जातो. शिवाय येणाऱ्‍या काळातसुद्धा आपल्याला अशाच समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे वार्षिक वचनात दिलेला सल्ला आपण रोजच्या जीवनात कसा लागू करू शकतो, याची चर्चा या लेखात केली जाईल.

^ परि. 5 काहींना एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र चिंता किंवा भीती वाटते. हा खरंतर एक गंभीर आजार आहे. पण येशू अशा प्रकारच्या चिंतेबद्दल बोलत नव्हता.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: (१) एक बहीण आपल्या चिंतांविषयी दिवसभरात अनेकदा प्रार्थना करते.

^ परि. 65 चित्रांचं वर्णन: (२) कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुट्टीत ती मार्गदर्शनासाठी, बुद्धीसाठी बायबल वाचते.

^ परि. 67 चित्रांचं वर्णन: (३) बायबलमध्ये दिलेल्या चांगल्या-वाईट उदाहरणांवर ती मनन करते.

^ परि. 69 चित्रांचं वर्णन: (४) आवडलेलं वचन तोंडपाठ करण्यासाठी ती ते फ्रीजवर चिकटवते.

^ परि. 71 चित्रांचं वर्णन: (५) सेवाकार्यात ती चांगल्या संगतीचा आनंद घेते.

^ परि. 73 चित्रांचं वर्णन: (६) नवीन जगातल्या आशीर्वादांवर मनन करून ती आपली आशा नेहमी डोळ्यांसमोर ठेवते.