व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३१

प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा

प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा

“माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.”​—स्तो. १४१:२.

गीत ५१ यहोवाला जडून राहू!

सारांश *

१. आपण प्रार्थनेत यहोवासोबत बोलू शकतो या गोष्टीकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?

 संपूर्ण विश्‍वाच्या निर्माणकर्त्याने आपल्याला त्याच्यासोबत बोलायची संधी दिली आहे ही खरंच किती विशेष गोष्ट आहे! आपण कोणत्याही वेळी आणि कोणत्याही भाषेत त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करू शकतो. आणि यासाठी आपल्याला त्याची परवानगी घ्यायची गरज नाही. आपण हॉस्पिटलमधल्या बेडवर असू किंवा जेलमधल्या तुरुंगातल्या कोठडीत असू, आपला प्रेमळ पिता आपलं ऐकेल याची खातरी आपण बाळगू शकतो. खरंच आपल्याला मिळालेल्या या बहुमानाबद्दल आपण नेहमी त्याची कदर बाळगली पाहिजे.

२. प्रार्थनेच्या बहुमानाबद्दल दावीदला कदर होती हे कशावरून दिसून येतं?

दावीद राजाच्या मनात प्रार्थनेच्या बहुमानाबद्दल खूप कदर होती. म्हणूनच त्याच्या एका गीतात तो यहोवाला असं म्हणाला: “माझी प्रार्थना तुझ्यासमोर चांगल्या प्रकारे तयार केलेल्या धूपाप्रमाणे असो.” (स्तो. १४१:१, २) त्याच्या काळात याजक मंदिरात जो पवित्र धूप जाळायचे तो खूप काळजीपूर्वक तयार केला जायचा. (निर्ग. ३०:३४, ३५) अगदी त्याच प्रकारे यहोवाला प्रार्थना करताना आपण त्याच्यासोबत जे काही बोलणार आहोत त्याचा आधीच चांगला विचार करावा अशी दावीदची इच्छा होती. आपलीही अशीच इच्छा आहे. कारण आपल्या प्रार्थनेमुळे यहोवाला आनंद व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं.

३. यहोवाला प्रार्थना करताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि का?

जेव्हा आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्या बरोबरीच्या व्यक्‍तीसोबत बोलतोय अशा प्रकारे बोलू नये. उलट, आपण खूप आदराने बोललं पाहिजे. कारण यहोवा या संपूर्ण विश्‍वाचा वैभवशाली राजा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला यशया, यहेज्केल, दानीएल आणि योहानला दिसलेल्या दृष्टान्तात पाहायला मिळते. त्यांना दिसलेले दृष्टान्त जरी वेगवेगळे असले तरी त्या सगळ्यांनी यहोवाला एका वैभवशाली राजाच्या रूपात पाहिलं. जसं की यशयाने “यहोवाला उंच स्थानावर असलेल्या एका भव्य राजासनावर बसलेलं पाहिलं.” (यश. ६:१-३) तर, यहेज्केलने यहोवाला त्याच्या स्वर्गीय रथावर विराजमान असलेलं पाहिलं. आणि त्याच्याभोवती मेघधनुष्यासारखं विलक्षण तेज पसरलेलं होतं. (यहे. १:२६-२८) दानीएलने “अति प्राचीन” असा कोणी आपल्या राजासनावर बसलेला पाहिला. त्याचे कपडे पांढरे शुभ्र होते आणि त्याचं राजासन आगीच्या ज्वालांचं होतं. (दानी. ७:९, १०) आणि योहाननेही यहोवाला एका राजासनावर विराजमान असलेलं पाहिलं. त्या राजासनाच्या भोवती पाचूसारखं दिसणारं मेघधनुष्य होतं. (प्रकटी. ४:२-४) खरंच, यहोवा किती महान आणि गौरवशाली आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते, की आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो हा आपल्यासाठी किती असाधारण बहुमान आहे! आणि म्हणूनच आपण नम्रपणे आणि आदराने त्याच्याशी बोललं पाहिजे. पण मग आपण कशी प्रार्थना केली पाहिजे?

“म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा”

४. येशूने शिकवलेल्या प्रार्थनेच्या सुरवातीच्या शब्दांवरून आपण काय शिकतो?

मत्तय ६:९, १० वाचा. डोंगरावर दिलेल्या उपदेशात येशूने आपल्या शिष्यांना देवाला आवडेल अशी प्रार्थना कशी करायची हे शिकवलं. “म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा,” असं म्हटल्यावर येशूने सुरवातीला अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल उल्लेख केला, ज्यांचा संबंध यहोवाच्या उद्देशाशी आहे. जसं की, यहोवाचं नाव पवित्र व्हावं आणि त्याचं राज्य यावं अशी त्याने प्रार्थना करायला सांगितलं. कारण हे राज्य देवाच्या सगळ्या विरोधकांचा नाश करेल. तसंच, भविष्यात पृथ्वीबद्दल आणि मानवजातीबद्दल त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असाही त्याने उल्लेख केला. आपणही जेव्हा आपल्या प्रार्थनेत या गोष्टींचा उल्लेख करतो, तेव्हा आपण दाखवून देतो की देवाची इच्छा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे.

५. व्यक्‍तिगत गरजांबद्दल प्रार्थना करणं योग्य आहे का?

येशूने प्रार्थनेत पुढे जे म्हटलं त्यावरून आपल्याला हे कळतं की यहोवाला प्रार्थना करताना आपल्या व्यक्‍तिगत गरजांबद्दल उल्लेख करणंसुद्धा योग्य आहे. यहोवाने आपल्याला आपलं दररोजचं अन्‍न द्यावं, आपल्या पापांची क्षमा करावी, आपल्याला मोहात पडू देऊ नये आणि सैतानापासून आपल्याला वाचवावं अशी विनंती आपण त्याला करू शकतो. (मत्त. ६:११-१३) जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींबद्दल यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा आपण हे दाखवून देत असतो की आपण त्याच्यावर विसंबून आहोत आणि त्याचं मन आनंदित करायची आपली इच्छा आहे.

एक पती आपल्या पत्नीसोबत कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो? (परिच्छेद ६ पाहा) *

६. येशूने शिकवलेली प्रार्थना आपण जशीच्या तशी म्हटली पाहिजे का? स्पष्ट करा.

येशूने शिकवलेली प्रार्थना आपण जशीच्या तशी म्हणावी अशी त्याची इच्छा नव्हती. खरंतर त्याने स्वतःसुद्धा इतर वेळी ज्या प्रार्थना केल्या त्यात त्याने अशा इतर गोष्टींचा उल्लेख केला ज्या त्याला त्या वेळेस महत्त्वाच्या वाटत होत्या. (मत्त. २६:३९, ४२; योहा. १७:१-२६) तसंच आपणसुद्धा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल प्रार्थना करू शकतो ज्याबद्दल आपल्याला चिंता वाटते. जसं की, जेव्हा आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा यहोवाने आपल्याला बुद्धी आणि समजशक्‍ती द्यावी म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो. (स्तो. ११९:३३, ३४) जेव्हा आपल्याला एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाते, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी यहोवाने आपल्याला सखोल समज द्यावी आणि समंजसपणा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू शकतो. (नीति. २:६) आईवडील आपल्या मुलांसाठी आणि मुलं आपल्या आईवडिलांसाठी प्रार्थना करू शकतात. तसंच आपण सर्वांनीसुद्धा आपल्या बायबल विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना आपण आनंदाचा संदेश सांगतो त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. पण प्रत्येक वेळेस आपण फक्‍त काहीतरी मागण्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे असं नाही.

आपण प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टीसाठी यहोवाचे आभार मानू शकतो? (परिच्छेद ७-९ पाहा) *

७. आपण यहोवाची स्तुती का केली पाहिजे?

प्रार्थना करताना आपण यहोवाची स्तुती  करायलाही विसरलं नाही पाहिजे. कारण इतर कोणाहीपेक्षा यहोवा आपली स्तुती मिळवायला योग्य आहे. तो “चांगला आणि क्षमाशील” देव आहे. तसंच, तो ‘दयाळू, करुणामय, सहनशील, एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आणि विश्‍वासू’ देव आहे. (स्तो. ८६:५, १५) खरंच, यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आणि तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण त्याची स्तुती केलीच पाहिजे.

८. आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल यहोवाचे आभार मानले पाहिजेत? (स्तोत्र १०४:१२-१५, २४)

प्रार्थनेत यहोवाची स्तुती करण्यासोबतच, त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचे आभारसुद्धा  मानले पाहिजेत. जसं की, रंगीबेरंगी फूलं तसंच तऱ्‍हे-तऱ्‍हेच्या आणि स्वादिष्ट वस्तूंसाठी आपण आभार मानले पाहिजेत. शिवाय मंडळीतल्या प्रेमळ भाऊबहिणीसाठीसुद्धा आपण यहोवाचे आभार मानू शकतो. या आणि अशा कितीतरी गोष्टी यहोवाने आपल्याला दिल्या आहेत. कारण त्याची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं. (स्तोत्र १०४:१२-१५, २४ वाचा.) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न पुरवतो, आणि त्याने भविष्यासाठी आपल्याला एक सुंदर आशा दिली आहे. या गोष्टींबद्दलही आपण त्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत.

९. यहोवाचे आभार मानायला आपण विसरू नये म्हणून आपण काय करू शकतो? (१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८)

यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आभार मानायला आपण कधीकधी विसरून जातो. मग असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? आपण ज्या विशिष्ट गोष्टींसाठी यहोवाला प्रार्थना केली होती, त्याची एक लिस्ट बनवू शकतो. आणि मग यहोवाने या प्रार्थनांचं कशा प्रकारे उत्तर दिलंय ते आपण वेळोवेळी तपासून पाहू शकतो. मग त्याने केलेल्या मदतीसाठी आपण प्रार्थना करून त्याचे आभार मानू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८ वाचा.) जेव्हा कोणीतरी आपले आभार मानतं तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि त्यांचं आपल्यावर प्रेम आहे याची जाणीवही आपल्याला होते. तसंच, आपणसुद्धा जेव्हा आठवणीने यहोवाचे आभार मानतो तेव्हा त्याला आनंद होतो. (कलस्सै. ३:१५) पण यहोवाचे आभार मानायचं आणखी एक महत्त्वाचं कारण कोणतं आहे?

आपल्या प्रिय मुलाला दिल्याबद्दल यहोवाचे आभार माना

१०. १ पेत्र २:२१ मध्ये सांगितल्याप्रमाणे, आपण यहोवाचे आभार का मानले पाहिजेत?

१० १ पेत्र २:२१ वाचा. यहोवाने त्याच्या प्रिय मुलाला आपल्याला शिकवण्यासाठी पाठवलं, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. आपण येशूच्या जीवनाबद्दल बायबलमधून वाचतो तेव्हा आपल्याला यहोवाबद्दल आणि आपण त्याला कसं आनंदी करू शकतो याबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. आपण जर येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवला आणि तो आपल्या जीवनातून दाखवला, तर आपण यहोवासोबत जवळचं नातं जोडू शकतो आणि त्याच्या सोबत शांतीचा नातेसंबंध अनुभवू शकतो.​—रोम. ५:१.

११. आपण येशूच्या नावाने प्रार्थना का करतो?

११ आपण येशूच्याद्वारे प्रार्थना करू शकतो याबद्दलही आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. आपण जेव्हा येशूच्या नावाने प्रार्थना करतो, तेव्हा यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांचं उत्तरही देतो. येशूच्या माध्यमानेच यहोवा आपल्या विनंत्या पूर्ण करतो. हीच गोष्ट येशूनेपण सांगितली होती. तो म्हणाला: “मुलाद्वारे पित्याचा गौरव व्हावा, म्हणून माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करीन. तुम्ही माझ्या नावाने कोणतीही विनंती केली, तरी मी ती पूर्ण करीन.”​—योहा. १४:१३, १४.

१२. आणखी कोणत्या गोष्टीबद्दल आपण यहोवाचे आभार मानू शकतो?

१२ येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो. येशूबद्दल बायबलमध्ये असं म्हटलंय, “आपल्याला लाभलेला महायाजक . . . स्वर्गात सर्वोच्च देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्री ८:१) तसंच बायबल असंही सांगतं, की तो “पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक आहे.” (१ योहा. २:१) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे कमजोर आहोत ही गोष्ट येशू ओळखतो आणि तो आपल्याशी सहानुभूतीने वागतो. तसंच, तो आपल्यासाठी यहोवाकडे “विनंतीही करतो.” असा महायाजक आपल्याला दिल्याबद्दल आपण यहोवाचे खरंच किती आभारी आहोत! (रोम. ८:३४; इब्री ४:१५) खरंतर, येशूने बलिदान दिलं नसतं तर आपण अपरिपूर्ण मानव यहोवाला प्रार्थनाच करू शकलो नसतो. यहोवाने त्याच्या प्रिय मुलाला आपल्यासाठी पृथ्वीवर पाठवलं यावरून दिसून येतं की त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. या मौल्यवान देणगीबद्दल आपण त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत, नाही का?

भाऊबहिणींसाठी प्रार्थना करा

१३. येशूचं आपल्या शिष्यांवर खूप प्रेम होतं हे कशावरून दिसून येतं?

१३ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या शिष्यांसाठी बराच वेळ प्रार्थना केली. त्याने आपल्या पित्याला अशी विनंती केली, की “त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ.” (योहा. १७:१५) खरंच येशूचं त्याच्या शिष्यांवर किती प्रेम होतं! काही वेळातच तो स्वतः एका कठीण परीक्षेचा सामना करणार होता. पण त्या वेळीही त्याला आपल्या प्रेषितांची काळजी लागलेली होती.

आपण आपल्या भाऊबहिणींसाठी कोणकोणत्या गोष्टींबद्दल प्रार्थना करू शकतो? (परिच्छेद १४-१६ पाहा) *

१४. भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?

१४ येशूसारखंच प्रार्थना करताना आपणसुद्धा फक्‍त आपल्याच गरजांचा विचार करत नाही. उलट आपण आपल्या भाऊबहिणींसाठीही नेहमी प्रार्थना करतो. असं करून आपण दाखवतो, की येशूने एकमेकांवर प्रेम करण्याबद्दल जी आज्ञा दिली तिचं आपण पालन करतो. तसंच, आपल्या भाऊबहिणींवर आपलं किती प्रेम आहे, हेसुद्धा आपण यहोवाला दाखवतो. (योहा. १३:३४) पण आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना केल्यामुळे खरंच काही फायदा होतो का? हो नक्कीच होतो. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, “नीतिमान माणसाने केलेल्या याचनेत खूप ताकद असते.”​—याको. ५:१६.

१५. आपण आपल्या भाऊबहिणींसाठी प्रार्थना का केली पाहिजे?

१५ आपल्या भाऊबहिणींना बऱ्‍याच कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. जसं की, आजारपण, नैसर्गिक विपत्ती, युद्ध, छळ आणि अशा इतर बऱ्‍याच समस्या. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि या समस्यांमध्ये टिकून राहता यावं म्हणून यहोवाने त्यांना मदत करावी, अशी आपण त्याला विनंती केली पाहिजे. अशा संकटांचा सामना करत असलेल्या काही भाऊबहिणींना तुम्ही ओळखता का? मग यहोवाला प्रार्थना करताना तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना मदत करायची विनंती त्याला करू शकता. जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो, तेव्हा आपण दाखवतो की आपण मनापासून आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करतो. तसंच जे भाऊबहीण बराच त्याग करून संकटात सापडलेल्यांना मदत करतात त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करू शकतो.

१६. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या भावांसाठी आपण प्रार्थना का केली पाहिजे?

१६ मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍या भावांसाठीसुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे. या प्रार्थनांची ते खूप कदर करतात. आणि या प्रार्थनांमुळे त्यांना मदत होते. प्रेषित पौललाही भाऊबहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनांची कदर होती. त्याने असं लिहिलं: “माझ्यासाठीही अशी प्रार्थना करा, की मी बोलण्यासाठी तोंड उघडेन तेव्हा मला शब्द सुचावेत; म्हणजे, आनंदाच्या संदेशाचं पवित्र रहस्य जाहीर करण्यासाठी मी धैर्याने बोलू शकेन.” (इफिस. ६:१९) आजही आपल्यामध्ये बरेच पुढाकार घेणारे भाऊ आहेत. आणि ते आपल्यासाठी खूप मेहनत घेतात. यहोवाने त्यांच्या कामावर आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करून आपण त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलं पाहिजे.

इतरांच्या वतीने प्रार्थना करताना

१७-१८. आपल्याला इतरांच्या वतीने प्रार्थना करायची संधी केव्हा असते, आणि त्या वेळी आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१७ बऱ्‍याच वेळा आपल्याला इतरांच्या वतीने प्रार्थना करायची संधी मिळते. उदाहरणार्थ, बायबल अभ्यास घेणारी एक बहीण दुसऱ्‍या एका बहिणीला आपल्यासोबत अभ्यासासाठी घेऊन जाते, त्या वेळी ती त्या बहिणीला प्रार्थना करायला सांगू शकते. पण ती बहीण विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे ओळखत नसल्यामुळे कदाचित तिने शेवटची प्रार्थना केलेलं जास्त चांगलं राहील. कारण अभ्यासादरम्यान विद्यार्थ्याच्या गरजा काय आहेत याचा तिला अंदाज येईल आणि प्रार्थनेत विद्यार्थ्यासाठी काय मागावं हे तिला समजेल.

१८ एखाद्या भावाला क्षेत्रसेवेच्या किंवा मंडळीच्या सभेच्या वेळी प्रार्थना करायला सांगितलं जाऊ शकतं. हा खरंतर एक बहुमान आहे. पण प्रार्थना करणाऱ्‍या भावाने सभेचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार प्रार्थना केली पाहिजे. तसंच प्रार्थना मंडळीतल्या भाऊबहिणींना सल्ला देण्यासाठी किंवा एखादी घोषणा करण्यासाठी नसते, हेही त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. सहसा मंडळीच्या सभांसाठी गीत आणि प्रार्थना मिळून पाच मिनिटं दिलेली असतात. त्यामुळे प्रार्थना करणाऱ्‍या भावाने खासकरून सुरवातीच्या प्रार्थनेला जास्त बोलू नये.​—मत्त. ६:७.

प्रार्थनेला तुमच्या जीवनात महत्त्व द्या

१९. यहोवाच्या दिवसासाठी तयार राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१९ यहोवाचा न्यायाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसं प्रार्थनेला आपण आपल्या जीवनात जास्त महत्त्वं दिलं पाहिजे. याबाबतीत येशूने म्हटलं: “म्हणून, जागे राहा आणि घडणार असलेल्या या सगळ्या गोष्टींतून बचावून तुम्हाला मनुष्याच्या मुलासमोर उभं राहता यावं, अशी सतत याचना करत राहा.” (लूक २१:३६) जर आपण सतत प्रार्थना करत राहिलो, तर आपला विश्‍वास मजबूत राहील आणि यहोवाच्या दिवसासाठी आपण तयार राहू.

२०. आपल्या प्रार्थना यहोवाला सुगंधी धुपासारख्या वाटाव्यात म्हणून आपण काय केलं पाहिजे?

२० तर मग या लेखात आपण काय पाहिलं? आपण हे पाहिलं, की प्रार्थना करायचा जो बहुमान आपल्याला मिळालाय, त्याची आपण कदर केली पाहिजे. प्रार्थना करताना सर्वात आधी आपण यहोवाच्या उद्देशाशी संबंधित असलेल्या गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. तसंच आपण प्रार्थनेत त्याच्या मुलाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल आभार मानले पाहिजेत. यासोबतच आपण आपल्या भाऊबहिणींबद्दलही प्रार्थना केली पाहिजे. आणि साहजिकच आपण आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजांसाठीसुद्धा प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेत आपण जे काही बोलतो, ते विचार करून बोललं पाहिजे. असं केल्यामुळे आपण दाखवतो, की या विशेष बहुमानाबद्दल आपल्याला कदर आहे. आणि यामुळे आपली प्रार्थना यहोवाला एका सुगंधी धुपाप्रमाणे वाटेल आणि त्यामुळे ‘त्याला आनंद होईल.’​—नीति. १५:८.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

^ आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो हा खरंच एक खूप मोठा बहुमान आहे. आणि त्यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत. म्हणून आपल्या प्रार्थना सुगंधी धूपाप्रमाणे असाव्यात आणि त्यांमुळे यहोवाला आनंद व्हावा अशीच आपली इच्छा आहे. प्रार्थनेत आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल बोलू शकतो ते आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, जेव्हा आपल्याला दुसऱ्‍यांच्या वतीने प्रार्थना करण्याची संधी मिळते तेव्हा आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत.

^ चित्रांचं वर्णन: एक भाऊ आपल्या पत्नीसोबत शाळेतल्या आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, आपल्या वयस्कर पालकांच्या आरोग्यासाठी आणि बायबल विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत आहे.

^ चित्रांचं वर्णन: एक तरुण भाऊ येशूच्या खंडणी बलिदानासाठी, या सुंदर पृथ्वीसाठी आणि पौष्टिक अन्‍नासाठी यहोवाचे आभार मानत आहे.

^ चित्रांचं वर्णन: एक बहीण नियमन मंडळातल्या भावांसाठी तसंच संकटांचा आणि छळाचा सामना करणाऱ्‍या भाऊबहिणींसाठी प्रार्थना करत आहे.