व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

‘ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला भाग पाडतं’

‘ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला भाग पाडतं’

“ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं . . . ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावं.”​—२ करिंथ. ५:१४, १५.

गीत १३ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश a

१-२. (क) येशूचं जीवन आणि सेवाकार्य यावर मनन केल्यामुळे आपल्याला कसं वाटतं? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

 आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा साहजिकच आपल्याला खूप दुःख होतं. तिचे शेवटचे दिवस आठवून, त्या काळात तिला किती त्रास झाला ते आठवून सुरवातीला आपल्यालाही खूप त्रास होतो. पण काही काळानंतर आपल्याला त्या व्यक्‍तीच्या अशाही काही गोष्टी आठवू लागतात ज्यांमुळे आपल्याला बरं वाटतं. त्यांनी शिकवलेल्या काही गोष्टी आठवून, किंवा आपल्याला धीर देण्यासाठी, खूश करण्यासाठी त्यांनी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टी आठवून आपल्याला आनंद वाटू लागतो.

अगदी तसंच, आपण जेव्हा येशूच्या मृत्यूबद्दल आणि त्याआधी त्याला काय-काय सहन करावं लागलं यांबद्दल वाचतो तेव्हा आपण दुःखी होतो. खासकरून स्मारकविधीच्या काळात, आपण त्याने दिलेलं खंडणी बलिदान किती महत्त्वाचं आहे यावर विचार करतो. (१ करिंथ. ११:२४, २५) पण पृथ्वीवर असताना त्याने ज्या गोष्टी शिकवल्या आणि केल्या त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला खूप आनंद होऊ शकतो. तसंच, तो सध्या काय करत आहे आणि भविष्यात काय करणार आहे यावर खोलवर विचार केल्यामुळेही आपल्याला प्रोत्साहन मिळतं. अशा सगळ्या गोष्टींवर मनन केल्यामुळे आपल्याला वाटणारी कदर आपण व्यावहारिक मार्गांनी कशी दाखवू शकतो ते या लेखात आपण पाहू या.

कदर असल्यामुळेच आपण येशूचं अनुकरण करत राहतो

३. खंडणी बलिदानाबद्दल आपल्याला कदर का वाटते?

आपण जेव्हा येशूचं जीवन आणि मृत्यू यांबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला खूप कदर वाटते. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांना हे शिकवलं, की देवाच्या राज्यामुळे आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळतील. त्या आशीर्वादांचा विचार करून आपल्याला खूप आनंद होतो. येशूने दिलेल्या खंडणी बलिदानासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत. कारण त्यामुळेच आपल्याला त्याच्यासोबत आणि यहोवासोबत जवळची मैत्री करणं शक्य होतं. जे येशूवर विश्‍वास ठेवतात त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची, तसंच मरण पावलेल्या आपल्या जवळच्या लोकांना पुन्हा भेटण्याची आशा आहे. (योहा. ५:२८, २९; रोम. ६:२३) हे सगळे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण खरंतर काहीच विशेष केलेलं नाही. शिवाय, यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. (रोम. ५:८, २०, २१) पण त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींसाठी आपल्याला किती कदर आहे हे आपण नक्कीच दाखवू शकतो. ते कसं?

मग्दालीया मरीयाच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे तुम्हाला कदर दाखवण्याची प्रेरणा कशी मिळते? (परिच्छेद ४-५ पाहा)

४. येशूने मग्दालीया मरीयासाठी जे केलं होतं त्याबद्दल तिने आपली कदर कशी दाखवली? (चित्र पाहा.)

मग्दालीया मरीयाचाच विचार करा. सात दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडल्यामुळे तिची अवस्था खूप वाईट झाली होती. आणि यातून आपली कधीच सुटका होणार नाही असं कदाचित तिला वाटलं असावं. पण येशूने जेव्हा तिची सुटका केली तेव्हा तिला किती बरं वाटलं असेल याचा विचार करा. हे उपकार मी कसे फेडू असं तिला वाटलं असेल. त्यामुळे ती येशूची शिष्या बनली आणि तिने आपला वेळ, शक्‍ती आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा उपयोग येशूच्या सेवाकार्याला पाठिंबा देण्यासाठी केला. (लूक ८:१-३) येशूने मरीयासाठी जे केलं होतं ती खरंच खूप मोठी गोष्ट होती. पण पुढे तो तिच्यासाठी जे काही करणार होता त्याची तिने कल्पनासुद्धा केली नसेल. तो संपूर्ण मानवजातीसाठी आपल्या जीवनाचं बलिदान देणार होता. त्यामुळे जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार होता त्याला सर्वकाळाचं जीवन मिळू शकणार होतं. (योहा. ३:१६) येशू जेव्हा वधस्तंभावर यातना सहन करत होता तेव्हा त्याला आणि इतरांना आधार देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी मरीया तिथेच थांबली होती. (योहा. १९:२५) मग येशूचा मृत्यू झाल्यावर त्याच्या शरीराला सुगंधी मसाले लावण्यासाठी ती इतर दोन स्त्रियांसोबत येशूच्या कबरेजवळ गेली. (मार्क १६:१, २) अशा प्रकारे मरीया शेवटपर्यंत येशूला विश्‍वासू राहिली. आणि त्यामुळे यहोवाने तिला एक मोठा आशीर्वाद दिला. तो म्हणजे, येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला भेटण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा बहुमान तिला मिळाला. असा बहुमान खूप कमी शिष्यांना मिळाला होता.​—योहा. २०:११-१८.

५. यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो?

यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल आपणसुद्धा आपली कदर दाखवू शकतो. आपला वेळ, शक्‍ती आणि आपल्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आपण करू शकतो. जसं की, उपासनेशी संबंधित असलेल्या इमारतींचं बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी आपण पुढे येऊ शकतो.

यहोवा आणि येशूवर प्रेम असल्यामुळे आपण इतरांवरही प्रेम करतो

६. खंडणी बलिदान ही प्रत्येकाला मिळालेली एक वैयक्‍तिक भेट आहे असं का म्हणता येईल?

यहोवा आणि येशू आपल्यावर किती प्रेम करतात याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याही मनात त्यांच्याबद्दल प्रेम दाटून येतं. (१ योहा. ४:१०, १९) आणि येशूने ‘खास माझ्यासाठी’ स्वतःचं जीवन दिलं याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा त्या दोघांवरचं आपलं प्रेम आणखीनच वाढतं. या गोष्टीची प्रेषित पौललासुद्धा जाणीव होती, आणि म्हणून गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलं: “[देवाच्या मुलाने] माझ्यावर  प्रेम केलं आणि माझ्यासाठी  स्वतःला अर्पण केलं.” (गलती. २:२०) खंडणी बलिदानामुळेच यहोवाने तुम्हाला त्याचे मित्र होण्यासाठी त्याच्याकडे आकर्षित केलं आहे. (योहा. ६:४४) यहोवाने तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं पाहिलं आणि तुम्हाला त्याचे मित्र बनता यावं म्हणून त्याने किती मोठी किंमत दिली याचा विचार करून तुमचं मन भरून येत नाही का? यहोवा आणि येशूवरचं तुमचं प्रेम आणखी वाढत नाही का? म्हणूनच आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘हे प्रेम मला काय करायला भाग पाडतं?’

यहोवा आणि येशूवरचं प्रेम आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांना राज्याचा संदेश सांगायची प्रेरणा देतं (परिच्छेद ७ पाहा)

७. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण यहोवा आणि येशूवरचं आपलं प्रेम कसं व्यक्‍त करू शकतो? (२ करिंथकर ५:१४, १५; ६:१, २)

यहोवा आणि येशूवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण इतरांवरही प्रेम करायला प्रवृत्त होतो. (२ करिंथकर ५:१४, १५; ६:१, २ वाचा.) हे प्रेम दाखवायचा एक मार्ग म्हणजे, प्रचाराच्या कामात आवेशाने भाग घेणं. आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांना राज्याचा संदेश सांगतो. एक व्यक्‍ती कोणत्या वंशाची किंवा रंगाची आहे, तिच्याकडे किती पैसा आहे किंवा समाजात तिचं काय स्थान आहे या गोष्टी आपण पाहत नाही. आपण असं करतो तेव्हा “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं,” हा जो यहोवाचा उद्देश आहे त्याप्रमाणे आपण काम करतो.​—१ तीम. २:४.

८. भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो तेव्हासुद्धा आपण यहोवा आणि येशूवर प्रेम असल्याचं दाखवतो. (१ योहा. ४:२१) भाऊबहीण एखाद्या समस्येतून जात असतात तेव्हा आपल्याला त्यांची मनापासून काळजी आहे हे आपण दाखवतो आणि त्यांना मदत करतो. जसं की, त्यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल, तर आपण त्यांचं सांत्वन करतो, ते आजारी असतात तेव्हा आपण त्यांना जाऊन भेटतो किंवा ते निराश असतात तेव्हा आपण त्यांना धीर देतो. (२ करिंथ. १:३-७; १ थेस्सलनी. ५:११, १४) तसंच, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, कारण आपल्याला माहीत आहे की “नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.”​—याको. ५:१६.

९. भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग कोणता आहे?

भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत चांगले नातेसंबंध ठेवणं. यहोवासारखं आपण त्यांना मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे. आपले पाप माफ करण्यासाठी जर यहोवाने स्वतःच्या मुलाला दिलं, तर मग आपले भाऊबहीण चुकतात तेव्हा आपणही त्यांना मोठ्या मनाने माफ करू नये का? येशूने सांगितलेल्या दुष्ट दासासारखं आपल्याला व्हायचं नाही. त्याच्या मालकाने त्याचं खूप मोठं कर्ज माफ केलं होतं. पण हा दास मात्र दुसऱ्‍या दासाचं एक छोटंसं कर्ज माफ करायला तयार नव्हता. (मत्त. १८:२३-३५) मंडळीत कोणाबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल, तर स्मारकविधीच्या आधी तो दूर करण्यासाठी आणि पुन्हा चांगले संबंध जोडण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता का? (मत्त. ५:२३, २४) तुम्ही जर असं केलं, तर यहोवा आणि येशूबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येईल.

१०-११. मंडळीतले वडील कसं दाखवू शकतात की यहोवा आणि येशूवर त्यांचं प्रेम आहे? (१ पेत्र ५:१, २)

१० मंडळीतले वडील कसं दाखवू शकतात की यहोवा आणि येशूवर त्यांचं प्रेम आहे? एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, येशूच्या मेंढरांची काळजी घेणं. (१ पेत्र ५:१, २ वाचा.) ही गोष्ट, येशूने पेत्रला जे म्हटलं त्यावरून स्पष्ट होते. पेत्रने येशूला तीन वेळा नाकारलं होतं. त्यामुळे येशूवर आपलं खूप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पेत्र कदाचित धडपड करत असावा. म्हणून आपल्या पुनरुत्थानानंतर येशूने त्याला विचारलं: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” आपल्या प्रभूवर आपलं प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पेत्र काहीही करायला तयार झाला असता असं आपण खातरीने म्हणू शकतो. मग येशू पेत्रला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” (योहा. २१:१५-१७) तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत, पेत्रने प्रभूच्या मेंढरांची खूप प्रेमळपणे काळजी घेतली, आणि असं करून येशूवर असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलं.

११ वडिलांनो, येशूने पेत्रला म्हटलेले शब्द तुमच्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत हे स्मारकविधीच्या काळात तुम्ही कसं दाखवू शकता? एक म्हणजे, भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नियमितपणे मेंढपाळ भेटी घेऊ शकता. तसंच, जे सेवेत थंड पडले आहेत त्यांना पुन्हा यहोवाकडे आणण्यासाठी खास प्रयत्न करू शकता. असं करून यहोवा आणि येशूवर तुमचं किती प्रेम आहे हे तुम्हाला दाखवता येईल. (यहे. ३४:११, १२) याशिवाय, स्मारकविधीला आलेल्या नवीन लोकांना आणि बायबल विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता. कारण पुढे जाऊन तेही येशूचे शिष्य बनतील अशी आपल्याला आशा आहे.

ख्रिस्तावर प्रेम असल्यामुळे आपण धैर्य दाखवतो

१२. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांना जे म्हटलं होतं त्यावर विचार केल्यामुळे आज आपल्याला धैर्य कसं मिळू शकतं? (योहा. १६:३२, ३३)

१२ आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “जगात तुमच्यावर संकटं येतील, पण हिंमत धरा! मी जगाला जिंकलंय.” (योहान १६:३२, ३३ वाचा.) शत्रूंचा धैर्याने सामना करण्यासाठी आणि शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्यासाठी येशूला कशामुळे मदत झाली? तो पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला. आपल्या अनुयायांनाही अशाच परीक्षांचा सामना करावा लागेल हे माहीत असल्यामुळे येशूने यहोवाला विनंती केली, की त्याने त्यांना सांभाळावं. (योहा. १७:११) या गोष्टीमुळे आज आपल्याला खूप धैर्य मिळतं. कारण आपल्या कोणत्याही शत्रूपेक्षा यहोवा कितीतरी शक्‍तिशाली आहे. (१ योहा. ४:४) त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपत नाही. त्यामुळे आपण ही खातरी ठेवू शकतो, की आपण जर यहोवावर विसंबून राहिलो, तर आपल्याला आपल्या भीतीवर मात करता येईल आणि धैर्य दाखवता येईल.

१३. अरिमथाई इथल्या योसेफने धैर्य कसं दाखवलं?

१३ अरिमथाई इथल्या योसेफचाच विचार करा. तो यहुदी न्यायसभेचा एक सदस्य होता. यहुदी लोकांमध्ये त्याला मानाचं स्थान होतं. तो येशूचा शिष्य तर होता, पण त्याने ही गोष्ट कधीही उघडपणे बोलून दाखवली नाही. त्याच्याबद्दल योहानने म्हटलं: “[तो] येशूचा शिष्य होता, पण ही गोष्ट त्याने यहुद्यांच्या भीतीमुळे लपवून ठेवली होती.” (योहा. १९:३८) योसेफला कदाचित ही भीती असावी, की आपण येशूचे शिष्य आहोत ही गोष्ट जर लोकांना कळली तर समाजात लोक आपल्याकडे आदराने पाहणार नाहीत. कारण काहीही असो, पण बायबल सांगतं की येशूच्या मृत्यूनंतर “तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.” (मार्क १५:४२, ४३) त्यानंतर आपण येशूचे शिष्य आहोत ही गोष्ट त्याने लोकांपासून लपवली नाही.

१४. तुम्हालाही लोकांची भीती वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता?

१४ योसेफसारखंच तुम्हालाही लोकांची भीती वाटते का? शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी आपण एक यहोवाचे साक्षीदार आहोत हे सांगायला तुम्हाला कधीकधी अवघडल्यासारखं वाटतं का? इतर जण काय विचार करतील या भीतीने तुम्ही प्रचारक व्हायला किंवा बाप्तिस्मा घ्यायला मागेपुढे पाहता का? पण अशा गोष्टींमुळे योग्य ते करण्यापासून स्वतःला आवरू नका. त्याऐवजी यहोवाला मनापासून प्रार्थना करा आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी त्याने तुम्हाला धैर्य दाखवायला मदत करावी अशी त्याला विनंती करा. मग यहोवा तुमच्या प्रार्थनांचं कसं उत्तर देत आहे हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला आणखी धैर्य दाखवायचं बळ मिळेल.​—यश. ४१:१०, १३.

आपण आनंदी असल्यामुळे यहोवाची सेवा करत राहतो

१५. येशूने शिष्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांना जो आनंद झाला त्यामुळे ते काय करायला प्रवृत्त झाले? (लूक २४:५२, ५३)

१५ येशूचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे शिष्य फार दुःखी होते. कारण त्यांनी फक्‍त एका जवळच्या मित्राला गमावलं नव्हतं, तर आता आपल्याला काहीच आशा नाही असंही त्यांना वाटत होतं. (लूक २४:१७-२१) पण येशूने जेव्हा त्यांना दर्शन दिलं, तेव्हा बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण करण्यात त्याची काय भूमिका आहे हे त्याने त्यांना समजावून सांगितलं. तसंच, त्याने त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारीही सोपवली. (लूक २४:२६, २७, ४५-४८) यामुळे असं झालं, की ४० दिवसांनंतर येशू स्वर्गात गेला, तोपर्यंत दुःखात बुडालेले त्याचे शिष्य पुन्हा आनंदी झाले होते. कारण त्यांना समजलं होती, की आपला प्रभू जिवंत आहे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करायला तो आपल्याला मदतही करेल. आणि या आनंदामुळे ते मोठ्या आवेशाने यहोवाची स्तुती करू लागले.​—लूक २४:५२, ५३ वाचा; प्रे. कार्यं ५:४२.

१६. आपण येशूच्या शिष्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

१६ आपण येशूच्या शिष्यांचं अनुकरण कसं करू शकतो? आपण फक्‍त स्मारकविधीच्या काळातच नाही, तर संपूर्ण वर्षादरम्यान यहोवाच्या सेवेतून आनंद मिळवू शकतो. त्यासाठी आपण देवाच्या राज्याला जीवनात सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. जसं की, काहींनी सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी, सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्यासाठी आपल्या रोजच्या कामात बदल केला आहे. काहींना कदाचित सुखसोयीच्या गोष्टी गरजेच्या आहेत असं वाटेल. पण काही भाऊबहीण, मंडळीतल्या कामात आणखी हातभार लावण्यासाठी किंवा गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी या गोष्टी खरेदी करायच्या मागे लागत नाहीत. आपण जर धीराने यहोवाची सेवा करत राहिलो आणि राज्याला जीवनात नेहमी सगळ्यात जास्त महत्त्व देत राहिलो, तर यहोवा आपल्याला वचन देतो की तो आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल.​—नीति. १०:२२; मत्त. ६:३२, ३३.

यहोवा आणि येशूने खास तुमच्यासाठी जे काही केलंय त्यावर स्मारकविधीच्या काळात मनन करा (परिच्छेद १७ पाहा)

१७. स्मारकविधीच्या काळात तुम्ही काय करायचा निश्‍चय केलाय? (चित्र पाहा.)

१७ आपण सगळेच मंगळवार, ४ एप्रिलला स्मारकविधी पाळायची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. येशूचं जीवन आणि मृत्यू, तसंच त्याने आणि त्याच्या पित्याने आपल्याला दाखवलेल्या प्रेमावर आपण आत्तापासूनच मनन करू या. नवे जग भाषांतर  या बायबलमधला अतिरिक्‍त लेख ख१२ यात एक तक्‍ता दिला आहे. त्याचं शीर्षक आहे: “येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा.” या तक्त्यात येशूच्या मृत्यूच्या शेवटच्या दिवसांत घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांबद्दल सांगितलं आहे. त्यांबद्दल वाचण्यासाठी आणि त्यांवर मनन करण्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. येशूच्या जीवनाबद्दल वाचताना खासकरून अशा अहवालांवर मनन करा ज्यांमुळे यहोवा आणि येशूबद्दल तुमच्या मनात कदर वाढेल, त्यांच्यावरचं आणि इतरांवरचं तुमचं प्रेम वाढेल, तसंच तुम्हाला आणखी धैर्य आणि आनंदही मिळेल. मग त्यांच्याबद्दल वाटणारी कदर कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी तुम्ही दाखवू शकता याचा विचार करा. स्मारकविधीच्या काळात येशूची आठवण करण्यासाठी तुम्ही जे काही कराल ते तो कधीच विसरणार नाही याची तुम्ही खातरी ठेवू शकता.​—प्रकटी. २:१९.

गीत १७ निःस्वार्थ प्रेम दाखवू या

a स्मारकविधीच्या काळात आपल्याला असं प्रोत्साहन दिलं जातं, की आपण येशूचं जीवन आणि मृत्यू, तसंच त्याने आणि त्याच्या पित्याने आपल्याला दाखवलेल्या प्रेमावर मनन करावं. यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करायची प्रेरणा आपल्याला मिळते. खंडणी बलिदानाबद्दल, तसंच यहोवा आणि येशूने दाखवलेल्या प्रेमाबद्दल असलेली आपली कदर आपण व्यावहारिक मार्गांनी कशी दाखवू शकतो, ते या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासोबतच, आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करायची, धैर्य दाखवायची आणि आपल्या सेवेतून आनंद मिळवायची प्रेरणा आपल्याला कशी मिळू शकते, तेही या लेखात आपण पाहणार आहोत.