व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं

मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं

बंधू डॉनअल्ड रिडली एक वकील होते. त्यांनी ३० पेक्षा जास्त वर्षं यहोवाच्या साक्षीदारांसाठी न्यायालयात खटले लढले. उपचार घेताना रुग्णांना रक्‍त संक्रमण नाकारण्याचा हक्क आहे हे डॉक्टरांना आणि न्यायाधीशांना समजावून सांगण्यात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अमेरिकेतल्या अनेक उच्च न्यायालयांत यहोवाच्या साक्षीदारांना बरेच खटले जिंकायला मदत केली. त्यांचे मित्र त्यांना प्रेमाने डॉन म्हणायचे. ते फार मेहनती आणि नम्र स्वभावाचे होते. आणि त्यांच्यामध्ये त्यागाची भावना होती.

२०१९ मध्ये बंधू डॉनला समजलं, की त्यांना एक मोठा आजार झाला आहे आणि त्यावर कोणताही उपचार नाही. तो आजार झपाट्याने वाढत गेला आणि शेवटी १६ ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांची ही जीवन कथा.

माझा जन्म १९५४ मध्ये अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातल्या सेंट पॉल शहरात झाला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला होता. आम्ही रोमन कॅथलिक होतो. मला एक मोठा आणि एक लहान भाऊ, आणि दोन लहान बहिणी आहेत. माझं शिक्षण एका कॅथलिक शाळेतून झालं. लहान असताना मी ऑल्टर बॉय म्हणून काम करायचो; म्हणजे चर्चच्या विधींमध्ये मी पाळकाला मदत करायचो. पण तरीही बायबलचं मला फारसं ज्ञान नव्हतं. सगळं काही बनवणारा एक देव असावा असं मी मानायचो खरं, पण चर्चवरून माझा विश्‍वास पूर्णपणे उडाला होता.

मला सत्य कसं मिळालं?

‘विल्यम मिशेल कॉलेज ऑफ लॉ’ इथून मी वकिलीचं शिक्षण घेत होतो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एकदा यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी आले. ते आले तेव्हा मी घरातलं काही काम करत होतो. त्यामुळे मी त्या जोडप्याला नंतर यायची विनंती केली. त्यावर ते लगेच हो म्हणाले. नंतर जेव्हा ते परत आले तेव्हा मी त्यांना दोन प्रश्‍न विचारले: “जगात चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोकच जास्त यशस्वी का होतात? आणि आपल्याला जीवनात आनंदी कसं राहता येईल?” त्या साक्षीदार जोडप्याने मला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरवते  हे पुस्तक दिलं. त्यासोबत पवित्र शास्त्राचे नवे जग भाषांतरसुद्धा  त्यांनी मला दिलं. ते एक सुंदर हिरव्या रंगाचं बायबल होतं. आणि मी त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करायला तयार झालो. या अभ्यासातून मी जे काही शिकलो त्यामुळे माझे डोळे उघडले. देवाचं राज्य एक सरकार आहे आणि हेच सरकार मानवांच्या सगळ्या समस्या आणि दुःख दूर करेल हे जाणून मला खूप आनंद झाला. माझ्या लक्षात आलं, की मानवी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आणि या सरकाराने जगाला दुःख आणि अन्याय याशिवाय काहीच दिलं नाही.

१९८२ मध्ये मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं, आणि त्याच वर्षी सेंट पॉल सिविक सेंटर या ठिकाणी झालेल्या “देवाच्या राज्याबद्दलचं सत्य,” या अधिवेशनात बाप्तिस्मा घेतला. त्याच्या पुढच्याच आठवडी मी वकिलीची परीक्षा द्यायला परत सिविक सेंटरला गेलो. आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, मी पास झाल्याचं मला कळलं. याचा अर्थ, आता मी वकील म्हणून काम करू शकत होतो.

“देवाच्या राज्याबद्दलचं सत्य” या अधिवेशनात बंधू माईक रिचअर्डसन यांच्याशी माझी भेट झाली. ते ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करत होते आणि त्यांनी मला सांगितलं, की आता आपल्या मुख्यालयात कायदा विभाग सुरू करण्यात आला आहे. त्या वेळी मला प्रेषितांची कार्ये ८:३६ यात लिहिलेले कूशी अधिकाऱ्‍याचे शब्द आठवले. आणि मी स्वतःला म्हटलं: “मला कायदा विभागात सेवा करायला काय हरकत आहे?” म्हणून मग मी बेथेल सेवेसाठी अर्ज भरला.

मी एक यहोवाचा साक्षीदार झालोय ही गोष्ट माझ्या आईवडिलांना मुळीच आवडली नव्हती. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला विचारलं, की ‘तू जर वॉचटावरसाठी काम करणार असशील तर तुझ्या करिअरचं काय? तू जे एवढं वकिलीचं शिक्षण घेतलंस त्याचं काय?’ मी त्यांना समजावून सांगितलं, की मला करिअर करायची इच्छा नाही. मी तिथे एक स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे. आणि बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या बाकीच्या सेवकांप्रमाणेच मलाही माझा खर्च भागवण्यासाठी दर महिन्याला एक छोटीशी रक्कम दिली जाईल.

पण मी नोकरी करत असल्यामुळे लगेच बेथेलला जाऊ शकलो नाही. नंतर काही काळाने, म्हणजे १९८४ मध्ये मी ब्रुकलिनमध्ये बेथेल सेवा सुरू केली. तिथे मला कायदा विभागात काम करण्यासाठी नेमण्यात आलं. आधी नोकरी केल्यामुळे मला जो अनुभव मिळाला होता, त्याचा पुढे किती फायदा होणार होता याची मी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतो.

स्टॅन्ली थिएटरची दुरुस्ती

संघटनेने स्टॅन्ली थिएटर विकत घेतलं तेव्हा ते असं दिसत होतं

नोव्हेंबर १९८३ मध्ये संघटनेने स्टॅन्ली थिएटर विकत घेतलं. हे थिएटर अमेरिकेतल्या न्यू जर्झी राज्याच्या जर्झी सिटी इथे होतं. बांधवांनी इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगचं काम करण्याची परवानगी मिळवण्यासाठी एक अर्ज भरला. तिथल्या अधिकाऱ्‍यांना भेटल्यावर बांधवांनी त्यांना सांगितलं, की त्यांना स्टॅन्ली थिएटर यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांसाठी वापरायचं आहे. पण यामुळे एक समस्या निर्माण झाली. त्या शहराच्या नियमांनुसार उपासनेच्या इमारती फक्‍त अशाच ठिकाण असायला हव्या होत्या जिथे लोक राहतात. पण स्टॅन्ली थिएटर हे व्यापारी क्षेत्रात होतं. त्यामुळे अधिकाऱ्‍यांनी दुरुस्तीसाठी परवानगी दिली नाही. बांधवांनी पुन्हा अधिकाऱ्‍यांकडे परवानगी मागितली. पण ती नाकारण्यात आली.

मी बेथेलमध्ये सेवा करू लागलो त्याच्या पहिल्याच आठवड्यात संघटनने या समस्येबद्दल संघ जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. मी नुकतंच मिनेसोटा राज्यातल्या सेंट पॉल शहराच्या संघ जिल्हा न्यायालयात दोन वर्षं काम केलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे खटले कसे हाताळायचे हे मला माहीत होतं. आपल्या एका वकिलाने असं म्हटलं, की यापूर्वी जर स्टॅन्ली थिएटर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात आलं आहे; जसं की चित्रपट दाखवण्यासाठी आणि संगीत कार्यक्रमांसाठी; तर मग धार्मिक कार्यक्रमासाठी ते वापरणं बेकायदेशीर कसं असू शकतं? न्यायालयाने यावर विचार केला आणि आपल्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने म्हटलं, की साक्षीदारांना आपला धर्म पाळायचा अधिकार आहे, पण त्यांच्या या हक्काचा जर्झी सिटीच्या अधिकाऱ्‍यांनी आदर केला नाही. न्यायालयाने अधिकाऱ्‍यांना आदेश दिला, की त्यांनी आपल्याला दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी. तेव्हापासून मला जाणवू लागलं, की यहोवा आपलं काम वाढवण्यासाठी संघटनेच्या कायदा विभागाचा कसा वापर करत आहे. आणि या कामात एक लहानसा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद होतो.

त्यानंतर बांधवांनी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि एका वर्षाच्या आत ते पूर्णही झालं. त्याच वर्षी, म्हणजे ८ सप्टेंबर १९८५ ला जर्झी सिटी असेंबली हॉलमध्ये गिलियडच्या ७९ क्लासचं ग्रॅज्युएशन झालं. कायदा विभागात काम करणं हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान होता. कारण यामुळे मी राज्याचं कार्य वाढवण्यात हातभार लावत होतो. या कामातून मला खूप आनंद मिळत होता. बेथेलला जाण्याआधी वकील म्हणून काम करताना मिळाला नाही, इतका आनंद आता मला मिळत होता. संघटनेच्या वतीने अनेक खटले लढण्यासाठी यहोवा माझा वापर करेल याची सुरुवातीला मला जराही कल्पना नव्हती.

रक्‍त न घेता उपचार करण्याच्या हक्कासाठीचा लढा

१९८० च्या दशकात यहोवाच्या साक्षीदारांना रक्‍त न घेता उपचार निवडणं फार कठीण जायचं. कारण, डॉक्टर आणि हॉस्पिटल त्यांच्या या इच्छेचा आदर करत नव्हते. खासकरून गर्भवती स्त्रियांसाठी ही एक मोठी समस्या होती. कारण गर्भवती स्त्रियांना रक्‍त संक्रमण नाकारण्याचा कायद्याने हक्क नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं होतं. रक्‍त संक्रमण नाकारल्यामुळे जर आईचा मृत्यू झाला तर बाळाची काळजी कोण घेणार असा प्रश्‍न ते उभा करायचे.

२९ डिसेंबर १९८८ ला बहीण डीनीस निकेलो हिने आपल्या बाळाला जन्म दिल्यावर तिला खूप रक्‍तस्राव झाला. आणि त्यामुळे तिचं हिमोग्लोबिन ५ च्याही खाली गेलं. तिचा जीव धोक्यात असल्यामुळे तिला रक्‍त घ्यावं लागेल असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. पण तिने त्याला नकार दिला. दुसऱ्‍या दिवशी सकाळी, तिला रक्‍त संक्रमण देण्यासाठी हॉस्पिटलने कोर्टाकडून परवानगी मागितली. कोर्टाने तिला आणि तिच्या पतीला आपली बाजू मांडायची संधी न देता आणि त्यांना काहीही न सांगता रक्‍त संक्रमण देण्याची परवानगी हॉस्पिटलला दिली.

शुक्रवार, ३० डिसेंबरला हॉस्पिटलने बहीण निकेलोला रक्‍त संक्रमण दिलं. त्या वेळी बहिणीचे पती आणि कुटुंबांतले इतर सदस्यही तिथे होते. त्यांनी खूप विरोध केला, पण तरीसुद्धा बहिणीला रक्‍त देण्यात आलं. त्याच दिवशी संध्याकाळी बहिणीच्या कुटुंबातल्या अनेक सदस्यांना आणि मंडळीतल्या काही वडिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आला, की रुग्णाला रक्‍त दिलं जाऊ नये म्हणून ते सगळे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्‍यांना अडवत होते. दुसऱ्‍या दिवशी न्यूयॉर्क आणि आसपासच्या शहरांत टिव्ही, वृत्तपत्रं आणि रेडिओ यांवर हीच बातमी दाखवण्यात आली.

मी तरुण असताना बंधू फिलिप ब्रमली यांच्यासोबत

सोमवारी सकाळी मी वरच्या न्यायालयाच्या एका न्यायाधीशाशी, म्हणजे मिल्टन मॉलन यांच्याशी बोललो. मी त्यांना केसची सगळी माहिती दिली. आणि आधीच्या न्यायाधीशाने कशा प्रकारे सुनावणी न करताच रक्‍त संक्रमणाचा आदेश दिला हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. न्यायाधीश मॉलन यांनी केसशी संबधित कायद्यांवर चर्चा करण्यासाठी मला संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात यायला सांगितलं. म्हणून मी आणि कायदा विभागाचे पर्यवेक्षक बंधू फिलिप ब्रमली आम्ही दोघं त्यांच्या कार्यालयात गेलो. न्यायाधीशाने हॉस्पिटलच्या वकिलालासुद्धा चर्चा करण्यासाठी बोलावून घेतलं होतं. चर्चा करता-करता माझाही आवाज वाढला. इतका की एका क्षणाला बंधू ब्रमली यांनी आपल्या वहीत लिहून मला शांत व्हायला सांगितलं. खरंतर त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला. कारण जे झालं ते चुकीचं होतं ही गोष्ट हॉस्पिटलच्या वकिलाला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात माझा आवाज चांगलाच वाढला होता.

वॉचटावर  विरुद्ध विलेज ऑफ स्ट्रॅटन  या केससंबंधी अमेरिकेच्या उच्च न्यायालयात वादविवाद झाला त्या दिवशी उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे वकील: (डावीकडून उजवीकडे) रिचअर्ड मोक, ग्रेगोरी ओल्ड्‌स, पॉल पॉलिडोरो, फिलिप ब्रमली, मी आणि मारयो मोरेनो—८ जानेवरी २००३, सावध राहा!  (इंग्रजी) पाहा

मग जवळपास एका तासानंतर न्यायाधीश मॉलन यांनी म्हटलं की उद्या सकाळी सर्वातआधी या केसची सुनावणी होईल. त्यांच्या कार्यालयातून निघताना त्यांनी मला म्हटलं: “उद्या हॉस्पिटलच्या वकिलाचं काही खरं नाही.” त्यांना असं म्हणायचं होतं, की हॉस्पिटलच्या वकिलाला आपली बाजू मांडणं फार कठीण जाणार आहे. यामुळे मला जाणवलं की आम्ही ही केस जिंकू असं आश्‍वासन यहोवा आम्हाला देत आहे. यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आमच्यासारख्या साध्या माणसांचा वापर करत आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

दुसऱ्‍या दिवशी आम्ही काय बोलणार याची आम्ही रात्री उशिरापर्यंत तयारी केली. ब्रुकलिन बेथेलपासून कोर्ट फार लांब नव्हतं. त्यामुळे कायदा विभागातले बरेच तिथे चालतच गेले. चार न्यायाधीशांनी आमची बाजू ऐकून घेतली आणि आमच्या बाजूने निकाल दिला. रक्‍त संक्रमणाचा आदेश देणं चुकीचं होतं हे त्यांनी सांगितलं. कोर्टाने बहिणीच्या बाजूने निकाल देऊन म्हटलं, की रुग्णाचं मत ऐकून न घेता कोणत्याही आदेशावर सही करणं हे मूलभूत मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

न्यूयॉर्कच्या सर्वात मोठ्या न्यायालयाने शेवटी म्हटलं की निकेलोला रक्‍त न घेता उपचार घेण्याचा अधिकार आहे. मला असे चार खटले लढण्याची संधी मिळाली. हे खटले अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यांत लढले गेले. या चारही खटल्यांचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला. बहीण निकेलोची केस त्यांपैकी सर्वात पहिली होती. (“ वेगवेगळ्या राज्यांतल्या उच्च न्यायालयांत जिंकलेले खटले,” ही चौकट पाहा.) याशिवाय, मी बेथेलमधल्या इतर वकिलांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे खटले लढलो; जसं की घटस्फोट, मुलांचा ताबा मिळवणं आणि जमीनजुमला.

माझा विवाह आणि कौटुंबिक जीवन

माझी पत्नी, डीनीस हिच्यासोबत

माझं लग्न डीनीसशी झालं. मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला तीन मुलं होती. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी ती नोकरी करून पायनियरिंग करत होती. तिने खूप कठीण दिवस पाहिले होते. पण यहोवाची सेवा करण्याचा तिचा निर्धार पक्का होता. तिची हीच गोष्ट मला खूप आवडली होती. मग १९९२ साली न्यूयॉर्क सिटीत झालेल्या “ज्योती वाहक” या अधिवेशनात मी तिला म्हटलं, की आपण एकमेकांना आणखी जाणून घेऊ या. मग एका वर्षानंतर आम्ही लग्न केलं. डीनीसचं यहोवावर खूप प्रेम आहे. आणि ती आनंदी, मनमिळाऊ स्वभावाची आहे. खरंच, ती मला यहोवाकडून मिळालेली एक भेटच आहे. डीनीसने मला आयुष्यभर चांगली साथ दिली. (नीति. ३१:१२) लग्न झाल्यानंतरही मी बेथेलसाठी काम करत होतो.

आमचं लग्न झालं तेव्हा डीनीसच्या मुली १६ आणि १३ वर्षांच्या होत्या, आणि मुलगा ११ वर्षांचा होता. मला एक चांगला पिता बनायचं होतं. म्हणून आपल्या प्रकाशनांमध्ये सावत्र पालकांसाठी जितकी माहिती होती ती सगळी मी वाचून काढली, आणि ती लागू करण्याचा प्रयत्न केला. एक चांगला पिता बनणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आज मुलं मला त्यांचा जवळचा मित्र आणि प्रेमळ पिता मानतात. आमच्या मुलांचे मित्रमैत्रिणी नेहमी आमच्या घरी यायचे. आणि त्यामुळे आमच्या घरी नेहमी खेळीमेळीचं वातावरण असायचं.

२०१३ मध्ये मी आणि डीनीस आमच्या वयस्कर आईवडिलांची काळजी घेण्यासाठी विस्कॉन्सिन राज्यात आलो. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे माझी बेथेल सेवा थांबली नाही. संघटनेच्या कायदा विभागाला मदत करण्यासाठी अधूनमधून मला बेथेलला बोलवलं जायचं.

अचानक झालेला बदल

सप्टेंबर २०१८ मध्ये माझ्या लक्षात आलं की बोलण्याआधी मी नेहमी माझा घसा खाकरतो. मी डॉक्टरांना दाखवलं, पण त्याचं नेमकं कारण त्यांना सांगता आलं नाही. मग दुसऱ्‍या एका डॉक्टरने मला मेंदूच्या डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला दिला. जानेवारी २०१९ मध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं की मला कदाचित प्रोग्रेसीव सुप्रान्यूक्लियर पॅल्सी (PSP) नावाचा आजार झाला आहे. सहसा फार कमी लोकांना हा आजार होतो, आणि हळूहळू याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.

तीन दिवसांनंतर, मी बर्फावर स्केटिंग करत असताना माझ्या उजव्या हाताचं मनगट फ्रॅक्चर झालं. खरंतर मी आयुष्यभर स्केटिंग करत आलो होतो आणि खूप सहजपणे ते करायचो. त्यामुळे माझ्या लक्षात आलं, की माझ्या हालचालींवरचा माझा ताबा हळूहळू सुटत चालला आहे. माझा आजार किती झपाट्याने वाढत गेला हे पाहून मी हादरून गेलो. या आजारामुळे बोलताना, कोणतीही हालचाल करताना आणि अन्‍न गिळताना मला भयंकर त्रास होतो.

मला या गोष्टीचा खूप आनंद होतो, की मला यहोवाच्या संघटनेसाठी एक वकील म्हणून काम करायची संधी मिळाली. याशिवाय डॉक्टर, वकील आणि न्यायाधीश जी मासिकं वाचतात त्यांत अनेक लेख लिहिण्याची, आणि वेगवेगळ्या देशांत झालेल्या सेमिनार्समध्ये भाषणं देण्याचीही संधी मला लाभली. या सगळ्यांतून मी लोकांना हे समजावून सांगू शकलो की रक्‍त न घेता उपचार केला जाऊ शकतो, आणि असा उपचार निवडण्याचा यहोवाच्या साक्षीदारांना हक्क आहे. अशा अनेक चांगल्या संधी माझ्या वाट्याला आल्या. पण तरीसुद्धा बायबलचा लेखक लूक याने म्हटलं त्याप्रमाणे मीसुद्धा हेच म्हणेन: ‘मी केवळ दास आहे आणि माझी काहीही योग्यता नाही. मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं.’—लूक १७:१०.