व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

गीत १३२ तू आणि मी, एक आता!

पतींनो, आपल्या पत्नीला मान द्या!

पतींनो, आपल्या पत्नीला मान द्या!

“पतींनो . . . त्यांना मान द्या.”१ पेत्र ३:७.

या लेखात:

पती आपल्या वागण्या-बोलण्यातून पत्नीला मान कसा देऊ शकतात ते पाहा.

१. यहोवाने विवाहाची भेट का दिली?

 यहोवा ‘आनंदी देव’ आहे आणि त्याची इच्छा आहे की आपणसुद्धा आनंदी राहावं. (१ तीम. १:११) त्यामुळे जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याने आपल्याला बऱ्‍याच भेटी दिल्या आहेत. (याको. १:१७) त्यांपैकी एक भेट म्हणजे विवाह. जेव्हा एका पुरुषाचं आणि स्त्रीचं लग्न होतं, तेव्हा ते एकमेकांना वचन देतात की ते एकमेकांचा आदर करतील आणि एकमेकांवर प्रेम करतील. जेव्हा ते त्यांच्यातलं नातं मजबूत ठेवतात, तेव्हा ते खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतात.—नीति. ५:१८.

२. आज बरेच पती आपल्या पत्नीशी कसं वागतात?

पण दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगात बरीच जोडपी लग्नाच्या दिवशी एकमेकांना दिलेलं वचन विसरतात. यामुळे ती जोडपी खूश नाहीत. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट सादर केला. त्यात असं सांगितलंय, की बरेच पती आपल्या पत्नीला मारहाण करतात, त्यांना घालूनपाडून बोलतात किंवा भावनिक रितीने त्यांचं शोषण करतात. जो पती आपल्या पत्नीशी असं वागतो तो कदाचित चारचौघांत तिला आदराने वागवत असेल, पण घरी तिचा छळ करत असेल. तसंच जेव्हा पती पोर्नोग्राफी पाहतो, तेव्हासुद्धा वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

३. कोणत्या कारणांमुळे पती आपल्या पत्नीचा छळ करतात?

कोणत्या कारणांमुळे एक पती आपल्या पत्नीचा छळ करू शकतो? कदाचित त्याचे वडील हिंसक असतील. त्यामुळे त्याला वाटू शकतं की अशा प्रकारचं वागणं चुकीचं नाही. किंवा काही संस्कृतींमध्ये असं शिकवलं जातं की “खरा मर्द” तोच असतो जो आपल्या बायकोला मुठीत ठेवतो. याचासुद्धा एखाद्यावर प्रभाव होऊ शकतो. तर काही पुरुषांना लहानपणी आपल्या भावनांवर ताबा ठेवायला शिकवलेलं नसतं. त्यामुळे ते आपल्या रागावरही ताबा ठेवू शकत नाही. तसंच काही पतींना पोर्नोग्राफी पाहायची सवय असते. त्यामुळे स्त्रियांबद्दल आणि शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होऊ शकतो. इतकंच काय, तर काही रिपोर्टप्रमाणे कोव्हिड-१९ च्या महामारीनंतर या सगळ्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. पण यांपैकी कोणतंही कारण सांगून पती आपल्या पत्नीशी वाईट वागू शकत नाही.

४. ख्रिस्ती पतींनी कशापासून सावध असलं पाहिजे आणि का?

आज स्त्रियांबद्दल जगाचा खूप चुकीचा दृष्टिकोन आहे. याचा आपल्यावर प्रभाव होऊ नये म्हणून ख्रिस्ती पतींनी सावध असलं पाहिजे. a का? कारण आपल्या विचारांचा आपल्या कामांवर प्रभाव होऊ शकतो. प्रेषित पौलने रोममधल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असा इशारा दिला, की त्यांनी “या जगाच्या व्यवस्थेचं अनुकरण करू” नये. (रोम. १२:१, २) पौलने जेव्हा रोममधल्या ख्रिश्‍चनांना हे पत्र लिहिलं, तेव्हा तिथली मंडळी सुरू होऊन काही काळ झाला होता. तरी पौलच्या शब्दांवरून हे दिसून येतं, की मंडळीतल्या काहींवर अजूनही जगातल्या विचारांचा आणि रितीरिवाजांचा प्रभाव होता. म्हणूनच पौलने त्यांना आपले विचार आणि वागणं बदलायचा सल्ला दिला. तोच सल्ला आज ख्रिस्ती पतींनासुद्धा लागू होतो. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही पतींवर जगाचा प्रभाव पडलाय आणि त्यांनी आपल्या पत्नीचा छळ केलाय. b मग पतींनी आपल्या पत्नीशी कसं वागावं असं यहोवाला वाटतं? याचं उत्तर आपल्याला या लेखाच्या मुख्य वचनात मिळतं.

५. १ पेत्र ३:७ प्रमाणे पतींनी आपल्या पत्नीशी कसं वागलं पाहिजे?

१ पेत्र ३:७ वाचा. यहोवाने पतींना अशी आज्ञा दिली आहे, की त्यांनी आपल्या पत्नीला मान द्यावा. मान देणं म्हणजेच आदर करणं. जो पती आपल्या पत्नीला मान देतो तो तिच्याशी दयेने आणि प्रेमाने वागतो. या लेखात आपण पाहू या, की पती आपल्या पत्नीला मान कसा देऊ शकतात. पण त्याआधी आपण यावर चर्चा करू या, की कोणत्या गोष्टींमुळे पत्नीचा अनादर होऊ शकतो.

पत्नीचा अनादर होईल असं वागणं टाळा

६. जे पती आपल्या पत्नीला मारहाण करतात त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? (कलस्सैकर ३:१९)

मारहाण करणं. यहोवा हिंसक लोकांचा द्वेष करतो. (स्तो. ११:५) आणि जे पती आपल्या पत्नीला मारहाण करतात ते तर यहोवाला मुळीच आवडत नाहीत. (मला. २:१६; कलस्सैकर ३:१९ वाचा.) १ पेत्र ३:७ या आपल्या मुख्य वचनात सांगितल्याप्रमाणे जर एक पती आपल्या पत्नीशी नीट वागत नसेल, तर याचा परिणाम यहोवासोबतच्या त्याच्या नात्यावरही होईल. इतकंच काय, तर यहोवा त्याच्या प्रार्थनासुद्धा ऐकणार नाही.

७. इफिसकर ४:३१, ३२ प्रमाणे पतींनी कशा प्रकारचं बोलणं टाळलं पाहिजे? (“शब्दाचा अर्थ” पाहा.)

घालूनपाडून बोलणं. काही पती आपल्या पत्नीशी रागाने बोलतात किंवा अशा प्रकारे बोलतात ज्यामुळे तिला वाईट वाटू शकतं. पण यहोवाला “राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ” c अजिबात आवडत नाही. (इफिसकर ४:३१, ३२ वाचा.) तो सगळं काही ऐकतो. एक पती आपल्या पत्नीशी ज्या प्रकारे बोलतो तेसुद्धा यहोवा ऐकतो; मग ते घराच्या चार भिंतींच्या आत असलं तरीही. जो पती आपल्या पत्नीशी कठोरपणे बोलतो त्याचा परिणाम त्याच्या विवाहावर तर होतोच, पण यहोवासोबतच्या त्याच्या नात्यावरही होतो.—याको. १:२६.

८. यहोवाला पोर्नोग्राफी पाहण्याबद्दल काय वाटतं आणि का?

पोर्नोग्राफी पाहणं. पोर्नोग्राफी पाहण्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? त्याला याची घृणा वाटते. जेव्हा पती घाणेरडी चित्रं पाहतो तेव्हा यहोवासोबतचं त्याचं नातं तर खराब होतंच, शिवाय त्याच्या पत्नीचाही अनादर होतो. d यहोवाची इच्छा आहे की पतीने आपल्या पत्नीला फक्‍त वागण्यातूनच नाही तर विचारांनीही एकनिष्ठ असावं. येशूने म्हटलं होतं की जेव्हा एक माणूस एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो, तेव्हाच तो “आपल्या मनात” तिच्याशी व्यभिचार करतो. eमत्त. ५:२८, २९.

९. जर एक पती आपल्या पत्नीवर जबरदस्ती करत असेल तर ते यहोवाला का आवडत नाही?

जबरदस्ती करणं. काही पती शारीरिक संबंध ठेवताना आपल्या पत्नीला आवडत नाही किंवा तिच्या विवेकाला पटत नाही अशी एखादी गोष्ट करायची जबरदस्ती करतात. अशा प्रकारचं स्वार्थी आणि निर्दयी वागणं यहोवाला मुळीच आवडत नाही. तो पतींकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपल्या पत्नीवर प्रेम करावं, तिच्याशी दयेने वागावं आणि तिच्या भावनांचा आदर करावा. (इफिस. ५:२८, २९) पण जर एक ख्रिस्ती पती आपल्या पत्नीवर जबरदस्ती करत असेल, तिचा छळ करत असेल किंवा पोर्नोग्राफी पाहत असेल तर काय? तो त्याच्या विचारात आणि कामांत कसा बदल करू शकतो?

पती अनादराने वागायचं कसं थांबवू शकतो?

१०. येशूच्या उदाहरणातून पतींना काय फायदा होऊ शकतो?

१० आपल्या पत्नीशी वाईट वागणं थांबवायला एका पतीला कशामुळे मदत होऊ शकते? तो येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न करू शकतो. येशूचं जरी लग्न झालं नसलं, तरी त्याने पतींसाठी एक चांगलं उदाहरण मांडलंय. (इफिस. ५:२५) त्यामुळे येशू आपल्या शिष्यांशी ज्या प्रकारे वागला-बोलला त्यातून पती काय शिकू शकतात ते आता पाहू या.

११. येशू आपल्या शिष्यांशी कसा वागला?

११ येशू त्याच्या शिष्यांशी दयेने आणि आदराने वागला. त्याने कधीच त्यांच्यावर अधिकार गाजवला नाही किंवा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला नाही. तो त्यांचा प्रभू असला तरी आपल्या ताकदीचा वापर करून त्याला त्याचा अधिकार सिद्ध केला नाही. उलट त्याने नम्रपणे त्यांची सेवा केली. (योहा. १३:१२-१७) त्याने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “माझ्याकडून शिका, म्हणजे तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल. कारण मी प्रेमळ आणि नम्र आहे.” (मत्त. ११:२८-३०) येशू प्रेमळ होता. पण प्रेमळ असण्याचा अर्थ एक व्यक्‍ती कमजोर आहे असा नाही. उलट त्याच्यात आत्मसंयम असतो. त्यामुळे जेव्हा त्याला भडकवलं जातं तेव्हा तो शांत राहतो आणि स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवतो.

१२. येशू इतरांशी कसं बोलला?

१२ येशूने आपल्या शब्दांचा वापर इतरांना सांत्वन आणि तजेला देण्यासाठी केला. तो त्याच्या शिष्यांशी कधीच कठोरपणे बोलला नाही. (लूक ८:४७, ४८) त्याच्या विरोधकांनी त्याचा अपमान केला आणि त्याला भडकवायचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा “त्याने उलटून अपमान केला नाही.” (१ पेत्र २:२१-२३) कधीकधी उलट उत्तर देण्याऐवजी त्याने शांत राहायचं निवडलं. (मत्त. २७:१२-१४) खरंच येशूने ख्रिस्ती पतींसाठी किती उत्तम उदाहरण मांडलंय!

१३. मत्तय १९:४-६ मध्ये सांगितल्याप्रमाणे एक पती आपल्या पत्नीशी कशा प्रकारे ‘जडून राहू’ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ येशूने पतींना आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहायला सांगितलं होतं. यहोवाने असं म्हटलं होतं की पुरुष आपल्या पत्नीशी “जडून राहील.” आणि येशूनेही हेच शब्द वापरले. (मत्तय १९:४-६ वाचा, द होली बायबल मराठी—आर.व्ही.) “जडून राहील” यासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आलाय, त्याचा शब्दशः अर्थ एखाद्या गोष्टीला “गोंद लावून चिकटवणं” असा होतो. पती आणि पत्नीमधलं वैवाहिक नातं इतकं मजबूत असलं पाहिजे, की जणू काही त्यांना एकमेकांशी चिकटवलं आहे. जर त्यांच्यापैकी एखाद्याने असं काही केलं ज्यामुळे त्याच्या जोडीदाराला त्रास झाला, तर त्या दोघांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्या पतीचं आपल्या पत्नीसोबत अशा प्रकारे घट्ट नातं असेल तो कुठल्याही प्रकारची पोर्नोग्राफी पाहणार नाही. तो “निरुपयोगी गोष्टींपासून” आपली दृष्टी लगेच वळवेल. (स्तो. ११९:३७) एका अर्थाने तो ईयोबसारखा आपल्या डोळ्यांशी करार करेल. तो कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही.—ईयो. ३१:१.

आपल्या पत्नीला विश्‍वासू असलेला पती पोर्नोग्राफी पाहायला नकार देतो (परिच्छेद १३ पाहा) g


१४. पतीने यहोवासोबतचं आणि त्याच्या पत्नीसोबतचं नातं पुन्हा सुधारण्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत?

१४ जो पती आपल्या पत्नीला मारहाण करतो किंवा तिला वाईटसाईट बोलतो त्याने यहोवासोबतचं आणि त्याच्या पत्नीसोबतचं नातं सुधारण्यासाठी आणखी काही पावलं उचलली पाहिजेत. ती पावलं कोणती आहेत? पहिलं, अशा प्रकारचं वागणं एक गंभीर समस्या आहे हे त्याने मान्य केलं पाहिजे. कारण यहोवाच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. (स्तो. ४४:२१; उप. १२:१४; इब्री ४:१३) दुसरं, त्याने आपल्या बायकोचा छळ करणं थांबवलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. (नीति. २८:१३) तिसरं, त्याने त्याच्या बायकोची आणि यहोवाची माफी मागितली पाहिजे. (प्रे. कार्यं ३:१९) तसंच स्वतःमध्ये बदल करायची इच्छा निर्माण व्हावी, म्हणून त्याने यहोवाकडे याचना केली पाहिजे. शिवाय, त्याला स्वतःच्या विचारांवर आणि वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवता यावं म्हणून त्याने यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. (स्तो. ५१:१०-१२; २ करिंथ. १०:५; फिलिप्पै. २:१३) चौथं, त्याने त्याच्या प्रार्थनांप्रमाणे वागलं केलं पाहिजे, म्हणजे सर्व प्रकारच्या हिंसेचा आणि वाईट बोलण्याचा द्वेष करायला शिकलं पाहिजे. (स्तो. ९७:१०) पाचवं, त्याने मंडळीतल्या प्रेमळ मेंढपाळांची लगेच मदत घेतली पाहिजे. (याको. ५:१४-१६) सहावं, भविष्यात आपल्याकडून असं काही होऊ नये म्हणून आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो, हे त्याने आधीच ठरवलं पाहिजे. जो पती पोर्नोग्राफी पाहतो त्यानेसुद्धा हीच पावलं उचलली पाहिजेत. तो बदल करण्यासाठी जी काही मेहनत घेतो त्यावर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल. (स्तो. ३७:५) पण, पतीने आपल्या पत्नीचा अनादर करायचं टाळणंच पुरेसं नाही, तर त्याने तिचा आदर करायलाही शिकलं पाहिजे. तो हे कसं करू शकतो?

तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर कसा करू शकता?

१५. पती आपल्या पत्नीवर प्रेम असल्याचं कसं दाखवू शकतो?

१५ तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम आहे हे तिला कळू द्या. काही भावांनी त्यांचं त्यांच्या पत्नीवर किती प्रेम आहे, हे दाखवायला दररोज तिच्यासाठी काही न काही करायची स्वतःला सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते त्यांच्या संसारात आनंदी आहेत. (१ योहा. ३:१८) एक पती छोट्या-छोट्या गोष्टी करून आपल्या पत्नीवर प्रेम असल्याचं दाखवू शकतो. जसं की, तो प्रेमाने तिचा हात हातात घेऊ शकतो किंवा तिला मिठीत घेऊ शकतो. तसंच, तो तिला मेसेज करून सांगू शकतो, की “जेवलीस का?” किंवा, “कशी आहेस? तुझा दिवस कसा चाललाय?” तसंच, आपलं प्रेम व्यक्‍त करायला तो तिला एखादं कार्ड लिहून देऊ शकतो. किंवा तिला गजरा किंवा फुलं आणून देऊ शकतो. जेव्हा एक पती या गोष्टी करतो तेव्हा तो त्याच्या पत्नीचा आदर करतो आणि त्यांचा विवाहसुद्धा मजबूत होतो.

१६. पतीने आपल्या पत्नीची प्रशंसा का केली पाहिजे?

१६ कदर असल्याचं दाखवा. जेव्हा एक पती आपल्या पत्नीला मान देतो तेव्हा तो तिला हे सांगत असतो, की ती त्याच्या नजरेत खूप अनमोल आहे. आणि त्यामुळे तिला बरं वाटतं. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, पत्नी आपल्या पतीला साथ देण्यासाठी जे काही करते त्याबद्दल न विसरता तिची प्रशंसा करणं. (कलस्सै. ३:१५) जेव्हा एक पती आपल्या पत्नीची मनापासून प्रशंसा करतो तेव्हा तिला खूप बरं वाटतं. त्यामुळे तिला सुरक्षित वाटतं, त्याच्या प्रेमाची जाणीव होते आणि आदर दिल्यासारखं वाटतं.—नीति. ३१:२८.

१७. एक पती आपल्या पत्नीचा आदर कसा करू शकतो?

१७ दयेने आणि आदराने वागा. ज्या पतीचं आपल्या पत्नीवर प्रेम असतं, तो तिची कदर करतो. त्यासोबतच, तो तिला यहोवाकडून मिळालेली एक अनमोल भेट समजतो. (नीति. १८:२२; ३१:१०) त्यामुळे तो तिच्याशी आदराने आणि दयेने वागतो, अगदी शारीरिक संबंध ठेवतानासुद्धा. तसंच, शारीरिक संबंध ठेवताना तो तिला अशी कोणतीही गोष्ट करायची जबरदस्ती करणार नाही ज्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटेल, तिला वाईट वागवल्यासारखं वाटेल, तिचं शोषण केल्यासारखं वाटेल किंवा तिचा विवेक तिला दोष देईल. f तसंच, पती स्वतःसुद्धा यहोवासमोर एक चांगला विवेक टिकवून ठेवायचा प्रयत्न करेल.—प्रे. कार्यं २४:१६.

१८. पतींनी काय करायचा निश्‍चय केला पाहिजे? (“ पतींनो, या चार मार्गांनी आपल्या पत्नीला आदर दाखवा” ही चौकटसुद्धा पाहा.)

१८ पतींनो, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुमच्या पत्नीला मान द्यायला तुम्ही खूप मेहनत घेता. तुम्ही खातरी बाळगू शकता की यहोवाला याची कदर आहे. म्हणून तुमच्या पत्नीचा अनादर होईल असं वागायचं टाळा. तसंच तिच्याशी दयेने, आदराने आणि प्रेमाने वागून तिला मान द्यायचा निश्‍चय करा. त्यामुळे तिला हे जाणवेल की तुमचं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही तिला अनमोल समजता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्नीला मान देऊन तुम्ही एक सर्वात महत्त्वाचं नातं जपू शकता. ते म्हणजे यहोवासोबतचं तुमचं मौल्यवान नातं.—स्तो. २५:१४.

गीत १३१ “देवाने जे जोडलयं”

a जानेवारी २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “स्त्रियांबद्दल तुमचा यहोवासारखाच दृष्टिकोन आहे का?” हा लेख वाचून पतींना फायदा होऊ शकतो.

b जर तुमचा जोडीदार तुमचा छळ करत असेल, तर JW लायब्ररी किंवा jw.org वर “कुछ और विषय” या लेख मालिकेतला “जब परिवार का कोई आप पर अत्याचार करे, तो क्या करें?” हा हिंदीतला लेख वाचल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

c शब्दाचा अर्थ: “शिवीगाळ” यात असं बोलणंसुद्धा सामील आहे, ज्यामुळे समोरच्या व्यक्‍तीचा अपमान होऊ शकतो आणि तिला स्वतःबद्दल खूप वाईट वाटू शकतं. तसंच, त्या व्यक्‍तीबद्दल आपल्याला जी गोष्ट आवडत नाही, त्याबद्दल तिला सारखे-सारखे टोमणे मारणंसुद्धा सामील आहे. त्यामुळे एक पती आपल्या पत्नीला दुखावण्यासाठी किंवा तिचा अपमान करण्यासाठी जे काही बोलतो त्याला शिवीगाळ करणं म्हटलंय.

d jw.org किंवा JW लायब्ररीवरपोर्नोग्राफी पाहणं देवाविरुद्ध पाप आहे का?” हा व्हिडिओ पाहा.

e ज्या स्त्रियांचे पती पोर्नोग्राफी पाहतात त्यांना ऑगस्ट २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातला “जेव्हा विवाह जोडीदार पोर्नोग्राफी पाहतो” या लेखामुळे मदत होईल.

f पती-पत्नींच्या शारीरिक संबंधांबद्दल कोणती गोष्ट शुध्द आणि कोणती गोष्ट अशुध्द आहे याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे ख्रिस्ती जोडप्याने या बाबतीत असे निर्णय घेतले पाहिजेत, ज्यांमधून हे दिसून येईल की त्यांना यहोवा आदर करायची, एकमेकांना खूश करायची आणि एक शुद्ध विवेक टिकवून ठेवायची इच्छा आहे. तसंच, विवाहित जोडपी त्यांच्यातल्या या खासगी गोष्टींबद्दल इतरांना सांगणार नाहीत.

g चित्राचं वर्णन: एका भावाचे कामावरचे सोबती त्याला पोर्नोग्राफीचं मासिक पाहायला सांगतात.