अभ्यास लेख ३
यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
‘यहोवा योसेफसोबत होता. तो त्याला सर्व गोष्टींत यश देत होता.’—उत्प. ३९:२, ३.
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
सारांश a
१-२. (क) आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य का वाटत नाही? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
आपण यहोवाचे लोक आहोत. त्यामुळे आपल्यावर जेव्हा परीक्षा येतात तेव्हा आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. कारण बायबलमध्येही असं म्हटलंय, की “आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.” (प्रे. कार्यं १४:२२) शिवाय आपल्याला हेही माहीत आहे, की देवाच्या राज्यात जाईपर्यंत काही समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत. कारण फक्त देवाच्या राज्यातच “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटी. २१:४.
२ आपल्यावर संकटं येतात तेव्हा यहोवा ती आडवत नाही, पण त्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला नक्की मदत करतो. रोममधल्या ख्रिश्चनांना प्रेषित पौलने काय म्हटलं ते पाहा. सुरवातीला त्याने त्याला आणि त्याच्या ख्रिस्ती बांधवांना कोणकोणत्या वाईट परीक्षांचा सामना करावा लागला ते सांगितलं. आणि त्यानंतर त्याने लिहिलं: “ज्याने आपल्यावर प्रेम केलं त्याच्या मदतीने आपण या सगळ्या गोष्टींवर पूर्णपणे विजय मिळवत आहोत.” (रोम. ८:३५-३७) याचाच अर्थ आपण संकटातून जात असतानासुद्धा यहोवा आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो. त्याने योसेफच्या बाबतीत हे कसं केलं आणि आपल्या बाबतीतही तो हे कसं करू शकतो ते आता पाहू या.
जेव्हा अचानक परिस्थिती बदलते तेव्हा . . .
३. योसेफचं आयुष्य अचानक कसं बदललं?
३ याकोबचं आपल्या सगळ्या मुलांमध्ये योसेफवर जास्त प्रेम होतं. (उत्प. ३७:३, ४) त्यामुळे याकोबच्या इतर मुलांना योसेफचा हेवा वाटायचा. म्हणून जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी योसेफला मिद्यानी व्यापाऱ्यांना विकून टाकलं. हे व्यापारी योसेफला शेकडो किलोमीटर दूर इजिप्तला घेऊन गेले. तिथे त्यांनी योसेफला फारोच्या दरबारात एक अधिकारी आणि पहारेकऱ्यांचा प्रमुख असलेल्या पोटीफरला विकलं. एका झटक्यात योसेफचं आयुष्य बदलून गेलं होतं. आपल्या वडिलांचा सगळ्यात लाडका मुलगा आता इजिप्तमधल्या एका माणसाचा दास बनला होता.—उत्प. ३९:१.
४. योसेफप्रमाणे आपल्यालाही कशा प्रकारे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागू शकतं?
४ बायबल म्हणतं की वाईट गोष्टी “सर्वांसोबत घडतात.” (उप. ९:११) इतरांवर सहसा येतात तसे वाईट प्रसंग यहोवाच्या लोकांवरसुद्धा येतात. (१ करिंथ. १०:१३) किंवा येशूचे शिष्य असल्यामुळेसुद्धा आपल्याला काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, कधीकधी आपली थट्टा केली जाऊ शकते, आपला विरोध केला जाऊ शकतो आणि कधीकधी तर आपल्या विश्वासासाठी आपला छळसुद्धा केला जाऊ शकतो. (२ तीम. ३:१२) पण कोणत्याही वाईट परिस्थितीला आपण तोंड देत असलो तरी यहोवा आपल्याला यशस्वी व्हायला मदत करू शकतो. हे त्याने योसेफच्या बाबतीत कसं केलं?
५. पोटीफरने योसेफबद्दल कोणती गोष्ट ओळखली होती? (उत्पत्ती ३९:२-६)
५ उत्पत्ती ३९:२-६ वाचा. पोटीफरने हे ओळखलं की योसेफ अतिशय मेहनती आणि कुशल व्यक्ती आहे. आणि याचं कारणही त्याला माहीत होतं. त्याने हे ओळखलं, की “यहोवा [योसेफला] सर्व गोष्टींत यश देत आहे.” b त्यामुळे साहजिकच पोटीफरने योसेफला आपला भरवशाचा सेवक म्हणून निवडलं. इतकंच नाही तर त्याने आपल्या घराचा सगळा कारभार त्याच्या हाती दिला. आणि याचा परिणाम म्हणजे, पोटीफरची भरभराट झाली.
६. आपल्या परिस्थितीबद्दल योसेफला कसं वाटत असावं?
६ आता थोडं योसेफच्या दृष्टिकोनातून विचार करा. त्याला नेमकं काय हवं होतं? पोटीफरने आपल्यावर खूश व्हावं आणि आपल्याला बक्षिसं द्यावीत अशी त्याची इच्छा होती का? नक्कीच नाही. उलट, आपल्याला या गुलामीतून कधी सुटका मिळेल आणि कधी आपल्या वडिलांकडे जाता येईल असं त्याला वाटत असेल. कारण त्याच्याकडे इतका अधिकार असला तरी मूर्तिपूजा करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताखाली तो अजूनही एक गुलामच होता. पण यहोवाने असं काहीही केलं नाही ज्यामुळे पोटीफरच्या गुलामीतून योसेफची सुटका होईल. उलट त्याची परिस्थिती आणखीनच कठीण होणार होती.
परिस्थिती आणखीनच वाईट होत जाते तेव्हा . . .
७. योसेफची परिस्थिती आणखी वाईट कशी होत गेली? (उत्पत्ती ३९:१४, १५)
७ उत्पत्तीच्या ३९ व्या अध्यायात आपण असं वाचतो, की पोटीफरची बायको योसेफकडे आकर्षित झाली आणि ती त्याला सारखं मोहात पाडायचा प्रयत्न करू लागली. पण प्रत्येक वेळी योसेफ तिला नकार देत राहिला. शेवटी ती योसेफवर इतकी चिडली, की तिने त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला. (उत्पत्ती ३९:१४, १५ वाचा.) हे समजल्यावर पोटीफरने योसेफला तुरुंगात टाकलं आणि तिथे बरीच वर्षं त्याला राहावं लागलं. (उत्प. ३९:१९, २०) त्या तुरुंगाची अवस्था कशी होती? तुरुंगासाठी योसेफने जो हिब्रू शब्द वापरला त्याचा अर्थ “कुंड,” किंवा “खड्डा” असा होतो. यावरून कळतं की त्या तुरुंगात सगळीकडे खूप अंधार असावा आणि त्यातून सुटण्याची योसेफला कसलीच आशा दिसत नव्हती. (उत्प. ४०:१५; तळटीप) बायबलमध्ये असंही म्हटलंय, की त्याच्या पायात बेड्या आणि गळ्यात लोखंडी साखळ्या घालण्यात आल्या होत्या. (स्तो. १०५:१७, १८) योसेफची परिस्थिती आता आणखीनच वाईट होत चालली होती. एकेकाळी भरवशाचा असलेला हा सेवक आता एक असाहाय्य कैदी बनला होता.
८. आपल्यावर येणारी परिस्थिती बिकट होत गेली तरी आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो?
८ तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का, की तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत आहात आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रार्थना करता. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखीनच वाईट बनत जाते. असं होऊ शकतं. कारण सैतानाच्या या जगात आपल्यावर येणाऱ्या संकटांना आणि परीक्षांना यहोवा आडवत नाही. (१ योहा. ५:१९) पण एका गोष्टीची तुम्ही खातरी ठेवू शकता. ती म्हणजे, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची यहोवाला पूर्ण जाणीव आहे आणि त्याला तुमची काळजी आहे. (मत्त. १०:२९-३१; १ पेत्र ५:६, ७) इतकंच नाही तर त्याने आपल्याला असं वचनही दिलंय, की “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” (इब्री १३:५) अगदी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर आहे असं आपल्याला वाटतं तेव्हासुद्धा यहोवा त्या परिस्थितीतून पार व्हायला आपल्याला मदत करतो. योसेफच्या बाबतीत यहोवाने हे कसं केलं ते आता पाहू या.
९. योसेफ तुरुंगात असताना यहोवा त्याच्यासोबत होता हे कशावरून दिसून आलं? (उत्पत्ती ३९:२१-२३)
९ उत्पत्ती ३९:२१-२३ वाचा. योसेफने तुरुंगात घालवलेल्या त्या कठीण काळातसुद्धा यहोवा त्याला मदत करत राहिला. कसं? योसेफने जसा पोटीफरचा भरवसा जिंकला होता तसाच त्याने तुरुंगातल्या मुख्य अधिकाऱ्याचाही भरवसा जिंकला आणि तो अधिकारी त्याच्याकडे आदराने पाहू लागला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याने त्याला सर्व कैद्यांवर नेमलं. बायबल असंही म्हणतं, की “योसेफवर सोपवलेल्या कोणत्याही कामाकडे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्याला लक्ष द्यावं लागायचं नाही.” योसेफ आता एका चांगल्या कामात आपलं मन गुंतवू शकत होता. त्याच्यासाठी हा एक अनपेक्षित बदल होता. ज्याच्यावर एका मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करायचा आरोप होता, त्याच्यावर इतकी भरवशाची जबाबदारी कशी काय सोपवण्यात आली? याचं फक्त एकच कारण होतं. उत्पत्ती ३९:२३ मध्ये म्हटलंय, “यहोवा योसेफसोबत होता आणि तो जे काही करायचा त्यात यहोवा त्याला यश द्यायचा.”
१०. आपण जे काही करत आहोत त्यात आपल्याला यश मिळत नाही असं योसेफला का वाटलं असेल?
१० पुन्हा एकदा योसेफच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा. त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. आपण जे काही करत आहोत त्यात आपल्याला यश मिळतंय असं त्याला वाटलं असावं का? त्या वेळेस योसेफच्या मनात काय चाललं असेल? तुम्हाला काय वाटतं? तुरुंगाच्या अधिकाऱ्याने आपल्यावर खूश व्हावं आणि आपल्याला अधिकार द्यावा असं त्याला वाटत असेल का? नाही, उलट आपल्याला निर्दोष ठरवलं जावं आणि तुरुंगातून आपली सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असेल. आणि म्हणून योसेफने सोबत असलेल्या एका कैद्यालाही असं सांगितलं होतं, की जेव्हा त्या कैद्याची सुटका होईल तेव्हा त्याने फारो राजाला सांगून त्याचीही सुटका करावी. (उत्प. ४०:१४) पण तो कैदी त्याच्याबद्दल बोलायचं विसरून गेला. त्यामुळे आणखी दोन वर्षं योसेफला तुरुंगात काढावी लागली. (उत्प. ४०:२३; ४१:१, १४) पण तरीसुद्धा या सबंध काळात यहोवा त्याला यश देत राहिला. ते कसं?
११. यहोवाच्या मदतीने योसेफ काय करू शकला, आणि त्यामुळे यहोवाचा उद्देश पूर्ण व्हायला कशी मदत झाली?
११ योसेफ तुरुंगात असताना यहोवाने इजिप्तच्या राजाला अशी दोन स्वप्नं दाखवली ज्यांमुळे राजा खूप अस्वस्थ झाला. फारो राजाला काहीही करून त्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा होता. जेव्हा राजाला कळालं, की योसेफ स्वप्नांचा अर्थ सांगू शकतो तेव्हा त्याने त्याला बोलवून घेतलं. यहोवाच्या मदतीने योसेफने स्वप्नांचा अर्थ तर सांगितलाच, पण त्यासोबतच त्याने राजाला एक उपयोगी सल्लासुद्धा दिला. त्यामुळे इजिप्तच्या राजावर योसेफची खूप चांगली छाप पडली. फारो राजाने ओळखलं की यहोवा योसेफसोबत आहे. आणि म्हणूनच त्याने योसेफला संपूर्ण इजिप्त देशावर अन्नधान्याचा अधिकारी म्हणून नेमलं. (उत्प. ४१:३८, ४१-४४) पुढे एक अतिशय भयंकर दुष्काळ पडला. आणि त्याचा परिणाम इजिप्तवरच नाही, तर ज्या ठिकाणी योसेफचं कुटुंब राहत होतं त्या कनान देशातही झाला. पण योसेफ आता एक मोठा अधिकारी असल्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाला वाचवता येणार होतं. आणि त्यामुळे मसीहा ज्या वंशातून येणार होता तो वंश सुरक्षित राहणार होता.
१२. कोणकोणत्या गोष्टींच्या बाबतीत यहोवाने योसेफला यश दिलं?
१२ योसेफच्या जीवनात घडलेल्या अनोख्या घटनांचाच विचार करा. योसेफ तर एक साधासुधा गुलाम होता, मग पोटीफरसारख्या मोठ्या माणसाचं लक्ष त्याच्याकडे कसं काय गेलं असेल बरं? योसेफसारख्या एका सर्वसाधारण कैद्यावर तुरुंगाच्या अधिकाऱ्याचं लक्ष कसं गेलं आणि त्याने त्याला भरवशाची जबाबदारी कशी काय दिली? फारोला अस्वस्थ करणारी स्वप्नं कोणी दाखवली? आणि त्यांचा अर्थ सांगण्याची क्षमता योसेफला कोणी दिली? संपूर्ण इजिप्त देशावर अन्नधान्याचा अधिकारी म्हणून योसेफला नियुक्त करण्याचा निर्णय घ्यायला फारोला कोणी प्रवृत्त केलं? (उत्प. ४५:५) या सगळ्या गोष्टींमध्ये योसेफला जे यश मिळालं त्यामागे साहजिकच यहोवा होता. शेवटी, योसेफच्या भावांनी त्याच्याविरुद्ध जो दुष्ट कट रचला होता त्याचाच वापर करून यहोवाने आपला उद्देश पूर्ण केला होता.
यहोवा आपल्याला यश कसं देतो?
१३. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत यहोवा हस्तक्षेप करतो का? समजावून सांगा.
१३ योसेफच्या या अहवालातून आपण काय शिकू शकतो? आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत यहोवा हस्तक्षेप करतो का? किंवा मग, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला वळण देऊन तो सगळ्या वाईट गोष्टींना एका चांगल्या गोष्टीत बदलतो का? नाही. बायबल असं शिकवत नाही. (उप. ८:९; ९:११) पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा यहोवाला त्या गोष्टीची जाणीव असते, आणि आपण मदतीसाठी करत असलेल्या प्रार्थना तो ऐकतो. (स्तो. ३४:१५; ५५:२२; यश. ५९:१) इतकंच नाही, तर आपण ज्या कठीण परिस्थितीतून जात आहोत त्या परिस्थितीतून यशस्वीपणे पार व्हायला तो आपल्याला मदत करतो. ते कसं?
१४. कठीण परिस्थितीत यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो?
१४ याचा एक मार्ग म्हणजे, यहोवा अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊन आपली मदत करतो. (२ करिंथ. १:३, ४) तुर्कमेनिस्तानमधल्या अझीझ नावाच्या एका भावानेसुद्धा हेच अनुभवलं. त्याला त्याच्या विश्वासामुळे दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तो म्हणतो: “ज्या दिवशी माझ्यावर खटला चालवला जाणार होता त्या दिवशी सकाळी मला एका भावाने यशया ३०:१५ हे वचन दाखवलं. तिथे म्हटलंय: ‘तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्तिशाली व्हाल.’ या वचनामुळे मला नेहमी शांत राहायला आणि प्रत्येक गोष्टीत यहोवावर विसंबून राहायला मदत झाली. या वचनावर मनन केल्यामुळे तुरुंगात घालवलेल्या त्या सबंध काळात मला खूप बळ मिळालं.” तुम्हालाही तुमच्या जीवनातली अशी एखादी वेळ किंवा घटना आठवते का, जेव्हा यहोवाने तुम्हाला अगदी योग्य वेळेला धीर आणि सांत्वन देऊन मदत केली?
१५-१६. टोरीच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१५ बऱ्याच वेळा असं होतं, की एखाद्या कठीण परिस्थितीतून पार झाल्यानंतरच यहोवाने त्या परिस्थितीत आपल्याला कशी मदत केली ते आपल्या लक्षात येतं. टोरी नावाच्या बहिणीलाही ही गोष्ट जाणवली. तिचा मुलगा मॅसन सहा वर्षं कॅन्सरशी झुंज देत होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे टोरी अक्षरशः दुःखात बुडून गेली होती. ती म्हणते: “मला नाही वाटत, एका आईसाठी यापेक्षा कोणतं मोठं दुःख असेल. आणि मला वाटतं, सगळेच आईवडील हे मान्य करतील, की आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलाला त्रास होताना कुठलेच आईवडील पाहू शकत नाहीत.”
१६ टोरीसाठी तो काळ खूप वाईट होता. पण त्या काळात यहोवाने आपल्याला कशी मदत केली याचा तिने विचार केला. ती म्हणते: “माझा मुलगा आजारी होता त्या संपूर्ण काळात यहोवाने मला कशी कशी मदत केली हे मी अनुभवलंय. मला आठवतं, मॅसन जेव्हा खूप आजारी होता तेव्हा त्याला कोणीच भेटू शकत नव्हतं. पण तेव्हासुद्धा फक्त मला आधार देण्यासाठी भाऊबहीण दोन तास प्रवास करून हॉस्पिटलला यायचे. मला मदत करण्यासाठी कोणी ना कोणी नेहमी तिथे असायचं. आम्हाला काय हवंय काय नको याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतली. अगदी वाइटातल्या वाईट परिस्थितीतसुद्धा आम्हाला ज्या गोष्टींची गरज होती त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या.” खरंच, यहोवाने टोरीला आणि मॅसनला त्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी खूप मदत केली.—“ आम्हाला गरज होती अगदी तेच यहोवाने आम्हाला दिलं” ही चौकट पाहा.
यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलंय त्याची आठवण ठेवा
१७-१८. कठीण परिस्थितीतून जात असताना यहोवा आपल्याला मदत करत आहे हे ओळखायला आणि त्याची कदर बाळगायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (स्तोत्र ४०:५)
१७ स्तोत्र ४०:५ वाचा. पर्वत शिखरांवर चढणाऱ्या गिर्यारोहकाचं एकच ध्येय असतं. ते म्हणजे त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचणं. पण हे करत असताना तो मधे-मधे थांबून तो निसर्गातल्या सुंदर दृष्यांचा आनंदसुद्धा घेतो. त्याचप्रमाणे आपणसुद्धा कठीण परिस्थितीतून जात असताना मधे-मधे थांबून यहोवा आपल्याला कशी मदत करत आहे याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण या प्रश्नांवर विचार केला पाहिजे, की ‘आज मी यहोवाचा आशीर्वाद कसा अनुभवला?’ ‘मी ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यात टिकून राहायला यहोवा मला कशी मदत करत आहे?’ कठीण परिस्थितीत टिकून राहायला यहोवाने तुम्हाला कशी मदत केली ते दाखवणारी एक तरी गोष्ट तुम्हाला मिळते का ते शोधायचा प्रयत्न करा.
१८ येणाऱ्या संकटातून यहोवाने आपल्याला सोडवावं अशी प्रार्थना तुम्ही करत असाल. हे समजण्यासारखं आणि बरोबरसुद्धा आहे. (फिलिप्पै. ४:६) पण सध्या यहोवा आपल्याला कोणकोणते आशीर्वाद देत आहे याचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे. कारण संकटातून जात असताना टिकून राहण्यासाठी मदत करायचं आणि बळ द्यायचं वचन यहोवाने आपल्याला दिलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत यहोवाची आपल्याला साथ आहे हे कधीही विसरू नका. असं केल्यामुळे कठीण परिस्थितीतून किंवा संकटातून जात असतानासुद्धा, यहोवाने योसेफला जशी मदत केली तशी तो आपल्यालाही मदत करत आहे हे आपल्याला जाणवेल.—उत्प. ४१:५१, ५२.
गीत ३२ यहोवाला इमानी राहा!
a कठीण परिस्थितीतून जात असताना आपण ‘यशस्वी’ आहोत असं आपण कधी म्हणणार नाही. कारण समस्येतून बाहेर पडल्याशिवाय असं कोणी म्हणत नाही. पण योसेफच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरून आपल्याला या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे, कठीण परिस्थितीतून किंवा संकटातून जात असतानासुद्धा यहोवा आपल्याला यशस्वी व्हायला मदत करतो. ते कसं ते या लेखात सांगण्यात आलंय.
b योसेफ गुलामीत असताना त्याच्या जीवनात सुरवातीला घडलेल्या गोष्टी बायबलच्या फक्त काही ओळींमध्येच सांगितल्या असल्या, तरी त्या गोष्टी खरंतर बऱ्याच वर्षांच्या काळादरम्यान घडल्या असाव्यात.