अभ्यास लेख १
देवाचं वचन ‘पूर्णपणे सत्य आहे’ याची खातरी बाळगा
२०२३ सालचं वार्षिक वचन: “तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत.”—स्तो. ११९:१६०.
गीत ९६ देवाचं अनमोल वचन
सारांश a
१. आज बरेच लोक बायबलवर भरवसा का करत नाहीत?
बऱ्याच लोकांना कोणावर भरवसा ठेवायचा हे समजत नाही. राजकीय पुढारी, वैज्ञानिक आणि व्यापारी क्षेत्रातल्या लोकांवरचा त्यांचा भरवसासुद्धा कमी होत चाललाय. आज चर्चच्या पाळकांबद्दलही त्यांच्या मनात आदर उरलेला नाही. आणि त्यामुळे पाळक ज्या ग्रंथाचं अनुकरण करतात ते बायबल तरी खरंय का अशी शंका त्यांना वाटते.
२. स्तोत्र ११९:१६० प्रमाणे आपल्याला कशाची खातरी असली पाहिजे?
२ यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला याची पूर्ण खातरी आहे, की तो ‘सत्याचा देव’ आहे आणि आपलं नेहमी भलं व्हावं अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ३१:५; यश. ४८:१७) बायबलमध्ये जे दिलंय त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो, कारण “[देवाचे] शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत” हे आपल्याला माहीत आहे. b (स्तोत्र ११९:१६० वाचा.) बायबलच्या एका विद्वानाने जे म्हटलं त्या गोष्टीशी आपणही सहमत आहोत. त्याने म्हटलं: “देवाने जे काही म्हटलंय ते कधीच खोटं असू शकत नाही किंवा कधीच खोटं ठरणार नाही. देवाच्या लोकांचा देवावर भरवसा आहे आणि त्यामुळे त्याने जे म्हटलं त्यावरही ते भरवसा ठेवू शकतात.”
३. या लेखात आपण काय शिकणार आहोत?
३ देवाच्या वचनावर आपला जसा भरवसा आहे तसा भरवसा इतरांनाही ठेवायला आपण कशी मदत करू शकतो? त्यासाठी आपण तीन गोष्टींवर चर्चा करू या. त्या गोष्टी म्हणजे बायबलमधल्या लिखाणांची अचूकता, त्यातल्या भविष्यवाण्यांची पूर्णता आणि लोकांचं जीवन बदलून टाकण्याची बायबलची ताकद.
बायबलचा संदेश अचूकपणे जपण्यात आलाय
४. बायबल अचूक आहे यावर काही लोक शंका का घेतात?
४ यहोवाने बायबलमधल्या पुस्तकांचं लिखाण करण्यासाठी जवळजवळ ४० विश्वासू पुरुषांचा उपयोग केला. मात्र त्यांनी लिहिलेल्या बायबलच्या मूळ हस्तलिखितांपैकी आज एकही अस्तित्वात नाही. c पण काळाच्या ओघात याच्या बऱ्याच प्रती बनवण्यात आल्या. आणि आज आपल्याकडे ज्या आहेत त्या याच प्रतींच्या प्रती आहेत. त्यामुळे आज लोकांना अशी शंका आहे, की आज आपण जे बायबल वाचतो ते मूळ लिखाणात होतं तसंच आहे की त्यात काही बदल करण्यात आलाय. मग या गोष्टीची खातरी कशी करता येईल? चला पुढे पाहू या.
५. हिब्रू शास्त्रवचनांच्या प्रती कशा प्रकारे तयार करण्यात आल्या होत्या? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)
५ बायबलमधला संदेश सुरक्षित राहावा म्हणून यहोवाने त्याच्या लोकांना हस्तलिखित प्रती तयार करायला सांगितल्या. त्याने इस्राएलच्या राजांना स्वतःसाठी नियमशास्त्राच्या प्रती तयार करायला सांगितल्या. तसंच त्याने लेव्यांना नियमशास्त्राच्या प्रती सांभाळून ठेवायला आणि त्यांतून लोकांना शिकवायला सांगितलं. (अनु. १७:१८; ३१:२४-२६; नहे. ८:७) यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासात गेल्यानंतर काही कुशल नकलाकारांनी हिब्रू शास्त्रवचनांच्या बऱ्याच प्रती बनवायला सुरवात केली होती. (एज्रा ७:६, तळटिपा) हे काम करताना नकलाकार इतके दक्ष होते की बायबलची नक्कल करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून त्यांनी पुढे अक्षरशः शब्दच नाही तर अक्षरंसुद्धा मोजायला सुरवात केली. असं असलं तरी मानवी अपरिपूर्णतेमुळे या प्रती बनवताना बारीकसारीक चुका झाल्या. पण मूळ लिखाणांच्या बऱ्याच प्रती तयार करण्यात आल्यामुळे या चुका शोधणं शक्य झालं. ते कसं काय?
६. बायबलच्या प्रतींमधल्या चुका शोधणं कसं शक्य झालं?
६ आजच्या काळातल्या तज्ज्ञांना नकलाकारांनी केलेल्या चुका शोधण्याचा एक भरवशालायक मार्ग मिळाला आहे. तो मार्ग कोणता आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. समजा आपण १०० माणसांना एका लेखाची प्रत तयार करायला सांगितली. त्यांच्यापैकी एक जण त्याची प्रत बनवताना एक छोटीशी चूक करतो. ती चूक शोधायचा एक मार्ग म्हणजे, आपल्याला त्या प्रतीची तुलना इतर सर्व प्रतींसोबत करावी लागेल. त्याच प्रकारे तज्ज्ञांनीसुद्धा हीच पद्धत वापरून बायबल हस्तलिखितांच्या प्रतींची एकमेकांसोबत तुलना केली. त्यामुळे नकलाकारांनी या प्रती बनवताना जर काही चुका केल्या असतील किंवा काही शब्द गाळले असतील तर ते शोधणं शक्य झालं.
७. नकलाकारांनी बायबलच्या प्रती बनवताना कशा प्रकारे काळजी घेतली होती?
७ बायबलच्या बऱ्याच हस्तलिखित प्रती तयार करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही लोकांना वाटेल की काळाच्या ओघात त्यांच्यामध्ये नक्कीच काही बदल झाले असतील. पण बायबलच्या नकलाकारांनी या प्रतींमध्ये कोणतीही चूक राहू नये म्हणून भरपूर परिश्रम घेतले होते. असं आपण का म्हणू शकतो? याचं एक उदाहरण लक्षात घ्या. काही वर्षांआधी आपल्याकडे पूर्ण हिब्रू शास्त्रवचनांची जी सर्वात जुनी प्रत होती ती इ.स. १००८ किंवा इ.स. १००९ च्या काळातली होती. या प्रतीला लेनीनग्राड कोडेक्स या नावाने ओळखलं जातं. पण अलीकडच्या काळात, संशोधकांना बायबलची काही हस्तलिखितं किंवा त्याचे काही भाग मिळाले आहेत. या प्रती लेनीनग्राड कोडेक्सपेक्षा जवळपास हजार वर्षं जुन्या आहेत. काही जणांना असं वाटत होतं, की या हजार वर्षांच्या काळात प्रतींच्या प्रती बनवल्या जात असताना त्यात नक्कीच खूप चुका झाल्या असतील. आणि या जुन्या प्रतींमधल्या लिखाणात आणि लेनीनग्राड कोडेक्समध्ये असलेल्या लिखाणात खूप कमी साम्यता उरली असेल. पण तज्ज्ञांनी जेव्हा आधीच्या हस्तलिखितांची तुलना लेनीनग्राड कोडेक्ससोबत केली, तेव्हा असं दिसून आलं की बारीकसारीक चुका सोडल्या तर त्यात कोणताही मोठा बदल झालेला नव्हता.
८. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांची आणि त्याच काळातल्या इतर लिखाणांची तुलना केली तर आपल्याला काय दिसून येतं?
८ हिब्रू शास्त्रवचनांच्या नकलाकारांनी जशा प्रती बनवल्या, तशाच प्रती पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनीही ग्रीक शास्त्रवचनाच्या प्रती बनवल्या. हे करताना त्यांनी खूप काळजी घेतली. या प्रतींचा वापर ते सभेसाठी आणि प्रचारकार्यासाठी करायचे. ग्रीक शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांची तुलना त्याच काळातल्या इतर लिखाणांशी केल्यानंतर एका तज्ज्ञाने असं म्हटलं: “एकंदरीत पाहायला गेलं, तर [ग्रीक शास्त्रवचनांच्या] जितक्या प्रती आज अस्तित्वात आहेत, तितक्या दुसऱ्या कोणत्याच पुस्तकाच्या नाहीत . . . . आणि त्यांचा बहुतेक भाग जसाच्या तसा आहे.” याबद्दल ॲनाटॉमी ऑफ द न्यू टेस्टमेंट नावाच्या पुस्तकात असं सांगितलंय: “आज आपण अशी खातरी बाळगू शकतो, की बायबलच्या लेखकांनी मूळ हस्तलिखितांमध्ये जे लिहिलं होतं तेच आज ग्रीक शास्त्रवचनांच्या एखाद्या भरवशालायक आणि चांगल्या भाषांतरात आपल्याला वाचायला मिळेल.”
९. यशया ४०:८ प्रमाणे बायबलच्या संदेशाच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी आहे?
९ आज बायबलमध्ये आपण जे वाचतो आणि बायबलच्या मूळ लेखकांनी जे लिहिलं होतं ते अगदी सारखंच आहे. आणि हे अनेक शतकं बायबलच्या नकलाकारांनी प्रती बनवताना घेतलेल्या काळजीमुळे आणि मेहनतीमुळेच शक्य झालं. d यात काहीच शंका नाही की या सर्व गोष्टींच्या मागे यहोवा आहे. कारण आपला संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचावा अशी त्याची इच्छा आहे. (यशया ४०:८ वाचा.) पण तरीही काही जण कदाचित म्हणतील, की बायबलचा संदेश सुरक्षित आहे म्हणून तो देवाकडून आहे असं म्हणता येत नाही. तर चला, बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिलंय हे सिद्ध करणारे काही पुरावे आता पाहू या.
बायबलच्या भविष्यवाण्या भरवशालायक आहेत
१०. २ पेत्र १:२१ मध्ये सांगितलेले शब्द खरे आहेत हे सिद्ध करणाऱ्या एका भविष्यवाणीचं उदाहरण द्या. (चित्र पाहा.)
१० बायबलमध्ये बऱ्याच भविष्यवाण्या आहेत. त्यांच्यापैकी काही तर पूर्ण होण्याच्या शेकडो वर्षांआधी लिहिण्यात आल्या होत्या. आणि त्या जशा लिहिल्या होत्या तशाच पूर्णही झाल्या याचे इतिहासात पुरावे आहेत. आणि ही गोष्ट आपल्याला आश्चर्याची वाटत नाही, कारण बायबलमधल्या भविष्यवाण्या यहोवाकडून आहेत हे आपल्याला माहीत आहे. (२ पेत्र १:२१ वाचा.) प्राचीन बाबेल शहराबद्दल केलेल्या भविष्यवाणीचाच विचार करा. इ.स.पू. ७७८ ते ७३२ दरम्यान यशया संदेष्ट्याने देवाच्या प्रेरणेने असं सांगितलं होतं, की या शहराला काबीज केलं जाईल. तसंच या शहरावर कोरेश नावाचा राजा कब्जा करेल आणि तो हे नेमकं कसं करेल हेसुद्धा यशयाने सांगितलं होतं. (यश. ४४:२७–४५:२) शिवाय या शहराचा पूर्णपणे नाश होईल आणि हे शहर ओसाड पडेल असंसुद्धा यशयाने सांगितलं होतं. (यश. १३:१९, २०) आणि अगदी तेच झालं. इ.स.पू. ५३९ मध्ये मेद आणि पारसच्या साम्राज्याने बाबेलवर कब्जा केला. आणि एकेकाळी शक्तिशाली असलेल्या या शहराचे आज फक्त काही अवशेषच उरले आहेत.—कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाच्या यांत इलेक्ट्रॉनिक प्रतीमध्ये धडा ०३ मुद्दा ५बाबेल शहराच्या नाशाबद्दल बायबलची भविष्यवाणी हा व्हिडिओ पाहा.
११. आज दानीएल २:४१-४३ ची पूर्णता कशी होत आहे ते स्पष्ट करा.
११ बायबलच्या भविष्यवाण्या फक्त पूर्वीच्या काळातच पूर्ण झाल्या असं नाही. आजच्या काळातसुद्धा त्या पूर्ण होत आहेत. उदाहरणार्थ, अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेबद्दल दानीएलची भविष्यवाणी किती विलक्षण रितीने पूर्ण झाली त्याचा विचार करा. (दानीएल २:४१-४३ वाचा.) या भविष्यवाणीत अगदी अचूकपणे सांगितलं होतं, की ही दुहेरी महासत्ता ‘लोखंडासारखी थोडीफार मजबूत आणि मातीसारखी थोडीफार कमजोर’ असेल. आणि हे आज खरं असल्याचं सिद्ध झालं आहे. ब्रिटन आणि अमेरिकेने दोन्ही महायुद्धं जिंकली आणि आजही त्यांच्याकडे प्रचंड लष्करी ताकद आहे. या गोष्टीवरून त्यांनी दाखवून दिलं, की ते खरंच लोखंडासारखे मजबूत आहेत. पण या दोन्ही देशांच्या नागरिकांनी मात्र त्यांच्या लोखंडासारख्या असलेल्या या ताकदीला कमजोर केलं आहे. या देशांचे नागरिक आपल्या हक्कांसाठी संघटना बनवून आणि आंदोलनं करून, तसच मोर्चे काढून सरकारविरुद्ध लढतात. त्यामुळे या महाशक्तीची लोखंडासारखी ताकद कमजोर पडली आहे. जागतिक राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या एका तज्ज्ञाने अलिकडेच असं म्हटलं: “आज राजकीयदृष्ट्या विभागलेला आणि फुटी असलेला अमेरिकेसारखा दुसरा कोणताच प्रजासत्ताक देश दिसत नाही.” तसंच या महाशक्तीचा दुसरा भाग असणाऱ्या ब्रिटनमध्येसुद्धा लोकांमध्ये एकमत असल्याचं दिसून येत नाही. युरोपीयन संघाच्या देशांसोबत आपण जवळचे संबंध ठेवले पाहिजेत की नाही याबद्दल त्यांची वेगवेगळी मतं आहेत. या फुटींमुळे अँग्लो-अमेरिकन महासत्तेने जरी ठामपणे काही करायचं ठरवलं तरी त्यांना ते करता येत नाही.
१२. बायबलच्या भविष्यवाणीमुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी होते?
१२ बायबलमधल्या या पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांमुळे देवाने भविष्याबद्दल जी अभिवचनं आपल्याला दिली आहेत त्यांवरचा आपला भरवसा आणखी वाढतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “तुझ्याकडून मिळणाऱ्या तारणाची मला आस लागली आहे, कारण तुझ्या शब्दांवर मी भरवसा ठेवलाय.” (स्तो. ११९:८१) आज आपल्यालाही या स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटतं. खरंच, यहोवा देवाने अगदी प्रेमळपणे बायबलच्या वचनांमधून आपल्याला “चांगलं भविष्य आणि आशा” दिली आहे. (यिर्म. २९:११) भविष्याबद्दलची आपली आशा ही माणसांच्या प्रयत्नांवर नाही तर यहोवाच्या अभिवचनावर अधारलेली आहे. तेव्हा, बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा बारकाईने अभ्यास करून देवाच्या वचनावरचा आपला भरवसा आपण वाढवत राहू या.
बायबलमधल्या सल्ल्याचा लाखो लोकांना फायदा होत आहे
१३. स्तोत्र ११९:६६, १३८ प्रमाणे बायबल भरवशालायक असल्याचा आणखी एक पुरावा कोणता आहे?
१३ बायबलवर भरवसा ठेवायचं आणखी एक कारण म्हणजे, त्यातल्या सल्ल्याचं पालन केल्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे. (स्तोत्र ११९:६६, १३८ वाचा.) उदाहरणार्थ, काही पती-पत्नी घटस्फोटाच्या मार्गावर होते. पण जेव्हा त्यांनी बायबलचा सल्ला आपल्या जीवनात लागू केला तेव्हा त्यांच्यातले संबंध पुन्हा चांगले झाले. आणि आज ते त्यांच्या मुलांना प्रेमळ आणि सुरक्षित वातावरणात वाढवत आहेत.—इफिस. ५:२२-२९.
१४. बायबलचा सल्ला लागू केल्यामुळे लोकांच्या जीवनात कसा चांगला बदल होतो त्याचं एक उदाहरण द्या.
१४ बायबलच्या सुज्ञ सल्ल्याचं पालन केल्यामुळे अतिशय क्रूर गुन्हेगारांच्या जीवनाचासुद्धा कायापालट झाला आहे. जॅक e नावाच्या एका गुन्हेगाराचं आयुष्य कसं बदललं ते पाहा. त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली त्यांच्यामध्ये हा सर्वात क्रूर आणि अट्टल गुन्हेगार होता. पण एके दिवशी जेव्हा आपले काही भाऊ जेलमध्ये बायबल अभ्यास चालवत होते तेव्हा जॅक त्या ठिकाणी जाऊन बसला आणि त्यांचं ऐकू लागला. त्या भावांचं वागणं जॅकला खूप विशेष वाटलं. आणि त्यानेसुद्धा बायबल अभ्यास करायला सुरवात केली. जसजसं तो बायबल सत्यांबद्दल शिकू लागला आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करू लागला, तसतसं त्याच्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात बरेच बदल झाले. काही काळानंतर जॅक बाप्तिस्मारहित प्रचारक बनला आणि त्यानंतर त्याने बाप्तिस्मासुद्धा घेतला. जेलमधल्या त्याच्या इतर साथीदारांनाही तो देवाच्या राज्याबद्दल अगदी आवेशाने सांगू लागला. त्याने कमीत कमी चार लोकांना बायबलचं सत्य शिकून घ्यायला मदत केली. त्याला ज्या दिवशी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार होती त्या दिवशी एक व्यक्ती म्हणून तो पूर्णपण बदलला होता. त्याच्या एका वकिलाने म्हटलं: “वीस वर्षांआधी मी ज्या जॅकला ओळखत होतो आणि आज जो जॅक माझ्यासमोर आहे, त्यात खूप मोठा फरक आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी त्याला जे शिकवलंय त्यामुळे त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलंय.” जॅकला देण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा तर बदलली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच स्पष्ट झाली. ती म्हणजे, देवाच्या वचनावर आपण नक्कीच भरवसा ठेवू शकतो आणि त्यामध्ये लोकांच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्याची ताकद आहे.—यश. ११:६-९.
१५. बायबलचा सल्ला मानल्यामुळे यहोवाचे लोक आज जगातल्या लोकांपेक्षा वेगळे असल्याचं कसं दिसून येतं? (चित्र पाहा.)
१५ देवाचे लोक बायबलच्या सल्ल्याप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांच्यात एकी आहे. (योहा. १३:३५; १ करिंथ. १:१०) त्यांच्यात असलेले शांतीचे संबंध आणि त्यांची एकता आज खूप विशेष आहे, कारण आज जगातले लोक राजकारणामुळे, सामाजिक आणि वांशिक भेदभावामुळे विभाजित आहेत. त्यांच्यातलं हे ऐक्य बघूनच जीन नावाच्या एका तरुण व्यक्तीवर जबरदस्त प्रभाव पडला. तो एका आफ्रिकन देशात वाढला. जेव्हा देशात अंतर्गत युद्ध सुरू झालं तेव्हा तोसुद्धा लष्करात भरती झाला. पण काही काळानंतर तो बाजूच्या एका देशामध्ये पळून गेला. तिथे यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्याची भेट झाली. जीन म्हणतो: “खऱ्या धर्माला मानणारे लोक कधीच राजकारणामध्ये भाग घेत नाहीत आणि कधीच भेदभाव करत नाहीत हे मला शिकायला मिळालं. उलट ते एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. आधी मी माझं जीवन देशासाठी समर्पित केलं होतं आणि त्यासाठी मी मरायलाही तयार होतो. पण सत्य समजल्यानंतर मी माझं जीवन यहोवाला समर्पित करायचं ठरवलंय.” जीनचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आपल्यापेक्षा वेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांसोबत लढाई करण्यापेक्षा तो आज लोकांना बायबलमधला शांतीचा संदेश सांगत आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की कोणत्याही देशाच्या आणि संस्कृतीच्या व्यक्तीला बायबलच्या सल्ल्याने फायदाच होतो. आणि हा देवाचं वचन खरं असल्याचा आणखी एक जबरदस्त पुरावा आहे.
देवाच्या सत्य वचनावर आपला भरवसा वाढवत राहा
१६. यहोवाच्या वचनावरचा आपला भरवसा मजबूत करणं आज महत्त्वाचं का आहे?
१६ आज जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे देवाच्या वचनावरचा भरवसा टिकवून ठेवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. लोक कदाचित आपल्या मनात बायबल खरंच सत्य आहे का, तसंच देवाने आपल्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी खरंच विश्वासू आणि बुद्धिमान दासाला नियुक्त केलं आहे का याबद्दल शंका निर्माण करतील. पण देवाचं वचन सत्य आहे अशी जर आपली खातरी असेल तर आपल्या विश्वासावर होणाऱ्या अशा हल्ल्यांचा आपण विरोध करू शकतो. उलट आपण असं म्हणू, की “मी [यहोवाच्या] कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत पालन करण्याचा निश्चय केलाय.” (स्तो. ११९:११२) इतरांना बायबलच्या सत्याबद्दल सांगायला आणि मदत करायला आपल्याला “लाज वाटणार नाही.” (स्तो. ११९:४६) उलट आपला छळ झाला आणि आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी “आनंदाने धीर” धरून आपल्याला ती सहन करता येईल.—कलस्सै. १:११; स्तो. ११९:१४३, १५७.
१७. २०२३ सालचं वार्षिक वचन आपल्याला कोणत्या गोष्टींची आठवण करून देतं?
१७ यहोवाने त्याचं सत्य आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे यासाठी आपण खरंच त्याचे किती आभार मानले पाहिजेत! गोंधळलेल्या आणि हेलकावे खाणाऱ्या या जगात हे सत्य आपल्याला स्थिर ठेवतं आणि या सत्यामुळेच आपल्या जीवनाला एक निश्चित ध्येय आणि दिशा मिळते. देवाच्या राज्याच्या अधिकाराखाली एक चांगलं भविष्य मिळवायची आशाही आपल्याला मिळते. तर चला, २०२३ चं वार्षिक वचन देवाच्या वचनावरचा आपला भरवसा मजबूत करायला आपल्याला मदत करो. कारण त्यांतले शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत!—स्तो. ११९:१६०.
गीत ९४ देवाच्या वचनासाठी आभारी
a “तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत,” हे विश्वास वाढवणारं वार्षिक वचन २०२३ या वर्षासाठी निवडण्यात आलं आहे. (स्तो. ११९:१६०) या वाचनातले शब्द खरे आहेत हे तुम्हीसुद्धा मान्य कराल. पण बरेच लोक बायबल सत्य आहे असं मानत नाहीत. त्यात दिलेलं मार्गदर्शन भरवशालायक आहे असं त्यांना वाटत नाही. या लेखात आपण अशा तीन पुराव्यांवर चर्चा करणार आहोत, ज्यांचा वापर करून आपण प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबल आणि त्यातला सल्ला भरवशालायक आहे अशी खातरी करून देऊ शकतो.
b शब्दाचा अर्थ: “पूर्णपणे” असं भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ एकूण, एकंदरीत किंवा एखाद्या गोष्टीचा सार असा होतो.
c “हस्तलिखितं” म्हणजे प्राचीन काळातले हातांनी लिहिलेले लेख.
d बायबलचा संदेश कसा सुरक्षित राहिला याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी jw.org/mr या वेबसाईटवर “इतिहास आणि बायबल” हे शब्द टाकून शोधा.
e काही नावं बदलण्यात आली आहेत.