व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १

गीत २ देवाचं अतुल्य नाव!

यहोवाचा महिमा करा!

यहोवाचा महिमा करा!

२०२५ सालचं वार्षिक वचन: “यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा.”स्तो. ९६:८.

या लेखात:

यहोवाला जो महिमा मिळाला पाहिजे तो आपण त्याला कसा देऊ शकतो, ते पाहा.

१. आज आपल्याला कशा प्रकारचे लोक पाहायला मिळतात?

 तुम्ही अशा बऱ्‍याच लोकांना पाहिलं असेल जे फक्‍त स्वतःचाच विचार करतात. दुसऱ्‍यांशी त्यांचं काही घेणं-देणं नसतं. उदाहरणार्थ, काही जण सोशल मिडियावर स्वतःकडे आणि त्यांनी केलेल्या गोष्टींकडे इतरांचं लक्ष वेधण्यासाठी बराच खटाटोप करतात. पण आज जगात यहोवाचा महिमा करणारे खूप कमी लोक आहेत. मग यहोवाचा महिमा करण्याचा काय अर्थ होतो? आपण त्याचा महिमा का करतो? जो महिमा यहोवाला मिळाला पाहिजे तो आपण त्याला कसा देऊ शकतो? आणि तो लवकरच त्याच्या नावाचा महिमा कसा करणार आहे? या प्रश्‍नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत.

यहोवाचा महिमा करण्याचा काय अर्थ होतो?

२. सीनाय पर्वताजवळ यहोवाने त्याचा महिमा कसा प्रकट केला? (चित्रसुद्धा पाहा.)

महिमा म्हणजे काय? बायबलमध्ये “महिमा” हा शब्द अशा कोणत्याही गोष्टीला सूचित करतो, ज्यामुळे एक व्यक्‍ती प्रभावशाली वाटू शकते. यहोवाने जेव्हा इस्राएल राष्ट्राला इजिप्तच्या गुलामीतून सोडवलं त्या वेळेचा विचार करा. याच्या थोड्याच काळानंतर, यहोवाने तो किती शक्‍तिशाली आहे हे दाखवून दिलं. कल्पना करा: लाखो इस्राएली लोक सीनाय पर्वताच्या पायथ्याशी त्यांच्या देवाचं ऐकायला एकत्र आले आहेत. मग एक दाट ढग पर्वताला घेरतो आणि अचानक एक मोठा भूकंप होतो. त्यामुळे त्यांच्या पायांखालची जमीन हादरते, विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येतो. (निर्ग. १९:१६-१८; २४:१७; स्तो. ६८:८) विचार करा, यहोवा किती शक्‍तिशाली आहे हे जेव्हा त्याने दाखवून दिलं, तेव्हा इस्राएली लोक किती भारावून गेले असतील!

सीनाय पर्वताजवळ यहोवाने इस्राएली लोकांपुढे आपला महिमा प्रकट केला (परिच्छेद २ पाहा)


३. यहोवाचा महिमा करण्याचा काय अर्थ होतो?

मग माणसंसुद्धा यहोवाचा महिमा करू शकतात का? हो करू शकतात. याचा एक मार्ग म्हणजे, त्याच्या सुंदर गुणांबद्दल आणि त्याने केलेल्या अद्‌भुत गोष्टींबद्दल इतरांना सांगणं. तसंच, आपण जेव्हा त्याच्या मदतीने केलेल्या कामांचं श्रेय त्याला देतो तेव्हासुद्धा आपण त्याचा महिमा करत असतो. (यश. २६:१२) दावीद राजाचं या बाबतीत खूप सुंदर उदाहरण आहे. त्याने जेव्हा इस्राएलच्या मंडळीसमोर प्रार्थना केली तेव्हा त्याने देवाला म्हटलं: “हे यहोवा! महानता, सामर्थ्य, वैभव, ऐश्‍वर्य आणि सन्मान हे सर्व तुझं आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेलं सगळं काही तुझंच आहे.” मग दावीदची प्रार्थना झाल्यावर “सर्व मंडळीने . . . यहोवाची स्तुती केली.”—१ इति. २९:११, २०.

४. येशूने यहोवाचा महिमा कसा केला?

पृथ्वीवर असताना येशूने मान्य केलं की तो जे चमत्कार करतोय ते पित्यामुळे करतो. असं करून त्याने आपल्या पित्याचा महिमा केला. (मार्क ५:१८-२०) त्याच प्रकारे लोकांना आपल्या पित्याबद्दल सांगून आणि त्यांच्याशी चांगलं वागूनसुद्धा येशूने यहोवाचा महिमा केला. एकदा तो एका सभास्थानात शिकवत होता. त्याचं ऐकणाऱ्‍यांमध्ये १८ वर्षांपासून दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेली एक स्त्रीसुद्धा होती. दुष्ट स्वर्गदूताच्या प्रभावामुळे ती कमरेपासून वाकली होती आणि तिला सरळ उभं राहणं शक्यच नव्हतं. खरंच त्या स्त्रीला किती त्रास होत असावा! येशूने जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा त्याला तिची खूप दया आली. त्यामुळे तो तिच्याकडे गेला आणि तिला प्रेमाने म्हणाला: “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्‍त झालीस.” मग त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ उभी राहिली आणि “देवाची स्तुती करू लागली.” यहोवाने आपल्याला बरं केलंय यासाठी ती खूप कृतज्ञ होती. (लूक १३:१०-१३) यहोवाचा महिमा करण्यासाठी त्या स्त्रीकडे एक चांगलं कारण होतं आणि आपल्याकडेही आहे.

आपण यहोवाचा महिमा का करतो?

५. यहोवाचा आदर करण्यासाठी आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

आपण यहोवाचा महिमा करतो, कारण आपण त्याचा मनापासून आदर करतो. त्याचा आदर करण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. यहोवा सर्वशक्‍तिमान आहे; त्याच्याकडे अमर्याद ताकद आहे. (स्तो. ९६:४-७) त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमधून त्याची अफाट बुद्धी स्पष्टपणे दिसते. त्याने आपल्याला जीवन तर दिलंच आहे, पण त्यासोबतच ते जगण्यासाठी लागणाऱ्‍या सगळ्या गोष्टीही दिल्या आहेत. (प्रकटी. ४:११) तो एकनिष्ठ आहे. (प्रकटी. १५:४) तो जे काही करतो त्यात यशस्वी होतो. आणि तो नेहमी दिलेलं वचन पाळतो. (यहो. २३:१४) त्यामुळेच यिर्मया संदेष्ट्याने यहोवाबद्दल म्हटलं: “राष्ट्रांतल्या सर्व बुद्धिमान लोकांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या राज्यांमध्ये, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.” (यिर्म. १०:६, ७) खरंच आपल्या स्वर्गातल्या पित्याचा आदर करण्यासाठी आपल्याकडे बरीच कारणं आहेत. पण आपण फक्‍त त्याचा आदरच करत नाही तर त्याच्यावर प्रेमही करतो.

६. आपण यहोवावर प्रेम का करतो?

आपण यहोवाचा महिमा करतो, कारण आपलं त्याच्यावर जिवापाड प्रेम आहे. यहोवाच्या बऱ्‍याच सुंदर गुणांमुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. त्यांपैकी काहींचा विचार करा. तो दयाळू आणि करुणामय आहे. (स्तो. १०३:१३; यश. ४९:१५) तो आपल्या भावना समजून घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा त्यालाही दुःख होतं. (जख. २:८) त्याला जाणून घ्यायला आणि त्याचे मित्र बनायला तो आपल्याला मदत करतो. (स्तो. २५:१४; प्रे. कार्यं १७:२७) यहोवा नम्र आहे. बायबल म्हणतं, की “आकाश आणि पृथ्वी यांना पाहण्यासाठी तो खाली वाकतो. तो दीनदुबळ्याला धुळीतून उठवतो.” (स्तो. ११३:६, ७) मग अशा महान देवाचा महिमा करायला कोणाला आवडणार नाही?—स्तो. ८६:१२.

७. आपल्याकडे कोणती खास संधी आहे?

आपण यहोवाचा महिमा करतो, कारण इतरांनी त्याला जाणून घ्यावं असं आपल्याला वाटतं. आज बऱ्‍याच जणांना यहोवाबद्दल सत्य माहीत नाही. का? कारण सैतानाने त्याच्याबद्दल खोटं पसरवून लोकांची मनं आंधळी केली आहेत. (२ करिंथ. ४:४) सैतानाने लोकांना हे पटवून दिलंय की यहोवा रागीट देव आहे. त्याला आपली अजिबात काळजी नाही आणि जगातल्या बऱ्‍याच समस्यांसाठी तोच जबाबदार आहे. पण खरं काय आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल सांगून त्याचा महिमा करायची संधी आपल्याकडे आहे. (यश. ४३:१०) ९६ व्या स्तोत्रामध्ये यहोवाचा गौरव करण्याबद्दल सांगितलंय. आता आपण त्या स्तोत्रातल्या काही गोष्टींवर चर्चा करू या. चर्चा करत असताना याचा विचार करा की आपण कोणत्या काही मार्गांनी यहोवाचा महिमा करू शकतो. कारण महिमा मिळवण्यासाठी तोच पात्र आहे.

यहोवाला जो महिमा मिळाला पाहिजे तो आपण त्याला कसा देऊ शकतो?

८. आपण कोणत्या एका मार्गाने यहोवाचा महिमा करू शकतो? (स्तोत्र ९६:१-३)

स्तोत्र ९६:१-३ वाचा. इतरांना यहोवाबद्दल सांगून आपण त्याच्या नावाचा महिमा करू शकतो. या वचनांमध्ये यहोवाच्या लोकांना ‘त्याच्यासाठी गीत गायचं,’ ‘त्याच्या नावाची स्तुती करायचं,’ ‘त्याच्याकडून मिळणाऱ्‍या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करायचं’ आणि ‘सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगायचं’ प्रोत्साहन देण्यात आलंय. आपणसुद्धा या सगळ्या गोष्टी करून आपल्या बोलण्याने यहोवाचा महिमा करू शकतो. प्राचीन काळातले यहोवाचे सेवक त्याच्या सुंदर गुणांबद्दल आणि त्याने त्यांच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल इतरांना सांगायला आतुर होते. (दानी. ३:१६-१८; प्रे. कार्यं ४:२९) आपणही हे कसं करू शकतो?

९-१०. अँजलिनाच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं? (चित्रसुद्धा पाहा.)

अमेरिकेत राहणाऱ्‍या अँजलिना a नावाच्या बहिणीच्या अनुभवाचा विचार करा. तिने कामाच्या ठिकाणी धैऱ्‍याने यहोवाबद्दल सांगितलं. एकदा तिच्या ऑफिसमध्ये एक मिटींग ठेवण्यात आली होती. त्या मिटींगमध्ये कामावरच्या नवीन लोकांना स्वतःची ओळख करून द्यायची होती. अँजलिना त्या ठिकाणी नवीन असल्यामुळे तीसुद्धा त्या मिटींगमध्ये होती. आपण यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे किती आनंदी आहोत हे सांगायला तिने काही फोटो दाखवायचं ठरवलं. पण तिच्याआधी एक माणूस स्वतःची ओळख करून देत होता. तोसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. पण तो साक्षीदारांबद्दल आणि ते जे काही मानतात त्याबद्दल वाईटसाईट बोलत होता. अँजलिना म्हणते: “मी खूप घाबरले होते. पण मी स्वतःला म्हटलं: ‘मी असं कोणालाही यहोवाबद्दल खोटंनाटं सांगू देईन का? की यहोवाची बाजू घेईन?’”

१० त्या माणसाचं बोलणं संपल्यावर अँजलिनाने मनातल्या मनात छोटीशी प्रार्थना केली. मग ती शांतपणे त्याला म्हणाली: “मीही तुमच्यासारखीच साक्षीदार कुटुंबात लहानाची मोठी झाले आणि मी आजही साक्षीदार आहे.” विचार करा, तिथलं वातावरण किती तापलं असेल. तरीही अँजलिना शांत राहिली होती. तिने कामावरच्या लोकांना फोटो दाखवले आणि सांगितलं, की यहोवाच्या सेवेत ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी किती खूश आहेत. त्यासोबतच तिने खूप आदराने त्यांना तिच्या विश्‍वासाबद्दल सांगितलं. (१ पेत्र ३:१५) मग पुढे काय झालं? अँजलिनाचं बोलणं संपेपर्यंत तो माणूस थोडा नरमला होता. इतकंच काय तर साक्षीदारांसोबतच्या चांगल्या आठवणींबद्दलही तो बोलला. अँजलिना म्हणते: “आपण यहोवाची बाजू घेतलीच पाहिजे. कारण तेच योग्य आहे. त्याच्या नावाबद्दल इतरांना खरं ते सांगणं हा आपल्यासाठी मोठा बहुमान आहे.” लोक त्याचा आदर करत नसले तरी आपल्याकडे त्याचा आदर करायची आणि त्याचा महिमा करायची खास संधी आहे. आणि ती आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

आपण यहोवाबद्दल इतरांना सांगून, आपल्या मौल्यवान गोष्टी देऊन आणि आपल्या वागण्या-बोलण्यातून यहोवाचा महिमा करू शकतो (परिच्छेद ९-१० पाहा) b


११. प्राचीन काळापासून यहोवाच्या उपासकांनी स्तोत्र ९६:८ मधलं तत्त्व कसं लागू केलं?

११ स्तोत्र ९६:८ वाचा. आपण आपल्या मौल्यवान गोष्टी देऊन यहोवाचा महिमा करू शकतो. खऱ्‍या उपासकांनी नेहमी अशाच प्रकारे यहोवाचा महिमा केलाय. (नीति. ३:९) उदाहरणार्थ, मंदिराचं बांधकाम आणि दुरुस्ती करायला इस्राएली लोकांनी दान दिलं. (२ राजे १२:४, ५; १ इति. २९:३-९) तसंच, येशूच्या शिष्यांनी ‘स्वतःच्या संपत्तीचा’ वापर करून त्याची आणि त्याच्या प्रेषितांची सेवा केली. (लूक ८:१-३) शिवाय, पहिल्या शतकातल्या भाऊबहिणींनीसुद्धा इतर भाऊबहिणींना मदत करण्यासाठी दान दिलं. (प्रे. कार्यं ११:२७-२९) आज आपणसुद्धा स्वेच्छेने दान देऊन यहोवाचा महिमा करू शकतो.

१२. आपल्या दानांमुळे यहोवाचा महिमा कसा होतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ आपल्या दानामुळे यहोवाचा महिमा कसा होतो याची बरीच उदाहरणं आहेत. आपण त्यांपैकी एक पाहू या. २०२० ला झिम्बाब्वेमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. लाखो लोकांची उपासमार झाली. त्यात आपली प्रिस्का नावाची एक बहीणसुद्धा होती. इतक्या कठीण परिस्थितीतही ती दर बुधवारी आणि शुक्रवारी प्रचाराला जायची. इतकंच काय तर, नांगरणीच्या काळातही ती तसंच करत राहिली. ती शेतात काम करण्याऐवजी प्रचाराला जायची म्हणून तिचे शेजारी तिची थट्टा करायचे. ते तिला म्हणायचे, “तू उपाशीच मरशील.” पण प्रिस्का त्यांना ठामपणे उत्तर द्यायची, की “यहोवा आपल्या सेवकांना कधीच सोडत नाही.” याच्या काही काळातच, तिला संघटनेकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टींची मदत मिळाली. आपण देत असलेल्या दानामुळे संघटनेने तिला ही मदत पुरवली. प्रिस्काच्या शेजाऱ्‍यांना या गोष्टीचं विशेष वाटलं. आणि ते तिला म्हणाले, “तुझ्या देवाने तुला सोडलं नाही म्हणून आम्हालाही त्याच्याबद्दल शिकायचंय.” यानंतर, तिच्या शेजारच्या सात लोकांनी सभांना यायला सुरुवात केली.

आपण आपल्या मौल्यवान गोष्टी देऊन यहोवाचा महिमा करू शकतो (परिच्छेद १२ पाहा) c


१३. आपल्या वागण्याने यहोवाचा महिमा कसा होऊ शकतो? (स्तोत्र ९६:९)

१३ स्तोत्र ९६:९ वाचा. आपण आपल्या वागण्याने यहोवाचा महिमा करू शकतो. यहोवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्‍या याजकांना त्यांचं शरीर स्वच्छ ठेवायची गरज होती. (निर्ग. ४०:३०-३२) आपणसुद्धा शरीराने शुद्ध असलं पाहिजे. पण त्यासोबतच, आपण नैतिक रितीनेसुद्धा शुद्ध असलं पाहिजे. म्हणजे, आपण अशी कोणतीही गोष्ट करू नये जिची यहोवाला घृणा वाटते. (स्तो. २४:३, ४; १ पेत्र १:१५, १६) बायबल म्हणतं की आपण “जुनं व्यक्‍तिमत्त्व” काढून टाकलं पाहिजे आणि “नवीन व्यक्‍तिमत्त्व” घातलं पाहिजे. याचा अर्थ, यहोवाला न आवडणारे चुकीचे विचार आणि वाईट वागणं टाळण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. तसंच, आपण अशा प्रकारे वागायला आणि विचार करायला शिकलं पाहिजे, ज्यामुळे यहोवाचे गुण दिसून येतील. (कलस्सै. ३:९, १०) अतिशय अनैतिक आणि क्रूर लोकसुद्धा यहोवाच्या मदतीने बदलू शकतात आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व घालू शकतात.

१४. जॅकच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायलं मिळालं? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ जॅक नावाच्या माणसाच्या उदाहरणाचा विचार करा. तो इतका क्रूर आणि हिंसक होता, की त्याला राक्षस असं नाव मिळालं होतं. त्याच्या गुन्ह्यांमुळे, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्याला मृत्यूदंड देण्याआधी काही काळ तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मग, तिथे गेलेल्या एका भावाने त्याला बायबल अभ्यासासाठी विचारलं. जॅक त्याच्यासोबत अभ्यास करायला तयार झाला. जॅकने आधी बरीच वाईट कामं केली असली, तरी त्याने स्वतःमध्ये बदल केले आणि पुढे तो बाप्तिस्म्यासाठी पात्र ठरला. तो इतका बदलला होता की, ज्या दिवशी जॅकला मृत्यूदंड देण्यात येणार होता, त्या दिवशी शिपायांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या वेळी, तुरुंगातल्या एका अधिकाऱ्‍याने म्हटलं: “एकेकाळी जॅक हा सगळ्यात वाईट कैदी होता. पण आता तो सगळ्यात चांगला कैदी आहे.” जॅकला मृत्यूदंड दिल्याच्या एक आठवड्यानंतर, काही भाऊ पुन्हा तुरुंगात सभा चालवायला तिथे गेले. तेव्हा त्यांनी एका नवीन कैद्याला तिथे पाहिलं. तो सभेला का आला होता? जॅकचं बदललेलं वागणं पाहून, त्याच्यावर चांगला प्रभाव पडला होता. आणि यहोवाची उपासना करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्याला जाणून घ्यायचं होतं. तर या उदाहरणावरून आपल्याला कळतं, की आपल्या वागण्यामुळे आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचा गौरव करू शकतो.—१ पेत्र २:१२.

आपण आपल्या वागण्यातून यहोवाचा महिमा करू शकतो (परिच्छेद १४ पाहा) d


लवकरच यहोवा त्याच्या नावाचा महिमा कसा करणार आहे?

१५. लवकरच यहोवा त्याच्या नावाचा महिमा कसा करणार आहे? (स्तोत्र ९६:१०-१३)

१५ स्तोत्र ९६:१०-१३ वाचा. स्तोत्र ९६ च्या शेवटच्या वचनांमध्ये यहोवाला नीतिमान न्यायाधीश आणि राजा म्हटलंय. मग यहोवा लवकरच त्याच्या नावाचा महिमा कसा करणार आहे? न्याय करून. थोड्याच काळात तो मोठ्या बाबेलचा नाश करणार आहे आणि आपल्या पवित्र नावाला लागलेला कलंक मिटवणार आहे. (प्रकटी. १७:५, १६; १९:१, २) हा नाश पाहणाऱ्‍यांपैकी काही जण कदाचित आपल्यासोबत खऱ्‍या उपासनेत सामील होतील. मग शेवटी यहोवा हर्मगिदोनच्या युद्धात सैतानाच्या संपूर्ण व्यवस्थेचा नाश करेल. म्हणजे त्याचा विरोध करणाऱ्‍यांचा आणि त्याच्या नावावर कलंक लावणाऱ्‍यांचा तो नाश करेल. पण तो अशा लोकांना वाचवेल जे त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्या आज्ञा पाळतात आणि ज्यांना त्याचा महिमा करणं अभिमानाची गोष्ट वाटते. (मार्क ८:३८; २ थेस्सलनी. १:६-१०) मग ख्रिस्ताचं हजार वर्षांचं शासन संपेल तेव्हा होणाऱ्‍या शेवटच्या परीक्षेनंतर यहोवा त्याचं नाव पूर्णपणे पवित्र करेल. (प्रकटी. २०:७-१०) त्या वेळी, “जसा समुद्र पाण्याने भरला आहे, तशीच ही पृथ्वी यहोवाच्या गौरवाविषयीच्या ज्ञानाने भरून जाईल.”—हब. २:१४.

१६. तुम्ही काय करायचा निश्‍चय केला आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ लवकरच असा एक दिवस येईल जेव्हा सगळे यहोवाच्या नावाचा महिमा करतील. तो दिवस खरंच किती रोमांचक असेल! पण तो दिवस येईपर्यंत आपण मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन यहोवाच्या नावाचा महिमा करू या. याच महत्त्वाच्या विषयावर जोर देण्यासाठी, नियमन मंडळाने स्तोत्र ९६:८ हे वचन २०२५ चं वार्षिक वचन म्हणून निवडलंय. तिथे म्हटलंय: “यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा.”

शेवटी सगळे जण यहोवाच्या नावाचा महिमा करतील! (परिच्छेद १६ पाहा)

गीत १२ महान देव यहोवा

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b चित्राचं वर्णन: अँजलिनाच्या अनुभवाचं नाट्यरूपांतर.

c चित्राचं वर्णन: प्रिस्काच्या अनुभवाचं नाट्यरूपांतर.

d चित्राचं वर्णन: जॅकच्या अनुभवाचं नाट्यरूपांतर.