व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?

तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?

“तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.

गीत क्रमांक: ४, ५१

१. आपल्या सर्वांमध्ये कोणती स्वाभाविक इच्छा असते?

तुम्हाला ओळखत असलेली, तुमचा आदर करत असलेली व्यक्‍ती तुमचं नाव विसरली किंवा तुम्हाला ओळखतच नाही असं जर तिने म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? असं घडलं तर तुम्ही नक्कीच निराश व्हाल. कारण आपल्याला इतरांनी ओळखावं, स्वीकारावं अशी प्रत्येकातच एक स्वाभाविक इच्छा असते. लोकांना आपली फक्‍त तोंडओळख असावी अशी आपली इच्छा नसते तर आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत, आपण कायकाय साध्य केलं आहे हेदेखील त्यांना माहीत असावं असं आपल्याला वाटतं.—गण. ११:१६; ईयो. ३१:६.

२, ३. इतरांकडून स्वीकृती मिळवण्याची आपली इच्छा चुकीचं रूप कसं धारण करू शकते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पण जर आपण सावध नसलो तर आपल्यात असलेली स्वाभाविक इच्छा चुकीचं रूप धारण करू शकते. सैतानाचं जग आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांनी आपल्याला महत्त्वपूर्ण समजावं अशी इच्छा उत्पन्‍न करण्यासाठी प्रवृत्त करू शकतं. आपल्यावर जर याचा प्रभाव झाला तर आपण आपल्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला त्याच्या हक्काची उपासना आणि महिमा देणार नाही.—प्रकटी. ४:११.

येशूच्या दिवसांत काही धार्मिक नेत्यांचा स्वीकृती मिळवण्याबद्दल चुकीचा दृष्टिकोन होता. येशूने त्याच्या शिष्यांना इशारा दिला: “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणं, बाजारांत लोकांकडून नमस्कार घेणं, आणि सभास्थानांत सर्वात चांगल्या आसनांवर व मेजवान्यांत सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.” पुढे त्याने असंही म्हटलं, की “त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.” (लूक २०:४६, ४७, तळटीप) याउलट, दोन छोटीशी नाणी दानपेटीत टाकणाऱ्‍या एका गरीब विधवेची येशूने प्रशंसा केली. त्या विधवेकडे कदाचित कोणाचं लक्ष गेलं नसेल पण येशूचं लक्ष मात्र तिच्याकडे गेलं. (लूक २१:१-४) यावरून स्पष्टच आहे, की स्वीकृती मिळवण्याबद्दल येशूचा दृष्टिकोन इतरांपेक्षा फार वेगळा होता. हा लेख आपल्याला याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन बाळगायला मदत करेल.

सर्वोत्तम स्वीकृती

४. सर्वोत्तम स्वीकृती काय आहे आणि का?

सर्वोत्तम स्वीकृती म्हणजे काय? बरेच लोक उच्च शिक्षणात, व्यवसायात, कला व खेळाच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाटतं की यामुळे लोक त्यांना ओळखतील. पण खरंतर ही सर्वोत्तम स्वीकृती नाही. याबद्दल पौलने म्हटलं: “आता मात्र तुम्हाला देवाची ओळख झाली आहे; खरेतर, देवानेच तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग, तुम्ही पुन्हा पूर्वीच्या त्या निरर्थक आणि तुच्छ अशा प्राथमिक गोष्टींकडे वळून त्यांचे दास का होऊ पाहता?” (गलती. ४:९) संपूर्ण विश्‍वाचा शासक आपल्याला ओळखतो हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे! आपण कोण आहोत हे यहोवा जाणतो व त्याचं आपल्यावर प्रेम आहे. आपण त्याच्याशी मैत्री करावी अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणून त्याने आपली रचनाही तशाच प्रकारे केली आहे.—उप. १२:१३, १४.

५. देवाने आपल्याला वैयक्‍तिक रीत्या ओळखावं यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे?

मोशे यहोवाचा मित्र होता हे आपल्याला माहीत आहे. “तुझे मार्ग मला दाखव” अशी विनंती जेव्हा मोशेने यहोवाला केली, तेव्हा त्याने उत्तर दिलं: “जे तू सांगितले आहे तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्‍तिशः नावाने ओळखत आहे.” (निर्ग. ३३:१२-१७) यहोवा आपल्याला वैयक्‍तिक रीत्या ओळखू शकतो. पण त्याचा मित्र बनण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपलं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे आणि आपण आपलं जीवन त्याला समर्पित केलं पाहिजे.—१ करिंथकर ८:३ वाचा.

६, ७. यहोवासोबतची मैत्री आपण कशामुळे गमावू शकतो?

पण आपल्या स्वर्गीय पित्यासोबत असलेली मौल्यवान मैत्री आपण टिकवून ठेवली पाहिजे. गलतीया इथल्या सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांसारखं आपण जगातल्या “निरर्थक आणि तुच्छ अशा प्राथमिक” गोष्टींचे दास बनू नये. यात जग देत असलेली प्रसिद्धी आणि यशदेखील समाविष्ट आहे. (गलती. ४:९) गलतीयामधल्या त्या ख्रिश्‍चनांनी देवाला जाणलं होतं आणि देवही त्यांना ओळखत होता. पण आता हेच बांधव “पुन्हा पूर्वीच्या” निरर्थक गोष्टींकडे वळत होते असं पौलने म्हटलं. सोप्या शब्दांत सांगायचं तर तो त्यांना विचारत होता: ‘तुम्ही त्या निरर्थक आणि व्यर्थ गोष्टींच्या मागे जाऊन त्याचे पुन्हा दास का बनला आहात?’

आपल्याबाबतीतही असं घडू शकतं का? हो घडू शकतं. आपण जेव्हा सत्य स्वीकारलं तेव्हा पौलप्रमाणे कदाचित आपणही सैतानाच्या जगात मिळालेल्या प्रसिद्धीचा व यशाचा त्याग केला असेल. (फिलिप्पैकर ३:७, ८ वाचा.) कदाचित आपण उच्च शिक्षण, चांगली नोकरी किंवा भरपूर पैसा कमवण्याची संधी सोडून दिली असेल. किंवा संगीत व खेळाच्या क्षेत्रात निपुण असल्यामुळे आपण भरपूर पैसा, मोठं नाव मिळवू शकलो असतो पण आपण या सर्व संधी नाकारल्या. (इब्री ११:२४-२७) आपण घेतलेल्या चांगल्या निर्णयांबद्दल पस्तावा करणं सुज्ञपणाचं ठरणार नाही. तसंच, ‘नाकारलेल्या सर्व गोष्टी मिळवल्या असत्या तर आज मी किती सुखी असतो’ असा विचार करणंही चुकीचं ठरेल. अशी मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपण एकेकाळी जगातल्या ज्या गोष्टींना “निरर्थक आणि तुच्छ” ठरवलं होतं त्यांच्याकडे परत जाण्याची आपली इच्छा होईल.

यहोवाची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दृढ करा

८. यहोवाची स्वीकृती मिळवण्याची आपली इच्छा कशामुळे दृढ होऊ शकते?

जगाची नाही तर यहोवाची स्वीकृती मिळवण्याची इच्छा आपण कशी दृढ करू शकतो? आपण दोन महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. पहिली, यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍याला तो नेहमी स्वीकृती देतो. (इब्री लोकांना ६:१० वाचा; ११:६) यहोवा आपल्या प्रत्येक सेवकाला मौल्यवान समजतो आणि त्याच्या नजरेत त्यांपैकी एकाकडेही दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्यावर ‘अन्याय’ करण्यासारखं आहे. “जे आपले आहेत” त्यांना यहोवा नेहमी ओळखतो. (२ तीम. २:१९) त्याला “नीतिमानांचा मार्ग” माहीत आहे आणि त्यांची कशी सुटका करायची हेही तो जाणतो.—स्तो. १:६; २ पेत्र २:९.

९. यहोवाने आपल्या लोकांना स्वीकृती कशी दिली याची काही उदाहरणं द्या.

यहोवाने अनेकदा आपल्या लोकांना खूप विशेष पद्धतींनी स्वीकृती दिली आहे. (२ इति. २०:२०, २९) उदाहरणार्थ, फारोच्या शक्‍तिशाली सैन्याने पाठलाग केला असताना, लाल समुद्राजवळ यहोवाने आश्‍चर्यकारक रीतीने आपल्या लोकांची कशी सुटका केली याचा जरा विचार करा. (निर्ग. १४:२१-३०; स्तो. १०६:९-११) ही घटना इतकी अद्‌भुत होती, की ती घडल्याच्या ४० वर्षांनंतरही लोक त्याचा उल्लेख करत होते. (यहो. २:९-११) यहोवाने गतकाळात आपल्या लोकांप्रती असलेलं प्रेम कसं दाखवलं आणि त्यांना सोडवण्यासाठी आपल्या शक्‍तीचा वापर कसा केला या गोष्टींची आठवण केल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल, कारण लवकरच मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करणार आहे. (यहे. ३८:८-१२) त्या वेळी, आपल्याला याचा खूप आनंद होईल की आपण जगाची नाही तर यहोवाची स्वीकृती मिळवण्याचा प्रयत्न केला.

१०. आणखीन कोणत्या गोष्टीवर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे?

१० दुसरी गोष्ट म्हणजे, आपण अपेक्षा केली नव्हती अशा मार्गाने यहोवा कदाचित आपल्याला स्वीकृती देईल यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इतरांकडून प्रशंसा मिळण्यासाठी जर लोक चांगली कामं करत असतील तर यहोवा त्यांना प्रतिफळ देणार नाही. कारण येशूने म्हटलं, की प्रशंसा मिळणं हेच त्यांचं प्रतिफळ आहे. (मत्तय ६:१-५ वाचा.) दुसरीकडे पाहता, यहोवा ‘गुप्त गोष्टींकडे’ लक्ष देतो. म्हणजे दुसऱ्‍यांचं भलं करणाऱ्‍या आणि प्रशंसा न मिळालेल्या लोकांकडे तो पाहतो. तो त्यांच्या कार्यांकडे लक्ष देतो आणि त्यासाठी त्यांना प्रतिफळ देतो. आणि कधीकधी तर यहोवा त्याच्या सेवकांना अगदी अनपेक्षित मार्गांनी प्रतिफळ देतो. याच्या काही उदाहरणांवर आता आपण चर्चा करू या.

एका नम्र आणि तरुण स्त्रीला अनपेक्षित स्वीकृती मिळते

११. यहोवाने मरीयाला कशा प्रकारे स्वीकृती दिली?

११ देवाच्या पुत्राला मानव म्हणून या पृथ्वीवर पाठवायचं होतं, तेव्हा यहोवाने मरीया नावाच्या नम्र व तरुण स्त्रीला येशूची आई होण्यासाठी निवडलं. मरीया यरुशलेम आणि त्यातल्या सुंदर मंदिरापासून दूर असलेल्या नासरेथ नावाच्या एका छोट्याशा शहरात राहायची. (लूक १:२६-३३ वाचा.) यहोवाने मरीयाला का निवडलं? गब्रीएल नावाच्या देवदूताने तिला म्हटलं: “देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.” तिची नातेवाईक असलेल्या अलीशिबाला तिने जे नंतर म्हटलं त्यावरून आपल्याला कळतं, की तिचा यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध होता. (लूक १:४६-५५) मरीयाच्या कार्यांवर यहोवाचं लक्ष होतं. यहोवाला विश्‍वासू असल्यामुळे तिने अपेक्षाही केली नाही अशा पद्धतीने त्याने तिला आशीर्वाद दिले.

१२, १३. येशूच्या जन्मानंतर आणि ४० दिवसांनी मरीया त्याला मंदिरात घेऊन गेली तेव्हा त्याला कशा प्रकारे सन्मानित करण्यात आलं?

१२ येशूच्या जन्माबद्दल यहोवाने कोणाला सांगितलं? याबद्दल त्याने यरुशलेम आणि बेथलेहेममधल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्‍यांना किंवा शासकांना सांगितलं नाही. याउलट बेथलेहेमच्या बाहेर मेंढरांची राखण करणाऱ्‍या गरीब मेंढपाळांकडे त्याने आपले देवदूत पाठवले. (लूक २:८-१४) मग ते मेंढपाळ बाळाला भेटायला गेले. (लूक २:१५-१७) येशूला अशा प्रकारे आदर मिळालेला पाहून मरीया आणि योसेफ यांना आश्‍चर्य वाटलं असेल. यहोवाची कार्य करण्याची पद्धत सैतानाच्या पद्धतीपेक्षा किती वेगळी आहे! सैतानाने ज्योतिष्यांना येशू आणि त्याच्या पालकांना भेटायला पाठवलं, तेव्हा संपूर्ण यरुशलेमला येशूच्या जन्माबद्दल कळलं आणि याचा खूप वाईट परिणाम झाला. (मत्त. २:३) यामुळे बऱ्‍याच निष्पाप मुलांचा बळी गेला.—मत्त. २:१६.

१३ यहोवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमानुसार मुलगा जन्मल्याच्या ४० दिवसांनंतर त्याच्या आईने यहोवाला बलिदान अर्पण करायचं होतं. म्हणून मग मरीया, येशू आणि योसेफसोबत यरुशलेमला गेली. बेथलेहेमपासून यरुशलेमच्या मंदिरापर्यंत चालत जायला त्यांना जवळजवळ दोन तास लागले असतील. (लूक २:२२-२४) प्रवास करताना मरीयाच्या मनात कदाचित विचार आला असेल, की येशूचा सन्मान करण्यासाठी याजक नक्की काहीतरी खास करतील. येशूचा सन्मान झाला खरा, पण मरीयाने जसा विचार केला होता त्याप्रमाणे नाही. यहोवाने शिमोन नावाच्या एका “नीतिमान व देवभीरू” व्यक्‍तीला आणि हन्‍ना नावाच्या ८४ वर्षांच्या संदेश सांगणाऱ्‍या एका विधवेला, येशू हा वचनयुक्‍त मसीहा किंवा ख्रिस्त बनेल अशी घोषणा करण्यासाठी निवडलं.—लूक २:२५-३८.

१४. यहोवाने मरीयाला कशा प्रकारे आशीर्वादित केलं?

१४ मरीयाने येशूचं विश्‍वासूपणे संगोपन केलं आणि त्याची काळजी घेतली, यासाठी यहोवा मरीयाला स्वीकृती देत राहिला का? हो. मरीयाने जे म्हटलं आणि जी कार्यं केली त्यातल्या काही गोष्टी बायबलमध्ये नमूद केल्या जातील याकडे यहोवाने लक्ष दिलं. असं दिसून येतं की येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवाकार्यादरम्यान ती त्याच्यासोबत ठिकठिकाणी प्रवास करू शकली नसावी. विधवा असल्यामुळे तिला कदाचित नासरेथमध्ये राहावं लागलं असेल. यामुळे इतरांसारखं सेवाकार्यातले कितीतरी सुंदर अनुभव तिला अनुभवता आले नाहीत. पण येशूच्या मृत्यूच्या वेळी मात्र ती त्याच्यासोबत होती. (योहा. १९:२६) त्यानंतर, येशूच्या शिष्यांना पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मिळायच्या आधी मरीया शिष्यांसोबत यरुशलेममध्ये होती. (प्रे. कार्ये १:१३, १४) इतर शिष्यांसोबत तीही अभिषिक्‍त झाली. म्हणजे याचा अर्थ स्वर्गात सर्वकाळासाठी येशूसोबत राहण्याची तिला संधी मिळाली. विश्‍वासूपणे केलेल्या तिच्या सेवेसाठी खरंच हा किती मोठा आशीर्वाद होता!

यहोवाने आपल्या पुत्राला स्वीकृती दिली

१५. येशू पृथ्वीवर असताना यहोवाने आपल्या पुत्राला स्वीकृती कशी दिली?

१५ धार्मिक किंवा राजनैतिक नेत्यांकडून येशूला आदर नको होता. यहोवाची स्वीकृती त्याच्यासाठी महत्त्वाची होती. यहोवा स्वतः येशूशी स्वर्गातून तीन वेळा बोलला. असं करण्याद्वारे यहोवाने दाखवून दिलं की त्याचं आपल्या पुत्रावर प्रेम आहे. यामुळे येशूला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल! यार्देन नदीत बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेच यहोवाने म्हटलं: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१७) असं दिसून येतं की फक्‍त बाप्तिस्मा देणारा योहान यानेच ते शब्द ऐकले असतील. मग येशूच्या मृत्यूच्या जवळपास एका वर्षाआधी त्याच्या तीन प्रेषितांनी यहोवाला येशूबद्दल असं बोलताना ऐकलं: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याचं ऐका.” (मत्त. १७:५) शेवटी येशूच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी यहोवा स्वर्गातून पुन्हा एकदा येशूसोबत बोलला.—योहा. १२:२८.

यहोवाने ज्या प्रकारे आपल्या पुत्राला स्वीकृती दिली यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (परिच्छेद १५-१७ पाहा)

१६, १७. यहोवाने अनपेक्षितपणे येशूला कसं सन्मानित केलं?

१६ येशूला माहीत होतं की लोक त्याला देवाची निंदा करणारा म्हणतील आणि त्याचा लज्जास्पद मृत्यू होईल. तरी त्याने स्वतःची इच्छा नाही, तर देवाची इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना केली. (मत्त. २६:३९, ४२) “त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ सोसला,” कारण त्याला जगाची नाही तर त्याच्या पित्याची स्वीकृती हवी होती. (इब्री १२:२) यहोवाने कशा प्रकारे त्याला स्वीकृती दिली?

१७ पित्यासोबत स्वर्गात असताना मिळणारा गौरव मला परत मिळो, अशी प्रार्थना पृथ्वीवर असताना येशूने केली. (योहा. १७:५) त्यापेक्षा जास्त काही मिळण्याची अपेक्षा येशूने केली, असं बायबलमध्ये कुठेही सांगण्यात आलं नाही. पृथ्वीवर यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला काही विशेष प्रतिफळ मिळण्याची अपेक्षा नव्हती. मग यहोवाने त्याला कसं आशीर्वादित केलं? यहोवाने अगदी अनपेक्षित रीतीने येशूला सन्मानित केलं. येशूला पुन्हा जिवंत केल्यानंतर यहोवाने त्याला स्वर्गात “एक श्रेष्ठ स्थान” दिलं. त्यासोबतच, त्याने येशूला अमर आत्मिक जीवन दिलं. एक असं जीवन जे याआधी कोणालाच मिळालं नव्हतं! * (फिलिप्पै. २:९; १ तीम. ६:१६) खरंच, येशूने विश्‍वासूपणे केलेल्या सेवेबद्दल यहोवाने त्याला किती अद्‌भुत प्रतिफळ दिलं!

१८. जगाची नाही तर यहोवाची स्वीकृती मिळवण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

१८ जगाची नाही तर यहोवाची स्वीकृती मिळवण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? यासाठी आपण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, की यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना नेहमी स्वीकृती देतो आणि अनेकदा अनपेक्षित रीतीने प्रतिफळ देतो. भविष्यात यहोवा आपल्याला कसं आशीर्वादित करेल याची आपण आता फक्‍त कल्पना करू शकतो! पण तोपर्यंत या दुष्ट जगात समस्यांचा आणि कष्टाचा सामना करत असताना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की हे जग लवकरच नष्ट होणार आहे. यामुळे या जगाकडून मिळालेली कोणत्याही प्रकारची स्वीकृती कायम टिकणारी नाही, तीही नष्ट होईल. (१ योहा. २:१७) याच्या उलट, आपण यहोवाच्या नावासाठी करत असलेली कार्यं आणि प्रेम तो कधीच विसरणार नाही. कारण आपला प्रेमळ पिता यहोवा “अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) यहोवाने आपल्याला स्वीकृती दिली आहे हे तो नक्कीच दाखवून देईल. आणि हे तो अशा प्रकारे करेल ज्याचा आपण कदाचित कधी विचारही केला नसेल!

^ परि. 17 हे प्रतिफळ अनपेक्षित असावं कारण हिब्रू शास्त्रवचनांत अमरत्वाचा उल्लेख कुठेही आढळत नाही.