व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २९

तुम्ही मोठ्या संकटासाठी तयार आहात का?

तुम्ही मोठ्या संकटासाठी तयार आहात का?

“तयार राहा.”​—मत्त. २४:४४.

गीत १४९ यहोवाच्या विजयाचं गीत

सारांश a

१. विपत्तीसाठी आधीच तयार असणं का गरजेचं आहे?

 आधीच तयारी केल्यामुळे जीव वाचू शकतो. उदाहरणार्थ, एखादी विपत्ती येते तेव्हा लोक जर तयार असतील, तर त्यातून त्यांची वाचण्याची शक्यता जास्त असते. तसंच त्यांना इतरांनाही मदत करता येऊ शकते. मानवांच्या भल्यासाठी काम करणारी युरोपमधली एक संघटना म्हणते: “चांगली तयारी असेल तरच आपण अशा परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.”

२. मोठ्या संकटासाठी आपण तयार का असलं पाहिजे? (मत्तय २४:४४)

आपल्याला माहीत आहे, की “मोठं संकट” अचानक सुरू होईल. (मत्त. २४:२१) विपत्ती येतात तेव्हा लोक शक्यतो बेसावध असतात. पण मोठ्या संकटाच्या बाबतीत तसं होणार नाही. कारण जवळजवळ २,००० वर्षांआधी येशूने आपल्या शिष्यांना त्याबद्दल इशारा दिला होता आणि त्या दिवसासाठी तयार राहायला सांगितलं होतं. (मत्तय २४:४४ वाचा.) आपण जर आधीच तयार राहिलो तर तो कठीण काळ पार करायला आपल्याला सोपं जाईल आणि इतरांनाही मदत करता येईल.​—लूक २१:३६.

३. मोठ्या संकटासाठी तयार राहायला धीर, करुणा आणि प्रेम या गुणांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

विचार करा, आपल्याला जर न्यायाचा संदेश घोषित करण्यासाठी सांगण्यात आलं आणि विश्‍वास न ठेवणारे लोक आपला जर विरोध करू लागले, तर अशा वेळी आपण काय करू? (प्रकटी. १६:२१) अशा वेळी यहोवा आपलं संरक्षण करेल असा विश्‍वास ठेवून धीराने  आपल्याला त्याची आज्ञा पाळावी लागेल. किंवा त्या काळात आपल्या भाऊबहिणींना त्यांच्याकडे असलेल्या काही गोष्टी किंवा सगळंच काही गमवावं लागलं तर आपण काय करू? (हब. ३:१७, १८) अशा वेळी आपल्या मनात त्यांच्याबद्दल करुणा  असेल तर आपल्याला त्यांना गरजेच्या गोष्टी पुरवता येतील. तसंच राष्ट्रांच्या समूहाने आपल्यावर हल्ला केल्यामुळे जर एकाच ठिकाणी बऱ्‍याच भाऊबहिणींसोबत आपल्याला राहावं लागलं तर काय? (यहे. ३८:१०-१२) अशा वेळी त्यांच्याबद्दल मनापासून प्रेम  आणि आपुलकी असल्यामुळे त्या कठीण काळातून पार व्हायला आपल्याला मदत होईल. हे तीन गुण मोठ्या संकटासाठी तयार राहायला आपल्याला मदत करू शकतात. तर चला आपण या तीन गुणांवर चर्चा करू या.

४. धीर, करुणा आणि प्रेम वाढवत राहण्यासाठी बायबलमध्ये आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन देण्यात आलंय?

देवाचं वचन आपल्याला धीर, करुणा आणि प्रेम हे गुण वाढवत राहायचं उत्तेजन देतं. जसं की लूक २१:१९ मध्ये म्हटलंय: “जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.” तसंच, कलस्सैकर ३:१२ मध्ये म्हटलंय: ‘करुणेचं वस्त्र घाला.’ आणि १ थेस्सलनीकाकर ४:९, १० मध्ये म्हटलंय: “देवाने स्वतः तुम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं आहे. . . . पण बांधवांनो, आम्ही तुम्हाला ते जास्तीत जास्त करण्याचं प्रोत्साहन देतो.” हा सल्ला अशा शिष्यांना देण्यात आला होता जे आधीपासूनच धीर, करुणा आणि प्रेम दाखवत होते. पण त्यांना हे गुण वाढवत राहणं गरजेचं होतं. आणि आज आपणही तेच करणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी यांतला प्रत्येक गुण कसा दाखवला याकडे आपण लक्ष देऊ या. आणि आपल्याला त्यांचं अनुकरण कसं करता येईल ते पाहू या. त्यामुळे मोठ्या संकटासाठी आपल्यालासुद्धा तयार राहता येईल.

धीर दाखवायचा निश्‍चय पक्का करा

५. परीक्षांचा सामना करत असतानाही सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे धीर दाखवला?

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना धीर दाखवायची गरज होती. (इब्री १०:३६) दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांसोबतच त्यांना इतर परीक्षांनाही तोंड द्यावं लागत होतं. यहुदी धर्मगुरू आणि रोमी अधिकारी तर त्यांचा छळ करायचेच पण त्यासोबतच त्यांना त्यांच्या कुटुंबातूनसुद्धा विरोध सहन करावा लागायचा. (मत्त. १०:२१) तसंच, मंडळीत धर्मत्यागी लोकांच्या प्रभावाचा आणि फुटी पाडणाऱ्‍या त्यांच्या शिकवणींचा त्यांना सामना करावा लागायचा. (प्रे. कार्यं २०:२९, ३०) तरीसुद्धा अशा परिस्थितीत या ख्रिश्‍चनांनी धीर दाखवला. (प्रकटी. २:३) ते हे कसं करू शकले? त्यांनी ईयोबसारख्या धीर दाखवणाऱ्‍या विश्‍वासू लोकांच्या उदाहरणावर मनन केलं. (याको. ५:१०, ११) बळ मिळावं म्हणून त्यांनी यहोवाकडे प्रार्थना केली. (प्रे. कार्यं ४:२९-३१) आणि धीर दाखवल्यामुळे यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल या गोष्टीकडेसुद्धा त्यांनी लक्ष लावलं.​—प्रे. कार्यं ५:४१.

६. छळाचा सामना करण्यासाठी मेरिटाने जे केलं त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

देवाच्या वचनात आणि आपल्या प्रकाशनांमध्ये अशा बऱ्‍याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला. आपण जर नेहमी त्यांचा अभ्यास केला तर आपल्यालाही धीर दाखवता येईल. असं केल्यामुळे अल्बेनियामध्ये राहणाऱ्‍या मेरिटा नावाच्या बहिणीलासुद्धा आपल्या घरच्यांकडून होणाऱ्‍या विरोधाचा सामना करता आला. तिच्या घरच्यांकडून तिला मारहाण होत होती. याबद्दल सांगताना ती म्हणते: “मी बायबलमध्ये ईयोबबद्दल वाचलं तेव्हा त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्याला बरंच काही सहन करावं लागलं. या सगळ्या गोष्टींमागे कोण होतं हे त्याला माहीत नसतानाही तो म्हणाला: ‘मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!’ (ईयो. २७:५) मी विचार केला, ईयोबला जे सहन करावं लागलं त्यापुढे मला जे सहन करावं लागतंय ते काहीच नाही. ईयोबला त्याच्या परीक्षांमागे कोण होतं हे माहीत नव्हतं. पण माझ्या परीक्षांमागे कोण आहे हे मला चांगलं माहीत आहे.”

७. सध्या जरी आपल्याला एखाद्या कठीण परीक्षेचा सामना करावा लागत नसला तरी आपण काय करायला शिकलं पाहिजे?

आपण आपल्या चिंतांसाठी सतत यहोवाला कळकळून प्रार्थना केली, तर आपल्याला धीर दाखवत राहायला मदत होईल. (फिलिप्पै. ४:६; १ थेस्सलनी. ५:१७) सध्या कदाचित तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देत नसाल. पण आज जेव्हा तुम्ही निराश होता, गोंधळून जाता किंवा चिंतेने भारावून जाता तेव्हाही तुम्ही यहोवाकडे मदत मागता का? जर तुम्ही आतापासूनच दररोजच्या जीवनात येणाऱ्‍या समस्यांबद्दल यहोवाकडे नियमितपणे मदत मागत राहिलात, तर पुढे येणाऱ्‍या मोठ्या संकटामध्ये यहोवाकडे मदत मागायला तुम्हाला संकोच वाटणार नाही. यामुळे तुम्हाला या गोष्टीची खातरी पटेल की तुम्हाला केव्हा आणि कशी मदत करायची हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे.​—स्तो. २७:१,.

धीर

येणाऱ्‍या प्रत्येक परीक्षेत आपण धीर दाखवतो तेव्हा पुढच्या परीक्षेतही धीर दाखवायला आपल्याला बळ मिळतं (परिच्छेद ८ पाहा)

८. आज परीक्षांचा धीराने सामना केल्यामुळे पुढेसुद्धा धीर दाखवायला मदत होईल, हे मिराच्या उदाहरणातून आपल्याला कसं दिसून येतं? (याकोब १:२-४) (चित्रसुद्धा पाहा.)

आपण जर आज येणाऱ्‍या समस्यांमध्ये धीर दाखवला तर मोठ्या संकटादरम्यान धीर दाखवायलासुद्धा आपल्याला जास्त सोपं जाईल. (रोम. ५:३) असं आपण का म्हणू शकतो? बऱ्‍याच भाऊबहिणींना असं दिसून आलंय की विश्‍वासाच्या प्रत्येक परीक्षेत धीर दाखवल्यामुळे, पुढे येणाऱ्‍या परीक्षांमध्येसुद्धा टिकून राहायला मदत होते. धीर दाखवल्यामुळे त्यांच्या विश्‍वासाची पारख झाली आहे. आणि यहोवा आपल्याला मदत करायला नेहमी तयार आहे या गोष्टीवरचा त्यांचा भरवसा आणखी वाढला आहे. आणि या विश्‍वासामुळेच, पुढे येणाऱ्‍या समस्यांना धीराने तोंड द्यायला त्यांना मदत झाली आहे. (याकोब १:२-४ वाचा.) अल्बेनियातल्या मिरा नावाच्या पायनियर बहिणीलासुद्धा, आधी दाखवलेल्या धीरामुळेच पुढे येणाऱ्‍या समस्यांमध्ये धीर दाखवायला मदत झाली. कधीकधी तिला असं वाटतं, की तिलाच सगळ्यात जास्त समस्या आहेत. पण मग ती, गेल्या २० वर्षांत यहोवाने तिला कशी मदत केली आहे ते आठवते. आणि मग ती स्वतःला म्हणते: ‘विश्‍वासू राहा. इतकी वर्षं तू यहोवाच्या मदतीने जो धीर दाखवलास, ज्या लढाया जिंकल्यास ते सगळं वाया जाऊ देऊ नकोस.’ तुम्हीसुद्धा आधी यहोवाने तुम्हाला धीर दाखवायला कशी मदत केली आहे यावर विचार करू शकता. प्रत्येक वेळी परीक्षांचा सामना करत असताना तुम्ही धीर दाखवता तेव्हा यहोवा ते पाहतो, या गोष्टीची तुम्ही खातरी बाळगू शकता. आणि यात कोणतीच शंका नाही की जेव्हा तुम्ही धीर दाखवाल, तेव्हा तो तुम्हाला नक्की प्रतिफळ देईल. (मत्त. ५:१०-१२) त्यामुळे पुढे जेव्हा मोठं संकट सुरू होईल, तेव्हा धीर कसा दाखवायचा हे तुम्हाला माहीत असेल आणि धीर दाखवायचा तुमचा निश्‍चयसुद्धा आणखी मजबूत झालेला असेल.

करुणा दाखवा

९. सीरियाच्या अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी कशा प्रकारे करुणा दाखवली?

यहूदीयातल्या ख्रिश्‍चनांना जेव्हा एका मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला, तेव्हा काय झालं याचा विचार करा. सीरियामधल्या अंत्युखियातल्या भाऊबहिणींना जेव्हा या दुष्काळाबद्दल समजलं तेव्हा त्यांना यहूदीयातल्या ख्रिश्‍चनांबद्दल नक्कीच करुणा वाटली असेल. पण त्यांना फक्‍त करुणा वाटली  नाही, तर त्यांनी ती कामातून  दाखवलीसुद्धा. त्यांनी “आपापल्या ऐपतीप्रमाणे यहूदीयातल्या बांधवांना मदत पाठवायचा निश्‍चय केला.” (प्रे. कार्यं ११:२७-३०) दुष्काळाची झळ बसलेले यहूदीयातले भाऊबहीण जरी त्यांच्यापासून दूर राहत असले, तरीही अंत्युखियातल्या भाऊबहिणींनी त्यांना मदत करायचा निश्‍चय केला होता.​—१ योहा. ३:१७, १८.

करुणा

नैसर्गिक विपत्ती येतात तेव्हा आपल्याला करुणा दाखवायची संधी मिळते (परिच्छेद १० पाहा)

१०. आपल्या भाऊबहिणींना एखाद्या विपत्तीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण कोणकोणत्या मार्गांनी त्यांना करुणा दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा)

१० आपल्या भाऊबहिणींना एखाद्या विपत्तीचा सामना करावा लागतो, तेव्हा आपणसुद्धा त्यांना करुणा दाखवू शकतो. मग आपण हे कसं करू शकतो? आपण त्यांना मदत करायला लगेच तयार राहू शकतो. विपत्ती येते त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्‍या मदतकार्यात आपणही सहभाग घेऊ शकतो का, याबद्दल आपण मंडळीतल्या वडिलांना विचारू शकतो. किंवा, आपण जगभरात केल्या जाणाऱ्‍या कामासाठी दान देऊ शकतो. तसंच, ज्या भाऊबहिणींना विपत्तीची झळ बसली आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. b (नीति. १७:१७) उदाहरणार्थ, २०२० मध्ये कोव्हिड-१९ महामारीची झळ बसलेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी, जगभरामध्ये ९५० विपत्ती मदतकार्य समित्या नेमण्यात आल्या. या समित्यांमध्ये काम करणाऱ्‍या सर्वांचे आपण खरंच किती आभारी आहोत! भाऊबहिणींबद्दल करुणा असल्यामुळेच, त्यांनी त्यांना गरजेचं सामान पुरवलं आणि यहोवाची सेवा करत राहायला मदत केली. तसंच, काही ठिकाणी तर त्यांनी त्यांची घरं आणि राज्य सभागृहं पुन्हा बांधायला किंवा दुरुस्त करायला मदत केली.​—२ करिंथकर ८:१-४ सोबत तुलना करा.

११. आपण करुणा दाखवतो तेव्हा स्वर्गातल्या आपल्या पित्याचा कसा गौरव होतो?

११ एखाद्या विपत्तीनंतर आपण भाऊबहिणींना करुणा दाखवण्यासाठी जे त्याग करतो, ते इतर लोकसुद्धा पाहतात. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये बहामा बेटांवर डोरियन चक्रीवादळ आलं होतं. तेव्हा तिथल्या राज्य सभागृहाची नासधूस झाली होती. हे राज्य सभागृह पुन्हा बांधलं जातं होतं, तेव्हा आपल्या भावांनी एका बाहेरच्या कॉन्ट्रक्टरला विचारलं, की त्यातल्या एका कामासाठी त्यांना किती खर्च येईल. तेव्हा तो म्हणाला, “या कामासाठी लागणारं साहित्य मला तुम्हाला दान द्यायला आवडेल. आणि माझी उपकरणंसुद्धा तुम्ही मोफत वापरू शकता. माझे मजूर मोफत तुमचं काम करून देतील. फक्‍त तुमच्या संघटनेसाठी मला हे करायचंय. तुमचं तुमच्या भाऊबहिणींवर किती प्रेम आहे, याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं.” जगातले बहुतेक लोक यहोवाला ओळखत नाहीत, पण इतरांना मदत करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार काय करतात, हे ते आपल्या डोळ्यांनी पाहतात.  आपण दाखवत असलेल्या करुणेमुळे “खूप दयाळू” असलेल्या आपल्या देवाबद्दल जाणून घ्यायला लोक तयार होतात. आणि ही गोष्ट आपल्यासाठी खरंच एक बहुमान आहे!​—इफिस. २:४.

१२. आतापासूनच करुणा दाखवत राहिल्यामुळे आपण मोठ्या संकटासाठी कसं तयार राहू शकतो? (प्रकटीकरण १३:१६, १७)

१२ मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला करुणा दाखवायची गरज का असेल? बायबल सांगतं, की जे आजच्या राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देत नाहीत, त्यांना आज आणि मोठ्या संकटाच्या वेळीसुद्धा समस्यांचा सामना करावा लागेल. (प्रकटीकरण १३:१६, १७ वाचा.) त्या वेळी आपल्या भाऊबहिणींना रोजच्या गरजा भागवण्यासाठीही मदतीची गरज पडेल. म्हणून आपण आतापासूनच करुणा दाखवत राहू या. म्हणजे, जेव्हा आपला राजा येशू ख्रिस्त न्यायदंड बजावण्यासाठी येईल, तेव्हा तो आपल्याला पाहील आणि “राज्याचा वारसा” घ्यायचं आमंत्रण देईल.​—मत्त. २५:३४-४०.

भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवा

१३. रोमकर १५:७ मध्ये सांगितल्याप्रमाणे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी एकमेकांवरचं प्रेम कसं वाढवलं?

१३ ‘प्रेम’ पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह होतं. पण त्यांना एकमेकांवर प्रेम करणं सोपं होतं का? रोममधल्या मंडळीतच किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते त्याचा विचार करा. त्यांच्यात असे यहुदी होते जे लहानपणापासून मोशेचं नियमशास्त्र पाळत होते. पण त्यासोबतच त्यांच्यामध्ये यहुदी धर्म स्वीकारलेले दुसरे लोकसुद्धा होते जे वेगवेगळ्या देशांतून आणि वेगवेगळ्या संस्कृतींतून आले होते. या ख्रिश्‍चनांपैकी काही जण गुलाम होते, तर काही जण स्वतंत्र होते. इतकंच नाही, तर काही जणांकडे स्वतःचे गुलामसुद्धा होते. मग इतक्या साऱ्‍या गोष्टींमध्ये फरक असतानासुद्धा ते एकमेकांवर प्रेम कसं करू शकत होते? प्रेषित पौलने त्यांना “एकमेकांचा स्वीकार करा” असा सल्ला दिला. (रोमकर १५:७ वाचा; तळटीप.) याचा काय अर्थ होतो? इथे, “स्वीकार करा” किंवा “स्वागत करा” असं जे म्हटलंय त्याचा अर्थ एखाद्याला आपुलकी दाखवणं किंवा त्याला घरी बोलवून त्याचं स्वागत करणं आणि त्याच्याशी मैत्री करून त्याच्यासोबत वेळ घालवणं असा होतो. उदाहरणार्थ, पौलने फिलेमोनला असं सांगितलं, की त्याने त्याच्या पळून गेलेल्या दासाचं म्हणजे अनेसिमचं ‘प्रेमाने स्वागत करावं.’ (फिले. १७) तसंच प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांनीही अपुल्लोचं स्वागत केलं. त्याला ख्रिस्ताबद्दल जास्त माहीत नव्हतं. पण “त्यांनी त्याला आपल्यासोबत घेतलं. त्यांनी देवाच्या मार्गाबद्दल त्याला आणखी अचूकपणे समजावून सांगितलं.” (प्रे. कार्यं १८:२६) पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी त्यांच्यातल्या विविधतेमुळे स्वतःमध्ये फुटी पडू देण्याऐवजी एकमेकांचं प्रेमाने स्वागत केलं.

प्रेम

परीक्षेत टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या भाऊबहिणींच्या प्रेमाची गरज आहे (परिच्छेद १५ पाहा)

१४. ॲना आणि तिच्या पतीने भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं?

१४ आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. असं केलं तर तेही आपल्यावर प्रेम करायला लागतील. (२ करिंथ. ६:११-१३) ॲना आणि तिच्या पतीचाच अनुभव घ्या. ते पश्‍चिम आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करायला गेल्या-गेल्या तिथे कोव्हिड-१९ महामारीची सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना आपल्या भाऊबहिणींना प्रत्यक्ष भेटताही आलं नाही. मग त्यांनी आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं कसं दाखवलं? त्यांनी व्हिडिओ कॉलवर आपल्या भाऊबहिणींची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला. आपण भेटायला किती उत्सुक आहोत, हेसुद्धा त्यांनी त्यांना सांगितलं. हे तिथल्या भाऊबहिणींना इतकं आवडलं, की तेही त्यांना सतत मेसेज आणि कॉल करू लागले. ॲना आणि तिच्या पतीने, या नवीन भाऊबहिणींना जाणून घ्यायचा प्रयत्न का केला? ॲना म्हणते, “चांगल्या-वाईट काळात भाऊबहिणींनी माझ्या कुटुंबावर जे प्रेम दाखवलं होतं, त्याची माझ्या मनावर खूप खोलवर छाप पडली होती. त्यामुळे मीही या नवीन भाऊबहिणींवर प्रेम असल्याचं दाखवू शकले.”

१५. सगळ्या भाऊबहिणींवर प्रेम करण्याच्या बाबतीत वेनेसाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? (चित्रसुद्धा पाहा.)

१५ आपल्यापैकी बरेच जण अशा मंडळ्यांमध्ये आहेत जिथे अनेक जण वेगवेगळ्या संस्कृतीतून आले आहेत. आणि त्यांचा स्वभावही वेगवेगळा आहे. पण आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देऊन, त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम वाढवू शकतो. न्यूझीलंडमध्ये सेवा करणाऱ्‍या वेनेसा नावाच्या बहिणीलासुद्धा तिच्या मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत जुळवून घेणं कठीण जात होतं. मग ज्यांचा स्वभाव तिला आवडत नव्हता, त्यांच्यापासून लांब राहण्याऐवजी तिने त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायचं ठरवलं. असं केल्यामुळे यहोवा त्यांच्यावर का प्रेम करतो, ते समजून घ्यायला तिला मदत झाली. ती म्हणते: “माझे पती विभागीय पर्यवेक्षक झाल्यापासून आमची सतत वेगवेगळ्या स्वभावाच्या भाऊबहिणींसोबत भेट होत राहते. आता मला त्यांच्याशी जुळवून घ्यायला सोपं जातं. इतकंच काय तर त्यांचा वेगवेगळा स्वभावसुद्धा मला आवडू लागला आहे.” यहोवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. त्यामुळे तो अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना, त्याची उपासना करण्यासाठी एकत्र करतो. जेव्हा आपण इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलंही त्यांच्यावर प्रेम असल्याचं आपण दाखवत असतो.​—२ करिंथ. ८:२४.

मोठ्या संकटादरम्यान आपण आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून राहिलो, तरच यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपलं संरक्षण करेल (परिच्छेद १६ पाहा)

१६. मोठ्या संकटादरम्यान भाऊबहिणींवर प्रेम असणं महत्त्वाचं का आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ मोठ्या संकटाच्या काळात आपल्याला भाऊबहिणींवर प्रेम करत राहणं खूप महत्त्वाचं असेल. मोठं संकट सुरू झाल्यानंतर यहोवा आपलं संरक्षण कसं करेल? प्राचीन बाबेलवर हल्ला झाला तेव्हा यहोवाने त्याच्या लोकांना कोणती सूचना दिली होती त्याचा विचार करा. त्याने म्हटलं: “जा माझ्या लोकांनो, आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा, दारं लावून घ्या. देवाचा क्रोध शांत होईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) असं दिसतं, की मोठ्या संकटाचा सामना करत असताना आपल्यालाही या सूचनांचं पालन करावं लागेल. इथे ज्या ‘आतल्या खोल्यांबद्दल’ सांगण्यात आलंय, त्या कदाचित आपल्या मंडळ्या असतील. मोठ्या संकटादरम्यान आपण जर आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून राहिलो, तरच यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपलं संरक्षण करेल. म्हणूनच आपण आपल्या भाऊबहिणींना फक्‍त सहनच केलं नाही पाहिजे, तर त्यांच्यावर प्रेम करत राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आपलं मोठ्या संकटातून वाचणं कदाचित यावरच अवलंबून असेल!

आत्ताच तयारी करा

१७. आपण आत्तापासूनच तयार राहिलो तर मोठ्या संकटादरम्यान आपल्याला काय करता येईल?

१७ “यहोवाचा मोठा दिवस” सगळ्या मानवजातीसाठी अतिशय कठीण काळ असेल. (सफ. १:१४, १५) यहोवाच्या लोकांनासुद्धा त्या वेळी खूप कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. पण जर आपण आत्तापासूनच तयारी केली तर आपलं मन शांत ठेवायला आणि इतरांना मदत करायला आपल्याला सोपं जाईल. जेव्हा आपल्यावर समस्या येतील तेव्हा आपल्याला धीर  दाखवता येईल. आपल्या भाऊबहिणींवर परीक्षा येतील तेव्हा आपण करुणा  दाखवून त्यांना होताहोईल तितकी मदत करू आणि त्यांना गरजेच्या वस्तू पुरवू. आपण जर आत्तापासूनच आपल्या भाऊबहिणींवर प्रेम  करायला शिकलो, तर तेव्हाही आपल्याला त्यांच्यावर प्रेम करणं सोपं जाईल. मग यहोवा आपल्याला नवीन जगात सर्वकाळाचं जीवन देईल. तिथे कोणत्याही प्रकारच्या संकटाची आणि समस्येची आपल्याला आठवण राहणार नाही.​—यश. ६५:१७.

गीत १४४ नवे जग डोळ्यांपुढे ठेवा!

a मोठं संकट लवकरच सुरू होईल. आणि भविष्यात येणाऱ्‍या त्या अतिशय कठीण काळासाठी तयार राहायला धीर, करुणा आणि प्रेम हे गुण आपल्याला मदत करतील. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांनी स्वतःमध्ये हे गुण कसे वाढवले? आज आपणही ते कसे वाढवू शकतो? आणि हे गुण आपल्याला मोठ्या संकटासाठी तयार राहायला कशी मदत करू शकतात? या प्रश्‍नांवर या लेखात चर्चा केली जाईल.

b ज्यांना विपत्ती मदतकार्यात सहभाग घ्यायचा असेल, त्यांनी आधी लोकल डिझाईन/कंस्ट्रक्शन वॉलंटियर ॲप्लिकेशन (DC-50) किंवा ॲप्लिकेशन फॉर वॉलंटियर प्रोग्राम (A-19) फॉर्म भरावा. मग गरज पडेल तेव्हा तुम्हाला मदतकार्यात हातभार लावण्यासाठी बोलावलं जाईल.