व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांच्या चुकांमुळे यहोवावर नाराज होऊ नका

इतरांच्या चुकांमुळे यहोवावर नाराज होऊ नका

“आपसात क्षमा करा.”—कलस्सै. ३:१३.

गीत क्रमांक: ५३, २८

१, २. यहोवाच्या लोकांच्या वाढीबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आलं होतं?

यहोवावर प्रेम करणाऱ्या आणि त्याची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांची जागतिक पातळीवर एक संघटना आहे. हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून यहोवाचे साक्षीदार आहेत. त्यांच्यात जरी काही उणीवा असल्या आणि ते चुकत असले, तरी यहोवा त्यांना आपल्या पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन देतो. यहोवाने त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित केलं आहे त्याबद्दल आता आपण पाहू.

सन १९१४ मध्ये यहोवाच्या उपासकांची संख्या फार कमी होती. पण यहोवाने आपल्या प्रचारकार्यावर भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे आज लाखो लोक बायबलमधील सत्य शिकून यहोवाचे साक्षीदार बनले आहेत. यहोवाने या विलक्षण वाढीबद्दल आधीच भाकीत केलं होतं: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यश. ६०:२२) ही भविष्यवाणी आपल्या काळातच पूर्ण होत आहे यात काहीच शंका नाही. यहोवाचे लोक आज एका मोठ्या राष्ट्राप्रमाणे आहेत. खरं पाहिलं तर जगभरात असे अनेक राषट्रे आहेत ज्यांची लोकसंख्या यहोवाच्या साक्षीदारांपेक्षा कमी आहे.

३. यहोवाच्या सेवकांनी प्रेम कसं प्रदर्शित केलं आहे?

शेवटल्या काळात यहोवाने आपल्याला एकमेकांमधील प्रेम आणखी वाढवण्यास मदत केली आहे. “देव प्रीती आहे” आणि आपण त्याचं अनुकरण करतो. (१ योहा. ४:८) येशूने आपल्या शिष्यांना “एकमेकांवर प्रीती” करण्याची आज्ञा दिली. त्यासोबतच त्याने म्हटलं: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) अलीकडच्या काळातही यहोवाच्या लोकांनी एकमेकांप्रती असंच प्रेम दाखवलं आहे. असं आपण का म्हणू शकतो? जगातील राषट्रे जरी एकमेकांविरुद्ध युद्धात उतरली, तरी यहोवाच्या लोकांनी मात्र एकमेकांवर फक्त प्रेमच केलं आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धात जवळपास ५ कोटी ५० लाख लोकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. पण यहोवाच्या लोकांनी युद्धात सहभाग घेतला नाही. त्यांनी कोणाचीच हत्या केली नाही. (मीखा ४:१,  वाचा.) यामुळे “सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी” राहण्यास त्यांना मदत झाली.—प्रे. कृत्ये २०:२६.

४. यहोवाच्या लोकांच्या संख्येत होणारी वाढ विलक्षण आहे असं का म्हणता येईल?

आपला शत्रू सैतान हा खूप शक्तिशाली आहे. तो या ‘युगाचा दैवत’ आहे. (२ करिंथ. ४:४) असं असलं तरी यहोवाच्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सैतानाने जगातील राजकीय संघटनांना व प्रसारमाध्यमांना आपल्या नियंत्रणात ठेवलं आहे. आणि त्यांचा वापर करून तो आपलं प्रचारकार्य थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण असं करण्यात त्याला कधीही यश मिळणार नाही. सैतानाला माहीत आहे की त्याच्याकडे फार थोडा वेळ उरला आहे. त्यामुळे तो आपल्याला यहोवाची उपासना करण्यापासून दूर नेण्याचा नेहमी प्रयत्न करत राहतो.—प्रकटी. १२:१२.

इतर जण चुका करतात तेव्हाही तुम्ही विश्वासू राहाल का?

५. कोणत्या कारणामुळे इतर जण आपलं मन दुखावू शकतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवाच्या उपासकांना माहीत आहे की, यहोवावर आणि इतरांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. येशूने म्हटलं: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्त. २२:३५-३९) पण बायबल आपल्याला हेदेखील सांगतं की आदामाने पाप केल्यामुळे आपण सर्व जन्मतःच पापी आहोत. (रोमकर ५:१२, १९ वाचा.) त्यामुळे कदाचित मंडळीत एखादा बांधव त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपलं मन दुखावू शकतो. असं जर झालं, तर आपण काय करणार? यहोवावरचं आपलं प्रेम आपण कमी होऊ देणार का? आपण त्याला आणि त्याच्या लोकांना विश्वासू राहू का? बायबलमध्ये आपल्याला देवाच्या अशा काही सेवकांबद्दल वाचायला मिळतं ज्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांचं मन दुखावलं. त्यांच्याबद्दल बायबलमध्ये जे सांगितलं आहे त्यातून आपण काय शिकू शकतो, हे आता आपण पाहू या.

एली आणि त्याच्या मुलांनी जे केलं ते पाहून तुमची प्रतिक्रिया काय असती? (परिच्छेद ६ पाहा)

६. एली आपल्या मुलांना वेळीच ताडन देण्यास कसा चुकला?

एलीचंच उदाहरण घ्या. इस्राएलमध्ये तो महायाजक होता. पण त्याची दोन मुलं यहोवाच्या नियमांनुसार मुळीच वागत नव्हती. बायबल त्यांच्याबद्दल म्हणतं: “एलीचे पुत्र दुष्ट होते. ते देवावर प्रेम करत नव्हते.” (१ शमु. २:१२, सुबोधभाषांतर) आपली मुलं वाईट कामं करत आहेत हे एलीला माहीत होतं. पण तरीही त्याने त्यांना कधी ताडन दिलं नाही. कालांतरानं मात्र यहोवाने एली आणि त्याच्या मुलांना त्यांच्या वाईट कृत्यांसाठी शिक्षा केली. तसंच, त्यानंतर एलीच्या वंशातील कोणालाही यहोवाने महायाजक म्हणून सेवा करण्याची संधी दिली नाही. (१ शमु. ३:१०-१४) तुम्ही जर एलीच्या काळात असता आणि तो त्याच्या मुलांना अगदी घाणेरडी कृत्यं करू देत आहे हे तुम्ही पाहिलं असतं, तर तुमच्यासाठी ते अडखळण ठरलं असतं का? या परिस्थितीमुळे यहोवावरचा तुमचा विश्वास इतका कमी झाला असता का, की तुम्ही त्याची सेवा करणंच सोडून दिलं असतं?

७. दाविदाने कोणत्या मोठ्या चुका केल्या आणि यहोवाने त्याबद्दल काय केलं?

दाविदामध्ये बरेच चांगले गुण असल्यामुळे यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. (१ शमु. १३:१३, १४; प्रे. कृत्ये १३:२२) पण दाविदानेदेखील आपल्या जीवनात काही मोठ्या चुका केल्या. त्याचा सेवक उरीया जेव्हा युद्धामध्ये होता तेव्हा त्याने त्याची पत्नी बथशेबा हिच्यासोबत व्यभिचार केला आणि ती गर्भवती झाली. दाविदाला आपलं पाप सर्वांपासून लपवून ठेवायचं होतं. त्यामुळे त्याने उरीयाला युद्धातून परत बोलावून घेतलं व त्याने आपल्या घरी जावं असा आग्रह केला. दाविदाला वाटलं की उरीयाने त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर मग सर्वांना वाटेल की तिच्या पोटात जे बाळ आहे ते उरीयाचंच आहे. पण उरीया मात्र आपल्या घरी जाण्यास तयार नव्हता. म्हणून मग दाविदाने युद्धात त्याची हत्या करण्याचा कट रचला. दाविदाने केलेल्या या पापांमुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला खूप दुःख सहन करावं लागलं. (२ शमु. १२:९-१२) पण नंतर यहोवाने त्याच्यावर दया दाखवली आणि त्याला माफ केलं. कारण योग्य ते करण्याची त्याची इच्छा आहे हे यहोवाने ओळखलं होतं. (१ राजे ९:४) तुम्ही जर दाविदाच्या काळात असता तर त्याने केलेल्या पापांबद्दल ऐकून तुम्हाला कसं वाटलं असतं? यामुळे तुम्ही यहोवाची सेवा करणं सोडून दिलं असतं का?

८. (क) पेत्राने आपला शब्द पाळला नाही असं कशावरून म्हणता येईल? (ख) पेत्राने चूक केल्यावरही यहोवाने त्याला जबाबदाऱ्या का दिल्या?

बायबलमधील आणखी एक उदाहरण पेत्राचं आहे. त्याला येशूने प्रेषित म्हणून निवडलं होतं. असं असलं तरी, पेत्र काही वेळा अशा गोष्टी बोलला किंवा त्याने अशी कार्ये केली ज्याचा त्याला नंतर पस्तावा झाला. उदाहरणार्थ, एकदा पेत्राने येशूला म्हटलं की इतर कोणीही तुला सोडून गेलं तरी मी कधीच तुला सोडून जाणार नाही. (मार्क १४:२७-३१, ५०) पण येशूला अटक करण्यात आली तेव्हा सर्व प्रेषित त्याला सोडून पळून गेले. यात पेत्रदेखील होता. नंतर, पेत्राने तीन वेळा ‘मी येशूला ओळखत नाही’ असं म्हणून त्याला नाकारलं. (मार्क १४:५३, ५४, ६६-७२) पण पेत्राला याबद्दल खूप वाईट वाटलं आणि त्याने पश्‍चात्ताप केला. त्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं आणि त्याला जबाबदाऱ्या दिल्या. समजा तुम्ही त्या काळात येशूचे शिष्य असता आणि पेत्राने केलेल्या चुकांबद्दल तुम्हाला माहीत असतं, तेव्हाही तुम्ही यहोवाला विश्वासू राहिला असता का?

९. यहोवा नेहमी योग्य तेच करतो या गोष्टीवर तुमचा भरवसा का आहे?

या सर्व उदाहरणांवरून आपल्याला कळतं की यहोवाच्या काही सेवकांनी आपल्या जीवनात चुका केल्या आहेत आणि इतरांचं मनही दुखावलं आहे. आज जर कोणी अशा चुका केल्या तर तुम्ही काय कराल? तुम्ही सभांना जाणं सोडून द्याल का? किंवा मग यहोवा आणि त्याच्या संघटनेला पूर्णपणे सोडून द्याल? की, यहोवा हा दया दाखवणारा देव आहे या गोष्टीची आठवण तुम्ही स्वतःला करून द्याल? पाप करणारी व्यक्ती पश्‍चात्ताप करेल याची तो कदाचित वाट पाहत आहे, याची जाणीव तुम्ही ठेवाल का? पण कधीकधी असंदेखील होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीने गंभीर चुका केल्या आहेत आणि तिला याबद्दल मुळीच पस्तावा नाही. अशा वेळीही यहोवावर तुमचा भरवसा राहील का? यहोवा सर्व काही पाहात आहे आणि योग्य वेळी तो पाऊल उचलेल असा भरवसा तुम्ही बाळगाल का? गरज पडल्यास यहोवा त्या व्यक्तीला मंडळीतून काढूनदेखील टाकेल. तेव्हा यहोवा नेहमी योग्य तेच करतो या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का?

यहोवाला विश्वासू राहा

१०. यहुदा इस्कर्योत आणि पेत्र यांच्या चुकांमुळे येशूने काय केलं नाही?

१० बायबलमध्ये आपल्याला यहोवाच्या बऱ्याच विश्वासू सेवकांबद्दल वाचायला मिळतं. त्यांच्या सोबत्यांनी व इतरांनी जरी गंभीर पाप केलं तरी ते मात्र यहोवाशी आणि त्याच्या लोकांशी विश्वासू राहिले. यांतील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे येशू. आपल्या पित्याला रात्रभर प्रार्थना केल्यानंतर येशूने १२ प्रेषितांना निवडलं. पण नंतर त्यांच्यापैकी असलेल्या यहुदा इस्कर्योत याने येशूचा विश्वासघात केला. तसंच, प्रेषित पेत्रानेही येशूला नाकारलं. (लूक ६:१२-१६; २२:२-६, ३१, ३२) येशूला हे माहीत होतं की यात यहोवाची किंवा इतर सेवकांची काहीच चूक नाही. त्यामुळे तो यहोवावर किंवा त्याच्या लोकांवर कधीच रागावला नाही. त्याऐवजी त्याने आपल्या पित्यासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवला आणि त्याची विश्वासूपणे सेवा केली. यामुळे यहोवाने येशूला आशीर्वादित केलं. त्याने त्याचं पुनरुत्थान केलं आणि स्वर्गात त्याला राजा बनवलं.—मत्त. २८:७, १८-२०.

११. आजच्या काळातील यहोवाच्या सेवकांबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आलं होतं?

११ येशूच्या उदाहरणावरून आपण शिकतो की आपण नेहमी यहोवाला आणि त्याच्या लोकांना विश्वासू राहिलं पाहिजे. आणि यासाठी आपल्याजवळ चांगली कारणंसुद्धा आहेत. शेवटल्या काळात यहोवा त्याच्या लोकांना मार्गदर्शन देत आहे याचे सबळ पुरावे आज आपण पाहू शकतो. जगभरात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी तो त्याच्या लोकांना मदत करत आहे आणि फक्त त्याचेच लोक हे काम करत आहेत. यहोवा त्यांना शिकवत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकता आहे आणि ते खऱ्या अर्थानं आनंदी आहेत. याबद्दल खरंतर यहोवाने आधीच भाकीत केलं होतं. त्याने म्हटलं होतं: “पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील.”—यश. ६५:१४.

१२. आपण इतरांच्या चुकांमुळे काय करू नये?

१२ आज आपण सर्व आनंदी आहोत. कारण यहोवा आपल्याला मार्गदर्शन देत आहे आणि बरीच चांगली कार्ये करण्यास आपल्याला मदत करत आहे. याच्या अगदी उलट, सैतानाच्या जगातील लोकांच्या जीवनात आनंद नाही आणि त्यांचं भविष्य अंधकारात आहे. जगाची अशी परिस्थिती असताना, मंडळीमध्ये एखाद्याच्या बोलण्यामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे यहोवाला आणि त्याच्या लोकांना सोडून जगात जाणं शहाणपणाचं आणि योग्य ठरेल का? नक्कीच नाही. त्याऐवजी आपण नेहमी यहोवाला विश्वासू राहिलं पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. इतरांच्या चुकांकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं आणि त्याबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवावी हेदेखील आपल्याला शिकून घेणं गरजेचं आहे.

तुमची प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

१३, १४. (क) आपण एकमेकांसोबत वागताना धीर का दाखवला पाहिजे? (ख) आपण कोणतं अभिवचन नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे?

१३ एखाद्या बांधवानं त्याच्या वागण्या-बोलण्यातून तुमचं मन दुखावलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? बायबल आपल्याला सल्ला देतं की, “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.” (उप. ७:९) आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे बऱ्याच वेळा चुकतो. म्हणून मग आपल्या बांधवांकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल की त्यांनी नेहमी योग्य तेच बोलावं आणि योग्य तेच करावं. तसंच, त्यांच्या चुकांबद्दल सतत विचार करत राहणंदेखील योग्य ठरणार नाही. आपण नेहमी त्यांच्या चुकांबद्दल विचार करत राहिलो तर यहोवाची सेवा करण्यात आपल्याला आनंद मिळणार नाही. त्याहूनही वाईट म्हणजे, आपला यहोवावरचा विश्वास कमी होऊ शकतो आणि आपण त्याची संघटना सोडून जाऊ शकतो. असं जर झालं तर यहोवाची सेवा करण्याचा बहुमान आणि नवीन जगात जाण्याची आशा आपण गमावून बसू.

१४ तर मग इतरांच्या चुकांमुळे आपलं मन दुखावलं गेलं असलं, तरीही यहोवाची आनंदानं सेवा करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यहोवाचं हे सांत्वन देणारं अभिवचन नेहमी लक्षात असू द्या: “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यश. ६५:१७; २ पेत्र ३:१३) तुम्ही यहोवाला विश्वासू राहिलात तर यहोवा तुम्हाला हे आशीर्वाद नक्की देईल.

१५. इतर जण चुकतात तेव्हा आपण काय करावं असं येशूने म्हटलं?

१५ पण नवीन जग अजूनही आलेलं नाही. त्यामुळे आज जर कोणी आपलं मन दुखावलं तर यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो यावर मनन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, येशूच्या पुढील शब्दांवर आपण मनन करू शकतो. त्याने म्हटलं: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” तसंच, पेत्राने जेव्हा येशूला विचारलं की मी माझ्या भावाला “सात वेळा” माफ करू का, तेव्हा येशूने उत्तर दिलं: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा” माफ कर. आपण इतरांना क्षमा करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे असं येशूने आपल्याला शिकवलं.—मत्त. ६:१४, १५; १८:२१, २२.

१६. योसेफाने कोणतं चांगलं उदाहरण मांडलं?

१६ इतरांच्या वागण्यामुळे आपण निराश होतो तेव्हा आपण काय करावं, याबद्दल योसेफाने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं. योसेफ आणि त्याचा लहान भाऊ ही दोघं राहेल आणि याकोबाची मुलं होती. याकोबाला आणखी दहा मुलं होती. पण त्या सर्वांपेक्षा योसेफावर त्याचं जास्त प्रेम होतं. त्यामुळे त्याचे भाऊ योसेफाचा द्वेष करायचे. ते त्याचा इतका द्वेष करायचे की त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं, आणि मग त्याला इजिप्तमध्ये नेण्यात आलं. याच्या बऱ्याच वर्षांनंतर योसेफाचं चांगलं काम पाहून इजिप्तचा राजा खूप खूश झाला आणि त्याने त्याला आपल्या सर्व गोष्टींवर अधिकारी म्हणून नेमलं. नंतर, दुष्काळामुळे योसेफाचे भाऊ अन्नसामग्री विकत घेण्यासाठी इजिप्तमध्ये त्याच्याजवळ आले. योसेफाने त्यांना ओळखलं, पण ते त्याला ओळखू शकले नाही. त्यांनी योसेफाला खूप वाईट वागणूक दिली होती. पण आता अधिकार असतानाही योसेफ त्यांच्याशी वाईट वागला नाही. हे खरं आहे की ते बदलले आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याने त्यांची परीक्षा घेतली. पण ते बदलले आहेत याची खात्री पटल्यावर त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाला: “भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करेन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.”—उत्प. ५०:२१.

१७. इतरांनी तुमचं मन दुखावल्यास तुम्ही काय करणार?

१७ आपल्या सर्वांमध्येच उणीवा आहेत. म्हणून आपल्यामुळेही इतरांचं मन दुखावलं जाऊ शकतं ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला असं जाणवलं की तुम्ही एखाद्याचं मन दुखावलं आहे तर बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यानुसार कार्य करा. त्या व्यक्तीकडे क्षमा मागा आणि शांतिपूर्ण नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करा. (मत्तय ५:२३, २४ वाचा.) इतर जण आपल्याला क्षमा करतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं. मग आपणही इतरांना क्षमा करू नये का? कलस्सैकर ३:१३ या वचनात म्हटलं आहे: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.” आपल्या बांधवांवर आपलं प्रेम असेल तर आपण त्यांनी केलेल्या चुका आठवून निराश होणार नाही. (१ करिंथ. १३:५) आपण इतरांना माफ केलं तर यहोवादेखील आपल्याला माफ करेल. म्हणून मग, आपला पिता यहोवा जसं आपल्यावर दया करतो, तसंच आपणही आपल्या बांधवांवर दया करण्याचा प्रयत्न करत राहू या.—स्तोत्र १०३:१२-१४ वाचा.