व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

विवाह जोडीदार शोधण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी डेटिंग ॲप्सचा किंवा वेबसाईट्‌सचा वापर करावा का?

लग्न करणाऱ्‍या मुलामुलीने आनंदी राहावं आणि त्यांचं नातं आयुष्यभर टिकावं असं यहोवाला वाटतं. (मत्त. १९:४-६) तुम्ही जर लग्नाचा विचार करत असाल तर तुम्हाला एक चांगला जोडीदार कसा मिळू शकतो? यहोवाने आपल्याला बनवलं आहे. त्यामुळे एका आनंदी विवाहासाठी आपण काय केलं पाहिजे हे तोच आपल्याला सांगू शकतो. त्यासाठी त्याने आपल्याला काही सल्ले दिले आहेत. ते जर आपण पाळले तर आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ. त्यांतले काही सल्ले आता आपण पाहू या.

पहिला सल्ला असा आहे: “हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं आहे आणि ते उतावळं आहे.” (यिर्म. १७:९) हा सल्ला आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. एक मुलगा आणि मुलगी लग्नाच्या हेतूने डेटिंग किंवा भेटीगाठी करतात तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांबद्दल लगेच प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. ते एकमेकांमध्ये इतके गुंतून जाऊ शकतात, की त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. आणि ते जेव्हा भावनेच्या आहारी जाऊन लग्नाचा निर्णय घेतात, तेव्हा परिणाम सहसा वाईट होतात. (नीति. २८:२६) त्यामुळे जोपर्यंत मुलगा-मलगी एकमेकांना चांगलं ओळखत नाहीत तोपर्यंत त्यांनी एकमेकांबद्दल वाटणाऱ्‍या भावना व्यक्‍त करू नयेत किंवा एकमेकांना कोणताही शब्द देऊ नये.

दुसरा सल्ला नीतिवचनं २२:३ मध्ये वाचायला मिळतो. त्यात म्हटलं आहे, “शहाणा धोका पाहून लपतो, पण भोळा पुढे जातो आणि परिणाम भोगतो.” डेटिंग ॲप्स किंवा वेबसाईट्‌स वापरण्यात कोणते धोके असू शकतात? काहींच्या बाबतीत असं घडलं आहे, की या माध्यमांतून त्यांनी अनोळखी लोकांशी मैत्री केली, डेटिंग केलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, की समोरची व्यक्‍ती त्यांच्या भावनांशी नुसतीच खेळत होती. ही खरंच किती दुःखाची गोष्ट आहे! तसंच, असे काही भामटे लोकसुद्धा असतात जे खोटं अकाउन्ट तयार करून भोळ्या लोकांकडून पैसे लुबाडतात. कधीकधी तर हे लोक साक्षीदार असल्याचंसुद्धा सांगतात.

अशा ॲप्सचा किंवा वेबसाईट्‌सचा आणखी एक धोका आहे. काही ॲप्स आणि वेबसाईट्‌स कंप्यूटर प्रोग्रामचा वापर करून तुमच्यासाठी मिळताजुळता जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात. पण असे विवाह यशस्वी होतातच असं नाही. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे तो घेताना माणसाने बनवलेल्या कंप्यूटर प्रोग्रामवर भरवसा ठेवणं कितपत योग्य आहे? त्याऐवजी बायबलचा सल्ला विचारात घेऊन आपण तो निर्णय घेतला पाहिजे. कारण बायबलचे सल्ले कायम भरवशालायक असतात.—नीति. १:७; ३:५-७.

तिसरा सल्ला आपल्याला नीतिवचनं १४:१५ मध्ये वाचायला मिळतो. त्यात म्हटलं आहे, “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो, पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.” एखाद्याला लग्नासाठी होकार देण्याआधी त्याला चांगल्या प्रकारे जाणून घेणं गरजेचं आहे. पण ते ऑनलाईन करणं कठीण असू शकतं. तुम्ही जरी एकमेकांसोबत स्वतःची माहिती शेअर केली आणि बराच वेळ ऑनलाईन बोललात, तरी तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखता असं म्हणता येईल का? काहींना असं वाटलं, की त्यांना त्यांचं खरं प्रेम मिळालं आहे. पण जेव्हा ते त्या व्यक्‍तीला प्रत्यक्षात भेटले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी विचार केला होता तशी ती व्यक्‍ती अजिबात नव्हती.

बायबलमधल्या आणखी एका सल्ल्याकडे लक्ष द्या. स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “फसवणूक करणाऱ्‍यांसोबत मी राहत नाही, ढोंगी लोकांपासून मी दूर राहतो.” (स्तो. २६:४) लोकांनी आपल्याला पसंत करावं म्हणून डेटिंग ॲप्सवर किंवा वेबसाईट्‌सवर स्वतःबद्दल खोटी माहिती देणं चुकीचं नाही असं अनेकांना वाटतं. ते आपलं खरं रूप लपवतात, आणि आपण त्यांच्याशी मेसेजवर बोलतो तेव्हासुद्धा त्यांचं खरं रूप आपल्याला कळत नाही. काही जण तर असंही म्हणतात, की ते यहोवाचे साक्षीदार आहेत. पण अशा वेळी आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे. जसं की, ‘त्या व्यक्‍तीचा बाप्तिस्मा झाला आहे का? यहोवासोबत तिचं चांगलं नातं आहे का? मंडळीत तिचं चांगलं नाव आहे का? मंडळीतल्या भाऊबहिणींसाठी तिचं उदाहरण चांगलं आहे का, की त्यांच्यासाठी तिची “संगती” वाईट आहे? (१ करिंथ. १५:३३; २ तीम. २:२०, २१) आणि बायबलमधल्या तत्त्वांच्या आधारावर तिला लग्न करायची मोकळीक आहे का?’ ही सगळी माहिती ऑनलाईन जाणून घेणं खूप कठीण आहे. त्यासाठी आपण अशा भाऊबहिणींसोबत बोललं पाहिजे जे त्या व्यक्‍तीला चांगल्या प्रकारे ओळखतात. (नीति. १५:२२) कारण एक यहोवाचा साक्षीदार विश्‍वासात नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न करायचा विचारसुद्धा करू शकत नाही.—२ करिंथ. ६:१४; १ करिंथ. ७:३९.

आपण जसं पाहिलं, की डेटिंग ॲप्स किंवा वेबसाईट्‌स वापरण्यात बरेच धोके आहेत. पण एक योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतर अनेक चांगले मार्गसुद्धा आहेत. आपण सभांसाठी, संमेलनांसाठी, अधिवेशनांसाठी आणि इतर कारणांसाठी एकत्र येतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्‍तीला प्रत्यक्ष भेटण्याची आणि ओळखण्याची संधी मिळते.

तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला, तर तुमची ध्येयं एकसारखी आहेत का आणि तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळून येईल

पण काही वेळा अशा प्रकारे एकत्र भेटणं शक्य नसतं. जसं की, कोव्हिड-१९ महामारीच्या या काळात. अशा वेळी आपण ऑनलाईन सभा चालवतो. अशा ऑनलाईन सभांमध्ये लग्न न झालेल्या साक्षीदारांना ओळखण्याची संधी मिळू शकते. ते कशा प्रकारे भाषणं देतात, उत्तरं देतात ते तुम्ही पाहू शकता. (१ तीम. ६:११, १२) तसंच, सभेनंतर ब्रेकआऊट रूममध्येसुद्धा तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. याशिवाय, इतर वेळीही तुम्ही काही साक्षीदारांसोबत ऑनलाईन भेटून वेळ घालवू शकता. त्या वेळी ती व्यक्‍ती इतरांशी कशी वागते, बोलते हे पाहण्याची आणि तिचा खरा स्वभाव जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. (१ पेत्र ३:४) अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना जाणून घेतलं तर तुम्हाला समजेल, की तुमची ध्येयं एकसारखी आहेत का, आणि तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात का?

जोडीदार शोधण्यासाठी एक व्यक्‍ती बायबलचे सल्ले विचारात घेते तेव्हा तिचा विवाह नक्कीच आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. नीतिवचनांतले शब्द किती खरे आहेत हे ते दोघंही अनुभवतील. तिथे असं म्हटलं आहे, “ज्याला चांगली बायको मिळते, त्याला मौल्यवान खजिना सापडतो; त्याच्यावर यहोवाची कृपा असते.” आणि हीच गोष्ट पत्नीच्या बाबतीतही म्हणता येईल.—नीति. १८:२२.