व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती येशू ख्रिस्ताला सूचित करते. ज्यांचा बचाव केला जाईल त्यांच्यावर तो चिन्ह लावतो

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

यहेज्केलच्या दृष्टांतात कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती आणि हातात विध्वंसक हत्यारे बाळगणारे सहा लोक कोणाला सूचित करतात?

ते स्वर्गातील त्या शक्तींना सूचित करतात ज्यांनी यरुशलेमचा नाश करण्यात सहभाग घेतला होता. तसंच, ते लवकरच हर्मगिदोनात सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करण्यातही सहभाग घेतील. ही सुधारित समज आहे. पण, आपल्या आधीच्या समजेत सुधारणा करण्याची गरज का होती?

यरुशलेमचा नाश होण्याआधी काय घडेल हे यहोवाने यहेज्केलला इ.स.पू. ६०७ च्या आधी एका दृष्टांतात दाखवलं होतं. त्या दृष्टांतात यहेज्केलने बऱ्याच वाईट गोष्टी घडताना पाहिल्या. नंतर मग त्याने सहा लोकांना पाहिलं ज्यांच्या हातात “विध्वंसक हत्यारे” होती. त्यांच्यासोबत एक “शुभ्र तागाचे वस्त्र” घातलेला मनुष्यही त्याला दिसला आणि त्याच्याजवळ “कारकुनाची दऊत” होती. (यहे. ८:६-१२; ९:२, ३) या मनुष्याला शहरात जाऊन “जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह” लावण्यास सांगण्यात आलं. नंतर ज्यांच्या कपाळावर चिन्ह नव्हतं त्या सर्वांना ठार मारण्यास या सहा लोकांना सांगण्यात आलं. (यहे. ९:४-७) आपण या दृष्टांतातून काय शिकू शकतो? आणि कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती कोण आहे?

यहेज्केलला हा दृष्टांत इ.स.पू. ६१२ मध्ये देण्यात आला. ही एक भविष्यवाणी होती जिची पहिली पूर्णता त्याच्या पाच वर्षांनी झाली. त्या वेळी यहोवाने बाबेलच्या सैन्याला यरुशलेम शहराचा नाश करू दिला. अशा प्रकारे बाबेलच्या हातून यहोवाने त्याची आज्ञा मोडणाऱ्या इस्राएली लोकांना दंड दिला. (यिर्म. २५:९, १५-१८) पण मग ज्या धार्मिक यहुद्यांनी शहरात घडणाऱ्या वाईट गोष्टींना पाठिंबा दिला नाही, त्यांचं काय झालं? या नाशातून ते बचावतील अशी योजना यहोवाने केली.

या दृष्टांतात यहेज्केलने लोकांच्या कपाळावर खरोखरचं चिन्ह लावलं नाही किंवा यरुशलेम शहराच्या नाशात स्वतः सहभाग घेतला नाही. याऐवजी देवदूतांनी यरुशलेम शहराच्या नाशाचं नेतृत्व केलं. या भविष्यवाणीवरून स्वर्गात नेमकं काय झालं असले हे समजून घेण्याची संधी आपल्याला मिळते. यहोवाने त्याच्या देवदूतांना आज्ञा दिली की त्यांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धार्मिक लोकांचा बचाव करण्यासाठी योजना करावी. *

या भविष्यवाणीची आणखी एक पूर्णता लवकरच आपल्या काळात होईल. आधी आपली अशी समज होती की कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्त जनांना सूचित करते. आपली अशीदेखील समज होती की जे लोक सुवार्ता ऐकतात व तिचा स्वीकार करतात, त्यांच्यावर बचावासाठी जणू काय चिन्ह लावलं जातं. पण अलीकडच्या काळात हे स्पष्ट झालं, की आपण ज्या प्रकारे या भविष्यवाणीचं स्पष्टीकरण देतो त्यात बदल करण्याची गरज आहे. मत्तय २५:३१-३३ या वचनांवरून आपल्याला समजतं की येशू लोकांचा न्याय करेल. आणि तो भविष्यात मोठ्या संकटादरम्यान हे करेल. त्या वेळी ज्या लोकांचा न्याय मेंढरं म्हणून केला जाईल त्यांचा बचाव होईल आणि ज्यांचा शेरडं म्हणून न्याय केला जाईल त्यांचा नाश होईल.

तर मग आपण यहेज्केलच्या दृष्टांतातून काय शिकतो? पुढील पाच धड्यांवर लक्ष द्या:

  1. यरुशलेम शहराचा नाश होण्याआधीच यहेज्केल, यिर्मया आणि यशया या संदेष्ट्यांनी शहराच्या नाशाबद्दल लोकांना इशारा दिला होता. त्यांनी एखाद्या पाहरेकऱ्यासारखं काम केलं. आज यहोवा अभिषिक्त जनांच्या एका लहान गटाचा उपयोग करून त्याच्या लोकांना शिकवत आहे. तसंच, मोठे संकट सुरू होण्याआधी इतरांना इशारा देत आहे. खरं पाहिलं तर, लोकांना इशारा देण्याच्या कार्यात देवाचे सर्वच सेवक, म्हणजे ‘परिवारातील’ सर्वच सदस्य सहभाग घेतात.—मत्त. २४:४५-४७.

  2. यहेज्केलने जसं शहरातील लोकांवर चिन्ह लावलं नाही, तसंच आज देवाचे लोकदेखील ज्यांचा बचाव होईल त्यांच्यावर चिन्ह लावत नाहीत. तर ते फक्त इतरांना प्रचार करतात आणि भविष्यात काय घडणार आहे त्याबद्दल त्यांना सांगतात. जगभरात चाललेलं हे प्रचारकार्य देवदूतांच्या साहाय्यानं पूर्ण केलं जात आहे.—प्रकटी. १४:६.

  3. यहेज्केलच्या काळात ज्या लोकांचा बचाव झाला त्यांच्या कपाळावर कोणतंही खरोखरचं चिन्ह नव्हतं. तसंच, भविष्यात ज्यांचा बचाव होईल त्यांच्या कपाळावरही खरोखरचं चिन्ह नसेल. मोठ्या संकटातून बचावण्यासाठी लोकांनी काय करण्याची गरज आहे? नाशाबद्दल इशारा मिळाल्यावर त्यांनी ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचं शिकलं पाहिजे. त्यांनी देवाला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे आणि सुवार्ता सांगण्याद्वारे ख्रिस्ताच्या बांधवांना मदत केली पाहिजे. (मत्त. २५:३५-४०) त्यांनी या गोष्टी केल्या तर मोठ्या संकटादरम्यान त्यांच्यावर लाक्षणिक अर्थानं चिन्ह लावण्यात येईल, म्हणजेच बचावासाठी त्यांची निवड करण्यात येईल.

  4. कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती येशूला सूचित करते. मोठे संकट सुरू असताना येशू मोठ्या कळपातील लोकांचा मेंढरं म्हणून न्याय करेल. त्या वेळी तो लाक्षणिक अर्थानं त्यांच्यावर चिन्ह लावेल. या लोकांना पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची संधी मिळेल.—मत्त. २५:३४, ४६. *

  5. विध्वंसाची हत्यारे बाळगणारे ते सहा लोक स्वर्गीय सैन्याला सूचित करतात ज्यांचं नेतृत्व येशू करतो. ते लवकरच सर्व राष्ट्रांचा नाश करून दुष्टाईला मुळासकट काढून टाकतील.—यहे. १०:२, ६, ७; प्रकटी. १९:११-२१.

या दृष्टांतातून शिकलेल्या धड्यांवर मनन केल्यावर आपल्याला याची खात्री पटते, की यहोवा दुष्ट लोकांसोबत आपल्या विश्वासू सेवकांचा कधीच नाश होऊ देणार नाही. (२ पेत्र २:९; ३:९) तसंच आपल्याला हेदेखील कळतं की आजच्या काळात प्रचारकार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. अंत येण्याआधी सर्वांना त्याबद्दलचा इशारा देण्याची गरज आहे.—मत्त. २४:१४.

^ परि. 6 शहराच्या नाशात ज्या लोकांचा बचाव झाला, जसं की बारूख (यिर्मयाचा सचिव), कूशी एबद-मलेख आणि रेखाबी लोक, यांच्या कपाळावर कोणत्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं. (यिर्म. ३५:१-१९; ३९:१५-१८; ४५:१-५) कपाळावर चिन्ह लावणं लाक्षणिक होतं आणि त्याचा अर्थ फक्त इतका होता की त्यांचं संरक्षण होईल.

^ परि. 12 विश्वासू अभिषिक्त जनांना बचावासाठी या चिन्हाची गरज पडणार नाही. कारण त्यांच्यावर एकतर मृत्यूआधी शेवटचा शिक्का मारला जातो किंवा मग मोठ्या संकटाची सुरुवात होण्याआधी शेवटचा शिक्का मारण्यात येईल.—प्रकटी. ७:१, ३.