तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या लाखो विटांवरून आणि या विटा बनवण्याच्या पद्धतीवरून, बायबलमधली माहिती खरी असल्याचं कसं कळतं?
प्राचीन गोष्टींचं संशोधन करणाऱ्यांना बॅबिलोनच्या अवशेषांमध्ये भाजलेल्या लाखो विटा सापडल्या. या विटांचा वापर हे शहर बांधण्यासाठी करण्यात आला होता. रॉबर्ट कोल्डवे नावाच्या एका संशोधकाच्या म्हणण्यानुसार त्या काळी अशा प्रकारच्या विटा भट्ट्यांमध्ये बनवल्या जायच्या. आणि “या भट्ट्या गावाच्या बाहेर असायच्या. कारण तिथे चांगल्या प्रतीची माती आणि विटा भाजण्यासाठी मुबलक प्रमाणात वाळलेली झुडपं असायची.”
प्राचीन अहवालांमधून असं दिसून येतं, की बॅबिलोनचे अधिकारी या भट्ट्यांचा वापर अतिशय क्रूर गोष्टींसाठीसुद्धा करायचे. टोरोंटो विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणारे पॉल-ॲलन ब्युली हे अश्शूरी लोकांच्या इतिहासाचे जाणकार आहेत. ते म्हणतात: “बॅबिलोनच्या बऱ्याच लिखाणांमध्ये अशी नोंद करण्यात आली आहे, की जे लोक राजाच्या आज्ञेच्या विरोधात जायचे आणि पवित्र गोष्टींचा अनादर करायचे त्यांना राजाच्या आदेशावरून या भट्ट्यांमध्ये टाकलं जायचं.” नबुखद्नेस्सर राजाच्या काळातल्या एका लिखाणात असं म्हटलं आहे: “त्यांना संपवून टाका. त्यांना भाजून, जाळून, मारून टाका. . . . त्यांना भट्टीत टाकून द्या. . . . त्यांना धगधगत्या आगीत भस्म करून टाका आणि त्यांचा धूर हवेत उठू द्या.”
या शब्दांवरून आपल्याला बायबलमधल्या दानीएल पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात लिहिलेल्या घटनांची आठवण होते. त्यात सांगितल्याप्रमाणे नबुखद्नेस्सर राजा एक सोन्याची भलीमोठी मूर्ती बॅबिलोन शहराच्या बाहेर असलेल्या दूरा नावाच्या मैदानात उभी करतो. जेव्हा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो त्या मूर्तीला दंडवत घालायला नकार देतात, तेव्हा नबुखद्नेस्सरला राग येतो. आणि तो “भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवण्याचा” हुकूम देतो. आणि त्या तिघांना “धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्याचा” आदेश देतो. पण एक शक्तिशाली स्वर्गदूत त्या तिघांना वाचवतो.—दानी. ३:१-६, १९-२८.
बायबलचा अहवाल खरा असल्याचं बॅबिलोनमध्ये सापडलेल्या विटांवरूनसुद्धा दिसून येतं. या विटांमध्ये अशा बऱ्याच विटा सापडल्या ज्यांवर राजाच्या स्तुतीसाठी काही शब्द कोरले होते. त्यांपैकी काही शब्द असे होते: “बॅबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर, . . . माझ्या ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून मी, महान राजा नबुखद्नेस्सर याने बांधलेला हा भव्य महाल. . . . माझा वंश या शहरावर कायम राज्य करत राहो.” हे शब्द दानीएल ४:३० मध्ये जे म्हटलंय त्याच्याशी अगदी जुळणारे आहेत. तिथे नबुखद्नेस्सर राजा स्वतःबद्दल अशी बढाई मारतो: “पाहा, हे महान बाबेल शहर! मी ते माझ्या शाही निवासासाठी आणि माझ्या ऐश्वर्याच्या गौरवासाठी स्वतःच्या शक्तीने आणि सामर्थ्याने बांधलंय!”