व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

इतरांबद्दल काळजी असल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात

इतरांबद्दल काळजी असल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात

१९४८ मध्ये मी, माझी आई आणि माझी बहीण पॅट

“अँग्लिकन चर्च सत्य शिकवत नाही. म्हणून तू ते शोधत राहा,” असं माझ्या आजीने माझ्या आईला सांगितलं. आणि तेव्हापासून माझ्या आईने सत्य नेमकं काय आहे ते शोधायला सुरुवात केली. माझ्या आईला यहोवाच्या साक्षीदारांसोबत बोलायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने मला म्हटलं, की ‘ते जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांच्यासमोर जाऊ नकोस.’ त्या वेळी आम्ही कॅनडाच्या टोरोंटोमध्ये राहत होतो. १९५० मध्ये जेव्हा माझ्या मावशीने साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू केला, तेव्हा आईसुद्धा त्यांच्यासोबत अभ्यासाला बसू लागली. त्या दोघी माझ्या मावशीच्या घरीच अभ्यास करायच्या. आणि काही काळाने त्या दोघींनीही बाप्तिस्मा घेतला.

कॅनडाच्या युनायटेड चर्चमध्ये माझे वडील पाळक होते. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला ते मला आणि माझ्या बहिणीला संडे स्कूलला पाठवायचे. संडे स्कूल संपल्यावर आम्ही ११ वाजता चर्चमध्ये जायचो. आणि मग दुपारी मी माझ्या आईसोबत सभेसाठी राज्यसभागृहात जायचो. चर्चमध्ये जे शिकवलं जायचं आणि राज्यसभागृहात जे शिकवलं जात होतं, त्यातला फरक मला स्पष्टपणे दिसून येत होता.

१९५८ मध्ये “ईश्‍वरी इच्छा” या अधिवेशनात हचसन कुटुंबासोबत

बॉब आणि मॅरिअन हचसन माझ्या आईचे खूप जुने मित्र होते. आईने त्यांनासुद्धा सत्याबद्दल सांगितलं आणि त्यांनीही सत्य स्वीकारलं. मग १९५८ ला हचसन यांनी मलाही त्यांच्या तीन मुलांसोबत न्युयॉर्क इथे असलेल्या आठ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी नेलं. त्या अधिवेशनाचा विषय होता ‘डिव्हाईन विल’ (ईश्‍वरी इच्छा). आज जेव्हा मी ते दिवस आठवतो तेव्हा मला जाणवतं, की मला सोबत घेऊन जाणं हे त्यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. पण ते अधिवेशन माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास आठवणींपैकी एक आहे.

भाऊबहिणींच्या मदतीमुळे यहोवाची जास्त सेवा करता आली

मी तरुण होतो तेव्हा आम्ही एका शेतावर राहायचो. तिथे आम्ही प्राणी पाळायचो. मला जनावरांचा डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती. ही गोष्ट माझ्या आईने मंडळीतल्या वडिलांना सांगितली. त्यांनी मला खूप प्रेमळपणे समजावून सांगितलं की आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. आणि मी जर उच्च शिक्षण घेण्यात बरीच वर्षं घालवली तर त्यामुळे माझ्या आणि यहोवाच्या नात्यावर परिणाम होईल. (२ तीम. ३:१) म्हणून मी उच्च शिक्षण घ्यायचा विचार सोडून दिला.

पण कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरसुद्धा माझ्या मनात हाच प्रश्‍न होता, की ‘पुढे काय करायचं?’ मी दर आठवडी प्रचाराला तर जायचो पण मला त्यात इतकी काही मजा येत नव्हती. आणि पुढे जाऊन मी पायनियर बनेन असंही वाटत नव्हतं. यादरम्यान माझे वडील आणि माझे काका मला टोरोंटोमध्ये एका मोठ्या विमा कंपनीत पूर्णवेळ नोकरी करण्यासाठी सांगत होते. माझे काका त्या कंपनीत मोठ्या हुद्द्‌यावर होते. त्यामुळे ही नोकरी मी करायचं ठरवलं.

टोरोंटोमध्ये काम करत असताना मी बहुतेक वेळा ओव्हरटाईम करायचो. माझा सगळा वेळ कामामध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये जायचा. त्यामुळे मला प्रचाराला आणि सभेला नियमितपणे जाता येत नव्हतं. सुरुवातीला मी माझ्या सत्यात नसलेल्या आजोबांसोबत राहायचो. पण त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मला आता दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जावं लागणार होतं.

१९५८ मध्ये ज्यांनी मला अधिवेशनासाठी नेलं होतं, ते बॉब आणि मॅरिअन हचसन माझ्यासाठी पालकांसारखेच होते. त्यांनी मला त्यांच्या घरी राहायला बोलवलं. आणि मला आध्यात्मिक प्रगती करायलाही मदत केली. १९६० मध्ये, त्यांच्या मुलासोबत म्हणजे जॉनसोबत माझासुद्धा बाप्तिस्मा झाला. जॉनने पायनियर सेवा सुरू केली. आणि मीही प्रचारकार्यात जास्त सहभाग घ्यावा असं त्याने मला प्रोत्साहन दिलं. मंडळीतल्या भावांना माझी प्रगती दिसून आली. आणि म्हणून त्यांनी मला ‘ईश्‍वरशासित सेवा प्रशाला’ सेवक म्हणून नियुक्‍त केलं. a

एक चांगला साथीदार आणि एक नवीन जाणीव

१९६६ मध्ये आमच्या लग्नाच्या दिवशी

१९६६ मध्ये, पामर बर्ज नावाच्या एका आवेशी पायनियरशी मी लग्न केलं. तिला गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायची खूप इच्छा होती. आमच्या प्रवासी पर्यवेक्षकांना आमच्याबद्दल खूप आपुलकी असल्यामुळे त्यांनी आम्हाला ओंटारीयो इथल्या ओरीलीया मंडळीत जाऊन सेवा करायचं प्रोत्साहन दिलं. मग आम्ही लगेच सामान बांधलं आणि तिथे गेलो.

ओरीलीयाला आल्यानंतर मीही पामरसोबत पायनियर म्हणून सेवा करू लागलो. सेवेतल्या तिच्या आवेशाचा माझ्यावर चांगलाच प्रभाव झाला होता. त्यामुळे मीही मनापासून पायनियर सेवा करू लागलो. प्रचारात लोकांना बायबलचं वचन दाखवायचा आणि त्यांना सत्य कसं समजतंय हे पाहायचा आनंद मी अनुभवला. तिथे एका जोडप्याला आम्ही बायबलचं सत्य शिकायला, त्यांच्या जीवनात बदल करायला आणि यहोवाचे सेवक बनायला मदत केली. हा खरंच आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद होता!

नवीन भाषा आणि नवीन विचारसरणी

मी टोरोंटोला गेलो होतो तेव्हा माझी भेट आर्नल्ड मॅक्नमारा यांच्याशी झाली. ते बेथेलमध्ये पुढाकार घेणाऱ्‍या भावांपैकी एक होते. त्यांनी मला विचारलं, की ‘तुला खास पायनियर म्हणून सेवा करायला आवडेल का?’ मी त्यांना लगेच म्हटलं “हो चालेल ना! क्युबेक सोडून कुठेही चालेल.” कारण कॅनडामधले इंग्रजी बोलणारे लोक क्युबेकमधल्या फ्रेंच बोलणाऱ्‍या लोकांबद्दल चुकीचा विचार करायचे. आणि त्यांच्या विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव झाला होता. त्या वेळी क्युबेकला कॅनडापासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून तिथले लोक सरकारविरुद्ध आंदोलन करत होते.

आर्नल्ड म्हणाले, “पण सध्या शाखा कार्यालय खास पायनियरना फक्‍त क्युबेकमध्येच पाठवत आहे.” तेव्हा मी लगेच जायला तयार झालो. कारण मला माहीत होतं, की पामरलाही तिथे सेवा करायची इच्छा आहे. आणि नंतर मला जाणवलं, की हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता!

पाच आठवड्यांचा फ्रेंच भाषेचा क्लास केल्यानंतर, मी, पामर आणि आणखी एक जोडपं, रिमौस्कीला गेलो. हे ठिकाण मॉन्ट्रियलच्या उत्तर-पूर्वेला ५४० कि.मी. अंतरावर होतं. आम्हाला अजूनही फ्रेंच भाषा इतकी काही चांगली येत नव्हती. त्यामुळे बऱ्‍याच मजेशीर गोष्टी घडायच्या. जसं की, एका सभेत मी घोषणा करत होतो. त्या वेळी येणाऱ्‍या अधिवेशनात मी ‘ऑस्ट्रियाहून पाहुणे येणार आहेत’ असं म्हणण्याऐवजी मी ‘ऑस्ट्रीच (शहामृग) पाहुणे येणार आहेत’ असं म्हटलं.

रिमौस्कीमधलं “व्हाईट हाऊस”

रिमौस्कीमध्ये असताना आमच्यासोबत आणखी चार बहिणी सेवा करायला आल्या. त्या सेवेत खूप आवेशी होत्या. तसंच भाऊ आणि बहीण ह्‍युबर्डो आणि त्यांच्या दोन मुलीही सेवा करायला रिमौस्कीमध्ये आल्या. ह्‍युबर्डो यांनी सात बेडरूमचं मोठं घर भाड्याने घेतलं होतं. आम्ही सगळे मिळून तिथे राहायचो आणि त्याचं भाडं भरायचो. त्या घराला आम्ही ‘व्हाईट हाऊस’ म्हणायचो. कारण त्या घराचे खांब आणि त्याचा समोरचा भाग पांढऱ्‍या रंगाचा होता. आम्ही जवळजवळ १२ ते १४ लोक तिथे राहत होतो. खास पायनियर असल्यामुळे मी आणि पामर, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी प्रचारकार्याला जायचो. आणि आमच्यासोबत नेहमी प्रचाराला कोणी-ना-कोणी असायचंच. खासकरून थंडीच्या दिवसांत कोणीतरी सोबत असायचं तेव्हा आणखी बरं वाटायचं.

त्या सगळया पायनियर भाऊबहिणींशी आमची चांगली मैत्री झाली होती. आम्ही एका कुटुंबासारखे होतो. कधीकधी आम्ही शेकोटी पेटवायचो. तिच्याभोवती बसून गप्पा मारायचो. किंवा एका खास दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे ‘डंप्लिंग्ज’ बनवायचो (करंज्यांसारखा दिसणारा एक पदार्थ). आमच्यापैकी एक भाऊ वाद्य वगैरे वाजवायचा. त्यामुळे सहसा शनिवारी संध्याकाळी आम्ही एकत्र मिळून गाणी गायचो आणि डान्ससुद्धा करायचो.

रिमौस्कीमध्ये आम्ही जो प्रचार केला होता, त्याचे चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळाले. जवळजवळ पाचच वर्षांत बऱ्‍याचशा बायबल विद्यार्थ्यांनी बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली. आणि मंडळीची वाढ होऊन प्रचारकांची एकूण संख्या ३५ झाली.

क्युबेकमध्ये सेवा करताना आम्हाला खूप चांगले अनुभव आले आणि बरंच काही शिकायलाही मिळालं. यहोवा प्रचार करण्यासाठी आणि आमच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला कशी मदत करत आहे, हे आम्हाला पाहता आलं. यासोबतच आम्ही फ्रेंच भाषा बोलणाऱ्‍या लोकांवर, त्यांच्या भाषेवर आणि त्यांच्या संस्कृतीवर प्रेम करायला शिकलो. त्यामुळे साहजिकच इतर संस्कृतीच्या लोकांवरही आम्ही प्रेम करायला शिकलो.​—२ करिंथ. ६:१३.

पण मग अचानकच शाखा कार्यालयाने आम्हाला ट्रॅकडी नावाच्या एका छोट्या गावात जाऊन प्रचार करायला सांगितलं. हे शहर न्यू ब्रुन्सविकच्या पूर्व किनाऱ्‍यावर होतं. ही नवीन नेमणूक स्वीकारणं आमच्यासाठी कठीणच होतं. कारण आम्ही नुकतंच एक घर भाड्याने घेतलं होतं आणि करारावर सह्‍याही केल्या होत्या. तसंच एका शाळेत मी शिक्षक म्हणून पार्ट टाईम कामही करत होतो. यासोबतच आमचे काही बायबल विद्यार्थी नुकतेच प्रचारक बनले होते. आणि आमचं राज्यसभागृह बांधायचं कामही चालू होतं.

शनिवारी आणि रविवारी आम्ही यहोवाकडे खूप प्रार्थना केली. आणि ट्रॅकेडी शहर कसं आहे हे जाऊन पाहिलं. ते रिमौस्कीपेक्षा खूप वेगळं होतं. पण आम्ही ठरवलं होतं, की जर यहोवाची इच्छा आहे आम्ही तिथे जावं तर आम्ही गेलंच पाहिजे. आम्ही यहोवाला पारखून पाहिलं आणि तो आमची प्रत्येक अडचण कशी दूर करतो हे अनुभवलं. (मला. ३:१०) आणि नेहमीप्रमाणेच पामरने मला खूप साथ दिली. तिची आध्यात्मिकता, आत्मत्यागी वृत्ती आणि तिच्या विनोदी स्वभावामुळे सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत पार पडलं.

आमच्या मंडळीत एकच वडील होते. रॉबर्ट रॉस. त्यांनी आणि त्यांची पत्नी लिंडा यांनी तिथे पायनियर सेवा केली होती. पण त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांनी तिथेच राहायचं ठरवलं. त्यांच्या मुलाची काळजी घेत असतानासुद्धा त्यांनी आम्हाला खूप चांगला पाहुणचार दाखवला, आमचं प्रेमाने स्वागत केलं. ते प्रचारातही खूप आवेशी होते. त्यांच्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं.

गरज असलेल्या ठिकाणी सेवा केल्यामुळे मिळालेले आशीर्वाद

माझ्या पहिल्या विभागातले थंडीचे दिवस

ट्रॅकेडीमध्ये दोन वर्षं पायनियर सेवा केल्यानंतर आम्हाला आणखी एक अनपेक्षित नेमणूक मिळाली. आम्हाला प्रवासी कार्यात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. जवळजवळ सात वर्षं इंग्रजी भाषेच्या विभागात सेवा केल्यानंतर मला पुन्हा क्युबेकमध्ये फ्रेंच भाषेच्या विभागात नेमण्यात आलं. त्या वेळी लियॉन्स क्रॅपॉल्ट हे आमचे प्रांतीय पर्यवेक्षक होते. माझ्या भाषणांसाठी ते माझं खूप कौतुक करायचे. पण त्यानंतर ते नेहमी मला सांगायचे, “तू तुझ्या भाषणात आणखी व्यावहारिक मुद्दे कसे आणू शकतोस याचा विचार कर.” b त्यांनी केलेल्या मदतीमुळे मला माझं शिकवण्याचं कौशल्य सुधारता आलं आणि माझी भाषणं आणखी साधी आणि समजायला सोपी करता आली.

१९७८ मध्ये मॉन्ट्रियल इथे “विक्टोरीयस फेथ” (विजयी ठरलेला विश्‍वास) हे आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनात मला जेवणाची व्यवस्था पाहणाऱ्‍या विभागात नेमण्यात आलं होतं. आणि ही नेमणूक माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. त्या अधिवेशनात जवळजवळ ८०,००० लोक अपेक्षित होते. आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी एक नवीनच योजना राबवण्यात आली होती. सगळं काही नवीन होतं. उपकरणं, जेवणाचे पदार्थ आणि जेवण बनवायची पद्धतसुद्धा. आमच्याकडे २० मोठमोठे फ्रिज होते. पण कधीकधी त्यात बिघाड व्हायचा. आदल्या दिवशी त्या स्टेडीयममध्ये खेळांच्या स्पर्धा चालू होत्या. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यासाठी आम्हाला मध्यरात्रीपर्यंत स्टेडीयममध्ये जातासुद्धा आलं नव्हतं. आणि सर्वांसाठी नाष्टा तयार करायला आम्हाला पहाटेच सुरुवात करावी लागणार होती. आम्ही खूप थकलो होतो. पण सोबत काम करणाऱ्‍या भाऊबहिणींकडून मला खूपकाही शिकायला मिळालं. ते खूप मेहनती होते, समजूतदार होते आणि ते हसत-खेळत काम करायचे. त्या वेळी आमची चांगली मैत्री झाली आणि ती आजही टिकून आहे. क्युबेकमध्ये झालेल्या त्या ऐतिहासिक अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा आनंद खूप खास होता. कारण याच ठिकाणी १९४० आणि १९५० च्या दशकांत आपल्या सेवाकार्याला तीव्र विरोध झाला होता. आणि भाऊबहिणींना खूप छळाचा सामनाही करावा लागला होता.

१९८५ साली मॉन्ट्रियल इथे पामरसोबत अधिवेशनाची तयारी करताना

मॉन्ट्रियलमध्ये झालेल्या मोठमोठ्या अधिवेशनांमध्ये माझ्यासोबत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्‍या भावांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. एकदा अशाच एका अधिवेशनात, आता नियमन मंडळाचे सदस्य म्हणून काम करणारे भाऊ डेविड स्प्लेनसुद्धा होते. ते अधिवेशनाचे पर्यवेक्षक होते. आणि संपूर्ण अधिवेशनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पुढे एका अधिवेशनात मला ही जबाबदारी देण्यात आली तेव्हा भाऊ डेविड स्प्लेन यांनी मला खूप सहकार्य केलं.

प्रवासी कार्यात जवळजवळ ३६ वर्षं सेवा केल्यानंतर मला २०११ मध्ये मंडळीच्या वडिलांसाठी असलेल्या प्रशालेत प्रशिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. या दोन वर्षांच्या काळात पामर आणि मला ७५ वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागलं. पण आम्ही केलेले हे त्याग वाया गेले नाहीत. कारण प्रत्येक आठवडी आम्ही पाहायचो की वडील मिळालेल्या प्रशिक्षणामुळे किती आनंदी आहेत आणि किती भारावून गेले आहेत. शिवाय, नियमन मंडळाला वडिलांच्या आध्यात्मिकतेची किती काळजी आहे, हेसुद्धा त्यांना जाणवत होतं.

नंतर मी सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेत प्रशिक्षक म्हणून काम केलं. या प्रशालेत विद्यार्थ्यांना दररोज जवळपास सात तास बसावं लागायचं. त्यानंतर दर संध्याकाळी जवळपास तीन तास गृहपाठ करावा लागायचा. आणि दर आठवड्याला चार ते पाच भाग हाताळावे लागायचे. त्यामुळे विद्यार्थी खूप थकून गेलेले असायचे आणि नेहमी चिंतेत असायचे. म्हणून मी आणि आणखी एका प्रशिक्षकाने त्यांना हे समजवून सांगितलं की यहोवाच्या मदतीशिवाय तुम्हाला हे करणं शक्य नाही.  मला अजूनही आठवतंय की यहोवावर विसंबून राहिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी विचारही केला नव्हत्या इतक्या गोष्टी त्यांना करता आल्या. आणि याचं त्यांना स्वतःलाच खूप आश्‍चर्य वाटत होतं.

इतरांना मदत केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात

माझ्या आईला इतरांबद्दल काळजी होती. आणि त्यामुळेच तिचे बायबल विद्यार्थी प्रगती करू शकले. तसंच माझ्या वडिलांचाही सत्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. तिच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतरच माझे वडील राज्यसभागृहात जाहीर भाषण ऐकण्यासाठी आले होते. हे पाहून आम्हाला खूप आश्‍चर्य वाटलं होतं. पुढची २६ वर्षं ते सभांना येत राहिले. माझ्या वडिलांनी बाप्तिस्मा घेतला नाही. पण तिथले वडील सांगतात की प्रत्येक आठवडी ते सभेला सगळ्यात आधी उपस्थित असायचे.

माझ्या आईने आम्हा मुलांसमोरसुद्धा खूप चांगलं उदाहरण मांडलं. माझ्या तिन्ही बहिणी आणि त्यांचे पती यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत. त्यांपैकी दोन बहिणी शाखा कार्यालयात सेवा करत आहेत. एक पोर्तुगालमध्ये तर एक हैटीमध्ये आहे.

पामर आणि मी सध्या ओंटारीयोच्या हॅमिल्टनमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करत आहोत. आम्ही प्रवासी कार्यात होतो तेव्हा इतरांच्या पुनर्भेटींना आणि बायबल अभ्यासाला जायला आम्हाला खूप आवडायचं. पण आता आमचे स्वतःचेच विद्यार्थी किती प्रगती करत आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो! तसंच आमच्या नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत आमची चांगली मैत्री झाली आहे. शिवाय, चांगल्या आणि वाईट काळात यहोवा त्यांना कशी मदत करत आहे हे पाहिल्यामुळे आम्हालाही खूप प्रोत्साहन मिळतं.

मी मागे वळून पाहतो तेव्हा इतरांनी आम्हाला जी काळजी आणि जे प्रेम दाखवलं त्याबद्दल आम्हाला त्यांचे खूप आभार मानावेसे वाटतात. आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या मनात इतरांबद्दल असलेली काळजी व्यक्‍त करायचा प्रयत्न करतो. आणि त्यांना यहोवाच्या सेवेत होताहोईल तितकं करायचं प्रोत्साहन देतो. (२ करिंथ. ७:६, ७) उदाहरणार्थ, एका कुटुंबामध्ये आई आणि तिची दोन लेकरं पूर्णवेळेची सेवा करत होते. म्हणून मी त्या मुलांच्या वडिलांना विचारलं की ‘तुम्हीसुद्धा पायनियर बनायचा विचार का करत नाही?’ तेव्हा ते म्हणाले की माझ्या घरातल्या तीन पायनियरांना सेवा करता यावी म्हणून मी त्यांची काळजी घेतो. मी त्यांना विचारलं, “तुम्ही यहोवापेक्षा त्यांची चांगली काळजी घेऊ शकता का?” मग, त्यांची पत्नी आणि मुलं ज्या सेवेचा आनंद घेत आहेत त्या सेवेचा आनंद त्यांनीही चाखून पाहावा असं प्रोत्साहन मी त्यांना दिलं. आणि पुढच्या सहा महिन्यातच त्यांनी पायनियर सेवा सुरू केली.

मी आणि पामर, आम्ही दोघेही “पुढच्या पिढीला” यहोवाच्या ‘अद्‌भुत कार्यांबद्दल’ असंच सांगत राहू. आणि यहोवाच्या सेवेत आम्हाला जितका आनंद मिळाला तितकाच त्यांनाही मिळेल अशी आशा करतो.​—स्तो. ७१:१७, १८.

a आता याला ‘जीवन आणि सेवाकार्य पर्यवेक्षक’ असं म्हणतात.

b फेब्रुवारी २०२० च्या टेहळणी बुरूज  अंकातली पान २६-३० वर असलेली लियॉन्स क्रॅपॉल्ट यांची जीवन कथा पाहा.