व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा “तुमची काळजी घेतो”

यहोवा “तुमची काळजी घेतो”

यहोवा आपली काळजी घेतो हे आपण खात्रीनं म्हणू शकतो का? हो नक्कीच. याचं एक कारण म्हणजे बायबलमध्ये तसं स्पष्टपणे लिहिलं आहे. पहिले पेत्र ५:७ म्हणतं: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” मग, यहोवा देव आपली काळजी घेतो आणि आपल्यामध्ये वैयक्तिक आस्था दाखवतो, याचे काही पुरावे आहेत का?

यहोवा भौतिक गरजा पुरवतो

प्रेम आणि उदारता दाखवण्यात यहोवाने उत्तम उदाहरण मांडलं आहे

आपल्या अगदी जिवलग मित्रांमध्ये आपण जे गुण पाहतो, अगदी तसेच गुण यहोवा देवदेखील दाखवतो. जिवलग मित्र एकमेकांना प्रेमानं व दयेनं वागवतात. तसंच ते उदारतादेखील दाखवतात. आपल्या रोजच्या जीवनात आपण पाहू शकतो की यहोवादेखील लोकांवर दया करतो आणि उदारतेनं देतो. एक उदाहरण घ्या. बायबल म्हणतं की, यहोवा “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.” (मत्त. ५:४५) यांमुळे काय साध्य होतं? या गोष्टींद्वारे यहोवा लोकांना “अन्नाने व हर्षाने . . . मन भरून तृप्त” करतो. (प्रे. कृत्ये १४:१७) जमीनीतून आपल्याला भरपूर पीक मिळावं याकडे यहोवा लक्ष देतो, आणि आनंद करण्यासाठी चविष्ट अन्नासारखी आणखी दुसरी कोणती गोष्ट असू शकते?

पण मग आजही अनेक लोक उपासमारीचे शिकार होत आहेत, असं का? कारण, मानवी शासक बहुतेक वेळा राजकीय सत्ता आणि नफा मिळवण्याच्याच मागे असतात. सामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. परंतु लवकरच यहोवा देव या समस्येचा अंत करेल. तो या लोभी शासकांना काढून टाकेल आणि त्याचं राज्य या पृथ्वीवर स्थापन करेल. या राज्याचा राजा त्याचा एकुलता एक पुत्र असेल. त्याच्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही. पण तोपर्यंत, आपल्या सर्व सेवकांचं पालनपोषण करण्याचं अभिवचन यहोवाने दिलं आहे. (स्तो. ३७:२५) यावरून यहोवा आपली काळजी घेतो हेच दिसून येत नाही का?

वेळ देण्याबाबतीत यहोवा उदार आहे

उदारतेनं वेळ देण्यात यहोवाने उत्तम उदाहरण मांडलं आहे

जिवलग मित्र नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवतात. आपल्या आवडीच्या विषयांवर ते तास न्‌ तास बोलतात. आणि जेव्हा त्यातील एखादा त्याची काळजी किंवा चिंता व्यक्त करतो, तेव्हा दुसरा लक्षपूर्वक ऐकतो. मग यहोवादेखील आपलं लक्षपूर्वक ऐकतो का? हो, आपल्या प्रार्थना तो लक्षपूर्वक ऐकतो. त्यामुळेच बायबल आपल्याला “प्रार्थनेत तत्पर” राहण्यास, इतकंच नाही तर “निरंतर प्रार्थना” करण्यास आर्जवते.—रोम. १२:१२; १ थेस्सलनी. ५:१७.

आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी यहोवा किती वेळ खर्च करण्यास तयार आहे? बायबलमधील एक उदाहरण आपल्याला या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यास मदत करतं. प्रेषितांची निवड करण्याआधी येशू “प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.” (लूक ६:१२) या प्रार्थनेत कदाचित येशूने शिष्यांच्या नावांचा उल्लेख केला असावा. प्रत्येकाचे चांगले गुण आणि त्यांच्यामध्ये असलेल्या उणिवा त्याने प्रार्थनेत मांडल्या असतील. आणि त्यांच्यामधून प्रेषितांची निवड करण्यासाठी त्याच्या स्वर्गीय पित्याकडे मदत मागितली असेल. संपूर्ण रात्र प्रार्थना केल्यानंतर, प्रेषित म्हणून कोण योग्य आहे हे येशूला सकाळपर्यंत समजलं. ‘प्रार्थना ऐकणारा’ या नात्यानं यहोवा प्रामाणिकपणे केलेल्या प्रार्थना ऐकण्यास नेहमी तयार असतो. (स्तो. ६५:२) चिंता किंवा काळजी वाटणाऱ्या विषयावर एखाद्या व्यक्तीने कित्येक तास जरी प्रार्थना केली, तरी यहोवा ती ऐकतो; तो वेळ मोजत बसत नाही.

यहोवा क्षमा करण्यास तयार असतो

क्षमा करण्यात यहोवाने उत्तम उदाहरण मांडलं आहे

कधीकधी अगदी जिवलग मित्रदेखील झालेल्या चुकांबद्दल एकमेकांना क्षमा करण्यास तयार नसतात. एकमेकांना क्षमा करणं काहींना इतकं कठीण जातं की त्यामुळे ते आपली वर्षानुवर्षांची मैत्रीदेखील तोडतात. परंतु, यहोवा देव तसा नाही. प्रत्येक पश्‍चात्तापी व्यक्तीला बायबल यहोवाकडे क्षमा मागण्यासाठी आर्जवतं. कारण यहोवा “त्याला भरपूर क्षमा करेल,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (यश. ५५:६, ७) पण यहोवा कोणत्या कारणामुळे असं करतो?

त्याचं आपल्यावर अपार प्रेम असल्यामुळे तो असं करतो. यहोवाने जगावर एवढी प्रीती केली की, मानवजातीला पाप आणि त्याच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी त्याने आपला पुत्र दिला. (योहा. ३:१६) पण येशू ख्रिस्ताच्या या खंडणी बलिदानामुळे आणखी एक गोष्ट शक्य झाली. ती म्हणजे या खंडणीच्या आधारावर यहोवा अशा लोकांना पूर्णपणे क्षमा करतो, ज्यांच्यावर त्याचं प्रेम आहे. प्रेषित योहानाने असं लिहिलं: “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल.” (१ योहा. १:९) यहोवा क्षमा करणारा आहे, आणि त्यामुळे मानव त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवू शकतात. यहोवाला आपली काळजी आहे म्हणून तो आपल्याला क्षमा करतो, ही गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्श करून जात नाही का?

गरजेच्या वेळी यहोवा मदतीला धावून येतो

गरजेच्या वेळी मदत करण्यात यहोवाने उत्तम उदाहरण मांडलं आहे

जिवलग मित्र गरजेच्या वेळी मदतीसाठी धावून येतात. मग यहोवादेखील मदतीसाठी धावून येतो का? त्याचं वचन काय म्हणतं ते पाहा. “तो [देवाचा एखादा सेवक] पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल.” (स्तो. ३७:२४) यहोवा त्याच्या सेवकांना वेगवेगळ्या मार्गांनी ‘सावरतो.’ सेंट क्वा या कॅरिबियन बेटावर राहणाऱ्या एका लहान मुलीचा अनुभव लक्षात घ्या.

आपल्या धार्मिक विश्वासामुळे या लहान मुलीने शाळेत झेंडावंदन करण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या वर्गातील सोबत्यांनी तिच्यावर तसं करण्याचा दबाव आणला. यहोवाकडे प्रार्थनेत याविषयी बोलल्यानंतर तिने या गोष्टीला तोंड देण्याचं ठरवलं. बायबल कथांचं माझं पुस्तक याचा वापर करून वर्गामध्ये तिने झेंडावंदन या विषयावर माहिती सांगितली. बायबलमधील शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांच्याविषयी दिलेल्या अहवालाचा तिच्या निर्णयावर कसा परिणाम झाला, हे तिने समजावून सांगितलं. ती म्हणाली: “यहोवाने त्या तीन इब्री तरुणांना वाचवलं, कारण त्यांनी कोणत्याही मूर्तीची उपासना केली नाही.” त्यानंतर तिने उपस्थित असलेल्यांना त्या पुस्तकाची प्रत देऊ केली. तिच्या वर्गसोबत्यांपैकी अकरा जनांनी ती घेतली. यहोवाने दिलेल्या धैर्यामुळे आणि बुद्धीमुळे या संवेदनशील विषयावर आपली बाजू मांडता आली, याबद्दल या लहान मुलीला खूप आनंद झाला.

‘यहोवा माझी खरोखर काळजी घेतो का?’ अशी शंका कधी तुमच्या मनात उपस्थित झालीच तर बायबलमधील स्तोत्र ३४:१७-१९; ५५:२२; आणि १४५:१८, १९ यांसारख्या वचनांवर मनन करा. यहोवाची वर्षानुवर्षे सेवा केलेल्यांना विचारा, की यहोवाने त्यांची कशी काळजी घेतली. आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज भासते तेव्हा यहोवाकडे प्रार्थना करा. असं केल्याने यहोवा खरोखर “तुमची काळजी घेतो” हे तुम्ही अनुभवू शकाल.