व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २९

आपल्यावर देखरेख करणाऱ्‍या येशूला पाठिंबा द्या!

आपल्यावर देखरेख करणाऱ्‍या येशूला पाठिंबा द्या!

“स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.”​—मत्त. २८:१८.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश *

१. आज यहोवाची काय इच्छा आहे?

 आज संपूर्ण पृथ्वीवर राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला जावा अशी यहोवाची इच्छा आहे. (मार्क १३:१०; १ तीम. २:३, ४) हे काम इतकं महत्त्वाचं आहे, की या कामाचं मार्गदर्शन करायची जबाबदारी त्याने आपल्या प्रिय मुलावर सोपवली आहे. आपल्याला याची खातरी आहे की या कामासाठी येशू अगदी योग्य आहे. आणि अंत येण्याआधी त्याच्या देखरेखीखाली हे काम यहोवाच्या इच्छेप्रमाणे नक्की पूर्ण केलं जाईल.​—मत्त. २४:१४.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आज येशू ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्याला आधात्मिक अन्‍न पुरवत आहे. तसंच, इतिहासातलं प्रचाराचं सगळ्यात मोठं काम पूर्ण करण्यासाठी तो आपल्या लोकांना संघटित करत आहे. (मत्त. २४:४५) हे तो कशा प्रकारे करत आहे, हे या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच येशूला आणि विश्‍वासू दासाला आपल्यापैकी प्रत्येक जण कशा प्रकारे पाठिंबा देऊ शकतो, हेही आपण पाहू या.

येशू प्रचाराच्या कामाची देखरेख करत आहे

३. येशूला कोणता अधिकार देण्यात आलाय?

आज येशू प्रचाराच्या कामाची देखरेख करत आहे. आपण असं का म्हणू शकतो? स्वर्गात जाण्याआधी येशू गालीलमधल्या एका डोंगरावर आपल्या काही विश्‍वासू शिष्यांना भेटला. त्याने त्यांना सांगितलं: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.” आणि यानंतर लगेच तो त्यांना म्हणाला: “म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा.” (मत्त. २८:१८, १९) तर यावरून कळतं, की प्रचाराच्या कामाचं मार्गदर्शन करायचा अधिकारही येशूला देण्यात आलाय.

४. आज आपल्या काळातही प्रचाराच्या कामाचं नेतृत्व येशू करत आहे असं आपण का म्हणू शकतो?

येशूने सांगितलं होतं, की प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम ‘सगळ्या राष्ट्रांमध्ये’ केलं जाईल. आणि या कामात, “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत” तो त्याच्या अनुयायांसोबत असेल असंही तो म्हणाला होता. (मत्त. २८:२०) येशूच्या या शब्दांवरून स्पष्टपणे दिसून येतं, की त्याच्या देखरेखीखाली प्रचाराचं हे काम आपल्या काळापर्यंत चालू राहील.

५. स्तोत्र ११०:३ मधली भविष्यवाणी पूर्ण करण्यात आपला कसा सहभाग आहे?

येशूला या गोष्टीची काळजी नव्हती, की जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला प्रचाराच्या कामासाठी पुरेसे कामकरी असतील की नाही. कारण एका स्तोत्रात दिलेली ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होईल या गोष्टीची त्याला खातरी होती: “तू आपलं सैन्य घेऊन युद्धाला निघशील, त्या दिवशी तुझे लोक स्वेच्छेने पुढे येतील.” (स्तो. ११०:३) जर तुम्हीसुद्धा प्रचाराच्या कामात सहभाग घेत आहात, तर ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही येशूला आणि विश्‍वासू दासाला पाठिंबा देत आहात. प्रचाराचं हे काम पूर्ण होत आहे पण त्यासोबतच या कामात काही आव्हानंसुद्धा आहेत.

६. आज राज्याच्या प्रचारकांना कोणत्या आव्हानाला तोंड द्यावं लागतंय?

पहिलं आव्हान म्हणजे या कार्याला होणारा विरोध. धर्मत्यागी लोकांनी तसंच धार्मिक आणि राजकीय पुढाऱ्‍यांनी आपल्या कामाबद्दल बरीच खोटी माहिती पसरवली आहे. कधीकधी आपले नातेवाईक, ओळखीचे लोक किंवा कामावरचे लोक या चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेवतात. आणि यामुळे ते यहोवाची सेवा आणि प्रचाराचं काम करण्यापासून आपल्याला रोखायचा प्रयत्न करतात. काही देशांमध्ये साक्षीदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांना अटक केली जाते आणि कधीकधी तर त्यांना जेलमध्येही टाकलं जातं. या गोष्टीचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. कारण येशूने आधीच सांगितलं होतं, की “माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.” (मत्त. २४:९) आज आपला द्वेष केला जातो, आपल्या कामाचा विरोध केला जातो, यावरूनच स्पष्ट होतं की आपण यहोवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करत आहोत. (मत्त. ५:११, १२) आपल्याला माहीत आहे, की या विरोधाच्या मागे सैतानाचा हात आहे. पण आपल्याला हेही माहीत आहे की तो येशूइतका शक्‍तिशाली नाही. आपल्या कामाला येशूचा पाठिंबा असल्यामुळे आज आनंदाचा संदेश सगळ्या राष्ट्रांच्या लोकांपर्यंत पोचवला जात आहे.

७. प्रकटीकरण १४:६, ७ मधले शब्द आज पूर्ण होत आहेत हे तुम्हाला कोणत्या गोष्टीवरून दिसून येतं?

आज जगभरातले लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. आणि आपल्या प्रचाराच्या कामात हेसुद्धा एक आव्हान आहे. प्रेषित योहानला दिलेल्या प्रकटीकरणात येशूने सांगितलं होतं की आपल्या दिवसांत या आव्हानावरसुद्धा मात केली जाईल. (प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.) मग येशूचे हे शब्द आज कसे पूर्ण होत आहेत? आज आपण जगाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. jw.org या आपल्या वेबसाईटवर १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबल आधारित साहित्य उपलब्ध आहे. शिष्य बनवण्याच्या कामासाठी असणारं आपलं मुख्य साधन कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे पुस्तक ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मूकबधिरांसाठी व्हिडिओंच्या रूपात आणि अंध लोकांसाठी ब्रेल भाषेतसुद्धा आपलं साहित्य उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं की बायबलमध्ये जे सांगण्यात आलं होतं ते आज पूर्ण होत आहे. आज “वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या सर्व राष्ट्रांमधून” लोक बायबलमधल्या सत्याची “शुद्ध भाषा” बोलायला शिकत आहेत. (जख. ८:२३; सफ. ३:९) आणि या सगळ्या गोष्टी आज येशू ख्रिस्ताच्या देखरेखीखाली पूर्ण होत आहेत.

८. आपल्या प्रचारकार्यामुळे कोणते चांगले परिणाम होत आहेत?

आज २४० देशांमधून ८० लाखांपेक्षा जास्त लोक यहोवाच्या संघटनेत आहेत. आणि दरवर्षी लाखो लोक बाप्तिस्मा घेत आहेत. पण या संख्या सगळ्यात महत्त्वाच्या नाहीत. तर या नवीन शिष्यांनी जे “नवीन व्यक्‍तिमत्वं” धारण केलंय आणि आपल्यामध्ये जे ख्रिस्ती गुण उत्पन्‍न केलेत ते जास्त महत्त्वाचंय. (कलस्सै. ३:८-१०) यांपैकी बरेच जण आधी अनैतिक जीवन जगायचे, ते हिंसक होते, भेदभाव करायचे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची विचारसरणी होती. पण त्यांनी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. यावरून दिसून येतं, की यशया २:४ मधली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. तिथं म्हटलंय, ‘ते युद्ध करायला शिकणार नाहीत.’ आज आपण सगळेच नवीन व्यक्‍तिमत्त्वं धारण करायचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे लोकांना देवाच्या संघटनेकडे यायला मदत होत आहे. आणि यावरून आपण हेही दाखवतो, की प्रचाराच्या कामाची देखरेख करणाऱ्‍या येशूचं आपण अनुकरण करत आहोत. (योहा. १३:३५; १ पेत्र २:१२) हे सगळं करणं आपल्याला कशामुळे शक्य होत आहे? कारण येशू आपल्याला लागणारी सगळी मदत पुरवत आहे.

येशू एका दासाला नियुक्‍त करतो

९. मत्तय २४:४५-४७ मध्ये शेवटच्या काळाबद्दल काय सांगण्यात आलं होतं?

मत्तय २४:४५-४७ वाचा. येशूने सांगितलं होतं की शेवटच्या काळात आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी तो एका ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला’ नियुक्‍त करेल. आणि आपल्या काळात खरंच हा दास खूप मेहनत घेत आहे. येशू ख्रिस्ताने देवाच्या सेवकांना आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना “योग्य वेळी [आध्यात्मिक] अन्‍न पुरवण्यासाठी” या दासाचा म्हणजे अभिषिक्‍त जनांच्या छोट्या गटाचा वापर केलाय. पण असं असलं तरी हे अभिषिक्‍त भाऊ इतरांच्या विश्‍वासावर सत्ता गाजवत नाहीत. (२ करिंथ. १:२४) उलट, येशू ख्रिस्त त्याच्या लोकांचं “नेतृत्व करणारा आणि शासक” आहे ही गोष्ट ते ओळखतात.​—यश. ५५:४.

१०. चित्रात दाखवलेल्या कोणत्या पुस्तकामुळे तुम्हाला यहोवाची सेवा सुरू करायला मदत झाली?

१० १९१९ पासून विश्‍वासू दासाने आवड दाखवणाऱ्‍या लोकांना देवाच्या वचनातलं सत्य समजून घ्यायला मदत करण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. उदाहरणार्थ, १९२१ मध्ये बायबलची मूलभूत सत्य शिकता यावीत म्हणून या दासाने द हार्प ऑफ गॉड हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि मग काळाच्या ओघात त्यांनी इतर प्रकाशनंही पुरवली. जसं की, “देव सत्य होवो,” सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते, तुम्ही पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, बायबल नेमके काय शिकवते?, बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?,  आणि कायम जीवनाचा आनंद घ्या!,  ही सगळी पुस्तकं त्या-त्या काळाची खास गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. यापैकी कोणत्या पुस्तकामुळे तुम्हाला आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत झाली?

११. आध्यात्मिक अन्‍नाची आपल्या सगळ्यांनाच गरज का आहे?

११ पण फक्‍त नवीन लोकांनाच यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल सखोल ज्ञान घ्यायची गरज आहे असं नाही, तर आपल्या सगळ्यांनाच या ज्ञानाची गरज आहे. प्रेषित पौलने म्हटलं: “जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे.” त्याने असंही म्हटलं की या ज्ञानामुळे आपल्याला ‘चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखायला’ मदत होते. (इब्री ५:१४) या कठीण काळात जगाची नैतिक मूल्य अगदी खालच्या थराला गेली आहेत. त्यामुळे यहोवाच्या स्तरांप्रमाणे वागायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण यासाठी लागणारी ताकद आपल्याला मिळावी म्हणून येशू नियमितपणे आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. हे आध्यात्मिक अन्‍न देवाच्या प्रेरित वचनावर, बायबलवर आधारीत आहे. विश्‍वासू दास येशूच्या मार्गदर्शनाखाली हे अन्‍न तयार करतो आणि आपल्यापर्यंत पोचवतो.

१२. येशूप्रमाणेच आपण देवाच्या नावाचा आदर कसा केलाय?

१२ येशूप्रमाणे आपणसुद्धा देवाच्या नावाला जो आदर दिला पाहिजे तो दिलाय. (योहा. १७:६, २६) उदाहरणार्थ, १९३१ मध्ये आपण शास्त्रवचनामध्ये दिलेलं ‘यहोवाचे साक्षीदार’ हे नाव स्वीकारलं. असं करून देवाचं हे नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्या नावाने ओळखलं जाण्याची आपली किती इच्छा आहे, हे आपण दाखवून दिलं. (यश. ४३:१०-१२) आणि त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून देवाचं पवित्र नाव या मासिकाच्या प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर छापण्यात आलं आहे. आज ख्रिस्ती धर्मजगताने बायबलच्या बऱ्‍याच भाषांतरातून देवाचं नाव काढून टाकलंय. पण याच्या अगदी उलट नवे जग भाषांतरात  जिथे-जिथे देवाचं नाव असलं पाहिजे तिथे टाकण्यात आलंय.

येशू आपल्या अनुयायांना संघटित करतो

१३. येशू आज ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाचा’ वापर करत आहे याची कोणत्या गोष्टीवरून तुम्हाला खातरी पटते? (योहा. ६:६८)

१३ संपूर्ण पृथ्वीवर खरी उपासना केली जावी म्हणून येशूने ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ एक उल्लेखनीय संघटना तयार केली आहे. या संघटनेबद्दल तुम्हाला कसं वाटतं? कदाचित तुमच्याही भावना प्रेषित पेत्रसारख्या असतील. त्याने येशूला म्हटलं: “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सर्वकाळाचं जीवन देणाऱ्‍या गोष्टी तर तुझ्याजवळ आहेत.” (योहा. ६:६८) खरंच, यहोवाच्या संघटनेबद्दल आपल्याला कळलं नसतं तर आज आपण कुठे असतो? या संघटनेद्वारे आज ख्रिस्त आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे. तसंच, तो आपलं सेवाकार्य चांगल्याप्रकारे पार पाडायला आवश्‍यक असलेलं प्रशिक्षण देत आहे. यासोबतच, आपल्याला यहोवाचं मन आनंदित करता यावं म्हणून “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करण्यासाठीसुद्धा तो आपल्याला मदत करत आहे.​—इफिस. ४:२४.

१४. कोविड महामारीदरम्यान यहोवाच्या संघटनेचा भाग असल्यामुळे तुम्हाला कसा फायदा झाला?

१४ संकटाच्या काळात येशू आपल्याला योग्य मार्गदर्शन देतो. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोविड महामारीच्या काळात आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन. या मार्गदर्शनामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप फायदा झाला. या महामारीचा कसा सामना करावा याबद्दल जगभरात गोंधळ माजला होता. पण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी येशूने आपल्याला त्याच्या संघटनेद्वारे स्पष्ट सूचना पुरवल्या. आपल्याला बाहेर जाताना मास्क घालायचं आणि लोकांपासून योग्य अंतर ठेवायचं प्रोत्साहन देण्यात आलं. तसंच, मंडळीतल्या सगळ्यांची नियमितपणे विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्याची वडिलांना वारंवार आठवण करून देण्यात आली. (यश. ३२:१, २) तसंच, नियमन मंडळ्याच्या रिपार्टमधून इतर गोष्टींबद्दल मार्गदर्शन आणि प्रोत्साहनसुद्धा पुरवण्यात आलं.

१५. महामारीच्या काळात सभांबद्दल आणि प्रचारकार्याबद्दल कोणतं मार्गदर्शन देण्यात आलं आणि याचे कोणते चांगले परिणाम दिसून आले?

१५ महामारीच्या काळात मंडळीच्या सभा कशा घेतल्या जाव्यात आणि प्रचारकार्य कसं केलं जावं, याबद्दलसुद्धा स्पष्ट मार्गदर्शन पुरवण्यात आलं. आपण लगेचच इंटरनेटच्या मदतीने आपल्या सभा, संमेलनं आणि अधिवेशनं सुरू केली. तसंच आपण पत्राद्वारे आणि टेलिफोनद्वारे आपलं साक्षकार्य करायला सुरवात केली. आणि यहोवाने आपल्या या सगळ्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला. बऱ्‍याच शाखाकार्यालयांनी या काळात प्रचारकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं सांगितलं आहे. आणि बऱ्‍याच प्रचारकांना या काळात साक्षकार्यात खूप चांगले अनुभव आले आहेत.​—“ यहोवाने आपल्या प्रचारकार्यावर आशीर्वाद दिलाय!” ही चौकटसुद्धा पहा.

१६. आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो?

१६ महामारीच्या काळात संघटना जरा जास्तच सावधगिरी बाळगत आहे, असं कदाचित काही जणांना वाटलं असेल. पण आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन किती योग्य होतं, हे वारंवार सिद्ध झालंय. (मत्त. ११:१९) खरंच आज येशू खूप प्रेमळपणे आपल्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे. आणि आपण यावर जितकं मनन करू, तितकीच आपल्याला या गोष्टीची खातरी पटेल, की पुढे काहीही झालं तरी यहोवा आणि येशू आपल्याला मदत करायला नेहमी आपल्यासोबत असतील.​—इब्री लोकांना १३:५, ६ वाचा.

१७. येशूच्या देखरेखीखाली काम करायला तुम्हाला कसं वाटतं?

१७ येशूच्या देखरेखीखाली आपण काम करत आहोत, हा खरंच एक आशीर्वाद आहे. आज आपण अशा एका संघटनेचा भाग आहोत, ज्यामध्ये संस्कृती, देश किंवा भाषेवरून कोणताही भेदभाव केला जात नाही. आपल्या प्रत्येकालासुद्धा नवीन व्यक्‍तिमत्व विकसित करायला आणि एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं जात आहे. आपल्याला अगदी भरपूर प्रमाणात अन्‍न मिळत आहे. आणि प्रचाराचं काम करण्यासाठीसुद्धा आवश्‍यक असलेलं सगळं प्रशिक्षण दिलं जात आहे. खरंच, येशू आपली देखरेख करतो या गोष्टीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे!

गीत १४ सर्व काही नवे झाले!

^ आज लाखो स्त्रीपुरुष आनंदाच्या संदेशाचा आवेशाने प्रचार करत आहेत. तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकी एक आहात का? असाल, तर तुम्हीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या देखरेखीखाली काम करत आहात. या प्रचाराच्या कामाचं नेतृत्व येशू करत आहे हे कोणत्या पुराव्यांवरून दिसून येतं, याबद्दल या लेखात आपण पाहणार आहोत. या माहितीवर विचार केल्यामुळे ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली देवाची सेवा करत राहायचा आपला निश्‍चय आणखी मजबूत होईल.