व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता

तो देवाची स्वीकृती मिळवू शकला असता

आपण यहोवाची सेवा करतो. यामुळे त्याचे आशीर्वाद आणि त्याची स्वीकृती मिळवण्याची आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. पण आपण देवाची स्वीकृती किंवा पसंती कशी मिळवू शकतो? बायबल काळात असे काही लोक होते ज्यांनी गंभीर पाप केलं पण देवाची स्वीकृती ते पुन्हा मिळवू शकले. तसंच, असेही काही लोक होते ज्यांच्यात चांगले गुण होते पण शेवटी त्यांनी देवाची स्वीकृती गमावली. म्हणून कदाचित तुमच्या मनात प्रश्‍न येईल: “यहोवा आपल्या प्रत्येकामध्ये काय पाहतो?” यहूदाचा राजा रहबाम याच्या उदाहरणावरून आपल्याला या प्रश्‍नाचं उत्तर शोधायला मदत होईल.

एक वाईट सुरुवात

रहबामचे वडील शलमोन यांनी ४० वर्षं इस्राएलवर राज्य केलं. (१ राजे ११:४२) शलमोनच्या मृत्यूनंतर राजा बनण्यासाठी रहबाम यरुशलेममधून शखेमला गेला. (२ इति. १०:१) शलमोन हा एक बुद्धिमान राजा म्हणून ओळखला जायचा. रहबामला राजा बनल्यावर हे सिद्ध करून दाखवावं लागणार होतं की कठीण समस्या सोडवण्याइतका तो नक्कीच बुद्धिमान आहे. मग रहबामला राजा बनण्याची भीती वाटत होती का?

आपल्यावर जुलूम होत आहे असं इस्राएली लोकांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आपले प्रतिनिधी रहबामकडे पाठवले. रहबामकडून त्यांची काय अपेक्षा होती याबद्दल त्यांनी म्हटलं: “आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आम्हावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.”—२ इति. १०:३, ४.

रहबामला आता एक कठीण निर्णय घ्यावा लागणार होता. जर त्याने लोकांच्या इच्छेनुसार निर्णय घेतला असता तर त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि महलात राहणाऱ्‍या लोकांना कदाचित काही सुखसोयी गमवाव्या लागल्या असत्या. आणि जर त्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेतला असता तर लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारला असता. मग त्याने कोणता निर्णय घेतला? तो सर्वात आधी अशा वृद्ध लोकांशी बोलला ज्यांनी त्याच्या वडिलांना मदत केली होती. त्यांनी रहबामला प्रजेचं ऐकण्याचा सल्ला दिला. पण मग रहबाम आपल्या वयाच्या लोकांशी बोलला आणि त्याने लोकांशी कठोरपणे वागण्याचा निर्णय घेतला. रहबामने प्रजेला म्हटलं: “माझ्या वडिलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हाला चाबकाने शासन केले असेल पण मी टोकदार धातूची टोके जोडलेल्या चाबकांनी शासन करीन.”—२ इति. १०:६-१४, ईझी-टू-रीड व्हर्शन.

यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आज आपल्यामध्ये अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणारे बरेच वृद्ध बांधव आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी ते आपली मदत करू शकतात. त्यामुळे आपण सुज्ञ होऊन त्यांचा सल्ला ऐकण्याचा प्रयत्न करू या.—ईयो. १२:१२.

“त्यांनी परमेश्‍वराचे हे वचन ऐकले”

रहबामने या बंडखोर गोत्रांशी लढण्यासाठी सैन्य गोळा केलं. पण यहोवाने शमाया संदेष्ट्याला त्याच्याकडे पाठवून म्हटलं: “आपले बांधव इस्राएल यांवर स्वारी करून लढू नका; तुम्ही सर्व आपआपल्या घरी परत जा; कारण ही माझी करणी आहे.”—१ राजे १२:२१-२४. *

यहोवाच्या म्हणण्यानुसार करणं रहबामला सोपं गेलं का? लोकांनी त्यांच्या नवीन राजाबद्दल काय विचार केला असता? त्याने तर म्हटलं होतं की तो लोकांना “टोकदार धातूची टोके जोडलेल्या चाबकांनी शासन” करेल. आणि आता तर तो या बंडाळीविरुद्ध काहीच करणार नव्हता. (२ इतिहास १३:७ पडताळून पाहा.) लोक त्याच्याविषयी काय विचार करत आहेत हे त्याच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. राजा आणि त्याच्या सैन्याने “परमेश्‍वराचे हे वचन ऐकले व त्याप्रमाणे ते सगळे परत चालते झाले.”

यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? इतरांनी आपल्याला नावं ठेवली तरी देवाची आज्ञा पाळणं सुज्ञपणाचं आहे. आपण आज्ञाधारक राहतो तेव्हा देव आपल्याला नेहमी आशीर्वाद देतो.—अनु. २८:२.

देवाची आज्ञा पाळल्यामुळे रहबामला आशीर्वाद मिळाला का? हो. यहूदा आणि बन्यामीन गोत्रांवर रहबाम राज्य करत राहिला आणि त्याने त्यांच्या क्षेत्रात नवीन शहरं बांधण्याचंही ठरवलं. यासोबतच, त्याने काही शहरांना “अधिक मजबुती आणली.” (२ इति. ११:५-१२) महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने काही काळासाठी यहोवाचे नियम पाळले. दहा गोत्रांनी मूर्तिपूजा सुरू केली होती. त्यामुळे तिथले अनेक लोक रहबाम आणि खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देण्यासाठी यरुशलेमला आले. (२ इति. ११:१६, १७) रहबामने यहोवाची आज्ञा पाळल्यामुळे त्याचं राज्य आणखी शक्‍तिशाली बनलं.

रहबामने केलेलं पाप आणि पश्‍चात्ताप

रहबामचं राज्य मजबूत झाल्यावर त्याने अनपेक्षित असं काहीतरी केलं. त्याने यहोवाची आज्ञा मानण्याचं सोडून दिलं आणि खोट्या दैवतांची उपासना करायला सुरुवात केली. त्याने असं का केलं? अम्मोनी असणाऱ्‍या आपल्या आईच्या प्रभावामुळे त्याने तसा निर्णय घेतला का? (१ राजे १४:२१) हे आपण सांगू शकत नाही. पण त्याच्या राष्ट्राच्या लोकांनी त्याच्या वाईट उदाहरणाचं अनुकरण केलं. म्हणून यहोवाने इजिप्तचा राजा शिशक याला यहूदा राज्यातली बरीच शहरं काबीज करू दिली. रहबामने शहरांना मजबूत केलं होतं, पण तरीही ती काबीज करण्यात आली.—१ राजे १४:२२-२४; २ इति. १२:१-४.

रहबाम राज्य करत असलेल्या शहरावर म्हणजे यरुशलेमवर जेव्हा शिशक आपल्या सैन्यासोबत चढाई करायला आला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. त्या वेळी शमाया संदेष्ट्याने रहबाम आणि त्याच्या सरदारांना देवाचा संदेश दिला. त्याने म्हटलं: “तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हाला सोडून तुम्हास शिशकाच्या हाती दिले आहे.” यहोवाने रहबामला शिस्त लावली. यावर त्याची प्रतिक्रिया काय होती? त्याने सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. त्याबद्दल बायबल म्हणतं: “तेव्हा इस्राएलाचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की परमेश्‍वर न्यायी आहे.” याचा परिणाम म्हणजे, यहोवाने रहाबामची सुटका केली आणि यरुशलेमला नाश होण्यापासून वाचवलं.—२ इति. १२:५-७, १२.

त्यानंतर रहबाम यहूदा राष्ट्रावर राज्य करत राहिला. मरणापूर्वी त्याने त्याच्या मुलांना बऱ्‍याच भेटवस्तू दिल्या. कारण त्याला अबीयाला राजा बनवायचं होतं आणि अबीयाच्या भावांनी त्यांच्याविरुद्ध बंड करू नये म्हणून त्याने असं केलं. (२ इति. ११:२१-२३) तरुण असताना रहबामने नेहमीच सुज्ञ निर्णय घेतले नसले, तरी या वेळी मात्र त्याने सुज्ञपणा दाखवला.

रहबाम चांगला होता की वाईट?

रहबामने जरी काही चांगली कार्यं केली, तरी बायबल त्याच्या शासनकाळाबद्दल म्हणतं: “जे वाईट ते त्याने केले.” त्याच्याबद्दल असं का म्हटलं आहे? “कारण परमेश्‍वराच्या भजनी त्याने चित्त लावले नाही.” म्हणून तो यहोवाची पसंती मिळवू शकला नाही.—२ इति. १२:१४.

रहबामचं दावीदसारखं यहोवासोबत घनिष्ठ नातं नव्हतं

रहबामच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्याने काही वेळा यहोवाच्या आज्ञा पाळल्या आणि यहोवाच्या लोकांसाठी काही चांगली कार्यंही केली. पण यहोवासोबत त्याचा नातेसंबंध घनिष्ठ नव्हता आणि यहोवाचं मन आनंदित करण्याचा त्याचा निर्धार पक्का नव्हता. त्यामुळे त्याने चांगल्या गोष्टी सोडून खोट्या दैवतांची उपासना करायला सुरुवात केली. तुम्ही कदाचित विचार कराल: ‘रहाबामला आपल्या पापांबद्दल खरोखर पस्तावा वाटत होता आणि त्याला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं म्हणून त्याने यहोवाकडून मिळालेलं ताडन स्वीकारलं का? की फक्‍त इतर जण सांगत होते म्हणून त्याने तसं केलं?’ (२ इति. ११:३, ४; १२:६) आपल्या जीवनाच्या अखेरीस जे चुकीचं आहे ते त्याने केलं. तो आपला आजोबा दावीद याच्यापेक्षा फार वेगळा होता. हे खरं आहे की दावीदच्या हातून चुका घडल्या. पण दावीदला आपल्या गंभीर पापांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप होता आणि त्याने आयुष्यभर यहोवावर प्रेम केलं व खऱ्‍या उपासनेची बाजू घेतली.—१ राजे १४:८; स्तो. ५१:१, १७; ६३:१.

बायबलच्या या अहवालातून आपण बरंच काही शिकू शकतो. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं आणि इतरांसाठी चांगली कार्यं करणं नक्कीच प्रशंसनीय आहे. पण यहोवाची स्वीकृती मिळवण्यासाठी आपण त्याच्या इच्छेनुसार त्याची उपासना केली पाहिजे आणि त्याच्यासोबत आपला नातेसंबंध घनिष्ठ असला पाहिजे.

हे ध्येय गाठण्यासाठी आपलं यहोवावर गाढ प्रेम असणं गरजेचं आहे. आग जळत राहावी म्हणून तिच्यात लाकडं घालत राहणं गरजेचं असतं. त्याप्रमाणेच यहोवासाठी असलेलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्या वचनाचं नियमित वाचन, त्यावर खोलवर विचार आणि प्रार्थना करत राहणं गरजेचं आहे. (स्तो. १:२; रोम. १२:१२) प्रत्येक कार्यांतून यहोवाचं मन आनंदित करण्याचं प्रोत्साहन आपल्याला या प्रेमामुळे मिळेल. त्यासोबतच, आपल्या हातून चुका घडल्यावर मनापासून पश्‍चात्ताप दाखवण्याचं आणि क्षमेसाठी यहोवाला प्रार्थना करण्याचं आपल्याला प्रोत्साहन मिळेल. या गोष्टी करण्याद्वारे, आपण दाखवून देऊ की आपण रहबामसारखे नसून खऱ्‍या उपासनेला नेहमी पाठिंबा देणारे आहोत!—यहू. २०, २१.

^ परि. 9 शलमोन अविश्‍वासूपणे वागला. त्यामुळे देवाने आधीच सांगितलं होतं की त्याच्या राज्याची दोन भागात विभागणी होईल.—१ राजे ११:३१.