अभ्यास लेख ३२
यहोवाचं अनुकरण करा—समजूतदार असा
“तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या.”—फिलिप्पै. ४:५.
गीत ८९ ऐका पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
सारांश a
१. ख्रिश्चनांनी कोणत्या बाबतीत नारळाच्या झाडासारखं असलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा)
वादळात झुलणारं एखादं नारळाचं झाड तुम्ही पाहिलंय का? ते वाकतं पण मोडत नाही. यातून आपल्याला एक महत्त्वाचा गुण शिकायला मिळतो. तो म्हणजे, लवचीकता. ख्रिश्चनांमध्येसुद्धा लवचीकता हा गुण असला पाहिजे, म्हणजे त्यांनी नेहमी बदल करायला तयार असलं पाहिजे. ते कसं? जेव्हा आपली परिस्थिती बदलते तेव्हा तिच्याशी जुळवून घेण्यासाठी आपण समजूतदार असलं पाहिजे. तसंच दुसऱ्यांच्या मतांचा आणि निर्णयांचा आदर करूनसुद्धा आपण समजूतदारपणा दाखवू शकतो.
२. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला कोणत्या गुणांमुळे आपल्याला मदत होईल आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ आपण यहोवाचे सेवक असल्यामुळे आपण समजूतदार असलं पाहिजे. त्यासोबतच आपल्यात नम्रता असली पाहिजे आणि इतरांबद्दल आपल्या मनात सहानुभूती असली पाहिजे. बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे काही ख्रिश्चनांना कशी मदत झाली आणि हे गुण आपल्याला कशी मदत करू शकतात, हे आपण या लेखात पाहणार आहोत. पण त्याआधी यहोवा आणि येशू यांनी समजूतदारपणा दाखवण्यात सगळ्यात चांगलं उदाहरण कसं मांडलं ते पाहू या.
यहोवा आणि येशू समजूतदार आहेत
३. यहोवा समजूतदार आहे हे आपल्याला कसं कळतं?
३ यहोवा आपला “खडक” आहे, कारण तो खंबीर आणि स्थिर आहे. (अनु. ३२:४) पण त्यासोबतच तो समजूतदारसुद्धा आहे. काळाच्या ओघात जशा घटना घडत गेल्या, तसे यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी परिस्थितीप्रमाणे बदलसुद्धा केले. यहोवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलंय त्यामुळे त्यांच्यातसुद्धा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. बायबलमध्ये यहोवा देवाने आपल्याला स्पष्ट तत्त्वं दिली आहेत. त्यामुळे जेव्हा जीवनात काही समस्या येतात किंवा कठीण परीक्षा येतात तेव्हा चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत होते. यहोवाच्या स्वतःच्या उदाहरणावरून आणि त्याने दिलेल्या तत्त्वांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतं, की तो ‘खडकासारखा’ खंबीर जरी असला तरी तो समजूतदारसुद्धा आहे.
४. यहोवा समजूतदारपणे कसा वागतो याचं एक उदाहरण द्या. (लेवीय ५:७, ११)
४ यहोवाचे मार्ग परिपूर्ण आहेत. आणि त्यातून तो समजूतदार असल्याचंसुद्धा दिसून येतं. माणसांशी तो कठोरपणे वागत नाही तर त्यांना समजून घेतो. उदाहरणार्थ, त्याने इस्राएली लोकांशी वागताना समजूतदारपणा कसा दाखवला याचा विचार करा. श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाने एकाच प्रकारचं बलिदान आणलं पाहिजे अशी त्याने आज्ञा दिली नाही. काही वेळा त्याने प्रत्येक व्यक्तीला तिच्या परिस्थितीप्रमाणे बलिदानं अर्पण करू दिली.—लेवीय ५:७, ११ वाचा.
५. यहोवाने नम्रता आणि करुणा कशी दाखवली याचं एक उदाहरण द्या.
५ यहोवामध्ये नम्रता आणि करुणा हे गुण असल्यामुळे तो समजूतदारपणा दाखवतो. उदाहरणार्थ, जेव्हा यहोवाने सदोमच्या दुष्ट लोकांचा नाश करायचं ठरवलं तेव्हा त्याची नम्रता दिसून आली. यहोवाने स्वर्गदूताद्वारे लोटला डोंगराळ प्रदेशाकडे पळून जायला सांगितलं होतं. पण लोटला तिथे जायची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने यहोवाला विनंती केली, की त्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सोअर शहरात जाऊ द्यावं. यहोवा देवाने सोअर शहराचासुद्धा नाश करायचं ठरवलं होतं. तो लोटला म्हणू शकला असता की त्याने त्याची आज्ञा जशीच्या तशी पाळावी. पण त्याने तसं केलं नाही. उलट त्याने लोटची विनंती मान्य केली आणि त्यामुळे त्याने सोअरचा नाश केला नाही. (उत्प. १९:१८-२२) याच्या काही शतकांनंतर यहोवाने निनवेच्या लोकांनासुद्धा करुणा दाखवली. त्याने योना संदेष्ट्याला तिथल्या लोकांचा आणि शहराचा नाश करण्याबद्दलची घोषणा करायला पाठवलं होतं. पण जेव्हा निनवेच्या लोकांनी पश्चात्ताप केला, तेव्हा यहोवाला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं आणि त्याने त्या शहराचा नाश केला नाही.—योना ३:१, १०; ४:१०, ११.
६. येशूनेसुद्धा यहोवासारखा समजूतदारपणा कसा दाखवला ते स्पष्ट करा.
६ येशूनेसुद्धा दाखवलं की तो यहोवाप्रमाणेच समजूतदार आहे. त्याला पृथ्वीवर फक्त ‘इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांना’ प्रचार करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. पण या कामातसुद्धा त्याने समजूतदारपणा दाखवला. एकदा एक इस्राएली नसलेली स्त्री त्याच्याकडे येऊन आपल्या मुलीला बरं करण्याची विनंती करू लागली. तिच्या मुलीला एका ‘दुष्ट स्वर्गदूताने पछाडलं’ होतं. येशूने तिची विनंती मान्य केली. आणि तिच्या मुलीबद्दल करुणा असल्यामुळे त्याने तिला बरं केलं. (मत्त. १५:२१-२८) आपण आणखी एक उदाहरण पाहू या. आपलं सेवाकार्य सुरू केल्याच्या काही काळानंतर, येशूने असं म्हटलं: “जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा . . . नाकारीन.” (मत्त. १०:३३) पण पेत्रने जेव्हा त्याला तीन वेळा नाकारलं तेव्हा येशूने त्याला नाकारलं का? नाही. पेत्रने जो विश्वास दाखवला आणि जो पश्चात्ताप केला तो येशूने लक्षात ठेवला. पुनरुत्थान झाल्यावर येशू जेव्हा पेत्रसमोर प्रकट झाला, तेव्हा त्याने त्याला नक्कीच माफ केल्याचं आणि त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं असेल.—लूक २४:३३, ३४.
७. फिलिप्पैकर ४:५ प्रमाणे आपण कशा प्रकारचं नाव कमवलं पाहिजे?
७ आपण हे पाहिलं की यहोवा देव आणि येशू समजूतदार आहेत. मग आपल्याबद्दल काय? यहोवाची अशी अपेक्षा आहे की आपणसुद्धा समजूतदार असलं पाहिजे. (फिलिप्पैकर ४:५ वाचा.) एका भाषांतरात फिलिप्पैकर ४:५ या वचनाचं असं भाषांतर करण्यात आलंय: “समजूतदार असण्याच्या बाबतीत चांगलं नाव कमवा.” म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘मी समजूतदार, बदलायला तयार असलेला, जुळवून घेणारा आहे असं लोक माझ्याबद्दल विचार करतात, की मी कठोर, हेकेखोर आणि कधीही न बदलणारा आहे असा विचार करतात? मी नेहमी स्वतःच्याच मतांवर अडून राहतो का? की मी दुसऱ्यांचं ऐकून घेतो आणि जेव्हा योग्य असतं तेव्हा नमतं घ्यायला तयार असतो?’ आपण जितका जास्त समजूतदारपणा दाखवू, तितकंच आपण यहोवाचं आणि येशूचं अनुकरण करतोय हे दिसून येईल. आता आपण अशा दोन परिस्थितींचा विचार करू या ज्यांमध्ये आपण समजूतदारपणा दाखवू शकतो. पहिली, जेव्हा आपली परिस्थिती बदलते. आणि दुसरी, जेव्हा इतरांची मतं आणि निर्णय आपल्या विचारांपेक्षा वेगळे असतात.
परिस्थिती बदलते तेव्हा समजूतदारपणा दाखवा
८. बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला समजूतदारपणा दाखवायला कशामुळे मदत होईल? (तळटीपसुद्धा पाहा.)
८ समजूतदार असण्यात परिस्थितीप्रमाणे बदल करणंसुद्धा सामील आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे आपल्याला कदाचित अशा समस्यांचा सामना करावा लागेल, ज्यांची आपण अपेक्षासुद्धा केली नव्हती. कदाचित अचानक आपल्याला एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागेल. आपण राहतो त्या ठिकाणाची आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे कदाचित आपलं पूर्ण जीवन विस्कळीत होऊन जाईल. (उप. ९:११; १ करिंथ. ७:३१) त्याचप्रमाणे यहोवाच्या सेवेत आपली नेमणूक बदलल्यामुळेसुद्धा आपल्या जीवनात एक मोठा बदल होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची समस्या आली तरी आपण जर पुढे दिलेल्या चार गोष्टी केल्या, तर बदललेल्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता येईल. त्या चार गोष्टी म्हणजे: (१) नवीन परिस्थिती स्वीकारा, (२) पुढचा विचार करा, (३) तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष लावा, (४) दुसऱ्यांची मदत करायचा प्रयत्न करा. b या चार गोष्टी केल्यामुळे काही भाऊबहिणींना कशी मदत झाली याची आपण आता उदाहरणं पाहू या.
९. एका मिशनरी जोडप्याने अचानक आलेल्या परीक्षांचा सामना कसा केला?
९ नवीन परिस्थिती स्वीकारा. इमॅन्युएल आणि फ्रांचेस्का या जोडप्याला एका दुसऱ्या देशात सेवा करायची नेमणूक मिळाली. त्यांनी तिथली भाषा शिकायला आणि भाऊबहिणींशी ओळख वाढवायला सुरुवात केली. पण त्यानंतर लगेच कोव्हिड-१९ महामारी सुरू झाली आणि त्यामुळे त्यांना भाऊबहिणींना भेटणं शक्य नव्हतं. यानंतर लगेच फ्रांचेस्काच्या आईचा मृत्यू झाला. बहीण फ्रांचेस्काला खूप वाटत होतं की आपल्या कुटुंबाला जाऊन भेटावं. पण महामारी सुरू असल्यामुळे तिला तिथे जाता आलं नाही. या इतक्या कठीण परिस्थितीचा सामना तिला कसा करता आला? पहिली गोष्ट म्हणजे, इमॅन्युएल आणि फ्रांचेस्काने यहोवाकडे प्रार्थना केली. चिंतेने भारावून न जाता, येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा सामना करायचं बळ मिळावं म्हणून त्यांनी यहोवाकडे मदत मागितली. यहोवाने आपल्या संघटनेद्वारे मदत पुरवून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. उदाहरणार्थ, त्यांना एका भावाची मुलाखत पाहून प्रोत्साहन मिळालं. त्यात त्या भावाने म्हटलं होतं: “जितक्या लवकर आपण आपली नवीन परिस्थिती स्वीकारू तितक्या लवकर आपला आनंद आपल्याला परत मिळेल. आणि आपल्याला नवीन परिस्थितीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे यहोवाची सेवा करता येईल.” c दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांनी टेलिफोनद्वारे साक्षकार्य करण्यामध्ये आपलं कौशल्य वाढवलं. आणि त्यामुळे त्यांना एक बायबल अभ्याससुद्धा सुरू करता आला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तिथल्या भाऊबहिणींनी त्यांना जी मदत आणि जे प्रोत्साहन दिलं ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं. एक बहीण त्यांना संपूर्ण वर्षभर रोज एक वचन आणि त्यासोबत एक छोटासा मेसेज पाठवायची. आपणसुद्धा या जोडप्यासारखं नवीन परिस्थिती स्वीकारतो तेव्हा आपण जितकं करू शकतो त्यात आपल्याला समाधानी राहता येईल.
१०. एका बहिणीने जीवनात आलेल्या एका मोठ्या अनपेक्षित बदलाशी कसं जुळवून घेतलं?
१० पुढचा विचार करा आणि तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष लावा. रोमेनियाच्या क्रिस्टीना नावाच्या बहिणीचा विचार करा. ती सध्या जपानमध्ये राहते. ती इंग्रजी भाषेच्या ज्या मंडळीत सेवा करत होती, त्या मंडळीतल्या प्रचारकांना दुसऱ्या मंडळीत पाठवण्यात आलं. कारण ती मंडळी आता राहणार नव्हती. पण क्रिस्टीना या गोष्टीवर विचार करत बसली नाही. उलट तिने जपानी भाषा बोलणाऱ्या मंडळीत जायला सुरुवात केली. आणि जपानी भाषेत प्रचार करू लागली. ती आधी जिथे काम करायची तिथल्या एका मैत्रिणीला तिने जपानी भाषा शिकवण्याची विनंती केली. तिने तिला विचारलं, की ‘तू बायबल आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकाचा वापर करून मला आणखी चांगल्या प्रकारे जपानी बोलायला शिकवशील का?’ तिची मैत्रीणसुद्धा तिला शिकवायला तयार झाली. क्रिस्टीना तर चांगल्या प्रकारे जपानी भाषा बोलायला शिकली, पण तिच्या मैत्रिणीचीसुद्धा बायबलबद्दल जाणून घ्यायची इच्छा वाढली. आपण जेव्हा पुढचा विचार करतो आणि आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष देतो, तेव्हा अनपेक्षित बदलांमुळे आपल्याला अनपेक्षित आशीर्वादसुद्धा मिळू शकतात.
११. जेव्हा एका जोडप्यापुढे पैशाची समस्या निर्माण झाली, तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली?
११ दुसऱ्यांची मदत करायचा प्रयत्न करा. आपल्या कामावर बंदी असलेल्या एका देशात राहणाऱ्या जोडप्याबद्दल विचार करा. जेव्हा त्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली, तेव्हा आपल्या या भाऊबहिणीला पैशाची अडचण निर्माण झाली. त्यांनी या गोष्टीशी कसं जुळवून घेतलं? पहिली गोष्ट म्हणजे, त्यांनी आपलं जीवन साधं करण्यासाठी पावलं उचलली. त्यानंतर, स्वतःच्या समस्यांबद्दलच विचार करत राहण्याऐवजी त्यांनी इतरांना मदत करण्याकडे लक्ष दिलं. त्यासाठी ते प्रचारकार्यात व्यस्त राहू लागले. (प्रे. कार्यं २०:३५) भाऊ म्हणतो, “प्रचारात व्यस्त राहिल्यामुळे नको त्या विचारांवर लक्ष देण्याऐवजी आम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष देऊ शकलो.” यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे परिस्थिती बदलते तेव्हा इतरांना मदत करणं खूप महत्त्वाचं आहे; खासकरून आपल्या सेवाकार्याद्वारे.
१२. प्रचारकार्यात बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रेषित पौलचं उदाहरण आपल्याला कसं मदत करू शकतं?
१२ प्रचार करतानासुद्धा आपण बदल करायला तयार असलं पाहिजे. आपल्याला प्रचारात वेगवेगळ्या स्वभावांचे आणि वेगवेगळा विश्वास असलेले लोक भेटतात. तसंच त्यांची पार्श्वभूमीसुद्धा वेगळी असते. याबाबतीत आपण प्रेषित पौलचं अनुकरण करू शकतो. कारण तोसुद्धा बदल करायला तयार होता. येशूने त्याला ‘विदेश्यांसाठी प्रेषित म्हणून’ नेमलं होतं. (रोम. ११:१३) आपली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पौलने यहुद्यांना, ग्रीक लोकांना, शिकलेल्या लोकांना, गावातल्या लोकांना, शासकीय अधिकाऱ्यांना आणि राजांनासुद्धा प्रचार केला. इतक्या वेगवेगळ्या लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यासाठी पौल “सर्व लोकांसाठी सर्वकाही” झाला. (१ करिंथ. ९:१९-२३) लोक कोणत्या संस्कृतीचे आहेत, कोणत्या पार्श्वभूमीचे आहेत, त्यांचे विश्वास काय आहेत या गोष्टींकडे त्याने लक्ष दिलं. आणि त्या आधारावर त्याने आपल्या प्रचाराच्या पद्धतीत बदल केला. आपणसुद्धा आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल विचार केला पाहिजे. तसंच, संदेश सांगण्याच्या आपल्या पद्धतीत बदल केला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपलं प्रचारकार्य आणखी चांगल्या प्रकारे करता येईल.
इतरांच्या मतांचा आदर करा
१३. आपण जर इतरांच्या मतांचा आदर केला तर १ करिंथकर ८:९ इथे सांगितलेला कोणता धोका आपल्याला टाळता येईल?
१३ समजूतदार राहिल्यामुळे आपल्याला इतरांच्या मतांचाही आदर करता येईल. उदाहरणार्थ, आपल्या काही बहिणींना मेकअप करायला आवडतं, तर काहींना आवडत नाही. काही ख्रिश्चनांना योग्य प्रमाणात दारू प्यायला आवडतं, तर काही पूर्णपणे दारूपासून दूर राहतात. सगळ्याच ख्रिश्चनांना चांगलं आरोग्य हवं असतं. आणि गरज असते तेव्हा ते उपचारासाठी वेगवेगळ्या पद्धती निवडतात. पण आपल्याला जर आपलीच मतं योग्य वाटत असतील आणि ती जर आपण मंडळीवर लादायचा प्रयत्न करत असू, तर त्यामुळे इतरांना अडखळण होईल आणि मंडळीत फुटी निर्माण होतील. आणि असं व्हावं अशी आपली मुळीच इच्छा नाही. (१ करिंथकर ८:९ वाचा; १०:२३, २४) तर चला, बायबलची तत्त्वं आपण कशी लागू करू शकतो याची दोन उदाहरणं आपण पाहू या. त्यांमुळे आपल्याला समतोल राखता येईल आणि मंडळीतली शांती टिकवून ठेवता येईल.
१४. कपड्यांच्या आणि हेअरस्टाईलच्या बाबतीत निर्णय घेताना बायबलची कोणती तत्त्वं आपण लक्षात ठेवू शकतो?
१४ कपडे आणि हेअरस्टाईल (केशभूषा). आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत याबद्दल कडक नियम बनवण्याऐवजी यहोवाने आपल्याला काही तत्त्वं दिली आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकांना शोभतील असे कपडे आपण घातले पाहिजेत. आणि त्यातून आपला समजूतदारपणा आणि ‘विचारशीलपणा’, तसंच आपली सभ्यता दिसून आली पाहिजे. (१ तीम. २:९, १०; १ पेत्र ३:३) त्यामुळे लोकांचं लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित होईल असे कपडे आपण घालणार नाही. बायबलची तत्त्वं समजून घेतल्यामुळे मंडळीतले वडीलसुद्धा कपडे आणि हेअरस्टाईलबद्दल स्वतःचे नियम बनवत नाहीत. जसं की, एका मंडळीतल्या काही तरुण भावांनी खूप प्रसिद्ध असलेली एक हेअरस्टाईल केली होती. त्यांचे केस छोटे होते, पण ते अस्ताव्यस्त आणि गबाळे दिसायचे. मग नियम बनवण्याऐवजी वडिलांनी त्या तरुण भावांना कशी मदत केली? याबाबतीत एका विभागीय पर्यवेक्षकांनी वडिलांना एक चांगला सल्ला दिला. त्यांनी या वडिलांना त्या तरुण भावांना असं सांगायला सांगितलं: “तुम्ही जर स्टेजवरून एखादा भाग सादर करत आहात आणि भाऊबहिणींचं लक्ष तुम्ही काय बोलत आहात, त्याऐवजी तुमच्या कपड्यांकडे किंवा हेअरस्टाईलकडे जात असेल, तर मग नक्कीच काहीतरी गडबड आहे.” अशा प्रकारे साध्या-सोप्या शब्दांत समजवल्यामुळे वडिलांना नियम बनवायची गरज पडली नाही. आणि त्या तरुण भावांना आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे, हेसुद्धा सहजपणे कळलं. d
१५. उपचारांबद्दल निर्णय घेताना बायबलमधल्या कोणत्या नियमांमुळे आणि तत्त्वांमुळे आपल्याला मदत होऊ शकते? (रोमकर १४:५)
१५ उपचार पद्धती. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे स्वतः ठरवलं पाहिजे. (गलती. ६:५) उपचार पद्धती निवडण्याच्या बाबतीत बायबलमध्ये काही मोजकेच नियम दिले आहेत. जसं की, रक्त आणि भूतविद्येपासून दूर राहणं. (प्रे. कार्यं १५:२०; गलती. ५:१९, २०) पण इतर उपचार पद्धतींच्या बाबतीत मात्र ख्रिस्ती स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. काही जण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यायचं निवडतात. पण इतर जण कदाचित दुसरी एखादी पद्धत निवडतील. आपल्याला कदाचित एखादी विशिष्ट उपचार पद्धतच चांगली आहे असं वाटेल. पण भाऊबहीण उपचाराच्या बाबतीत जे काही निर्णय घेतात, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. याबाबतीत आपण चार गोष्टी लक्षात ठेवू शकतो. (१) फक्त देवाचं राज्यच आरोग्याच्या समस्या पूर्णपणे आणि कायमच्या काढून टाकू शकतं. (यश. ३३:२४) (२) स्वतःसाठी कोणती उपचार पद्धत सगळ्यात चांगली आहे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या मनाला ‘पटलेलं’ असलं पाहिजे. (रोमकर १४:५ वाचा.) (३) इतरांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत किंवा चुकीचे आहेत हे आपण ठरवत नाही आणि त्यांच्यासाठी अडखळण बनत नाही. (रोम. १४:१३) (४) आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की आपल्याला स्वतःचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य जरी असलं, तरी त्यापेक्षा मंडळीची एकता जास्त महत्त्वाची आहे. (रोम. १४:१५, १९, २०) आपण जर या गोष्टी लक्षात ठेवल्या तर भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं मजबूत राहील आणि मंडळीतली शांतीसुद्धा टिकून राहील.
१६. इतर वडिलांसोबत काम करताना एक वडील समजूतदारपणा कसा दाखवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)
१६ मंडळीतल्या वडिलांनी समजूतदारपणा दाखवण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. (१ तीम. ३:२, ३) उदाहरणार्थ, एखाद्या वडिलांनी ते वयाने मोठे असल्यामुळे फक्त त्यांचंच म्हणणं नेहमी मान्य केलं जाईल असा विचार करू नये. उलट त्यांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, की यहोवाची पवित्र शक्ती वडीलवर्गातल्या प्रत्येक व्यक्तीवर काम करते. त्यामुळे यहोवा आपल्या पवित्र शक्तीद्वारे वडीलवर्गातल्या कोणत्याही व्यक्तीला अशी गोष्ट बोलायला प्रेरित करू शकतो, ज्यामुळे चांगला निर्णय घेता येईल. एखादी गोष्ट जर बायबल तत्त्वांच्या विरोधात नसेल, तर समजूतदार वडिलांनी जास्तीत जास्त वडिलांचं जे मत आहे, त्याला साथ दिली पाहिजे. मग काही वडिलांचं मत जरी वेगळं असलं तरीसुद्धा.
समजूतदार असण्याचे फायदे
१७. समजूतदारपणा दाखवल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?
१७ आपण जेव्हा समजूतदारपणा दाखवतो तेव्हा आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात. भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं चांगलं राहतं आणि मंडळीतली शांतीसुद्धा टिकून राहते. यहोवाच्या संघटनेत वेगवेगळ्या स्वभावाचे आणि संस्कृतीचे लोक आहेत. इतकी विविधता असूनसुद्धा आपण एकतेने मिळून यहोवाची उपासना करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला समजूतदार देव यहोवा याचं अनुकरण करत असल्याचं समाधान आपल्याला मिळतं.
गीत ८५ एकमेकांचा स्वीकार करा
a यहोवा आणि येशू समजूतदार आहेत. आणि आपणही तोच गुण वाढवावा असं त्यांना वाटतं. जर आपण समजूतदार असलो तर आपल्याला जीवनात येणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं सोपं जातं. जसं की, एखादी आरोग्याची किंवा आर्थिक समस्या येते तेव्हा. समजूतदार असल्यामुळे आपण मंडळीच्या शांतीला आणि एकतेलासुद्धा हातभार लावू शकतो.
b सावध राहा! २०१६ क्र. ४ यातला “जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?” हा लेख पाहा.
c ही मुलाखत पाहण्यासाठी www.pr418.com/mr या वेबसाईटवर ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत हा व्हिडिओ शोधा.
d कपडे आणि हेअरस्टाईलच्या बाबतीत आणखी माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला धडा ५२ पाहा.