व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३१

“खंबीर आणि स्थिर राहा”

“खंबीर आणि स्थिर राहा”

“माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर आणि स्थिर राहा.”​—१ करिंथ. १५:५८.

गीत १२२ निर्भय व निश्‍चयी राहा!

सारांश a

१-२. यहोवाचे सेवक कशा प्रकारे टोकियोमधल्या बिल्डिंगसारखे आहेत? (१ करिंथकर १५:५८)

 १९७८ मध्ये जपानच्या टोकियो शहरात एक ६० मजली बिल्डिंग बांधण्यात आली. टोकियो शहरात नेहमी भूकंप होत राहतात. त्यामुळे या बिल्डिंगकडे बघणाऱ्‍यांच्या मनात असा प्रश्‍न यायचा, की ‘या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये ही बिल्डिंग कशी काय टिकून राहील?’ पण मग, ही बिल्डिंग टिकून राहण्यामागचं रहस्य काय होतं? ते म्हणजे, त्या बिल्डिंगची धक्के सहन करायची क्षमता. बिल्डिंग बांधणाऱ्‍यांनी ती अशा प्रकारे बांधली होती, की ती मजबूत तर राहिलच, पण भूकंपाचे धक्के सहन करण्यासाठी लवचीकताही तिच्यामध्ये असेल. यहोवाचे सेवकसुद्धा त्या बिल्डिंगसारखेच आहेत. ते कसं?

त्या बिल्डिंगप्रमाणेच यहोवाच्या सेवकांनीसुद्धा खंबीर राहायच्या बाबतीत आणि लवचीकता हा गुण दाखवायच्या बाबतीत समतोल राखला पाहिजे. लवचीकता म्हणजे बदल करायला तयार असणं. जेव्हा यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि त्याच्या स्तरांप्रमाणे चालण्याची गोष्ट येते, तेव्हा त्यांनी खंबीर आणि स्थिर म्हणजे ठाम असलं पाहिजे. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) त्यांनी नेहमी “आज्ञाधारक” असलं पाहिजे आणि यहोवाच्या नियमांच्या बाबतीत तडजोड केली नाही पाहिजे. यासोबतच, परिस्थितीप्रमाणे आणि गरज पडते तेव्हा त्यांनी ‘समजूतदारपणा’ दाखवला पाहिजे. (याको. ३:१७) जी ख्रिस्ती व्यक्‍ती अशा प्रकारे समतोल राखते, ती कधीही टोकाची भूमिका घेत नाही आणि ‘सगळं काही चालतं’ असाही विचार करत नाही. आपण खंबीर कसं राहू शकतो याबद्दल या लेखात चर्चा केली जाईल. तसंच आपला हा निश्‍चय कमकुवत करण्याचा सैतान कोणत्या पाच मार्गांनी प्रयत्न करतो आणि आपण त्याचा प्रतिकार कसा करू शकतो, हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.

आपण खंबीर कसं राहू शकतो?

३. प्रेषितांची कार्यं १५:२८, २९ मध्ये यहोवाने कोणत्या नियमांबद्दल सांगितलं आहे?

यहोवा नियम देणारा सर्वोच्च अधिकारी आहे. त्याने आपल्या लोकांना नेहमीच स्पष्ट नियम दिले आहेत. (यश. ३३:२२) उदाहरणार्थ, पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाद्वारे त्याने ख्रिश्‍चनांना तीन गोष्टींमध्ये ठाम राहायला सांगितलं: (१) मूर्तिपूजेपासून दूर राहून फक्‍त त्याचीच उपासना करण्याच्या बाबतीत, (२) रक्‍ताबद्दल यहोवाचे नियम पाळण्याच्या बाबतीत, आणि (३) बायबलच्या उच्च नैतिक स्तरांप्रमाणे चालण्याच्या बाबतीत. (प्रेषितांची कार्यं १५:२८, २९ वाचा.) आजसुद्धा ख्रिस्ती या तीन गोष्टींच्या बाबतीत ठाम कसे राहू शकतात?

४. आपण फक्‍त यहोवाचीच उपासना का करतो? (प्रकटीकरण ४:११)

आपण मूर्तिपूजेपासून दूर राहून फक्‍त यहोवाचीच उपासना करतो.  यहोवाने इस्राएली लोकांना फक्‍त त्याचीच उपासना करण्याची आज्ञा दिली होती. (अनु. ५:६-१०) सैतानाने जेव्हा येशूची परीक्षा घेतली, तेव्हा येशूनेसुद्धा हेच दाखवून दिलं, की आपण फक्‍त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. (मत्त. ४:८-१०) म्हणून आपण उपासनेसाठी कोणत्याही मूर्तीचा वापर करत नाही. तसंच आपण कोणत्याही मानवांची उपासना करत नाही आणि त्यांना देवांचा दर्जा देत नाही; मग ते धार्मिक पुढारी असोत, राजकीय नेते असोत, किंवा मग खेळाच्या आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्‍ती असोत. आपण नेहमी यहोवाची बाजू घेतो आणि फक्‍त त्याचीच उपासना करतो. कारण त्यानेच “सर्व गोष्टी निर्माण केल्या” आहेत.​—प्रकटीकरण ४:११ वाचा.

५. जीवनाच्या आणि रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल यहोवाने दिलेल्या नियमाचं आपण पालन का करतो?

आपण जीवनाच्या आणि रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल यहोवाने दिलेल्या नियमांचं पालन करतो.  का बरं? कारण यहोवाने म्हटलं रक्‍त म्हणजेच जीवन आहे. आणि जीवन यहोवाकडून आपल्याला मिळालेली एक मौल्यवान भेट आहे. (लेवी. १७:१४) जेव्हा यहोवाने पहिल्यांदा मानवांना मांस खायची परवानगी दिली, तेव्हा मांसासोबत रक्‍त न खाण्याची आज्ञाही दिली. (उत्प. ९:४) पुढे जेव्हा त्याने इस्राएली लोकांना मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं, तेव्हाही त्याने ही आज्ञा पुन्हा सांगितली. (लेवी. १७:१०) यानंतर, त्याने पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाद्वारे सर्व ख्रिश्‍चनांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी ‘रक्‍तापासून दूर राहावं.’ (प्रे. कार्यं १५:२८, २९) त्यामुळे आपणसुद्धा उपचारांच्या बाबतीत निर्णय घेताना, या आज्ञेचं खंबीरपणे पालन करतो. b

६. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांप्रमाणे जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांचं आपण काटेकोरपणे पालन करतो.  (इब्री १३:४) प्रेषित पौलने असा सल्ला दिला, की एका अर्थाने आपण आपल्या ‘शरीराच्या अवयवांना मारून टाकलं पाहिजे.’ म्हणजेच, चुकीच्या इच्छांना आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण ठोस पावलं उचलली पाहिजेत. आपण अशी कोणतीही गोष्ट पाहायचं किंवा करायचं टाळलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या हातून अनैतिक लैंगिक कृत्य घडेल. (कलस्सै. ३:५; ईयो. ३१:१) एखादी चुकीची गोष्ट करायचा मोह आपल्याला होतो, तेव्हा तो विचार आपण लगेच आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. तसंच, यहोवाची आणि आपली मैत्री धोक्यात येईल अशी कोणतीही गोष्ट आपण करू नये.

७. आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे आणि का?

यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचं “मनापासून पालन” करावं. (रोम. ६:१७) त्याचं मार्गदर्शन नेहमी आपल्या भल्यासाठीच असतं. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्याचे नियम कधीच बदलू शकत नाही. (यश. ४८:१७, १८; १ करिंथ. ६:९, १०) म्हणून, आपण यहोवाचं मन आनंदी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नेहमी स्तोत्रकर्त्याप्रमाणे मनोवृत्ती दाखवली पाहिजे. त्याने म्हटलं, “मी तुझ्या कायद्यांचं नेहमी, अगदी शेवटपर्यंत पालन करण्याचा निश्‍चय केलाय.” (स्तो. ११९:११२) पण, सैतान कायम आपला हा निश्‍चय कमकुवत करायचा प्रयत्न करतो. यासाठी तो कोणते मार्ग वापरतो?

सैतान आपला निश्‍चय कमकुवत करायचा कसा प्रयत्न करतो?

८. आपला निश्‍चय कमकुवत करण्यासाठी सैतान छळाचा वापर कसा करतो?

छळ.  सैतान हिंसेचा आणि दबावाचा वापर करून आपला निश्‍चय कमकुवत करायचा प्रयत्न करतो. यहोवासोबत आपलं नातं तुटावं म्हणून तो जणू आपल्याला ‘गिळून’ टाकायचा प्रयत्न करतो. (१ पेत्र ५:८) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी यहोवाच्या बाजूने उभं राहण्याचा ठाम निश्‍चय केला तेव्हा त्यांना धमकावण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि काहींना तर ठारही मारण्यात आलं. (प्रे. कार्यं ५:२७, २८, ४०; ७:५४-६०) सैतान आजही त्याच प्रकारे देवाच्या लोकांचा छळ करत आहे. रशिया आणि इतर देशांमध्ये आपल्या भाऊबहिणींना जी क्रूर वागणूक देण्यात येत आहे, आणि इतर ठिकाणी विरोधक त्यांच्यावर जे हल्ले करत आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं.

९. छुप्या दबावांच्या बाबतीत आपण सावध का असलं पाहिजे ते स्पष्ट करा?

छुपे दबाव.  सैतान थेट हल्ल्यांसोबतच ‘डावपेचांचासुद्धा’ वापर करतो. (इफिस. ६:११) बॉब नावाच्या एका भावाचंच उदाहरण घ्या. त्याला एका मोठ्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्याने डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितलं होतं, की कोणत्याही परिस्थितीत त्याला रक्‍त चढवलं जाऊ नये. आणि डॉक्टरांनीही त्याचा निर्णय मान्य केला होता. पण ऑपरेशनच्या आदल्या रात्री दुसरा एक डॉक्टर त्याला भेटण्यासाठी आला. त्या वेळी बॉबच्या कुटुंबातलं कोणीही त्याच्याजवळ नव्हतं. त्या डॉक्टरने त्याला सांगितलं, की ‘तशी तर रक्‍ताची गरज पडणार नाही, पण जर लागलंच तर आम्ही ते तयार ठेवू.’ त्या डॉक्टरला असं वाटलं होतं की कुटुंबातलं कोणीही जवळ नसताना बॉब कदाचित आपला निर्णय बदलेल. पण बॉब खंबीर राहिला. त्याने पुन्हा एकदा सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत त्याला रक्‍त दिलं जाऊ नये.

१०. मानवी विचार आपल्यासाठी पाश का ठरू शकतात? (१ करिंथकर ३:१९, २०)

१० माणसांचे विचार.  आपण जर कोणत्याही गोष्टीकडे मानवी दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला तर आपण कदाचित यहोवाला आणि त्याच्या स्तरांना विसरून जाऊ. (१ करिंथकर ३:१९, २० वाचा.) “जगाची बुद्धी” ही आपल्याला नेहमी स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला प्रवृत्त करते. पहिल्या शतकातल्या पर्गम आणि थुवतीरा या शहरांमधले लोक मूर्तिपूजक आणि अनैतिक होते. त्यामुळे या शहरांमध्ये राहणाऱ्‍या काही ख्रिश्‍चनांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव झाला होता. या दोन्ही शहरांतल्या मंडळ्यांनी लैंगिक अनैतिकतेला खपवून घेतल्यामुळे येशूने कडक शब्दांत त्यांना सल्ला दिला होता. (प्रकटी. २:१४, २०) आजसुद्धा आपल्यावर जगाची चुकीची विचारसरणी स्वीकारायचा दबाव येत असतो. आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या ओळखीचे लोक कदाचित आपल्याला हे पटवून द्यायचा प्रयत्न करतील, की यहोवाचे नियम खूप कडक आहेत आणि आपल्याला नेहमीच ते पाळायची गरज नाही. उदाहरणार्थ, कदाचित ते आपल्याला असं सांगतील, की बायबलचे नैतिक स्तर आता जुने झाले आहेत आणि त्यामुळे स्वतःची इच्छा पूर्ण करणं ही काही वाईट गोष्ट नाही.

११. यहोवाच्या नियमांवर ठाम राहण्याचा प्रयत्न करत असताना आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

११ कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की यहोवाने दिलेलं मार्गदर्शन पुरेसं नाही. त्यामुळे “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे” जाण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. (१ करिंथ. ४:६) येशूच्या काळातल्या धार्मिक पुढाऱ्‍यांनीसुद्धा हेच पाप केलं होतं. त्यांनी नियमशास्त्रामध्ये स्वतःच्या नियमांची भर घातली होती. त्यामुळे सर्वसाधारण माणसांवर त्यांनी मोठं ओझं लादलं होतं. (मत्त. २३:४) यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला स्पष्ट मार्गदर्शन देतो. आणि त्याने दिलेल्या मार्गदर्शनात आपल्याला कोणतीही भर घालायची गरज नाही. (नीति. ३:५-७) म्हणून बायबलमध्ये जे लिहिलंय त्याच्या पलीकडे आपण जात नाही. आणि भाऊबहिणींच्या खाजगी गोष्टींबद्दल आपण नियम बनवत नाही.

१२. सैतान ‘फसव्या गोष्टींचा’ वापर कसा करतो?

१२ फसवणूक.  सैतान ‘फसव्या गोष्टींचा’ आणि ‘जगाच्या विचारसरणीचा’ वापर करून लोकांची दिशाभूल करायचा आणि त्यांच्यात फूटी निर्माण करायचा प्रयत्न करतो. (कलस्सै. २:८) त्याने हे पहिल्या शतकात कसं केलं? त्याने मानवी विचारांवर आधारलेल्या तत्त्वज्ञानाचा आणि देवाच्या वचनानुसार नसलेल्या यहुदी शिकवणींचा वापर केला. तसंच, त्याने ख्रिश्‍चनांना हे पटवून द्यायचा प्रयत्न केला, की त्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केलं पाहिजे. ही सगळी फसवणूक होती. कारण त्यामुळे, खऱ्‍या बुद्धीचा स्रोत असलेल्या यहोवा देवापासून लोकांचं लक्ष विचलित झालं. आजसुद्धा सैतान फसवणूक करण्यासाठी मिडिया आणि सोशल नेटवर्कचा (प्रसार आणि समाज माध्यमांचा) वापर करत आहे. यांचा वापर करून तो अफवा आणि राजकीय पुढाऱ्‍यांना हव्या असणाऱ्‍या खोट्या बातम्या पसरवतो. कोव्हिड-१९ महामारीच्या वेळी आपल्याला हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. c ज्यांनी या चुकीच्या माहितीकडे लक्ष दिलं त्यांना नको त्या चिंतांचा सामना करावा लागला. याउलट ज्या यहोवाच्या साक्षीदारांनी संघटनेकडून येणाऱ्‍या मार्गदर्शनाचं पालन केलं त्यांना अशा चिंतांपासून दूर राहायला मदत झाली.​—मत्त. २४:४५.

१३. लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींच्या बाबतीत आपण सावध का असलं पाहिजे?

१३ लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी.  आपण नेहमी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. (फिलिप्पै. १:९, १०) कारण लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींमुळे आपला बराच वेळ आणि बरीच शक्‍ती वाया जाऊ शकते. रोजच्या जीवनातल्या गोष्टींनासुद्धा आपण जर जास्त महत्त्व दिलं तर त्यांमुळेसुद्धा आपलं लक्ष विचलित होऊ शकतं; जसं की, खाणं-पिणं, मनोरंजन आणि नोकरी-व्यवसाय. (लूक २१:३४, ३५) यासोबतच आपल्यावर दररोज सामाजिक वादविषयांचा आणि राजनैतिक मुद्द्‌यांचा बातम्यांमधून भडिमार होत असतो. अशा प्रकारच्या वादविषयांमुळे आपलं लक्ष विचलित होऊन चालणार नाही. नाहीतर आपण मनातल्या मनात कोणाची तरी बाजू घ्यायचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टींचा वापर करून सैतान योग्य ते करायचा आपला निश्‍चय कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. तर चला, आता आपण खंबीर राहून सैतानाचे हे प्रयत्न कसे हाणून पाडू शकतो यावर विचार करू या.

आपण खंबीर कसं राहू शकतो?

स्थिर आणि ठाम राहायचं असेल तर, तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा का घेतला याचा विचार करा, देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यावर मनन करा, आपलं मन खंबीर करा आणि यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा (परिच्छेद १४-१८ पाहा)

१४. यहोवाच्या बाजूने खंबीर उभं राहण्यासाठी तुम्ही कोणत्या एका गोष्टीचा विचार करू शकता?

१४ तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा का घेतला याचा विचार करा.  तुम्हाला यहोवाच्या बाजूने उभं राहायचं होतं म्हणून तुम्ही ही पावलं उचलली. हेच सत्य आहे याची तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींमुळे खातरी पटली ते आठवा. तुम्ही यहोवाबद्दल अचूक ज्ञान घेतलं आणि स्वर्गातल्या आपल्या पित्याबद्दल तुमच्या मनात आदर आणि प्रेम वाढलं. तुमचा विश्‍वास वाढला आणि पूर्वी केलेल्या चुकांबद्दल तुम्ही पश्‍चात्ताप केला. तुम्ही वाईट गोष्टी सोडून दिल्या आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगू लागला. यहोवाने तुम्हाला माफ केलंय, हे जेव्हा तुम्हाला जाणवलं तेव्हा तुम्हाला खूप बरं वाटलं. (स्तो. ३२:१, २) तुम्ही नियमितपणे सभांना येऊ लागला आणि शिकलेल्या गोष्टी इतरांनाही सांगू लागला. आज तुम्ही बाप्तिस्मा घेतलेली समर्पित व्यक्‍ती म्हणून जीवनाच्या मार्गावर चालत आहात. आणि या मार्गावर चालत राहण्याचा तुमचा ठाम निश्‍चय आहे.​—मत्त. ७:१३, १४.

१५. देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यावर मनन करणं का फायद्याचं आहे?

१५ देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि त्यावर मनन करा.  झाडाची मुळं खोलवर गेली असतील तर झाड मजबूतपणे उभं राहू शकतं. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाचा अभ्यास करून आपण आपल्या विश्‍वासाची मुळं खोलवर रुजवलेली असतील तर आपल्याला ठाम उभं राहता येईल. जसजसं एखादं झाड वाढत जातं, तसतशी त्याची मुळं आणखी खोलवर व दूरवर पसरत जातात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यावर मनन करतो, तेव्हा आपला विश्‍वाससुद्धा आणखी मजबूत होत जातो. तसंच देवाचे मार्गच श्रेष्ठ आहेत यावरचा आपला भरवसाही वाढत जातो. (कलस्सै. २:६, ७) जुन्या काळात देवाच्या सेवकांना यहोवाच्या सूचनांमुळे, मार्गदर्शनामुळे आणि संरक्षणामुळे कसा फायदा झाला, त्याचा विचार करा. उदाहरणार्थ, यहेज्केलने पाहिलेल्या लाक्षणिक मंदिराच्या दृष्टान्ताचा विचार करा. त्यात स्वर्गदूत मंदिराचं मोजमाप करत असताना यहेज्केलने बारकाईने लक्ष दिलं. या दृष्टान्तामुळे यहेज्केलचा विश्‍वास मजबूत झाला. तसंच, शुद्ध उपासनेसाठी असलेल्या यहोवाच्या स्तरांवर आपण कसं चालू शकतो, यासाठी हा दृष्टान्त आज आपल्यालाही मदत करतो. d (यहे. ४०:१-४; ४३:१०-१२) आजसुद्धा आपण देवाच्या वचनातल्या गहन गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढतो तेव्हा आपल्यालाही फायदा होतो.

१६. मन खंबीर केल्यामुळे बॉबचं कसं संरक्षण झालं? (स्तोत्र ११२:७)

१६ मन खंबीर करा.  दावीद राजाने एका गीतात असं गायलं: “हे देवा, माझं मन खंबीर आहे.” (स्तो. ५७:७) यावरून त्याने दाखवून दिलं, की यहोवावर असलेलं त्याचं प्रेम कधीच कमी होणार नाही. आपणही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आपलं मन खंबीर करू शकतो. (स्तोत्र ११२:७ वाचा.) आधी उल्लेख केलेल्या बॉबने आपलं मन खंबीर केलं. त्यामुळे त्याला कसा फायदा झाला त्याचा विचार करा. बॉबला सांगण्यात आलं होतं, की ऑपरेशन करताना जर गरज पडली तर रक्‍त तयार ठेवलं जाईल. पण त्याने लगेच त्यांना सांगितलं, की रक्‍त द्यायची कोणतीही शक्यता असेल, तर तो लगेच हॉस्पिटलमधून निघून जाईल. नंतर बॉबने असं सांगितलं: “मी काय करणार आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. आणि पुढे काय होईल याबद्दल मला जराही चिंता नव्हती.”

यहोवावरचा आपला विश्‍वास मजबूत असेल तर कोणत्याही परीक्षेत आपण खंबीर राहू शकतो (परिच्छेद १७ पाहा)

१७. बॉबच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (चित्रसुद्धा पाहा.)

१७ बॉब खंबीर राहू शकला, कारण हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच त्याने ठाम राहण्याचा निश्‍चय केला होता. तो असं का करू शकला? पहिली गोष्ट म्हणजे, त्याला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याने बायबलचा आणि बायबलवर आधारित साहित्यांचा अभ्यास करून हे समजून घेतलं होतं, की जीवनाच्या आणि रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल त्यात काय सांगितलंय. तिसरी गोष्ट म्हणजे, त्याला या गोष्टीची पूर्ण खातरी होती, की यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे कायम टिकणारे आशीर्वाद मिळतात. कोणतीही परीक्षा आली, तरी बॉबप्रमाणे आपणसुद्धा आपलं मन खंबीर ठेवू शकतो.

बाराक आणि त्याच्या सैनिकांनी धैर्याने सीसराच्या सैनिकांवर हल्ला केला (परिच्छेद १८ पाहा)

१८. बाराकचं उदाहरण यहोवावर भरवसा ठेवायला आपल्याला कशा प्रकारे मदत करतं? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१८ यहोवावर भरवसा ठेवा.  यहोवाच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवल्यामुळे बाराकला कसं यश मिळालं, त्याचा विचार करा. यहोवाने बाराकला कनानी लोकांविरुद्ध युद्ध करायला सांगितलं होतं. कनानच्या सैन्याचा सेनापती सीसरा होता आणि त्याच्याजवळ ९०० रथ आणि भरपूर शस्त्रसामग्री होती. याउलट, इस्राएली सैनिकांपैकी एकाकडेही ढाल किंवा बरची नव्हती. (शास्ते ५:८) दबोरा संदेष्टीने सीसरा आणि त्याच्या सैन्यासोबत युद्ध करायला बाराकला कीशोनच्या खोऱ्‍यात जायला सांगितलं. खरंतर सीसराकडे रथ असल्यामुळे खोऱ्‍यातल्या सपाट जमिनीवर युद्ध करायला त्याला जास्त सोपं जाणार होतं. पण तरीसुद्धा बाराकने दबोराचं म्हणणं ऐकलं. इस्राएली सैनिक ताबोर डोंगरावरून खाली येत होते, तेव्हा यहोवाने जोरदार पाऊस पाडला. त्यामुळे सीसराचे सगळे रथ चिखलात रूतले आणि यहोवाने बाराकला मोठा विजय मिळवून दिला. (शास्ते ४:१-७, १०, १३-१६) बाराकप्रमाणे आज आपणसुद्धा यहोवावर आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर भरवसा ठेवला, तर तो आपल्यालाही विजय मिळवून देईल.​—अनु. ३१:६.

खंबीर राहायचा निश्‍चय करा

१९. तुम्ही खंबीर राहायचा निश्‍चय का केला आहे?

१९ आपण जोपर्यंत या दुष्ट जगात राहत आहोत, तोपर्यंत आपल्याला खंबीर राहण्यासाठी झगडावं लागेल. (१ तीम. ६:११, १२; २ पेत्र ३:१७) त्यामुळे छळ, छुपे दबाव, माणसांचे विचार, फसवणूक आणि लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टींमुळे आपल्याला डळमळून चालणार नाही. (इफिस. ४:१४) याउलट, आपण स्थिर राहून खंबीरपणे यहोवाची उपासना करत राहू या आणि ठाम राहून त्याची आज्ञा पाळत राहू या. पण यासोबतच आपल्याला समजूतदार असण्याचीसुद्धा गरज आहे. समजूतदार असण्याच्या बाबतीत यहोवा आणि येशूने कसं सर्वोत्तम उदाहरण मांडलं, ते आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

a आदाम आणि हव्वा यांच्या काळापासूनच सैतान लोकांना हे पटवून द्यायचा प्रयत्न करतोय, की काय चांगलं आणि काय वाईट आहे, हे ते स्वतःच ठरवू शकतात. यहोवाच्या नियमांबद्दल आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाबद्दल आपणही तसाच दृष्टिकोन ठेवावा अशी सैतानाची इच्छा आहे. त्याच्या अशा विचारसरणीपासून दूर राहायला आणि यहोवाच्या बाजूने ठाम उभं राहायचा आपला निश्‍चय पक्का करायला, हा लेख आपल्याला मदत करेल.

b एक ख्रिस्ती व्यक्‍ती देवाने रक्‍ताबद्दल दिलेल्या नियमांचं पालन कसं करू शकते, याबद्दल आणखी माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकाचा धडा ३९ पाहा.

c जास्त माहितीसाठी jw.org वेबसाईटवर “प्रोटेक्ट युवरसेल्फ फ्रॉम मिसइन्फॉर्मेशन” हा इंग्रजीतला लेख पाहा.