व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३

गीत ३५ जाणू कशाचं मोल मोठं!

यहोवाला आवडतील असे निर्णय घ्या

यहोवाला आवडतील असे निर्णय घ्या

“यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे, आणि परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्‍ती आहे.”नीति. ९:१०.

या लेखात:

आपण आपल्या ज्ञानाचा, समजशक्‍तीचा आणि समंजसपणाचा वापर करून चांगले निर्णय कसे घेऊ शकतो ते पाहा.

१. आपल्या सगळ्यांना कोणती कठीण गोष्ट करावी लागते?

 आपल्याला दररोज काही न काही निर्णय घ्यावे लागतात. त्यांपैकी काही निर्णय खूप सोपे असतात. जसं की, नाष्ट्याला काय बनवायचं किंवा किती वाजता झोपायचं. पण काही निर्णय घ्यायला खूप कठीण जातं. कारण त्यांचा परिणाम आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर, आपण सगळे आनंदी राहू की नाही यावर किंवा आपल्या उपासनेवर होऊ शकतो. आपली इच्छा असते की आपल्या निर्णयांमुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला फायदा व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण घेतलेल्या निर्णयांमुळे यहोवाला आनंद व्हावा असं आपल्याला वाटतं.—रोम. १२:१, २.

२. चांगले निर्णय घ्यायला आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत?

जर आपण (१) माहिती गोळा केली, (२) त्या गोष्टीबद्दल यहोवाला कसं वाटतं यावर विचार केला आणि (३) आपल्यासमोर असलेल्या पर्यायांची तुलना करून पाहिली, तर आपल्याला बऱ्‍याचदा चांगले निर्णय घेता येतील. या लेखात याच तीन गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली आहे. तसंच, आपल्याला आपला समंजसपणा वाढवायला कशामुळे मदत होईल यावरही चर्चा करण्यात आली आहे.—नीति. २:११.

माहिती गोळा करा

३. निर्णय घेण्याआधी माहिती गोळा करणं का महत्त्वाचं आहे हे समजवण्यासाठी एक उदाहरण द्या.

चांगले निर्णय घेण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे माहिती गोळा करणं. हे का गरजेचं आहे? कल्पना करा, एका रुग्णाला गंभीर आजार झाल्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आहे. मग डॉक्टर त्याला तपासल्याशिवाय किंवा त्याला प्रश्‍न विचारल्याशिवाय त्याने कोणता उपचार घेतला पाहिजे हे लगेच सांगेल का? नक्कीच नाही. आपल्यालाही जर चांगले निर्णय घ्यायचे असतील, तर आपण सगळ्यात आधी आपल्या परिस्थितीशी संबंधित माहितीवर विचार केला पाहिजे. आपण ते कसं करू शकतो?

४. नीतिवचनं १८:१३ प्रमाणे माहिती गोळा करायला तुम्ही काय करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

सहसा माहिती गोळा करण्यासाठी आपण प्रश्‍न विचारू शकतो. समजा तुम्हाला एका पार्टीचं आमंत्रण मिळालंय. मग तुम्ही तिथे गेलं पाहिजे का? ज्याने तुम्हाला पार्टीला बोलवलंय त्याला तुम्ही ओळखत नसाल किंवा त्याने पार्टीची काय व्यवस्था केली आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याला असे प्रश्‍न विचारू शकता: “पार्टी कुठे आणि कधी असणार आहे? पार्टीत किती लोक येणार आहेत? तिथे देखरेख करण्यासाठी कोण आहे? पार्टीत कोण-कोण येणार आहे? तिथे काय-काय होणार आहे? पार्टीत दारू दिली जाईल का?” या प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला मदत होईल.—नीतिवचनं १८:१३ वाचा.

प्रश्‍न विचारून माहिती गोळा करा (परिच्छेद ४ पाहा) a


५. माहिती मिळाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे?

सगळी माहिती गोळा केल्यानंतर, आता संपूर्ण परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार करा. उदाहरणार्थ, जर तुमच्या लक्षात आलं की त्या पार्टीत असे लोक येणार आहेत, ज्यांना बायबलच्या तत्त्वांशी काहीच घेणंदेणं नाही किंवा तिथे कोणाच्याही देखरेखीशिवाय दारू दिली जाणार आहे, तर तुम्ही काय कराल? त्या पार्टीचं रूपांतर एखाद्या बेधुंद पार्टीत होण्याची शक्यता आहे का? (१ पेत्र ४:३) या प्रश्‍नांसोबतच तुम्ही स्वतःला हा प्रश्‍नसुद्धा विचारला पाहिजे: या पार्टीमुळे माझी सभेची किंवा प्रचाराची वेळ चुकेल का? या सगळ्या माहितीचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला सोपं जाईल. पण तुम्ही आणखीन एक पाऊल उचललं पाहिजे. कोणतं? तुम्हाला या परिस्थितीबद्दल कसं वाटतं हे तर तुम्हाला माहीत आहे, पण यहोवाला त्याबद्दल कसं वाटतं याचाही विचार करा.—नीति. २:६.

यहोवाला काय वाटतं याचा विचार करा

६. याकोब १:५ प्रमाणे आपण यहोवाला मदतीसाठी प्रार्थना का केली पाहिजे?

एखाद्या गोष्टीच्या बाबतीत यहोवा कसा विचार करतो हे समजून घ्यायला त्याच्याकडे मदत मागा. कारण अमुक एक निर्णय त्याला आवडतो की नाही हे समजून घ्यायला तो आपल्याला बुद्धी देईल असं त्याने वचन दिलंय. तो “कोणालाही कमी न लेखता सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.”—याकोब १:५ वाचा.

७. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत यहोवा काय विचार करतो हे तुम्ही कसं समजून घेऊ शकता? उदाहरण द्या.

मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केल्यानंतर तो काय उत्तर देतो याकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, तुम्ही प्रवासात वाट चुकला, तर तुम्ही तिथल्या एखाद्या माणसाकडे मदत मागाल. पण तो उत्तर देण्याआधीच तुम्ही तिथून निघून जाल का? नक्कीच नाही. तुम्ही त्याचं लक्ष देऊन ऐकाल. त्याच प्रकारे यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना केल्यानंतर, त्याचं उत्तर काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे तुम्ही कसं करू शकता? आपल्या परिस्थितीला कोणती बायबल तत्त्वं आणि नियम लागू होतात हे शोधून. उदाहरणार्थ, आधी सांगितलेल्या पार्टीला जायचं की नाही हे ठरवताना त्याबद्दल बायबल काय म्हणतं हे तुम्ही तपासून पाहू शकता; जसं की, बेधुंद पार्ट्यांबद्दल, वाईट संगतीबद्दल आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा राज्याला पहिली जागा देण्याबद्दल.—मत्त. ६:३३; रोम. १३:१३; १ करिंथ. १५:३३.

८. तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही काय करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)

कधीकधी हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला मदतीची गरज पडू शकते. यासाठी तुम्ही एखाद्या अनुभवी भावाची किंवा बहिणीची मदत घेऊ शकता. पण स्वतः संशोधन केल्यामुळेसुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक आणि ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं यांसारख्या साहित्यांमध्ये माहितीचा खजिना आहे. त्यात तुम्हाला हवी ती माहिती मिळू शकते. तर मग आपलं ध्येय लक्षात ठेवा. ते म्हणजे यहोवाला आवडेल असा निर्णय घेणं.

यहोवाला एखाद्या गोष्टीबद्दल कसं वाटतं याचा विचार करा (परिच्छेद ८ पाहा) b


९. आपल्या निर्णयांमुळे यहोवाला आनंद होईल याची खातरी आपण कशी करू शकतो? (इफिसकर ५:१७)

आपल्या निर्णयांमुळे यहोवाला आनंद होईल याची खातरी आपण कशी करू शकतो? सगळ्यात आधी आपण त्याला चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. बायबल म्हणतं: “परमपवित्र देवाचं ज्ञान हीच समजशक्‍ती आहे.” (नीति. ९:१०) हो, यहोवाच्या गुणांबद्दल, त्याच्या उद्देशाबद्दल आणि त्याला काय आवडतं किंवा त्याला कोणत्या गोष्टींचा द्वेष आहे याबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्याला समजशक्‍ती मिळू शकते. त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी यहोवाला जितकं ओळखतो त्यावरून काय म्हणता येईल? माझ्या या निर्णयामुळे त्याला आनंद होईल का?’—इफिसकर ५:१७ वाचा.

१०. कुटुंबातल्या परंपरेपेक्षा किंवा आपल्या संस्कृतीपेक्षा बायबलची तत्त्वं महत्त्वाची का आहेत?

१० यहोवाला खूश केल्यामुळे कधीकधी आपले जवळचे लोक नाराज होऊ शकतात. उदाहरणार्थ, सगळ्याच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचं भलं व्हावं. यासाठी काही आईवडील आपल्या मुलीवर एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न करायचा दबाव टाकतील; मग तो आध्यात्मिक रित्या मजबूत नसला तरीही. हे खरंय की त्यांची इच्छा असते की आपल्या मुलीला काहीच कमी पडू नये. पण मग तिला आध्यात्मिक प्रगती करायला कोण मदत करेल? या गोष्टीबद्दल यहोवाला काय वाटतं? याचं उत्तर आपल्याला मत्तय ६:३३ मध्ये मिळतं. तिथे सगळ्याच ख्रिश्‍चनांना सांगितलंय की त्यांनी “आधी देवाचं राज्य . . . मिळवण्याचा प्रयत्न करत” राहावं. हे खरंय की आपण आपल्या आईवडिलांचा आणि नातेवाइकांचा आदर करतो, पण यहोवाला खूश करणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे.

तुमच्यासमोर असलेल्या पर्यायांची तुलना करा

११. फिलिप्पैकर १:९, १० मध्ये सांगितलेल्या कोणत्या गुणामुळे तुमच्यासमोर असलेल्या पर्यायांची तुलना करायला मदत होईल?

११ तुम्हाला निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्‍या बायबल तत्त्वांवर विचार केल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करा. (फिलिप्पैकर १:९, १० वाचा.) तुम्ही जितक्या समंजसपणे विचार कराल, तितकं प्रत्येक पर्यायाचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घ्यायला तुम्हाला मदत होईल. कधीकधी तुम्हाला सहज निर्णय घेता येतील, पण सगळेच निर्णय इतके सोपे नसतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, फिलिप्पैकर १:९, १० मध्ये सांगितल्याप्रमाणे आपली “पूर्ण समज” वापरल्यामुळे तुम्हाला चांगले निर्णय घ्यायला मदत होईल.

१२-१३. नोकरी शोधण्याच्या बाबतीत समंजसपणामुळे तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला कशी मदत होऊ शकते?

१२ या परिस्थितीचा विचार करा: तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही एक नोकरी शोधत आहात. तुमच्यासमोर दोन नोकऱ्‍या आहेत. तुम्ही सर्व माहिती गोळा करता. जसं की, काम कशा प्रकारचं आहे? ते किती वेळ असेल? यायला-जायला किती वेळ लागेल? या दोन्ही नोकऱ्‍या बायबल तत्त्वांप्रमाणे योग्य आहेत. त्यातल्या एका नोकरीतलं काम तुम्हाला आवडतं किंवा मग त्या नोकरीत पगार जास्त आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ती नोकरी करावीशी वाटेल. पण कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्ही इतरही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

१३ यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता: ‘या नोकरीमुळे मला सभांना जाणं अवघड होईल का? किंवा मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला, खूश ठेवायला आणि यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत करायला जो वेळ देतो त्या वेळेच्या आड ही नोकरी येईल का?’ असे प्रश्‍न विचारल्यामुळे तुम्हाला पैशांपेक्षा “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींना पहिली जागा द्यायला मदत होईल. त्या गोष्टी म्हणजे तुमची उपासना आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा. या गोष्टींवर विचार केल्यामुळे तुम्हाला एक चांगला निर्णय घेता येईल आणि त्यावर यहोवाचा आशीर्वाद असेल.

१४. इतरांना अडखळण होईल असं वागणं टाळण्यासाठी आपल्याला समंजसपणामुळे आणि प्रेमामुळे कशी मदत होईल?

१४ आपल्या निर्णयाचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचार करायलाही, समंजसपणामुळे आपल्याला मदत होईल. असं केल्यामुळे आपण “इतरांसाठी अडखळण ठरणार नाही.” (फिलिप्पै. १:१०) कपडे आणि तयार होणं यांसारख्या वैयक्‍तिक गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, कपड्यांची किंवा तयार होण्याची एखादी विशिष्ट पद्धत आपल्याला आवडत असेल. पण मंडळीतले भाऊबहीण किंवा बाहेरचे लोक त्यामुळे अडखळत असतील तर काय? समंजसपणामुळे आपल्याला त्यांच्या भावनांचा आदर करायला मदत होईल. त्यासोबतच प्रेमामुळे आपण ‘दुसऱ्‍यांच्या फायद्याचा’ विचार करू आणि शालीनतेने पेहराव करू. (१ करिंथ. १०:२३, २४, ३२; १ तीम. २:९, १०) या सगळ्या गोष्टींमुळे, इतरांबद्दलचं आपलं प्रेम आणि आदर दिसून येईल असे निर्णय आपल्याला घेता येतील.

१५. एखादा मोठा निर्णय अंमलात आणण्याआधी आपण काय केलं पाहिजे?

१५ जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो अमलात आणण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करा. येशूने शिकवलं होतं, की ‘खर्चाचा हिशोब लावा.’ (लूक १४:२८) त्यामुळे तो निर्णय यशस्वी होण्यासाठी तुम्हाला किती वेळ, मेहनत आणि साधनं लागतील याचा विचार करा. काही बाबतीत तुमच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी कुटुंबातल्या सदस्यांना काय करता येईल, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. असं करणं फायद्याचं का आहे? कारण त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कदाचित तुमच्या निर्णयामध्ये बदल करायची गरज आहे, किंवा दुसरा एखादा पर्याय जास्त व्यावहारिक आहे. तसंच, जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना यात सामील कराल आणि त्यांचं ऐकून घ्याल, तेव्हा तुमच्या निर्णयाला साथ द्यायला ते मनापासून तयार होतील.—नीति. १५:२२.

असा निर्णय घ्या जो यशस्वी होईल

१६. कोणती पावलं उचलल्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी होईल? (“ चांगले निर्णय कसे घ्याल?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१६ जर तुम्ही या लेखात दिलेली पावलं उचलली असतील, तर तुम्हाला एक चांगला निर्णय घेता येईल. कारण यहोवाला आवडेल असा निर्णय घेण्यासाठी तुम्ही सगळी माहिती गोळा केली आहे आणि बायबल तत्त्वांवर विचार केला आहे. आता तुमचा निर्णय यशस्वी व्हावा म्हणून तुम्ही यहोवाकडे मदत मागू शकता.

१७. चांगले निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे?

१७ तुम्ही याआधी बरेच निर्णय घेतले असतील आणि ते यशस्वीही झाले असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगले निर्णय घेण्यासाठी आपण आपल्या बुद्धीवर किंवा अनुभवावर अवलंबून न राहता यहोवाच्या बुद्धीवर अवलंबून राहिलं पाहिजे. तोच तुम्हाला खरं ज्ञान, समजशक्‍ती आणि समंजसपणा देऊ शकतो. आणि याच तीन गोष्टी बुद्धीचे खांब आहेत! (नीति. २:१-५) हो, यहोवाच्या मदतीनेच तुम्ही त्याला आवडतील असे निर्णय घेऊ शकता.—स्तो. २३:२, ३.

गीत २८ यहोवा तुझे मित्र कोण?

a चित्राचं वर्णन: तरुण भाऊबहीण त्यांना फोनवर मिळालेल्या पार्टीच्या आमंत्रणाबद्दल बोलत आहेत.

b चित्राचं वर्णन: त्यांपैकी एक भाऊ पार्टीला जायचं की नाही हे ठरवण्याआधी संशोधन करतोय.