व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या

महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या

“हे परमेश्वरा, . . . तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहो.”—यश. ६४:८.

गीत क्रमांक: ११, २६

१. यहोवा एक महान कुंभार आहे असं का म्हणता येईल?

२०१० सालच्या नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एका लिलावात, चीनी मातीची एक फुलदाणी जवळजवळ ४७० कोटी रूपयांत विकण्यात आली. अगदी कमी किमतीच्या आणि साध्याशा मातीचं रूपांतर एका अतिशय सुंदर आणि किमती फुलदाणीत करण्याची कुंभाराची कला खरोखरच विलक्षण आहे. यहोवा देव हा आपला कुंभार आहे. पण, मानवी कुंभाराच्या तुलनेत तो कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. बायबल म्हणतं की यहोवाने “जमिनीतील मातीचा” एक परिपूर्ण मनुष्य घडवला. (उत्प. २:७) या मनुष्याला, म्हणजेच आदामाला देवाच्या गुणांचं अनुकरण करण्याच्या क्षमतेसह बनवण्यात आलं होतं. आणि म्हणून त्याला “देवाचा पुत्र” म्हणण्यात आलं.—लूक ३:३८.

२, ३. पश्‍चात्तापी इस्राएली लोकांचं आपण अनुकरण कसं करू शकतो?

पण जेव्हा आदामाने आपल्या निर्माणकर्त्याविरूद्ध बंड केला, तेव्हा “देवाचा पुत्र” असण्याचा बहुमान त्यानं गमावला. तरी, आदामाच्या संततीपैकी अनेकांनी मात्र यहोवाला आपला शासक म्हणून निवडलं आहे. (इब्री १२:१) नम्रपणे आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेत राहण्याद्वारे त्यांनी हे दाखवून दिलं आहे, की आपला पिता आणि कुंभार म्हणून सैतानाला नाही तर यहोवाला त्यांनी निवडलं आहे. (योहा. ८:४४) त्यांच्या एकनिष्ठेवरून आपल्याला पश्‍चात्तापी इस्राएली लोकांनी जे म्हटलं त्याची आठवण होते. त्यांनी म्हटलं: “हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहो.”—यश. ६४:८.

यहोवाचे खरे उपासक आजदेखील नम्रता आणि आज्ञाधारकता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यहोवाला पिता म्हणणं एक बहुमानच आहे असं त्यांना वाटतं. आणि तो त्यांचा कुंभार असावा अशीही त्यांची इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? आकार देऊन जिला देव एका मौल्यवान पात्रात रूपांतरित करू शकतो, अशी मऊ माती होण्याची तुमची तयारी आहे का? यहोवा आपल्या सर्व बंधुभगिनींमध्ये चांगले बदल घडवून आणत आहे आणि त्यांना अजूनही आकार दिला जात आहे हे तुम्ही पाहू शकता का? याबाबतीत योग्य दृष्टिकोन बाळगण्यासाठी आता आपण पुढील तीन गोष्टींवर चर्चा करू या: (१) आकार देण्यासाठी यहोवा एखाद्या व्यक्तीची निवड कशी करतो, (२) तो तिला आकार का देतो, आणि (३) तो हे कशा प्रकारे करतो.

आकार देण्यासाठी यहोवा स्वतः निवड करतो

४. लोकांची निवड करताना यहोवा काय पाहतो? काही उदाहरणं द्या.

मानवांकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन यात खूप मोठा फरक आहे. तो आपलं हृदय पारखतो. आपण आतून कशा प्रकारचे व्यक्ती आहेत हे तो पाहतो. (१ शमुवेल १६:७ब वाचा.) ख्रिस्ती मंडळीची स्थापना करताना त्याने हेच दाखवून दिलं. यहोवाने अशा बऱ्याच लोकांना स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडे आकर्षित केलं, जे काहींच्या मते काहीच उपयोगाचे किंवा योग्य नव्हते. (योहा. ६:४४) शौलाचंच उदाहरण घ्या. तो एक परूशी होता. शिवाय, “निंदक, छळ करणारा व जुलमी” होता. (१ तीम. १:१३) पण, यहोवाने त्याचं मन पारखलं. तो निरुपयोगी मातीसारखा आहे आणि त्याला आकार देता येणार नाही, असं त्याला वाटलं नाही. (नीति. १७:३) तर, त्याला आकार देऊन “निवडलेले पात्र” म्हणून घडवता येईल हे यहोवाने ओळखलं. आणि “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती” यांना सुवार्ता सांगण्यास त्याला तयार करता येईल हे यहोवाला माहीत होतं. (प्रे. कृत्ये ९:१५) यासोबतच, यहोवाने इतर जणांचीही निवड केली आणि त्यांना आकार देऊन त्याने उत्तम कामासाठी त्यांचा वापर केला. यांत मद्यपी, अनैतिक काम करणारे आणि चोर यांचाही समावेश होता. (रोम. ९:२१; १ करिंथ. ६:९-११) देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे त्याच्यावरचा त्यांचा विश्वास आणखी मजबूत झाला. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार मिळावा म्हणून त्यांनी स्वतःला यहोवाच्या हातात सोपवलं.

५, ६. यहोवाला आपला कुंभार म्हणून स्वीकारल्यामुळे, क्षेत्रातील लोकांप्रती आणि आपल्या बंधुभगिनींप्रती आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

आपल्याला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे, की योग्य व्यक्तीची निवड करून तिला स्वतःकडे आकर्षित करण्याची क्षमता यहोवाजवळ आहे. त्यामुळे क्षेत्रात भेटणाऱ्या लोकांबद्दल किंवा आपल्या मंडळीतील लोकांबद्दल कोणताही पूर्वग्रह बाळगणं चुकीचं ठरेल. माइकल नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण लक्षात घ्या. यहोवाचे साक्षीदार जेव्हा त्याला भेट द्यायचे तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी असायची याबद्दल तो सांगतो: “मी त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करायचो आणि त्यांचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसायचो. मी खरंच खूप कठोरतेनं त्यांच्याशी वागायचो! नंतर एकदा मी एका कुटुंबाला भेटलो. त्यांची चांगली वागणूक पाहून मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं. एक दिवस मला समजलं की ते तर यहोवाचे साक्षीदार आहेत! हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या चांगल्या वागणुकीनं मला स्वतःचं परीक्षण करण्यास भाग पाडलं. साक्षीदारांबद्दल असलेला माझा दृष्टिकोन कोणत्या आधारावर आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न केला. यामुळे माझ्या लक्षात आलं की त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती नव्हती आणि काही अफवांवर मी विश्वास ठेवला होता, म्हणून त्यांच्याप्रती असलेला माझा दृष्टिकोन चुकीचा होता.” माइकलला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा होती, त्यामुळे त्याने बायबल अभ्यास स्वीकारला. नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला आणि पुढे तो पूर्णवेळेची सेवा करू लागला.

आपण जेव्हा यहोवाला आपला कुंभार म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपल्या बंधुभगिनींप्रती यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला मदत होते. आपण हे लक्षात ठेवतो की त्यांच्यात चांगले बदल घडवून यहोवा अजूनही त्यांना आकार देत आहे. यहोवा त्यांच्या उणिवांकडे नाही, तर ते आतून कशा प्रकारचे व्यक्ती आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करतो. तसंच, ते कशा प्रकारचे व्यक्ती बनू शकतात हेदेखील त्याला माहीत आहे. (स्तो. १३०:३) आपल्या बांधवांप्रती आपण जर सकारात्मक दृष्टिकोन बाळगला, तर यहोवाचं अनुकरण करणं आपल्याला शक्य होईल. इतकंच नाही तर आपल्या बंधुभगिनींना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास मदत करण्याद्वारे आपण आपल्या महान कुंभारासोबत काम करू शकतो. (१ थेस्सलनी. ५:१४, १५) ख्रिस्ती वडिलांनी या कार्यात पुढाकार घेऊन मंडळीसमोर चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे.—इफिस. ४:८, ११-१३.

यहोवा आपल्याला आकार का देतो?

७. यहोवा आपल्याला शिस्त लावतो या गोष्टीची तुम्ही कदर का करता?

तुम्ही कदाचित काही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल, ‘लहानपणी आईवडील आपल्याला जी शिस्त लावतात त्याची किंमत स्वतः आईवडील झाल्याशिवाय कळत नाही.’ लहानपणी मिळालेली शिस्त खरंच किती योग्य होती हे मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येतं. कारण, शिस्त ही खरंतर प्रेमापोटी दिली जाते हे आपल्याला कळतं. (इब्री लोकांस १२:५, ६, ११ वाचा.) यहोवादेखील आपल्याला त्याची मुलं समजतो आणि आपल्यावर खूप प्रेम करतो. याच कारणामुळे तो धीर दाखवून आपल्याला शिस्त लावतो म्हणजे आपल्याला आकार देतो. आपण सुज्ञ बनावं आणि नेहमी आनंदी राहावं अशी आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे. (नीति. २३:१५) आपल्याला दुःख सहन करावं लागतं हे पाहून त्यालाही वाईट वाटतं. शिवाय “क्रोधाची प्रजा” किंवा अपश्‍चात्तापी म्हणून आपला शेवटी मृत्यू व्हावा अशी त्याची इच्छा नाही.—इफिस. २:२, ३

८, ९. यहोवा आज आपल्याला कशा प्रकारे प्रशिक्षित करत आहे आणि नवीन जगातही कशा प्रकारे चालू राहील?

एके काळी आपण “क्रोधाची प्रजा” होतो आणि यहोवाला नाराज करतील अशा अनेक वाईट गुणांनी भरलेले असे होतो. पण, यहोवाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवलं, आपल्याला आकार दिला आणि एखाद्या मेंढराप्रमाणे बनण्यास आपल्याला मदत केली. खरंच आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत! (यश. ११:६-८; कलस्सै. ३:९, १०) आज आपण एका अशा आध्यात्मिक नंदनवनात राहत आहोत, जे यहोवाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी मदत व्हावी म्हणून निर्माण केलं आहे. जगात पाहिलं तर परिस्थिती अतिशय वाईट आहे. ते दुष्टतेनं भरलेलं आहे. पण अशा परिस्थितीतही आपल्याला या आध्यात्मिक नंदनवनात अगदी सुरक्षित असल्यासारखं वाटतं. आपल्यापैकी काही जण अशा कुटुंबात लहानाचे मोठे झाले आहेत जिथं प्रेम आणि जिव्हाळा नव्हता. पण, आता आध्यात्मिक नंदनवनात ते आपल्या बंधुभगिनींचं खरं प्रेम अनुभवत आहेत. (योहा. १३:३५) तसंच, इतरांवर प्रेम करण्याचंही आपण शिकलो आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे आणि त्याचं प्रेम आपण अनुभवत आहोत.—याको. ४:८.

नवीन जगात या आध्यात्मिक नंदनवनातून आपण पुरेपूर लाभ घेऊ. तसंच, देवाच्या शासनाखाली पृथ्वीवरील नंदनवनाचा आपण आनंद घेऊ. त्या काळी यहोवा आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणखी आकार देईल आणि त्याच्या शिक्षणात आपल्याला वाढवेल. तो हे कसं करेल हे आताच पूर्णपणे समजून घेणं आपल्याला शक्य नाही. (यश. ११:९) नवीन जगात यहोवा आपल्यातून अपरिपूर्णता काढून टाकेल आणि परिपूर्ण शरीर व मन आपल्याला मिळेल. यामुळे यहोवाकडून मिळणारं मार्गदर्शन पूर्णपणे समजून घेण्यास आणि त्याचं पालन करण्यास आपल्याला सोपं जाईल. तेव्हा, यहोवा आज प्रेमापोटी आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत आहे या गोष्टीची कदर आपण बाळगू या. तसंच, त्याच्याकडून मिळणारी शिस्तदेखील स्वीकारू या.—नीति. ३:११, १२.

यहोवा आज आपल्याला कशा प्रकारे आकार देत आहे?

१०. येशूने महान कुंभाराप्रमाणे धीर आणि कुशलता कशी दाखवली?

१० एका अतिशय अनुभवी आणि कुशल कुंभाराला ज्या प्रकारे मातीची चांगली ओळख असते, अगदी त्याच प्रकारे यहोवादेखील आपल्याला ओळखतो. त्याला आपल्या कमतरता, आपल्या मर्यादा आणि आपण करत असलेली प्रगतीदेखील माहीत आहे. आपल्याला आकार देताना तो या सर्व गोष्टी लक्षात घेतो. (स्तोत्र १०३:१०-१४ वाचा.) येशूने आपल्या प्रेषितांच्या उणिवांकडे ज्या दृष्टिकोनानं पाहिलं त्यावरून, यहोवाचा आपल्याप्रती असलेला दृष्टिकोन समजून घेण्यास आपल्याला मदत होते. ‘आपल्यापैकी मोठा कोण’ या विषयावर प्रेषितांमध्ये कधीकधी वाद व्हायचा. जर तुम्ही तिथं असता तर प्रेषितांचं असं वागणं पाहून त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला असता? कदाचित ते मऊ मातीप्रमाणे नाहीत असं तुम्हाला वाटलं असतं. पण, येशूचा दृष्टिकोन तसा नव्हता. त्यांना चांगला आकार दिला जाऊ शकतो हे येशूला माहीत होतं. यासाठी, त्यांना धीर आणि दया दाखवून सल्ला देण्याची गरज आहे हे त्याने ओळखलं. तसंच, त्याच्या नम्रतेचं त्यांनी अनुकरण करण्याची गरज आहे हेदेखील त्याला माहीत होतं. (मार्क ९:३३-३७; १०:३७, ४१-४५; लूक २२:२४-२७) येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर प्रेषितांना देवाकडून पवित्र आत्मा मिळाला आणि त्यानंतर त्यांच्यात बदल झाला. आपल्यात ‘मोठा कोण’ या गोष्टीऐवजी येशूने दिलेल्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.—प्रे. कृत्ये ५:४२.

११. दावीद मऊ मातीप्रमाणे होता के कशावरून म्हणता येईल, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

११ आपल्याला आकार देण्यासाठी आज यहोवा बायबलचा, त्याच्या पवित्र आत्म्याचा आणि मंडळीचा उपयोग करत आहे. आपण जेव्हा बायबलचं वाचन करतो, त्यावर मनन करतो आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यासाठी यहोवाकडे मदत मागतो, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. दावीद राजाने लिहिलं: “मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करत असतो.” (स्तो. ६३:६) त्याने असंही लिहिलं: “परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते.” (स्तो. १६:७) यहोवाकडून मिळणाऱ्या सल्ल्यावर दावीदाने मनन केलं आणि त्याद्वारे आपल्या अंतःकरणात अगदी खोलवर असलेल्या विचारांना आणि भावनांना चांगला आकार दिला. जेव्हा यहोवाचा सल्ला स्वीकारणं अतिशय कठीण होतं तेव्हाही त्याने तो स्वीकारला. (२ शमु. १२:१-१३) असं करण्याद्वारे दावीदाने नम्रता आणि आज्ञाधारकता याबाबतीत आपल्यापुढे एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. तेव्हा स्वतःला विचारा: ‘बायबलचं वाचन करताना मी त्यावर मनन करतो का? देवाकडून मिळणाऱ्या सल्ल्याचा वापर करून मी माझ्या मनात अगदी खोलवर असलेल्या विचारांना आणि भावनांना सुधारण्याचा प्रयत्न करतो का? तसंच, हे मला आणखी जास्त प्रमाणात कसं करता येईल?’—स्तो. १:२, ३.

१२, १३. आपल्याला आकार देण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याचा आणि ख्रिस्ती मंडळीचा कशा प्रकारे वापर करतो?

१२ देवाचा पवित्र आत्माही आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी आकार देतो. उदाहरणार्थ, पवित्र आत्मा आपल्याला येशूच्या व्यक्तिमत्त्वाचं अनुकरण करण्यास मदत करतो. यामुळे आत्म्याच्या फळाचे वेगवेगळे पैलू दाखवण्यास आपल्याला मदत होते. (गलती. ५:२२, २३) यातीलच एक पैलू म्हणजे प्रेम. आपलं देवावर प्रेम आहे आणि त्याच्या आज्ञेत राहण्याची आपली इच्छा आहे. तसंच, त्याच्या आज्ञा आपल्या भल्यासाठीच आहेत याची जाणीवदेखील आपल्याला आहे. त्यामुळे त्याच्याकडून मिळणारी शिस्त आपण स्वीकारतो. यासोबतच, दुष्ट जगाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठीही पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो. (इफिस. २:२) प्रेषित पौल तरुण असताना त्याच्यावर घमेंडी यहुदी धर्मपुढाऱ्यांचा प्रभाव पडला होता. पण, पवित्र आत्म्याच्या मदतीनं त्याला बदल करण्यास मदत झाली. त्याने नंतर लिहिलं: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३) मनापासून केलेल्या आपल्या प्रार्थनांचं यहोवा उत्तर देतो, हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा, आपणही पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे.—स्तो. १०:१७.

यहोवा ख्रिस्ती वडिलांचा वापर करून आपल्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो, पण आपण त्यांचा सल्ला स्वीकारावा अशी अपेक्षाही आपल्याकडून केली जाते (परिच्छेद १२, १३ पाहा)

१३ आपल्याला आकार देण्यासाठी यहोवा मंडळीचा आणि ख्रिस्ती वडिलांचाही उपयोग करतो. उदाहरणार्थ, आपल्यात काही उणिवा आहेत हे जेव्हा एखाद्या वडिलांच्या लक्षात येतं, तेव्हा ते आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला काही सल्लाही देतात. पण, असं करताना ते त्यांचे स्वतःचे विचार आपल्याला सांगत नाहीत. (गलती. ६:१) तर, ते नम्रता दाखवून यहोवाकडे समजबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करतात. त्यानंतर, ते बायबलचा आणि इतर प्रकाशनांचा वापर करून संशोधन करतात आणि आपल्याला मदत होईल अशी माहिती शोधतात. त्यामुळे, मंडळीतील एखाद्या वडिलांनी तुम्हाला प्रेमळपणे आणि दयाळूपणे सल्ला देण्याचा प्रयत्न केला, तर हे लक्षात असू द्या की त्यांनी दिलेला सल्ला हा खरंतर देवाचं तुमच्यावर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे. कदाचित हा सल्ला तुमच्या पेहरावाबद्दल असू शकतो. अशा वेळी तुम्ही त्यांचा सल्ला स्वीकारला तर तुम्ही यहोवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे ठराल. यामुळे तुम्हाला आकार देणं यहोवाला शक्य होईल आणि तुम्हाला फायदा होईल.

१४. आपल्यावर अधिकार असूनही यहोवा आपल्या इच्छास्वातंत्र्याची कशा प्रकारे कदर करतो?

१४ यहोवा आपल्याला कशा प्रकारे आकार देत आहे हे जर आपण समजून घेतलं, तर आपल्या बंधुभगिनींसोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. तसंच, सेवाकार्यादरम्यान भेटणाऱ्या लोकांप्रती आणि आपल्या बायबल विद्यार्थ्यांप्रती आपला दृष्टिकोनही सकारात्मक राहील. मातीचं एखादं पात्र बनवण्याआधी कुंभार ती माती स्वच्छ करतो. तिच्यात असलेले दगड किंवा इतर कचरा काढून टाकतो. अगदी त्याच प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या महान कुंभाराची शिस्त स्वीकारण्यास तयार असते, तेव्हा तोही तिच्यातील उणिवा काढून टाकण्यासाठी तिची मदत करतो. पण, त्या व्यक्तीनं आपल्या जीवनात बदल करावेत म्हणून तो तिला जबरदस्ती करत नाही. तर तो त्याचे उच्च नैतिक दर्जे काय आहेत हे दाखवून देतो. आणि मग जीवनात बदल करायचे की नाहीत हे तो त्या व्यक्तिलाच ठरवू देतो.

१५, १६. बायबल विद्यार्थी हे कसं दाखवू शकतात की त्यांना यहोवाकडून मिळणारी शिस्त मान्य आहे? उदाहरण द्या.

१५ ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या टेसी नावाच्या बहिणीचं उदाहरण विचारात घ्या. बायबलमधील सत्य शिकून घेणं तिला खूप सोपं गेलं. पण, तिनं म्हणावी तितकी प्रगती केली नाही आणि ती सभांनासुद्धा जात नव्हती. तिचा बायबल अभ्यास घेणाऱ्या बहिणीनं यहोवाला प्रार्थना करून बायबल अभ्यास बंद करण्याचं ठरवलं. पण, तेव्हाच एक आश्चर्याची गोष्ट घडली. आतापर्यंत आपण प्रगती का केली नाही हे टेसीनं तिला सांगितलं. टेसी म्हणाली की तिला जुगार खेळण्याची सवय आहे आणि त्यामुळे ती दुहेरी जीवन जगत आहे असं तिला वाटतं. पण, आता तिनं जुगार खेळणं बंद करण्याचं ठरवलं आहे.

१६ त्यानंतर लवकरच टेसी सभांना जाऊ लागली. तिच्या जुन्या मित्र-मैत्रिनींपैकी काही जणांनी तिची टिंगल केली. पण तरी तिनं ख्रिस्ती गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला. कालांतरानं, टेसीचा बाप्तिस्मा झाला आणि चार मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असूनही तिनं पायनियर सेवा सुरू केली. टेसीच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की जेव्हा बायबल विद्यार्थी यहोवाला आनंदी करण्यासाठी स्वतःत बदल करतात, तेव्हा तो त्यांच्या आणखी जवळ येतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल घडवून आणतो.

१७. (क) कुंभार या नात्यानं यहोवा दाखवत असलेला कोणता गुण तुम्हाला जास्त आवडतो? (ख) पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

१७ आजही काही कुंभार आपल्या हातांनी अगदी काळजीपूर्वक रीत्या मातीला आकार देऊन मौल्यवान आणि सुंदर पात्र तयार करतात. त्याच प्रकारे, यहोवादेखील आपल्याला सल्ला देऊन धीरानं आकार देण्याचा प्रयत्न करतो. तसंच, त्याच्या शिस्तीला आपण कसा प्रतिसाद देतो हेदेखील तो काळजीपूर्वक पाहतो. (स्तोत्र ३२:८ वाचा.) यहोवा तुमच्यात आस्था घेत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का? यहोवा काळजीपूर्वक रीत्या तुम्हाला कशा प्रकारे आकार देत आहे हे तुम्ही पाहू शकता का? असं असेल तर, यहोवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे बनण्यासाठी कोणत्या गुणांमुळे आपल्याला मदत होईल? निरुपयोगी मातीसारखे होऊ नये म्हणून आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? तसंच, यहोवा जेव्हा मुलांना आकार देतो तेव्हा आईवडील या कार्यात त्याला कशी साथ देऊ शकतात? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील लेखात पाहू.