महान कुंभाराकडून आकार मिळवण्यास तुम्ही तयार का?
“पाहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहा.”—यिर्म. १८:६.
१, २. दानीएल देवासाठी ‘परमप्रिय पुरुष’ का होता, आणि आपण दानीएलासारखे आज्ञाधारक कसे राहू शकतो?
बाबेल शहर मूर्तींनी भरलेलं होतं. तिथले लोक दुरात्म्यांची उपासना करायचे. आणि अशाच शहरात यहूदी लोकांना कैद करून नेण्यात आलं होतं. पण अशा परिस्थितीतही दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांसारख्या काही विश्वासू यहुद्यांनी बाबेलच्या लोकांचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. (दानी. १:६, ८, १२; ३:१६-१८) दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांनी यहोवाला आपला कुंभार म्हणून स्वीकारलं होतं आणि ते केवळ त्याचीच उपासना करत राहिले. बाबेलसारख्या खराब शहरात बरीच वर्षं राहूनसुद्धा दानीएलाने स्वतःवर वाईट प्रभाव पडू दिला नाही. म्हणून एका देवदूताने त्याला म्हटलं की तो देवासाठी ‘परमप्रिय पुरुष’ आहे.—दानी. १०:११, १९.
२ बायबलच्या काळातही कुंभार आपल्या शक्तीचा वापर करून मातीला आकार द्यायचे. विश्वाचा सर्वोच्च अधिकारी या नात्यानं यहोवाला राष्ट्रांना आणि लोकांना आकार देण्याचा अधिकार आहे, हे त्याच्या खऱ्या उपासकांना माहीत आहे. (यिर्मया १८:६ वाचा.) पण, अधिकार असूनही यहोवा आपल्या शक्तीचा वापर करून कोणालाही बदल करण्याची जबरदस्ती करत नाही. याउलट, त्याच्याकडून आकार मिळवण्याची आपली स्वतःची इच्छा असावी असं त्याला वाटतं. आपण देवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे कसे राहू शकतो याबद्दल या लेखात सांगण्यात आलं आहे. यासाठी आपण पुढील तीन प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: (१) यहोवाचे सल्ले नाकारून तुम्ही निरुपयोगी माती बनण्याचं कसं टाळू शकतो? (२) यहोवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे बनण्यासाठी आणि त्याच्या आज्ञेत राहण्यासाठी मदत करतील असे गुण आपण कसे विकसित करू शकतो? आणि, (३) मुलांना आकार देताना ख्रिस्ती पालक कशा प्रकारे यहोवाच्या सोबत काम करू शकतात?
अंतःकरण कठीण होईल अशा प्रकारची वृत्ती टाळा
३. कोणत्या वृत्तीमुळे आपलं अंतःकरण कठीण होऊ शकतं? उदाहरण द्या.
३ नीतिसूत्रे ४:२३ मध्ये म्हटलं आहे: “सर्व रक्षणीय वसतूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” आपलं अंतःकरण कठीण होऊ नये म्हणून आपण कशा प्रकारची वृत्ती टाळली पाहिजे? आपण गर्विष्ठपणा, पाप करण्याची वृत्ती आणि अविश्वासूपणा यांसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. याबाबतीत जर आपण खबरदारी बाळगली नाही, तर कदाचित आपण बंडखोर बनू आणि आज्ञा पाळण्यासही नकार देऊ. (दानी. ५:१, २०; इब्री ३:१३, १८, १९) यहूदाचा राजा उज्जीया याच्या बाबतीत हेच घडलं. (२ इतिहास २६:३-५, १६-२१ वाचा.) सुरवातीला उज्जीया आज्ञाधारक होता आणि यहोवासोबत त्याचा चांगला नातेसंबंध होता. म्हणून यहोवाने त्याला सामर्थ्य दिलं. पण, जेव्हा “तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत होऊन तो बिघडला.” तो इतका गर्विष्ठ झाला की मंदिरात जाऊन धूप जाळण्याचं जे काम फक्त याजकांनी करायचं होतं, ते करण्याचा त्याने प्रयत्न केला. जेव्हा याजकांनी उज्जीयाला थांबवलं, तेव्हा तो त्यांच्यावर भयंकर रागावला. त्यामुळे यहोवाने या गर्विष्ठ राजाला शिक्षा दिली आणि तो मरेपर्यंत कोडी राहिला.—नीति. १६:१८.
४, ५. आपण जर गर्विष्ठपणा टाळला नाही तर काय होऊ शकतं? उदाहरण द्या.
४ आपणही जर गर्विष्ठपणा टाळला नाही, तर आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागू. आणि यामुळे कदाचित बायबलमधून आपल्याला जो सल्ला दिला जातो तोदेखील आपण स्वीकारणार नाही. (नीति. २९:१; रोम. १२:३) मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या जीम नावाच्या बांधवासोबत असंच झालं. मंडळीतील एका समस्येबद्दल चर्चा करताना इतर वडिलांच्या मतांशी तो सहमत नव्हता. जीम म्हणतो, “मी त्या बांधवांना सांगितलं की ते ही गोष्ट प्रेमळपणे हाताळत नाहीत, आणि असं म्हणून मी त्या सभेतून निघून गेलो.” याच्या जवळजवळ सहा महिन्यांनंतर जीम दुसऱ्या एका मंडळीत जाऊ लागला. पण तिथं त्याला वडील म्हणून नेमण्यात आलं नाही. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. आपलंच म्हणणं बरोबर आहे याची त्याला इतकी खात्री होती की त्याने यहोवाची सेवा करणं सोडून दिलं. आणि सत्यामध्ये तो दहा वर्षं अक्रियाशील राहिला. आता जीम म्हणतो, की “तेव्हा मी गर्विष्ठ होतो आणि त्यामुळे जे काही झालं त्यासाठी मी यहोवाला दोष लावत होतो. मंडळीतील बांधवांनी मला कितीतरी वर्षं भेट दिली आणि मदत करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची मदत स्वीकारण्यास तयार नव्हतो.”
५ जीम म्हणतो, “इतर जण कशा प्रकारे चुकीचं वागले याचाच मी विचार करत राहिलो.” या उदाहरणावरून आपल्याला समजतं की आपल्यात जर गर्विष्ठपणा असला, तर आपली चुकीची वागणूक बरोबरच आहे हे सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करतो. जेव्हा असं होतं तेव्हा देवाच्या हातात आपण मऊ मातीप्रमाणे ठरत नाही. (यिर्म. १७:९) एखाद्या बांधवाच्या किंवा बहिणीच्या वागण्या-बोलण्यातून तुम्ही कधी दुखावले गेले आहात का? किंवा एखादा बहुमान तुमच्याकडून काढून घेण्यात आल्यामुळे तुम्ही निराश झाला होता का? तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली होती? तुम्ही गर्विष्ठ वृत्ती बाळगली होती, की आपल्या बांधवांसोबत शांतीनं राहणं आणि यहोवाला एकनिष्ठ असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, याची जाणीव तुम्हाला होती?—स्तोत्र ११९:१६५; कलस्सैकर ३:१३ वाचा.
६. आपण पाप करत राहिलो तर काय होऊ शकतं?
६ एखादी व्यक्ती जेव्हा पाप करत राहते आणि इतरांपासून ते लपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा देवाकडून मिळणारा सल्ला स्वीकारणं तिला आणखी कठीण होतं. त्यामुळे, तिच्या हातून आणखी मोठी पापं घडू शकतात. एक बांधव म्हणतो की त्याच्या चुकीच्या वागणुकीचं काही काळानंतर त्याला काहीच वाटत नव्हतं. (उप. ८:११) दुसरा एक बांधव, ज्याला काही काळ पोर्नोग्राफी पाहण्याची सवय होती त्याने असं म्हटलं: “वडिलांची टीका करण्याची वृत्ती माझ्यात निर्माण होत होती हे मला जाणवलं.” त्याच्या या सवयीमुळे यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध बिघडला. तो काय करत आहे हे इतरांच्या लक्षात आलं आणि वडिलांकडून त्याला आवश्यक ती मदत पुरवली गेली. हे खरं आहे की अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सर्वच चुकतो. पण अशा वेळी देवाकडे क्षमा मागण्याऐवजी, आपण जर आपल्याला मदत करणाऱ्यांबद्दल टीकात्मक वृत्ती बाळगली किंवा आपल्या चुकीच्या वागणुकीबद्दल कारणं देण्याची वृत्ती बाळगली, तर आपलं अंतःकरण कठीण होऊ शकतं.
७, ८. (क) विश्वासाची कमी असल्यामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात, हे इस्राएली लोकांच्या उदाहरणावरून कसं दिसून येतं? (ख) आपण त्यावरून कोणता धडा शिकू शकतो?
७ यहोवाने इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवलं. त्यांनी त्याचे बरेच आश्चर्यकारक चमत्कारदेखील पाहिले. पण असं असूनही, वचन दिलेल्या देशाच्या अगदी जवळ असताना त्यांचं अंतःकरण कठीण झालं. कारण देवावर त्यांचा विश्वास नव्हता. यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी ते घाबरले आणि मोशेविरुद्ध तक्रार करू लागले. इतकंच नाही तर जिथं ते गुलाम म्हणून होते त्या इजिप्त देशात पुन्हा जाण्याचा विचारदेखील त्यांनी केला. यामुळे यहोवाला खूप दुःख झालं. तो म्हणाला: “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार?” (गण. १४:१-४, ११; स्तो. ७८:४०, ४१) या इस्राएली लोकांचं मन कठोर झाल्यामुळे आणि त्यांच्यात विश्वासाची कमी असल्यामुळे त्यांचा अरण्यातच मृत्यू झाला.
८ आज आपणदेखील नवीन जगाच्या अगदी उंबरठ्यावर आहोत आणि आपल्याही विश्वासाची परीक्षा होत आहे. त्यामुळे यहोवावर आपला विश्वास किती मजबूत आहे, हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. यासाठी मत्तय ६:३३ मध्ये येशूने जे म्हटलं त्याचं आपण परीक्षण करू शकतो. असं करताना आपण स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या निर्णयांवरून आणि मी जी ध्येयं ठेवली आहेत, त्यांवरून येशूच्या शब्दांवर खरोखरच माझा भरवसा आहे हे दिसून येतं का? जास्त पैसे कमवण्यासाठी मी सभा आणि प्रचारकार्य चुकवेल का? जर माझ्या कामाच्या ठिकाणी मला अधिकाधिक वेळ खर्च करण्याचा दबाव आला, तर मी काय करणार? मी या जगाचा स्वतःवर प्रभाव होऊ देईल का, किंवा मग त्यामुळे यहोवाची सेवा करण्याचं सोडून देईल का?’
९. आपण आपल्या विश्वासाचं परीक्षण करणं गरजेचं का आहे, आणि आपण ते कसं करू शकतो?
९ सोबती निवडण्याबद्दल, बहिष्कृत झालेल्यांसोबत सहवास ठेवण्याबद्दल किंवा मनोरंजनाबद्दल बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचं जर आपण पालन केलं नाही, तर आपलं अंतःकरण कठीण होऊ शकतं. तुमच्या बाबतीत जर असं घडू लागलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? अशा वेळी तुम्ही आपल्या विश्वासाचं लगेच परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. बायबल म्हणतं: “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा.” (२ करिंथ. १३:५) अगदी प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करा आणि आपली विचारसरणी सुधारण्यासाठी नियमित रीत्या देवाच्या वचनांचा वापर करा.
मऊ मातीप्रमाणे राहा
१०. यहोवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे राहण्यास आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
१० बायबल, ख्रिस्ती मंडळी आणि सेवाकार्य यांमुळे आपल्याला देवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे बनण्यास मदत होते. ज्या प्रकारे पाणी घातल्यानं माती मऊ होते, अगदी त्याच प्रकारे बायबलचं दररोज वाचन आणि त्यावर मनन केल्यामुळे आपलं अंतःकरण मऊ मातीप्रमाणे ठेवण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे आपल्याला आकार देणं यहोवाला शक्य होतं. यहोवाने इस्राएलच्या राजांना अशी आज्ञा दिली होती, की त्यांनी नियमशास्त्र लिहून काढावं आणि दररोज त्याचं वाचन करावं. (अनु. १७:१८, १९) तसंच, प्रेषितांनाही हे माहीत होतं की देवाच्या वचनांचं वाचन करून त्यावर मनन करणं सेवाकार्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या लिखाणांत त्यांनी इब्री शास्त्रवचनांच्या भागांचा शेकडो वेळा उल्लेख केला. तसंच, लोकांनीही शास्त्रवचनांचा वापर करावा असं उत्तेजन प्रचार करताना त्यांनी दिलं. (प्रे. कृत्ये १७:११) आज आपल्यालाही याची जाणीव आहे, की बायबलचं दररोज वाचन करून त्यावर मनन करणं खूप गरजेचं आहे. (१ तीम. ४:१५) यामुळे, नम्र राहण्यास आपल्याला मदत होते आणि आपल्याला आकार देणंही यहोवाला शक्य होतं.
११, १२. आपल्या गरजेनुसार आपल्याला आकार देण्यासाठी यहोवा ख्रिस्ती मंडळीचा कसा वापर करतो? उदाहरण द्या.
११ यहोवा आपल्या प्रत्येकाला अगदी चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि ख्रिस्ती मंडळीचा वापर करून तो आपल्या गरजेनुसार आपल्याला आकार देतो. आधी उल्लेख करण्यात आलेल्या जीम या बांधवाला मंडळीतील एका वडिलांनी मदत केली. त्यांनी त्याच्यात व्यक्तिगत आस्था घेतल्यामुळे, त्याला स्वतःच्या दृष्टिकोनात बदल करण्यास मदत झाली. यहोवाला दोष देता येणार नाही” आणि “यहोवाची सेवा निष्ठावंतपणे करा” हे लेख वाचल्यामुळेही त्याला मदत झाली.
जीम म्हणतो: “त्यांनी एकदाही मला दोष दिला नाही. माझ्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे असं ते एकदाही बोलले नाहीत. याउलट, त्यांनी माझ्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आणि मला मदत करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे हे सांगितलं.” याच्या जवळपास तीन महिन्यांनंतर त्या वडिलांनी जीमला सभेत येण्याचं आमंत्रण दिलं. जीम सांगतो की मंडळीतील बांधवांनी अगदी आनंदानं त्याचं स्वागत केलं आणि त्यांच्या प्रेमामुळे त्याला आपली विचारसरणी सुधारण्यास मदत झाली. त्याला हे जाणवलं की त्याचेच विचार आणि भावना सगळ्यात महत्त्वाच्या नाहीत. मंडळीतील वडिलांनी आणि त्याच्या पत्नीनं त्याला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे तो हळूहळू पुन्हा यहोवाकडे आला आणि त्याची सेवा करू लागला. तसंच, १ फेब्रुवारी १९९३ च्या टेहळणी बुरूज अंकातील “१२ काही काळानंतर, जीम पुन्हा एकदा मंडळीत वडील म्हणून सेवा करू लागला. तेव्हापासून त्याने इतर बांधवांना अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी मदत केली आहे. आधी त्याला वाटायचं की यहोवासोबत त्याचा नातेसंबंध अगदी जवळचा आहे, पण वास्तविकतेत तसं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं. जे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी, त्याने गर्विष्ठ वृत्ती दाखवून इतरांच्या चुकांवर जास्त लक्ष दिलं याबद्दल त्याला पस्तावा वाटतो.—१ करिंथ. १०:१२.
१३. सेवाकार्यामुळे आपल्याला कोणते गुण विकसित करण्यास मदत होते, आणि त्यामुळे कोणता फायदा होतो?
१३ सेवाकार्याद्वारेही यहोवा आपल्याला आकार देतो आणि एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतो. ते कसं? आपण जेव्हा इतरांना सुवार्ता सांगतो, तेव्हा नम्रता विकसित करण्यास आणि पवित्र आत्म्याच्या फळाचे इतर पैलू आत्मसात करण्यास आपल्याला मदत होते. (गलती. ५:२२, २३) सेवाकार्यामुळे तुम्हाला कोणते चांगले गुण विकसित करण्यासाठी मदत झाली आहे त्याचा विचार करा. आपण जेव्हा ख्रिस्ताचं अनुकरण करतो तेव्हा लोक आपल्याकडे आणि आपल्या संदेशाकडे आकर्षित होतात. तसंच, आपल्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन असलेल्यांपैकी काहींचा दृष्टिकोनही बदलतो. एक उदाहरण लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियामध्ये दोन साक्षीदार घरोघरच्या प्रचारकार्यात एका स्त्रीला भेटले. तेव्हा ती स्त्री त्यांच्यावर रागावली आणि त्यांच्याशी अगदी उद्धटपणे वागली. पण, साक्षीदारांनी मात्र तिचं अगदी शांतपणे ऐकून घेतलं. नंतर, त्या स्त्रीला स्वतःच्या वागणुकीबद्दल वाईट वाटलं. म्हणून तिने शाखा कार्यालयाला एक पत्र लिहिलं आणि आपल्या वाईट वागणुकीबद्दल क्षमा मागितली. तिने लिहिलं: “मी खरंच किती मूर्खपणे वागले. देवाचं वचन सांगणाऱ्या त्या दोन लोकांना मी दारात उभंसुद्धा केलं नाही. त्यांना लगेच घालवून दिलं.” या उदाहरणावरून हेच दिसून येतं, की प्रचार करताना नम्रता दाखवून शांत राहणं खरंच खूप फायद्याचं आहे. आपण करत असलेल्या सेवाकार्यातून इतरांना तर फायदा होतोच, पण त्याच वेळी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासही आपल्याला मदत होते.
मुलांना आकार देताना पालकांनी देवासोबत काम करणं गरजेचं आहे
१४. आपल्या मुलांना आकार देण्यात यशस्वी व्हायचं असेल तर पालकांनी काय करण्याची गरज आहे?
१४ बहुतेक लहान मुलं नम्र असतात आणि शिकून घेण्यास उत्सुक असतात. (मत्त. १८:१-४) त्यामुळे, मुलं लहान असतानाच आईवडिलांनी त्यांना बायबलचं सत्य आणि त्यावर प्रेम करण्यास शिकवलं पाहिजे. (२ तीम. ३:१४, १५) पण, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आईवडील स्वतः सत्यावर प्रेम करत असतील आणि बायबलमधील मार्गदर्शन स्वतःच्या जीवनात लागू करत असतील. त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मुलंही सत्यावर प्रेम करायचं शिकतील. तसंच, मुलांना हेदेखील कळेल की पालक जेव्हा त्यांना शिस्त लावतात, तेव्हा खरंतर तो त्यांच्या आणि यहोवाच्या प्रेमाचाच पुरावा असतो.
१५, १६. जेव्हा मुलाला किंवा मुलीला बहिष्कृत करण्यात येतं, तेव्हा देवावर विश्वास असल्याचं आईवडील कसं दाखवू शकतात?
१५ पण, मुलांना सत्यावर प्रेम करण्याचं शिकवूनसुद्धा, काही मुलं यहोवापासून दूर जातात किंवा काही कारणांमुळे त्यांना बहिष्कृत करण्याची गरज पडते. ज्या कुटुंबात असं घडतं त्यांच्यासाठी हे खूपच दुःखदायक असतं. दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणारी एक बहीण म्हणते: “माझ्या भावाला बहिष्कृत करण्यात आलं, तेव्हा ते आमच्यासाठी जणू त्याचा मृत्यू झाल्यासारखंच होतं. ते सहन करणं खरंच खूप कठीण होतं.” पण मग, अशा वेळी तिने आणि तिच्या आईवडिलांनी काय केलं? त्यांनी बायबलमधील सल्ला लागू केला. (१ करिंथकर ५:११, १३ वाचा.) तिच्या आईवडिलांना हे माहीत होतं की देवाच्या आज्ञेत राहणं सगळ्यांच्या भल्याकरताच आहे. तसंच त्यांना याचीही जाणीव होती, की एखाद्याला बहिष्कृत करणं ही यहोवाकडून प्रेमळपणे मिळणारी शिस्त आहे. याच कारणामुळे, अगदीच गरजेचं असल्याशिवाय त्यांनी त्याच्यासोबत कोणताही संबंध ठेवला नाही.
१६ मग याबद्दल मुलाला कसं वाटलं? त्याने नंतर म्हटलं: “मला माहीत होतं की माझ्या कुटुंबातील सदस्य माझा द्वेष करत नाहीत, तर ते केवळ यहोवाच्या आणि त्याच्या संघटनेच्या आज्ञांचं पालन करत आहेत.” त्याने असंही म्हटलं, की जेव्हा त्याच्या जीवनात एखादी गंभीर समस्या यायची, तेव्हा मदतीकरता तो फक्त यहोवाकडेच पाहू शकत होता. आणि अशा वेळी त्याला जाणवलं की त्याला यहोवाची खरंच किती गरज आहे. जेव्हा हा मुलगा यहोवाकडे परत आला, तेव्हा त्याच्या कुटुंबाला किती आनंद झाला असले याची कल्पना तुम्ही करू शकता का? आपणही नेहमी देवाच्या आज्ञेत राहिल्यास, आनंदी राहणं आणि यशस्वी होणं आपल्याला शक्य होईल.—नीति. ३:५, ६; २८:२६.
१७. आपण नेहमी यहोवाच्या आज्ञेत का राहिलं पाहिजे, आणि यामुळे आपल्याला काय फायदा होईल?
१७ यशया संदेष्ट्याने अशी भविष्यवाणी केली होती, की बाबेलमध्ये असलेले यहूदी पश्चात्ताप करतील आणि म्हणतील: “हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहो.” ते यहोवाला अशीही विनंती करतील: “आमचा अधर्म सदा स्मरू नको, पाहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवतो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहो.” (यश. ६४:८, ९) आपण जेव्हा नम्र होऊन नेहमी यहोवाच्या आज्ञेत राहतो, तेव्हा त्याच्या नजरेत आपणही दानीएलाप्रमाणेच परमप्रिय ठरतो. यहोवा त्याच्या वचनाचा, पवित्र आत्म्याचा आणि संघटनेचा वापर करून नेहमी आपल्याला आकार देत राहील. त्यामुळे भविष्यात आपल्याला त्याची परिपूर्ण मुलं होणं शक्य होईल.—रोम. ८:२१.