अभ्यास लेख २
“आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या”
“आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.”—रोम. १२:२.
गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव
सारांश a
१-२. बाप्तिस्म्यानंतरही आपण काय करत राहणं गरजेचं आहे? स्पष्ट करा.
तुम्ही तुमचं घर किती वेळा स्वच्छ करता? तुम्ही पहिल्यांदा घरात राहायला आला तेव्हा तुम्ही चांगली साफसफाई केली असेल. पण नंतर जर तुम्ही साफसफाई करायचं सोडून दिलं तर काय होईल? लवकरच तुमचं घर धुळीने पुन्हा माखून जाईल आणि घाण होईल. घर निटनेटकं ठेवायचं असेल तर ते वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.
२ घराला निटनेटकं ठेवण्यासाठी जसं प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, तसं आपल्या विचारसरणीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीतही आहे. बाप्तिस्मा घेण्याआधी आपण स्वतःमध्ये योग्य तो बदल करण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. आणि आपल्या “शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध” केलं असेल. (२ करिंथ. ७:१) पण आता प्रेषित पौलने दिलेल्या एका सल्ल्याचंही आपल्याला अनुकरण करावं लागेल. त्याने असा सल्ला दिला, की तुमच्या मनोवृत्तीत “सतत बदल करत राहा.” (इफिस. ४:२३) आपण सतत असा बदल करत राहणं का गरजेचं आहे. कारण आपण जर असं केलं नाही, तर या जगाची धूळ आणि घाण आपल्या मनात साचू लागेल. पण हे जर आपल्याला टाळायचं असेल आणि यहोवासमोर आपल्याला शुद्ध राहायचं असेल, तर आपण आपल्या विचारसरणीचं, व्यक्तिमत्त्वाचं आणि इच्छा-आकांक्षांचं नेहमी परिक्षण करत राहिलं पाहिजे.
‘सतत आपल्या विचारसरणीत बदल करत राहा’
३. आपल्या विचारसरणीत बदल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (रोमकर १२:२)
३ आपली विचारसरणी बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? (रोमकर १२:२ वाचा.) ‘विचारसरणी बदलणं’ यासाठी असलेल्या ग्रीक वाक्यांशाचं भाषांतर ‘मनाचं नविनीकरण’ असंही केलं जाऊ शकतं. एखाद्या गोष्टीचं नविनीकरण करणं म्हणजे फक्त वरवर बदल करणं असं नाही. उदाहरणार्थ, एखाद्या घराचं नविनीकरण करायचं असतं तेव्हा आपण फक्त त्याची सजावट करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं नविनीकरण करण्यासाठी फक्त काही चांगली कामं करणंच पुरेसं नाही. तर आपण आतून कशा प्रकारची व्यक्ती आहोत, याचंसुद्धा खोलवर परीक्षण केलं पाहिजे. आणि यहोवाच्या स्तरांचं जवळून पालन करण्यासाठी, आपल्या जीवनात आवश्यक ते बदल आपण केले पाहिजेत. शिवाय, हे एकदाच करून चालणार नाही, तर आपण ते सतत करत राहिलं पाहिजे.
४. या जगाचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू नये म्हणून आपण काय करू शकतो?
४ जेव्हा आपण परिपूर्ण होऊ तेव्हा आपण नेहमी असंच वागू ज्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल. पण तोपर्यंत यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहावे लागतील. रोमकर १२:२ मध्ये आपली विचारसरणी बदलणं आणि देवाची इच्छा काय आहे ते समजून घेणं, यांचा कसा संबंध आहे ते प्रेषित पौलने समजावून सांगितलं आहे. जगाचा प्रभाव स्वतःवर पडू देण्याऐवजी आपण सतत स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. तसंच, आपण जी ध्येयं ठेवतो किंवा जे निर्णय घेतो त्यांवर जगाच्या विचारसरणीपेक्षा, देवाच्या विचारसरणीचा आपण किती प्रभाव पडू देतो हेसुद्धा तपासून पाहिलं पाहिजे.
५. यहोवाचा दिवस जवळ आहे, या बाबतीत आपण स्वतःच्या विचारसरणीचं परीक्षण कसं करू शकतो? (चित्र पाहा.)
५ एका उदाहरणाचा विचार करा. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण ‘त्याच्या दिवसाची वाट पाहिली’ पाहिजे आणि तो दिवस नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. (२ पेत्र ३:१२) तर आता हे प्रश्न विचारून स्वतःचं परीक्षण करा: ‘मी ज्या प्रकारे जीवन जगतोय, त्यावरून या जगाचा अंत जवळ आलाय याची मला जाणीव असल्याचं दिसून येतं का? शिक्षणाबद्दल आणि नोकरी-व्यवसायाबद्दल मी जे निर्णय घेतो त्यांवरून यहोवाची सेवा माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची आहे, हे दिसून येतं का? यहोवा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करेल, असा विश्वास मला आहे का, की मी सतत पैसा कमवण्याबद्दल चिंता करत राहतो?’ यहोवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपण आपल्या विचारसरणीत आणि जीवनात बदल करतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल!—मत्त. ६:२५-२७, ३३; फिलिप्पै. ४:१२, १३.
६. आपल्याला नेहमी काय करत राहायची गरज आहे?
६ आपण आपल्या विचारसरणीचं नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे. आणि जिथे गरज आहे तिथे नेहमी बदल करत राहिलं पाहिजे. प्रेषित पौलने करिंथमधल्या भाऊबहिणींना असा सल्ला दिला: “तुम्ही विश्वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे सतत पाहा.” (२ करिंथ. १३:५) ‘विश्वासात असणं’ म्हणजे फक्त सभांना उपस्थित राहणं आणि अधूनमधून प्रचारकार्यात सहभाग घेणं इतकंच नाही; तर आपले विचार, आपल्या इच्छा आणि आपले हेतू यांच्याशीसुद्धा त्याचा संबंध आहे. म्हणूनच आपण देवाचं वचन वाचून आपल्या विचारसरणीत बदल करत राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण यहोवासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. आणि मग त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनात आवश्यक ते बदल केले पाहिजेत.—१ करिंथ. २:१४-१६.
“नवीन व्यक्तिमत्त्व धारण करा”
७. इफिसकर ४:३१, ३२ प्रमाणे आपल्याला आणखी काय करत राहायची गरज आहे, आणि हे कठीण का असू शकतं?
७ इफिसकर ४:३१, ३२ वाचा. आपल्या विचारसरणीत बदल करण्यासोबतच आपण “नवीन व्यक्तिमत्त्व धारण” केलं पाहिजे. (इफिस. ४:२४) आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की, सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध यांसारखे वाईट गुण आपण स्वतःमधून काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. का बरं? कारण काही वाईट गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात खोलवर रुजलेले असतात. उदाहरणार्थ, काही जण “तापट” स्वभावाचे असतात आणि त्यांना ‘लगेच राग येतो.’ (नीति. २९:२२) अशा प्रकारच्या वाईट गुणांना आपल्यामधून मुळासकट काढून टाकण्यासाठी आपल्याला बराच काळ प्रयत्न करत राहावे लागतील; मग आपला बाप्तिस्मा झाला असला तरीसुद्धा तसं करत राहावं लागेल. हेच आपल्याला पुढच्या अनुभवात पाहायला मिळेल.
८-९. जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतील, हे स्टिफनच्या उदाहरणातून कसं कळतं?
८ स्टिफन नावाच्या एका भावाला आपल्या रागावर ताबा मिळवायला खूप कठीण जात होतं. तो म्हणतो, “बाप्तिस्म्यानंतरही मला या बाबतीत खूप प्रयत्न करावे लागले. एकदा घरोघरच्या प्रचारकार्यात असताना एका चोराने माझ्या कारमधला रेडीओ चोरला. मी त्याच्यामागे धावत गेलो. मी त्याला पकडणार इतक्यात तो रेडीओ टाकून पळून गेला. त्यानंतर मी जेव्हा ही गोष्ट माझ्या ग्रुपमधल्या भाऊबहिणींना सांगत होतो, तेव्हा एका वडिलांनी मला विचारलं: ‘स्टिफन, जर तू त्या चोराला पकडलं असतंस, तर तू काय केलं असतंस?’ त्यांच्या त्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडलं. आणि मला जाणीव झाली की मला माझ्या रागावर नियंत्रण करण्यासाठी अजूनही प्रयत्न करत राहावे लागतील.” b
९ आपल्याला कदाचित वाटेल, की आपण आपल्या वाईट गुणांवर ताबा मिळवलाय. पण स्टिफनच्या उदाहरणातून दिसून येतं, की कधीकधी अचानक असे गुण बाहेर येऊ शकतात. तुमच्या बाबतीत जर कधी असं झालं तर निराश होऊ नका. आणि आपल्याला कधीच सुधारणा करता येणार नाही असा विचार करू नका. प्रेषित पौलनेही कबूल केलं: “योग्य ते करायची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच दिसतं.” (रोम. ७:२१-२३) आपण यहोवाची सेवा करत असलो तरीसुद्धा अपरिपूर्णतेमुळे आपल्या सगळ्यांमध्येच काही वाईट गुण असतात. ज्याप्रमाणे घर नियमितपणे स्वच्छ केलं नाही तर ते धुळीने माखू शकतं, त्याचप्रमाणे जर आपण सतत प्रयत्न केले नाहीत, तर हे वाईट गुण पुन्हा-पुन्हा आपल्यामध्ये डोकावू शकतात. म्हणूनच आपण या गुणांवर मात करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. पण आपण हे कसं करू शकतो?
१०. वाईट गुणांवर आपण कशा प्रकारे मात करू शकतो? (१ योहा. ५:१४, १५)
१० ज्या वाईट गुणांवर मात करायचा तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यांबद्दल यहोवाला प्रार्थना करा. आणि असा भरवसा बाळगा, की तो तुमच्या प्रार्थना ऐकेल आणि तुम्हाला नक्की मदत करेल. (१ योहान ५:१४, १५ वाचा.) यहोवा चमत्कार करून तो वाईट गुण तुमच्यातून काढून टाकणार नाही. पण त्यावर मात करण्यासाठी तो तुम्हाला नक्की ताकद देईल. (१ पेत्र ५:१०) प्रार्थना करण्यासोबतच त्यावर काम करा. आणि असं काहीही करू नका ज्यामुळे जुनं व्यक्तिमत्त्व पुन्हा तुमच्यामध्ये येईल. उदाहरणार्थ, ज्या गुणावर तुम्ही मात करायचा प्रयत्न करत आहात, त्या गुणाला बढावा देणारे चित्रपट आणि कार्यक्रम पाहू नका, किंवा तशा कथा-कादंबऱ्या वाचू नका. आणि चुकीच्या इच्छांना मनात घोळू देऊ नका.—फिलिप्पै. ४:८; कलस्सै. ३:२.
११. नवीन व्यक्तिमत्त्व धारण करत राहण्यासाठी आपण काय करू शकतो?
११ तुम्ही जुनं व्यक्तिमत्त्व सोडून दिलेलं असलं, तरी नवीन व्यक्तिमत्त्व धारण करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. मग हे आपण कसं करू शकतो? यासाठी यहोवाच्या गुणांबद्दल तुम्हाला जे काही शिकायला मिळतं, त्याप्रमाणे वागून यहोवाचं अनुकरण करायचं ध्येय ठेवा. (इफिस. ५:१, २) उदाहरणार्थ, यहोवाच्या क्षमाशीलतेबद्दल बायबलचा एखादा अहवाल वाचत असताना, तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मीही इतरांना क्षमा करायला तयार असतो का?’ तसंच, हलाखीच्या परिस्थितीत असलेल्यांबद्दल यहोवा जी दया दाखवतो त्याबद्दल वाचत असताना स्वतःला विचारा: ‘मलाही गरजू भाऊबहिणींबद्दल अशीच काळजी वाटते का? आणि माझ्या वागण्यातून मी ती दाखवतो का?’ अशा प्रकारे आपल्या विचारसरणीत बदल करून नवीन व्यक्तिमत्त्व धारण करायचा प्रयत्न करत राहा. आणि असं करत असताना धीर सोडू नका.
१२. देवाच्या वचनात किती ताकद आहे, हे स्टिफनने कसं अनुभवलं?
१२ आधी उल्लेख केलेल्या स्टिफनलाही नवीन व्यक्तिमत्त्व धारण करता आलं. तो म्हणतो: “बाप्तिस्मा झाल्यानंतर मला बऱ्याचदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागला, जेव्हा माझ्या रागावर नियंत्रण करणं मला कठीण होतं. जेव्हा कोणी मला चीड आणायचा प्रयत्न करतो, तेव्हा एकतर मी तिथून निघून जातो किंवा दुसऱ्या एका मार्गानी ते वातावरण थंड करायचा प्रयत्न करतो. मी ज्या प्रकारे या परिस्थिती हाताळल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांनी आणि माझ्या बायकोनेही माझी प्रशंसा केली आहे. कधीकधी तर मलाच याचं आश्चर्य वाटतं. मला माहीत आहे, की माझ्या व्यक्तिमत्त्वात झालेले हे बदल मी स्वतःच्या बळावर केलेले नाहीत. उलट देवाच्या वचनात एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल करण्याची ताकद आहे, याचाच हा एक पुरावा आहे.”
वाईट इच्छांविरूद्ध लढत राहा
१३. योग्य ते करत राहण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? (गलतीकर ५:१६)
१३ गलतीकर ५:१६ वाचा. जे योग्य आहे ते करत राहण्यासाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून यहोवा उदारपणे आपल्याला त्याची पवित्र शक्ती पुरवतो. जेव्हा आपण देवाच्या वचनातून अभ्यास करतो, तेव्हा या शक्तीचा प्रभाव आपल्यावर होत असतो. तसंच आपण ख्रिस्ती सभांना जातो तेव्हासुद्धा आपल्याला देवाची ही पवित्र शक्ती मिळते. या सभांमध्ये आपण आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवतो, कारण तेही आपल्यासारखंच योग्य ते करत राहण्यासाठी खूप मेहनत घेतात. आणि यामुळे आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं. (इब्री १०:२४, २५; १३:७) शिवाय, आपण जेव्हा यहोवाला आपल्या कमतरतांविरुद्ध लढत राहण्यासाठी कळकळीची विनंती करतो, तेव्हा या कमतरतांविरुद्ध लढत राहण्यासाठी तो आपल्याला पवित्र शक्ती देतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे चुकीच्या इच्छा आपल्यामधून आपोआप निघून जाणार नाहीत. पण त्याप्रमाणे वागण्याचा मोह आपल्याला टाळता येईल. गलतीकर ५:१६ म्हणतं, की जे पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागतात, ते ‘चुकीच्या इच्छांप्रमाणे वागणार नाहीत.’
१४. योग्य इच्छा उत्पन्न करत राहणं का महत्त्वाचं आहे?
१४ आध्यात्मिक गोष्टी नियमितपणे करत राहायची सवय लावल्यानंतर आपण ती सवय टिकवून ठेवली पाहिजे आणि योग्य इच्छा आपण आपल्या मनात उत्पन्न करत राहिलं पाहिजे. हे का महत्त्वाचं आहे? कारण आपला एक शत्रू कधीही झोपत नाही. आणि तो शत्रू म्हणजे चुकीच्या गोष्टी करत राहण्याचा मोह. बाप्तिस्मा झाल्यानंतरसुद्धा ज्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, त्या गोष्टींचं आकर्षण आपल्याला वाटू शकतं. जसं की, जुगार, अतिमद्यपान आणि अश्लील गोष्टी पाहणं. (इफिस. ५:३, ४) एक तरुण ख्रिस्ती भाऊ प्रामाणिकपणे असं सांगतो, “मला सगळ्यात कठीण गोष्ट कोणती गेली असेल, तर ती म्हणजे समलिंगी व्यक्तींबद्दल असलेलं आकर्षण. मला वाटलं या भावना फक्त काही काळापुरत्या राहतील आणि नंतर निघून जातील. पण आजसुद्धा मला या भावनांशी झगडावं लागतं.” एखादी चुकीची इच्छा जर खूपच तीव्र असेल, तर तुम्हाला कोणती गोष्ट मदत करू शकेल?
१५. इतरांनाही आपल्यासारखंच चुकीच्या इच्छांना तोंड द्यावं लागलं हे समजल्यामुळे आपल्यालाही कसं प्रोत्साहन मिळतं? (चित्र पाहा.)
१५ जेव्हा तुम्ही तीव्र अशा चुकीच्या इच्छेविरूद्ध झगडत असता, तेव्हा हे नेहमी लक्षात असू द्या, की तुम्ही एकटे नाहीत. बायबल म्हणतं: “माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.” (१ करिंथ. १०:१३क) करिंथ मंडळीतल्या भाऊबहिणींना उद्देशून हे लिहिण्यात आलं होतं. त्यांच्यापैकी काही जण आधी व्यभिचारी, समलिंगी आणि दारुडे होते. (१ करिंथ. ६:९-११) बाप्तिस्म्यानंतर त्यांना कोणत्याही चुकीच्या इच्छेविरुद्ध झगडावं लागलं नसेल, असं तुम्हाला वाटतं का? हे शक्य नाही. ते अभिषिक्त ख्रिस्ती असले तरीसुद्धा ते सगळे अपरिपूर्ण होते. त्यामुळे त्यांना वेळोवेळी चुकीच्या इच्छेविरुद्ध नक्कीच झगडावं लागलं असेल. पण त्यांनी त्याच्यावर मात केली. चुकीच्या इच्छांवर कोणी ना कोणी आधी मात केली आहे हे समजल्यामुळे आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा ‘विश्वासात दृढ राहा, कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.’—१ पेत्र ५:९.
१६. आपण कोणता चुकीचा विचार टाळला पाहिजे, आणि का?
१६ एखाद्या कमतरतेशी झगडत असताना आपल्याला किती त्रास होतोय हे दुसरं कोणीच समजू शकणार नाही, असा विचार करू नका. असा विचार करणं धोकादायक आहे. कारण असा विचार केल्यामुळे आपण अगदी असाहाय्य आहोत आणि चुकीच्या इच्छांवर आपण कधीच मात करू शकत नाही, असं तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही. बायबल असं म्हणतं: “देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही. तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.” (१ करिंथ. १०:१३ख) त्यामुळे एखादी चुकीची इच्छा कितीही तीव्र असली, तरी आपण तिच्यावर मात करू शकतो आणि यहोवाच्या मदतीने आपण चुकीचं करण्यापासून स्वतःला आवरू शकतो.
१७. चुकीच्या इच्छा मनात येऊ देण्याचं आपण टाळू शकत नसलो तरी आपण काय करू शकतो?
१७ आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण अपरिपूर्ण असल्यामुळे अशा चुकीच्या इच्छा आपल्या मनात वेळोवेळी येतील, त्यांना आपण टाळू शकत नाही. पण या इच्छांचा आपण ठामपणे विरोध नक्कीच करू शकतो. योसेफनेही असंच केलं. पोटीफरच्या बायकोने जेव्हा त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला, तेव्हा तो तिथून लगेच पळून गेला. (उत्प. ३९:१२) त्यामुळे चुकीच्या इच्छांपुढे हात टेकायची काहीच गरज नाही.
प्रयत्न करत राहा
१८-१९. आपल्या विचारसरणीत बदल करायचा प्रयत्न करत असताना आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१८ या लेखात आपण पाहिलं, की आपले विचार आणि आपलं वागणं यहोवाच्या इच्छेप्रमाणे असावं म्हणून आपल्या विचारसरणीत बदल करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि या प्रश्नांवर विचार केला पाहिजे: ‘आपण अगदी शेवटच्या काळात जगत आहोत याची मला जाणीव आहे, हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का? नवीन व्यक्तिमत्त्व धारण करण्याच्या बाबतीत मी प्रगती करत आहे का? चुकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा मोह आवरता यावा म्हणून मी यहोवाच्या पवित्र शक्तीचा स्वतःवर प्रभाव होऊ देत आहे का?’
१९ तुम्ही स्वतःचं परीक्षण करता तेव्हा परिपूर्णतेची अपेक्षा करू नका, तर आतापर्यंत तुम्ही किती प्रगती केली आहे, त्याकडे लक्ष द्या. काही बाबतींत तुम्हाला अजूनही सुधारणा करायची गरज आहे असं दिसून आलं तर निराश होऊ नका. त्याऐवजी फिलिप्पैकर ३:१६ मध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागा: “आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.” आपण जर असं करत राहिलो, तर आपल्या विचारसरणीत बदल करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल.
गीत ३१ देवासोबत चालत राहा!
a प्रेषित पौलने ख्रिस्ती भाऊबहिणींना असा सल्ला दिला, की ‘या जगाचा प्रभाव स्वतःवर होऊ देऊ नका.’ त्याने दिलेला हा सल्ला आज आपल्यासाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. या दुष्ट जगाचा प्रभाव आपल्यावर तर होत नाही ना, या गोष्टीची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी, जेव्हा-जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपली विचारसरणी देवाच्या इच्छेप्रमाणे नाही, तेव्हा-तेव्हा आपण आपल्या विचारसरणीत बदल केला पाहिजे. हे आपल्याला कसं करता येईल, हे या लेखात आपण पाहू या.
b jw.org/mr वर “बायबलमुळे जीवन बदलतं” या टॅबखाली “माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं” हा लेख पाहा.
c चित्राचं वर्णन: एक तरुण भाऊ उच्च शिक्षण घ्यायचं की पूर्ण वेळेच्या सेवेत जायचं, याचा विचार करत आहे.