व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३०

सत्याच्या मार्गावर चालत राहा

सत्याच्या मार्गावर चालत राहा

“माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही.”—३ योहान ४.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश *

१. तिसरे योहान ३, ४ या वचनांनुसार कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतो?

प्रेषित योहानने अनेकांना सत्य शिकायला मदत केली होती. ते ख्रिस्ती अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत हे जाणून त्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो का? त्याच्यासाठी ते विश्‍वासू ख्रिस्ती त्याच्या मुलांसारखेच होते. त्यांच्यासमोर अनेक समस्या होत्या आणि त्यांचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी योहान खूप मेहनत घेत होता. त्याच प्रकारे आपली मुलं किंवा आपण ज्यांना सत्य शिकायला मदत केली आहे, ते जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करतात आणि त्याची सेवा करत राहतात तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो.—३ योहान ३, ४ वाचा.

२. योहानने विश्‍वासू ख्रिश्‍चनांना पत्रं का लिहिली?

योहान पात्म बेटावर कैदेत होता. मग तिथून सुटका झाल्यानंतर तो इफिसमध्ये किंवा त्याच्या जवळपास राहत असावा. तो तिथे असताना इ.स. ९८ मध्ये यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्याला तीन पत्रं लिहिण्याची प्रेरणा दिली. विश्‍वासू ख्रिश्‍चनांना येशूवरचा आपला विश्‍वास टिकवून ठेवण्याचं आणि सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी ही पत्रं लिहिण्यात आली.

३. या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा केली जाईल?

येशूच्या प्रेषितांपैकी फक्‍त योहान आता जिवंत होता. योहानला ख्रिश्‍चनांची खूप काळजी वाटत होती. कारण त्या वेळी मंडळीत ख्रिस्तविरोधी शिरले होते आणि त्यांच्या खोट्या शिकवणींचा ख्रिश्‍चनांवर वाईट परिणाम होत होता. * (१ योहा. २:१८, १९, २६) हे धर्मत्यागी लोक देवावर विश्‍वास असल्याचा दावा करत होते, पण त्याच्या आज्ञा मात्र पाळत नव्हते. त्यामुळे योहानने आपल्या पत्रात त्यांना सल्ला दिला. त्या सल्ल्यावर आता आपण चर्चा करू या. तसंच, आपण तीन प्रश्‍नांची उत्तरंही पाहू या. ती म्हणजे: सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा काय अर्थ होतो? आपल्यासमोर कोणते अडथळे येऊ शकतात? आणि आपण एकमेकांना सत्यात टिकून राहायला कशी मदत करू शकतो?

सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा काय अर्थ होतो?

४. १ योहान २:३-६ आणि २ योहान ४, ६ या वचनांनुसार सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपण बायबलमध्ये दिलेलं सत्य जाणून घेतलं पाहिजे. त्यासोबतच, आपण यहोवाच्या आज्ञांचं पालनही केलं पाहिजे. (१ योहान २:३-६; २ योहान ४,  वाचा.) या बाबतीत येशूने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्यामुळे यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे येशूच्या पावलांचं शक्य तितक्या जवळून अनुकरण करणं.—योहा. ८:२९; १ पेत्र २:२१.

५. आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी असली पाहिजे?

सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपल्याला याची पक्की खातरी असली पाहिजे, की यहोवा हा सत्याचा देव आहे; म्हणजे, त्याचं वचन बायबल यात त्याने जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे याची आपल्याला खातरी असली पाहिजे. तसंच, येशू हाच मसीहा आहे याचीही आपल्याला खातरी असली पाहिजे. कारण येशूला देवाच्या राज्याचा राजा म्हणून निवडण्यात आलं आहे यावर आज अनेक जण शंका घेतात. योहानने आपल्या पत्रांत ख्रिश्‍चनांना ‘फसवणूक करणाऱ्‍यांबद्दल’ इशारा दिला. यहोवा आणि येशू यांच्याबद्दल असलेल्या सत्यावर ज्यांचा पूर्णपणे विश्‍वास नव्हता अशांना ते सहज फसवतील असं योहान म्हणाला. (२ योहा. ७-११) योहानने लिहिलं: “येशू हा ख्रिस्त आहे ही गोष्ट जो नाकारतो तो जर खोटारडा नाही, तर मग कोण आहे?” (१ योहा. २:२२) फसवणूक करणाऱ्‍यांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे, देवाच्या वचनाचा अभ्यास करणं. त्यामुळे आपण यहोवाला आणि येशूला ओळखू शकतो. (योहा. १७:३) तेव्हाच आपल्याला पक्की खातरी होईल की आपण जे मानतो तेच सत्य आहे.

आपल्यासमोर कोणते अडथळे येऊ शकतात?

६. तरुणांसमोर कोणता एक अडथळा येऊ शकतो?

मानवी विचारधारा  यापासून सर्वच ख्रिश्‍चनांनी सावध असलं पाहिजे. (१ योहा. २:२६) खासकरून तरुणांनी या धोक्यापासून सावध असलं पाहिजे. फ्रान्समध्ये राहणारी २५ वर्षांची ऍलेक्सिया * नावाची बहीण म्हणते: “मी शाळेत असताना आम्हाला उत्क्रांतिवादाबद्दल आणि इतर मानवी तत्त्वज्ञानाबद्दल शिकवलं जायचं. त्यामुळे सत्याबद्दल माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. उत्क्रांतिवाद आणि मानवी शिकवणी योग्य आहेत असं काही वेळा मला वाटायचं. पण मग मी विचार केला की शाळेत जे शिकवलं जातं त्यावर मी नुसतंच डोळे झाकून विश्‍वास ठेवायला नको. मी यहोवाचंसुद्धा ऐकलं पाहिजे.” ऍलेक्सियाने लाइफ—हाउ डिड इट गेट हियर? बाय एवल्यूशन ऑर बाय क्रिएशन?  या पुस्तकाचा अभ्यास केला. आणि काही आठवड्यांतच तिच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. त्याबद्दल ऍलेक्सिया म्हणते: “बायबलमध्ये जे सांगितलं आहे तेच सत्य आहे याची मी स्वतःला खातरी पटवून दिली. आणि बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगल्यामुळे मला शांती आणि आनंद मिळू शकतो याची मला जाणीव झाली.”

७. आपण कोणत्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे आणि का?

आपण सर्वांनीच दुहेरी जीवन जगण्यापासून सावध असलं पाहिजे; मग आपण तरुण असोत किंवा वृद्ध. योहाननेसुद्धा म्हटलं की सत्याच्या मार्गावर चालत असताना आपण अनैतिक जीवन जगू नये. (१ योहा. १:६) आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे काही करतो ते यहोवा पाहतो. म्हणून यहोवाला आनंद होईल असंच जीवन आपण जगलं पाहिजे. आपण गुप्तपणे करत असलेल्या गोष्टी लोकांना दिसत नसल्या तरी यहोवाला त्या दिसतात.—इब्री ४:१३.

८. आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

पापाबद्दल असलेला जगाचा दृष्टिकोन  आपण टाळला पाहिजे. प्रेषित योहानने म्हटलं: “‘आपल्यामध्ये पाप नाही,’ असे जर आपण म्हटले, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत.” (१ योहा. १:८) योहानच्या दिवसांत धर्मत्यागी लोक असा दावा करत होते की एक व्यक्‍ती जाणूनबुजून पाप करत राहू शकते आणि त्याच वेळी यहोवासोबतची मैत्रीही टिकवून ठेवू शकते. असाच विचार करणाऱ्‍या लोकांमध्ये आज आपण राहत आहोत. आज अनेक जण देवावर विश्‍वास असल्याचा दावा करतात, पण पापाबद्दल यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र त्यांना मान्य नसतो. खासकरून लैंगिक संबंधाबद्दल. या बाबतीत यहोवाने मानवांसाठी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. पण जगातले काही लोक असा विचार करतात, की आपल्याला या मर्यादा पाळण्याची गरज नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण करू शकतो, जसं जगायचं आहे तसं जगू शकतो.

तरुणांनो, एखादी गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे असं यहोवा का म्हणतो हे माहीत करून घ्या. त्यामुळे तुम्ही चुकीच्या गोष्टी का करत नाही, हे तुम्हाला इतरांना समजावून सांगता येईल (परिच्छेद ९ पाहा) *

९. बायबल जे शिकवतं त्याप्रमाणे तरुणांनी का वागलं पाहिजे?

शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी बहुतेक लोकांचा लैंगिक संबंधाविषयीचा दृष्टिकोन चुकीचा असतो. आणि असाच दृष्टिकोन बाळगण्याचा दबाव तरुण ख्रिश्‍चनांवर येऊ शकतो. ऍलेक्झँडर नावाच्या बांधवावर असाच दबाव आला होता. तो म्हणतो: “माझ्यासोबत शिकणाऱ्‍या काही मुलींनी माझ्यावर शरीरसंबंध ठेवण्याचा दबाव टाकला. मी त्यांना नाही म्हणालो तेव्हा त्या मला म्हणाल्या की ‘तुला गॅलफ्रेंड नाहीये, म्हणजे तू नक्कीच समलैंगिक असशील.’” अशा प्रकारच्या परीक्षा तुमच्यासमोरही येऊ शकतात. पण बायबल जे सांगतं त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुमचा आत्मसन्मान टिकून राहील, तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमचा विवेक शुद्ध राहील आणि यहोवासोबतची तुमची मैत्रीसुद्धा टिकून राहील. तुम्ही जितक्या वेळा मोहाचा प्रतिकार कराल तितकं तुम्हाला योग्य ते करणं सोपं जाईल. लक्षात असू द्या की लैंगिकतेबद्दल जगाचा चुकीचा दृष्टिकोन हा सैतानाकडून आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जगातल्या लोकांसारखा दृष्टिकोन बाळगायचं टाळता तेव्हा खरंतर तुम्ही “त्या दुष्टावर विजय” मिळवत असता.—१ योहा. २:१४.

१०. पहिले योहान १:९ हे वचन आपल्याला शुद्ध विवेकाने यहोवाची सेवा करत राहायला कशी मदत करू शकतं?

१० योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा हक्क यहोवाला आहे ही गोष्ट आपण मान्य करतो. आणि म्हणून आपण योग्य ते करण्याचाच प्रयत्न करतो. पण आपल्याकडून कधी पाप घडलं तर आपण प्रार्थनेत यहोवाकडे ते कबूल केलं पाहिजे. (१ योहान १:९ वाचा.) आणि जर आपल्या हातून कधी गंभीर पाप घडलं तर आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घेतली पाहिजे. कारण यहोवाने त्यांना आपली काळजी घेण्यासाठी नेमलं आहे. (याको. ५:१४-१६) पण पापाची क्षमा मिळाल्यानंतर आपण सतत स्वतःला दोष देत राहू नये. का बरं? कारण आपल्या प्रेमळ पित्याने आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी आपल्या पुत्राचं खंडणी बलिदान दिलं आहे. यहोवा म्हणतो की आपण जर मनापासून पश्‍चात्ताप केला तर तो आपल्याला माफ करेल. आणि त्याने जर तसं म्हटलं आहे तर तो नक्कीच तसं करेल. त्यामुळे शुद्ध विवेकाने यहोवाची सेवा करत राहणं आपल्याला शक्य होतं.—१ योहा. २:१, २, १२; ३:१९, २०.

११. आपला विश्‍वास कमजोर करणाऱ्‍या शिकवणींपासून आपण आपलं संरक्षण कसं करू शकतो?

११ आपण धर्मत्यागी शिकवणी  नाकारल्या पाहिजेत. ख्रिस्ती मंडळीची सुरुवात झाली तेव्हापासून सैतानाने नेहमीच ख्रिश्‍चनांचा विश्‍वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय यांतला फरक ओळखायला आपण शिकलं पाहिजे. * यहोवावरचा आपला विश्‍वास कमजोर करण्यासाठी आणि भाऊबहिणींवर असलेलं आपलं प्रेम कमी करण्यासाठी आपले विरोधी इंटरनेट किंवा सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरवू शकतात. पण या गोष्टींमागे सैतानाचा हात आहे हे कधीही विसरू नका. आणि अशा खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका.—१ योहा. ४:१, ६; प्रकटी. १२:९.

१२. आपण बायबलमधून शिकलेल्या सत्यांवरचा आपला विश्‍वास आणखी का वाढवला पाहिजे?

१२ सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी येशूवर असलेला आपला भरवसा आपण वाढवला पाहिजे. तसंच, देव आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा उपयोग करत आहे यावर आपला भरवसा असला पाहिजे. याशिवाय, यहोवा आपल्या संघटनेचं मार्गदर्शन करण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचाच उपयोग करत आहे यावरही आपला भरवसा असला पाहिजे. (मत्त. २४:४५-४७) पण हे आपण कसं करू शकतो? त्यासाठी आपण बायबलचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. असं केल्यामुळे आपला विश्‍वास अशा एका झाडासारखा होईल ज्याची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात. पौलने कलस्सैकरांना लिहिताना असंच काहीसं लिहिलं. तो म्हणाला: “तुम्ही प्रभू, ख्रिस्त येशू याला स्वीकारले, तसेच त्याच्यासोबत ऐक्यात राहून पुढेही चालत राहा, . . . त्याच्यात मुळावलेले असे व्हा आणि वाढत जा, तसेच विश्‍वासात स्थिर व्हा.” (कलस्सै. २:६, ७) आपण जर आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली तर सैतान आणि त्याला साथ देणारे कधीच आपल्याला सत्याच्या मार्गावर चालत राहण्यापासून रोखू शकणार नाहीत.—२ योहा. ८, ९.

१३. आपण कशाची अपेक्षा करू शकतो आणि का?

१३ जग आपला द्वेष करेल ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. (१ योहा. ३:१३) योहानने म्हटलं: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहा. ५:१९) या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतसा सैतानाचा राग आणखी वाढत आहे. (प्रकटी. १२:१२) धर्मत्यागी लोकांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टी आणि अनैतिकता यांसारख्या छुप्या मार्गांनीच सैतान आपल्यावर हल्ला करत नाही, तर तो उघडपणेसुद्धा आपल्यावर हल्ला करतो; जसं की, क्रूरपणे केलेला छळ. आपलं प्रचारकार्य बंद करण्यासाठी आणि आपला विश्‍वास कमजोर करण्यासाठी सैतानाजवळ खूप कमी वेळ आहे हे त्याला माहीत आहे. त्यामुळे काही देशांत आपल्या कार्यावर पूर्णपणे किंवा काही प्रमाणात बंदी घालण्यात आली आहे या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. असं असलं तरी त्या देशांतले आपले भाऊबहीण विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. ते दाखवून देत आहेत की सैतानाने यहोवाच्या सेवकांवर कितीही हल्ले केले तरी ते यहोवाला विश्‍वासू राहू शकतात.

एकमेकांना सत्यात टिकून राहायला मदत करा

१४. आपण कोणत्या एका मार्गाने आपल्या भाऊबहिणींना सत्यात टिकून राहायला मदत करू शकतो?

१४ आपल्या भाऊबहिणींना सत्यात टिकून राहायला मदत करण्यासाठी आपण त्यांना कृतीतून प्रेम दाखवलं पाहिजे . (१ योहा. ३:१०, ११, १६-१८) जीवनात सगळं काही सुरळीत चाललेलं असतं फक्‍त तेव्हाच नाही तर समस्या येतात तेव्हासुद्धा आपण त्यांच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे. तुमच्या मंडळीत अशी एखादी व्यक्‍ती आहे का जिच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे? तुम्ही तिचं सांत्वन किंवा तिला व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकता का? किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वकाही गमावलेल्या आपल्या भाऊबहिणींना तुम्ही मदत करू शकता का? त्यांची घरं बांधायला किंवा राज्य सभागृहं बांधायला तुम्ही मदत करू शकता का? आपल्या भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे हे फक्‍त शब्दांतून नाही, तर कृतीतून दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे.

१५. १ योहान ४:७, ८ या वचनांनुसार आपण काय करणं गरजेचं आहे?

१५ आपण आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो तेव्हा हे दाखवून देतो की आपण आपल्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याचं अनुकरण करत आहोत. (१ योहान ४:७, ८ वाचा.) प्रेम दाखवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे एकमेकांना क्षमा करणं . समजा मंडळीतली एखादी व्यक्‍ती आपल्याला दुखावते, पण नंतर माफीही मागते. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? झालं गेलं सगळं विसरून आपण त्यांना माफ केलं पाहिजे. असं करून आपण दाखवून देऊ की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे. (कलस्सै. ३:१३) ऑल्डो नावाच्या बांधवासमोर अशीच एक परिस्थिती आली. एका बांधवाबद्दल त्याला फार आदर होता. पण त्या बांधवाने आपल्या संस्कृतीबद्दल काहीतरी वाईट बोलल्याचं ऑल्डोच्या कानावर आलं. तो म्हणतो: “या बांधवाबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना येऊ नये म्हणून मी यहोवाला सतत प्रार्थना केली.” यासोबतच ऑल्डोने आणखी एक पाऊल उचललं. त्याने त्या बांधवासोबत प्रचाराला जायचं ठरवलं. त्याच्यासोबत प्रचारात काम करत असताना ऑल्डोने त्या बांधवाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या. त्याबद्दल ऑल्डो म्हणतो: “त्या बांधवाच्या बोलण्यामुळे मला किती वाईट वाटलं हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली. तो ज्या प्रकारे बोलला त्यावरून मला जाणवलं की त्याला किती पस्तावा झाला आहे. आणि झालं गेलं सगळं विसरून आम्ही पुन्हा चांगले मित्र बनलो.”

१६-१७. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

१६ प्रेषित योहानचं भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं आणि त्यांनी विश्‍वासात मजबूत राहावं अशी त्याची इच्छा होती. त्याने आपल्या तीन पत्रांमध्ये जो सल्ला दिला त्यातून त्याची काळजी आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. योहानप्रमाणेच, येशूसोबत राज्य करणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचंसुद्धा आपल्यावर प्रेम आहे आणि ते आपली काळजी करतात. हे जाणून आपल्याला खरंच खूप आनंद होतो!—१ योहा. २:२७.

१७ या लेखात आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या आपण नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू या. आपण सत्याच्या मार्गावर चालत राहण्याचा, म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक पैलूत यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा पक्का निर्धार करू या. त्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी सत्य आहेत याची स्वतःला खातरी पटवून द्या. येशूवर असलेला आपला भरवसा मजबूत करा. मानवी विचारधारेचा आणि धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींचा विरोध करा. दुहेरी जीवन जगू नका. तसंच, जे लोक चुकीच्या गोष्टी करण्याचा तुमच्यावर दबाव आणतात त्यांचं ऐकू नका. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जगण्याचा प्रयत्न करा. भाऊबहीण आपलं मन दुखावतात तेव्हा त्यांना क्षमा करा. आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा. असं करून, आपण आपल्या भाऊबहिणींना विश्‍वासात मजबूत राहायला मदत करू शकतो. मग जीवनात कितीही समस्या आल्या तरी आपण सत्याच्या मार्गावर चालत राहू!

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

^ परि. 5 सैतान हा खोटेपणाचा बाप आहे आणि या जगावर सध्या त्याचंच राज्य आहे. त्यामुळे आज सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो. पहिल्या शतकाच्या शेवटी राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनासुद्धा असाच संघर्ष करावा लागला होता. त्यांना मदत करण्यासाठी यहोवाने प्रेषित योहानला तीन पत्रं लिहिण्याची प्रेरणा दिली. त्या पत्रांतून आज आपल्यालाही मदत होते. त्यांतून आपल्याला दिसून येईल की सत्याच्या मार्गावर चालत असताना आपल्यासमोर कोणकोणते अडथळे येऊ शकतात, आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो.

^ परि. 6 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 11तुमच्याजवळ संपूर्ण माहिती आहे का?” हा ऑगस्ट २०१८ च्या टेहळणी बुरूज  अंकातला अभ्यास लेख पाहा.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: शाळेत एका बहिणीला सतत अशा गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात ज्यांवरून समलैंगिक असण्यात काहीच गैर नाही असं भासवलं जातं. (काही देशांमध्ये मेघधनुष्यातले सात रंग हे समलैंगिकतेचं प्रतिक मानले जातात.) यहोवा जे सांगतो तेच योग्य आहे यावरचा आपला विश्‍वास पक्का करण्यासाठी ती बहीण नंतर आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करते. यामुळे योग्य निर्णय घ्यायला तिला मदत होते.