व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे”

“यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे”

“हे इस्राएला, ऐक, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे.”—अनु. ६:४, पं.र.भा.

गीत क्रमांक: १, 

१, २. (क) अनुवाद ६:४ या वचनातील शब्द आज बऱ्याच लोकांना का माहीत आहेत? (ख) मोशेने हे शब्द का वापरले?

शेकडो वर्षांपासून यहुदी लोक अनुवाद ६:४ या वचनातील शब्द एका खास प्रार्थनेमध्ये वापरत आहेत. या प्रार्थनेला ‘शेमा’ असं म्हणतात. हिब्रू भाषेत या वचनातील पहिला शब्द ‘शेमा’ आहे ज्याचा अर्थ ‘ऐक’ असा होतो. देवाला आपण पूर्णपणे एकनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी बरेच यहुदी दररोज सकाळी व संध्याकाळी ही प्रार्थना करतात.

मोशेने आपल्या मृत्यूपूर्वी इस्राएली लोकांना जे शेवटचं भाषण दिलं, त्यात त्याने या शब्दांचा वापर केला होता. इ.स.पू. १४७३ या साली इस्राएली लोक मवाब देशात होते. आणि यार्देन नदी पार करून ते आता वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. (अनु. ६:१) मोशेने इस्राएली लोकांचं ४० वर्षं नेतृत्व केलं होतं आणि पुढे येणाऱ्या समस्यांचा त्यांनी धैर्यानं सामना करावा अशी त्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवण्याची गरज होती. तसंच त्यांनी यहोवाला एकनिष्ठ राहणंदेखील खूप गरजेचं होतं. मोशेच्या शब्दांमुळे त्यांना या गोष्टी करण्यास मदत मिळाली. मोशेने दहा आज्ञा आणि यहोवाच्या इतर नियमांचा उल्लेख केल्यानंतर, इस्राएली लोकांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्याचा आर्जव केला. ती गोष्ट आपल्याला अनुवाद ६:४, ५ (वाचा.) [1] या वचनांत वाचायला मिळते.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवा देव हा “एकच यहोवा” आहे ही गोष्ट इस्राएली लोकांना माहीत होती. विश्वासू इस्राएली त्यांच्या पूर्वजांच्या देवाची, अर्थात फक्त यहोवा देवाचीच उपासना करायचे. तर मग यहोवा त्यांचा देव “एकच यहोवा” आहे या गोष्टीची मोशेला त्यांना आठवण करून द्यायची काय गरज होती? तसंच, या गोष्टीत आणि देवावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करण्यात काय संबंध आहे? अनुवाद ६:४, ५ या वचनांतील शब्द आज आपल्याला कसे लागू होतात?

आपला देव “एकच यहोवा” आहे

४, ५. (क) “एकच यहोवा” या शब्दांचा एक अर्थ काय आहे? (ख) यहोवा इतर राष्ट्रांच्या दैवतांपेक्षा कसा वेगळा आहे?

एकमात्र. “एकच यहोवा” या शब्दांवरून आपल्याला कळतं की यहोवा हा एकमात्र देव आहे. त्याच्यासारखा किंवा त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीच नाही. मोशेला या शब्दांवरून काय सांगायचं होतं? या ठिकाणी मोशेला त्रैक्याची शिकवण चुकीची आहे हे सिद्ध करायचं नव्हतं. तर यहोवा हा स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता आहे आणि तो संपूर्ण विश्वाचा अधिकारी आहे, हे त्याला सांगायचं होतं. तो एकच खरा देव आहे आणि त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीच देव नाही हे तो या ठिकाणी सांगत होता. (२ शमु. ७:२२) मोशेच्या शब्दांमुळे इस्राएली लोकांना या गोष्टीची नेहमी आठवण होणार होती की त्यांनी फक्त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला राहणारे विदेशी लोक बऱ्याच खोट्या देवी-देवतांची उपासना करायचे. त्यामुळे त्यांनी अशा लोकांपासून दूर राहण्याची गरज होती. या विदेशी लोकांचा असा विश्वास होता की त्यांचे देव निसर्गाच्या शक्तींवर नियंत्रण ठेवतात.

उदाहरणार्थ, इजिप्तमध्ये राहणारे लोक ‘रा’ नावाच्या सूर्यदेवाची, ‘नट’ नावाच्या आकाशाच्या देवीची, ‘गेब’ नावाच्या पृथ्वीच्या देवाची उपासना करायचे. तसंच ते ‘हापी’ नावाच्या नाईल नदीच्या देवाची आणि बऱ्याच जनावरांचीसुद्धा उपासना करायचे. पण इजिप्तवर दहा पीडा आणून यहोवाने दाखवून दिलं की तो या खोट्या देवतांपेक्षा खूप शक्तिशाली आहे. कनानी लोकांचा मुख्य दैवत बआल होता. ते असं मानायचे की त्यानेच जीवन अस्तित्वात आणलं आहे. तसंच हा बआल आकाश, पाऊस आणि वादळ यांचादेखील देव आहे असाही विश्वास ते करायचे. बऱ्याच ठिकाणी लोक सुरक्षेसाठी बआलाची उपासना करायचे. (गण. २५:३) पण इस्राएली लोकांना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची होती की केवळ त्यांचा देव यहोवा हाच एकमात्र खरा देव आहे.—अनु. ४:३५, ३९.

६, ७. “एकच” या शब्दाचा आणखी कोणता अर्थ आहे, आणि यहोवा या शब्दाला कसा जागला?

कधीही न बदलणारा आणि एकनिष्ठ. “एकच” या शब्दावरून आपल्याला आणखी एक गोष्ट समजते. ती म्हणजे यहोवाचा उद्देश आणि त्याची कार्ये यांवर आपण नेहमी भरवसा ठेवू शकतो. यहोवा देवाची कधीही द्विधा मनःस्थिती होत नाही किंवा तो त्याचा उद्देश बदलत राहत नाही. तो विश्वासू, कधीही न बदलणारा, एकनिष्ठ आणि खरा देव आहे. उदाहरणार्थ, यहोवाने अब्राहामाला वचन दिलं होतं की त्याची संतती वचन दिलेल्या देशात राहील. आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी यहोवाने बरीच मोठमोठी आश्चर्यकर्मे केली. यहोवाने हे वचन दिलं त्याच्या चारशे तीस वर्षांनंतरही त्याने आपला उद्देश बदलला नव्हता.—उत्प. १२:१, २, ७; निर्ग. १२:४०, ४१.

या घटनेच्या शेकडो वर्षांनंतर यहोवाने इस्राएली लोकांना त्याचे साक्षीदार असं संबोधलं आणि त्यांना सांगितलं: “मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही.” तसंच, “येथून पुढेही मीच तो आहे” या शब्दांवरूनही यहोवाने हे अगदी स्पष्ट केलं की तो त्याचा उद्देश कधीच बदलणार नाही. (यश. ४३:१०, १३; ४४:६; ४८:१२) खरंच, कधीही न बदलणाऱ्या आणि एका विश्वासू देवाची उपासना करण्याचा किती मोठा बहुमान इस्राएली लोकांना मिळाला होता! आज आपल्यालाही यहोवाने तोच सन्मान दिला आहे.—मला. ३:६; याको. १:१७.

८, ९. (क) यहोवा आपल्या उपासकांकडून काय अपेक्षा करतो? (ख) मोशेच्या शब्दांच्या महत्त्वावर येशूने कसा जोर दिला?

मोशेने इस्राएली लोकांना याची आठवण करून दिली की यहोवाचं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम कधीही बदलणार नाही आणि तो त्यांची नेहमी काळजी घेत राहील. यहोवा इस्राएली लोकांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्याने अपेक्षा केली की त्यांनीसुद्धा फक्त त्याचीच एकनिष्ठपणे उपासना करावी. तसंच त्यांनी पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने त्याची सेवा करावी. इस्राएलमधील पालकांना प्रत्येक संधीचा वापर करून आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवायचं होतं. यामुळे त्यांची मुलंदेखील जीवनात फक्त यहोवाचीच उपासना करायला शिकणार होती.—अनु. ६:६-९.

यहोवा आपला उद्देश कधीही बदलत नाही. त्यामुळे खऱ्या उपासकांकडून तो ज्या मूलभूत अपेक्षा करतो त्यादेखील तो कधीही बदलणार नाही. आपल्या उपासनेमुळे यहोवाचं मन आनंदित व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याची एकनिष्ठपणे उपासना केली पाहिजे. तसंच आपण पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. येशूने म्हटलं की हीच सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे. (मार्क १२:२८-३१ वाचा.) “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे” यावर आपला विश्वास असल्याचं आपण आपल्या कार्यांतून कसं दाखवू शकतो, हे आता आपण पाहू या.

एकनिष्ठेने यहोवाची उपासना करा

१०, ११. (क) आपण फक्त यहोवाचीच उपासना का करतो? (ख) बाबेलमधील तीन इब्री तरुणांनी यहोवाप्रती एकनिष्ठा कशी दाखवली?

१० आपल्यासाठी यहोवा हाच एकमेव देव आहे. आपण जेव्हा फक्त त्याचीच उपासना करतो तेव्हा आपण त्याला एकनिष्ठ आहोत हे दिसून येतं. आपण कधीही इतर देवतांची उपासना करू नये किंवा खोट्या धर्मातील प्रथा शुद्ध उपासनेत आणू नये. यहोवा असा देव नाही जो फक्त इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ किंवा शक्तिशाली आहे, तर केवळ तोच खरा देव आहे. आणि आपण फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे.—प्रकटीकरण ४:११ वाचा.

११ दानीएलाच्या पुस्तकात आपल्याला हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या या तरुणांबद्दल वाचायला मिळतं. यहोवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या अन्नाचं सेवन करण्यास नकार देऊन त्यांनी यहोवाप्रती आपली एकनिष्ठा दाखवली. तसंच त्यांनी नबुखद्‌नेस्सरच्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत करण्यासदेखील नकार दिला. त्यांच्या जीवनात यहोवाला पहिलं स्थान होतं. ते त्याला पूर्णपणे एकनिष्ठ होते.—दानी. २:१–३:३०.

१२. यहोवाची एकनिष्ठपणे उपासना करताना, आपण कोणत्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे?

१२ यहोवाला आपल्या जीवनात नेहमी पहिलं स्थान असलं पाहिजे. आपल्याला जर त्याला पूर्णपणे एकनिष्ठ राहायचं असेल, तर दुसरी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात पहिल्या स्थानी येणार नाही याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे. अशा कोणत्या काही गोष्टी असू शकतात? दहा आज्ञांमधील एक आज्ञा अशी होती की यहोवाच्या उपासकांनी इतर देवांची उपासना करू नये. त्यांना सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेपासून दूर राहायचं होतं. (अनु. ५:६-१०) आज जगात मूर्तिपूजेचे बरेच प्रकार आहेत, आणि यांपैकी काही तर लगेच लक्षातदेखील येत नाहीत. मूर्तिपूजेबद्दल यहोवाचा नियम आजही बदललेला नाही. तो आजही “एकच यहोवा” आहे. त्यामुळे आजच्या काळात आपण मूर्तिपूजा कशी टाळू शकतो याबद्दल आता आपण पाहू या.

१३. कोणत्या गोष्टी आपल्याला यहोवापेक्षा जास्त प्रिय वाटू शकतात?

१३ यहोवासोबतची आपली मैत्री कोणत्या गोष्टींमुळे तुटू शकते याबद्दल आपल्याला कलस्सैकर ३:५ (वाचा.) या वचनात वाचायला मिळतं. या ठिकाणी लोभाची तुलना मूर्तिपूजेशी करण्यात आली आहे. ही तुलना योग्य आहे असं का म्हणता येईल? कारण आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्याची खूप उत्कट इच्छा असली, तर या गोष्टी आपल्या जीवनाला नियंत्रित करू शकतात. जसं की खूप पैसा किंवा ऐशआरामाचं जीवन. या गोष्टी एखाद्या शक्तिशाली देवासारखंच आपल्या जीवनात कार्य करतात. कलस्सैकर ३:५ या वचनात सांगण्यात आलेले सर्व पाप लोभाशी संबंधित आहेत. आणि लोभ ही एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे. त्यामुळे आपल्याला जर या गोष्टी मिळवण्याची उत्कट इच्छा असली, तर मग आपण या गोष्टींवर देवापेक्षा जास्त प्रेम करू लागू. असं जर झालं तर मग यहोवा आपल्यासाठी “एकच यहोवा” आहे असं आपण म्हणू शकणार नाही. आणि तसं व्हावं अशी आपल्यापैकी कोणाचीच इच्छा नाही.

१४. प्रेषित योहानाने कोणता इशारा दिला?

१४ प्रेषित योहानानेसुद्धा अशाच गोष्टींवर जोर दिला. त्याने इशारा दिला की जर कोणी “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी” यांसारख्या जगातील गोष्टींवर प्रेम केलं, तर मग “त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.” (१ योहा. २:१५, १६) त्यामुळे आपण वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ‘मी जगातील गोष्टींवर प्रेम करू लागलो आहे का?’ हा प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारायला हवा. आत्मपरीक्षण केल्यावर कदाचित आपल्याला जाणवेल की जगातील मनोरंजन, लोक आणि फॅशन या गोष्टी आपल्याला आवडू लागल्या आहेत. किंवा मग, उच्च शिक्षण घेऊन ‘मोठ्या गोष्टी’ साध्य करायची इच्छा कदाचित आपल्या मनात निर्माण झाली आहे. (यिर्म. ४५:४, ५) आपण नवीन जगाच्या उंबरठ्यावर आहोत हे नेहमी लक्षात असू द्या. आपण स्वतःला मोशेच्या शब्दांची आठवण करून दिली पाहिजे. “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे” या गोष्टीवर जर आपला पूर्ण भरवसा असेल, तर मग आपण त्याला एकनिष्ठ राहू आणि त्याला मान्य असलेल्या पद्धतीनंच त्याची उपासना करू.—इब्री १२:२८, २९.

ख्रिस्ती एकता टिकवून ठेवा

१५. आपला देव ‘एकच यहोवा’ आहे या गोष्टीची आठवण पौलाने का करून दिली?

१५ “एकच यहोवा” या शब्दांवरून आपल्याला आणखी एक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे आपल्या सर्व उपासकांनी एकतेनं राहावं आणि त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश असावा अशी यहोवाची इच्छा आहे. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत वेगवेगळ्या राष्ट्रांमधून आलेले लोक होते. जसं की यहुदी, ग्रीक, रोमी आणि इतर देशांतील लोक. त्यांची पार्श्वभूमी, चालीरीती आणि त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. यामुळे काहींना उपासनेची नवीन पद्धत स्वीकारण्यास किंवा त्यांच्या जुन्या प्रथा सोडण्यास कठीण गेलं. पौलाने ही गोष्ट पाहिली आणि ख्रिश्चनांना आठवण करून दिली की आपल्या सर्वांचा देव एकच यहोवा आहे.—१ करिंथकर ८:५, ६ वाचा.

१६, १७. (क) आपल्या दिवसांत कोणती भविष्यवाणी पूर्ण होत आहे आणि त्याचे काय परिणाम झाले आहेत? (ख) आपली ख्रिस्ती एकता कशामुळे धोक्यात येऊ शकते?

१६ आजच्या ख्रिस्ती मंडळीबद्दल काय? यशया संदेष्ट्याने म्हटलं: “शेवटल्या दिवसांत असे होईल” की सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतील आणि म्हणतील, “तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यश. २:२, ३) आज ही भविष्यवाणी पूर्ण होत असताना पाहून आपल्याला खरंच खूप आनंद होतो! आपले बंधुभगिनी वेगवेगळ्या ठिकाणांहून आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे आणि त्यांची संस्कृतीदेखील वेगळी आहे. असं असलं तरी आपण सर्व एकतेनं यहोवाची उपासना करतो. पण कधीकधी आपल्यामध्ये असलेल्या या विविधतेमुळे काही समस्यादेखील उद्‌भवू शकतात.

मंडळीच्या एकतेला तुम्ही हातभार लावत आहात का? (परिच्छेद १६-१९ पाहा)

१७ उदाहरणार्थ, अशा बंधुभगिनींबद्दल आपण काय विचार करतो जे वेगळ्या संस्कृतीतून आहेत? त्यांची भाषा, पेहराव, त्यांच्या सवयी आणि खाणंपिणं आपल्यापेक्षा कदाचित खूप वेगळं असेल. अशा बंधुभगिनींसोबत तुम्ही मैत्री करायचं टाळत का? तुम्ही फक्त अशाच बांधवांसोबत वेळ घालवता का ज्यांच्या आवडीनिवडी तुमच्यासारख्या आहेत? तसंच तुमच्या मंडळीतील वडिलांबद्दल काय? तुमच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या किंवा मग एखाद्या दुसऱ्या देशातून किंवा संस्कृतीतून आलेल्या वडिलांबद्दल तुम्ही कसा विचार करता? आपण जर खबरदारी बाळगली नाही तर आपल्यामध्ये असलेल्या या विविधतेला आपण नकारात्मक दृष्टीने बघू शकतो. आणि यामुळे मंडळीची एकता धोक्यात येऊ शकते.

१८, १९. (क) इफिसकर ४:१-३ या वचनांत कोणता सल्ला देण्यात आला आहे? (ख) मंडळीतील एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?

१८ आपण हे चुकीचे विचार कसे टाळू शकतो? इफिसमध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांना पौलाने एक व्यावहारिक सल्ला दिला. या शहरातील लोक खूप श्रीमंत होते आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले होते. (इफिसकर ४:१-३ वाचा.) त्यांनी नम्रता, सौम्यता, धीर आणि प्रेम यांसारखे गुण दाखवावेत असं पौलाने सांगितलं. हे गुण एखाद्या घराला मजबूत ठेवणाऱ्या पायासारखे आहेत. पण केवळ मजबूत पाया असणंच पुरेसं नसतं, तर घराला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी परिश्रम घेत राहण्याचीही गरज असते. त्यामुळे इफिसमधील ख्रिश्चनांनी “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम घेत राहावेत अशी पौलाची इच्छा होती.

१९ मंडळीत एकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. हे आपण कसं करू शकतो? सर्वात आधी, आपण पौलाने उल्लेख केलेले गुण म्हणजे नम्रता, सौम्यता, धीर आणि प्रेम हे विकसित केले पाहिजेत. मग, “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य” टिकवून ठेवण्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजेत. जशा भिंतीला भेगा पडतात तशाच गैरसमजुतींमुळे आपल्या एकतेला भेगा पडू शकतात. आपण वेळीच अशा गैरसमजुती दूर करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्यामध्ये एकता आणि शांती टिकून राहील.

२०. “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे” या शब्दांचा अर्थ आपल्याला समजला आहे, हे कशावरून दिसून येईल?

२० “यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे,” हे शब्द खरंच किती अर्थपूर्ण आहेत! वचन दिलेला देश काबीज करताना इस्राएली लोकांपुढे जेव्हा समस्या आल्या तेव्हा या शब्दांमुळे त्यांना धैर्य मिळालं. आज आपल्यालाही या शब्दांवरून धैर्य मिळू शकतं. या धैर्यामुळे आपल्याला मोठं संकट पार करून नवीन जगात जाण्यास मदत होईल. आपण नेहमी यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करू या. आपण पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याची सेवा करत राहिली पाहिजे. तसंच, आपल्या बंधुभगिनींसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण परिश्रम घेत राहिले पाहिजेत. आपण जर या गोष्टी करत राहिलो तर येशू आपला न्याय नीतिमान म्हणून करेल आणि म्हणेल: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”—मत्त. २५:३४.

^ [१] (परिच्छेद २) अनुवाद ६:४, ५ (पं.र.भा.): “हे इस्राएला, ऐक, यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे. तर तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर.”