अभ्यास लेख ४
स्मारकविधी पाळण्यासाठी आपण घेत असलेल्या मेहनतीवर यहोवा आशीर्वाद देतो
“माझी आठवण म्हणून हे करत राहा.”—लूक २२:१९.
गीत १९ प्रभूचे सांजभोजन
सारांश a
१-२. दर वर्षी आपण स्मारकविधीला का उपस्थित राहतो?
जवळजवळ २,००० वर्षांआधी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं आणि त्यामुळे आपल्यासाठी सर्वकाळाच्या जीवनाचा मार्ग मोकळा झाला. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने त्याच्या शिष्यांना त्याच्या मौल्यवान बलिदानाची आठवण ठेवायची आज्ञा दिली. त्यासाठी त्यांना भाकर आणि द्राक्षारसाचा वापर करून एक साधासा विधी करायचा होता.—१ करिंथ. ११:२३-२६.
२ येशूवर आपलं मनापासून प्रेम असल्यामुळे आपण त्याची ही आज्ञा पाळतो. (योहा. १४:१५) दर वर्षी स्मारकविधीच्या काळात आपण अशा बऱ्याच गोष्टी करतो, ज्यांमुळे येशूच्या बलिदानाबद्दल असलेली आपली कदर दिसून येते. जसं की, त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला कसा फायदा झाला आहे याबद्दल आपण विचार करतो आणि प्रार्थना करतो. तसंच आपण सेवाकार्यात आवेशाने सहभाग घ्यायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोकांना स्मारकविधीला यायचं प्रोत्साहन देतो. आणि काहीही झालं तरी स्मारकविधीला उपस्थित राहायचा आपला ठाम निश्चय असतो.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी यहोवाचे साक्षीदार खूप मेहनत घेतात. या लेखात आपण अशा तीन गोष्टी पाहू ज्यावरून हे दिसून येतं. त्या तीन गोष्टी म्हणजे: (१) येशूने शिकवला होता अगदी त्याच पद्धतीने आपण स्मारकविधी पाळतो, (२) आपण इतर लोकांनासुद्धा स्मारकविधीला उपस्थित राहायचं आमंत्रण देतो. आणि (३) काहीही झालं आणि कितीही समस्या आल्या तरी आपण स्मारकविधीला उपस्थित राहायचा पुरेपूर प्रयत्न करतो.
येशूने शिकवला होता अगदी त्याच पद्धतीने स्मारकविधी पाळणं
४. दरवर्षी स्मारकविधीच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात, आणि आपण या गोष्टींना क्षुल्लक का समजू नये? (लूक २२:१९, २०)
४ दर वर्षी स्मारकविधीच्या दिवशी आपण बायबलवर आधारित एक भाषण ऐकतो आणि त्यात आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात. जसं की, मानवजातीला खंडणी बलिदानाची गरज का आहे आणि एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सगळ्यांच्या पापांची क्षमा कशी होते. तसंच, भाकर आणि द्राक्षारस कशाला सूचित करतो आणि कोण त्याचं सेवन करू शकतात, याचीसुद्धा आपल्याला आठवण करून दिली जाते. (लूक २२:१९, २० वाचा.) आणि ज्यांना पृथ्वीवरच्या जीवनाची आशा आहे त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील यावरसुद्धा आपण मनन करतो. (यश. ३५:५, ६; ६५:१७, २१-२३) बायबलमधल्या या महत्त्वपूर्ण शिकवणींना आपण क्षुल्लक समजलं नाही पाहिजे. जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. आणि त्यामुळे येशूने दिलेल्या मौल्यवान खंडणी बलिदानाबद्दल त्यांना जराही कदर नाही. तसंच, येशूने घालून दिलेल्या पद्धतीने ते स्मारकविधीसुद्धा पाळत नाहीत. का बरं?
५. प्रेषितांच्या मृत्यूनंतर स्मारकविधी पाळण्याच्या पद्धतीत कसा बदल झाला?
५ प्रेषितांच्या मृत्यूच्या काही काळानंतर खोटे ख्रिस्ती मंडळीमध्ये शिरू लागले. (मत्त. १३:२४-२७, ३७-३९) ते ‘शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवू लागले.’ (प्रे. कार्यं २०:२९, ३०) त्यातलीच एक चुकीची गोष्ट म्हणजे, पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून नेण्यासाठी ख्रिस्ताला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण करण्यात आलेलं नाही, तर त्याला वारंवार बलिदान देण्याची गरज आहे, असं ते शिकवू लागले. (इब्री ९:२७, २८) आज बऱ्याच प्रामाणिक मनाच्या लोकांना हीच गोष्ट शिकवण्यात आली आहे. आणि त्यामुळे ते दर आठवडी आणि कधीकधी तर दररोज “पवित्र मिस्सा बलिदान” म्हटलेला विधी पाळण्यासाठी चर्चमध्ये जातात. b ख्रिस्ती धर्मातले काही पंथ हा विधी दररोज पाळत नसले, तरी येशूच्या मृत्यूमुळे काय शक्य झालंय हे त्यांच्यातल्या बहुतेक सदस्यांना माहीत नाही. त्यामुळे येशूच्या बलिदानामुळे माझ्या पापांची क्षमा होईल का, असा प्रश्न त्यांना पडतो. कारण त्यांच्यावर अशा लोकांचा प्रभाव आहे ज्यांना येशूच्या बलिदानामुळे पापांची क्षमा होऊ शकते की नाही अशी शंका वाटते. पण येशूच्या अनुयायांनी या लोकांना येशूच्या मृत्यूमुळे काय शक्य झालंय आणि स्मारकविधी पाळायची योग्य पद्धत काय आहे, हे समजून घ्यायला मदत केली आहे. ती कशी ते आता आपण पाहू या.
६. १८७२ मध्ये बायबल विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट कळली?
६ १८७० च्या काळात चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्यासोबत असलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या एका गटाने शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करायला सुरवात केली. येशूच्या बलिदानाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा स्मारकविधी कसा पाळला गेला पाहिजे याबद्दलचं सत्य त्यांना माहीत करून घ्यायचं होतं. मग १८७२ मध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासावरून त्यांना समजलं, की येशूने दिलेलं बलिदान खरंच संपूर्ण मानवजातीसाठी होतं. त्यांना समजलेली ही महत्त्वपूर्ण गोष्ट त्यांनी स्वतःजवळच ठेवली नाही. उलट त्यांनी पुस्तकं, वर्तमानपत्रं आणि मासिकांद्वारे ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर लगेचच ते पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांप्रमाणे येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी वर्षांतून एकदा एकत्र येऊ लागले.
७. बायबल विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे आज आपल्याला कसा फायदा होतो?
७ त्या काळात बायबल विद्यार्थ्यांनी अभ्यास करून जे संशोधन केलं, त्यामुळे आज आपल्याला खूप फायदा होत आहे. तो कसा? येशूच्या बलिदानाचा काय अर्थ आहे आणि त्यामुळे संपूर्ण मानवजातीला कसा फायदा होणार आहे, याबद्दलचं सत्य आपल्याला यहोवाच्या आशीर्वादामुळे समजलं आहे. (१ योहा. २:१, २) तसंच, देवाची आज्ञा पाळणाऱ्या लोकांना कोणती आशा मिळणार आहे, तेही बायबल आपल्याला सांगतं. काहींना स्वर्गातल्या अमर जीवनाची आशा आहे, तर बाकीच्या लाखो लोकांना पृथ्वीवर कायम जीवन जगण्याची आशा आहे. यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो आणि येशूच्या बलिदानामुळे आपल्याला कसा फायदा होतो यावर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण यहोवाच्या आणखी जवळ जातो. (१ पेत्र ३:१८; १ योहा. ४:९) त्यामुळे त्या विश्वासू बायबल विद्यार्थ्यांप्रमाणेच आपणसुद्धा इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण देतो.
इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण देणं
८. इतरांना स्मारकविधीला बोलवण्यासाठी यहोवाच्या लोकांनी आजपर्यंत काय केलं आहे? (चित्र पाहा.)
८ बऱ्याच वर्षांपासून यहोवाचे लोक इतरांना स्मारकविधीचं आमंत्रण देत आले आहेत. जसं की, १८८१ मध्ये अमेरिकेतल्या भाऊबहिणींना ॲलिगेनी, पेन्सिल्वेनिया इथे एका बांधवाच्या घरी या खास प्रसंगासाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक मंडळीतले भाऊबहीण आपापल्या भागात स्मारकविधीसाठी एकत्र येऊ लागले. मग मार्च १९४० मध्ये प्रचारकांना असं सांगण्यात आलं, की ते त्यांच्या भागातल्या आवड दाखवणाऱ्या लोकांनाही या खास प्रसंगासाठी बोलवू शकतात. १९६० मध्ये बेथेलमधून पहिल्यांदाच सगळ्या मंडळ्यांना स्मारकविधीच्या छापील आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत स्मारकविधीच्या लाखो-करोडो पत्रिका लोकांना देण्यात आल्या आहेत. पण लोकांना आमंत्रण पत्रिका देण्यासाठी आपण इतका वेळ का खर्च करतो आणि इतकी मेहनत का घेतो?
९-१०. आपण स्मारकविधीसाठी कोणाला बोलवतो आणि त्यामुळे त्यांना कसा फायदा होतो? (योहा. ३:१६)
९ लोकांना स्मारकविधीला आमंत्रण देण्याचं एक कारण म्हणजे, त्यांना यहोवा आणि येशूने आपल्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल शिकायला मिळावं, हे आहे. (योहान ३:१६ वाचा.) स्मारकविधीला आल्यानंतर ते जे काही पाहतील आणि ऐकतील त्यामुळे त्यांना आणखी शिकून घ्यायचं आणि यहोवाचे सेवक बनायचं प्रोत्साहन मिळावं अशी आपली इच्छा असते. पण या नवीन लोकांशिवाय आणखीनही काही जणांना याचा फायदा होतो.
१० जे यहोवाची सेवा करण्यात थंड पडले आहेत अशांनाही आपण आमंत्रण देतो. यहोवाचं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे, याची त्यांना जाणीव व्हावी अशी आपली इच्छा असते. असे अनेक जण स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारतात आणि त्यांना पाहून आपल्याला खूप आनंद होतो. स्मारकविधीला आल्यामुळे आपण आधी किती आनंदाने यहोवाची सेवा करायचो, याची त्यांना आठवण होते. या बाबतीत मोनिकाचाच अनुभव पाहा. c कोव्हिड महामारीच्या काळात तिने पुन्हा प्रचार करायला सुरवात केली. २०२१ सालच्या स्मारकविधीला उपस्थित राहिल्यानंतर ती म्हणाली: “हा स्मारकविधी माझ्यासाठी खूप खास होता. वीस वर्षांनंतर पहिल्यांदा मी लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देऊ शकले. यहोवा आणि येशूने माझ्यासाठी खरंच खूप काही केलंय, म्हणून या कामात मी मनापासून सहभाग घेतला.” (स्तो. १०३:१-४) काही लोक आपलं आमंत्रण स्वीकारतील, तर काही जण स्वीकारणार नाहीत. पण आपण आवेशाने लोकांना आमंत्रण देत राहिलं पाहिजे. कारण आपण जी मेहनत घेतो, त्याकडे यहोवा लक्ष देतो.
११. लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देण्याच्या कामावर यहोवाने कसा आशीर्वाद दिला आहे? (हाग्गय २:७)
११ स्मारकविधीचं आमंत्रण देण्यासाठी आपण ज्या-ज्या वेळेस मेहनत घेतली आहे, त्या-त्या वेळेस यहोवाने खरंच आपल्याला खूप आशीर्वाद दिलाय. २०२१ मध्ये कोव्हिड महामारीच्या काळात आपण स्मारकविधीसाठी प्रत्यक्ष रितीने एकत्र येऊ शकलो नाही. पण तरीसुद्धा २ कोटी १३ लाख ६७ हजार ६०३ लोक स्मारकविधीला उपस्थित होते. हा खरंच एक उच्चांक होता. कारण ही संख्या जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अडीज पट मोठी होती. पण यहोवाला संख्येपेक्षा स्मारकविधीला आलेली प्रत्येक व्यक्ती जास्त महत्त्वाची आहे. (लूक १५:७; १ तीम. २:३, ४) आपण जेव्हा लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देतो, तेव्हा यहोवा योग्य अंतःकरणाच्या लोकांना शोधायला आपल्याला मदत करेल याची खातरी आपण बाळगू शकतो.—हाग्गय २:७ वाचा.
परिस्थिती कशीही असली, तरी आपण स्मारकविधी पाळतो
१२. कोणत्या गोष्टींमुळे स्मारकविधी पाळणं कठीण जाऊ शकतं? (चित्र पाहा.)
१२ येशूने सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसांत आपल्याला बऱ्याच कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. जसं की, घरच्यांचा विरोध, छळ, युद्ध, महामाऱ्या आणि बरंच काही. (मत्त. १०:३६; मार्क १३:९; लूक २१:१०, ११) कधीकधी या समस्या इतक्या वाढतात, की स्मारकविधी पाळणं कठीण होऊन जातं. पण अशा समस्यांवर भाऊबहिणींनी कशी मात केली आहे आणि यहोवाने त्यांना कशी मदत केली आहे?
१३. तुरुंगात असताना स्मारकविधी पाळण्यासाठी आर्टेमने दाखवलेलं धैर्य आणि त्याचा ठाम निश्चय पाहून यहोवाने त्याला कसा आशीर्वाद दिला?
१३ तुरुंगात असताना. जे भाऊबहीण त्यांच्या विश्वासामुळे जेलमध्ये आहेत, ते स्मारकविधी पाळायचा पुरेपूर प्रयत्न करतात. आर्टेम नावाच्या भावाचाच विचार करा. २०२० च्या स्मारकविधीच्या काळात त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. १८३ चौरस फुटाच्या त्या छोट्याशा कोठडीत कधीकधी तर ४ ते ५ कैद्यांना ठेवलं जायचं. असं असतानाही स्मारकविधीची प्रतीकं म्हणून वापरण्यासाठी त्याने काही गोष्टी कशाबशा मिळवल्या. आणि त्याने स्वतःसाठीच स्मारकविधीचंही भाषण द्यायचंही ठरवलं. पण त्याच्यासोबत असलेले इतर कैदी खूप शिवीगाळ करायचे आणि सिगारेट ओढायचे. म्हणून त्याने त्यांना एक तासभर सिगारेट न ओढण्याची आणि शांत राहायची विनंती केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तयार झाले. ‘तुम्हाला स्मारकविधीबद्दल जाणून घ्यायला आवडेल का,’ असं त्याने त्यांना विचारलं. पहिल्यांदा त्यांनी नकार दिला. पण आर्टेमला स्मारकविधी पाळताना पाहिल्यानंतर त्यांनी त्याला बरेच प्रश्न विचारले.
१४. कोरोनाच्या काळातही स्मारकविधी पाळण्यासाठी भाऊबहिणींनी कशी मेहनती घेतली?
१४ कोरोना महामारीच्या काळात. महामारी पसरली तेव्हा भाऊबहिणींना प्रत्यक्ष भेटून स्मारकविधी पाळणं शक्य नव्हतं. मग अशा परिस्थितीतही त्यांनी स्मारकविधी कसा पाळला. ज्या मंडळ्यांकडे इंटरनेटची सोय होती त्यांनी झूमसारख्या माध्यमांचा वापर करून स्मारकविधी पाळला. पण ज्या मंडळ्यांकडे इंटरनेटची सोय नव्हती त्यांनी काय केलं? काही देशांमध्ये टिव्हीवरून किंवा रेडिओवरून स्मारकविधीचं भाषण प्रसारित करण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाय, दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या भाऊबहिणींना स्मारकविधी पाळता यावा म्हणून शाखाकार्यालयांनी ५०० पेक्षा जास्त भाषांमध्ये स्मारकविधीचं भाषण रेकॉर्ड केलं. आणि ज्या भाऊबहिणींना याची गरज होती त्यांच्यापर्यंत हे रेकॉर्डिंग पोचवण्यासाठी विश्वासू बांधवांनी मेहनत घेतली.
१५. सुझन नावाच्या बायबल विद्यार्थीनीच्या बाबतीत जे घडलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
१५ घरच्यांचा विरोध असताना. स्मारकविधी पाळण्यासाठी काही जणांना सगळ्यात जास्त विरोध होतो, तो घरच्यांकडून. सुझन नावाच्या एका बायबल विद्यार्थीनीचाच विचार करा. २०२१ मध्ये तिलाही स्मारकविधीला उपस्थित राहायचं होतं. पण आदल्या दिवशी तिने तिचा बायबल अभ्यास घेणाऱ्या बहिणीला सांगितलं, की घरच्यांकडून विरोध होत असल्यामुळे तिला स्मारकविधीला येता येणार नाही. मग त्या बहिणीने लूक २२:४४ हे वचन वाचलं. आणि तिला समजावून सांगितलं, की जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सुझनने स्मारकविधीची प्रतीकं बनवली आणि jw.org वर स्मारकविधीच्या दिवशी असलेला सकाळच्या उपासनेचा खास कार्यक्रम पाहिला. मग संध्याकाळी आपल्या खोलीत एकटी असताना तिने फोनवरून स्मारकविधीचा कार्यक्रम ऐकला. नंतर तिने तिचा बायबल अभ्यास घेणाऱ्या बहिणीला लिहिलं: “काल तुम्ही जे सांगितलंत, त्यामुळे मला खूप धीर मिळाला. स्मारकविधीसाठी मला जे जमलं ते मी केलं आणि बाकी सगळं काही यहोवावर सोपवून दिलं. मला खूप आनंद होतोय आणि यहोवाने मला जी मदत केली त्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते!” तुमच्यासमोरही अशीच परिस्थिती आली तर यहोवा नक्की मदत करेल याची तुम्हालाही खातरी आहे का?
१६. स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्यावर यहोवा आशीर्वाद देईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो? (रोमकर ८:३१, ३२)
१६ येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी जेव्हा आपण पुरेपूर प्रयत्न करतो तेव्हा यहोवा त्याची खूप कदर करतो. यहोवाने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल जेव्हा आपण कदर दाखवतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. (रोमकर ८:३१, ३२ वाचा.) म्हणून या वर्षीच्या स्मारकविधीला उपस्थित राहायचा आपण पक्का निश्चय करू या आणि त्या काळात सेवाकार्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यायचाही पुरेपूर प्रयत्न करू या.
गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ
a मंगळवार, ४ एप्रिल २०२३ ला जगभरातले लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतील. बरेच जण पहिल्यांदाच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यात असेही काही साक्षीदार असतील, जे यहोवाच्या सेवेत थंड पडल्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच स्मारकविधीला येतील. काही लोक तर बऱ्याच कठीण समस्या पार करून त्या ठिकाणी हजर असतील. पण स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू, त्यामुळे यहोवाला खरंच खूप आनंद होईल.
b हा विधी पाळणारे असं मानतात, की भाकर आणि द्राक्षारस घेताना त्याचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये होतं. त्यामुळे जेव्हा-जेव्हा ते भाकर आणि द्राक्षारस घेतात, तेव्हा-तेव्हा येशूच्या शरीराचं आणि रक्ताचं बलिदान दिलं जातं असं ते मानतात.
c काही नावं बदलण्यात आली आहेत.