अभ्यास लेख ३
गीत १०८ देवाचं एकनिष्ठ प्रेम
कठीण परिस्थितीत यहोवा तुम्हाला मदत करेल
“[यहोवा ] तुझं जीवन स्थिर करणारा आहे.”—यश. ३३:६.
या लेखात:
जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा यहोवाकडून मिळणाऱ्या मदतीतून फायदा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?
१-२. यहोवाच्या विश्वासू सेवकांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागू शकतो?
आपल्यावर जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा आपलं जीवन एका रात्रीत बदलून जाऊ शकतं. उदाहरणार्थ लुईस a नावाच्या एका विश्वासू भावाला कळतं की त्याला कॅन्सर झालाय. डॉक्टरने त्याला सांगितलं की त्याच्या हातात आता फक्त काही महिनेच उरलेत. मोनिका आणि तिचा पती उपासनेशी संबंधित कामांमध्ये व्यस्त होते. पण एके दिवशी मोनिकाला कळतं की वडील म्हणून सेवा करणारा तिचा पती कित्येक वर्षांपासून दुहेरी जीवन जगतोय. ऑलिव्हिया नावाच्या बहिणीला एका चक्रीवादळामुळे तिचं घर सोडून जावं लागलं. पण जेव्हा ती परत येते तेव्हा तिचं घर पूर्णपणे वादळात उद्ध्वस्त झालेलं दिसतं. एका क्षणात या सगळ्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. या भाऊबहिणींची मनःस्थिती तुम्ही समजू शकता का? तुम्हालाही एखाद्या संकटाचा सामना करावा लागला आहे का, ज्यामुळे तुमच्या जीवनात उलथापालथ झाली आहे?
२ आपण यहोवाचे विश्वासू सेवक असलो तरीपण, या जगातल्या लोकांप्रमाणेच आपल्यावरही संकट येऊ शकतात. तसंच देवाच्या लोकांचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून आपल्याला छळ आणि विरोध सहन करावा लागू शकतो. यहोवा कदाचित आपल्याला अशा संकटांमधून वाचवणार नाही तरी तो आपल्याला मदत करण्याचं वचन मात्र देतो. (यश. ४१:१०) त्याच्या मदतीने आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थितीतसुद्धा त्याला एकनिष्ठ राहू शकतो. संकटांचे काळे ढग आपल्या जीवनात जेव्हा दिसू लागतात तेव्हा यहोवा कोणत्या चार मार्गांनी आपल्याला मदत करतो, याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच यहोवा पुरवत असलेल्या मदतीचा फायदा करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो हेही आपण या लेखात पाहणार आहोत.
यहोवा तुमचं रक्षण करेल
३. आपण जेव्हा एखाद्या समस्येतून जात असतो तेव्हा कोणती गोष्ट करायला आपल्या कठीण जाऊ शकते?
३ समस्या. आपल्यावर जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा स्पष्टपणे विचार करायला आणि निर्णय घ्यायला आपल्याला कदाचित कठीण जाऊ शकतं. का बरं? कारण आपण अक्षरशः दुःखात बुडून गेलेलो असतो आणि चिंतेने आपलं मन अगदी सुन्न झालेलं असतं. दाट धुक्यात जसं आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही, त्याचप्रमाणे आता काय करायचं हेही कदाचित आपल्याला सुचणार नाही. सुरुवातीला आपण ज्या दोन बहिणींबद्दल चर्चा केली होती, त्यांच्यावर जेव्हा समस्या आल्या तेव्हा त्यांना कसं वाटलं याकडे लक्ष द्या. ऑलिव्हिया म्हणते: “माझं घर जेव्हा वादळात उद्ध्वस्त झालं तेव्हा आता सगळं काही संपलंय असं मला वाटलं. आता काय करायचं? कुठे जायचं? या विचाराने मी पूर्णपणे गोंधळून गेले होते.” आपल्या पतीने केलेल्या विश्वासघाताबद्दल मोनिका म्हणते: “माझी स्थिती हताश होण्याच्याही पलीकडे गेली होती. माझ्या वेदना अगदी मनाला पिळवटून टाकणाऱ्या होत्या. दररोजच्या साध्या-साध्या गोष्टीसुद्धा करायचं मला सुचत नव्हतं. मी विचारही केला नव्हता अशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली होती.” मग गोंधळून टाकणाऱ्या या परिस्थितीत यहोवा आपल्याला मदत करायचं वचन कसं देतो?
४. फिलिप्पैकर ४:६, ७ प्रमाणे यहोवा कोणत्या गोष्टीचं वचन देतो?
४ यहोवा कशी मदत करतो? यहोवा आपल्याला एक खास गोष्ट द्यायचं वचन देतो. बायबलमध्ये याला “देवाची शांती” म्हटलंय. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) यहोवासोबतच्या अनमोल नात्यामुळे निर्माण होणारी शांती म्हणजेच देवाची शांती आहे. ही शांती “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” आहे. कारण या शांतीचा अनुभव आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतो. यहोवाला कळकळून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला कधी एकदम शांत झाल्यासारखं वाटलंय का? यालाच “देवाची शांती” म्हटलंय.
५. देवाची शांती आपल्या मनाचं आणि बुद्धीचं संरक्षण कसं करते?
५ याच वचनामध्ये सांगितलंय, की देवाची शांती आपल्या “मनाचं आणि बुद्धीचं रक्षण” करते. “रक्षण” यासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द शत्रूच्या आक्रमणापासून शहराचं रक्षण व्हावं म्हणून पहारा देणाऱ्या सैनिकांच्या संदर्भात हा वापरला जायचा. त्या शहरातले लोक शांतपणे झोपायचे कारण त्यांना माहीत असायचं की शहराच्या फाटकाजवळ सैनिक उभे आहेत. तसंच एका सैनिकाप्रमाणे देवाची शांती आपल्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करते तेव्हा आपण सुरक्षित आहोत या भावनेने आपलं मन शांत होतं. (स्तो. ४:८) हन्नाप्रमाणे आपली परिस्थिती लगेच बदलणार नाही. पण आपलं मन शांत होऊ शकतं. (१ शमु. १:१६-१८) यामुळे स्पष्टपणे विचार करायला आणि चांगले निर्णय घ्यायला सहसा आपल्याला सोपं जातं.
६. देवाची शांती मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
६ आपण काय करण्याची गरज आहे? जेव्हा तुमच्यावरती एखादं संकट येतं तेव्हा आताच चर्चा केल्याप्रमाणे, सैनिकाला बोलवा. म्हणजेच देवाची शांती मिळेपर्यंत त्याला प्रार्थना करा. (लूक ११:९; १ थेस्सलनी. ५:१७) आधी उल्लेख केलेल्या लुईसला जेव्हा कळलं की त्याच्याकडे आता फक्त काही महिनेच उरलेत, तेव्हा त्याने आणि त्याच्या पत्नीने या परिस्थितीचा सामना कसा केला याबद्दल तो म्हणतो: “अशा परिस्थितीत आरोग्याच्या बाबतीत आणि इतर गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेणं खूप म्हणजे खूप कठीण जातं. पण अशा कठीण परिस्थितीत मनाची शांती हवी असेल, तर प्रार्थनेमुळे जशी मदत होते तशी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने होऊ शकत नाही.” आपलं मन शांत राहावं आणि आपल्याला निर्णय घेण्यासाठी बुद्धी मिळावी म्हणून लुईस आणि त्याच्या पत्नीने कळकळून आणि वारंवार यहोवाकडे प्रार्थना केली. आणि त्यांनी यहोवाची मदत अनुभवलीसुद्धा! जर तुम्हीही संकटाचा सामना करत असाल तर सारखं–सारखं यहोवाला प्रार्थना करा. यामुळे मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करणारी यहोवाची शांती तुम्ही अनुभवाल.—रोम. १२:१२.
यहोवा तुमचं मन स्थिर करेल
७. एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असताना आपल्याला कसं वाटू शकतं?
७ समस्या. एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असताना आपण नेहमी जसं वागतो तसं वागत नाही. आपल्या भावना आणि आपले विचार बदलतात. आपल्या मनात विचारांचं वादळ उठलंय असं आपल्याला वाटू शकतं. सुरुवातीला उल्लेख केलेल्या ॲनाला लुईसच्या मृत्यूनंतर असंच वाटलं. ती म्हणते: “कधीकधी मला खूप निराश वाटायचं आणि मला स्वतःचंच वाईट वाटायचं. कधीकधी तर तो मला असं सोडून का गेला याचीच चीड यायची.” ॲनाला खूप एकटं पडल्यासारखं वाटायचं आणि लुईस ज्या गोष्टी सांभाळायचा त्या आता आपल्यालाच सांभाळाव्या लागत आहेत, याचा तिला खूप त्रास व्हायचा. आपण वादळात अडकलोय असं तिला वाटायचं. आपल्यालाही जेव्हा असं वाटतं तेव्हा यहोवा आपल्याला कशी मदत करतो?
८. यशया ३३:६ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी देतो?
८ यहोवा कशी मदत करतो? तो आपल्याला खातरी देतो, की तो आपलं मन स्थिर करेल. (यशया ३३:६ वाचा.) जेव्हा एखादं जहाज वादळात सापडतं, तेव्हा ते कदाचित खूप जोराने हेलकावे खाऊ लागेल. अशा वेळी जहाज स्थिर ठेवण्यासाठी बऱ्याच जहाजांना खालून दोन्ही बाजूला पंख्यांसारखी दिसणारी उपकरणं लावली जातात. त्यामुळे जहाज स्थिर ठेवायला मदत होते. तसंच प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित राहतात आणि त्यांचा प्रवास सुखरूप होतो. पण जहाज पुढे जात राहतं तेव्हाचे ही उपकरणं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याच प्रकारे संकटाच्या काळातही आपण जेव्हा विश्वासूपणे पुढे जात राहतो, तेव्हा यहोवा आपलं मन स्थिर करतो.
९. आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी संशोधनाच्या साधनांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
९ आपल्याला काय करायची गरज आहे? जेव्हा तुम्हाला भावनांच्या वादळात सापडल्यासारखं वाटतं, तेव्हा उपासनेशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. हे खरं आहे, की तुम्ही आधी जितकं करू शकत होता तितकं करणं आता तुम्हाला शक्य नसेल. पण नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा तुमच्याकडून जास्त गोष्टींची अपेक्षा करत नाही. (लूक २१:१-४ सोबत तुलना करा.) तसंच, व्यक्तिगत अभ्यास आणि मनन करण्यासाठी विशिष्ट वेळ बाजूला काढून ठेवा. का? कारण आपलं मन स्थिर करण्यासाठी यहोवा आपल्याला संघटनेकडून खूप चांगली माहिती पुरवतो. तुम्हाला ज्याची गरज आहे, ते शोधण्यासाठी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या संशोधनाच्या साधनांचा तुम्ही वापर करू शकता. जसं की, JW लायब्ररी ॲप, वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक. आधी उल्लेख केलेली मोनिका म्हणते, की जेव्हा तिला अस्वस्थ करणाऱ्या विचारांमुळे त्रास व्हायचा तेव्हा ती संशोधनांच्या साधनांची मदत घ्यायची. उदाहरणार्थ, ती “राग” हा शब्द शोधायची. तर कधी ती “विश्वासघात” किंवा “एकनिष्ठा” हे शब्द टाकून माहिती शोधायची. आणि तिला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ती ही माहिती वाचत राहायची. ती म्हणते, “मी बैचेन होऊन काहीही शोधत राहायचे, पण वाचत राहिल्यामुळे मला असं वाटायचं की जणू यहोवा मला प्रेमाने मिठीत घेतोय. मला जाणवायचं, की यहोवाला माझ्या सगळ्या भावना समजत आहेत आणि तो मला मदत करत आहे.” यहोवाकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे वादळात अडकलेल्या जहाजाप्रमाणे अस्वस्थ झालेलं तुमचं मन जोपर्यंत शांत पाण्याजवळ येत नाही तोपर्यंत आपल्या भावनांवर नियंत्रण करायला तुम्हाला मदत होईल.—स्तो. ११९:१४३, १४४.
यहोवा तुम्हाला आधार देईल
१०. एखाद्या धक्कादायक घटनेनंतर आपल्याला कदाचित कसं वाटेल?
१० समस्या. एखाद्या धक्कादायक घटनेनंतर आपल्याला कधीकधी शारीरिक आणि भावनिकरीत्या खूप गळून गेल्यासारखं वाटेल. आपल्याला कदाचित अशा खेळाडूसारखं वाटेल, जो आधी खूप जोरात धावायचा. पण आता जखमी झाल्यामुळे त्याला लंगडत चालावं लागतंय. आपण आधी ज्या गोष्टी खूप सहज करायचो, त्या गोष्टी करायला आता आपल्याला खूप कठीण जात असेल. किंवा ज्या गोष्टी आपण आधी खूप आनंदाने करायचो, त्या करायची आता आपल्याला इच्छाच होणार नाही. एलीयाप्रमाणे आपल्याला कदाचित उठायचीही शक्ती नसेल. फक्त झोपून राहावंसं वाटेल. (१ राजे १९:५-७) अशा परिस्थितीत यहोवा काय वचन देतो?
११. आणखी कोणत्या मार्गाने यहोवा आपल्याला मदत करतो? (स्तोत्र ९४:१८)
११ यहोवा आपल्याला कशी मदत करतो? अशा वेळी यहोवा आपल्याला आधार द्यायचं वचन देतो. (स्तोत्र ९४:१८ वाचा.) जसं एका जखमी खेळाडूला हालचाल करण्यासाठी आधाराची गरज असते, त्याचप्रमाणे यहोवाची सेवा करत राहण्यासाठी आपल्याला कदाचित मदतीची गरज पडू शकते. अशा वेळी यहोवा आपल्याला अशी खातरी देतो: “तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे, ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.’” (यश. ४१:१३) दावीद राजाला जेव्हा शत्रूंचा आणि संकटांचा सामना करावा लागला, तेव्हा त्यानेसुद्धा ही मदत अनुभवली. त्याने यहोवाला म्हटलं: “तुझा उजवा हात मला आधार देतो.” (स्तो. १८:३५) मग यहोवा आपल्याला कशी मदत पुरवतो?
१२. आपण निराश असतो तेव्हा यहोवा कदाचित कोणाचा वापर करून आपल्याला मदत करेल?
१२ यहोवा नेहमी आपल्या भाऊबहिणींचा वापर करून आपल्याला मदत पुरवायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, दावीद जेव्हा खूप निराश होता, तेव्हा त्याचा मित्र योनाथान त्याला भेटण्यासाठी आला आणि त्याने त्याला भावनिक आधार दिला आणि त्याला प्रोत्साहन दिलं. (१ शमु. २३:१६, १७) त्याचप्रमाणे एलीयाला मदत पुरवण्यासाठी यहोवाने अलीशाचा वापर केला. (१ राजे १९:१६, २१; २ राजे २:२) आजसुद्धा यहोवा कदाचित आपल्या घरच्यांचा, आपल्या मित्रांचा आणि मंडळीतल्या वडिलांचा वापर करून आपल्याला मदत पुरवेल. पण कधीकधी आपलं मन इतकं दुखावलेलं असतं, आपण इतके निराश असतो, की आपल्याला एकटं राहावंसं वाटतं. असं वाटणं साहजिक आहे. पण मग अशा वेळी यहोवाकडून मदत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?
१३. यहोवा पुरवत असलेल्या मदतीचा आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ आपल्याला काय करायची गरज आहे? आपल्याला कितीही एकटं राहावंसं वाटलं, तरी आपण ते टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकटं राहिल्यामुळे आपण फक्त स्वतःबद्दल आणि ज्या समस्येतून आपण जात आहोत त्याबद्दलच विचार करत बसू. आणि त्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला अवघड जाऊ शकतं. (नीति. १८:१) हे खरंय, की खासकरून जेव्हा एखादी वाईट घटना आपल्यासोबत घडते, तेव्हा आपल्याला एकांत हवा असेल. पण आपण जर जास्त काळ एकटं राहिलो, तर आपण यहोवा पुरवत असलेली मदत नाकारत आहोत असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपल्याला कितीही वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागत असलं, तरी आपल्या घरच्यांकडून, मित्रांकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मिळाणारी मदत आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्यांच्याद्वारे यहोवाच आपल्याला मदत करत आहे, असा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे.—नीति. १७:१७; यश. ३२:१, २.
यहोवा तुमचं सांत्वन करेल
१४. आपल्याला कोणत्या भीतीदायक परिस्थितींना तोंड द्यावं लागू शकतं?
१४ समस्या. आपल्यालाही कदाचित अशा एखाद्या भीतीदायक परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, ज्यामुळे आपण खूप घाबरून जाऊ. बायबलमध्येसुद्धा देवाच्या अशा विश्वासू सेवकांबद्दल सांगितलंय, ज्यांना त्यांच्या शत्रूंमुळे आणि इतर तणावात्मक परिस्थितींमुळे खूप घाबरल्यासारखं वाटलं होतं. (स्तो. १८:४; ५५:१, ५) त्याचप्रमाणे, आज आपल्यालासुद्धा शाळा-कॉलेजमध्ये, कामावरच्या ठिकाणी, आपल्या घरच्यांकडून आणि सरकारकडून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. एवढंच नव्हे, तर कधीकधी आरोग्याच्या समस्येमुळे कदाचित आपल्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला एखादं लहान बाळ जसं स्वतःहून काहीच करू शकत नाही तसं, खूप हतबल असल्यासारखं वाटेल. मग अशा वेळी यहोवा आपल्याला कशी मदत करतो?
१५. स्तोत्र ९४:१९ मध्ये आपल्याला कोणती खातरी देण्यात आली आहे?
१५ यहोवा आपल्याला कशी मदत करतो? यहोवा आपल्याला दिलासा देतो आणि आपलं सांत्वन करतो. (स्तोत्र ९४:१९ वाचा.) हे स्तोत्र वाचून कदाचित आपल्या मनात एका लहान मुलीचं चित्र येईल. वादळामुळे विजांचा कडकडाट होत आहे. आणि त्यामुळे या लहान मुलीला झोप लागत नाही. ती खूप घाबरलेली आहे. मग तिचे वडील तिच्याकडे येतात आणि तिला उचलून घेतात. तिला झोप लागेपर्यंत ते तिला आपल्या कुशीत घेतात. ढगांचा गडगडाट अजून थांबलेला नसला तरी त्या लहान मुलीला आपल्या वडिलांच्या मिठीत खूप सुरक्षित वाटतं आणि तिला गाढ झोप लागते. आपल्यालाही जेव्हा खूप भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपल्याला शांत आणि सुरक्षित वाटेपर्यंत आपल्या स्वर्गातल्या पित्याने, आपल्याला जणू असंच आपल्या मिठीत घ्यावं असं कदाचित आपल्याला वाटेल. मग अशा प्रकारचं सांत्वन आपण यहोवाकडून कसं मिळवू शकतो?
१६. यहोवाकडून सांत्वन मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ आपल्याला काय करायची गरज आहे? यहोवाला प्रार्थना करून आणि बायबल वाचून यहोवासोबत नियमितपणे वेळ घालवायचा प्रयत्न करा. (स्तो. ७७:१, १२-१४) असं केल्यामुळे जेव्हा तुम्ही खूप तणावात्मक परिस्थितीत असता तेव्हा सर्वात आधी आपल्या स्वर्गातल्या पित्याला प्रार्थना करायचा विचार तुमच्या मनात येईल. तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, कोणत्या गोष्टीची चिंता वाटते, ते यहोवाला सांगा. आणि त्याच्या वचनातून त्याला तुमच्याशी बोलू द्या आणि तुमचं सांत्वन करू द्या. (स्तो. ११९:२८) जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटत असते, तेव्हा बायबलमध्ये वाचलेला एखादा विशिष्ट भाग तुम्हाला खासकरून खूप सांत्वनदायक वाटेल. जसं की, बायबलमधल्या ईयोब, स्तोत्रं आणि नीतिवचनं या पुस्तकांमधला एखादा भाग किंवा मत्तय ६ व्या अध्यायातले येशूचे शब्द खूप प्रोत्साहनदायक वाटतील. खरंच यहोवाला प्रार्थना करून आणि त्याचं वचन वाचून तुम्हाला त्याचं सांत्वन अनुभवता येईल.
१७. आपण कोणता भरवसा बाळगू शकतो?
१७ आपल्याही आयुष्यात कधीकधी खूप वाईट परिस्थिती येऊ शकते. पण तेव्हा आपण नक्कीच एकटं नसू. उलट, यहोवा आपल्यासोबत कायम असेल असा भरवसा आपण ठेवू शकतो. (स्तो. २३:४; ९४:१४) कारण यहोवा आपल्याला संरक्षण द्यायचं, आपलं मन शांत आणि स्थिर ठेवायचं, आपल्याला आधार द्यायचं आणि आपलं सांत्वन करायचं वचन देतो. यशया २६:३ मध्ये यहोवाबद्दल म्हटलंय: “तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहणाऱ्यांचं तू रक्षण करशील. तू त्यांना कायम टिकणारी शांती देशील. कारण त्यांनी तुझ्यावर आपला भरवसा ठेवलाय.” म्हणून यहोवावर भरवसा ठेवा आणि तो तुम्हाला मदत करण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करतोय त्यांचा फायदा करून घ्या. तुम्ही जर असं केलं तर कठीण परिस्थितीतही तुम्हाला नव्याने शक्ती मिळेल!
तुमचं उत्तर काय असेल?
-
आपल्याला खासकरून केव्हा यहोवाच्या मदतीची गरज भासू शकते?
-
आपल्यावर संकटं येतात तेव्हा कोणत्या चार मार्गांनी यहोवा आपल्याला मदत करतो?
-
यहोवा पुरवत असलेल्या मदतीचा फायदा घेण्यासाठी आपण काय करू शकतो?
गीत ४ “यहोवा माझा मेंढपाळ”
a काही नावं बदलण्यात आली आहेत.