व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

यहेज्केलच्या ३७ व्या अध्यायात सांगण्यात आलं आहे की दोन “ढलपा” म्हणजेच दोन काठ्या एक होतील. याचा काय अर्थ होतो?

यहेज्केल संदेष्ट्याद्वारे यहोवाने सांगितलं, की त्याचे लोक वचन दिलेल्या देशात परततील आणि त्यांचं पुन्हा एक राष्ट्र बनेल. त्या भविष्यवाणीत असंही सांगितलं होतं, की शेवटल्या दिवसांत यहोवाचे उपासक एकतेनं त्याची उपासना करतील.

यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला या दोन काठ्यांवर लिहिण्यासाठी सांगितलं. त्याने एका काठीवर “यहूदा व त्याचे सोबती इस्राएल वंशज,” तर दुसऱ्या काठीवर “योसेफाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्राएल घराणे यांचा ढलपा,” असं लिहायचं होतं. नंतर या दोन्ही काठ्या “एकजीव” किंवा एक होणार होत्या.—यहे. ३७:१५-१७.

इथं “एफ्राईम” या शब्दाचा काय अर्थ होतो? इस्राएलच्या उत्तरेकडील दहा वंशाच्या राज्यामध्ये एफ्राईम हा इतर वंशांपेक्षा जास्त प्रबळ होता. खरंतर, या राज्यावर राज्य करणारा पहिला राजा यराबाम हा एफ्राईम वंशातलाच होता. (अनु. ३३:१३, १७; १ राजे ११:२६) हा वंश योसेफाचा मुलगा एफ्राईम याचा वंश होता. (गण. १:३२, ३३) योसेफाला त्याच्या वडिलांकडून, याकोबाकडून एक खास आशीर्वाद मिळाला होता. त्यामुळे ‘एफ्राईमची काठी’ ही उत्तरेच्या दहा वंशाच्या राज्याला सूचित करते, हे योग्यच होतं. यहेज्केलने भविष्यवाणी करण्याच्या बऱ्याच काळाआधी इ.स.पू. ७४० मध्ये अश्शूरी सैन्याने इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यावर कब्जा करून तिथल्या इस्राएली लोकांना बंदी बनवून नेलं होतं. (२ राजे १७:६) याच्या अनेक वर्षांनंतर, बाबेलच्या लोकांनी अश्शूरी लोकांवर विजय मिळवला. म्हणून जेव्हा यहेज्केलने या दोन काठ्यांविषयीची भविष्यवाणी केली तेव्हा इस्राएली लोक बाबेलच्या साम्राज्यात सर्वत्र पसरलेले होते.

इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलनं यहूदाच्या दक्षिणेकडील दोन-वंशीय राज्यावर कब्जा केला आणि तिथल्या लोकांना ते बाबेलमध्ये घेऊन गेले. तसंच, इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यात उरलेल्या लोकांनादेखील त्यांनी कदाचित सोबत नेलं असावं. दक्षिणेकडील राज्याचे राजे यहूदाच्या वंशातले होते. मंदिर यरुशलेममध्ये असल्यामुळे याजकही यहूदा राज्यातच राहायचे. (२ इति. ११:१३, १४; ३४:३०) त्यामुळे, ‘यहूदासाठी असलेली काठी’ ही दक्षिणेकडील दोन-वंशीय राज्याला सूचित करते.

या दोन काठ्या “एकजीव” किंवा एक कधी झाल्या? इ.स.पू. ५३७ मध्ये जेव्हा दक्षिण आणि उत्तरेकडील राज्याचे लोक बंदिवासातून परत आले आणि त्यांनी यरुशलेमच्या मंदिराची पुनर्बांधणी सुरू केली, तेव्हा हे घडलं. इस्राएल राष्ट्र आता पुन्हा एक झालं होतं आणि सर्व इस्राएली एकत्र मिळून यहोवाची उपासना करू लागले. (यहे. ३७:२१, २२) त्यांच्यातील या एकतेबद्दल यशया आणि यिर्मया संदेष्ट्यांनीही आधीच भाकीत केलं होतं.—यश. ११:१२, १३; यिर्म. ३१:१, ६, ३१.

यहेज्केलने त्याच्या भविष्यवाणीत शुद्ध उपासनेबद्दल काय सांगितलं होतं? त्याने म्हटलं होतं की, यहोवा त्याच्या सर्व उपासकांना एकत्र किंवा “एकजीव” करेल. (यहे. ३७:१८, १९) आपल्या काळात हे अभिवचन पूर्ण झालं आहे का? हो नक्कीच. १९१९ साली ही भविष्यवाणी पूर्ण व्हायला सुरवात झाली. याच्या आधी सैतानाने देवाच्या लोकांमध्ये फूट पाडून त्यांना कायमस्वरूपी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. पण, १९१९ सालापासून त्यांना हळूहळू संघटित व एकत्रित करण्यात आलं.

त्या वेळी देवाच्या बहुतेक उपासकांना येशूसोबत स्वर्गात राजे आणि याजक म्हणून राज्य करण्याची आशा होती. (प्रकटी. २०:६) ते जणू यहूदासाठी असलेल्या काठीप्रमाणे होते. तसंच, त्या वेळी पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या लोकांची संख्या फार कमी होती. पण, जसजसा काळ सरत गेला तसतशी त्यांच्या संख्येत वाढ होत गेली. (जख. ८:२३) हे लोक जणू योसेफासाठी असलेल्या काठीप्रमाणे होते.

आज हे दोन्ही गट एकत्र मिळून यहोवाची सेवा करत आहेत. आणि त्यांचा एकच राजा आहे, अर्थात येशू ख्रिस्त. यहेज्केलच्या भविष्यवाणीमध्ये येशूला “माझा सेवक दावीद” असं म्हणण्यात आलं आहे. (यहे. ३७:२४, २५) येशूने आपल्या अनुयायांसाठी त्याच्या पित्याजवळ अशी प्रार्थना केली: “त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे.” * (योहा. १७:२०, २१) येशूने अशीही भविष्यवाणी केली होती की अभिषिक्तांनी बनलेला लहान कळप ‘दुसऱ्या मेंढरांसोबत’ मिळून “एक कळप” होईल. आणि त्या सर्वांचा “एक मेंढपाळ” असेल. (योहा. १०:१६) येशूने सांगितल्याप्रमाणे देवाचे सर्व उपासक आज संघटित आहेत. मग, त्यांची आशा स्वर्गात जाण्याची असो किंवा पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची.

^ परि. 5 येशू जेव्हा शेवटल्या दिवसांतील चिन्हांबद्दल सांगत होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना अनेक दाखले दिले. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की त्याने सर्वात आधी ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचा’ उल्लेख केला. अभिषिक्त बांधवांनी बनलेला हा लहान गट देवाच्या लोकांचं नेतृत्व करणार होता. (मत्त. २४:४५-४७) त्यानंतर त्याने सर्व अभिषिक्त जनांना सूचित करणारे काही दाखले दिले. (मत्त. २५:१-३०) शेवटी, जे ख्रिस्ताच्या बांधवांना साहाय्य करतील आणि ज्यांना या पृथ्वीवर राहण्याची आशा असेल त्यांच्याबद्दल तो बोलला. (मत्त. २५:३१-४६) त्याच प्रकारे, जेव्हा यहेज्केलची भविष्यवाणी आपल्या काळात पूर्ण होऊ लागली तेव्हा ती सर्वात आधी स्वर्गात जगण्याची आशा असलेल्यांच्या बाबतीत लागू झाली. हे खरं आहे की इस्राएलचं दहा-वंशीय राज्य पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांना सूचित करत नाही. पण, या भविष्यवाणीत उल्लेखण्यात आलेली एकता आपल्याला अभिषिक्तांमध्ये आणि इतर मेंढरांमध्ये असलेल्या एकतेची आठवण करून देते.