व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २७

आपण स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये

आपण स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नये

“मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठे समजू नये, तर . . . स्वतःबद्दल समंजसपणे विचार करावा.”—रोम. १२:३.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

सारांश *

१. फिलिप्पैकर २:३ या वचनानुसार नम्रता या गुणामुळे आपल्याला काय फायदा होईल?

आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे हे यहोवाला माहीत असतं, म्हणून नम्रपणे आपण त्याच्या आज्ञांचं पालन करतो. (इफिस. ४:२२-२४) आपल्यात जर नम्रतेचा गुण असेल तर आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा यहोवाच्या इच्छेला जीवनात जास्त महत्त्व देऊ. आणि इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजू. यामुळे आपलं यहोवासोबत आणि भाऊबहिणींसोबत नातं चांगलं राहील.—फिलिप्पैकर २:३ वाचा.

२. प्रेषित पौलने काय मान्य केलं, आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आपण जर काळजी घेतली नाही तर आपणसुद्धा सैतानाच्या जगातल्या लोकांसारखंच गर्विष्ठ आणि स्वार्थी होऊ. * पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसोबत असंच काहीसं घडलं असावं म्हणून प्रेषित पौलने रोमकरांना असं लिहिलं: “मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठे समजू नये, तर देवाने प्रत्येकाला जितका विश्‍वास दिला आहे त्यानुसार स्वतःबद्दल समंजसपणे विचार करावा.” (रोम. १२:३) स्वतःबद्दल योग्य प्रमाणात विचार करणं चुकीचं नाही हे पौलने मान्य केलं. आपण जर नम्र असू तर आपण स्वतःला खूप जास्त महत्त्व देणार नाही, तर स्वतःबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगू. या लेखात आपण अशा तीन क्षेत्रांवर चर्चा करणार आहोत ज्यांत नम्रता दाखवणं गरजेचं आहे. ती तीन क्षेत्रं म्हणजे: (१) आपलं वैवाहिक जीवन (२) यहोवाच्या संघटनेत मिळालेल्या जबाबदाऱ्‍या (३) आणि सोशल मीडियाचा वापर, म्हणजेच इंटरनेटवर आपण जे फोटो, व्हिडिओ आणि मेसेज टाकतो.

आपल्या वैवाहिक जीवनात नम्रता दाखवा

३. वैवाहिक जीवनात मतभेद का उद्‌भवू शकतात आणि ते सोडवण्यासाठी काही जण काय करतात?

पती-पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असावं अशी यहोवाची इच्छा आहे. पण दोघंही अपरिपूर्ण असल्यामुळे दोघांमध्ये मतभेद होणं साहजिकच आहे. आणि म्हणूनच पौलने म्हटलं की वैवाहिक जोडप्यांना त्यांच्या जीवनात काही प्रमाणात दुःखं सोसावी लागतील. (१ करिंथ. ७:२८) काही जोडपी सतत भांडत असतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटू शकतं, की त्यांनी एकमेकांशी लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. जगातल्या लोकांसारखं त्यांनाही असं वाटू शकतं की यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे घटस्फोट. आपल्या जोडीदारापेक्षा आपला आनंद जास्त महत्त्वाचा आहे असं त्यांना वाटेल.

४. वैवाहिक जीवनात समस्या येतात तेव्हा आपण काय करू नये?

वैवाहिक जीवनात समस्या येतात तेव्हा आपला विवाह यशस्वी ठरला नाही आणि यावर घटस्फोट हा एकच उपाय आहे असा आपण विचार करू नये. कारण अनैतिक लैंगिक कृत्य या एकाच कारणामुळे आपण घटस्फोट घेऊ शकतो असं बायबल म्हणतं. (मत्त. ५:३२) म्हणून समस्या येतात तेव्हा पती-पत्नींनी फक्‍त स्वतःचाच विचार करू नये. त्यांनी असं म्हणू नये, की ‘माझ्या जोडीदाराला माझी काळजीच नाहीए,’ ‘त्याचं माझ्यावर प्रेमच नाहीए,’ किंवा ‘कदाचित मी दुसऱ्‍या व्यक्‍तीसोबत जास्त आनंदी राहीन.’ असा विचार करून एक व्यक्‍ती स्वतःचाच स्वार्थ पाहत असते. जगातले लोकसुद्धा असाच विचार करतात. त्यांचं असं म्हणणं असतं, की ‘तुमच्या मनाला जे योग्य वाटतं ते करा आणि फक्‍त स्वतःच्या  आनंदाचा विचार करा.’ मग त्यासाठी घटस्फोट घ्यावा लागला तरी चालेल. पण याच्या अगदी उलट देवाचं वचन म्हणतं: “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.” (फिलिप्पै. २:४) तुम्ही घटस्फोट घेऊ नये तर आपला विवाह टिकवून ठेवावा अशी यहोवाची इच्छा आहे. (मत्त. १९:६) तुम्ही स्वतःचा नाही तर आधी बायबलच्या तत्त्वांचा विचार करावा असं त्याला वाटतं.

५. इफिसकर ५:३३ या वचनानुसार पती-पत्नींनी एकमेकांशी कसं वागलं पाहिजे?

पती-पत्नींनी एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागलं पाहिजे. (इफिसकर ५:३३ वाचा.) घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे असं बायबल आपल्याला सांगतं. (प्रे. कार्ये २०:३५) एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागायला कोणत्या गुणामुळे मदत होऊ शकते? नम्रता या गुणामुळे. पती-पत्नी जर नम्र असतील तर ते “केवळ स्वतःचे नाही, तर दुसऱ्‍याचे हित” पाहतील.—१ करिंथ. १०:२४.

पती-पत्नी नम्र असतील तर ते एकमेकांशी भांडणार नाहीत; उलट ते सोबत मिळून काम करतील (परिच्छेद ६ पाहा)

६. स्टिवन आणि स्टेफनी यांनी जे म्हटलं त्यातून आपण काय शिकू शकतो?

नम्रता या गुणामुळे बऱ्‍याच ख्रिस्ती जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी राहणं शक्य झालं आहे. उदाहरणार्थ, स्टिवन नावाचे पती म्हणतात: “तुम्ही एकत्र मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. खासकरून समस्या येतात तेव्हा त्या तुम्ही एकत्र सोडवल्या पाहिजेत. माझ्यासाठी  काय चांगलं आहे असा विचार करण्याऐवजी आपल्यासाठी  काय चांगलं आहे असा विचार आपण केला पाहिजे.” त्याच्या पत्नीला, स्टेफनीलाही असंच वाटतं. ती म्हणते, “सतत भांडत राहणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत राहायला कोणालाच आवडत नाही. जेव्हा आमच्यात मतभेद होतो तेव्हा तो नेमका कशामुळे झाला हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. मग आम्ही एकत्र प्रार्थना करतो, संशोधन करतो आणि ती समस्या कशी सोडवता येईल त्यावर चर्चा करतो. एकमेकांशी भांडण्याऐवजी आम्ही एकत्र मिळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःपेक्षा आपल्या जोडीदाराचा जास्त विचार करणारे पती-पत्नी आनंदी असतात.”

नेहमी नम्रता दाखवून यहोवाची सेवा करा

७. जबाबदारी मिळाल्यावर एखाद्या बांधवाची मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

यहोवाची सेवा करणं हा आपल्यासाठी बहुमान आहे, मग ती कुठल्याही प्रकारची सेवा असो. (स्तो. २७:४; ८४:१०) एखादा बांधव यहोवाच्या सेवेत जास्त करण्याची तयारी दाखवतो तर ती चांगलीच गोष्ट आहे. बायबलसुद्धा हेच म्हणतं की “मंडळीत देखरेख करण्यास पात्र ठरण्यासाठी जर एखादा मनुष्य प्रयत्न करत असेल, तर तो चांगल्या कामाची इच्छा बाळगतो.” (१ तीम. ३:१) पण संघटनेत एखादी जबाबदारी मिळाल्यावर आपण खूप महत्त्वाची व्यक्‍ती बनलो आहोत असा त्या बांधवाने विचार करू नये. (लूक १७:७-१०) त्याऐवजी त्याने नम्रपणे इतरांची सेवा केली पाहिजे.—२ करिंथ. १२:१५.

८. दियत्रफेस, उज्जीया आणि अबशालोम यांच्या उदाहरणांतून आपण काय शिकतो?

बायबलमध्ये अशा काही लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा श्रेष्ठ समजलं. त्यांपैकी एक म्हणजे दियत्रफेस . त्याने मंडळीत इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न केला. (३ योहा. ९) आणखी एक उदाहरण म्हणजे उज्जीया . तो खूप गर्विष्ठ होता. त्याने असं काम करण्याचा प्रयत्न केला जे करण्यासाठी यहोवाने त्याला नेमलं नव्हतं. (२ इति. २६:१६-२१) अबशालोम  यानेही अशीच मनोवृत्ती दाखवली. त्याला राजा बनण्याची इच्छा होती. म्हणून लोकांची मनं जिंकण्यासाठी त्याने त्यांच्यावर प्रेम असण्याचा दिखावा केला. (२ शमु. १५:२-६) बायबलमधल्या या उदाहरणांवरून स्पष्ट होतं, की जे लोक प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर यहोवा खूश नसतो. (नीति. २५:२७) कारण जे लोक गर्विष्ठ असतात आणि इतरांची प्रशंसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या जीवनात शेवटी समस्याच निर्माण होतात.—नीति. १६:१८.

९. येशूने आपल्यासाठी कोणत्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडलं आहे?

येशू  त्या गर्विष्ठ लोकांसारखा नव्हता. बायबल म्हणतं, “तो देवाच्या स्वरूपात असूनही त्याने कधीही देवाचे स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.” (फिलिप्पै. २:६) यहोवानंतर जर कोणाकडे सर्वात जास्त अधिकार असेल तर तो येशूकडे आहे. तरीही त्याने स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा श्रेष्ठ समजलं नाही. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं: “तुम्हा सर्वांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.” (लूक ९:४८) पायनियर, सहायक सेवक, वडील आणि विभागीय पर्यवेक्षक हे येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करतात. आणि ते नम्रपणे यहोवाची सेवा करतात. अशा भाऊबहिणींसोबत काम करणं ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण नम्र असू तर आपण इतरांवर जास्त प्रेम करू. येशूने म्हटलं की आपसातलं प्रेमच देवाच्या खऱ्‍या सेवकांचं ओळखचिन्ह असेल.—योहा. १३:३५.

१०. मंडळीतले वडील समस्या योग्य रीतीने हाताळत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे?

१० मंडळीतल्या समस्या वडील व्यवस्थित हाताळत नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? तक्रार करण्याऐवजी तुम्ही नम्रता दाखवली पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्‍यांच्या अधीन राहिलं पाहिजे. (इब्री १३:१७) स्वतःला विचारा: ‘मला ज्या समस्या दिसतात त्या खरंच इतक्या मोठ्या किंवा गंभीर आहेत का की त्या सोडवल्या गेल्याच पाहिजेत? त्या सोडवण्याची ही योग्य वेळ आहे का? त्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे का? तक्रार करून मी मंडळीत एकी निर्माण करतोय की इतरांचं लक्ष वेधून घेतोय?’

मंडळीत जबाबदारी हाताळणारे बांधव त्यांच्या क्षमतांसाठीच नाही, तर नम्रतेसाठीही ओळखले गेले पाहिजेत (परिच्छेद ११ पाहा) *

११. इफिसकर ४:२, ३ या वचनांनुसार नम्रपणे यहोवाची सेवा करण्याचे काय फायदे आहेत?

११ यहोवासाठी क्षमतांपेक्षा नम्रता आणि कौशल्यांपेक्षा एकी जास्त महत्त्वाची आहे. म्हणून नम्रपणे यहोवाची होता होईल तितकी सेवा करा. यामुळे मंडळीत एकी वाढेल. (इफिसकर ४:२, ३ वाचा.) प्रचारकार्यात आवेशाने भाग घ्या, भाऊबहिणींना मदत करण्याच्या संधी शोधा आणि सगळ्यांचा पाहुणचार करा; मंडळीत ज्यांच्याकडे जबाबदाऱ्‍या नाहीत अशांचासुद्धा. (मत्त. ६:१-४; लूक १४:१२-१४) तुम्ही नम्र राहून मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत काम केलं, तर त्यांना तुमची कौशल्यंच नाही तर नम्रताही दिसून येईल.

सोशल मीडियाचा वापर करताना नम्रता दाखवा

१२. मित्र बनवण्याबद्दल बायबल काय म्हणतं? स्पष्ट करा.

१२ आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या आणि मित्रांच्या सहवासाचा आनंद घ्यावा असं यहोवाला वाटतं. (स्तो. १३३:१) येशूलाही मित्र होते. (योहा. १५:१५) बायबल आपल्याला खरे मित्र असण्याच्या फायद्यांबद्दल सांगतं. (नीति. १७:१७; १८:२४) तसंच बायबल आपल्याला हेही सांगतं की आपण एकटं-एकटं राहू नये. (नीति. १८:१) अनेकांना असं वाटतं की सोशल मीडिया अनेक मित्र बनवण्याचा आणि एकटेपणा घालवण्याचा चांगला मार्ग आहे. सोशल मीडिया म्हणजे असे ॲप्स किंवा वेबसाईट्‌स ज्यांवर लोक आपले फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस टाकतात. पण सोशल मीडियाचा वापर करताना आपण सावध राहिलं पाहिजे.

१३. सोशल मीडियाचा वापर करणारे काही जण निराश का होतात आणि त्यांना एकटेपणा का जाणवतो?

१३ काही अहवालांवरून दिसून आलं आहे, की जे लोक सोशल मीडियावर टाकलेले फोटो पाहण्यात आणि मेसेज वाचण्यात बराच वेळ घालवतात ते शेवटी निराश होतात, आणि त्यांना एकटेपणा जाणवतो. पण असं का होतं? याचं एक कारण असं असू शकतं की लोक सहसा आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर टाकतात. ते स्वतःचे, आपल्या मित्रांचे आणि ज्या ठिकाणी ते फिरायला गेले असतील त्या ठिकाणांचे सर्वात चांगले फोटो सोशल मीडियावर टाकतात. आणि ते फोटो पाहणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला कदाचित वाटेल की, ‘यांच्या तुलनेत माझं जीवन किती बोरिंग आहे.’ १९ वर्षांच्या एका ख्रिस्ती बहिणीला असंच वाटलं. ती म्हणते: “इतर लोक शनिवार-रविवार किती मजा करतात आणि मी मात्र घरात बसून बोर होते, याचं मला खूप वाईट वाटायचं.”

१४. सोशल मीडियाचा सुज्ञपणे वापर करण्यासाठी १ पेत्र ३:८ मध्ये दिलेला बायबलचा सल्ला आपल्याला कसा मदत करू शकतो?

१४ हे खरं आहे की सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठीसुद्धा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या संपर्कात राहता येतं. पण तुमच्या लक्षात आलं असेल की काही लोक स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्‌स टाकत असतात. एका अर्थी त्यांना असं सांगायचं असतं, की “माझ्याकडे बघा.” काही जण तर स्वतःच्या आणि इतरांच्या फोटोंबद्दल टीकात्मक किंवा अश्‍लील कमेंट्‌ही टाकतात. पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असं प्रोत्साहन दिलं जातं की त्यांनी नम्र असावं आणि इतरांच्या भावनांचा विचार करावा. त्यामुळे आपण सोशल मीडियाचा सुज्ञपणे वापर करावा.१ पेत्र ३:८ वाचा.

तुम्ही सोशल मीडियावर जे फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्‌स टाकता त्यांवरून तुम्ही बढाई मारत आहात असं दिसतं का? (परिच्छेद १५ पाहा)

१५. आपण खूप महत्त्वाचे आहोत असा दृष्टिकोन टाळायला बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं?

१५ तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर करत असाल तर स्वतःला विचारा: ‘मी सोशल मीडियावर जे कमेंट्‌स, फोटो किंवा व्हिडिओ टाकतो, त्यावरून लोकांना असं वाटेल का की मी स्वतःची बढाई मारतोय? यामुळे इतरांच्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण होईल का?’ बायबल म्हणतं: “जगातल्या सर्व गोष्टी—शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा—या पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.” (१ योहा. २:१६) इतरांनी आपल्याला महत्त्व द्यावं किंवा आपली प्रशंसा करावी असं ख्रिश्‍चनांना वाटू नये. आपण पुढे दिलेल्या बायबलच्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. बायबल म्हणतं: “आपण अहंकारी किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्‍न करणारे किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे असे होऊ नये.” (गलती. ५:२६) आपण जर नम्र असलो, तर जगातल्या लोकांसारखं आपण गर्विष्ठ बनणार नाही. तसंच त्यांच्यासारखं आपण स्वतःला खूप महत्त्व देण्याचा प्रयत्नही करणार नाही.

“स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा”

१६. आपण गर्विष्ठ का असू नये?

१६ एक गर्विष्ठ व्यक्‍ती समंजसपणा दाखवत नाही. त्यामुळे आपण नम्रता विकसित केली पाहिजे. (रोम. १२:३) गर्विष्ठ लोक भांडखोर आणि अहंकारी असतात. ते आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःला आणि इतरांना दुखावतात. जर त्यांनी काळजी घेतली नाही तर सैतान त्यांची मनं आंधळी आणि भ्रष्ट करेल. (२ करिंथ. ४:४; ११:३) पण याच्या अगदी उलट, एक नम्र व्यक्‍ती समंजस असते. आपण खूप महत्त्वाचे आहोत असं ती स्वतःबद्दल विचार करत नाही; तर इतर जण बऱ्‍याच गोष्टींमध्ये आपल्यापेक्षा चांगले आहेत हे ती मान्य करते. (फिलिप्पै. २:३) तसंच, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो ही गोष्ट तिला माहीत असते. (१ पेत्र ५:५) यहोवाने आपला विरोध करावा अशी आपली मुळीच इच्छा नाही. आणि म्हणून आपण समंजस असणं गरजेचं आहे.

१७. नेहमी नम्र राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१७ नम्र राहण्यासाठी आपण बायबलचा सल्ला लागू केला पाहिजे. बायबल म्हणतं: “आपले जुने व्यक्‍तिमत्त्व त्याच्या वाईट सवयींसहित काढून टाका” आणि “देवाकडील नवीन व्यक्‍तिमत्त्व परिधान करा.” असं करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाचं आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं जवळून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपलाच फायदा होईल. (कलस्सै. ३:९, १०; १ पेत्र २:२१) नम्रता विकसित केल्यामुळे आपलं कौटुंबिक जीवन आणखी आनंदी होईल, मंडळीतली एकी वाढेल आणि आपण सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यहोवाचा आशीर्वाद व स्वीकृती मिळेल.

गीत १९ नंदनवन—देवाचे अभिवचन

^ परि. 5 आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे जास्तीत जास्त करून लोक गर्विष्ठ आणि स्वार्थी आहेत. आपण त्यांच्यासारखं होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतःला जास्त महत्त्व देऊ नये अशा तीन क्षेत्रांवर या लेखात आपण चर्चा करणार आहोत.

^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: एक गर्विष्ठ व्यक्‍ती इतरांपेक्षा स्वतःचा खूप जास्त विचार करते. म्हणूनच ती व्यक्‍ती स्वार्थी असते असं म्हणता येईल. याउलट नम्रता एका व्यक्‍तीला निःस्वार्थ बनायला मदत करते. एक नम्र व्यक्‍ती गर्विष्ठ नसते, आणि आपण खूप जास्त महत्त्वाचे आहोत असा ती स्वतःबद्दल विचार करत नाही.

^ परि. 56 चित्रांचं वर्णन: अधिवेशनांत चांगली भाषणं देण्याची आणि मंडळीत चांगली देखरेख करण्याची क्षमता असलेले वडील सेवाकार्यात आणि राज्य सभागृह स्वच्छ करण्यातसुद्धा आनंदाने पुढाकार घेतात.