व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २७

यहोवासारखा धीर धरा

यहोवासारखा धीर धरा

“जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.”—लूक २१:१९.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

सारांश *

१-२. यशया ६५:१६, १७ ही वचनं आपल्याला समस्यांचा धीराने सामना करायला कशी मदत करतात?

२०१७ च्या प्रांतीय अधिवेशनाचा विषय होता, “धीर सोडू नका!” समस्यांचा धीराने सामना कसा करायचा हे त्या अधिवेशनात आपण शिकलो होतो. त्या अधिवेशनाला आता चार वर्षं झाली. आणि सैतानाच्या या दुष्ट जगात आपण अजूनही समस्यांचा सामना करत आहोत.

अलीकडे तुम्हाला कोणत्या समस्येचा सामना करावा लागला? कुटुंबातल्या किंवा जवळच्या व्यक्‍तीच्या मृत्यूचा? एका गंभीर आजाराचा? वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या समस्यांचा? नैसर्गिक आपत्तीचा? हिंसेचा किंवा छळाचा? की, कोव्हिड-१९ यासारख्या महामारीच्या परिणामांचा? त्यामुळे या सगळ्या समस्या नाहीशा होतील, त्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या वेळी कोणत्याही समस्या आपल्याला आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच आपल्याला त्यांचा सामना करावा लागणार नाही.—यशया ६५:१६, १७ वाचा.

३. आज आपल्याला कशाची गरज आहे, आणि का?

आजच्या काळात जीवन जगणं खूप कठीण झालं आहे. आणि येणाऱ्‍या काळात तर ते आणखीनच कठीण होऊ शकतं. (मत्त. २४:२१) त्यामुळे आपल्याला धीर दाखवण्याची जास्त गरज आहे. कारण, “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल,” असं येशूने म्हटलं होतं. (लूक २१:१९) समस्यांचा धीराने सामना करण्याच्या बाबतीत आपण इतरांकडून बरंच काही शिकू शकतो.

४. धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे असं आपण का म्हणू शकतो?

धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. पण तुम्ही म्हणाल, की ‘यहोवाला धीर धरायची काय गरज आहे?’ जरा याचा विचार करा. हे संपूर्ण जग सैतानाच्या हातात आहे आणि त्यामुळे सगळीकडे समस्याच आहेत. यहोवाला हवं तर तो लगेच या समस्या सोडवू शकतो. पण तो तसं करत नाही. तो एका ठरवलेल्या दिवसाची वाट पाहत आहे. (रोम. ९:२२) सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी यहोवाने जी वेळ ठरवली आहे तोपर्यंत यहोवा धीर धरत आहे. अशा कोणत्या नऊ गोष्टी आहेत ज्यांबद्दल यहोवा धीर धरत आहे ते आता आपण पाहू या.

यहोवा कोणकोणत्या बाबतींत धीर धरत आहे?

५. यहोवाच्या नावाची बदनामी कशी करण्यात आली, आणि त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

आपल्या नावाची बदनामी.  कोणी आपल्या नावाची बदनामी करावी असं यहोवाला वाटत नाही. सगळ्यांनी त्याचा आदर करावा असं त्याला वाटतं. (यश. ४२:८) पण गेल्या सहा हजार वर्षांपासून देवाच्या नावाची बदनामी केली जात आहे. (स्तो. ७४:१०, १८, २३) याची सुरुवात एदेन बागेत झाली. तिथे दियाबलाने, म्हणजे निंदा करणाऱ्‍याने देवावर खोटा आरोप लावला. त्याने म्हटलं, की आदाम आणि हव्वाला आनंदी राहण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे तीच देवाने त्यांना दिली नाही. (उत्प. ३:१-५) तेव्हापासून यहोवावर असा खोटा आरोप लावण्यात आला आहे, की मानवांना आनंदी राहायला खरंच ज्या गोष्टींची गरज आहे त्या तो त्यांना देत नाही. आपल्या पित्याच्या नावाची अशी बदनामी होत असलेली येशूला पाहवत नव्हती. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.”—मत्त. ६:९.

६. राज्य करण्याच्या अधिकाराचा वाद मिटवण्यासाठी यहोवाने इतका वेळ का जाऊ दिला?

आपल्या अधिकाराचा विरोध.  स्वर्गात आणि पृथ्वीवर राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार यहोवालाच आहे. आणि शासन करण्याची त्याचीच पद्धत सगळ्यात चांगली आहे. (प्रकटी. ४:११) पण सैतानाने खोटं बोलून स्वर्गदूतांना आणि मानवांना असा विचार करायला लावला, की देवाला आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही. हा वाद मिटवण्यासाठी वेळ लागणार होता. म्हणून देवाने मानवांना बऱ्‍याच काळापर्यंत राज्य करू दिलं. त्यावरून त्यांना याची जाणीव होणार होती, की देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. (यिर्म. १०:२३) देवाने दाखवलेल्या या धीरामुळे हा वाद एकदाच कायमचा मिटवला जाईल. मग सगळ्यांना कळून येईल, की राज्य करण्याची देवाचीच पद्धत सगळ्यात चांगली आहे. आणि त्याचंच राज्य पृथ्वीवर खरी शांती आणि सुरक्षा आणेल.

७. यहोवाविरुद्ध कोणी-कोणी बंड केलं, आणि शेवटी तो त्यांचं काय करेल?

आपल्या काही मुलांनी केलेलं बंड.  यहोवाने स्वर्गदूतांना आणि मानवांना परिपूर्ण बनवलं होतं. त्यांच्यात कोणताही दोष नव्हता. पण सैतानाने, म्हणजे विरोध करणाऱ्‍याने आदाम आणि हव्वाला यहोवाविरुद्ध भडकवलं. इतर काही स्वर्गदूतांनी आणि मानवांनीही सैतानाला साथ दिली. (यहू. ६) पुढे देवाने निवडलेल्या इस्राएली लोकांनीसुद्धा तेच केलं. त्यांनी यहोवाला नाकारलं आणि ते खोट्या दैवतांची उपासना करू लागले. (यश. ६३:८, १०) अशा प्रकारे त्यांनी यहोवाचा मोठा विश्‍वासघात केला. तरी त्याने हे सगळं सहन केलं, आणि आजही करत आहे. पण यहोवा त्या दिवसाची धीराने वाट पाहत आहे जेव्हा तो सगळ्या बंडखोरांचा नाश करेल. मग, त्याला आणि त्याच्या विश्‍वासू सेवकांना खूप आनंद होईल; कारण पुन्हा कधीच त्यांना वाईट गोष्टी सहन कराव्या लागणार नाहीत.

८-९. यहोवावर कोणते आरोप लावण्यात आले आहेत, आणि ते खोटे आहेत हे दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो?

सैतानाने केलेले खोटे आरोप.  सैतानाने असा खोटा आरोप लावला, की ईयोब आणि इतर विश्‍वासू सेवक फक्‍त स्वार्थापोटी यहोवाची उपासना करतात. (ईयो. १:८-११; २:३-५) आजही तो आपल्यावर असेच आरोप लावतो. (प्रकटी. १२:१०) पण आपण जेव्हा समस्यांचा धीराने सामना करतो आणि यहोवावरच्या प्रेमामुळे त्याला विश्‍वासू राहतो तेव्हा आपण हे दाखवतो, की सैतानाने लावलेले आरोप खोटे आहेत. जर आपण धीर दाखवला तर यहोवाने ईयोबला जसे आशीर्वाद दिले तसेच तो आपल्यालाही देईल.—याको. ५:११.

इतकंच नाही, तर सैतान धर्मगुरूंचा वापर करून यहोवावर असे खोटे आरोप लावतो, की तो क्रूर आहे आणि तोच माणसांवर दुःख आणतो. मुलांचा मृत्यू होतो तेव्हा काही जण तर असंही म्हणतात, की देवाला त्यांची गरज होती, म्हणून त्याने त्यांना नेलं. पण हे किती खोटं आहे! कारण आपल्याला माहीत आहे, की यहोवा एक प्रेमळ पिता आहे आणि तो असं कधीच करणार नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादा गंभीर आजार होतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा आपण कधीच यहोवाला दोष देणार नाही. उलट, आपल्याला असा भरवसा आहे, की एक दिवस तो सगळ्या आजारांना बरं करेल आणि मृतांना जिवंत करेल. म्हणून यहोवा किती प्रेमळ आहे हे आपण लोकांना सांगतो. असं केल्यामुळे टोमणे मारणाऱ्‍या सैतानाला यहोवा उत्तर देऊ शकेल.—नीति. २७:११.

१०. स्तोत्र २२:२३, २४ या वचनांतून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं?

१० आपल्या सेवकांना होणारा त्रास.  यहोवा खूप दयाळू देव आहे. त्यामुळे त्याच्या सेवकांना छळामुळे, आजारपणामुळे किंवा अपरिपूर्णतेमुळे दुःख सहन करावं लागतं तेव्हा त्याला ते पाहवत नाही. (स्तोत्र २२:२३, २४ वाचा.) आपल्याला दुःखात पाहून त्यालाही दुःख होतं. म्हणूनच त्याला हे सगळं काढून टाकायचं आहे. आणि लवकरच तो तसं करणार आहे. (निर्गम ३:७, ८; यशया ६३:९ पडताळून पाहा.) “तो [आपल्या] डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटी. २१:४.

११. ज्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

११ आपल्या मित्रांपासून झालेली ताटातूट.  ज्या विश्‍वासू स्त्री-पुरुषांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं? त्यांना पाहण्यासाठी तो आतुर आहे. (ईयो. १४:१५) त्याचा मित्र अब्राहाम याची त्याला किती आठवण येत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? (याको. २:२३) किंवा मोशे, ज्याच्याशी तो समोरासमोर बोलायचा त्याच्याशी पुन्हा बोलण्यासाठी तो किती उत्सुक असेल याचा तुम्ही विचार करू शकता का? (निर्ग. ३३:११) तसंच, दावीद आणि इतर स्तोत्रकर्त्यांची मधुर स्तुतिगीतं ऐकण्यासाठी त्याचे कान किती आसुसलेले असतील याचीही कल्पना करा. (स्तो. १०४:३३) देवाचे हे सगळे मित्र मृत्यूच्या झोपेत असले, तरी तो त्यांना विसरलेला नाही. (यश. ४९:१५) त्यांची एकेक गोष्ट त्याच्या लक्षात आहे. त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत. (लूक २०:३८) एक दिवस तो त्यांना जिवंत करेल तेव्हा ते परत त्याची उपासना करू शकतील आणि त्याला प्रार्थना करू शकतील. हे पाहून यहोवाला खूप आनंद होईल. तुमच्याही जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल, तर या गोष्टींवर विचार केल्यामुळे तुमचं दुःख हलकं होऊ शकतं, आणि तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

१२. आज होत असलेल्या दुष्टाईमुळे यहोवाला कसं वाटतं?

१२ दुष्ट लोक करत असलेला अत्याचार.  एदेन बागेत झालेल्या बंडाळीमुळे पुढे जाऊन परिस्थिती खूप खराब होईल हे यहोवाला माहीत होतं. आज जगात सगळीकडे दुष्टाई, अन्याय आणि हिंसाच आहे. हे पाहून यहोवाला राग येतो. पण जे कमजोर आहेत, स्वतःचं सरंक्षण करू शकत नाहीत, जसं की अनाथ आणि विधवा अशांची त्याला खासकरून दया येते. (जख. ७:९, १०) आणि जेव्हा त्याच्या विश्‍वासू सेवकांवर जुलूम होतो, खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलं जातं, तेव्हा तर त्याला खूप जास्त त्रास होतो. दुष्ट लोकांमुळे जे लोक अत्याचार सहन करत आहेत त्या सगळ्यांवर यहोवा खूप प्रेम करतो याची तुम्ही खातरी ठेवू शकता.

१३. आज जगात कोणती वाईट कामं पाहायला मिळतात, आणि त्यांबद्दल देव काय करणार आहे?

१३ लोकांची अनैतिक लैंगिक कामं.  मानवांना अशा प्रकारे बनवलं आहे, की ते देवाचं अनुकरण करू शकतात. पण सैतान त्यांना अनैतिक कामं करायला लावतो. नोहाच्या काळात “यहोवा देवाने पाहिलं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला आहे.” आणि त्यामुळे “पृथ्वीवर मानवाला निर्माण केल्याचा यहोवाला पस्तावा झाला आणि त्याला मनापासून वाईट वाटलं.” (उत्प. ६:५, ६, ११) त्यानंतर जगाची परिस्थिती चांगली झाली का? मुळीच नाही. उलट, आज स्त्री-पुरुष आणि समलैंगिक लोक सर्व प्रकारची अनैतिक कामं करत आहेत. ते पाहून सैतानाला खूप आनंद होतो. (इफिस. ४:१८, १९) आणि खासकरून यहोवाची उपासना करणारे लोक अशी कामं करतात तेव्हा तर त्याला आणखीनच आनंद होतो. पण, यहोवा खूप काळ या गोष्टी सहन करणार नाही. तो लवकरच या गोष्टी करणाऱ्‍यांचा नाश करणार आहे.

१४. देवाने बनवलेल्या पृथ्वीचं आज मानव काय करत आहे?

१४ पृथ्वीची होत असलेली नासाडी.  “माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान केलं आहे.” (उप. ८:९) त्यासोबतच त्याने पृथ्वीचं आणि प्राण्यांचंही नुकसान केलं आहे. यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे माणूस त्यांची काळजी घेत नाही. (उत्प. १:२८) काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे, की माणूस आज जे काही करत आहे त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये प्राण्यांच्या आणखी दहा लाख जाती नाहीशा होऊ शकतात. त्यामुळे लोकांना वाटतं, की निसर्ग धोक्यात आला आहे, आणि म्हणून त्यांना काळजी वाटते. पण यहोवाने अभिवचन दिलं आहे, की तो “पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश” करेल आणि या पृथ्वीला नंदनवनात बदलेल.—प्रकटी. ११:१८; यश. ३५:१.

धीराच्या बाबतीत आपण यहोवाकडून काय शिकू शकतो?

१५-१६. कोणती गोष्ट आपल्याला यहोवासारखाच धीर धरायला मदत करेल? उदाहरण देऊन सांगा.

१५ विचार करा, गेल्या हजारो वर्षांपासून यहोवा किती काही सहन करत आला आहे. (“ यहोवा कोणकोणत्या गोष्टी सहन करत आहे?” ही चौकट पाहा.) यहोवा या दुष्ट जगाचा अंत कधीच करू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने धीर धरला आणि त्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला. तो कसा? हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. समजा डॉक्टर एका जोडप्याला सांगतो, की त्यांच्या होणाऱ्‍या बाळाला आरोग्याच्या गंभीर समस्या असतील आणि ते जास्त दिवस जगणार नाही. पण तरीसुद्धा ते आईवडील आपल्या बाळाला या जगात येऊ देतात. त्याची काळजी घेणं आपल्याला कठीण जाणार आहे हे माहीत असूनही ते हा निर्णय घेतात. बाळावर प्रेम असल्यामुळे ते काहीही सहन करायला तयार असतात, आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत.

१६ तसंच, आदाम आणि हव्वापासून जन्मलेली सगळी मुलं अपरिपूर्ण आहेत. तरीही यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो. (१ योहा. ४:१९) पण यहोवा, उदाहरणात सांगितलेल्या आईवडिलांसारखा नाही, जे आपल्या बाळाचं दुखणं दूर करू शकत नाहीत. तो लवकरच मानवाचं सगळं दुःख दूर करणार आहे, आणि त्यासाठी त्याने एक वेळ ठरवली आहे. (मत्त. २४:३६) तोपर्यंत आपल्यावरचं त्याचं प्रेम आपल्याला धीर धरायला मदत करेल.

१७. (क) इब्री लोकांना १२:२, ३ मध्ये येशूबद्दल काय सांगितलं आहे? (ख) त्यामुळे आपल्याला कशी मदत होते?

१७ धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. येशूनेही आपल्या पित्यासारखाच धीर धरला आणि बऱ्‍याच गोष्टी सहन केल्या. त्याने आपल्यासाठी लोकांचं वाईट बोलणं, अपमान आणि वधस्तभांवर मृत्यूदेखील सहन केला. (इब्री लोकांना १२:२, ३ वाचा.) हे सगळं सहन करण्याची ताकद त्याला यहोवाच्या उदाहरणामुळेच मिळाली. तशीच ताकद आपल्यालाही मिळू शकते.

१८. २ पेत्र ३:९ या वचनात सांगितल्याप्रमाणे यहोवाच्या धीरामुळे काय शक्य झालं आहे?

१८ २ पेत्र ३:९ वाचा. या दुष्ट जगाचा अंत केव्हा करायचा हे यहोवाला माहीत आहे. त्याने दाखवलेल्या धीरामुळे मोठ्या लोकसमुदायातल्या लाखो लोकांना गोळा करणं शक्य झालं आणि आज ते त्याची उपासना करत आहेत. यहोवाच्या धीरामुळे ते जन्माला येऊ शकले, त्याच्यावर प्रेम करू शकले आणि त्याला आपलं जीवन समर्पण करू शकले. आणि त्यासाठी ते यहोवाचे खूप आभारी आहेत. शेवटपर्यंत धीर धरणाऱ्‍या या लाखो लोकांना यहोवा भरभरून आशीर्वाद देईल. त्या वेळी हे दिसून येईल, की धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाने घेतलेला निर्णय योग्यच होता.

१९. आपला निर्धार काय असला पाहिजे, आणि शेवटी आपल्याला काय मिळेल?

१९ धीराने सहन करताना आनंदी कसं राहायचं हे आपण यहोवाकडून शिकतो. सैतानाने इतकं दुःख आणि समस्या निर्माण केल्या, तरीसुद्धा यहोवाने स्वतःवर त्यांचा परिणाम होऊ दिला नाही. तो नेहमी “आनंदी” राहतो. (१ तीम. १:११) यहोवा लवकरच आपल्या नावाची बदनामी दूर करणार आहे, त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करणार आहे, दुष्टाईचा आणि आपल्या सगळ्या समस्यांचा अंत करणार आहे. तोपर्यंत आपणसुद्धा धीराने आणि आनंदाने त्या दिवसाची वाट पाहू या. असं केल्यामुळे पुढे दिलेले शब्द आपल्या सगळ्यांच्या बाबतीत खरे ठरतील: “जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी! कारण परीक्षा पार केल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल. यहोवाने आपल्यावर प्रेम करत राहणाऱ्‍यांना हा मुकुट देण्याचं वचन दिलं आहे.”—याको. १:१२.

गीत ५५ चिरकालाचे जीवन!

^ परि. 5 आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही समस्यांचा सामना करावा लागतो. यांपैकी बऱ्‍याच समस्यांवर सध्या तरी काहीच उपाय नाही. आपल्याला त्या सहन कराव्याच लागतात. पण आपण एकटेच सहन करतो असं नाही. तर आजपर्यंत यहोवासुद्धा अनेक गोष्टी सहन करत आला आहे. त्यांपैकी नऊ गोष्टींबद्दल या लेखात आपण चर्चा करणार आहोत. यहोवाच्या धीरामुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या आणि त्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो याचीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत.