व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३०

तुमचं प्रेम वाढवत राहा!

तुमचं प्रेम वाढवत राहा!

“आपण . . . सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं.”​—इफि. ४:१५.

गीत २ देवाचं अतुल्य नाव!

सारांश a

१. तुम्ही बायबल अभ्यास सुरू केला तेव्हा तुम्हाला कोणती सत्यं समजली?

 तुम्ही बायबल अभ्यास सुरू केला तो काळ तुम्हाला आठवतो का? देवाला एक नाव आहे, हे समजल्यावर तुम्हाला आश्‍चर्य वाटलं असेल. तसंच तो लोकांना नरकाच्या आगीत शिक्षा देत नाही, ही गोष्ट समजल्यावर तुम्हाला हायसं वाटलं असेल. तुम्ही तुमच्या मेलेल्या प्रिय व्यक्‍तीला पुन्हा भेटू शकता आणि पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम जगू शकता, ही गोष्ट समजल्यावर तुम्ही भारावून गेला असाल.

२. बायबलची सत्यं शिकण्यासोबतच तुम्ही आणखी कोणकोणत्या गोष्टींमध्ये प्रगती केली? (इफिसकर ५:१, २)

तुम्ही यहोवाबद्दल जितकं जास्त शिकत गेला तितकं यहोवावरचं तुमचं प्रेम  वाढत गेलं. या प्रेमामुळेच तुम्ही शिकलेल्या गोष्टी लागू  करायला सुरुवात केली. बायबल तत्त्वांच्या आधारावर तुम्ही चांगले निर्णय घेऊ लागला. यहोवाला खूश करायची इच्छा असल्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्या-बोलण्यातही सुधारणा केली. जसं एक लहान मूल आपल्या आईवडिलांचं अनुकरणं करतं, तसं तुम्ही तुमच्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत राहिला.​—इफिसकर ५:१, २ वाचा.

३. आपल्या मनात कदाचित कोणते प्रश्‍न येतील?

स्वतःचं परीक्षण करत असताना कदाचित आपण विचार करू: ‘बाप्तिस्म्याच्या वेळी माझं यहोवावर जितकं प्रेम होतं, त्यापेक्षा आज त्याच्यावर माझं जास्त प्रेम आहे का? बाप्तिस्म्यानंतर मी जास्तीत जास्त यहोवासारखा विचार करायला आणि त्याच्यासारखं वागायला शिकलोय का? खासकरून भाऊबहिणींवर प्रेम करण्याच्या बाबतीत?’ तुमचं “सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे,” असं जर तुम्हाला वाटत असेल, तर निराश होऊ नका. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीतही असंच झालं होतं. पण तरीसुद्धा येशूने त्यांना नाकारलं नाही आणि आज तो आपल्यालाही नाकारणार नाही. (प्रकटी. २:४,) सुरुवातीला सत्य शिकल्यावर तुमच्या मनात यहोवाबद्दल जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम तुम्ही आजसुद्धा तुमच्या मनात पुन्हा उत्पन्‍न करू शकता, हे त्याला माहीत आहे.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण, यहोवावरचं आणि इतरांवरचं आपलं प्रेम कसं वाढवत राहू शकतो यावर चर्चा करू या. आणि हे प्रेम वाढवल्यामुळे आपल्याला आणि इतरांना कोणते आशीर्वाद मिळू शकतात हेसुद्धा पाहू या.

यहोवावर  असलेलं तुमचं प्रेम वाढवा

५-६. (क) प्रेषित पौलला त्याच्या सेवेदरम्यान कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? (ख) पण यहोवाची सेवा करत राहायला त्याला कशामुळे मदत झाली?

प्रेषित पौलने यहोवाची सेवा आनंदाने केली. पण त्याच्यासाठी हे नेहमीच सोपं नव्हतं. त्याला लांब-लांब प्रवास करावा लागायचा आणि त्या काळात प्रवास करणं कठीण होतं. प्रवासादरम्यान काही वेळा त्याला ‘नद्यांवरच्या संकटांचा’ आणि ‘लुटारूंच्या संकटांचा’ सामना करावा लागला. काही वेळा तर विरोधकांनी त्याला मारहाणसुद्धा केली. (२ करिंथ. ११:२३-२७) इतकंच नाही, तर पौल भाऊबहिणींना मदत करण्यासाठी जे प्रयत्न करत होता, त्याची भाऊबहिणींना काही वेळा कदरसुद्धा नव्हती.​—२ करिंथ. १०:१०; फिलिप्पै. ४:१५.

यहोवाची सेवा करत राहायला पौलला कशामुळे मदत झाली? त्याने शास्त्रवचनातून आणि स्वतःच्या अनुभवातून यहोवा कसा आहे हे समजून घेतलं. त्याला खातरी पटली, की यहोवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे. (रोम. ८:३८, ३९; इफिस. २:४, ५) आणि त्याचंही यहोवावर असलेलं प्रेम वाढत गेलं. त्याने “पवित्र जनांची सेवा केली” आणि पुढेही तो करत राहिला. असं करून त्याने यहोवावर असलेलं त्याचं प्रेम दाखवून दिलं.​—इब्री ६:१०.

७. यहोवावर असलेलं आपलं प्रेम वाढवायचा एक मार्ग कोणता आहे?

आपण बायबलचा अभ्यास करण्यासाठी मेहनत घेतली तर यहोवावर असलेलं आपलं प्रेम वाढत जाईल. बायबल वाचत असताना त्या अहवालातून यहोवाबद्दल तुम्हाला काय समजतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मग या प्रश्‍नांवर विचार करा: ‘या अहवालातून मला कसं कळतं की यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे? आणि मीसुद्धा यहोवावर प्रेम केलं पाहिजे याची कोणती कारणं मला मिळतात?’

८. प्रार्थना केल्यामुळे यहोवाबद्दल असलेलं आपलं प्रेम कसं वाढू शकतं?

यहोवावरचं आपलं प्रेम वाढवायचा आणखी एक मार्ग म्हणजे, आपण त्याला दररोज प्रार्थना करून मनमोकळेपणाने त्याच्याशी बोललं पाहिजे. (स्तो. २५:४, ५) आणि असं केल्यावर यहोवाही आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल. (१ योहा. ३:२१, २२) आशियामध्ये राहणारी कहन नावाची एक बहीण म्हणते: “आधी यहोवाबद्दल मी जे शिकले त्यामुळे मी त्याच्यावर प्रेम करायचे. पण जेव्हा मी पाहिलं की तो माझ्या प्रार्थनांचं उत्तर कसं देतो, तेव्हा त्याच्यावरचं माझं प्रेम आणखी वाढलं. यामुळे त्याला ज्या गोष्टी आवडतील त्याच मला कराव्याशा वाटतात.” b

इतरांवर  असलेलं तुमचं प्रेम वाढवा

९. तीमथ्यचं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम वाढलंय हे त्याने कसं दाखवलं?

पौल ख्रिस्ती बनला त्याच्या काही वर्षांनंतर त्याची ओळख तीमथ्य नावाच्या एका तरुणाशी झाली. तीमथ्यचं यहोवावर प्रेम होतं आणि इतरांवरही प्रेम होतं. म्हणूनच काही वर्षांनंतर पौलने फिलिप्पैकरांना असं लिहिलं: “त्याच्यासारखा स्वभाव असलेला असा कोणीही माझ्याजवळ नाही, जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल.” (फिलिप्पै. २:२०) पौल इथे तीमथ्यच्या काम करायच्या पद्धतीबद्दल किंवा भाषण द्यायच्या कौशल्याबद्दल बोलत नव्हता. तर त्याचं भाऊबहिणींवर किती प्रेम होतं, हे पाहून तो प्रभावित झाला होता. म्हणूनच मंडळीतले भाऊबहीण तीमथ्यच्या भेटींची आतुरतेने वाट पाहायचे.​—१ करिंथ. ४:१७.

१०. ॲना आणि तिच्या पतीने भाऊबहिणींबद्दल त्यांच्या मनात असलेलं प्रेम कामातून कसं दाखवलं?

१० आपणसुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या भाऊबहिणींची मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. (इब्री १३:१६) आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या ॲनाचंच उदाहरण घ्या. एका भयंकर वादळानंतर ती आणि तिचे पती एका साक्षीदार कुटुंबाला भेटायला गेले होते. त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराचं छत पडलं होतं. आणि त्यामुळे त्या घरातल्या लोकांचे सगळे कपडे खराब झाले होते. ॲना म्हणते, “आम्ही त्यांचे कपडे आणले, स्वच्छ धुतले आणि इस्त्री करून, घडी घालून त्यांना परत दिले. ही खरंतर छोटीशीच गोष्ट होती. पण यामुळे आमची त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. आणि ती आजपर्यंत टिकून आहे.” ॲना आणि तिच्या पतीचं भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळेच, ते व्यावहारिक मार्गाने त्यांना मदत करायला पुढे आले.​—१ योहा. ३:१७, १८.

११. (क) इतरांवर प्रेम असल्याचं आपण आपल्या कामांतून दाखवतो, तेव्हा त्यांना कसं वाटतं? (ख) आपण इतरांवर प्रेम असल्याचं आपल्या कामांतून दाखवतो, तेव्हा नीतिवचनं १९:१७ प्रमाणे यहोवा काय करतो?

११ आपण जेव्हा इतरांशी दयाळूपणे आणि प्रेमळपणे वागतो, तेव्हा त्यांना दिसून येतं की आपण यहोवाचं अनुकरण करायचा प्रयत्न करत आहोत. आपण त्यांच्यासाठी जे करतो, त्या गोष्टीची त्यांना किती कदर आहे, हे आपल्या कदाचित लक्षातही येणार नाही. आधी उल्लेख केलेल्या कहन नावाच्या बहिणीला ज्यांनी मदत केली होती, त्यांच्याबद्दल आठवून ती असं म्हणते, “ज्या बहिणी मला प्रचारात घेऊन जायच्या, त्यांचे मी खरंच खूप आभार मानते. त्या मला घ्यायला यायच्या, नाष्ट्यासाठी, जेवणासाठी बोलवायच्या आणि पुन्हा घरी आणून सोडायच्या. त्या माझ्यासाठी किती मेहनत घेत होत्या, ते आता मला समजतं. आणि माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच त्यांनी हे केलं.” हे खरंय की आपण ज्यांची मदत करतो, ते सगळेच आपले आभार मानणार नाहीत. पण कहनला ज्यांनी मदत केली, त्यांच्याबद्दल ती म्हणते, “त्यांनी मला जो दयाळूपणा दाखवला, त्याची परतफेड मी करावी असं मला खूप वाटतं. पण आता सध्या त्या सगळ्या कुठे राहतात, हे मला माहीत नाही. पण यहोवाला ते माहीत आहे. आणि त्याने त्यांची परतफेड करावी अशी मी त्याला प्रार्थना करते.” या बहिणीचं म्हणणं अगदी खरंय. आपण एखाद्याला छोटीशी मदत जरी केली, तरी यहोवा ती पाहतो. आपण इतरांना जी मदत करतो, तिला तो एक मौल्यवान अर्पण समजतो. आपण जणू यहोवाला उसनं दिलंय असं तो समजतो. आणि त्याची तो नक्की परतफेड करेल.​—नीतिवचनं १९:१७ वाचा.

एक व्यक्‍ती आध्यात्मिक प्रगती करते, तेव्हा ती वेगवेगळ्या मार्गांनी इतरांवर असलेलं आपलं प्रेम दाखवायचा प्रयत्न करते (परिच्छेद १२ पाहा)

१२. मंडळीतले भाऊ इतर भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे हे कसं दाखवू शकतात? (चित्रंसुद्धा पाहा)

१२ तुम्ही जर एक भाऊ असाल, तर इतरांवर तुमचं प्रेम आहे आणि त्यांना मदत करायची तुमची इच्छा आहे, हे तुम्ही कसं दाखवू शकता? जॉर्डन नावाच्या एका तरुण भावाने, तो इतर भाऊबहिणींना आणखी कशी मदत करू शकतो, याबद्दल मंडळीतल्या एका वडिलांना विचारलं. त्याने आतापर्यंत जी प्रगती केली त्याची त्या वडिलांनी खूप प्रशंसा केली. आणि तो आणखी काय-काय करू शकतो याबद्दल त्याला सल्ला दिला. जसं की, त्यांनी जॉर्डनला सांगितलं, की तो राज्य सभागृहात लवकर येऊन इतरांना भेटू शकतो, सभांमध्ये सहभाग घेऊ शकतो आणि त्याच्या प्रचाराच्या गटासोबत नियमितपणे प्रचार करू शकतो. तसंच, इतरांना व्यावहारिक मार्गाने कशी मदत करता येईल, याचाही विचार करू शकतो. जेव्हा जॉर्डनने हा सल्ला लागू केला, तेव्हा तो फक्‍त नवीन कौशल्यंच शिकला नाही, तर भाऊबहिणींवर असलेलं त्याचं प्रेमसुद्धा वाढत गेलं. जॉर्डनला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, एखादा भाऊ सहायक सेवक बनतो तेव्हा तो इतरांना मदत करायला सुरुवात करत नाही,  तर तो आधीपासून त्यांना मदत करत असतो, आणि तो ती पुढेही सुरू ठेवतो.​—१ तीम. ३:८-१०, १३.

१३. प्रेमामुळे ख्रिश्‍चन नावाच्या बांधवाला वडील म्हणून पात्र ठरायला कशी मदत झाली?

१३ कदाचित तुम्ही आधी एक सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा केली असेल. भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे तुम्ही जे काही त्यांच्यासाठी केलं, ते यहोवा विसरलेला नाही. (१ करिंथ. १५:५८) आणि तुम्ही आतापण भाऊबहिणींवर जे प्रेम करता, ते तो पाहतो. ख्रिश्‍चन नावाच्या एका भावाकडे जेव्हा वडील म्हणून सेवा करायची जबाबदारी राहिली नाही, तेव्हा तो खूप निराश झाला. पण तरी तो म्हणतो, “माझ्याकडे जबाबदाऱ्‍या असल्या काय किंवा नसल्या काय, यहोवावर असलेल्या प्रेमामुळे मी त्याची सेवा होता होईल तितकी करायचा प्रयत्न करेन.” काही काळाने त्याला पुन्हा वडील म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. तो म्हणतो, “पुन्हा ही जबाबदारी घ्यायला सुरुवातीला मी थोडा कचरत होतो. पण मी विचार केला, की जर यहोवा मला दया दाखवतोय आणि पुन्हा वडील म्हणून सेवा करायची संधी देतोय, तर मी ती सेवा का करू नये? यहोवाच्या आणि भाऊबहिणींच्या प्रेमाखातर मी पुन्हा ती सेवा करेन.”

१४. जॉर्जियामध्ये राहणाऱ्‍या एका बहिणीने जे म्हटलं त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१४ यहोवाचे सेवक आपल्या शेजाऱ्‍यांवरसुद्धा प्रेम करतात. (मत्त. २२:३७-३९) उदाहरणार्थ, जॉर्जियामध्ये राहणारी एलीना नावाची बहीण म्हणते, “सुरुवातीला मी फक्‍त यासाठीच प्रचार करायचे, कारण यहोवावर माझं प्रेम होतं. पण हे प्रेम जसजसं वाढत गेलं, तसतसं इतर लोकांवर असलेलं माझं प्रेमही वाढत गेलं. त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि कोणत्या विषयांवर बोललेलं त्यांना आवडेल, याचाही मी विचार करू लागले. अशा प्रकारे मी जितका जास्त विचार करू लागले, तितकी माझ्यात त्यांना मदत करायची इच्छा वाढत गेली.”​—रोम. १०:१३-१५.

इतरांवर प्रेम केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद

प्रेमाखातर केलेल्या मदतीमुळे एकालाच नाही तर अनेकांना फायदा होतो (परिच्छेद १५-१६ पाहा)

१५-१६. चित्रात दाखवल्याप्रमाणे, इतरांवर प्रेम केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१५ जेव्हा आपण भाऊबहिणींवर आपलं प्रेम असल्याचं दाखवतो, तेव्हा फक्‍त त्यांनाच फायदा होत नाही, तर इतरांनाही होतो. कोव्हिड-१९ महामारी सुरू झाल्यानंतर बंधू पाउलो आणि त्यांच्या पत्नीने मंडळीतल्या बऱ्‍याच वयस्कर बहिणींना मोबाईल आणि टॅब कसा वापरायचा हे शिकवलं. त्यामुळे या बहिणींना प्रचार करणं सोपं गेलं. पण त्यांच्यापैकी एका बहिणीला हे शिकून घेणं खूप कठीण जात होतं. पण शेवटी तीसुद्धा शिकली. यामुळे तिला तिच्या नातेवाइकांना स्मारकविधीचं आमंत्रण देता आलं. आणि जवळजवळ तिचे ६० नातेवाईक व्हिडिओकॉलद्वारे स्मारकविधीला हजर राहिले. बंधू पाउलो आणि त्यांच्या पत्नीने जी मेहनत घेतली होती त्यामुळे त्या बहिणीला आणि तिच्या नातेवाइकांना फायदा झाला. नंतर त्या बहिणीने त्या बांधवाला असं लिहून कळवलं, “तुम्ही आमच्यासारख्या वयस्कर लोकांना शिकवलं, त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे! यहोवाला असलेली आमची काळजी आणि तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत मी कधीच विसरणार नाही.”

१६ अशा प्रकारच्या अनुभवांमधून पाउलो यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. आपल्याकडे कितीही ज्ञान असलं किंवा कौशल्यं असली, तरी त्यापेक्षा प्रेम जास्त महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, “आधी मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करायचो. पण आज मला याची जाणीव होते, की भाऊबहीण कदाचित माझी भाषणं विसरले असतील, पण मी त्यांना जी मदत केली होती, ती आजही त्यांच्या लक्षात आहे.”

१७. आपण इतरांवर प्रेम करतो, तेव्हा आणखी कोणाला फायदा होतो?

१७ आपण जेव्हा इतरांवर आपलं प्रेम असल्याचं दाखवतो, तेव्हा आपण विचारही केला नसेल अशा प्रकारे आपल्याला फायदा होतो. न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्‍या जॉनथन नावाच्या बांधवाच्या बाबतीत हेच घडलं. त्याने पाहिलं की एक पायनियर भाऊ शनिवारी भर दुपारी रस्त्यावर प्रचार करत होता. तेव्हा या बांधवासोबत आपणही दर शनिवारी प्रचार करावा असं त्याने ठरवलं. त्या बांधवाला मदत केल्यामुळे त्याला स्वतःलासुद्धा किती फायदा होणार होता याची जॉनथनला कल्पनाही नव्हती. तो म्हणतो, “त्या वेळी मला प्रचार करणं इतकं आवडत नव्हतं. पण जेव्हा मी पाहिलं की तो पायनियर भाऊ कशा प्रकारे शिकवतो आणि प्रचारात त्याला किती चांगले परिणाम मिळतात, तेव्हा प्रचार करणं मलाही आवडू लागलं. मला एक चांगला मित्रसुद्धा मिळाला. त्याने मला आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करायला, आनंदाने प्रचार करायला आणि यहोवाच्या जवळ जायला मदत केली.”

१८. आपण काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे?

१८ आपलं यहोवावर आणि भाऊबहिणींवर असलेलं प्रेम वाढत जावं अशी यहोवाची इच्छा आहे. या लेखात शिकल्याप्रमाणे आपण बायबलचं वाचन करून, त्यावर मनन करून आणि नियमितपणे त्याला प्रार्थना करून हे प्रेम वाढवू शकतो. तसंच, भाऊबहिणींना व्यावहारिक मार्गांनी मदत करून आपण त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम वाढवू शकतो. जसजसं आपलं हे प्रेम वाढत जाईल, तसतसं आपण यहोवाच्या आणि आपल्या भाऊबहिणींच्या आणखी जवळ येऊ. आणि त्यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा कायम आनंद घेऊ!

गीत १०५ “देव प्रेम आहे”

a आपण सत्यात नवीन असलो किंवा बऱ्‍याच वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो, तरी आपण सर्वांनीच प्रगती करत राहिली पाहिजे. हे आपण कसं करू शकतो, याबद्दल या लेखात एक महत्त्वाचा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे यहोवावर आणि इतरांवर प्रेम करणं. या लेखावर मनन करत असताना हासुद्धा विचार करा, की आत्तापर्यंत तुम्ही किती प्रगती केली आहे आणि पुढेसुद्धा तुम्हाला किती प्रगती करायची गरज आहे.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.