व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभिवादन करण्याचे फायदे!

अभिवादन करण्याचे फायदे!

“नमस्ते! कसे आहात तुम्ही?”

तुम्ही अनेकदा अशा प्रकारचं अभिवादन केलंच असेल. अभिवादन करताना कदाचित तुम्ही हात मिळवला असेल किंवा आलिंगन दिलं असेल. प्रत्येक ठिकाणी अभिवादनाचे शब्द किंवा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. पण मूळ पद्धतीत जास्त फरक नसतो. अभिवादन न केल्यामुळे किंवा त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे तुम्ही दयाळू नाहीत किंवा तुमच्यावर चांगले संस्कार नाहीत असं कदाचित लोकांना वाटेल.

पण सर्व जण अभिवादन करायला तयार नसतात. काही जण अभिवादन करायला कचरतात कारण ते लाजाळू असतात किंवा ते स्वतःला कमी लेखतात. काहींना वेगळ्या वंशाच्या किंवा संस्कृतीच्या लोकांना आणि समाजात वेगळं स्थान असणाऱ्‍यांना अभिवादन करायला अवघड जातं. पण तरीही थोडक्यात केलेल्या अभिवादनामुळेही सकारात्मक परिणाम घडून येऊ शकतात.

स्वतःला विचारा: ‘अभिवादन केल्याने कोणते चांगले परिणाम होऊ शकतात? आणि अभिवादन करण्याच्या बाबतीत मी देवाच्या वचनातून काय शिकू शकतो?’

“सर्व प्रकारच्या” लोकांचं अभिवादन करा

जेव्हा प्रेषित पेत्रने पहिला विदेशी कर्नेल्य याचं ख्रिस्ती मंडळीत स्वागत केलं तेव्हा तो म्हणाला: “देव भेदभाव करत नाही.” (प्रे. कार्ये १०:३४) नंतर पेत्रने लिहिलं की “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा” असं देवाला वाटतं. (२ पेत्र ३:९) सुरुवातीला आपण कदाचित हे वचन सत्य शिकत असणाऱ्‍या नवीन व्यक्‍तीच्या बाबतीत लागू करू. पण पेत्रने ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन दिलं की “सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा, संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम करा.” (१ पेत्र २:१७) यामुळे आपण सर्वांना अभिवादन केलं पाहिजे. मग ते कोणत्याही वंशाचे, संस्कृतीचे किंवा पार्श्‍वभूमीचे असले तरीही. असं करण्याद्वारे आपण त्यांना आदर आणि प्रेम दाखवू शकतो.

प्रेषित पौलने मंडळीला असा आर्जव केला: “ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार [“स्वागत,” तळटीप] केला, तसा तुम्हीसुद्धा एकमेकांचा स्वीकार करा.” (रोम. १५:७) पौलने अशा बांधवांचा खास उल्लेख केला जे त्याला “धीर देणारे साहाय्यक” असे ठरले होते. देवाच्या लोकांना सैतानाच्या तीव्र हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या बांधवांनाही धीराची जास्त गरज कधी नव्हे इतकी आज आहे.—कलस्सै. ४:११, तळटीप; प्रकटी. १२:१२, १७.

शास्त्रात दिलेल्या उदाहरणांवरून कळतं की अभिवादन केल्यामुळे इतरांचं स्वागत तर होईलच, पण यामुळे आणखी फायदेही होतील.

सांत्वन, प्रोत्साहन, प्रेम

जेव्हा देवाच्या पुत्राला मरीयाच्या गर्भात स्थलांतरित करण्याची वेळ आली, तेव्हा संदेश द्यायला यहोवाने एका देवदूताला तिच्याकडे पाठवलं. “हे आशीर्वादित कुमारी! तुला शांती असो. यहोवा तुझ्यासोबत आहे” असं म्हणून देवदूत तिच्याशी बोलू लागला. हे ऐकून मरीया “मोठ्या गोंधळात पडली.” कारण तिला कळतं नव्हतं की एक देवदूत तिच्यासोबत का बोलत आहे. हे पाहून देवदूत तिला म्हणाला: “मरीया, घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.” त्याने तिला समजावलं की तिने मसीहाला जन्म द्यावा हा देवाचा तिच्यासाठी असलेला उद्देश आहे. आणखी गोंधळून न जाता, अधीनता दाखवत मरीया म्हणाली: “पाहा! मी यहोवाची दासी आहे! तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझ्या बाबतीत घडो.”—लूक १:२६-३८.

यहोवाचा संदेशवाहक असणं त्या देवदूतासाठी एक सन्मानाची गोष्ट होती. असं असलं तरीही एका अपरिपूर्ण मनुष्यासोबत बोलणं त्याला कमी दर्जाचं वाटलं नाही. त्याने मरीयाला अभिवादन करून आपलं बोलणं सुरू केलं. आपण या उदाहरणापासून काय शिकू शकतो? आपण इतरांना अभिवादन करायला आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला तयार असलं पाहिजे. दोन शब्द बोलूनही आपण त्यांना मदत करू शकतो आणि ही खात्री पटवून देऊ शकतं की ते देवाच्या लोकांमधले एक मौल्यवान सदस्य आहेत.

आशिया मायनर आणि युरोपमध्ये असणाऱ्‍या अनेकांना पौल ओळखत होता. त्याच्या पत्रात त्याने विशिष्ट लोकांना नमस्कार पाठवला. रोमकर याच्या १६ व्या अध्यायात आपल्याला ते पाहायला मिळतं. त्या पत्रात पौल अनेक बंधुभगिनींना नमस्कार पाठवतो. यात त्याने फीबीचा उल्लेख “आपली बहीण” असा केला आणि बांधवांना आग्रह केला की त्यांनी “पवित्र जनांचे केले जावे तसे प्रभूमध्ये तिचे स्वागत करावे; तसेच, तिला जे काही साहाय्य लागेल ते करावे.” त्याने “प्रिस्का आणि अक्विल्ला” यांना नमस्कार सांगितला आणि त्यांच्याबद्दल तो म्हणाला: “केवळ मीच नाही, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे आभार मानतात.” त्याने अशा लोकांनाही नमस्कार पाठवला, ज्यांना आपण आज एवढ्या चांगल्या प्रकारे ओळखत नाही. त्यांपैकी काहींना तो अशा प्रकारे संबोधतो: “माझा प्रिय अपैनत” तसंच “प्रभूमध्ये परिश्रम करणाऱ्‍या त्रुफैना आणि त्रुफोसा” या स्त्रिया. यावरून हे स्पष्ट होतं की आपल्या बंधुभगिनींना अभिवादन करण्यात पौल तत्पर होता.—रोम. १६:१-१६.

पौलने आवर्जून त्याच्या पत्रात आपली आठवण ठेवली हे कळल्यावर त्या बंधुभगिनींना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! पौलबद्दल आणि एकमेकांबद्दल त्यांचं प्रेम नक्कीच वाढलं असेल! आणि अशा प्रकारचं प्रेमळ अभिवादन ऐकून इतर ख्रिश्‍चनांनाही नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल आणि यामुळे त्यांचा विश्‍वास मजबूत करायलाही मदत झाली असेल. आपण जे अभिवादन करतो त्यामधून एखाद्यात प्रामाणिकपणे घेतलेली आस्था आणि स्तुती दिसून आली पाहिजे. यामुळे देवाच्या एकनिष्ठ सेवकांमधली मैत्री दृढ होते व त्यांच्यातलं ऐक्य वाढतं.

जेव्हा पौल पुत्युलाच्या बंदरावर आला आणि रोमला जायला निघाला तेव्हा तिथे राहणारे ख्रिश्‍चन त्याला भेटायला दक्षिणेकडे आले. त्यांना दुरून पाहताच पौलने “देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला.” (प्रे. कार्ये २८:१३-१५) अभिवादन करताना कधी-कधी आपल्याला फक्‍त स्मितहास्य करणं किंवा हात दाखवणंच शक्य होतं. तरीही असं केल्यामुळे निराश किंवा दुःखी असलेल्या एका व्यक्‍तीला प्रोत्साहन मिळू शकतं.

समान विषय

एकदा काही ख्रिश्‍चनांना कडक शब्दात सल्ला देण्याची शिष्य याकोबला गरज भासली. कारण काही ख्रिस्ती जगासोबत मैत्री करण्याद्वारे आध्यात्मिक व्यभिचारी बनत चालले होते. (याको. ४:४) पण त्यांना सल्ला देताना याकोबने त्याच्या पत्राची सुरुवात कशी केली त्याकडे लक्ष द्या:

“ठिकठिकाणी विखुरलेल्या बारा वंशांना, देव आणि प्रभू येशू ख्रिस्त यांचा दास याकोब याचा नमस्कार!” (याको. १:१) अशा प्रकारच्या अभिवादनामुळे त्याचं पत्र वाचणाऱ्‍यांना त्याचा सल्ला स्वीकारणं सोपं गेलं असेल. कारण त्यांचं आणि याकोबचं देवासमोर सारखंच स्थान आहे हे त्यांना त्याच्या पत्रातून कळलं. खरंच नम्रपणाने केलेल्या अभिवादनामुळे गंभीर विषयांवर बोलणंही सोपं होतं.

मनापासून केलेलं अभिवादन जरी थोडक्यात केलेलं असलं तरी ते प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यातून तुमचं खरं प्रेम दिसून आलं पाहिजे; मग ते लक्षात येण्यासारखं नसलं तरीही. (मत्त. २२:३९) आयर्लंड इथे राहणारी एक बहीण सभा सुरू होणार इतक्यात राज्य सभागृहात पोहचली. ती घाईघाईने आत येत होती. तेवढ्यात एक बांधव तिच्याकडे आला व स्मितहास्य करून तिला म्हणाला: “नमस्ते. तुम्हाला पाहून आनंद झाला.” काहीच न बोलता ती तिच्या जागेवर जाऊन बसली.

काही आठवड्यांनंतर ती बहीण त्या बांधवाकडे येऊन म्हणाली की ती काही दिवसांपासून घरातल्या काही परिस्थितींमुळे त्रस्त होती. ती म्हणाली: “त्या संध्याकाळी मी खूप नाराज होते. राज्य सभागृहात मी येऊच नये असं मला वाटत होतं. त्या दिवशी सभेमध्ये काय शिकवलं ते माझ्या लक्षात नाही; पण तुम्ही केलेलं अभिवादन मात्र माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू.”

आपल्या थोडक्या शब्दात केलेल्या अभिवादनामुळे एवढा चांगला परिणाम होईल हे त्या बांधवाला माहीत नव्हतं. तो म्हणतो: “माझ्या अभिवादनाचा तिच्यावर काय परिणाम झाला आहे हे जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा मी तिला अभिवादन करण्यास पुढाकार घेतला याचा मला खूप आनंद झाला. मलाही खरंच खूप बरं वाटलं.”

शलमोनने लिहिलं: “आपले अन्‍न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.” (उप. ११:१) इतरांना अभिवादन करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवून जेव्हा आपण अभिवादन करतो, खासकरून आपल्या बंधुभगिनींना, तेव्हा फक्‍त आपल्यालाच नाही तर त्यांनाही फायदा होतो. त्यामुळे अभिवादन करण्याच्या फायद्यांना आपण कधीच कमी लेखू नये.