व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३०

तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी बायबलची पहिली भविष्यवाणी

तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी बायबलची पहिली भविष्यवाणी

“मी तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये . . . शत्रुत्व निर्माण करीन.”—उत्प. ३:१५.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश *

१. आदाम आणि हव्वाने पाप केल्यानंतर लगेचच यहोवाने काय केलं? (उत्पत्ती ३:१५)

 आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यावर लगेचच यहोवाने एक महत्त्वाची भविष्यवाणी केली. आणि त्याद्वारे त्यांच्या वंशजांना एक आशा दिली. ती भविष्यवाणी आपल्याला उत्पत्ती ३:१५ मध्ये वाचायला मिळते.​—वाचा.

२. ही भविष्यवाणी इतकी खास का आहे?

ही भविष्यवाणी बायबलच्या पहिल्या पुस्तकात पाहायला मिळते. पण कोणत्या-ना-कोणत्या मार्गाने बायबलमधल्या इतर सर्व पुस्तकांचा या भविष्यवाणीशी संबंध आहे. जसे माळेतले सगळे मोती एकाच धाग्यात ओवलेले असतात त्याच प्रकारे बायबलच्या सगळ्या पुस्तकांमधला एकंदर संदेश उत्पत्ती ३:१५ मधल्या एकाच भविष्यवाणीत सामावलेला आहे असं म्हणता येईल. हा संदेश म्हणजे देव एका सुटका करणाऱ्‍याला पाठवेल आणि तो सैतानाचा आणि त्याच्या सर्व दुष्ट साथीदारांचा नाश करेल. * यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सगळ्यांसाठी हा खरंच किती मोठा आशीर्वाद असेल!

३. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण उत्पत्ती ३:१५ मधल्या भविष्यवाणीबद्दल खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं पाहू या. या भविष्यवाणीत ज्यांच्याबद्दल सांगितलंय ते कोण  आहेत? ही भविष्यवाणीची पूर्णता कशी  होत आहे? आणि या भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा  फायदा होत आहे?

भविष्यवाणीत ज्यांच्याबद्दल उल्लेख केलाय ते कोण आहेत?

४. ‘जुना साप’ कोण आहे आणि आपण असं का म्हणू शकतो?

उत्पत्ती ३:१४, १५ या वचनांमध्ये ‘साप,’ ‘सापाची संतती,’ ‘स्त्री’ आणि ‘स्त्रीची संतती’ यांचा उल्लेख केलाय. हे नेमके कोण आहेत हे समजायला बायबल आपल्याला मदत करतं. * सगळ्यात आधी ‘सापाबद्दल’ पाहू या. एदेन बागेत यहोवाने जे म्हटलं ते साहजिकच एका सापाला समजू शकत नाही. त्यामुळे भविष्यवाणीत ज्याचा उल्लेख केलाय तो खरोखरचा साप असू शकत नाही. तर मग तो कोण आहे? तो नक्कीच विचार करू शकणारा एक व्यक्‍ती असला पाहिजे. प्रकटीकरण १२:९ आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं, की ‘जुना साप’ हा दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे. पण मग, सापाची संतती कोणाला सूचित करते?

साप

प्रकटीकरण १२:९ मध्ये “जुना साप” म्हटलेला सैतान (परिच्छेद ४ पाहा)

५. सापाच्या संततीत कोणा-कोणाचा समावेश होतो?

बायबलमध्ये प्रत्येकच ठिकाणी संतती हा शब्द एखाद्याच्या मुलांबद्दल सांगण्यासाठी वापरलेला नाही. तर एखाद्याच्या विचारांचं आणि वागणुकीचं अनुकरण करणाऱ्‍यांनाही त्याची संतती असं म्हटलंय. त्यामुळे सापाची संतती हे असे दुष्ट स्वर्गदूत आणि मानव आहेत, जे सैतानाप्रमाणेच यहोवा देवाचा आणि त्याच्या लोकांचा विरोध करतात. यांमध्ये नोहाच्या काळात ज्यांनी स्वर्गातलं आपलं स्थान सोडून दिलं होतं ते दुष्ट स्वर्गदूतही आहेत. तसंच जे दुष्ट मानव त्यांच्या पित्यासारखं म्हणजेच सैतानासारखंच वागतात तेसुद्धा यांमध्ये आहेत.​—उत्प. ६:१, २; योहा. ८:४४; १ योहा. ५:१९; यहू. ६.

सापाची संतती

यहोवाच्या लोकांचा विरोध करणारे दुष्ट स्वर्गदूत आणि मानव (परिच्छेद ५ पाहा)

६. भविष्यवाणीतली ‘स्त्री’ हव्वा का असू शकत नाही?

आता भविष्यवाणीतली ‘स्त्री’ कोण आहे ते पाहूया. ती हव्वा असू शकत नाही. का बरं? याचं एक कारण लक्षात घ्या. भविष्यवाणीत म्हटलंय की स्त्रीची संतती सापाचं डोकं “ठेचेल.” आपण आताच पाहिलं की साप सैतानाला सूचित करतो आणि सैतान एक अदृश्‍य व्यक्‍ती असल्यामुळे हव्वेच्या पोटी जन्मलेल्या अपरिपूर्ण संततीपैकी कोणीही त्याला ठेचू शकत नाही. तर मग सैतानाला कोण मारणार होतं?

७. उत्पत्ती ३:१५ मध्ये उल्लेख केलेली स्त्री कोण आहे?

उत्पत्ती ३:१५ मध्ये उल्लेख केलेली स्त्री कोण आहे हे आपल्याला बायबलच्या शेवटच्या पुस्तकातून कळतं. (प्रकटीकरण १२:१, २, ५, १० वाचा.) ही एक सर्वसाधारण स्त्री नाही. ती लाक्षणिक असून तिच्या पायाखाली चंद्र आहे आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्‍यांचा मुकुट आहे. आणि ती एका असाधारण मुलाला, म्हणजे देवाच्या राज्याला जन्म देते. हे राज्य स्वर्गात असल्यामुळे, ती स्त्रीसुद्धा स्वर्गात असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरून आपण असं म्हणू शकतो, की ही स्त्री यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाला सूचित करते ज्यात देवाचे विश्‍वासू स्वर्गदूत आहेत.​—गलती. ४:२६.

स्त्री

विश्‍वासू स्वर्गदूतांनी बनलेला यहोवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग (परिच्छेद ७ पाहा)

८. स्त्रीच्या संततीचा प्रमुख भाग कोण आहे, आणि तो प्रमुख भाग कधी बनला? (उत्पत्ती २२:१५-१८)

देवाचं वचन आपल्याला स्त्रीच्या संततीचा प्रमुख भाग समजून घ्यायलाही मदत करतं. तो अब्राहामचा वंशज असणार होता. (उत्पत्ती २२:१५-१८ वाचा.) भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे येशू त्या विश्‍वासू कुलप्रमुखाचा वंशज होता. (लूक ३:२३, ३४) पण ती संतती कोणत्याही मानवापेक्षा जास्त शक्‍तिशाली असणं गरजेचं होतं, कारण ती सैतानाचा समूळ नाश करणार होती. येशू जेव्हा साधारण तीस वर्षांचा हाता, तेव्हा त्याला पवित्र शक्‍तीने देवाचा मुलगा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं. जेव्हा येशूला अभिषिक्‍त करण्यात आलं, तेव्हा तो स्त्रीच्या संततीचा प्रमुख भाग बनला. (गलती. ३:१६) येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान झाल्यानंतर देवाने त्याला “गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट” घातला. त्याने त्याला “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार” आणि यासोबतच “सैतानाची कार्यं उद्ध्‌वस्त” करण्याचाही अधिकार दिला.​—इब्री २:७; मत्त. २८:१८; १ योहा. ३:८.

स्त्रीची संतती

येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० अभिषिक्‍त जन (परिच्छेद ८-९ पाहा)

९-१०. (क) स्त्रीच्या संततीचा दुसरा भाग कोण आहे आणि ते संततीचा भाग कधी बनतात? (ख) आता आपण काय पाहणार आहोत?

पण या संततीचा दुसरा भागही असणार होता. प्रेषित पौलने संततीच्या या दुसऱ्‍या भागाबद्दल यहुदी आणि गैरयहुदी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असं सांगितलं: “जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तर तुम्ही खरोखर अब्राहामची संतती आणि त्याला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे वारस आहात.” (गलती. ३:२८, २९) जेव्हा यहोवा एखाद्या व्यक्‍तीला पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करतो, तेव्हा ती व्यक्‍ती स्त्रीच्या संततीचा भाग बनते. तर यावरून कळतं की स्त्रीच्या संततीत येशू ख्रिस्त आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० जण आहेत. (प्रकटी. १४:१) हे सर्व जण आपल्या पित्याप्रमाणे म्हणजे यहोवाप्रमाणे विचार करायचा आणि वागायचा प्रयत्न करतात.

१० तर आतापर्यंत आपण, उत्पत्ती ३:१५ मध्ये कोणा-कोणाबद्दल सांगितलंय हे पाहिलं. पण आजपर्यंत यहोवाने ही भविष्यवाणी क्रमाक्रमाने कशी पूर्ण केली आहे आणि यामुळे आपल्याला कसा फायदा होतो याबद्दल आता आपण थोडक्यात पाहू या.

ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आहे?

११. स्त्रीच्या संततीच्या ‘टाचेला’ कशा प्रकारे घाव झाला?

११ उत्पत्ती ३:१५, च्या भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं होतं, की साप स्त्रीच्या संततीच्या “टाचेवर” घाव करेल. सैतानाने जेव्हा यहुदी आणि रोमी लोकांना, देवाच्या मुलाला ठार मारायला प्रवृत्त केलं तेव्हा हे शब्द पूर्ण झाले. (लूक २३:१३, २०-२४) ज्या प्रकारे एखाद्याच्या टाचेवर जखम झाली तर तो काही काळासाठी चालू शकत नाही, त्याच प्रकारे येशूचा मृत्यू झाला तेव्हा काही काळासाठी तो काहीही करू शकत नव्हता आणि तीन दिवसांपर्यंत तो मेलेल्या स्थितीत कबरेत होता.​—मत्त. १६:२१.

१२. सापाचं डोकं कधी आणि कसं ठेचलं जाईल?

१२ उत्पत्ती ३:१५ मधल्या भविष्यवाणीतून हे दिसून येतं की येशू तसाच कबरेत राहणार नव्हता. का? कारण या भविष्यवाणीप्रमाणे स्त्रीची संतती सापाचं डोकं ठेचणार होती. आणि यासाठी येशूचं पुनरुत्थान होणं गरजेचं होतं. आणि अगदी तसंच झालं. येशूच्या मृत्यूनंतर तिसऱ्‍या दिवशी त्याला एक अमर अदृश्‍य व्यक्‍ती म्हणून जिवंत करण्यात आलं. यहोवाने ठरवलेल्या वेळी येशू सैतानाचा समूळ नाश करेल. (इब्री २:१४) जे येशूसोबत राज्य करतील ते त्याच्यासोबत मिळून देवाच्या शत्रूंचा म्हणजेच सापाच्या संततीचा या पृथ्वीवरून पूर्णपणे नाश करतील.​—प्रकटी. १७:१४; २०:४, १०. *

या भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा फायदा होत आहे?

१३. या भविष्यवाणीच्या पूर्णतेमुळे आपल्याला कसा फायदा होत आहे?

१३ जर तुम्ही देवाचे समर्पित सेवक असाल, तर तुम्हाला या भविष्यवाणीमुळे फायदा होत आहे. येशू एक मानव म्हणून या पृथ्वीवर आला होता. त्याने त्याच्या पित्याचं व्यक्‍तिमत्वं अगदी पूर्णपणे दाखवून दिलं. (योहा. १४:९) यामुळे त्याच्याद्वारे आपल्याला यहोवा देवाची ओळख करून घेणं आणि त्याच्यावर प्रेम करणं सोपं झालं. तसंच, आज तो ख्रिस्ती मंडळीचं मार्गदर्शन करत आहे आणि आपल्याला त्याच्या शिकवणींमुळे आणि मार्गदर्शनामुळे फायदा होतोय. आपल्या वागण्या-बोलण्याने आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो हे त्याने आपल्याला शिकवलंय. तसंच येशूच्या टाचेला घाव झाल्यामुळे म्हणजेच त्याचा मृत्यू झाल्यामुळेही आपल्या सगळ्यांना फायदा झाला आहे. तो कसा? येशूचा मृत्यू झाल्यानंतर यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि त्याच्या परिपूर्ण बलिदानाची किंमत स्वीकारली. त्यामुळे येशूचं हे बलिदान “आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.”​—१ योहा. १:७.

१४. एदेनमध्ये यहोवाने केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता लगेच होणार नव्हती असं का म्हणता येईल? स्पष्ट करा.

१४ एदेन बागेत यहोवाने सांगितलेल्या शब्दांवरून हे दिसून येतं, की या भविष्यवाणीची पूर्णता होण्याआधी काही काळ जाणं गरजेचं होतं. कारण स्त्रीने वचन दिलेल्या संततीला जन्म देण्यासाठी, तसंच सैतानाला त्याच्या साथीदारांना गोळा करण्यासाठी आणि या दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण होण्यासाठी वेळ लागणार होता. ही भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो. कारण सैतानाच्या अधिकाराखाली असलेलं जग देवाच्या उपासकांचा द्वेष करेल असा इशारा आपल्याला यामुळे मिळतो. येशूनेही आपल्या शिष्यांना अशाच प्रकारचा इशारा दिला होता. (मार्क १३:१३; योहा. १७:१४) गेल्या १०० वर्षांत आपण खासकरून भविष्यवाणीतली ही गोष्ट पूर्ण होताना पाहिली आहे. ती कशी?

१५. जग आपला जास्त द्वेष का करत आहे? पण आपल्याला घाबरण्याची गरज का नाही?

१५ १९१४ मध्ये येशू मसीही राजा बनल्यानंतर थोड्याच काळात सैतानाला स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं. तो आता परत स्वर्गात जाऊ शकत नाही आणि लवकरच त्याचा नाश होणार आहे. (प्रकटी. १२:९, १२) पण तो शांत बसलेला नाही. उलट तो खूप क्रोधित झाला आहे आणि देवाच्या लोकांवर सगळा राग काढत आहे. (प्रकटी. १२:१३, १७) आणि या कारणामुळे सैतानाचं जग देवाच्या लोकांचा आणखीनच द्वेष करत आहे. पण आपण सैतानाला आणि त्याच्या साथीदारांना घाबरण्याची काही गरज नाही. उलट, प्रेषित पौलसारखं आपण हे खातरीने म्हणू शकतो, की “जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभं राहू शकतं?” (रोम. ८:३१) आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो, कारण उत्पत्ती ३:१५ मधल्या भविष्यवाणीचा बराचसा भाग आधीच पूर्ण झालाय.

१६-१८. उत्पत्ती ३:१५ मधली भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे कर्टीस, उर्सुला आणि जेसिका यांना कसा फायदा झालाय?

१६ आपल्या जीवनात कोणतीही परीक्षा आली तरी उत्पत्ती ३:१५ मध्ये यहोवाने जे वचन दिलंय त्यामुळे आपल्याला त्या परीक्षेचा सामना करायला मदत होते. ग्वाम या देशात मिशनरी म्हणून सेवा करणारे कर्टीस म्हणतात: “माझ्या जीवनात असे बरेच कठीण प्रसंग आले जेव्हा मला यहोवाला एकनिष्ठ राहणं सोपं नव्हतं. पण उत्पत्ती ३:१५ मधल्या भविष्यवाणीवर मनन केल्यामुळे मला नेहमी आपल्या स्वर्गीय पित्यावर विसंबून राहायला मदत झाली आहे.” कर्टीस त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा यहोवा आपल्याला सगळ्या संकटांपासून मुक्‍त करेल.

१७ बवेरिया इथे राहणारी उर्सुला नावाची एक बहीण म्हणते, की उत्पत्ती ३:१५ मधली भविष्यवाणी समजून घेतल्यामुळे तिला ही खातरी पटली की बायबल हे देवाचं प्रेरित वचन आहे. बायबलमधल्या इतर सगळ्या भविष्यवाण्या या भविष्यवाणीशी कशा जोडलेल्या आहेत हे समजल्यावर ती खूप प्रभावित झाली. ती असंही म्हणते: “आपल्याला एक आशा देण्यासाठी यहोवाने लगेच पाऊल उचललं हे जेव्हा मला कळलं, तेव्हा त्याच्यावरचं माझं प्रेम आणखीनच वाढलं.”

१८ मायक्रोनेशियामध्ये राहणारी जेसिका म्हणते: “आपल्याला सत्य सापडलंय याची जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मला किती आनंद झाला होता, हे मला आजही आठवतंय. उत्पत्ती ३:१५ मधली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. आपण आज जे जीवन जगतोय, ते खरं जीवन नाही  हे आठवणीत ठेवायला मला त्यामुळे मदत झाली. यहोवाची सेवा केल्यामुळे आज आणि भविष्यातही चांगलं जीवन जगणं शक्य आहे या गोष्टीवरचा माझा भरवसा या भविष्यवाणीमुळे आणखीनच मजबूत झालाय.”

१९. भविष्यवाणीचा शेवटचा भाग पूर्ण होईल अशी खातरी आपण का बाळगू शकतो?

१९ आपण या लेखात पाहिलं, की उत्पत्ती ३:१५ मधली भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे. स्त्रीची संतती आणि सापाची संतती कोण आहे, हे अगदी स्पष्ट झालंय. स्त्रीच्या संततीचा मुख्य भाग असलेला येशू त्याच्या टाचेला झालेल्या जखमेतून बरा झालेला आहे. आणि आज तो एक वैभवशाली अमर राजा आहे. संततीच्या दुसऱ्‍या भागात जे आहेत, त्यांना निवडण्याचं कामही आज जवळजवळ पूर्ण झालंय. या भविष्यवाणीचा पहिला भाग पूर्ण झाला असल्यामुळे आपण हा पूर्ण भरवसा बाळगू शकतो की भविष्यवाणीचा शेवटचा भाग, म्हणजेच सैतानाचं डोकं ठेचलं जाण्याबद्दल जे सांगितलंय, तेपण नक्कीच पूर्ण होईल. सैतानाचा नाश केला जाईल तेव्हा देवाच्या सेवकांना खूप आनंद होईल. तोपर्यंत हार मानू नका. आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. स्त्रीच्या संततीद्वारे तो “पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना” असंख्य आशीर्वाद देईल.​—उत्प. २२:१८.

गीत ३० यहोवाने राज्य आरंभिले

^ बायबलचा संदेश पूर्णपणे समजून घेण्यासाठी उत्पत्ती ३:१५ यात दिलेली भविष्यवाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. या भविष्यवाणीचं परीक्षण केल्यामुळे यहोवा देवावरचा आपला विश्‍वास मजबूत होईल. तसंच, त्याने दिलेली सगळी अभिवचनं तो नक्कीच पूर्ण करेल यावरचा आपला भरवसाही वाढेल.

^ नवे जग भाषांतर  मधला अतिरिक्‍त लेख ख१, “बायबलचा संदेश” पाहा.

^उत्पत्ती ३:१४, १५ मध्ये कोणा-कोणाबद्दल सांगितलंय?” ही चौकट पाहा.