व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशू महायाजक कधी बनला?

पुरावे दाखवतात, की येशूने इ.स. २९ मध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा तो महायाजक बनला. असं आपण का म्हणू शकतो? येशूने बाप्तिस्मा घेतला तेव्हा त्याने दाखवून दिलं, की तो आपलं जीवन लाक्षणिक वेदीवर बलिदान करायला तयार आहे. ही लाक्षणिक वेदी म्हणजे यहोवाची ‘इच्छा.’ (गलती. १:४; इब्री १०:५-१०) येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी लाक्षणिक वेदी अस्तित्वात आली. याचाच अर्थ, महान आध्यात्मिक मंदिरसुद्धा त्याच वेळी अस्तित्वात आलं असावं. हे महान आध्यात्मिक मंदिर म्हणजे शुद्ध उपासनेची व्यवस्था. ही व्यवस्था खंडणी बलिदानावर आधारित आहे. आणि वेदी हा महान आध्यात्मिक मंदिराचा महत्त्वाचा भाग आहे.—मत्त. ३:१६, १७; इब्री ५:४-६.

महान आध्यात्मिक मंदिर अस्तित्वात आल्यावर एका महायाजकाची गरज होती. आणि त्यासाठी येशूला “पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषिक्‍त” करण्यात आलं. (प्रे. कार्ये १०:३७, ३८; मार्क १:९-११) पण, येशूला त्याच्या मृत्यूच्या आणि पुनरुत्थानाच्या आधीच महायाजक म्हणून नेमण्यात आलं असं आपण खातरीने का म्हणू शकतो? या प्रश्‍नाचं उत्तर, महायाजक अहरोनच्या आणि त्याच्या वंशजांच्या उदाहरणावरून आपल्याला मिळतं.

मोशेच्या नियमशास्त्रानुसार निवासमंडपातल्या परमपवित्र स्थानात फक्‍त महायाजक जाऊ शकत होता. नंतर जेव्हा मंदिर बांधण्यात आलं तेव्हासुद्धा मंदिराच्या परमपवित्र स्थानात फक्‍त महायाजक जाऊ शकत होता. परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान यांना वेगळं करण्यासाठी एक पडदा लावण्यात आला होता. महायाजक फक्‍त प्रायश्‍चित्ताच्या दिवशीच हा पडदा पार करून परमपवित्र स्थानात जायचा. (इब्री ९:१-३, ६, ७) पण निवासमंडपातला पडदा पार करण्याआधी अहरोन आणि त्याचे वंशज यांनी महायाजक असणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे येशूलाही महान आध्यात्मिक मंदिरात जाण्याआधी महायाजक असणं गरजेचं होतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो, की येशूचा मृत्यू होण्याआधीच त्याला महायाजक म्हणून नेमण्यात आलं असावं. आणि त्यानंतर तो “पडद्याला पार करून” (पडदा म्हणजे त्याचं शरीर) स्वर्गात गेला. (इब्री १०:२०) म्हणूनच प्रेषित पौलने येशूबद्दल म्हटलं, की तो “महायाजक या नात्याने आला” आणि मग हातांनी न बांधलेल्या “अधिक श्रेष्ठ व अधिक परिपूर्ण अशा मंडपात,” म्हणजेच “प्रत्यक्ष स्वर्गात गेला.”—इब्री ९:११, २४.

नव्या कराराची स्थापन करण्याची वेळ आणि तो अमलात आणण्याची वेळ यात काही फरक होता का?

नाही. असं का म्हणता येईल? येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात गेला आणि त्याने आपल्या बलिदानाचं मोल देवासमोर सादर केलं, तेव्हा त्याने नवा करार स्थापन करण्यासाठी किंवा तो पक्का करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं. पण आणखी दोन पावलं उचलण्याची गरज होती. ही तीन पावलं उचलण्यात आली तेव्हा हा करार अमलातसुद्धा आला. ती कोणती पावलं होती ते आता आपण पाहू या.

पहिलं पाऊल म्हणजे येशू यहोवासमोर उपस्थित राहिला. दुसरं म्हणजे, त्याने आपल्या बलिदानाचं मोल यहोवाला अर्पण केलं. आणि शेवटचं पाऊल म्हणजे येशूने वाहिलेल्या रक्‍ताचं मोल यहोवाने स्वीकारलं. ही तीन पावलं उचलल्यानंतरच नवा करार अमलात आला.

यहोवाने येशूच्या बलिदानाचं मोल केव्हा स्वीकारलं हे बायबल आपल्याला सांगत नाही. त्यामुळे नवा करार केव्हा स्थापन करण्यात आला आणि तो केव्हा अमलात आला याची नेमकी वेळ आपण सांगू शकत नाही. पण एक गोष्ट आपल्याला माहीत आहे, ती म्हणजे पेन्टेकॉस्टच्या दहा दिवसांआधी येशू स्वर्गात गेला. (प्रे. कार्ये १:३) या दहा दिवसांमध्येच कधीतरी येशूने आपल्या बलिदानाचं मोल यहोवासमोर सादर केलं आणि यहोवाने ते स्वीकारलं. (इब्री ९:१२) याचा पुरावा आपल्याला इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जी घटना घडली  त्यावरून मिळतो. (प्रे. कार्ये २:१-४, ३२, ३३) याचाच अर्थ, तोपर्यंत नवा करार स्थापित झाला होता आणि तो अमलातही आला होता.

थोडक्यात सांगायचं तर यहोवाने येशूच्या रक्‍ताचं मोल स्वीकारल्यावर नवा करार स्थापन झाला आणि तो अमलातही आला. तिथून पुढे महायाजक येशूने नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून सेवा करायला सुरुवात केली.—इब्री ७:२५; ८:१-३, ६; ९:१३-१५.