व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १

गीत ३८ तो तुला बळ देईल

यहोवावर भरवसा ठेवा आणि भीतीवर मात करा

यहोवावर भरवसा ठेवा आणि भीतीवर मात करा

२०२४ सालचं वार्षिक वचन: “मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.”​—स्तो. ५६:३.

या लेखात:

आपण यहोवावरचा भरवसा कसा मजबूत करू शकतो आणि भीतीवर कशी मात करू शकतो हे जाणून घ्या.

१. आपल्याला कधीकधी भीती का वाटू शकते?

 आपल्या सगळ्यांनाच कधी-न-कधी भीती वाटते. पण बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला मेलेल्यांची, अलौकिक शक्‍तींची आणि पुढे जगाचं काय होईल याची भीती वाटत नाही. पण आपण सध्या अशा काळात जगत आहोत, ज्यामध्ये युद्धं, गुन्हेगारी, रोगराई यांसारखी “भयानक दृश्‍यं” आपल्याला पाहायला मिळतात. (लूक २१:११) आपल्याला कदाचित माणसांचीसुद्धा भीती वाटेल. जसं की सरकारं किंवा खऱ्‍या उपासनेला विरोध करणाऱ्‍या आपल्या घरच्या लोकांची. काही जणांना असं वाटतं, की त्यांना सध्या सहन करत असलेल्या किंवा भविष्यात येणाऱ्‍या समस्यांचा सामना करता येणार नाही. आणि त्यामुळेसुद्धा त्यांना चिंता वाटते.

२. गथमध्ये असताना दावीदची परिस्थिती कशी होती ते समजावून सांगा.

दावीदलाही काही वेळा भीती वाटली. उदाहरणार्थ, शौल राजा त्याच्या जीवावर उठला होता, तेव्हा दावीद घाबरून पलिष्टी लोकांच्या गथ शहरात पळून गेला. दावीद तिथे असताना तिथल्या आखीश राजाला कळलं, की दावीद एक शूर योद्धा आहे आणि त्याने ‘लाखो’ पलिष्टी लोकांना मारलंय. त्यामुळे आखीश राजा आता आपलं काय करेल या विचाराने दावीदला “खूप भीती वाटली.” (१ शमु. २१:१०-१२) मग भीतीवर मात करायला दावीदला कशामुळे मदत झाली?

३. स्तोत्र ५६:१-३, ११ प्रमाणे दावीदने त्याच्या भीतीवर कशी मात केली?

गथमध्ये असताना दावीदला कशाची भीती वाटत होती आणि त्यामुळे त्याला कसं वाटत होतं हे त्याने स्तोत्र ५६ मध्ये सांगितलंय. पण या भीतीवर मात करण्यासाठी त्याला कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली, हेसुद्धा त्याने या स्तोत्रात सांगितलंय. दावीदला जेव्हा भीती वाटली, तेव्हा त्याने यहोवावर भरवसा ठेवला. (स्तोत्र ५६:१-३, ११ वाचा.) दावीदने यहोवावर जो भरवसा ठेवला होता तो व्यर्थ गेला नाही. यहोवाच्या आशीर्वादाने त्याला एक युक्‍ती सुचली. त्याने वेड्याचं सोंग घेतलं. त्यामुळे दावीदपासून आपल्याला काही धोका नाही असं आखीशला वाटलं आणि म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अशा प्रकारे दावीदला त्याच्या हातून निसटता आलं.​—१ शमु. २१:१३–२२:१.

४. आपण यहोवावरचा भरवसा कसा मजबूत करू शकतो? उदाहरण द्या.

आपणसुद्धा यहोवावर भरवसा ठेवून भीतीवर मात करू शकतो. पण आपण यहोवावरचा आपला भरवसा कसा  वाढवू शकतो, खासकरून आपल्याला भीती वाटते तेव्हा? एका उदाहरणाचा विचार करा. समजा तुम्हाला कळतं, की तुम्हाला एक आजार झालाय तेव्हा पहिल्यांदा तुम्ही घाबरून जाता. पण डॉक्टरवर भरवसा असल्यामुळे तुमची भीती नाहीशी होते. कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल, की त्याने तुमच्यासारखाच आजार असलेल्या रुग्णांना बरं केलंय. तसंच तो तुमचं लक्ष देऊन ऐकतोय आणि त्याला तुमच्या भावना कळत आहेत याची तो तुम्हाला खातरी करून देतोय. यासोबतच तो तुम्हाला असा एखादा उपचार सांगेल ज्यामुळे बऱ्‍याच रुग्णांना फायदा झालाय. अगदी तसंच, यहोवाने आधी काय-काय केलंय, तो सध्या काय करतोय आणि तो पुढे आपल्यासाठी काय करणार आहे यांवर विचार केल्यामुळे त्याच्यावरचा आपला भरवसा मजबूत होऊ शकतो. दावीदनेही असंच केलं. आता स्तोत्र ५६ मध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत असताना तुम्ही यहोवावरचा भरवसा कसा वाढवू शकता आणि भीतीवर कशी मात करू शकता, ते पाहा.

यहोवाने आधी काय-काय केलंय?

५. भीतीवर मात करण्यासाठी दावीदने कशावर मनन केलं? (स्तोत्र ५६:१२, १३)

दावीदचा जीव धोक्यात होता, तेव्हा यहोवाने आधी काय-काय केलंय  यावर दावीद विचार करत राहिला. (स्तोत्र ५६:१२, १३ वाचा.) दावीद नेहमी असाच विचार करायचा. उदाहरणार्थ, त्याने यहोवाने बनवलेल्या सृष्टीवर  मनन केलं. त्यामुळे यहोवा किती शक्‍तिशाली आहे आणि त्याचं मानवांवर किती प्रेम आहे याची त्याला आठवण झाली. (स्तो. ६५:६-९) तसंच, यहोवाने इतरांसाठी  जे केलं त्याचा दावीदने विचार केला. (स्तो. ३१:१९; ३७:२५, २६) आणि खासकरून यहोवाने स्वतः दावीदसाठी  काय-काय केलंय, याचाही त्याने विचार केला. दावीद अगदी लहान होता तेव्हापासूनच यहोवाने त्याला सांभाळलं होतं आणि त्याला सुरक्षित ठेवलं होतं. (स्तो. २२:९, १०) अशा प्रकारे मनन केल्यामुळे दावीदचा यहोवावर असलेला भरवसा किती वाढला असेल याचा विचार करा!

यहोवाने आधी काय केलंय, तो सध्या काय करतोय आणि तो पुढे काय करणार आहे या गोष्टींवर विचार केल्यामुळे दावीदला यहोवावरचा आपला भरवसा वाढवता आला (परिच्छेद ५, ८, १२ पाहा) d


६. जेव्हा आपल्याला भीती वाटते, तेव्हा यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘यहोवाने आजपर्यंत काय-काय केलंय?’ त्याने बनवलेल्या सृष्टीबद्दल विचार करा. उदाहरणार्थ, त्याने बनवलेल्या पक्ष्यांना आणि फुलांना तुम्ही ‘निरखून पाहता,’ तेव्हा तुम्हाला कळतं, की त्याने त्यांना आपल्या प्रतिरूपात बनवलं नाही आणि ते त्याची उपासनासुद्धा करू शकत नाहीत. पण तरीसुद्धा यहोवा किती प्रेमळपणे त्यांची काळजी घेतो. त्यामुळे यहोवा तुमचीही काळजी घेईल या गोष्टीवरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (मत्त. ६:२५-३२) तसंच, यहोवाने त्याच्या उपासकांसाठी काय केलंय त्याचाही विचार करा. तुम्ही बायबलमधल्या एखाद्या व्यक्‍तीबद्दल अभ्यास करू शकता, ज्याने खूप जबरदस्त विश्‍वास दाखवला. तसंच, अलीकडच्या काळातल्या यहोवाच्या एखाद्या विश्‍वासू सेवकाचा अनुभवही तुम्ही वाचू शकता. a यासोबतच यहोवाने आजपर्यंत तुमची कशी काळजी घेतली या गोष्टीवरसुद्धा तुम्ही मनन करू शकता. जसं की यहोवाने तुम्हाला सत्यात कसं आणलं? (योहा. ६:४४) त्याने तुमच्या प्रार्थनांचं उत्तर कसं दिलं? (१ योहा. ५:१४) आणि त्याच्या प्रिय मुलाचं बलिदान दिल्यामुळे तुम्हाला दररोज कसा फायदा होत आहे?​—इफि. १:७; इब्री ४:१४-१६.

यहोवाने आधी काय केलंय, तो सध्या काय करतोय आणि तो पुढे काय करणार आहे या गोष्टींवर विचार केल्यामुळे आपण यहोवावरचा आपला भरवसा वाढवू शकतो (परिच्छेद ६, ९-१०, १३-१४ पाहा) e


७. दानीएल संदेष्ट्याच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे वेनेस्साला आपल्या भीतीवर कशी मात करता आली?

हैतीमध्ये राहणाऱ्‍या वेनेस्सा  b नावाच्या एका बहिणीला एका भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ज्या भागात राहत होती, तिथला एक माणूस तिला दररोज फोन आणि मेसेज करून त्याच्यासोबत संबंध ठेवायला तिच्यावर दबाव टाकायचा. पण वेनेस्साने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे तो जास्तच भडकला आणि त्याने तिचं बरंवाईट करायची धमकी दिली. वेनेस्सा म्हणते: “त्या वेळी मला खूप भीती वाटली.” मग तिने काय केलं? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिने काही व्यावहारिक पावलं उचलली. तिने मंडळीतल्या एका वडिलाची मदत घेऊन पोलिस अधिकाऱ्‍यांकडे त्या माणसाबद्दल तक्रार केली. त्यासोबतच प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कशा प्रकारे मदत केली होती यावर तिने विचार केला. ती म्हणते: “सगळ्यात आधी माझ्या मनात दानीएल संदेष्ट्याचा विचार आला. कारण त्याचीसुद्धा काहीएक चूक नसताना त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. पण यहोवाने त्याला सांभाळलं. त्यामुळे मीसुद्धा यहोवाला अशी प्रार्थना केली, की ‘यहोवा आता तूच हे सगळं सांभाळ.’ त्यानंतर माझ्या मनातली भीती निघून गेली.”​—दानी. ६:१२-२२.

यहोवा सध्या काय करतोय?

८. दावीदला कोणत्या गोष्टीची खातरी होती? (स्तोत्र ५६:८)

गथमध्ये असताना दावीद जीवावर बेतणाऱ्‍या परिस्थितीमध्ये होता. पण तरीसुद्धा तो भीतीला बळी पडला नाही. उलट, यहोवा त्या क्षणी  त्याच्यासाठी काय करत आहे या गोष्टीचा त्याने विचार केला. आपल्याला कसं वाटतंय हे यहोवाला कळतंय आणि तो आपलं मार्गदर्शन करतोय, आपलं संरक्षण करतोय ही गोष्ट दावीदला जाणवत होती. (स्तोत्र ५६:८ वाचा.) यासोबतच दावीदला योनाथानसारख्या विश्‍वासू मित्रांची साथ होती. आणि महायाजक अहीमलेखकडूनसुद्धा त्याला मदत मिळाली. (१ शमु. २०:४१, ४२; २१:६, ८, ९) इतकंच नाही तर शौल राजा त्याच्या जीवावर उठला होता, तेव्हासुद्धा दावीद त्याच्या तावडीतून आपला जीव वाचवू शकला. आपल्यावर कोणतं संकट आलंय आणि आपल्याला कसं वाटतंय हे यहोवाला खूप चांगल्या प्रकारे कळतंय या गोष्टीची त्याला खातरी होती.

९. आपल्या प्रत्येकाबद्दल यहोवाला काय माहीत आहे?

एखाद्या संकटामुळे तुम्ही जेव्हा घाबरून जाता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाला तुमच्यावर आलेलं संकट माहीत आहे आणि तुम्हाला कसं वाटतं  हेसुद्धा त्याला कळतं. उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोकांवर जे अत्याचार होत होते ते यहोवाने पाहिलेच, पण त्यासोबतच “त्यांना किती यातना सोसाव्या लागत आहेत” हेसुद्धा यहोवा पाहत होता. (निर्ग. ३:७) ही गोष्ट दावीदनेसुद्धा अनुभवली. म्हणूनच त्याने एका स्तोत्रात असं गायलं, की यहोवा त्याचं “दुःख” आणि त्याला “होणाऱ्‍या यातना” जाणतो. (स्तो. ३१:७) यहोवाच्या लोकांनासुद्धा जेव्हा त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे वाईट परिणाम भोगावे लागले, तेव्हा यहोवाला ते पाहून “दुःख” झालं. (यश. ६३:९) तर हे नेहमी लक्षात ठेवा, की तुम्ही घाबरता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हे यहोवाला जाणवतं आणि त्या भीतीवर मात करण्यासाठी तो तुम्हाला मदत करायला आतुर असतो.

१०. यहोवाला तुमची काळजी आहे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तो तुम्हाला मदत करू शकतो या गोष्टीची तुम्हाला खातरी का वाटते?

१० तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल, की एखाद्या भीतीदायक परिस्थितीचा सामना करताना यहोवा आपल्यासोबत आहे, हे आपल्याला कसं कळेल? त्यासाठी तुम्ही काय करू शकता? अशा वेळी यहोवा आपल्यासोबत आहे, हे आपल्याला पाहता यावं म्हणून त्याला प्रार्थना करा. (२ राजे ६:१५-१७) आणि मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांचा विचार करा: सभेत एका भावाने किंवा बहिणीने दिलेल्या उत्तरातून तुम्हाला धीर मिळाला आहे का? एखाद्या साहित्यामुळे, व्हिडिओमुळे किंवा एखाद्या खास गीतामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे का? एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला एखादं चांगलं वचन किंवा मुद्दा सांगितला आहे का? हे खरं आहे, की यहोवा आपल्याला जे आध्यात्मिक अन्‍न पुरवतो आणि आपल्या प्रेमळ भाऊबहिणींची आपल्याला जी साथ आहे, तिचा कधीकधी आपल्याला विसर पडू शकतो. पण या सगळ्या गोष्टी यहोवाकडून मिळालेल्या अनमोल भेटीच आहेत! (यश. ६५:१३; मार्क १०:२९, ३०) यावरून यहोवाला आपली काळजी आहे, हेच दिसून येतं. (यश. ४९:१४-१६) आणि या गोष्टी दाखवतात, की यहोवावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

११. कोणत्या गोष्टीमुळे आयडाला आपल्या मनातली भीती काढून टाकायला मदत झाली?

११ संकटात असताना यहोवा आपल्याला कशी मदत करतो हे सेनेगालमध्ये राहणाऱ्‍या आयडा नावाच्या एका बहिणीला पाहायला मिळालं. भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे तिच्या आईवडिलांची अशी अपेक्षा होती, की तिने नोकरी करून त्यांना सांभाळावं. पण आयडाने जेव्हा पायनियर सेवा करून साधं जीवन जगायचं ठरवलं, तेव्हा मात्र तिला पैशांची अडचण भासू लागली. त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिचा खूप राग आला आणि ते तिला नको ते बोलू लागले. आयडा म्हणते: “मला याची भीती होती, की मी आईवडिलांना सांभाळू शकणार नाही. आणि त्यामुळे सगळे जण माझ्याशी नातं तोडतील. यहोवाने माझ्यासोबत इतकं वाईट का होऊ दिलं असा विचार करून मी त्यालाच दोष देऊ लागले.” पण मग तिने सभेत एक भाषण ऐकलं. त्याबद्दल ती म्हणते: “भाषणात त्या बांधवाने आम्हाला याची आठवण करून दिली, की यहोवाला आपल्या मनावर झालेल्या सगळ्या जखमा माहीत असतात. त्यानंतर हळूहळू मंडळीतल्या वडीलांच्या आणि इतरांच्या मदतीने मला हे जाणवलं, की यहोवाला माझी काळजी आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यानंतर मी पूर्ण भरवशाने यहोवाला प्रार्थना करू लागले. इतकंच नाही, तर तो माझ्या प्रार्थनांची कशी उत्तरं देतो हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझं मन खूप शांत झालं.” काही काळानंतर आयडाला एक चांगली नोकरी मिळाली, ज्यामुळे तिला पायनियर सेवाही करता आली आणि आपलं कुटुंबही सांभाळता आलं. आयडा म्हणते: “मी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकले. आता जेव्हा कधी मला भीती वाटते आणि त्याबद्दल मी यहोवाला प्रार्थना करते तेव्हा माझी भीती निघून होते.”

यहोवा पुढे काय करणार आहे?

१२. स्तोत्र ५६:९ मध्ये सांगितल्याप्रमाणे दावीदला कोणत्या गोष्टीची खातरी होती?

१२ स्तोत्र ५६:९ वाचा. दावीदला आपल्या भीतीवर मात करण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टीने मदत केली ते या वचनातून आपल्याला कळतं. दावीदचा जीव धोक्यात असला तरी त्याने यहोवा भविष्यात आपल्यासाठी काय करणार आहे  या गोष्टीवर मनन केलं. त्याला माहीत होतं, की वेळ आल्यावर यहोवा नक्की त्याला वाचवेल. कारण इस्राएलचा पुढचा राजा म्हणून यहोवाने दावीदलाच घोषित केलं होतं. (१ शमु. १६:१, १३) आणि दावीदला माहीत होतं, की जर यहोवाने शब्द दिला आहे तर तो पूर्ण झाल्यासारखाच आहे.

१३. यहोवाबद्दल आपल्याला कोणती खातरी आहे?

१३ यहोवाने तुमच्यासाठी काय करायचं वचन दिलंय? सैतानाच्या या दुष्ट जगात राहत असताना यहोवाने कोणतीच संकटं आपल्यावर येऊ देऊ नयेत अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. c पण आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या यहोवा नवीन जगात काढून टाकेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो. (यश. २५:७-९) कारण मरण पावलेल्या आपल्या जवळच्या लोकांना जिवंत करायची, आपले आजार बरे करायची, आपल्या मनावरच्या जखमा भरून काढायची आणि आपल्या सगळ्या विरोधकांचा नाश करायची ताकद आपल्या निर्माणकर्त्यामध्ये आहे.​—१ योहा. ४:४.

१४. आपण कशावर मनन करू शकतो?

१४ तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा भविष्यात यहोवा आपल्यासाठी काय करणार आहे, यावर मनन करा. जसं की, सैतानाचा नाश केला जाईल, दुष्ट लोकांच्या जागी चांगले लोक असतील आणि दररोज हळूहळू आपल्यातल्या कमतरता निघून जातील. तो काळ किती सुंदर असेल याची कल्पना करा! आपल्या या आशेवर आपण कसं मनन करू शकतो याबद्दल २०१४ च्या प्रांतीय अधिवेशनात एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यात एका वडिलांनी आपल्या कुटुंबासोबत चर्चा केली होती. आणि चर्चेत २ तीमथ्य ३:१-५ या वचनांत नंदनवनाबद्दल जर सांगितलं असतं तर त्यातले शब्द कसे असते ते बोलून दाखवलं होतं. ते म्हणाले होते: “नवीन जगात आनंदच आनंद असेल. कारण तेव्हा माणसं इतरांवर प्रेम करणारी आणि आध्यात्मिक गोष्टींवर प्रेम करणारी, मर्यादा असलेली, नम्र, देवाचा गौरव करणारी, आईवडिलांचं ऐकणारी, उपकारांची जाणीव ठेवणारी, एकनिष्ठ, कुटुंबासाठी माया ममता असलेली, एकमेकांशी सहमत असलेली, इतरांबद्दल चांगलं बोलणारी, संयमी, सौम्य, चांगल्याबद्दल प्रेम असणारी, भरवशालायक, ऐकून घेणारी, मनाने लीन असलेली, चैनीच्या गोष्टींची आवड धरण्यापेक्षा देवावर प्रेम करणारी, देवाची भक्‍ती करण्याचा फक्‍त दिखावा न करता त्याची मनापासून भक्‍ती करणारी असतील. अशा लोकांसोबत मिळून राहा.” नवीन जग कसं असेल याबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबातल्या लोकांशी किंवा भाऊबहिणींशी चर्चा करता का?

१५. तानियाला आपल्या भीतीवर मात करायला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली?

१५ उत्तर मॅसिडोनियामधल्या तानिया नावाच्या एका बहिणीने भविष्यात मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर मनन करून आपल्या भीतीवर मात केली. ती बायबल अभ्यास करत असल्यामुळे तिचे आईवडील तिचा खूप विरोध करत होते. ती म्हणते: “मला ज्या गोष्टींची भीती वाटली त्यांपैकी काही गोष्टी खरोखर घडल्या. प्रत्येक सभेनंतर माझी आई मला मारायची. इतकंच नाही तर मी जर यहोवाची साक्षीदार बनले तर ते मला मारून टाकतील अशी धमकीसुद्धा त्यांनी मला दिली.” शेवटी तानियाला घराबाहेर काढण्यात आलं. मग या सगळ्या परिस्थितीत तिने काय केलं? ती म्हणते: “मी जर यहोवाला विश्‍वासू राहिले, तर सदासर्वकाळ मला आनंदी राहता येईल या गोष्टीवर मी जास्त विचार केला. तसंच, या जगात मला ज्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील, त्यांच्या बदल्यात यहोवा मला नवीन जगात किती आशीर्वाद देईल आणि या जगातल्या वाईट गोष्टींचा पुढे मला कसा विसर पडेल याचाही मी विचार केला.” त्यामुळेच तानिया यहोवाला विश्‍वासू राहू शकली. आणि यहोवाच्या मदतीने तिला राहायला एक चांगली जागा मिळाली. आज तानियाचं एका विश्‍वासू भावासोबत लग्न झालंय आणि आज ते आनंदाने पूर्ण वेळेची सेवा करत आहेत.

आत्तापासूनच यहोवावर भरवसा वाढवा

१६. लूक २१:२६-२८ मध्ये सांगितलेल्या घटना घडतील तेव्हा धैर्य दाखवायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१६ मोठ्या संकटादरम्यान भीतीमुळे या जगातल्या “लोकांचे हातपाय गळून जातील.” पण देवाचे लोक मात्र धैर्याने आणि खंबीरपणे उभे राहतील. (लूक २१:२६-२८ वाचा.) का बरं? कारण आपण आधीच यहोवावर भरवसा ठेवायला शिकून घेतलेलं असेल. आधी उल्लेख केलेली तानिया म्हणते, की तिच्या आधीच्या अनुभवांमुळे तिला आता इतर कठीण परीक्षांचा सामना करायला मदत होत आहे. ती म्हणते: “अशी कोणतीही परिस्थिती नाही जिच्यामध्ये यहोवा आपल्याला मदत करू शकत नाही. कधीकधी असं वाटतं, की सगळं काही लोकांच्या हातात आहे. पण खरंतर यहोवा त्यांना जितकी अनुमती देतो तितक्याच गोष्टी त्यांच्या हातात असतात. आणि त्यापलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. एखादी समस्या आपल्याला कितीही कठीण वाटत असली, तरी ती कायम राहत नाही.”

१७. २०२४ च्या वार्षिक वचनामुळे आपल्याला कशी मदत होईल? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१७ आजकाल भीती वाटणं एकदम साहजिक आहे. पण दावीदसारखंच आपणसुद्धा भीतीला बळी पडायचं टाळू शकतो. दावीदने यहोवाला प्रार्थना केली आणि तेच २०२४ सालचं वार्षिक वचन आहे: “मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.” (स्तो. ५६:३) या वचनाबद्दल बायबलच्या एका संदर्भ ग्रंथात असं म्हटलंय, की इथे दावीद “ज्या गोष्टींची त्याला भीती वाटत होती आणि ज्या समस्या त्याला होत्या त्यांवर विचार करत बसत नाही, तर आपली सुटका करणाऱ्‍या तारणकर्त्यावर त्याचा भरवसा आहे.” तर मग येणाऱ्‍या महिन्यांमध्ये, खासकरून तुम्हाला जेव्हा भीती वाटेल अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा या वार्षिक वचनावर विचार करा. यहोवाने आधी काय-काय केलंय, सध्या तो काय करत आहे आणि भविष्यात तो काय करेल या गोष्टींवर विचार करा. म्हणजे दावीदने जे म्हटलं तेच तुम्हालाही म्हणता येईल: “मी देवावर भरवसा ठेवतो, मी घाबरणार नाही.”​—स्तो. ५६:४.

संकटात असलेली एक बहीण वार्षिक वचनावर विचार करत आहे (परिच्छेद १७ पाहा)

खाली दिलेल्या गोष्टींवर मनन करून तुम्ही भीतीवर कशी मात करू शकता?

  • यहोवाने आत्तापर्यंत काय केलंय.

  • यहोवा सध्या काय करत आहे.

  • यहोवा पुढे काय करणार आहे.

गीत ३३ आपला भार यहोवावर टाक

a तुमचा विश्‍वास वाढेल अशी माहिती jw.org वर तुम्ही शोधू शकता. त्यासाठी तुम्ही सर्च बॉक्समध्ये “त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा” किंवा “अनुभव” असं टाईप करून शोधू शकता. तसंच JW लायब्ररी  ॲपमध्ये “त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा” किंवा “यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवन कथा” ही लेखमालिका पाहा.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

d चित्राचं वर्णन: यहोवाने आपल्याला एका अस्वलाला मारायची ताकद कशी दिली होती, अहीमलेखकडून तो आपल्याला कशी मदत करत आहे आणि पुढे तो आपल्याला कसं राजा बनवेल या गोष्टीवर दावीदने विचार केला.

e चित्राचं वर्णन: विश्‍वासामुळे जेलमध्ये असलेला एक भाऊ, यहोवाने त्याला सिगारेटची सवय सोडायला कशी मदत केली होती, तो त्याला जवळच्या लोकांकडून आलेल्या पत्रांमधून कसं उत्तेजन देत आहे आणि पुढे तो त्याला नंदनवन पृथ्वीवर कसं सर्वकाळचं जीवन देईल या गोष्टींवर विचार करत आहे.