व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

गीत १०८ देवाचं एकनिष्ठ प्रेम

यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

“ख्रिस्त येशू पापी लोकांना वाचवायला जगात आला.”१ तीम. १:१५.

या लेखात:

खंडणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो आणि यहोवाने दिलेल्या या अनमोल भेटीबद्दल आपण कदर कशी व्यक्‍त करू शकतो ते पाहा.

१. आपण यहोवाला खूश कसं करू शकतो?

 कल्पना करा, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्‍तीला एक खूप सुंदर भेट दिली आहे आणि ती भेट तिच्या कामाचीही आहे. पण जर त्या व्यक्‍तीने ती भेट न वापरता अशीच कोपऱ्‍यात ठेवून दिली तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला नक्कीच खूप वाईट वाटेल. पण जर तिने त्या भेटीचा चांगला वापर केला आणि त्याबद्दल कदर व्यक्‍त केली, तर तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल. मग यातून आपण काय शिकू शकतो? यहोवाने आपल्यासाठी त्याच्या प्रिय मुलाला दिलं. या अनमोल भेटीबद्दल आणि ज्या प्रेमाने प्रवृत्त होऊन त्याने खंडणीची व्यवस्था केली त्याबद्दल आपण कदर व्यक्‍त केली तर त्याला नक्कीच आनंद होईल!—योहा. ३:१६; रोम. ५:७, ८.

२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

पण जसजसा वेळ जातो तसतसं खंडणीबद्दलची आपली कदर कमी होऊ शकते. जणू काय देवाने दिलेली ही भेट आपण कोपऱ्‍यात टाकून देतो. आपल्याकडे ती आहे म्हणून आपण आनंदी तर आहोत, पण कदाचित आपलं तिच्याकडे लक्षच नाही. असं होऊ नये म्हणून देवाने आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दलची कदर आपण सतत वाढवत राहिली पाहिजे. हा लेख आपल्याला तेच करायला मदत करेल. खंडणीमुळे आपल्याला आता आणि भविष्यात कसा फायदा होऊ शकतो यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. तसंच, यहोवाच्या प्रेमाबद्दल आपण आणखी कदर कशी वाढवू शकतो, खासकरून या स्मारकविधीच्या काळात, यावरसुद्धा आपण चर्चा करणार आहोत.

खंडणीमुळे आज काय फायदा होतो?

३. खंडणीमुळे आपल्याला आज कोणता फायदा होतो?

ख्रिस्ताच्या खंडणीमुळे आपल्याला आजसुद्धा फायदा होतो. उदाहरणार्थ, खंडणीच्या आधारावर यहोवा आपली पापं क्षमा करतो. आपल्याला क्षमा करायला तो बांधील नाही, पण तरीसुद्धा त्याला आपल्याला क्षमा करायची इच्छा आहे. याबद्दल कदर असल्यामुळे स्तोत्रकर्त्याने असं गायलं: “हे यहोवा, तू चांगला आणि क्षमाशील आहेस.”—स्तो. ८६:५; १०३:३, १०-१३.

४. यहोवाने खंडणी बलिदानाची व्यवस्था कोणासाठी केली? (लूक ५:३२; १ तीमथ्य १:१५)

काही लोकांना असं वाटू शकतं की ते यहोवाच्या क्षमेच्या लायक नाहीत. खरंतर आपल्यापैकी कोणीच यहोवाच्या क्षमेच्या लायक नाही. प्रेषित पौलला ही गोष्ट समजली होती म्हणून त्याने म्हटलं: “प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही.” पण तरीसुद्धा त्याने पुढे असं म्हटलं: “आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.” (१ करिंथ. १५:९, १०) जेव्हा आपण आपल्या पापांसाठी पश्‍चात्ताप करतो तेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करतो. का? आपण त्या लायक आहोत म्हणून? नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यहोवाच्या क्षमेच्या लायक नाही, तर काय? तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की यहोवाने खंडणी बलिदानाची व्यवस्था पाप न करणाऱ्‍या माणसांसाठी नाही, तर पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी माणसांसाठी केली आहे.—लूक ५:३२; १ तीमथ्य १:१५ वाचा.

५. आपल्याला यहोवाची क्षमा मिळवण्याचा हक्क आहे असं आपल्यापैकी कोणीच का म्हणू शकत नाही? समजावून सांगा.

ही गोष्ट खरी आहे की आपण विश्‍वासूपणे केलेल्या सेवेची यहोवा कदर करतो. (इब्री ६:१०) पण आपण बरीच वर्षं यहोवाची सेवा केली असली, तरी आपल्यापैकी कोणीच असा विचार करू नये की यहोवाची क्षमा मिळवण्याचा आपल्याला हक्क आहे. त्याने आपल्याला खंडणी बलिदानाची भेट आपल्या सेवेच्या मोबदल्यात नाही, तर मोफत दान म्हणून दिली आहे. जर आपण असा दावा केला, की आपल्या सेवेमुळे आपण स्वतःहून त्याची क्षमा मिळवली आहे, तर एका अर्थाने आपण असं म्हणत असू की ख्रिस्ताने उगीचंच आपला प्राण दिला.—गलतीकर २:२१ सोबत तुलना करा.

६. पौलने यहोवाच्या सेवेत इतकी मेहनत का केली?

पौलला माहीत होतं की त्याने यहोवाची कितीही सेवा केली तरी त्याच्या मोबदल्यात तो यहोवाची क्षमा कमावू शकत नाही. मग त्याने यहोवाच्या सेवेत इतकी मेहनत का केली? त्याने हे दाखवण्यासाठी यहोवाची सेवा केली नाही की तो त्याच्या क्षमेच्या लायक आहे. तर, यहोवाने त्याच्यावर जी अपार कृपा केली होती, त्या कृपेबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी त्याने यहोवाची सेवा केली. (इफिस. ३:७) पौलसारखं आपणसुद्धा यहोवाची आवेशाने सेवा करत राहतो. त्याची क्षमा मिळवण्यासाठी नाही, तर तिच्याबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी.

७. खंडणीमुळे आज आपल्याला आणखी कोणता फायदा होतो? (रोमकर ५:१; याकोब २:२३)

खंडणी बलिदानामुळे आज आपल्याला आणखी एक फायदा होतो. तो म्हणजे, आपण यहोवासोबत जवळचं नातं जोडू शकतो. a आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, जेव्हा आपला जन्म झाला होता तेव्हा देवासोबत आपलं नातं नव्हतं. पण खंडणीमुळे आपण “देवासोबत शांतीचा संबंध” जोडू शकतो. त्यामुळेच आपण त्याच्या जवळसुद्धा जाऊ शकतो.—रोमकर ५:१; याकोब २:२३ वाचा.

८. यहोवाने आपल्याला प्रार्थना करण्याचा बहुमान दिल्यामुळे आपण त्याचे आभार का मानले पाहिजेत?

यहोवासोबत जवळचं नातं असल्यामुळे आपल्याला एक खास बहुमान मिळालाय. तो म्हणजे, त्याला प्रार्थना करायचा. सगळ्यांसोबत केलेल्या प्रार्थना तर यहोवा ऐकतोच. पण आपल्यापैकी प्रत्येक जण जेव्हा एकट्यात त्याला प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थनासुद्धा तो ऐकतो. प्रार्थना केल्यामुळे आपलं मन शांत राहतं. पण प्रार्थना फक्‍त एका थेरपीसारखी नाही किंवा प्रार्थनेचा फक्‍त हाच एक फायदा नाही. प्रार्थनेमुळे यहोवासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होते. (स्तो. ६५:२; याको. ४:८; १ योहा. ५:१४) पृथ्वीवर असताना येशू नेहमी यहोवाला प्रार्थना करायचा. कारण त्याला माहीत होतं, की यहोवा त्याच्या प्रार्थना ऐकतोय आणि प्रार्थना केल्यामुळे त्याचं पित्यासोबतचं नातं आणखी मजबूत होईल. (लूक ५:१६) येशूच्या खंडणी बलिदानामुळे आपण यहोवाचे मित्र बनू शकतो आणि प्रार्थना करून थेट त्याच्यासोबत बोलूसुद्धा शकतो. खरंच, यासाठी आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

खंडणीमुळे भविष्यात कसा फायदा होणार आहे?

९. खंडणी बलिदानामुळे यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना भविष्यात कसा फायदा होणार आहे?

यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना खंडणी बलिदानामुळे भविष्यात कसा फायदा होणार आहे? त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार आहे. या पृथ्वीवर हजारो वर्षांपासून माणसांचा मृत्यू होतोय. त्यामुळे बऱ्‍याच लोकांना वाटतं की माणसांना सर्वकाळाचं जीवन मिळणं अशक्य आहे. पण यहोवाचा माणसांसाठी मूळ उद्देश हाच होता की त्यांनी कायम जगावं. जर आदामने पाप केलं नसतं तर सर्वकाळाचं जीवन अशक्य आहे असं कोणालाच वाटलं नसतं. आज जरी सर्वकाळाच्या जीवनाबद्दल कल्पना करणं आपल्याला कठीण वाटतं असलं, तरी आपण ही खातरी बाळगू शकतो की हे जीवन आपल्याला नक्की मिळू शकतं. कारण त्यासाठी यहोवाने सर्वात मोठी किंमत दिली आहे. ती म्हणजे, आपल्या एकुलत्या एका मुलाचं खंडणी बलिदान.—रोम. ८:३२.

१०. अभिषिक्‍त जनांना आणि दुसऱ्‍या मेंढरांना कोणत्या गोष्टीची उत्सुकता आहे?

१० आपल्याला सर्वकाळाचं जीवन जरी भविष्यात मिळणार असलं, तरी यहोवाची इच्छा आहे की आपण त्याबद्दल आज विचार करावा. अभिषिक्‍त जनांना ख्रिस्तासोबत स्वर्गातून राज्य करायची आशा आहे. या सुंदर जीवनाची ते आतुरतेने वाटत बघत आहेत. (प्रकटी. २०:६) दुसऱ्‍या मेंढरांना याच पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम जगायची आशा आहे. तिथे दुःख आणि त्रास अजिबात नसेल. (प्रकटी. २१:३, ४) तुम्हीसुद्धा दुसऱ्‍या मेंढरांपैकी एक आहात का? आणि याच पृथ्वीवर कायम जीवन जगायची तुम्ही उत्सुकतेने वाट बघताय का? पृथ्वीवरचं जीवन हे स्वर्गातल्या जीवनापेक्षा कमी दर्जाचं नक्कीच नाही. कारण माणसांना त्यासाठीच बनवण्यात आलं होतं. म्हणूनच भविष्यात या पृथ्वीवर कायमचं जीवन जगून आपण खूप आनंदी राहू!

११-१२. नंदनवनातल्या कोणत्या आशीर्वादांची आपण आतुरतेने वाट पाहतोय? (चित्रंसुद्धा पाहा.)

११ पृथ्वीवरच्या नंदनवनात तुमचं जीवन कसं असेल याची कल्पना करा. तुम्हाला आजारपणाची काळजी नसेल किंवा मृत्यूची भीती नसेल. (यश. २५:८; ३३:२४) यहोवा तुमच्या सगळ्या योग्य इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला नवीन जगात कशाबद्दल शिकायला आवडेल? प्राण्यांबद्दल? पक्ष्यांबद्दल? तुम्हाला एखादं वाद्य शिकायला आवडेल का? की चित्रं काढायला आवडतील? नंदनवनात आपल्याला अशा लोकांची गरज लागेल जे घरांची डिझाईन बनवू शकतील आणि घरं बांधू शकतील. तसंच, आपल्याला अशा लोकांचीसुद्धा गरज लागेल जे शेती करतील, जेवण बनवतील, वेगवेगळी अवजारं बनवतील, बागा लावतील आणि त्यांची निगा राखतील. (यश. ३५:१; ६५:२१) आपल्यापुढे न संपणारं जीवन असेल. त्यामुळे कोणतंही कौशल्य शिकायला आपल्याकडे भरपूर वेळ असेल.

१२ नवीन जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या प्रिय जनांचं स्वागत करताना आपल्याला खरंच खूप आनंद होईल! (प्रे. कार्यं २४:१५) सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टींचं निरीक्षण करून आपल्याला यहोवाबद्दल आणखी शिकून घेताना किती आनंद होईल याचीसुद्धा कल्पना करा. (स्तो. १०४:२४; यश. ११:९) आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, मनात कोणतीही दोषीपणाची भावना न ठेवता आपल्याला यहोवाची सेवा करता येईल. ‘पापाच्या क्षणिक सुखासाठी’ आपण हे सगळे आशीर्वाद गमावण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही! (इब्री ११:२५) आज आपल्याला कराव्या लागणाऱ्‍या कोणत्याही त्यागाच्या तुलनेत हे आशीर्वाद खूप मोठे आहेत. लक्षात असू द्या, एक असा दिवस येईल जेव्हा पृथ्वीवरचं नंदनवन फक्‍त भविष्यातली आशा नसेल, तर आपण तिथे प्रत्यक्ष असू. यहोवाने आपल्यावरच्या प्रेमापोटी खंडणी बलिदानाची भेट दिली नसती, तर यांपैकी कोणतीच गोष्ट शक्य झाली नसती.

नंदनवनातल्या कोणत्या आशीर्वादांची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय? (परिच्छेद ११-१२ पाहा)


यहोवाच्या प्रेमाची कदर करा

१३. यहोवाच्या प्रेमाबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो? (२ करिंथकर ६:१)

१३ यहोवाने केलेल्या खंडणी बलिदानाच्या तरतुदीसाठी आपण कदर कशी दाखवू शकतो? त्याच्या कामाला आपल्या जीवनात पहिली जागा देऊन. (मत्त. ६:३३) कारण येशू “सगळ्यांसाठी मेला ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही, तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावं.” (२ करिंथ. ५:१५) यहोवाने आपल्याला जी अपार कृपा दाखवली आहे तिचा मुख्य उद्देश आपण कधीच विसरू नये.२ करिंथकर ६:१ वाचा.

१४. यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१४ यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवूनसुद्धा आपण त्याच्या प्रेमाबद्दल कदर असल्याचं दाखवू शकतो. ते कसं? कधीकधी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात; जसं की, किती शिक्षण घ्यायचं किंवा कोणत्या प्रकारची नोकरी करायची. हे निर्णय घेताना त्यांबद्दल यहोवाला कसं वाटतं, यावर आपण विचार केला पाहिजे. (१ करिंथ. १०:३१; २ करिंथ. ५:७) जेव्हा आपण आपल्या विश्‍वासाप्रमाणे काम करतो, तेव्हा एक सुंदर गोष्ट घडते. ती म्हणजे आपला यहोवावरचा विश्‍वास मजबूत होतो आणि आपली त्याच्यासोबतची मैत्री आणखी घट्ट होते. तसंच, सर्वकाळाच्या जीवनाची आपली आशासुद्धा पक्की होते.—रोम. ५:३-५; याको. २:२१, २२.

१५. आपल्याला यहोवाच्या प्रेमाबद्दल कदर आहे हे आपण स्मारकविधीच्या काळात कसं दाखवू शकतो?

१५ आपण आणखी एका मार्गाने यहोवाच्या प्रेमाबद्दल कदर असल्याचं दाखवू शकतो. तो मार्ग म्हणजे स्मारकविधीच्या या काळात आपल्याला खंडणीबद्दल किती कदर आहे हे यहोवाला दाखवणं. आपण सगळेच स्मारकविधीला हजर राहणार आहोत. पण आपण इतरांनाही तिथे यायचं आमंत्रण देऊ शकतो. (१ तीम. २:४) ज्यांना आपण आमंत्रण देऊ त्यांना आपण हे समजावून सांगू, की त्या वेळी तिथे काय होईल. येशूला का मरावं लागलं? आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा हे व्हिडिओ दाखवून आपण त्यांना मदत करू शकतो. तसंच, अक्रियाशील लोकांना आमंत्रण द्यायची खातरी वडील करतील. विचार करा, यहोवाच्या हरवलेल्या मेंढरांपैकी काही मेंढरं जर परत आली, तर स्वर्गात आणि पृथ्वीवर किती आनंद साजरा केला जाईल! (लूक १५:४-७) स्मारकविधीच्या वेळी आपण एकमेकांचं स्वागत करतो. पण तिथे आलेल्या नवीन लोकांचं किंवा बऱ्‍याच काळानंतर आलेल्या लोकांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यापैकी कोणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे.—रोम. १२:१३.

१६. स्मारकविधीच्या काळात आपण आपली सेवा वाढवायचा विचार का केला पाहिजे?

१६ स्मारकविधीच्या काळात तुम्ही तुमची सेवा आणखी वाढवू शकता का? यहोवा आणि येशूने आपल्या सर्वांसाठी जे काही केलंय त्याबद्दल कदर दाखवायचा हा एक खूप चांगला मार्ग आहे. आपण यहोवाच्या सेवेत जितकं जास्त व्यस्त राहू, तितकं तो आपल्याला कशा प्रकारे मदत करतो हे आपल्याला जाणवेल. यामुळे त्याच्यावरचा आपला भरवसासुद्धा आणखी वाढेल. (१ करिंथ. ३:९) स्मारकविधीच्या काळात शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा किंवा सभेसाठी कार्यपुस्तिका यात दिलेल्या तक्त्याप्रमाणे तुम्ही नियमितपणे स्मारकविधीचं बायबल वाचन करू शकता. किंवा या बायबल वचनांमध्ये दिलेल्या घटनांवर तुम्ही वैयक्‍तिक अभ्याससुद्धा करू शकता.

१७. यहोवाला कशामुळे आनंद होतो? (“ यहोवाच्या प्रेमाबद्दल कदर दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग” ही चौकटसुद्धा पाहा.)

१७ कदाचित आपल्या परिस्थितीमुळे या लेखात दिलेल्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला शक्य होणार नाही. पण लक्षात असू द्या की यहोवा कधीच आपली तुलना इतरांशी करत नाही. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपण त्याच्यासाठी जे करतो त्याची त्याला कदर आहे. त्याने खंडणीची तरतूद करून आपल्याला एक अनमोल भेट दिली आहे. त्यासाठी आपल्याला किती कदर आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो!—१ शमु. १६:७; मार्क १२:४१-४४.

१८. आपण यहोवा देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे आभार का मानले पाहिजेत?

१८ खंडणी बलिदानामुळेच आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते, यहोवासोबत मैत्री करता येते आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे त्याने आपल्याला हे सगळे आशीर्वाद दिलेत. म्हणून आपण नेहमी त्याबद्दल कदर व्यक्‍त करत राहू या. (१ योहा. ४:१९) येशूनेसुद्धा आपल्यावर प्रेम असल्यामुळे पृथ्वीवर येऊन त्याच्या जीवनाचं बलिदान दिलं. म्हणून त्याने जे केलं, त्याबद्दलसुद्धा आपण नेहमी कदर व्यक्‍त करत राहू या.—योहा. १५:१३.

गीत १५४ अनंत प्रेम

a येशूने खंडणी बलिदान देण्याच्या आधीच्या काळात यहोवा देवाने त्याच्या उपासकांची पापं माफ केली. कारण त्याला या गोष्टीची खातरी होती, की त्याचा मुलगा शेवटच्या श्‍वासापर्यंत विश्‍वासू राहील. त्यामुळे देवाच्या नजरेत खंडणी आधीच दिल्यासारखी होती.—रोम. ३:२५.