व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या

देवाच्या नियमांना व तत्त्वांना तुमच्या विवेकाला प्रशिक्षित करू द्या

“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.”—स्तो. ११९:९७.

गीत क्रमांक: २९, ११

१. कोणत्या गोष्टीमुळे आपण प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत?

यहोवाने मानवांना एक खास गोष्ट दिली आहे. ती म्हणजे आपला विवेक. या एका गोष्टीमुळे आपण प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत. आदाम-हव्वा यांच्याकडे विवेक होता असं आपण का म्हणू शकतो? देवाची आज्ञा मोडल्यानंतर ते त्याच्यापासून लपले. यावरूनच कळतं की त्यांचा विवेक त्यांना सतावत होता.

२. आपला विवेक होकायंत्रासारखा कसा आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

विवेक आपल्यात असणारी एक अशी जाणीव आहे ज्यामुळे योग्य व अयोग्य यांमधला फरक आपल्याला कळतो. आणि यामुळे जीवनात मार्गदर्शन मिळवायला आपल्याला मदत होते. एका व्यक्‍तीचा विवेक जर चांगल्या प्रकारे प्रशिक्षित नसेल तर ती व्यक्‍ती अशा जहाजासारखी आहे जिचं होकायंत्र * मोडलेलं आहे. वारा आणि समुद्री प्रवाहामुळे ते जहाज चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. पण नीट चालणाऱ्‍या होकायंत्रामुळे कॅप्टनला जहाज योग्य दिशेला न्यायला मदत होते. त्याच प्रकारे, जर आपण आपल्या विवेकाला योग्य प्रशिक्षण दिलं तर ते आपलं योग्य मार्गदर्शन करेल.

३. विवेकाला योग्यपणे प्रशिक्षण न दिल्यामुळे काय घडू शकतं?

आपला विवेक योग्यपणे प्रशिक्षित नसेल तर चुकीच्या गोष्टी करण्यापासून तो आपल्याला सावध करणार नाही. (१ तीम. ४:१, २) यामुळे आपण कदाचित “वाईटाला बरे” म्हणू. (यश. ५:२०) येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला ठार मारणारा प्रत्येक जण, आपण देवाची पवित्र सेवा केली आहे असं समजेल.” (योहा. १६:२) स्तेफनची हत्या करणाऱ्‍यांनीही असाच विचार केला होता. (प्रे. कार्ये ६:८, १२; ७:५४-६०) इतिहासात अनेकदा आपल्याला अशा धार्मिक लोकांबद्दल वाचायला मिळतं ज्यांनी हत्येसारखी वाईट कृत्यं केली आहेत. ती त्यांनी देवासाठी केली असा ते दावा करतात. पण खरंतर त्यांनी देवाचे नियम मोडले आहेत. (निर्ग. २०:१३) यावरून स्पष्टच होतं, की त्यांच्या विवेकाने त्यांचं योग्य मार्गदर्शन केलेलं नाही.

४. आपला विवेक नीट काम करत आहे की नाही याची खात्री आपण कशी करू शकतो?

आपला विवेक नीट काम करत आहे की नाही याची आपण खात्री कशी करू शकतो? बायबलमध्ये दिलेले नियम आणि तत्त्वं “शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी” आहेत. (२ तीम. ३:१६) आपण बायबलचं नियमित वाचन केलं पाहिजे, त्यावर खोलवर विचार केला पाहिजे आणि वाचलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू केल्या पाहिजेत. असं केल्यामुळे आपण यहोवासारखा विचार करायला लागू. मगच आपण खात्रीने म्हणू शकतो, की आपला विवेक योग्य मार्गदर्शन करायला प्रशिक्षित झाला आहे. यहोवाने दिलेल्या नियमांमुळे आणि तत्त्वांमुळे आपण आपल्या विवेकाला कसं प्रशिक्षित करू शकतो, यावर आता आपण चर्चा करू या.

देवाच्या नियमांद्वारे प्रशिक्षित व्हा

५, ६. देवाने दिलेल्या नियमांमुळे आपल्याला कशी मदत होते?

देवाच्या नियमांनी तुम्हाला प्रशिक्षित करावं अशी जर तुमची इच्छा असेल, तर ते नियम फक्‍त वाचणं किंवा माहीत असणंच पुरेसं नाही. आपल्याला त्या नियमांबद्दल प्रेम आणि आदर असला पाहिजे. बायबल आपल्याला म्हणतं: “वाइटाचा द्वेष करा, बऱ्‍याची आवड धरा.” (आमो. ५:१५) आपण हे कसं करू शकतो? यासाठी आपण यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हे समजण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या: तुम्हाला चांगली झोप लागत नाही म्हणून डॉक्टर तुम्हाला पौष्टिक आहार, जास्त व्यायाम आणि जीवनशैलीत काही बदल करायला सांगतात. तुम्ही त्यांच्या सल्ल्याचं पालन करता आणि तुमची झोपेची समस्या नाहीशी होते. यामुळे डॉक्टरांनी दिलेला सल्ला खरंच खूप उपयुक्‍त होता असा तुम्ही विचार करणार नाही का?

त्याच प्रकारे, पापाच्या वाईट परिणामांपासून आपलं संरक्षण होण्यासाठी व आपलं जीवन सुधारण्यासाठी आपल्या सृष्टिकर्त्याने आपल्याला नियम दिले आहेत. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलं आहे की आपण खोटं बोलू नये, चोरी करू नये, कोणाला फसवू नये. तसंच त्यात हेही सांगितलं आहे की आपण अनैतिक कार्य, हिंसा किंवा भूतविद्या या गोष्टींपासून लांब राहावं. (नीतिसूत्रे ६:१६-१९ वाचा; प्रकटी. २१:८) यहोवाच्या नियमांचं पालन केल्यामुळे आपल्याला जे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात त्यामुळे आपलं यहोवावरचं आणि त्याच्या नियमांवरचं प्रेम आणखी वाढत जातं.

७. बायबलच्या अहवालांवरून आपल्याला कशी मदत होते?

देवाचे नियम मोडल्यामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात हे जाणण्यासाठी ते आपण स्वतः अनुभवण्याची गरज नाही. गत काळात इतरांनी ज्या चुका केल्या त्यांवरून आपण खूप काही शिकू शकतो. आणि अशी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. नीतिसूत्रे १:५ मध्ये म्हटलं आहे: “ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे.” हे ज्ञान म्हणजे देवाकडून येणाऱ्‍या सूचना आहेत आणि त्या सर्वोत्तम आहेत! दावीदच्या उदाहरणावरून आपण ही गोष्ट समजू शकतो. त्याने बथशेबासोबत अनैतिक संबंध ठेवले व यहोवाची आज्ञा मोडली. त्यामुळे त्याला खूपकाही सोसावं लागलं. (२ शमु. १२:७-१४) हा अहवाल वाचल्यावर स्वतःला विचारा: ‘बथशेबासोबत व्यभिचार केल्यामुळे ज्या समस्यांना दावीदला सामोरं जावं लागलं त्यांना तो कसा टाळू शकला असता? मी जर अशा परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं? मी दावीदसारखं अनैतिक कार्य केलं असतं की योसेफसारखा तिथून पळ काढला असता?’ (उत्प. ३९:११-१५) जर आपण पापाच्या भयानक परिणामांबद्दल खोलवर विचार करत राहिलो तर आपल्या मनात वाईट गोष्टींबद्दल “द्वेष” वाढत जाईल.

८, ९. (क) आपला विवेक काय करण्यासाठी आपली मदत करतो? (ख) आपला विवेक यहोवाच्या तत्त्वांनुसार कसा कार्य करतो?

आपण अशा गोष्टींपासून दूर राहतो ज्यांचा यहोवा द्वेष करतो. पण एखाद्या गोष्टीबद्दल जर बायबलमध्ये स्पष्ट नियम दिला नसेल तर काय? देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे आपल्याला कसं कळेल? आपण बायबलनुसार आपल्या विवेकाला प्रशिक्षित केलं तर आपण सुज्ञ निर्णय घेऊ.

यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपल्या विवेकाला प्रशिक्षित करता यावं म्हणून त्याने आपल्याला तत्त्वं दिली आहेत. तो म्हणतो: “मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यश. ४८:१७, १८) जेव्हा आपण बायबल तत्त्वांबद्दल खोलवर विचार करतो आणि त्यांना आपल्या हृदयावर ठसवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या विवेकाला सुधारणं व आवश्‍यक ते बदल करणं आपल्याला शक्य होतं. यामुळे आपल्याला सुज्ञ निर्णय घ्यायला मदत होते.

देवाच्या तत्त्वांद्वारे मार्गदर्शन मिळवा

१०. तत्त्व म्हणजे काय आणि त्यांचा उपयोग करून येशूने कसं शिकवलं?

१० तत्त्व म्हणजे एक असं मूलभूत सत्य, ज्यामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते. यहोवाने दिलेल्या तत्त्वांमुळे आपल्याला त्याचे विचार समजून घेता येतात. यासोबतच त्याने एखादा नियम का दिला आहे हेदेखील समजायला मदत होते. येशूने तत्त्वांचा वापर करून शिष्यांना शिकवलं की एका व्यक्‍तीला तिच्या वागण्या-बोलण्याचे परिणाम भोगावे लागतात. उदाहरणार्थ, रागामुळे हिंसा घडू शकते आणि अनैतिक विचारांमुळे व्यभिचार घडू शकतो असं त्याने शिकवलं. (मत्त. ५:२१, २२, २७, २८) यहोवाच्या तत्त्वांना आपलं मार्गदर्शन करू दिल्यामुळे आपला विवेक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होतो. यामुळे देवाचा गौरव होईल असेच निर्णय आपण घेऊ.—१ करिंथ. १०:३१.

एक प्रौढ ख्रिस्ती इतरांच्या विवेकाचा विचार करतो (परिच्छेद ११, १२ पाहा)

११. प्रत्येकाचा विवेक वेगवेगळा कसा असू शकतो?

११ बायबल प्रशिक्षित विवेक असणाऱ्‍या दोन ख्रिश्‍चनांची काही विषयांवर मतं पूर्णपणे वेगवेगळी असू शकतात, जसं की मद्यपान. बायबलमध्ये सांगितलं आहे की मद्यपान करणं चुकीचं नाही. पण अती प्रमाणात मद्याच्या सेवनाबद्दल बायबल आपल्याला सावध करतं. (नीति. २०:१; १ तीम. ३:८) मग याचा अर्थ असा होतो का, की जर एक ख्रिस्ती व्यक्‍ती प्रमाणात मद्यपान करत असेल, तर तिला आणखी कोणतीच गोष्ट लक्षात घेण्याची गरज नाही? असं नाही. एखाद्याचा विवेक जरी त्याला मद्यपान करण्याची अनुमती देत असला, तरी त्याला इतरांच्या विवेकाचाही विचार करण्याची गरज आहे.

१२. रोमकर १४:२१ या वचनामुळे आपल्याला इतरांच्या विवेकाचा आदर करायला कशी मदत होते?

१२ आपण इतरांच्या विवेकाचा आदर केला पाहिजे हे सांगण्यासाठी पौलने म्हटलं: “मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या भावाला अडखळण होईल असे काहीही न करणे हेच चांगले.” (रोम. १४:२१) आपल्याला मद्य पिण्याची सूट असली तरी त्यामुळे जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाच्या विवेकाला ठेच लागणार असेल तर मद्याचा त्याग करायला आपण तयार असलं पाहिजे. कदाचित त्या ख्रिस्ती बांधवाला सत्य शिकण्याआधी दारूचं व्यसन असावं आणि ती पूर्णपणे सोडून देण्याचा त्याने निर्धार केला असावा. आपण असं काहीही करणार नाही ज्यामुळे सोडलेल्या सवयीच्या पुन्हा आहारी जाण्यासाठी त्याला उत्तेजन मिळेल. (१ करिंथ. ६:९, १०) अशा बांधवाला आपण घरी जेवायला बोलवलं व त्याने पिण्यासाठी नकार दिला, तरीही आपण त्याला आग्रह करणार का? नक्कीच नाही!

१३. इतरांनी आनंदाचा संदेश स्वीकारावा म्हणून तीमथ्यने त्यांच्या विवेकाचा आदर कसा केला?

१३ सुंता केल्यामुळे वेदना होतील हे माहीत असूनही तीमथ्य त्यासाठी तयार झाला. कारण तो ज्या यहुदी लोकांना प्रचार करणार होता त्यांच्यासाठी सुंता करणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला माहीत होतं. पौलसारखंच तीमथ्यलासुद्धा कोणाचंही मन दुखवायचं नव्हतं. (प्रे. कार्ये १६:३; १ करिंथ. ९:१९-२३) इतरांना मदत व्हावी म्हणून स्वतःच्या इच्छांचा त्याग करायला तुम्हीदेखील तयार आहात का?

“प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट करू या”

१४, १५. (क) प्रौढ असण्याचा काय अर्थ होतो? (ख) प्रौढ ख्रिस्ती इतरांशी कसं वागतात?

१४ “ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे” जाऊन “प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट” करण्याची आपली इच्छा असली पाहिजे. (इब्री ६:१) अनेक वर्षांपासून सत्यात असल्यामुळे आपण प्रौढ ख्रिस्ती बनत नाही, तर त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आपण आपलं ज्ञान आणि समज वाढवत राहिलं पाहिजे आणि यासाठी रोज बायबलचं वाचन करणं गरजेचं आहे. (स्तो. १:१-३) जसजसं तुम्ही नियमितपणे बायबलचं वाचन कराल, तसतसं यहोवाचे नियम आणि तत्त्वं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील.

१५ प्रेमाचा नियम हा ख्रिश्‍चनांसाठी सर्वात महत्त्वाचा नियम आहे. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) प्रेमाला “राजाज्ञा” आणि “नियमशास्त्राची पूर्णता” असं म्हटलं आहे. (याको. २:८; रोम. १३:१०) बायबल म्हणतं की “देव प्रेम आहे” आणि त्यामुळे आपण समजू शकतो की प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे. (१ योहा. ४:८) प्रेम ही देवासाठी फक्‍त एक भावना नाही. तो आपल्या कार्यांद्वारे त्याचं प्रेम व्यक्‍तही करतो. योहानने म्हटलं: “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावे. यावरूनच देवाचे आपल्यावरील प्रेम दिसून आले.” (१ योहा. ४:९) आपण जेव्हा आपल्या कार्यांद्वारे यहोवावर, येशूवर, आपल्या बांधवांवर आणि इतरांवर प्रेम असल्याचं दाखवतो तेव्हा आपण प्रौढ ख्रिस्ती असल्याचं इतरांना दिसून येतं.—मत्त. २२:३७-३९.

जसजसं आपण बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांवर तर्क करतो तसतसा आपला विवेक आपल्यासाठी भरवशालायक मार्गदर्शक ठरत जातो (परिच्छेद १६ पाहा)

१६. आपण जसजसं प्रौढ ख्रिस्ती बनत जातो तसतसं आपल्यासाठी तत्त्वं महत्त्वपूर्ण का बनत जातात?

१६ आपण जसजसं प्रौढ ख्रिस्ती बनत जातो तसतसं आपल्या नजरेत तत्त्वांचं मोल वाढत जातं. नियम सहसा विशिष्ट परिस्थितीला लागू होतात, पण तत्त्वं मात्र वेगवेगळ्या परिस्थितींना लागू होतात. उदाहरणार्थ, वाईट लोकांशी मैत्री करणं धोक्याचं आहे हे एका लहान मुलाला समजणार नाही. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी पालकांनी त्याच्यासाठी काही नियम ठरवणं आवश्‍यक आहे. (१ करिंथ. १५:३३) पण जसजसं ते लहान मूल प्रौढ बनत जातं, तसतसं ते बायबल तत्त्वांबाबतीत तर्क करायला शिकतं. आणि या तत्त्वांमुळे त्याला चांगले मित्र निवडण्यासाठी मदत होईल. (१ करिंथकर १३:११; १४:२० वाचा.) आपण जितकं जास्त बायबलमधल्या तत्त्वांवर तर्क करू, तितका जास्त आपला विवेक भरवशालायक बनेल. अशा प्रकारे, एखाद्या परिस्थितीत यहोवाच्या इच्छेनुसार निर्णय कसे घ्यावेत हे चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपल्याला मदत होईल.

१७. सुज्ञ निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे पुरेशी मदत उपलब्ध आहे असं आपण का म्हणू शकतो?

१७ यहोवाचं मन आनंदित होईल असे निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे पुरेशी मदत उपलब्ध आहे. बायबलमध्ये असे नियम आणि तत्त्वं आहेत, ज्यामुळे आपल्याला “सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज” व्हायला मदत होते. (२ तीम. ३:१६, १७) यहोवा ज्या प्रकारे विचार करतो ते समजण्यासाठी आपल्याला बायबल तत्त्वांमुळे मदत होते. पण बायबलमध्ये ती तत्त्वं शोधण्यासाठी मात्र आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. (इफिस. ५:१७) आपल्या मदतीसाठी यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक, वॉचटॉवर लायब्ररी, वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररी आणि JW लायब्ररी अॅप ही साधनं उपलब्ध आहेत. आपण जेव्हा वैयक्‍तिक आणि कौटुंबिक अभ्यासादरम्यान या साधनांचा वापर करतो तेव्हा आपल्याला फायदा होऊ शकतो.

बायबल प्रशिक्षित विवेकामुळे आशीर्वाद!

१८. यहोवाने दिलेले नियम व तत्त्वं लागू केल्याने कोणते आशीर्वाद मिळतात?

१८ यहोवाचे नियम आणि तत्त्वं लागू केल्यामुळे आपलं जीवन सुधारतं. स्तोत्र ११९:९७-१०० मध्ये म्हटलं आहे: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधि पाळतो.” जेव्हा आपण देवाच्या नियमांवर आणि तत्त्वांवर खोलवर विचार करण्यासाठी वेळ काढू, तेव्हा सुज्ञपणे व समंजसपणे वागण्यासाठी आपल्याला मदत होईल. तसंच, आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्यासाठी जेव्हा आपण देवाने दिलेल्या नियमांचा व तत्त्वांचा वापर करू, तेव्हा “प्रौढता प्राप्त करून ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची” गाठणं आपल्याला नक्कीच शक्य होईल!—इफिस. ४:१३.

^ परि. 2 होकायंत्र किंवा कंपास एक असं साधन आहे ज्यात असलेली चुंबकीय सुई उत्तर दिशेला स्थिर असते. व्यवस्थित चालणाऱ्‍या होकायंत्रामुळे एक व्यक्‍ती वाट चुकत नाही.